
दोन दिवसांनी ख्रिसचा एसएमएस आला. "आज संध्याकाळी मला वेळ आहे, तुला सेलिंगची प्रॅक्टिस करायची आहे नं?"
महेश्वरला अगदी हायसं वाटलं. त्यानं एक दीर्घ श्वास सोडला.
निश्वास सोडला, अन् तो विचारात पडला. का? ख्रिसचा निरोप आल्यावर माझा जीव का भांड्यात पडला? कसली काळजी होती मला? का वाट पहात होतो मी तिच्या काॅलची? मला तिच्या पसंतीची का गरज भासली? ती अमेरिकन आहे म्हणून, का ती गोरी आहे म्हणून, का ती बाई आहे म्हणून, का ती भारत जवळून पाहूनही माझ्याशी, एका भारतीयाशी संपर्क ठेऊ पहातेय म्हणून? महेश्वर भांबावला. कामावर असल्याने त्याने विचार झटकले.
"नक्कीच!", त्याने उत्तर पाठवले. तसाही तो रोज डाॅकवर जात होताच.
आज लेकवर जाताना ते विचारांचं वादळ परत त्याच्या मनात घोंघावायला लागलं. असं का वाटावं मला? का मला तिच्या गुड बुक्स मधे जायची हौस आहे? गाडीच्या वेगाबरोबर विचारांनी गती घेतली.
आपण परदेशात आहोत. म्हणावं असं ओळखीचं, जिवाभावाचं कोणी नाही. इथल्या रितीभाती निराळ्या, अनोळखी. इथली आपली सगळी नाती वरवरची, कामापुरती. त्या नात्यांमध्ये जीव नाही. रोजच्या कामाच्या धबडश्यात ह्या गोष्टी फार लक्षातही येत नाहीत म्हणा. पण.. पण कधी तरी असं काहीतरी घडतं, अन त्या दिखावेपणाचा पातळ पापुद्रा दूर होतो. ख्रिसनं सुरुवातीला आपल्याला नाकारलं. तिनं भारतीय म्हणून आपल्याला अव्हेरलं, याचा कुठेतरी वर्मी घाव बसलाय. मला म्हणून नाकार, चालेल. पण कुठल्या तरी चुकीच्या समजुतींमुळे नको.
विचारांच्या गुंत्यातून हा उत्तराचा धागा हाती लागताच महेश्वर सुखावला. आपण ती अमेरिकन, गोरी, वा बाई आहे म्हणून तिच्या पसंतीची अपेक्षा करत नाही आहोत हे उमजून शांतावला. मधल्या काळात महेश्वरला आता फारसे दिवस या ठिकाणी राहिले नाहीत हे कळलं होते. मायदेशी परत जावे लागणार याबद्दल घरी जायचा आनंद आणि एक पर्व संपणार याचा खेद यांच्या सीमारेषेवर तो उभा होता. पण भारतात परत कधी सेलिंग करायला मिळेल याची निश्चिती नाही हे त्याला पक्कं ठावूक होतं. आहे वेळ तर सर्टिफिकेट जाऊ द्या, सेलिंग तर करून घेऊ, असा त्याचा पवित्रा होता.
त्याच्यापाठोपाठ ख्रिस डाॅकवर पोहोचलीच.
डॉकमास्टर म्हणाला, "नवीन बोट कशाला काढता, ती बघा एक बोट परत येते आहे."
हे त्यांच्या पथ्यावरच पडले. नवी बोट शीड चढवून तयार करायची म्हणजे अर्धा तास गेला असता. मग सेलिंगला फार तर अर्धा पाऊण तासच मिळाला असता. समोरची बोट आली. ती मंडळी उतरली. या दोघांनी नौकेचा ताबा घेतला. ख्रिस म्हणाली "बोट डॉक एरियातून बाहेर काढायला शिकला आहेस ना? मग तूच घे सुकाणू हातात." धडधडत्या हृदयाने महेश्वर सुकाणू हाती धरून बसला. नशिबानं वारं डॉककडून लेकच्या दिशेने वाहात होतं. जिब सेल (छोटं शीड) आणि सुकाणू यांची योग्य सांगड घालताच शिडात वारं भरलं आणि बोट पाण्यातून सरसर पुढे सरकायला लागली.
मुख्य लेक मध्ये जायला एक काटकोनात वळण घ्यायचं होतं. महेश्वर नुस्तं सुकाणू वळवणार हे जाणवताच ख्रिस म्हणाली, "जिब मोकळं सोड, नाही तर आपटशील..." महेश्वर भानावर आला, आणि त्यानं दोन्ही अवधानं नीट निभावत बोट डॉकवरून बाहेर काढली. मोकळ्या पाण्यावर आली बोट आणि ख्रिसनं झपाझप मुख्य शिड वरती चढवलं. आख्ख्या शिडात वारं भरलं... एक उसळी घेतली अन् नौका डौलात सरसर पाणी कापत धावायला लागली! सेलिंग मधला हा एक इतका समाधानाचा क्षण असतो, विचारू नका. नवशिक्याचं मन उचंबळतं, चित्तवृत्ती थाऱ्यावर रहात नाहीत. कानात वारं शिरलेलं वासरू आणि शिडात वारं भरलेला नवशिक्या - एकच! ख्रिसच्या "यर डूइंग गुड" या शेऱ्यानं महेश्वर खुलला. पलिकडचा काठ जवळ यायला लागला तसं ख्रिसनं विचारलं "कसं वळणार? टॅक का जाईब" आता तिने महेश्वरचं अलगदपणे प्रशिक्षण सुरू केलं. नाकावर वारा असताना, पाठीवर वारा असताना, वारा दिशा बदलून आडवा यायला लागला की... वेगवेगळी मनूव्हर सुरू झाली. महेश्वरच्या हातात मेन शीट आणि सुकाणू होतं. बोटीच्या एका कडेवर बसून हातात जिब शीट धरून ख्रिस त्याला सूचना देत होती. महेश्वर बरा हाकतोय होडी याचा अंदाज आल्यावर ख्रिस म्हणाली, "हे घे जिब शीट. आता तू ठरव कुठे आणि कसं जायचं ते." महेश्वर फुशारला. आता वारा थोडा पडला होता. बोट जरा आस्तेकदम चालली होती. ख्रिस बोटीच्या कललेल्या बाजूला बसली होती. महेश्वर जरा रिलॅक्स झाला. सूर्यास्त जवळ आला होता. लेकचा दूरचा भाग आता काठावरच्या उंच झाडांच्या सावल्यांनी आच्छादला होता. पाण्यावर पसरलेली सोनकळा आता विरू लागली होती.
एकदम ख्रिस म्हणाली, "जोरात वारा येतो आहे डावीकडून, लक्ष दे!"
हे तिने म्हणेस्तवर वाऱ्याचा झोत येऊन शिडे टरारा फुगली. बोटीनं वेग घेतला अन आणखीनच कलली. बोट तर महेश्वरनं सावरली. पण तो जोराचा वारा, त्याबरोबर उठलेल्या लाटा आणि बोटीचा वाढलेला कल यांचा एकत्र परिणाम होऊन जे पाणी उडलं त्या फवाऱ्यानं ख्रिसला सचैल स्नान घातलं! लगेच भानावर येऊन महेश्वरनं मेन सेल सैल सोडले. होडीचा वेग झटक्यात कमी झाला. कलणं कमी झालं. आता बहुतेक ख्रिस त्याची सालं काढणार या विचारानं तो अस्वस्थ झाला. सॉरी, सॉरी करून क्षमायाचना करू लागला. पण त्याच्या सुदैवानं ख्रिसनं फार मनावर घेतलं नाही.
"बी केअरफुल यंग मॅन! इट इजन्ट जेन्टलमनली वेट्टींग ए फिमेल कंपॅनिअन ऑन परपझ!" पण हे म्हणताना तिचा टोन खेळकर होता. तिनं हा प्रसंग लाईटली घेतला त्यामुळे त्याचं टेन्शन कमी झालं. पण जिब शीट हातात घेऊन ती बोटीच्या पुढच्या भागात गेली. आता महेश्वर आणि ख्रिस यांच्यामध्ये मेन सेल होतं.
महेश्वरनं विचारलं, "पण तुला कसं कळलं, ख्रिस, की तिकडून जोरात वारा येतोय?"
ती हलकेच हसली, "अरे, लांब पाण्यावर ज्या लाटा किंवा तरंग उठतात त्यांच्याकडे लक्ष ठेवायचं असतं. पाण्याचा रंग, त्याची छटा बदलेली दिसते. फार बारकाईनं बघावं लागतं. त्यातूनच वारा कुठून आणि कसा येतोय ते लवकर कळतं. डोन्ट वरी, तुला हळूहळू कळायला लागेल!"
दिवस थंडीचे होते. वाराही वेगात वाहू लागला होता. महेश्वर ख्रिसला म्हणाला, "ओली झाली आहेस तू, आपण परत जाऊ या. उगाच आजारपण नको."
ती पण म्हणाली "ओके, लेट्स हेड बॅक".
तसाही बोटीचा वेग कमी झाला होता. बोट डॉकच्या दिशेनेच चालली होती. पण आता वारा उलटा असल्यानं महेश्वर आणि ख्रिसनं जागा बदलल्या. बघताबघता तिनं सहज नाव काटकोनात वळवून डॉकला लावली. डॉकमास्टरनं ती ओली झाली आहे हे पाहून काही विनोद केले. पण एकंदर मामला सगळा मजेत घेतला गेला. या सगळ्या भानगडीत महेश्वरचं ब्लडप्रेशर बरंच वर गेलं होतं. डॉकवर आल्यावर तो थकून खाली बसला. ख्रिसनं येऊन त्याच्या खांद्यावर थोपटले. फार मनावर घेऊ नकोस म्हणाली. येतेच असं म्हणून ती पार्कमध्ये असलेल्या लेडीज वॉशरूमकडे गेली. महेश्वरनं डॉकमास्टरला बोट नीट बांधायला अन् झाकायला मदत केली. इतरही दोनतीन बोटींची व्यवस्था लावली. ते झाले अन् डाॅकमास्टर म्हणाला, "झाली वेळ, मी निघतो आता."
ख्रिसची वाट पहात महेश्वर त्या बॉक्सवर टेकून पाण्याकडे नजर लावून बसला होता. सरत्या संध्याकाळचा प्रकाश बापुडवाणा दिसत होता. वाऱ्यात किनाऱ्यावरच्या उंच सूचिपर्णी वृक्षांचे शेंडे डोलत होते. वाऱ्याच्या लहरींमुळे लाटाही नेहमीपेक्षा जास्त होत्या. सेलिंग साठी म्हणून तो शॉर्ट्स आणि टीशर्ट मध्ये होता. त्यालाही वाऱ्यानं शिरशिरी भरली. ही ख्रिस कुठे कडमडली आहे? पण आपल्याच गाढवपणानंच ती पूर्ण भिजली आहे हे आठवून महेश्वर गप्प झाला. मागे वळून बघतो तर लेडीज वॉशरूम मधून पूर्ण वेषांतर करून ख्रिस येत होती. तिचा सेलिंगचा ड्रेस बदलून ती प्रोफेशनल ड्रेसमध्ये आली होती. बहुतेक कामावरून डायरेक्ट लेकवर आली असणार. त्यामुळेच तिला ओले झालेले बदलायला कपडे तरी मिळाले असावेत. स्लॅक्स, शर्ट, जॅकेट, हील्स, वर बांधलेले केस या सगळ्यांमुळे फारच वेगळी दिसत होती. ती महेश्वरच्या शेजारी येऊन बसली. महेश्वर अजूनही बावरलेलाच होता. पण ती छान मूडमध्ये होती. विषय भिजण्याचा होता. तिला भारतयात्रेत गंगेच्या निवळशंख पाण्याची, केलेल्या बोटिंगची, मारलेल्या बुड्यांची आठवण येत होती. ती किस्से घोळवून घोळवून सांगत होती. खळखळून हसत होती. कुणी बाबा, कुणी महाराज, त्यांचे आश्रम, तो योगा ॲन्ड मेडिटेशन याबरोबरच त्यांच्या लकबी, ते गांजा ओढणं, ती तंद्री हे ती रंगवून सांगत होती.
एक बनारस आणि त्याचे घाट सोडले तर ती भारतीय समजून जे जग वर्णन करत होती ते महेश्वरला केवळ अनोळखी होते, ऐकून माहिती होते. त्यातही ते एका फॉरेनर युवतीच्या दृष्टितून बघताना, ऐकताना वेगळीच निखार येत होती. ती मनानं नवथर तरुणी होऊन भारतात गंगेच्या किनारी स्वच्छंद विहरत होती. यमुनेकाठी गुंजणारा वेणुनाद तिच्या कानांत रुंजी घालत होता. नगाधिराज हिमालयाच्या बर्फाच्छादित शिखरांवरून येणारे गार वारे तिच्या सोनेरी बटांशी खेळत होते. हेच पाणी तिथेही होतं, तिथेही संधिप्रकाश होता. पण तिथं तिच्याबरोबर एक नवखा भारतीय तरूण होता का? ते कळायला मार्ग नव्हता. इथे मात्र महेश्वर होता. तो मोहरला होता. त्याच्या अंगावर उठलेल्या रोमांचांचा त्या थंड हवेशी काही संबंध नव्हता!
अचानक मागे पार्क रेंजर्सची गाडी आली. पार्क बंद व्हायची वेळ झाली होती. दोघेही भानावर आले.
ख्रिस म्हणाली, "एमके, आणखी एक सत्र घेतलं तुझं सेलिंगचं तर तुझी टेस्ट देण्याइतपत तयारी होईल. बघ, भेटायचं का उद्या? मला वेळ आहे."
महेश्वरच्या तोंडावर आलं होतं, की बाई मला आता सेलिंगच्या टेस्टचा अन् सर्टिफिकेटचा काही उपयोग नाही. पण त्यानं ते शब्द गिळून टाकले. म्हणाला, "उद्या नं? हो, चालेल की!"
गुडबाय करून दोघेही आपापल्या गाड्यांकडे वळले. त्याला पुन्हा थंडीची जाणीव झाली. कुडकुडत महेश्वर गाडीत बसू लागला. पलिकडच्या काठावर लागलेले दिवे पाण्यात परिवर्तित झालेले त्याला दिसत होते.
(क्रमश:)
वाचतोय!
वाचतोय!
मस्त!
मस्त!
छानच आहे..
छानच आहे..
मस्तच. एकदम वेगळी थीम आहे.
मस्तच. एकदम वेगळी थीम आहे.
चित्रे पण सुरेख आहेत.
हा ही भाग चांगला आहे पण छोटा
हा ही भाग चांगला आहे पण छोटा आहे. जरा मोठे भाग टाकलेत तर बरं होईल.
मस्त आहे हा भाग पण.. पुभाप्र
मस्त आहे हा भाग पण.. पुभाप्र
वाचतोय
वाचतोय आवडले
सुंदर वर्णन! आवडतेय
सुंदर वर्णन! आवडतेय
उत्साहवर्धक प्रतिसादाबद्दल
उत्साहवर्धक प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार!
>>>>>> इथे मात्र महेश्वर होता
>>>>>> इथे मात्र महेश्वर होता. तो मोहरला होता. त्याच्या अंगावर उठलेल्या रोमांचांचा त्या थंड हवेशी काही संबंध नव्हता!
सह्ही!
मस्तच आहे गोष्ट.
मस्तच आहे गोष्ट.