रंग पाण्याचे - भाग १

Submitted by Abuva on 11 January, 2023 - 22:24
Docked Sailboats in gathering dusk (DALLE-2)

त्यादिवशी महेश्वर डॉकवर पोचला तेव्हा शुकशुकाट होता. अंधार व्हायला तास-दीडतासच राहिला होता. मावळतीला झुकलेल्या सूर्याची किरणं पाण्याला सुवर्णझळाळी देत होती. डॉकच्या पायऱ्या चढून वर येताना त्याला सेलिंग क्लबच्या टूल चेस्टवर एक स्त्री बसलेली दिसली. "आज ही कोणे डॉकमास्टर?" तोपर्यंत तिचंही लक्ष महेश्वरकडे गेलं होतं. त्यानं हाय म्हणताच तिनंही हसून प्रतिसाद दिला.
"आय ॲम महेश्वर. आर यू द डॉकमास्टर टुडे?" असं म्हणताच तिच्या चेहेऱ्यावर आश्चर्य उमटलं.
"हो. तू सेलिंग क्लब मध्ये आहेस?" तिच्या चेहेऱ्यावरचं आश्चर्य मावळायला तयार नव्हतं. महेश्वरनं खिशातून मेंबरशिप कार्ड काढून तिच्या समोर धरलं.
"मी ख्रिस्टिना, काॅल मी ख्रिस." तिनं डोळ्यावरचा गॉगल डोक्यावर सरकवला. कार्डवरचं नाव वाचून त्याच्या नावाचा तिनं धडपडत उच्चार केला.
"एव्हरीवन कॉल्स मी एमके", महेश्वर समजुतीने म्हणाला.
"ओके! ते बरं आहे! ", तिच्या चेहेऱ्यावर नाराजी उमटली.
"मला माझे तास पूर्ण करायचे आहेत. कुणी जोडीला असलं तर सेलिंग करावं, म्हणून आलो होतो."
"इतक्या उशीरा? आज कठीण दिसतंय. आपली‌ एकच बोट आहे लेकमध्ये. येतीलच ते परत इतक्यात", ती जरा अंतरावर दिसणाऱ्या एका सेल बोटीच्या शिडाकडे बघत म्हणाली.
महेश्वरनं पुस्ती जोडली, "मला स्वयंसेवक म्हणूनही तास भरायचे आहेत."
ती गप्प बोटीकडे बघत राहिली.
थोड्या वेळानं तिनं मान फिरवून महेश्वरकडे बघितलं. एक क्षण थांबून रोखून बघत तिनं विचारलं "आर यू फ्रॉम इंडिया?" तिचा चेहेरा जरासा कठोर झाला होता. आवाजही बदलला होता.
पण प्रश्न अपेक्षितच होता. महेश्वरनं मान हलवली, "येस".
तिनं नजर न काढता म्हटलं "फार इंडियन लोकं दिसत नाहीत इथे." ती परत मान वळवून येणाऱ्या बोटीकडे बघू लागली. महेश्वर अस्वस्थ झाला. काय झालं? बाईच्या मनात काय आहे कळत नाही.

थंडी सुरू झाली होती. आता दोन-एक आठवडेच सेलिंगचे राहिले होते. पण शाळा सुरू होत्या, थॅंक्सगिव्हिंगपूर्वी कामं संपवण्यात लोकं गर्क होती. मग गर्दी कशाला असणार? मात्र महेश्वरचे स्वयंसेवकगिरीचे तास कमी पडत होते. ते पूर्ण झाले नाहीत तर पुढच्या वर्षी सेलिंग करणं अडचणीचं ठरलं असतं. हा सेलिंग क्लब स्वयंसेवी बाण्याने चालवला जात होता. त्यामुळे सेलिंग फुकट होतं. पण त्यासाठी नियमानुसार स्वयंसेवक म्हणून तास भरणं गरजेचं होतं. म्हणून तो सध्या रोज लेकवर येत होता. रोज कुणी तरी नवीन असायचं, भेटायचं. पण वातावरण साधारणत खेळीमेळीचं असायचं. आज मात्र जरा तेढ जाणवत होती.

अचानक ख्रिस म्हणाली, "मी बॅकपॅकिंग केलं आहे भारतात वीसएक वर्षांपूर्वी."
तिच्या स्वरातली नाराजीची छटा ऐकून महेश्वर जरा बिचकला. वीस वर्षांपूर्वीच्या भारतात पाठीला झोळी बांधून हिनं दशदिशांना भ्रमंती केली असेल तर म्हणजे जरा डेंजरसच होतं. आपल्या गावात आलेल्या फॉरेनर्सच्या मागे लागणारी टारगट पोरं आणि पोरकट थोरं आणि त्यांची थेरं त्याला आठवली. बाईंना काय अनुभव आले असतील भगवान जाणे, असं म्हणून त्यानं मनातल्या मनात डोक्याला हात लावला. पण काही तरी प्रतिक्रिया देणं आवश्यक होतं.
"वॉव, कुठे हिमालयात गेली होतीस का?"
"येस, आणि इतर ठिकाणीही" तिनं कोरड्या आवाजात उत्तर दिलं. तोपर्यंत ती बोट डॉक जवळ आली होती.
"प्लीज मदत करशील मला‌ ती बोट लावून घ्यायला?", ख्रिसनं विचारलं.
"हो!" महेश्वरला विषय टळल्यानं हायसं वाटलं.

पुढची पाच मिनिटे त्या बोटीची व्यवस्था लावण्यात गेली. ती दोघं ख्रिसच्या ओळखीची होती. ख्रिसनं महेश्वरची ओळख करून दिली. तोंडदेखलं हाय-हॅलो झालं. त्यांच्या गप्पांतून महेश्वरला समजलं की ख्रिस ही सेलिंग क्लबची बरीच जुनी आणि नावाजलेली मेंबर आहे. थोडा वेळ गप्पा करून ती मंडळी गेली. तोपर्यंत महेश्वर बोटीशी घुटमळत होता.

सावल्या लांबल्या होत्या. तरी अजून तासभर काढायचा होता. बरं, ख्रिस डाॅकमास्टर असल्यानं तिला बोट काढून सेलिंगला चल म्हणायची सोय नव्हती. मगाचं झळाळणारं पाणी आता काळवंडलं होतं. महेश्वरच्या मनाची अवस्था काहीशी अशीच होती.

ख्रिस पुन्हा जाऊन आपल्या जागी बसली. तिनंच हाक मारली, "एमके, मी तुझं नाव आजच्यासाठी असिस्टंट टू डॉकमास्टर म्हणून टाकते. दोनेक तास स्वयंसेवकगिरीचे भरतील."
महेश्वरला‌ बरं वाटलं. तिच्याच शेजारी तो टेकला.
मग तिनं विचारलं "तू इथं काय करतोस?".
महेश्वर म्हणाला, "अमक्या तमक्या इन्शुरन्स कंपनीत काम करतो."
तिच्या चेहेऱ्यावर लख्ख नाराजी पसरली. महेश्वर पुन्हा बावचळला. काही अंदाज येईना.
"आय हॅव हॉरिबल एक्सपिरीयन्स विथ देम. त्यांनी माझ्या आयुष्याचा खेळखंडोबा केलाय." असं म्हणून तिनं मान फिरवली. पुन्हा एक अवघडलेली शांतता पसरली.

मगाशी‌ आलेल्या बोटीचं कव्हर सैल होऊन वाऱ्यात फडफडायला लागलं होतं. ख्रिस म्हणाली " चल, ते जरा घट्ट ओढून घेऊ." त्या दोघांनी मिळून ते नीट बांधून घेतलं. त्या छोट्या कामातही ख्रिसचा अनुभव अन तयारीचा हात दिसून येत होता.

ख्रिस साधारणतः पस्तीस-चाळीसची असावी. सेलिंगसाठी योग्य ड्रेसमध्ये होती. डोक्यावर हॅट, सैलसर टॉप, शॉर्टस् आणि पायात कॅनव्हास टाईप बूट. कुठलाच भपका नव्हता. दिसायला सर्वसाधारण होती. आयुष्य कष्टांत गेल्याचं चेहेऱ्यावर दिसत होतं. चेहेरा खडूस नव्हता. खरं तर आखडू नसावी, पण महेश्वरच्या ओळखीची सुरुवातच जरा तणावात झाली होती.

संध्याकाळ उतरत होती. काळोख वाढत होता. डॉक खालती चुबुकचुबुक आवाज करत लाटा किनारा आपलासा करत होत्या. डॉकच्या आजूबाजूची वर्दळ शांत झाली होती. इतर काही बोटी लेकमध्ये होत्या, त्याही एक एक करत परतत होत्या. महेश्वर डाॅकवरून पाय सोडून पाण्याकडे नजर लावून बसला होता. पहिल्यांदा सोनेरी दिसणारं पाणी आता काळं दिसत होतं. पायाखाली बघावं तर हिरवं दिसत होतं. त्याच्या खोलीचा अंदाज येत नव्हता. आणि ही ख्रिस. तिच्या लहरीपणाचा तरी कुठे अदमास येत होता?

बराच वेळ गेल्यावर शांततेचा भंग करत तिनं विचारलं "आर यू फ्रॉम बनारेस?". महेश्वरला ते अनपेक्षित होतं. त्यानं वळून पाहिलं. ख्रिस त्याच्याच कडे बघत होती. कदाचित तीही काही आडाखे बांधत असावी.
"नाही" पण संवाद खुंटेल की काय या विचारानं त्यानं विषय पुढे रेटला, "पण मी एकदा‌ जाऊन आलोय वाराणसीला."
"गेला आहेस कधी हरिद्वारला? तिथली गंगा बघितली आहेस?"
"नाही. कधी संधी नाही मिळाली. पण खूप ऐकलंय त्या विषयी" तो उठून तिच्या जवळ आला.
"ओके. पण मग तू कुठल्या गावचा आहेस?"
थोडा वेळ तो तिला भारताचा नकाशा समजावत होता. ती दक्षिणेला तिरुवण्णमलै आणि पॉंडिचेरीत जाऊन आली होती. ज्या सफाईदारपणे तिनं तिरुवण्णमलैचा उल्लेख केला ते ऐकून महेश्वरला गंमत वाटली! त्यालासुद्धा ते नाव इतक्या सहजतेने घेणं जमलं असतंच याचा भरवसा नव्हता. पण तिचा मुंबैप्रवास काही घडला नव्हता. या चर्चेदरम्यान वातावरण जरा मवाळलं. तरीही तिच्या वागण्याबोलण्यातली नाराजीची झाक लपत नव्हती. तरी पण त्यानं बनारस पाहीले आहे म्हटल्यावर तिला जरा हुरूप आल्यासारखा वाटला. ती विचारात गढली होती.
मग काही वेळानं तिनं भारतातला एक किस्सा सांगितला. प्रसंग रेल्वे प्रवासातला होता. समोरच्या फाटक्या दिसणाऱ्या माणसाचे अस्खलित इंग्लिश बोलणे, त्याचा इंग्लिश वाङ्मयाचा अभ्यास, हे तिला चकीत करणारे होतेच. पण त्याच्याच ओळखीने बनारस हिंदू विद्यापीठाच्या होस्टेलमध्ये तिची तात्पुरती झालेली सोय तिला खूपच भावली होती. तिची देहबोली आता बदलली होती. मगाचे चेहेऱ्यावरचे रूक्ष भाव जाऊन एक मृदुता आली होती. का कोण जाणे, महेश्वरला वाटलं तिनं जरी तिला आलेला चांगला अनुभव सांगितला असला तरी बाकी ठिकाणी निराशा अन् कटू अनुभवच पदरी पडले असावेत.

हवेतला थंडावा वाढत होता. ते लेक असलेला पार्क बंद व्हायची वेळ आली. डॉकचं टायमिंग संपलं होतं.
ख्रिस म्हणाली, "चला. वेळ झाली. निघू या आता."
महेश्वरनं तिचं मेंबर कार्ड सही करून दिलं, आणि ख्रिसनं त्याचं. हे स्वयंसेवकगिरीचे सोपस्कार होते. परत एकदा तिनं महेश्वरचं पूर्ण नाव कार्डावरून वाचून उच्चारलं, काळजीपूर्वक उच्चारलं. खूप अपेक्षेने तिनं महेश्वरकडं बघितलं. तिच्या त्या प्रयत्नामुळे महेश्वरलाही बरं वाटलं. त्यानं आनंदानें मान डोलावली. तिचा चेहेरा उजळला होता. त्यावरची ती कडवट छटा आता दूर पळाली होती.
तिला आणखी काही तरी बोलायचय असं महेश्वरला वाटलं. पण ती "गुड बाय" असं म्हणत वळली. महेश्वर ही त्याच्या गाडीच्या दिशेने निघाला. तेवढ्यात तिची हाक आली, "एमके!"
महेश्वर थबकला, वळला. ती त्याच्या दिशेने येत होती.
"पुढच्या वेळी इथे आपण वेळ ठरवून भेटू. चालेल नं तुला?"
"हो". थोडा विचार करून तो म्हणाला, "तुझ्याकडून सेलिंग शिकायला आवडेल मला!"
ती म्हणाली "चालेल. मग आपल्याला खूप गप्पा मारता येतील. कुणी भारतीय भेटून बरेच दिवस झाले आहेत. ते दिवस आठवताना बरं वाटतंय." हे जरा नवलच होतं महेश्वरसाठी!
दोघांनी एकमेकांचे मोबाईल नंबर टिपून घेतले.
मग आपापल्या गाड्यांत बसून दोघे दोन दिशांना पांगले.
परत येताना महेश्वरच्या मनात तिच्या वागण्याबद्दल विचार होते. तिच्या मनात भारतीयांविषयी अढी आहे का नाही हे काही त्याला नक्की कळले नव्हते. पण तिनं आपण होऊन पुन्हा भेटू या असं म्हटलं याचंही त्याला आश्चर्य वाटत होतं. "चला, बघू या काय होतंय पुढच्या वेळी! पुढची भेट झाली तर!"
(क्रमश:)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

एका वेगळ्या पार्श्वभूमीवर कथा लिहीली आहे. त्याच्या स्वागताबद्दल आभार!
धन्यवाद sneha1, धनवन्ती, हर्पेन, वावे, rmd, अ'निरु'द्ध , आबा. , रश्मी., सायो, अश्विनी११, अंजली_१२