सारे विश्वची माझे घर

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

(४ महिन्यांपुर्वी माझा खालील लेख न्यु जर्सीच्या साहित्य विश्व मध्ये प्रसिद्ध झाला - सचीत्र)

छंद म्हणून जडलेली अवकाशविज्ञानाची आवड जेंव्हा व्यवसायात बदलली तेंव्हा ते साहजिक वाटण्याइतका पगडा त्या शास्त्राने बसवला होता. व्यवसाय म्हणजे काय तर केवळ आपली आवड पुरवता पुरवता उदरनिर्वाह देखील साधायचा. पण माझ्या कळत-नकळत माझ्या आचार-विचारांमध्ये मात्र यामुळे अमुलाग्र बदल घडत होता.

पहिल्यांदा जेंव्हा आपण ऐकतो, की गुरुग्रह हा पृथ्वीपेक्षा ११ पटीने मोठा आहे तेंव्हा आपले वय ११ पेक्षा कमीच असते. त्यामुळे मुळात पृथ्वी केवढी आहे, याचे काही स्पष्ट चित्र डोळ्यांपुढे नसते. पण तो काही तरी मोठा प्रकार असणार हे आपल्या आराध्यदैवत पालकांच्या सांगण्यावरुन कळतं आणि त्यांची त्यामधील ईनवॉलमेंट पाहुन आपण पुरेसे ईंप्रेस होतो आणि “हो, खरंच, पहानं” इ.इ. त्या वयात देखील करुन इतरांनाही त्याबद्दल सांगतो.

नंतर (किंवा काही भाग्यवंतांना आधीच) कधीतरी कळतं की कितीही उड्या मारल्या तरी मुळीच न ढळणारी ही वसुंधरा वेगाने स्वत:भोवती तर गिरक्या घेते आहेच, पण त्या विवरांनी सजलेल्या चांदोमामासकट सुर्यकाकाभोवती फिरते आहे. (कवींनी जरी चंद्रमुखी असा शब्दप्रयोग वापरणे सोडलेले नाही तरी, काही लोकांचा असा तर्क आहे, की चंद्रावर विवरे आहेत हे भारतीयांना पूर्वीपासून माहीत होते).

नंतरही अनेक गोष्टी कळतात.....
सूर्याचे तापमान ६००० सेल्शिअस आहे (हे पृष्टभागाचे - अंतर्भागाचे त्याच्याही हजारपट असते. आणि हो, शून्यापासून इतक्या दूरच्या तापमानाबद्दल आपण जेंव्हा बोलतो तेंव्हा फॅरनाईटमध्ये हे आकडे जवळपास दुप्पट असतात - १.८ पट. पण तसे पाहता तापमानाबाबत ६००० काय आणि ११००० काय, सारखेच की हो Happy ; शनीला कडी आहेत (खरंतर गुरु, युरेनस, नेपच्युन यांनाही कडी आहेत पण छोट्या दूरदर्शिकेतून केवळ शनीची चमकदार कडीच दिसतात; आपला सूर्य केवळ(!?) एक तारा आहे आणि आपल्या दिर्घीकेत (Galaxy) असे १०० अब्ज तारे आहेत; ब्लॅकहोल्सच्या (कृष्णविवर) गुरुत्वाकर्षणापासून प्रकाशदेखील निसटू शकत नाही (पृथ्वीची “’ईस्केप व्हेलॉसिटी” साधारण ११ किमी/सेकंद [हो, तास नव्हे] असते - म्हणजे एखादा उपचंद्र किंवा यान कक्षेअधीन करायला एवढा वेग लागतो; कृष्णविवरांचे वस्तुमान [खरेतर घनता] मात्र येवढे असते की, ३००,००० किमी/सेकंद [मैलांमध्ये याच्या साधारण ६ दशांश] असे वेगवान प्रकाशकण {फोटॉन्स} देखील नमते घेतात. विश्वात कोट्यावधी (खरेतर अब्जावधी) दिर्घीका आहेत आणि त्या सर्व एकमेकांपासून दूर जाताहेत..........
..... आणि अशाच इतर अनेक गमती-जमती हळुहळु कळतात!

बहुतांश लोक अशा गोष्टींपासून तात्पुरते मनोरंजन साधून आपल्या दैनंदिन आयुष्याच्या (थोडक्यात अर्थपूर्ण गोष्टींच्या) मागे लागतात. मला मात्र हे दोन वैचारीक विभाग अलग ठेवणे कठीण जाई आणि यात मी एकटा नाही आणि पहिला तर मुळीच नाही.

आता विश्वाच्या प्रपंचाची कल्पना आपण आकार व कालमापनाने घ्यायचा प्रयत्न करु या. विश्वाचे वय साधारण १३.७ अब्ज वर्षे आहे (विलकिन्सन मायक्रोवेव्ह अनायसोट्रोपी प्रोब), पृथ्वीचे वय ४.५ अब्ज वर्षे आहे (भुगर्भशास्त्र, किरणोत्सारी द्रव्ये), पहिले बॅक्टेरीआ अवतरले ३ अब्ज वर्षांपूर्वी, मुबलक प्राणवायु उपलब्ध झाला १ अब्ज (= १०० कोटी) वर्षांपूर्वी, पहिल्या मनुष्याचा जन्म केवळ २०-३० लाख वर्षांपूर्वीचा, चाणक्य २-३ हजार वर्षांपूर्वींचा, तर अणुबॉंब २०-३० वर्षांपूर्वींचा (ठीक आहे, ७०, पण अणुबॉंब ही काही अभिमानाची गोष्ट होऊ शकत नाही). अशातर्हेने या विश्वाच्या प्रंपचात आपण केवळ बच्चे आहोत. आकाराबद्दल बोलायचे तर आपली नगण्यता जास्तच प्रकर्षाने जाणवते. दिर्घीकांमधील तारे इतके विखुरलेले असतात की जेंव्हा दोन दिर्घीकांची टक्कर होते (होय, लांब पल्ल्यावर कार्यरत असलेल्या गुरुत्वाकर्षणाच्या कचाट्यातुन कोणीही सुटत नाही) तेंव्हा ताऱ्यांची मात्र या विरळतेमुळेच टक्कर होत नाही. आपली सुर्यमाला आकाशगंगेच्या (हे आपल्या दिर्घीकेचे नाव) मध्यापासून बरीच दूर आहे. येथे ताऱ्यांमधील अंतरे ही सुर्यमालेच्या आकाराच्या हजारोपट जास्त असतात. आपला सूर्य हा एक “जी” प्रकारात मोडणारा (तापमान, आकारमान इ. वरुन ओ, बी, ए, एफ, जी, के, एम असे ताऱ्यांचे मुख्य प्रकार पडतात) साधारण असा तारा आहे. अशाप्रकारे विश्वाच्या कोपऱ्यात कुठे तरी असलेलो, इतक्यातच सूर्यमालेबाहेर यान पाठवू शकलेलो, असे आपण अगदी क्षुल्लक आहोत.
विश्वात आपले खास स्थान तर नाहीच, पण खास काळही नाही.

पण, मग ....?
तिथेच अज्ञाताची ओढ आपली पकड घट्ट करते. अगदी नजीकच्या भूतकाळातदेखील अनेक गोष्टींबद्दल आपल्याला केवळ भाकीत करावे लागे. त्यावर मनोरे रचले जात. आता मात्र अनेक गोष्टी पडताळून पहाता येतात आणि त्यांच्या सहाय्याने अजून गोष्टींचे ज्ञान मिळवणे शक्य होते. ताऱ्यांचे तापमान, कृष्णविवरांचे वस्तुमान, दिर्घीकांची (व त्यांच्यापर्यंतची) अंतरे, स्थळकाळाचा जन्म इ. आपण कोण आहोत, आपल्यासारखे इतर आहेत का, अशा प्रश्नांचा मागोवा घेणे शक्य होते. सगळे शास्त्रज्ञ जणु एका महाकाय जिगसॉ पझल मधला आपला खारीचा वाटा उचलीत असावेत. ताऱ्यांमधे होत असलेल्या फ्युजन प्रक्रियांद्वारे केवळ लोखंड (आण्विक क्रमांक २६) व त्याआधीचेच अणु बनू शकतात (विश्वोत्पत्तीच्या वेळी फक्त हायड्रोजन आणि हिलिअम हेच बनले होते). आपल्या शरीरात असलेले इतर अणु (उदा. तांबे, आयोडिन, जस्त) हे सर्व कोणत्यातरी ताऱ्याच्या अंतिम आक्रोशात बनले आहेत. कार्ल सगानने म्हटल्याप्रमाणे आपल्यात तारकांचे अंश आहेत. विश्वाची रहस्ये सोडविणे अनिवार्य आहे.

पुढच्या काही अंकांमधून खगोलशास्त्राच्या काही अंगांचे किंचित का होईना पण सखोल असे दर्शन घडविण्याचा प्रयत्न असेल.

विषय: 
प्रकार: 

विश्वात आपले खास स्थान तर नाहीच, पण खास काळही नाही.>> धन्यवाद. हे मला लहानपणापासुन वाट्त आले आहे. स्पॅन ह्या जुन्या मासिकात ग्रहमालेचा एक छोटा फोटो आला होता. जर हेच छोटे तर त्यात मी कोण असा प्रश्न पड्ला होता.

अशी माहीती लहान मुलांना समजावून सान्गताना अतिशय उपयोगी पड्ते. बीबीसीची स्पेस साईट पाहिली आहे का? जबरदस्त आहे.

अरे वा वा वा... कधी काळी (११वी-१२वी) मलापण खगोलशास्ताने पछाडलं होतं! मी घरच्या भिंतीवर सुर्यमालेतील ग्रह त्यांची अंतरे scale down करुन काढले होते... एक भिंगांची दूरदर्शी तयार केली होती... त्यातुन गुरुचे चंद्र, शनीची कडी, अ‍ॅन्ड्रोमेडा दिर्घिका बघितली होती...

परवाच सायमन सिंग यांचे 'बिग बँग' पुस्तक वाचले... मस्त आहे पुस्तक... सोप्या भाषेत सगळं समजाउन सांगितलय. पण मला एक शंका होती... बरं झालं तुम्ही भेटलात!!

हबलने स्पेक्ट्रोग्राफीच्या मदतीने दिर्घिका आपल्यापासुन दूर जात आहेत हे दाखवले, एवढेच नाही तर, दूरच्या दिर्घिका जास्त वेगाने दूर जात आहेत हे ही दाखवलं. पण दूरच्या दिर्घिकांचा प्रकाश आपल्यापर्यंत यायला लाखो वर्ष लागतात, म्हणजेच तो 'जुना/पुर्वीचा' प्रकाश असतो... मग या वरुन त्या दिर्घिका 'लाखो वर्शांपूर्वी' खुप वेगाने दूर जात होत्या, असं आपण का नाही म्हणू शकणार? (मला काय म्हणायचंय ते कळलं का?)

>> ... खगोलशास्त्राच्या काही अंगांचे किंचित का होईना पण सखोल असे दर्शन घडविण्याचा प्रयत्न असेल.
आतुरतेने वाट बघतोय... काही सोप्पी पुस्तकं, चांगल्या वेब साइट पण जरुन सांगा.

मस्त रे आशीष. म्हणजे ह्यात माहिती नसलेले असे काहीच नवीन नाही पण तुझी लिहिण्याची पद्धत एकदम आवडली.

> मग या वरुन त्या दिर्घिका 'लाखो वर्शांपूर्वी' खुप वेगाने दूर जात होत्या, असं आपण का नाही म्हणू शकणार?

सॅम, ते बरोबरच आहे. दिर्घिका जितकी दुर तितकी ती जास्त वेगाने दुर जाते. हा वेग ~७० किमि/से/मेपार्सेक इतके आहे (यालाच हबल कॉन्स्टंट असे म्हणतात). म्हणजे, जर एक दिर्घिका आपल्यापासुन १ मेगापार्सेक (=१०^६ पार्सेक = १०^६*४.३ प्रकाषवर्श) तर ती ~७० किमि/सेकंद या वेगाने दुर जात असते. १००० मेगापार्सेक दुर असलेली दिर्घिका ~७०*१००० किमि/सेकंद या वेगाने दुर जात असते.

पहिली, ४३०००००० प्रकाषवर्श दुर असलेली दिर्घिका ४३००००० वर्षांपुर्वी ७० किमि/से या गतीने दुर जात होती. ४३०००००० वर्षात ती किती दुर गेली असेल? ४३००००००*३.१*१०^७*७० किमि =~ १०^१६ किमि =~ १०^३ प्रकाषवर्श. म्हणजेच ४३,०००,००० ऐवजी आता ४३,००१,००० दुर असेल (आणि गती फारशी बदलली नसेल). अशातर्हेने जवळच्या दिर्घिकांकरता फारसा फरक पडत नाही. पण बर्याच दुर असलेल्या दिर्घिकांकरता दुसरे अनेक मुद्दे लक्षात घ्यावे लागतात. उदा. अतिदुर असलेली दिर्घिका प्रकाषापेक्षा जास्त वेगाने जाऊ शकते का? या गोष्टि मॉडेलप्रमाणे बदलतात.

अ‍ॅन्ड्रोमेडा चे अंतर ~२.५ मेगापर्सेक आहे. पण अ‍ॅन्ड्रोमेडा एका जवळच्या "फ्लो" मध्ये असल्याने ती आपल्याजवळ सरकते आहे. काही कोटी वर्षांनी आकाशगंगेशी अ‍ॅन्ड्रोमेडाची टक्करसुद्धा होऊ शकते.

आशिष, उशिर झाला उत्तर द्यायला...
मला माहिती होतं की मी चुकीच्या दिशेने विचार करतोय... पण काय चुकतय ते दाखवल्याबद्दल आभार.
अजुन वाचायला आवडेल.

एक शंका:

बुध आणि प्लुटो या दोनच ग्रहांची केंद्रच्युती जास्त असण्याचे कारण कळले आहे का? एका ठिकाणी वाचले की ते मानवाला अजून ज्ञात नाही

तसेच, प्लुटोमागे आणखी एक अजस्त्र ग्रह असण्याची शक्यता जास्त आहे का? ( दोन शंका झाल्या)

केंद्रच्युती म्हणजे नेमके काय?

प्लुटो आता ग्रहांमधे गणला जात नाही (खूपच छोटा आहे हे एक मूख्य कारण - कितीतरी चंद्रही त्यापेक्ष मोठे आहेत). त्याच्या पलीकडे त्याच्यापेक्षा मोठे ग्रह त्यामुळे असणारच (एरीस नामक एक लघुग्रह सुर्यापासुन सध्या प्लुटोपेक्षा जास्त अंतरावर आहे) . पण अजस्त्र ग्रह असण्याची फार काही शक्यता नाही.

छान माहिती, मला आज बघायला मिळाली... विश्वाचा फाफटपसारा (अंतर, संख्या, आपण किती कस्पटासमान लहान आहोत) बघितल्यावर या विश्वाची उत्पत्ती कशी झाली हा प्रश्न त्रास देतो.

आपला सूर्य केवळ(!?) एक तारा आहे आणि आपल्या दिर्घीकेत (Galaxy) असे १०० अब्ज तारे आहेत;
----- या १०० अब्ज तार्‍यांमधे अनेक ग्रह असतील... आणि जशी पृथ्वीवर परिस्थिती होती/ आहे तशीच कुठेतरी सजिवाला पोषक अशी परिस्थिती असेल. सजिव अस्तित्वात असणारी पृथ्वी एकमेव नसावी (असे वाटते) अशा स्थळांची संख्या पण खुप मोठी असेल. या बद्दल मला तुमचे विचार काय आहेत हे वाचायला आवडेल (येथेच कुठे या विषयावर लिहीले असेल तर कृपया लिंक द्या).

त्याच्या पलीकडे त्याच्यापेक्षा मोठे ग्रह त्यामुळे असणारच>> >

म्हणजे सूर्यमालेपैकी का आपल्या?

केंद्रच्युती - अक्षाचा भ्रमणकक्षेशी कोन म्हणे, बुधाचा आणि प्लुटोचा ०.२ पेक्षा जास्त आहे ना? तो.