पहाट!

Submitted by आसावरी. on 11 October, 2022 - 02:28

उसवून वीण श्वासांची
तो सहज वेगळा झाला,
सांडून सडा प्राजक्ती
जणु वार सुगंधी केला

शिडकावा दवबिंदूंचा
उठवून शहारा गेला,
तो मंद धुक्यातून जेव्हा
सामोरा अवचित आला

खळखळणारी यमुना
सामीलच होती त्याला,
ठरवूनच कट तो घडला,
हातून घट निसटला!

नजर टाळुनी त्याची
मी जाता पल्याड पळुनी,
फितुरलेच तरीही डोळे
पाहिलेच त्यांनी वळुनी!

एकाच कटाक्षामधुनी
समजलेच सारे त्याला,
घेऊन बासरी हाती
तो मंत्र मुग्धसे हसला!

- आसावरी.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

घेऊन बासरी हाती
तो मंत्र मुग्धसे हसला! >> वाह! सुरेख शेवट.

छान