कारकाई

Submitted by योगेश आहिरराव on 6 October, 2022 - 06:30

कारकाई

चिंतामणच्या दारात बुलेट लावली. चहा नाश्ता घेत खिरेश्वर सोडेपर्यंत साडेनऊ झाले. यंदा निमित होेते हरिश्चंद्रगड बालाघाट रांगेतील हरिश्चंद्रगडचा शेजारी कारकाई... सोबतीला, अश्विनी आणि साधना.
गावाची आश्रमशाळा सोडून शेतीवरील बांधावरून चालू पडलो. वाटेत काही मुलं खेळताना दिसली त्यांना विचारत वाटेची खात्री करून घेतली. टोलार खिंडीला डावीकडे ठेवत समोरच्या महाकाय डोंगराची दिशा धरली. सुरूवातीस वाट झक्क मळलेली नंतर एका टेकडीला वळसा घालून आतल्या बाजूने वर चढू लागली. आधी वाटलं हि टेकडी चढून पदरात जाऊ मग विरूद्ध बाजूला असलेल्या मुख्य धारेवर येऊ. काही मिनिटातच दोघं तिघं गवताचे भारे वाहून आणताना भेटले. त्यांनी तर कारकाई ला इकडून वाट नाही अस स्पष्ट सांगून टाकले. हि लोकं आतल्या बाजूस लाकूडफाटा गोळा करायला जातात, तसेच टेकडीच्या माथ्यावर जनावरं घेऊन. माघारी वळून मुख्य ओढा पार करून पलीकडील बाजूस गेलो. एक अस्पष्टशी वाट धरली आत खोलवर जंगलात शिरत ती वाट काही चढाईला लागेना. दिशेप्रमाणे उजवीकडे कारवीच्या रानात घुसखोरी केली. ते पार करत मग ठिसूळ बारीक दगडगोटे तीव्र चढाई त्यात स्क्री. काही मिनिटातच त्या गचपणातून बाहेर येत आडव्या अरुंद अशा ट्रेव्हर्स वर आलो. आता समोरच्या बाजूस उजवीकडे होती ती कारकाई ची वाट त्याच वाटेला काहीजण खराड असेही म्हणतात. पंचेचाळीस अंशाहून अधिक तीव्र कोनात असलेली अरूंद वाट पार करून पदरात दाखल झालो. थोडं उजव डावं करत मुख्य वाटेवर आलो. काही अंतर जाताच दोघेजण दिसले
विचारपूस केल्यावर कळले की कारकाई ला खिरेश्वरहून सहसा कुणी जात नाहीत, हि मुख्य वाट कोल्हेवाडीतून येते. साधारण अर्धा पाऊण तास दाट जंगलातून चाल, तांबट चा कुटर कुक तर अधून मधून कानी पडणारा शिळकरी कस्तुर. पदरातील वाट थेट कड्याला चिकटून बाहेर आली. खाली पाहिलं तर आम्ही बरीच ऊंची गाठली होती. पिंपळगाव जोगा धरणाचा निळाशार फुगवटा, खिरेश्वर आसपासच्या वाड्या वस्त्या तर समोर डोंगराचे कातळकडे नजर थेट टोलारच्या दिशेने जात हरिश्चंद्रगडाच्या बालेकिल्ल्यातच. उजवीकडे कडा तर डावीकडे दरी अशी अरूंद वाट तिरक्या रेषेत चढाई. अधे मध्ये पिवळीधम्मक गवताची पाती. वीसेक मिनिटातच मुख्य नाळेत आलो याच वाटेला खराड दरा असे म्हणतात. सुरूवातीस बऱ्यापैकी रूंद असलेल्या नाळेत फार अशी झाडं नाहीच. तुरळक कारवी, कुठे खुरटी झुडपं तर मध्येच एखाद दुसरं ऊंबराचे झाडं, भर उन्हात तेच काय सावलीचे ठिकाण. नेहमीप्रमाणेच जसजसे वर जाऊ लागलो नाव अरूंद होत आजूबाजूचे कडे चांगलेच भेदक वाटू लागले. शेवटच्या टप्प्यातील दगडांचा खच आणि भयंकर घसारा दोन तीन पावलं वर गेलं तर एखादा पाऊल खाली येणारच. डावं उजवं करत कड्याचा आधार घेत अस्तेकदम वर पोहचलो. फार सपाट नसलेल्या ऊंच सखल माथ्यावर गवताळ पठारावरून आजूबाजूचा बराच प्रदेश दृष्टिक्षेपात येतो. पूर्वेस वारल्याची टेकडी, निरोळी कडील बाजू. पश्चिमेला पिंपळगाव जोगा जलाशया मागे उधळ्या, सिंदोळा, भोजगिरी कडील बाजू तर उत्तरेला हरिश्चंद्रगडाचा पसारा. अर्थात वातावरण धुसर असल्याने फार अजून काही पाहता आलं नाही. मळलेली एक वाट घेतली त्यानुसार साधारण हरिश्चंद्र दिशेने निघालो.साधना तर आधी म्हणत होती असेच जाऊ व टोलार खिंडीत उतरू. हे म्हणायला जरी सोपं असलं तरी हा कारकाईचा डोंगर जो हरिश्चंद्रगडाचा शेजारी जरी असला तरी तो टोलारच्या दिशेला टप्पा टप्प्यात टेकडीने जोडला आहे. सहाजिकच खिंड व काहीशी अवघड चढाई उतराई. वाट एका ठिकाणी कोरड्या ओढ्यात उतरत नाहिशी झाली. आम्ही तसेच पुढे उजवीकडे दरीच्या काठावर जाऊन पाहिलं तर खाली डाव्या बाजूला बर्‍यापैकी दूरवर भैरोबा दुर्ग. आमचं नियोजन त्याच भागात म्हणजे खिरेश्वरच्या विरूद्ध दिशेला असलेल्या कोथळे उतरून वळसा घेत टोलार खिंड मार्गे खिरेश्वर परत. थोडक्यात असा लुप ठरविला होता. या ठिकाणी आणखी एक जाणवलं ते म्हणजे ही कारकाई निरोळी मानखंदा ते रांजणा पर्यंत ची रांग कोल्हेवाडी खिरेश्वर बाजूला सरळसोट तुटलेली आहे. त्यामुळेच या बाजूने भव्य एकसलग बसाल्टची महाकाय पर्वतरांग दिसते तर पल्याड मांडवी, फोफसंडी खोऱ्यात व कोथळे बाजूस सौम्य टप्प्यांत उतरण आहे.
दरीच्या काठाने चालू लागलो, एखादी वाट त्या बाजूला उतरते का ते पाहत. तसंच जात वरच्या भागात आलो एका लहानश्या ओढ्याला चांगल स्वच्छ वाहतं पाणी, ऐन जानेवारीत असं पाणी मिळणं हे भारीच. तसेही दुपारचं जेवणाला या पेक्षा चांगली जागा नसावी. घरून आणलेले डबे काढत ईन मीन तीन भिडू बसले. जेवण झाल्यावर ओढ्याच्या कडेला सावली पाहून ताणून द्यावीशी वाटत होती. या निर्जन एकाकी डोंगरावर अशा ठिकाणी मुक्काम करायला नक्कीच मजा येईल. नीरव शांततेत अगदी निवांत, रमणीय सुर्यास्त, गुढ संधीप्रकाश, तारकासमूह पाहात लागणारी झोप, सकारात्मक ऊर्जेने भारावलेला सुर्योदय. सारंच हवंहवस.असो.....
देवा घाणेकर ने हा ट्रेक आधी केला होता. त्याला कोथळे कडील वाट कन्फर्म करायला फोन लावला. त्याने कोथळे च्या वाटेने चढाई केली होती त्या वाटेला मसाईदरा असं म्हणतात. देवाने फोन वर सविस्तर माहिती देत काही फोटोज पाठवले. त्यावरून दिशेप्रमाणे अंदाज बांधून ओढ्याच्या पलीकडील बाजूच्या घळीने उतरायला सुरूवात केली. आधी करवंदाची जाळी मग कारवी पण दगडातून अगदी रचाई केलेली वाटावी अशी मळलेली वाट. म्हटलं चला भारीच काम झालं. तीन चारशे फूट उतरल्यावर उजवीकडे प्रशस्त गुहा लागली. कारवीचे बारीक दांडे त्यावर शेण माती लिंपून आडोसा तयार केलेला आत मध्ये डोकावत पाहिलं तर रिकाम्या पाण्याच्या बाटल्या, तेलाचा कॅन व चटई. सरत्या पावसात कोथळे परिसरातील गावकरी इथे नक्कीच गुरं ठेवत असावीत. हरिश्चंद्रगड फोफसंडी परिसरातील अनेक डोंगरावर अशा गुहा आहेत. काही अंतर जाताच सेम अजून एक गुहा डावीकडे लागली. त्यातही माणसांचा वावर असल्याच्या खुणा पण सध्या मात्र कुणीही नाही. तसेच खाली उतरत राहिलो, वाट अधून मधून ओढ्यातून जाऊ लागली काही ठिकाणी तीव्र उतरण. दूरवर कोथळे परिसरातील घरे व शेतजमिनी दिसू लागल्या. चला तर परफेक्ट वाटेला लागलो. आता सारं नियोजनबद्ध जुळून येणार तेच पुढे असलेली साधना बसलेली दिसली. तिचा चेहरा वेगळाच वाटू लागला, जवळ गेल्यावर काय ते समजून गेलो. वाट The End होऊन खाली सरळ तीनशे साडेतीनशे फुटांचा फाॅल. थोडक्यात सर्व ठिक आहे असं वाटत असतानाच मार्ग खुंटला. आम्हा तिघांची अवस्था एकसारखीच.. पुन्हा गेल्या मार्गी वर धापा टाकत आलो तसाही दुसरा पर्याय नव्हताच. देवाने दिलेल्या फोटो प्रमाणे काही अंतर आणखी पुढे जात डावीकडे एक धार कोथळे बाजूस उतरलेली वरून तरी दिसत होती. त्यात साधना म्हणाली तिथे न जाता सरळ आणखी वरच्या भागात जाऊन मग कोल्हेवाडीत उतरता येईल बहुदा ती उंबारल्याची वाट पण वेळचं गणित पाहता उंबारल्याचा ऑप्शन तर फारच कठीण तर कोथळे बाजूस जर उतरायचे झाले तरी मसाई दरा उतराई मग भैरोबा दुर्ग ला वळसा घालून त्या बाजूने टोलार खिंड चढाई मग खिरेश्वरला उतराई हा पण मोठा फेरा. घड्याळात पाहिलं तर चार वाजून गेलेले सारासार विचार करत मी आलो त्याच खराड मार्गे उतरायचे जाहीर केले. हाच एकमेव ऑप्शन अंधार पडायच्या आत खिरेश्वर पोहचणे जो एकदम सुरक्षित. हे ठरल्यावर अश्विनी काहीशी नाराज झाली दुसरी वाट उतराई राहून ट्रेक ठरल्याप्रमाणे होणार नव्हता तर तिला पुन्हा ती खराड दरा ची ती तीव्र घसराईवाली वाट आणि मुख्य म्हणजे सकाळी जसे वाट शोधत घुसून चढलो तो प्रकार नको होता. तिला म्हणालो, हा खराडचा अगदी सुरूवातीचा घसराई पॅच सावकाश पार करू मग पदरात गेल्यावर थेट खिरेश्वर कडे उतरायचे प्रयोग न करता सरळ आडवी मारत मळलेल्या कोल्हेवाडीच्या वाटेने जाऊ. तसेही साधना ने कोल्हेवाडी सुळका क्लांईब केला होता त्यामुळे पुढची वाट तीला माहीत होती. ठरलं तर, मघाच्या ओढ्यातून अर्धवट पाण्याचा बाटल्या पूर्ण भरून उतराईला सुरूवात केली. पंधरा ते वीस मिनिटात खराड दरा ला आलो. खोलवर डावीकडे धरणाचे पाणी मावळतीकडे जाणाऱ्या सुर्य किरणानी चकाकत होते. सावधगिरीने पावलं टाकत योग्य ठिकाणी काठीचा आधार घेत तो घसारा टप्पा व्यवस्थित पार झाला. एक दोन थांबे घेत नाळेतून बाहेर येत गवताळ आडवी पकडली मग पदरातून झटपट पुढे जाऊ लागलो. मळलेलेल्या वाटेने आणखी एक टप्पा खाली उतरत मोकळवनात आलो. इथे काही ढोरवाटा चकवू पहात होत्या आम्ही मात्र दिशेप्रमाणे एकदम परफेक्ट सरकत होतो. मध्येच जंगलाचे टप्पे मग परत मोकळं पुन्हा जंगलात. असं आडव बरंच चालत होतो. साधनाला विचारत, कधी येईल तुझा सुळका ? ती पण न वैतागत येणार येणार म्हणत चालत होती. अखेर एकदाचा पदराला खालच्या बाजूने बिलगून असलेला कोल्हेवाडीचा सुळका दिसला. खाली कोल्हेवाडी सुध्दा व्यवस्थित नजरेत. आकाशातील रंगारंगांच्या छटा पाहत क्षणभर विश्रांती आणि आम्हा तिघांचा एक सेल्फी घेऊन चालू पडलो. आत वाट सुळक्याला वळसा घालून नाळेतून खाली उतरू लागली. अर्ध्या पाऊण तासात ती दगड धोंड्यातली नाळ पार करून शेवटचा टेपाड उतरून सपाटीवर आलो. मग शेतं पार करत कोल्हेवाडीत दाखल झालो तेव्हा सुर्यास्त झाला होता. वाडीतील नौशाद नावाचा मुलगा साधनाच्या ओळखीचा होता. त्याचाच घराच्या अंगणात विसावलो, गार पाणी मग त्याच्या अम्मीने कोरा चहा पाजला. खरंच तरतरी आली. नौशाद ने आम्हाला खिरेश्वर ला सोडले तेवढीच दीड दोन किमीची डांबरी रस्त्याची तंगडतोड वाचली.....
दुसरी वाट झाली नाही, पण वेळेत कारकाई पाहून खाली आलो हेही काय कमी नाही.
वाटाड्या अथवा गाईड घ्यावा की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न.. मी तरी हे सारासार विचार करून ठरवतो. तरीही मला विना गाईड, अनुभव आणि कौशल्य वापरून केलेली भटकंती खुप आवडते. सर्व व्यवस्थित घडलं तर बल्ले बल्ले नाहीतर आहेच जमा होणारा अनुभव...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद.... ..

मॅप, फोटो, रूट सर्व टाकायचा प्रयत्न केला. वेळ पण बराच गेला काही अपलोड झाले नाही.

फोटो,ब्लॉग पाहिले. छान आहेत.
हल्ली या रूट साइटस/apps free राहिल्या नाहीत. जो रूट दिसतो तो शेअर न करता त्याचा स्क्रीनशॉट घेऊन फोटो म्हणून टाकणे सोपे पडते.