‘अ’ जीवनसत्व : निरोगी दृष्टीचा मूलाधार

Submitted by हेमंतकुमार on 8 January, 2019 - 00:45

जीवनसत्त्वे लेखमाला : भाग २

( भाग १ : https://www.maayboli.com/node/68579)
* * * *

सामान्यजनांना ‘अ’ या नावाने परिचित असलेल्या या रासायनिक घटकाला जीवनसत्वांच्या यादीत अग्रस्थान द्यायला काहीच हरकत नाही. त्याचे अधिकृत नाव Retinol आहे. आपल्या निरोगी दृष्टीसाठी ते अत्यावश्यक असते. याव्यतिरिक्त इतरही अनेक महत्वाची कार्ये ते शरीरात करते. गरीब देशांतील दारिद्र्यरेषेखाली असणाऱ्यांमध्ये त्याचा आहारातील अभाव बऱ्यापैकी आढळतो. त्यामुळे अनेक राष्ट्रीय आरोग्यसेवांच्या माध्यमातून ‘अ’ च्या गोळ्यांचा पुरवठा वंचितांना केला जातो.
अशा या महत्वाच्या जीवनसत्वाचा परिचय या लेखात करून देत आहे.

शोधाचा इतिहास:
रातांधळेपणाची समस्या प्राचीन काळापासून माहित होती. तेव्हा इजिप्तमध्ये यावर संशोधन चालू झाले. सुरवातीस आहारातील एखाद्या पदार्थाने त्यावर फरक पडतो का यावर लक्ष केंद्रित केले गेले. प्रयोगांती असे आढळले की मांसाहारातील यकृताचा भाग अशा रुग्णास नियमित दिल्यास त्याला बराच फरक पडतो. नंतर काही वैज्ञानिकांनी दुधामधून काही ‘मेदरुपी घटक’ शोधले आणि ते शरीराच्या वाढीसाठी आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. त्यावेळेस या घटकांना ‘अ’ असे तात्पुरते नाव देण्यात आले. पुढील संशोधनात हे घटक डोळ्याच्या दृष्टीपटलात (retina) असल्याचे आढळले. त्यामुळे त्यांचे रासायनिक नामकरण Retinol असे झाले. हेच ते ‘अ’ जीवनसत्व. ते केवळ एक रसायन नसून अनेकांचे मिळून एकत्र कुटुंब आहे (Retinoids).

नंतर ते वनस्पतींत शोधण्यात आले. तेव्हा असे आढळले की नारिंगी रंगाच्या भाजीपाल्यांत ते Carotene या रुपात आढळते. किंबहुना गाजरामध्ये (Carrot) ते विपुल असल्यानेच त्याला हे नाव पडले. Carotene हे Retinol चे पूर्वरूप (precursor) आहे. अशा भाज्यांमधून ते शरीरात गेल्यावर त्याचे पक्क्या ‘अ’ मध्ये रुपांतर होते.

आहारातील स्त्रोत:
Foods+High+in+Vitamin+A+Carrots+Papaya+Squash+Fish+Meat+Eggs+&+Cheese.jpg

१. शाकाहार: गाजर, तांबडा भोपळा, रताळे, हिरव्या पालेभाज्या, इ.
२. प्राणीजन्य आहार: यकृत, मासे, दूध, अंडे.

आता या दोन्ही प्रकारच्या स्त्रोतांमधील फरक पाहू. शाकाहारातून Carotene मिळते आणि शरीरात त्याचे ‘अ’ होते. ही प्रक्रिया होताना एक महत्वाचा बदल होतो. जर आपण Caroteneचे १० भाग खाल्ले तर शरीरात त्यापासून फक्त १ भाग Retinol (‘अ’) तयार होते. शुद्ध शाकाहारीनी हा मुद्दा ध्यानात घ्यावा. म्हणून त्या भाज्या भरपूर खाल्ल्या पाहिजेत. याउलट प्राणीजन्य आहार थेट Retinol पुरवतो.
आहारातून शोषलेल्या ‘अ’ चा बऱ्यापैकी साठा आपल्या यकृतात केला जातो. तिथून गरजेप्रमाणे ते सर्व शरीराला पुरवले जाते. त्यातील डोळ्याचा वाटा महत्वाचा आहे.
अलीकडे तेलासारख्या खाद्यांमध्ये कृत्रिम ‘अ’ घालून त्यांना ‘ संपन्न' केले जाते. त्यामुळे रोजच्या स्वयंपाकातून ते सर्वांना मिळू शकते.

शरीरातील कार्य:
१. त्याचे सर्वात महत्वाचे कार्य आपल्या दृष्टीसंदर्भात आहे. दृष्टीपटलामध्ये Rhodopsin हे प्रथिन असते ज्यामध्ये ‘अ’चा समावेश असतो. प्रकाशकिरण या प्रथिनावर पडल्यावर अनेक रासायनिक क्रिया होतात. त्यातून आपल्या मेंदूला ‘दृष्टीसंदेश’ पाठवला जातो. निरोगी दृष्टीसाठी आपल्या दृष्टीपटलात Rhodopsin चा भरपूर साठा असावा लागतो.

२. आपल्या त्वचेवर आणि सर्व पोकळ इंद्रियांमध्ये एका पातळसर संरक्षक पेशींचे (epithelium) अस्तर असते. या सर्व पेशींना ‘अ मजबूत करते. या पेशी श्वसनमार्ग, मूत्रमार्ग, आतड्यांमध्ये आणि अन्यत्रही संरक्षक असतात. असे हे अखंड अस्तर आणि त्वचेवरील थर रोगजंतूना रोखण्याचे काम करतात.

३. सर्व पेशींमध्ये ‘अ’ सूक्ष्म पातळीवर काम करते. त्याद्वारे ते अनेक जनुकांच्या नियंत्रणात भाग घेते. परिणामी ते पेशींची वाढ आणि विकास या मूलभूत गोष्टींचे नियंत्रण करते.

४. त्याचा antioxidant हा अजून एक महत्वाचा गुणधर्म. पेशींमधील रासायनिक क्रियांतून free radicals प्रकारची अस्थिर रसायने तयार होतात. ती जर जास्त प्रमाणात साठू लागली तर त्याचे दीर्घकालीन दुष्परिणाम होतात. त्यातून कर्करोगादिंचा धोका संभवतो. पेशीतले antioxidant पदार्थ या घातक अस्थिर रसायनांचा नायनाट करतात. या कामी ‘अ’ च्या जोडीने ‘इ’ व ’क’ या जीवनसत्वांचे योगदान महत्वाचे आहे.

अभावाचा जागतिक प्रादुर्भाव:
जगातील ७५ देशांमध्ये हा मोठा आरोग्य-प्रश्न आहे. त्यातले बरेचसे देश दक्षिणपूर्व-आशियाई व आफ्रिकी आहेत. प्रौढांच्या तुलनेत मुलांत ‘अ’ चा यकृत-साठा बराच कमी असतो. त्यामुळे त्यांच्यात अभावाची लक्षणे लवकर दिसतात. आज जवळपास २५ कोटी मुले या अभावाची शिकार झाली आहेत. त्यांच्या डोळ्यांचे आरोग्य चिंताजनक आहे. त्यापैकी सुमारे चार लाख मुले दरवर्षी अंध होतात. यावरून या प्रश्नाचे गांभीर्य कळेल.

आहारातील अभावाखेरीज आतड्यांच्या व स्वादुपिंडाच्या काही आजारांमध्ये ‘अ’ चे शोषण नीट न झाल्याने अभावाची लक्षणे दिसू शकतात.

अभावाचे परिणाम:
१. दृष्टीवरील दुष्परिणाम सर्वात महत्वाचे. रोगाच्या सुरवातीस जेव्हा Rhodopsinचा साठा कमी होऊ लागतो तसे रुग्णास अंधुक प्रकाशात कमी दिसते. पुढे रातांधळेपणा होतो. या स्थितीतच ‘अ’ चे उपचार सुरु करायचे असतात. जर दुर्लक्ष केले तर मग दृष्टी हळूहळू अधू होत जाते. त्याचबरोबर डोळ्यातील अस्तराचा ऱ्हास होऊन डोळा कोरडा पडतो. याही स्थितीत दुर्लक्ष केल्यास डोळ्याची अवस्था खराब होत शेवटी पूर्ण अंधत्व येते.
अभावाच्या सुरवातीस जर डोळ्यांची तपासणी तज्ञाने केली तर त्यात काही वैशिष्ट्यपूर्ण ठिपके (Bitot spots) दिसू शकतात.

२. त्वचेवरील परिणाम : ती कोरडी पडते. जाड, लालसर व खवले पडल्यासारखी दिसते आणि खूप खाजते.

३. जंतूसंसर्ग : रक्तक्षय आणि दुबळ्या प्रतिकारशक्तीमुळे शरीरात जंतू सहज शिरतात आणि विविध दाह होतात.

उपचार:

अभावाची लक्षणे दिसू लागताच त्वरीत डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार चालू करावेत. त्यासाठी ‘अ ’च्या गोळ्या मिळतात. गंभीर रुग्णांमध्ये इंजेक्शनचा पर्याय वापरला जातो.
रोगप्रतिबंध:
आपल्या देशातील बालकांना शालेयपूर्व वयात रोगप्रतिबंधक म्हणून ‘अ’ चे मोठे डोस देण्याची पद्धत अवलंबली जाते.

‘अ’ चे उपचार नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावेत. अनावश्यक जास्त डोस घेतल्यास त्याचे यकृत, मेंदू व त्वचेवर दुष्परिणाम होतात.
* * *

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

२. जीवनसत्व असले तरी ते संयुग रुपात असणार एकटे नसणार .मग प्रतेक संयुगे वेगळी असणार हे सरळ आहे >>>
होय बरोबर आहे. योग्य मुद्दा.
या अनुषंगाने एक रोचक तुलना दाखवतो.

समजा एक माणूस अ जीवनसत्वाची गरज फक्त गाजर खाऊन भागवतो आहे तर दुसरा माणूस कुठलातरी प्राणीजन्य पदार्थ खाऊन.
प्राणीजन्य पदार्थांमध्ये तयार स्वरूपातील अ जीवनसत्व असते आणि जेवढे खाऊ जवळजवळ तेवढेच शोषले जाते.

या उलट वनस्पतींमधील हे जीवनसत्व आपण ६ मायक्रोग्रमस खाल्ले तर शरीराला फक्त एकच मायक्रोग्राम मिळतो. इतका तो फरक आहे.

वनस्पतींमध्येही त्या जीवनसत्वाची संयुगे जशी बदलतील त्यानुसार शोषणात थोडाफार फरक पडेल.

लोकांची एक मानसिकता असते.
"थंडा मतलब कोकाकोला"
म्हणजे कॉल्ड ड्रिंक्स.
त्यांच्या मेंदूत तेच फिक्स केले आहे हुशार लोकांनी.
जितकी जीवन सत्व आहे ,क्षार आहेत, किंवा
बाकी पोषक घटक आहेत.
तज्ञ त्या मधील एकच प्रकार घेवून त्याचे महत्व सांगतात.( त्यांचे लेखन योग्य च असते पण तज्ञ नसणाऱ्या लोकांसाठी ती अर्धवट माहिती असते)
हाडे मजबूत हवीत तर कॅल्शिअम हवं मग कॅल्शियम असणारे पदार्थ खा.
पण हाडाची मजबुती फक्त कॅल्शिअम वर अवलंबून आहे?
इथे उत्तर अपेक्षित.
बाकी कोणतेच घटक नकोत ?
इथे पण उत्तर अपेक्षित
चोरस आहार आणि चोरस लेखन हे आरोग्यास चांगले .
हे वाक्य मला तरी योग्य वाटत आहे.
फक्त A जीवनसत्व नजर सुधारते?
त्याला कोणत्याच बाकी पोषक घटकांची गरज नाही?

आरोग्य हा विषय दलदली सारखा आहे जितके हात पाय हलवाल तितके जास्त फसत जाल.
दलदली मध्ये हातपाय हलवले को अजून खोलात जातो माणूस आणि शेवटी अंत.
निष्कर्ष काहीच नसतो.
पारंपरिक आहार घ्या जास्त विचार करू नका.
निवडून हवं तेच घेण्यात आणि नको ते फेकून देण्यात शरीर सक्षम आहे.
चिंता विरहित जागा

वेळ जात नाही म्हणून कीबोर्ड बडवत बसण्यापेक्षा डेटा पॅक चा उपयोग दुसऱ्या कामासाठी चांगला करता येईल. नाही का?

Hemant33 जिथे तिथे आपल्या पिंका टाकायलाच हव्यात का ?ईथे टाईमपास करून जनरल सरसकट विधान करण्यापेक्षा खरच नीट माहिती जमवून एक सविस्तर लेख लिहा की आहारावर..

Pages