कविता एक प्रवास (१)

Submitted by अज्ञात on 14 June, 2008 - 14:06

{या क्षेत्राशी माझा दुरान्वयेच संबंध असूनही सतत्याने चाललेला हा प्रवास मलाच आश्चर्यकारक आहे. आजवरची ही प्रक्रिया आणि विषय, कल्पना, विचार, आकार, आशय, शब्द, मांडणी यात वेळोवेळी होत गेलेले बदल, तसेच लिहिण्यापूर्वी, लिहितांना आणि लिहून झाल्यावर जाणवणार्‍या कळा आपणा सर्वांशी शेअर कराण्यासाठी केलेला हा प्रपंच !! मझ्या प्रवासातले टप्पे आणि अनुभव यांची त्या त्या वेळेची नोंद कवितांच्या डायरीत मी करून ठेवलेली आहे. हे सगळं माझं माझ्यापुरतंच आहे कारण "मायबोली" व्यतिरिक्त इतर कुठेही, कुणाजवळही मी जाहीर झालेलो नाही. माझी अजणता सज्ञान व्हावी ही अपेक्षा.}

------------------------------------------------------------------------------------------
कविता एक प्रवास (१)

नदीचं मूळ आणि संतांचं कुळ शोधू नये म्हणतात तरीही त्यांचे कुलवृत्तांत आणि उगम स्थानं यांचं महत्व कमी होत नाही. उलट एखाद्याला झाला तर त्याचा फायदाच होतो, वाल्याचा वाल्मिकी झाला तसा....!!

तसं पाहिलं तर मी अपघातानंच कविता लिहायला लागलो. १९९९ च्या 'फ्रेंडशिप डे' ला माझ्या मित्राच्या मुलींनी मझ्या मनगटावर अस्फुट प्रेमाने ओथंबलेला "रेशिम धागा" बांधून हृदय स्पर्श केला आणि परीटघडीच्या स्वास्थ्याला झुगारून, निरागस बालमनाची अस्वस्थ कोंडलेली अवस्था उचंबळून आली. मी भावनेत चिंब बुडालो. त्या दिवशी मला झोपच लागली नाही. तो प्रसंगच इतका अल्हाददायक आणि अनपेक्षित होता की माझं 'वडील वय' गळून पडलं आणि मी त्यांच्या वयात तरंगू लागलो. हा कायाकल्प विलक्षण होता. त्या भावनांचे पदर सप्तरंगांच्या पलिकडले होते. एक वेगळंच सक्षात्कारी विश्व त्यात मला दिसलं . त्या दिवशी त्यांच्या त्या कृतीला प्रतिसाद म्हणून कांही शब्द कागदावर उतरले. त्यात हृदयाचा ओलावा होता, आनंदाश्रूंचा शिडकावा होता, संवेदनांचा शहारा होता, आशीर्वादाचा सुगंध आणि कृतज्ञतेचा इशारा होता.

दुसर्‍या दिवशी आम्ही असेच, सर्वजण जमलो असतांना, हो नाही म्हणता म्हणता मनाचा हिय्या करून, एक गम्मत म्हणून ते शब्दांकन वाचून दाखवलं. घरातल्या घरात जाहीर कविता वाचन झालं. (अरे किती छान "कविता" !! असं उपस्थित सर्व म्हणाले म्हणून ही "कविता")

बॉय फ्रेंड-

जग हे जगण्यासाठी कसे हे शोधत शोधत फिरतांना
एक क्षण मला गवसला आनंदामधे रमण्याचा

मला 'बेस्ट बॉय फ्रेंड' केल्याने 'मॅन'चा झाला 'बॉय'
मन आनंदले वय आटल्याने 'प्रिया' तुला हाय !

ऐकुन आला गोड शहारा 'काका' 'मित्र' झाला आता
चितारले मग चित्र मनी मी कशी असावी तू जगता.......

.... अशीच गोड दिसत रहा गलावरती खळी अंथरत
सतत खळखळत हसत रहा अधर अधर मिश्किल बोलत

केंद्र बिंदू जरूर हो पण आपले काटे विसरू नकोस
कढतांना काटा देखिल कुणाला तू दुखवू नकोस

जगामधे या वावरतांना स्वतः कधी तू हरवु नकोस
तुझ्या आजच्या ह्या मित्राला भविष्यातही विसरु नकोस

मित्रत्वाचे हे नाते तू वयात कधिही मोजु नकोस
या नात्याचे बंधन सखये मनात दटुन ठेवु नकोस

अशीच मैत्री राहो आपली या जन्मी अन पुढेहि ती
हीच प्रार्थना करून प्रभुशी जगू शांतता या जगती

जगाला 'जग' म्हणत जगात 'जगत' 'जगवत रहा'
तुझ्यामधिल त्या सुधा गुणांनी आनंदाला लुटत रहा

................................१-०८-१९९९,नाशिक

मदत-

'स्नेहलता' तू लतेसम असो सुगंध दरवळ चोहिकडे
या मित्राला गर्व तुझा ग आनंदित तो आज गडे

वय अंतर ठेउन बाजुस तू मित्र म्हणुनि या काकाला
संबोधिताच बंधित झाला तुझ्या हव्या त्या कामाला

असेच जगणे तव मैत्रीचे वय विसरुन मी जात असे
हाच खरा आनंद मनीचा पुन्हा मी बालपण जगतो कसे

या वर्षीची ही मैत्री तव असो जन्मभर अशीच ग
माझ्या अस्तित्वावर ठेविल उर्मी प्रेमळ बांधुन ग

हीच भावना अशीच निर्मळ ओंजळीत तव जपून ग
मलाही करशिल 'मदत' ठेवण्या माझे बालपण टिकून ग

................................१-०८-१९९९,नाशिक

अजून एक पऊल पुढे म्हणजे आता मला नवीन मैत्रिणी मिळाल्या होत्या. एका अनोख्या स्वप्ननगरीत मी वावरू लागलो होतो. दृष्टी बदलली होती. वृत्ती संवेदनशील झाल्या होत्या आणि विचारांना वाट सापडली होती. माझ्या मूळ प्रकृतीच्या आधाराने, 'शब्द', ताल-सूर-लय-वृत्त-छंद पकडून बगडायला लगले. ही १९९९ सालची गोष्ट !!

नाही म्हणायला माझं लग्नं ठरलं तेंव्हा, १९७६ साली, असंच कांहीसं झालं होतं. माझा तसा 'प्रेमविवाह' पण 'ऍरेंज्ड' पद्धतीने झालेला. म्हणजे आम्ही एका नटकात काम करत होतो. राज्य नाट्य स्पर्धेचं. "ही एक धर्मशाळा". दोन अडीच महिन्यांच्या तालमीत झालेली ओळख. मी 'तिच्या आजोबांच्या ' भूमिकेत, तिच्या वडिलांच्या विरोधाला न जुमानता, तिचं तिच्या आवडीच्या मुलाशी लग्न लावून देतो असा प्रसंग होता. भूमिका लहान असल्याने अवांतर गप्पांना भरपूर वेळ. प्रयोग छान झाला. सर्वांनी कौतुक केलं. आम्ही दोघांनी एकमेकांच्या अभिनयाचं विशेष कौतुक केलं आणि तालमींचा समारोप झाला. एकाच लहान शहरात आणि अनेक समायिक ओळखी त्यामुळे कधि मधी रस्त्याने जाता येता भेट, सर्वसाधारण चौकशा, गप्पा इ. होत असत.

एकदा नाटकातल्या एका व्यक्तिने मला सांगितलं "शास्त्रीबुवा, (माझा नाटकात ८० वर्ष वयाच्या इतिहास संशोधक शास्त्रीबुवांचा रोल होता) आपल्या गीताचं लग्नं ठरलं" आणि प्रेम होणं म्हणजे काय असतं हे मला कळलं. अर्थात; ती बातमी (सिनेमा किंवा सिरियल प्रमाणे) चुकीची निघाली. तिच्या मैत्रिणींनी माझ्या जवळ विषय काढला. एव्हाना मला 'ती' जाणीव झालेलीच होती. त्यांच्या घरी सुचविण्यात आलं, ते रीतसर घरी आले, लग्न ठरलं- झालं.

सांगायचा मुद्दा असा की लग्न ठरणे आणि होणे यात नऊ महिन्यांचे अंतर होते. आता भेटींचे संदर्भ बदलले होते आणि आम्ही आनंदसागरात डुंबत होतो. त्या अवकाशात, आठ दिवसांसाठी, ती जेंव्हा परगावी गेली होती, तेंव्हा एकदा असाच झरा पाझरला होता. त्या वेळचा तो विषय, ती हुर हुर, शब्दांचं रूप, छंद वेगळा होता. गुदमर शृंगारला होता.

तृप्ती-

मंद मंद मधुगंध सुगंधित
धुंद फुंद ही संध्या शांत
तरिही असे का सुन्न सुन्न मम
प्रसन्नतेतही मन अशांत

सुवर्ण स्वप्नांच्या रश्मींतुन
मनात माझ्या तू प्रतिबिंबित
कुंद संथ घन अंधारातही
एक दीप तू अखंड तेवत

व्याध मी चंचल दौडतसे बघ
रानोमाळी उधळत चौखुर
उत्साहित गे करण्या मृगया
आठवणींची तव प्रीतीच्या

थकलो अनंत प्रयत्ना अंती
कशी घालवावी ही अशांती
विचार केला जसा निवांती
आलो निष्कर्षास प्रभाती

तू अन मी जरी असे एक तरी
आत्मा आपुला एक तरीही
तृप्तीसाठी भेट जरूरी
आहे शरिरांची..

...................२ मे १९७६, नाशिक

या आधी १९६६ साली, शाळेत असतांना, गंमत म्हणून, ' वेड लागले राधेला ' ह्या चालीवर एक विडंबन लिहिलं होतं. त्या वेळच्या वहीतला 'तो' कागद, जीर्ण झाला असला तरी मी जपून ठेवला आहे. ते वय; चेष्टा मस्करी हसण्या खिदळण्याचे होते.

जो तो सांगे ज्याला त्याला
वेड लागले काँग्रेसला // धृ //

प्रयत्न चालती पैशांसाठी
वशिलेबाजी जागोजागी
मिठी मारुनी बैलजोडिला
म्हणती द्या मते या बैलांना //१//

छप्पन इंची डगला शिवला
अठरा इंची टोपी ल्याली
नउ वारीचं धोतर केलं
सावरती त्या पोटाला //२//

पुढे अजून कडवी आहेत...

..........२० ऑक्टो १९६६, नाशिक

माझ्या मोठ्या मुलीच्या लग्नात तिच्या विरहाच्या कल्पनेनं ढवळून गुदमरलेलं- विस्कटलेलं मन फुटून शब्दबद्ध झालं २००० साली. त्या वेळची माझी व्याकूळ अस्वस्थ मानसिकता वेगळी होती. इथं मझ्या रचनेचं स्वरूपच बदललं.

मुलीस-

सगळ्याच घरांना असतात दारं
पण सगळीच नसतात मायेची कोठारं
तरीही...............

ऊन तशी सावली असते
काटेरी झाडावरही फूल उमलते
दरी ओलांडणे अशक्य जरूर वाटते
पण पूल बांधून ते कोडे सुटते

अनेक शिकल्या आहेस गोष्टी
अर्थ तुला समजेल आता
तरीही अजून खूप कळतील
आयुष्याचं कोडं उलगडता

व्यवहाराच्या धाग्यांबरोबर
गुंफत रहा मायेची वीण
कधीच वाटून घेऊ नकोस
पाणी पाजण्याचा वृथा शीण

मायेनं मिळालेलं एक माणूस
दागिन्यांहून मोलाचं आहे
अडचणीला धावलेल्या मित्राचं मोल
पृथ्वीच्या तोलाचं आहे

आयुष्यभर जरूर झिजावं
त्यात बरंच दुसर्‍यासाठीही असावं
इतरांबरोबर आपणही हसावं
फुलत फुलत आयुष्य जगावं

फुलणं प्रत्येकाचा स्वभाव
आणि फुलवणं हा एक धर्म
धर्माशिवाय फुलणं ही एक कवायत
जाण हे आयुष्याचं मर्म

भितिदायक अंधार
दिवा लावून विझव
प्रत्येक प्रश्नाला असते उत्तर
शोधण्यात आयुष्य झिजव

प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक उचल
काळजीची न करता काळजी
कर तिची
सवकाश उकल

जमेल तेवढं पहात रहा
पहाता पहाता कळेल
आपली हिंमत पक्की असेल
तर अंधार सावली आपोआप पळेल

भिती भिती जी काय असते
केंव्हातरी उसळेल
जोडलेल्या मणसांच्या भितीने
तिथल्या तिथे 'ती' जळेल

सोपे प्रश्न आधी सोडव
परिक्षेचा थोडा वेळ
नहीतर आयुष्य अवघड आहे
नाही बसणार लवकर मेळ

'त्याने मला' की 'मी त्याला'
कोणी आधी समजून घ्यावे ?
समजून घेणे हीच गरज
अटी तटी व्यर्थ आहे

लग्न हा एक खेळ आहे
आयुष्यामधे रमण्याचा
नाही हेव्या दाव्यांचा
नाही गुंता करण्याचा

झालाच गुंता सोडवावा कसा
दुसर्‍याला आधी समजण्याचा
घ्यावास तू
आज वसा

उदबत्ती जळते
जळतांनाही दुसर्‍यासाठी
जळल्यावरची उरली राख;
राख नव्हे तो अंगारा
मस्तकावर लावण्यासाठी

असेच असावे तुझे कार्य
निष्ठा आणि विश्वासाचे
दिसतांना धूर असला तरी
सुगंधी श्वास होण्याचे

प्रेम सन्मान हे
नेहमीच असतात प्रतिसाद
ज्यासाठी घालावी लागते
प्रथम आपल्यालाच साद

तोडणे सहज जोडणे असते अवघड
हे ठऊक आहेच तुला
गोड फळे चखण्याची वाट
कठिण असते पाउला

तुझे आयुष्य जसे असो तसे
आहे तुलाच ते जगणे
तरीही समजू नकोस कधीही
माहेर तुझे हे उणे

मित्र असावा कोण कसा
कधी न तू जाणला
तुझ्याच जवळी इतकी वर्षे
बाप म्हणुन तो जगला

ताडण केले बोल बोलला
दुखवलीस तू कदा
तुला न कळले सतत विचारी
तुझे भले तो सदा

आज रोज जरी जोडत असशी
पाश नविन तू जगा
नकोस तोडू नाळ तुझी गे
अर्जव मज हे तुला

जीवन साथी नविन मित्र तव
ठेविल जपुन तुला
तरीही आमुच्या आठवणींनी
झुलव तु जीवन झुला

............८ जुलै २०००, नाशिक

माझं असं हळवेपण म्हणजे, माझ्या दृष्य व्यक्तिमत्वाच्या तुलनेत, " राक्षसाच्या गळ्यातून किन्नराचा आवाज निघण्या इतका शत प्रतिशत विरोधाभास होता. अशाच गोष्टींमुळे; चेष्टा होण्याच्या भितीने; माणूस व्यक्त व्हायला कचरतो, गुदमरतो, आणि मग प्रौढ होतो.

सुदैवाने माझी वेळीच कागद-पेनशी मैत्री झाली आणि मन मोकळं करायला 'मुका' श्रोता मिळाला !! सीता हरण झ्याल्यावर रामही पशु पक्षी झाडापानांजवळ सीतेची चौकशी करत होता म्हणे. त्या वेळी त्याला जे दिसेल त्याच्या समोर व्यक्त होणं ही गरज होती. आज ती तुम्हा आम्हाला आहे.

शरिराच्या वार्धक्यावर आपला ताबा नसला तरी मनाच्या सर्व अवस्थांवर आपण मरेपर्यंत केंव्हाही कसाही कितीही वेळा विहार करू शकतो. त्याचं तारुण्य टिकवण्यासाठी, ' गा़ळ साचूच न देणं; वेळोवेळी व्यक्त होत अंतरंग स्वच्छ करत रहाणं' हा प्राथमिक, सरळ, सोपा मार्ग असतो.

आता अशा अधुन मधून येणार्‍या कल्पना मी वेळोवेळी लिहून ठेवू लागलो. त्यांना समर्पक शीर्षकेही देऊ लागलो.

(क्रमशः)....

गुलमोहर: 

आदित्य,
मस्त आहे. आवडलं. खरच, वय कमी असणं, हे शरीरापेक्षा मनावरच अवलंबुन असतं.
अनघा

अनघा,
प्रतिसादबद्दल आभार. पुढचंही वाच आणि कळव. आवडेल.

"अज्ञात" हेच माझं नाव !!! बाकी "ADNYAT" वर क्लिक केलं की कळेल !! भेट दिल्याबद्दल आभार ! पण लेख आवडला की नाही ते कळलं नाही. सगळे भाग वाच आणि कळव. पाचवा भाग लवकरच येइल. मी वाट पाहीन.
.....................अज्ञात

खूपच म्हणजे खूपच छान........ कल्पना

अज्ञात
छान आहे लेखन , आणि तुमच्या कवितेचा अर्थात मनातील स्थित्यंतराचा प्रवास.
-----------------------
हर देशमे तू हर वेषमे तू , तेरे नाम अनेक तू एक ही है
तेरी रंगभुमी यह विश्वंभरा , सब खेलमे मेलमे तूही तो है

कल्पना_०५३ आणि जो_स,
अभिप्रायाबद्दल आभार. बकीचे भाग पण वाचलेत का? नसतील तर प्लीज वाचा आणि कळवा.
......................अज्ञात

चान आहे, पन खरा सान्गु का पुर्न वाचल्या शिवाय काहिच सान्गावास वातत नाहि ! http://www.maayboli.com/node/2360 - 2 may 1976 – nashik - ह्याचि शेवतचि ओल मि माझ्या बोय फ्रेन्द ला दिलि......

सध्या येवधिच दाद, लवकर देइन मनापासुन वाचुन दाद, एग्जाम चा अभ्यास करतेय.

सुरेख! माझ्या मोठ्या बहिणीचे लग्न झाल्यावर माझ्या वडिलान्चे आतडे असेच तुटले होते. माझे लग्न झाले तेव्हा मी जाताना बाबान्ना बरेच शोधले पण ते दिसलेच नाही. त्यान्ना माझा निरोप घेता आला नाही. नन्तर लग्नाच्या कसेट मधे बघितल्यावर जड पावलान्नी मागच्यामागे निघुन जाणारे बाबा दिसले. ते पाहताना अश्रू आवरताच आले नाही. आज तुमच्या कवितान्नी तो प्रसन्ग पुन्हा जागा केला! माझे बाबा माझे अजुनही मित्रच आहेत. त्यान्नी मनोमन माझा अगदी असाच निरोप घेतला असणार!

सुदैवाने माझी वेळीच कागद-पेनशी मैत्री झाली आणि मन मोकळं करायला 'मुका' श्रोता मिळाला ....khupach chan ahe

मला कविता आवडतात.. पन फक्त वाचायला...व एकायला..करता येत नाहि तुमच्या कविता आवडल्या खुप च् सुन्दर......

कल्पना आवडली. एका कवीचा प्रवास पाहणं खूप महत्वाचं आहे. तो माहीत असेल तर त्याचं आत्मचिंतन, प्रकटीकरण, शैली समजून घ्यायला मदत होते..

मी वाचतोय काका.

मला कविता आवडतात.. पन फक्त वाचायला...व एकायला..करता येत नाहि तुमच्या कविता आवडल्या खुप च् सुन्दर......