कविता एक प्रवास (२)

Submitted by अज्ञात on 18 June, 2008 - 14:01

कविता एक प्रवास (२)-

एकदा आमच्या नटकाचा दिग्दर्शक मुकुंद कुलकर्णी एका नटकाबद्दल चर्चा करण्यासाठी घरी आला होता. मुख्य चर्चा झाल्यावर फराळपाणी करतांना त्याला माझ्या "त्या" रचना वाचून दाखवल्या. तो 'त्या छान आहेत' म्हणाला पण तो असंही म्हणाला 'पण ह्या कविता नसून तुझ्या संवेदना आहेत. मी त्याला प्रश्न केला की, मग कविता कशा असतात ? त्यावर त्याने अत्यंत समर्पक उत्तर दिलं ते असं :- " ज्या सर्व समावेशक असतात, ज्यांचे संदर्भ व्यापक असतात, कुणालाही तो आपला विषय वाटतो, जेंव्हा त्यातून कांही संदेश; कांही नवीन विचार; नवी अनुभूती; नवीन कल्पना उत्सर्जित होतात किंवा अल्हाददायक स्वप्नं उमलतात, एखादी वस्तुस्थिती डोळ्यासमोर तंतोतंत उभी करतात, कांही अनाकलनीय उकलून दखवतात, अज्ञाताची सफर करून आणतात" त्या कविता असतात किंबहुना त्यांना कविता म्हणतात. पण हरकत नाही तू छान लिहितो आहेस. माणसानं जरूर लिहावं. लिहिल्याने आत दडपलेल्या आकांक्षा बाहेर पडतात. ती आपल्या वेदनांची, दडपणांची, आतंकाची रूपकं असतात, जी हवी तशी-हवी तेंव्हा आणि हवी तितकी फक्त स्वतःशीच बोलता येतात. म्हणून स्वतःसाठी लिहावं. आपला आपल्यालाच आनंद मिळतो, दुसर्‍याला मिळो न मिळो.

त्या दिवशी मी एक डायरी केली. तीत पहिली 'विडंबन्'-शाळेतली कविता लिहिली, नंतर सगळ्या, आतपर्यंतच्या सर्व रचना, त्यांना अनुक्रम, तारीख, स्थळ आणि विशेष असेल तर तिची वेळही लिहून संपादित केल्या.

जसं येत गेलं तसं लिहित गेलो. माझं माझ्याबरोबर वाटत गेलो. सुरुवातीला आकडा वाढला की आनंद होत असे.येवढं आपल्याला सुचतंच कसं याचं आश्चर्य वाटत असे. केंव्हातरी हे संपेल असंही वाटत असे. पण ते कधीच न संपणारं आणि आमरण आयुष्य उलगडंत रहाणारं कोडं आहे हे आता कळलंय.

धनंजय गोवर्धने, माझा चित्रकार-कवी-साहित्यिक मित्र. त्याला मी कौतुकाने पहिल्या रचना वाचून दाखवल्या. त्या वेळी त्या १०-१५ च होत्या. त्यानेही मुकुंद साऱखंच मत दिलं आणि कंही सुचनाही केल्या ज्यांचा प्रभाव मी पुढे अनुभवला.
(१). प्रत्येक वेळी कल्पनांची मांडणी वेगळी हवी. (२). शब्द भांडार व्यापक पाहिजे. (३). वेगवेगळे विषय हतळले पाहिजेत. अर्थात त्याने हेही सांगितले की, (४). "प्रत्येक कवी-साहित्यिक्-चित्रकार्-गायक यांचा आपापला पिंड असतो. त्याची एक विशिष्ट शैली असते जी त्याच्या मूळ स्वभावाशी निगडित असते. तरीही त्याला पर काया प्रवेश करून इतरांच्या भावना आत्मसात करता यायला हव्या म्हणजे त्या आपोआप मांडतापण येतील."(५). कुणाची नक्कल अजिबात करू नकोस पण इतरांचं आवश्य वाच त्यात तुला आडलेल्या ठि़आणचा मर्ग सापडू शकेल, मांडणीचा नव आकार दिसू शकेल, आवश्यक्-अनावश्यक यातला भेद उमजेल आणि नेमकेपण येईल. (६). कवितेत शब्दांबरोबर 'जाण' ही तितकीच महत्वाची आहे कारण ती असली तरच आशय मांडता येईल ( गहन विषयाची उकल समजण्यासाठी वाचणार्‍यालाही ती असावी लागते). "जाण-शब्द-आशय-विषय" हे एकमेकांना धरून "लय-ताल-छंद-वृत्त" यांना सोबतच घेऊन येतात. (७). कुण्या मोठ्या कवीनं म्हटलंय, " पोएम ईज अ स्पाँटॅनिअस ओव्हर फ्लो ऑफ पॉवरफुल फीलींग्ज, री सेट इन ट्रँक्विटी" (८). कविता कळानुरूप, " परिस्थिती-अनुभव्-वय आणि संवेदना अशी बदलत जाते, ती बदलली पाहिजे". बाळपण, तारुण्य, प्रणय, अस्वास्थ्य, शोध, प्रार्थना, निष्कर्ष, उपदेश, हे तिचे विविध टप्पे आहेत. कवीचं वैशिष्ठ्य हे असायला हवं कि तो कुठल्याही टप्प्यावर केंव्हाही रमू शकेल. तिथे त्याला 'लिंग जात पात वय' कुठेही आडवं येत नाही. ( उदा. विंदांच्या बाल, पडगांवकरांच्या तरूण, सुरेश भटांच्या मेंदीच्या पानावर).

प्रत्येक कविता थेट समुद्रपर्यंत पोहोचेलच असं होत नाही. एखाद्या दुसर्‍या प्रवाहाला मिळून तिचं अस्तित्व सीमित होऊ शकतं, पण म्हणून तिनी वाहूच नये हा विचार खुळा आहे. तिने तिच्या वेशीपर्यंत जरूर वहावे. वेस ओलांडण्याची प्रेरणा तिला वेशीच्या आतही भरपूर समृद्ध करू शकते.

कवींप्रमाणे कवितांची गूढ्गर्भता समजणार्‍या-समजू शकणार्‍या अथवा उकलू शकणार्‍या प्रकृती वेगळ्या असतात. अनेक व्यक्ति एकाच विषयाचे अनेक अर्थ लावून ते स्वतःच्या विचारवेदनेशी संलग्न करून समाधान पावू शकतात. ज्याचा त्याचा आपापला वेगळा सांप्रदाय असतो. आपण फक्त लिहायचं आणि द्यायचं काम करायचं. ज्याला जे हवं ते तो घेईल. आपला आनंद आपल्या जवळ.

सादरीकरणाच्या, "हलक्या फुलक्या, नर्म विनोदी, विडंबनात्मक, प्रणयधुंद," आणि चिंतनाच्या, साधनेच्या, अनुभूतीच्या, सुन्न करणार्‍या, गूढ आशयघन कविता वेगळ्या असतात. त्यांचा वाचक वर्गहि वेगळा असतो. जड कविता लिहिणार्‍याने वा उत्तम समज असणार्‍याने वाचल्या तर समजायला सोप्या जातात. संगीताची चाल मिळाली तर कुणालाहि सहज कळतात. कविता कशी वाचावी हे एक तंत्र आहे. ते ज्याला अवगत असेल तो शेवटच्या थेंबापर्यंत अस्वाद घेऊ शकतो. असो.

माझ्या बायकोला माझ्या कविता लिखाणाबद्दल अनादर नसला तरी आस्था मुळीच नाही कारण ते तिला हवं तसं, बाळबोध्-सरळ सरळ, झिम्मा फुगडी-भोंडल्याची गाणी-उखाणे किंवा बाळगोपाळांच्या बड्बडगीतासारखं नाही. तरीही मी आपला लिहितोच आहे. लिहिणार आहे. जे येतंय ते त्या त्या वेळच्या मुशीतून गाळून येतंय. स्वयंस्फूर्त येतंय. ही माझ्या जीवनपटाची लिपी आहे अविभाज्य अनुभूती आहे.

लिहून लिहून डायर्‍या संपल्या, नवीन सुरु झाल्या. सुरुवातीला वैयक्तिक, मग भावनिक, कधि नैमित्तिक, मधे व्यावसायिक, .........!! एकट्याच्या दुकट्याच्या, प्रश्नांच्या उत्तरांच्या, स्वस्थ अस्वस्थ, ताप पश्चात्ताप, संवेदना वेदना, क्षमा याचना, सौंदर्य प्रणय, असलेलं नसलेलं, हवंसं नकोसं, स्वर्ग निसर्ग, किती विषय आश्चर्याचा धबधबाच !!

प्रत्येक डायरीच्या अखेरीस आणि दुसरीच्या सुरुवातीस तेंव्हाचे जे विचार लिहिले आहेत ते पुढच्या भागात...........

...........................क्रमशः

गुलमोहर: 

छान लिहिलं आहे सीएल. विचारांचा सिक्वेन्स मस्त... <<<<वेस ओलांडण्याची प्रेरणा तिला वेशीच्या आतही भरपूर समृद्ध करू शकते..... >>>> हे आवडलं......<<<<<........ते तिला हवं तसं, बाळबोध्-सरळ सरळ, झिम्मा फुगडी-भोंडल्याची गाणी-उखाणे किंवा बाळगोपाळांच्या बड्बडगीतासारखं नाही......>>>>> हे नाही आवडलं. कारण हे प्रकार कमी लेखण्यासारखे नाहीत. प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या असू शकतात. असो... असेच लिहीत रहा.... आवडतं.....

अज्ञात, सुरेख लिहिले आहे. गद्य साहित्य लेखनाच्या बाबतीतही ह्या सूचना अतीशय मोलाच्या आहेत. फक्त त्यात लय-ताल-छंद-वृत्त येत नाही इतकेच.

मन्या ,
अपेक्षित प्रतिसाद. ते तिला हवं तसं, बाळबोध्-सरळ सरळ, झिम्मा फुगडी-भोंडल्याची गाणी-उखाणे किंवा बाळगोपाळांच्या बड्बडगीतासारखं नाही......>>>>> हे नाही आवडलं. यात उपेक्षा नाही. तिची आवड काय येवढंच काय ते सांगायचं आहे. नाहीतर, " ज्याचा त्याचा आपापला वेगळा सांप्रदाय असतो. आपण फक्त लिहायचं आणि द्यायचं काम करायचं. ज्याला जे हवं ते तो घेईल. आपला आनंद आपल्या जवळ".
आणि >"माझ्या बायकोला माझ्या कविता लिखाणाबद्दल अनादर नसला तरी आस्था मुळीच नाही "em> असं लिहिलं नसतं. कुठलंच साहित्य कमी लेखण्यासरखं नसतं. माणसांच्या प्रकृती वेगवेगळ्या असतात. मी आमच्या व्यवसायाच्या संदर्भात, मीच बनवलेल्या दोन डिझाईन्स कोणतं चांगलं; असं जेंव्हा एखादं गिर्‍हाईक मलाच विचारतं; तेंव्हा मी एक उलटा प्रश्न त्याला विचारतो, " श्रीदेवी चांगली की हेमा मालिनी ?"
दोन्हीही चांगल्याच आहेत आता तुम्हाला कुठली आवडली ते तुम्ही ठरवा !! कुणाला ही आवडेल कुणाला ती. असंच कवितेच्याही अथवा कुठल्याही आवडीनिवडीबाबत असतंच. असो. गैर समज नसावा म्हणून एवढा उहापोह. एकंदरीत स्पष्टोक्तीबद्दल आभार आणि धन्यवाद!!
वाय के के,
तुझेही प्रतिसादबद्दल आभार.

अज्ञात नेहमीप्रमाणे मस्तच लिखाण!
प्रत्येक कविता थेट समुद्रपर्यंत पोहोचेलच असं होत नाही. एखाद्या दुसर्‍या प्रवाहाला मिळून तिचं अस्तित्व सीमित होऊ शकतं, पण म्हणून तिनी वाहूच नये हा विचार खुळा आहे. तिने तिच्या वेशीपर्यंत जरूर वहावे. वेस ओलांडण्याची प्रेरणा तिला वेशीच्या आतही भरपूर समृद्ध करू शकते.........>>>>>

एकदम छान! असेच लिहित रहा!

कवितेवरच हे चिंतन अतिशय सुंदर आहे. तुझ्या मित्रांचे कविता आणि स्वसंवेदना यातील फरक समजावण खूप छान आहे. शिवाय कवितेला चित्रांशी जुळवणही मस्त!
पुढचे भाग वाचायला मिळू दे लवकर.

अतिशय सुंदर विचार !

सुंदर! मला व्यसन लावले हे फारच छान झाले.
कालच सामिल झालो आणि चालु नाही पळायला लागलो. तुमच्याकडुन प्रेरणा घेवुन मलाही लिहिता यायला लागेल.
अविनाश

खूपच छान..... मनाचा प्रामाणिकपणा आवडला......कल्पना

धन्यवाद कल्पना.
.......................अज्ञात