गेले ते "मोरपंखी" दिवस.

Submitted by केशवकूल on 15 September, 2022 - 07:34

मी दहावी पास झाल्यावर माझ्या बाबांच्या माझ्याबद्दलच्या अपेक्षा फार वाढल्या. आपला मुलगा कमीत कमी इंजिनिअर होणारच होणार आणि लगेच पहिले विमान पकडून अमेरिकेला जाणार अशी दिवास्वप्ने त्यांना पडू लागली. ती स्वप्ने खरी झाली आहेत अश्या थाटांत कॉलर ताठ करून ते कॉलनीत फिरू लागले. तरी बरं मला फक्त एकोणसाठ टक्के गुण मिळाले होते. गणितात माझी अवस्था वादळांत सापडून वाताहात झालेल्या जहाजावरील खलाशासारखी होती. एखाद्या फळकुटाला पकडून, वादळ आणि लाटांनी अस्त व्यस्त मार खाऊन अर्धमेला झालेला खलाशी शेवटी देवाच्या दयेने किनाऱ्याला पोहोचतो तसा मी गणिताच्या पस्तीस गुणांच्या काठाला येऊन थडकलो होतो. सायन्स मध्ये पाच वर्षे झाली पण अजून मला अर्किमेडिजचा सिद्धांत नीट समजला नव्हता. अर्किमेडिज कपडे न चढवता ‘युरेका, युरेका,’ ओरडत का पळाला? तो युरेका, युरेका असे ओरडत होता की यू रेखा , यू रेखा असं ओरडत होता? पुन्हा शास्त्र आणि गणिताच्या चक्करमध्ये अडकायचे? बाप रे! पण तो बाप रे बापच माझा एकमेव फायनॅन्सर असल्यामुळे माझा नाईलाज होता. शेवटी दबकत दबकत मी अकरावी सायन्सला प्रवेश घेतला.

कॉलेजात प्रवेश घेतल्यावर मी माझी स्ट्रॅटेजी फिक्स केली. आपल्याकडून आपण कुठेही कमी पडायचे नाही. सर्व लेक्चर्सला प्रामाणिकपणे हजेरी लावायची, नोट्स काढायच्या आणि मुख्य म्हणजे मुलींकडे अजिबात लक्ष द्यायचे नाही. परिणाम जो व्हायचा तो झाला. मी पहिल्या टेस्टमध्ये सुखरूप पास झालो.

ही जी गोष्ट मी इथे लिहितो आहे ती कॉलेज मधल्या “यशाच्या दहा गुरुकिल्ल्या” ह्या लिस्टिकलची नाही. की मला शेवटी अर्किमेडिजचा सिद्धांत कसा समजला त्याचीही नाही. ही माझ्या गणितांच्या सरांची आहे.

माझे गणिताचे सर हे किती महान होते ते मला टर्म संपल्यावर समजले. आधी मला (खर तर सर्वांनाच) ते खूप हुशार असावेत असा संशय होता. गणित हा सगळ्यांचा वीक पॉइंट असल्याने सुरवातीला त्यांच्या क्लासला शंभर टक्के हजेरी असे. आमच्या सिनिअर्सनी जेव्हा ते पाहिले तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला.

“तो काय शिकवतो ते तुम्हाला समजते? नाही ना. मग कशाला उगाच टाईमपास करता? फेल व्हायचा बेत असेल तर मग ठीक आहे. पास व्हायचे असेल तर जा आणि उदगीर सरांचा क्लास लावा.”

ह्यानंतर हजेरी शंभरची ऐशी टक्के झाली.

गणिताचा क्लास असला की सिनिअर आम्हाला खिडकीतून बारीक बारीक दगड मारत असत. काहीच्या काही कॉमेंट्स पास करत असत. नाव घेऊन शिव्या देत असत.

“ए जोश्या, आई+ल्या. काय आइ्न्स्टाइन व्हायचा बेत आहे काय?”

“अरे ए पडवळ, कॅनटीनमध्ये चहा वाट पाहतो आहे.”

“मार्तंड्या, आम्ही चाललो आहे मॅटीनीला. येणार तर चल लवकर.”

सर क्लासमध्ये आले की प्रेझेंटी घेत असत. प्रेझेंटी झाली की अर्धी मुलं सरांची नजर चुकवून पळून जायची. एके दिवशी प्रेझेंटी झाल्यावर सरांनी सांगितले, “माझ्या क्लासला ज्यांना बसायचे नसेल त्यांनी खुशाल निघून जा. आता ज्यांना जायचे असेल ते जाऊ शकतात.”

त्या दिवसापासून क्लासची हजेरी वीस टक्के झाली. वीस टक्के म्हणजे त्या क्लासमधल्या मुली. आणि मुलांपैकी मी. मला खूप एम्बरास व्हायचे. पण मी ही निश्चय केला होता. मला सरांची खूप दया यायची. बिचारे सर. जे लोक साधे, सरळ असतात त्यांना जग मूर्ख समजते. जे लोक छक्के पंजे करणारे, आत एक बाहेर दुसरे, स्वतःची टिमकी वाजवत फिरणारे असतात त्यांना समाज हुशार समजतो.

हळू हळू क्लासची हजेरी रोडावून एक टक्क्यावर आली. हा एक टक्का म्हणजे मी. मी एकटाच सरांच्या क्लासला सिंसिअरली बसत होतो. माझ्या मित्रांनी मला समजाऊन सांगण्याचा प्रयत्न केला.

“अरे तू हजेरीसाठी घाबरु नकोस. आपल्या कॉलेजमध्ये पाच रुपये दंड भरला की युनिवर्सिटीचा फॉर्म देतात. तुझ्याकडे पाच रुपये नसतील तर आम्ही देउ. मग तर झाले. अरे भित्र्या पोरी देखील क्लासला बसत नाहीत.” पण मी बधलो नाही. मला बाबांच्याकडे जाऊन उदगीर सरांच्या क्लास साठी पैसे मागायचे नव्हते. बाबांनी पैसे दिले असते पण एक जळजळीत प्रवचन ऐकवून.वर आयुष्यभर त्याची आठवण देत राहिले असते ते निराळेच.

“तेव्हा मी फी भरली म्हणून तुला आज हे दिवस दिसताहेत.”

बाबांनी जर “तेव्हा” स्वतःच्या मनाला तो ‘उत्तम ब्रेक’ लावला असता तर मला एकही दिवस बघावा लागला नसता हे ते सोयीस्कररित्या विसरतात. अर्थात मी बापाला पिताश्री म्हणणाऱ्यापैकी असल्यामुळे असे उघडपणे बोलू शकत नाही.

ह्या सर्व मानसिक टॉर्चरपेक्षा इथे मन लावून सरांची लेक्चर ऐकणे परवडले. शेवटी माझ्या मित्रांनी माझा नाद सोडला.

ह्या सरांची एक गंमत होती. जरी त्यांच्या क्लासमध्ये मी एकटाच बसत असे तरी ते क्लास मध्ये शंभर मुले बसली आहेत अश्या आविर्भावात शिकवत असत. मी समोर पुढच्या बाकावर बसलेला पण माझ्याकडे ते क्वचितच लक्ष द्यायचे. मधेच ते थांबायचे, “ हा ठोंबरे, तुझी काय डिफिकल्टी आहे?” ठोंबरे कॅंटीन मध्ये चहा ढोसत बसलेला असायचा. इकडे सर “मन्या ठोंबरे” ची डिफिकल्टी “समजाऊन” घेत असत आणि त्याचे शंका निरसन पण करत असत. कधी कधी सर “कुणाला” तरी खडू फेकून मारत असत, “मोबाइल बाजूला ठेव. मी काय सांगतो आहे इकडे लक्ष दे. तुझ्या बाबांनी पैसे भरून तुला कॉलेज मध्ये गेम खेळायाला पाठवलेला नाही.”

अश्या प्रसंगी मला सरांची दया यायची, कीव वाटायची. वाटायचे ह्यापेक्षा सर पार्कच्या बाहेर चणा शेंग का नाही विकत?

शेवटी एकदाचे वर्ष संपले. सरांचा शेवटला क्लास होता. सरांनी मनापासून “सगळ्या

क्लासला” बेस्ट विशेस दिल्या.

यथावकाश परीक्षा झाल्या. निकाल लागले. मी गणितात चांगल्या गुणांनी पहिल्या श्रेणीत पास झालो. उदगीर सरांच्या क्लासला जाणाऱ्या मुलांपेक्षा जास्त गुण मिळाले, मी खुश होऊन पेढे घेऊन सरांना भेटायला गेलो. सर कॉमन रूम मध्ये एकटेंच बसले होते. मला पाहून सरांच्या भुवया उंचावल्या, “कोण रे तू?”

मी थोडा खट्टू झालो, “सर मी तुमच्या क्लासमध्ये पहिल्या बाकावर बसत होतो.”

सरांच्या डोक्यांत ट्यूब पेटली असावी. “अरे हो, तू प्रभुदेसाई ना. तुला कसा विसरेन मी? निकाल बघितलास? किती मार्क मिळाले?”

मी लंगडा आणि एक्का असे बोलणार होतो पण वेळेवर स्वतःला सावरले, “सर एक्काहत्तर. आपली कृपा” मी सरांच्या पायाला स्पर्श करून पेढ्यांचा पुडा पुढे केला, “सर हे पहा. मी तुमच्या सर्व लेक्चरच्या नोट्स काढल्या होत्या. डायग्राम सकट.” मी सरांना नोट्स दाखवल्या. माझ्या सुवाच्य अक्षरांतल्या आणि रंगीत डायग्रामसह नोट्स बघून सरांना गदगदून आले. त्यानंतर सरांनी मला दणका दिला.

“प्रभुदेसाई, मी तुझ्यावर खुश झालो आहे. शिष्य असावा तर असा. आपल्या संस्कृतीत शिष्य गुरूला गुरुदक्षिणा देतात. आज मी तुला शिष्यदक्षिणा देणार आहे. मी तुझ्यावर प्रसन्न होऊन तीन वर देतो आहे. ह्या तीन वरांनी तुला काय पाहिजे ते मागून घे.”

मी माझे हसू कसेबसे दाबून धरले. सर एकतर माझी टिंगल करत असावेत, किंवा त्यांची सटकली असावी. सर क्रॅकपॉट असावेत असा माझा संशय होता तो आता दृढ झाला. त्यामुळे काय बोलायचे, कसे बोलायचे मला समजेना. शेवटी सरच बोलले, “तुझा माझ्या बोलण्यावर विश्वास दिसत नाही. असच असते. जो माणूस खर बोलतो त्याच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही. तुझ्या मनात काय आहे माझ्या गुरुजींना चांगले माहीत आहे. उघडपणे बोलायचं धैर्य तुझ्यात नाही. तेव्हा मी तुला आशीर्वाद देतो की तुझ्या मनातली इच्छा पूर्ण होईल. जा देव तुझे कल्याण करो.”

“सर, तुमचे गुरुजी?”

“हो माझे गुरुजी! ते गुरुजी ज्यांनी माझ्या आयुष्याला गणिताचे वळण दिले. ते गुरुजी जे स्थळकाळ अबाधित आहेत. त्रिकालाबाधित सत्य त्यांच्या चरणाशी लोळण घेते. त्यांच्या चरणरजांनी पावन होत्साते ते सत्य त्यांच्या पायाशी एखाद्या श्वाना.....”

असं बरच काहीबाही बोलत राहिले. मला वाटले मी सरांना उगीचच टोकारले. अखेर देवाच्या दयेने सरांचे गुरुजी स्तवन संपले.

आता सरांनी अब्राकाडब्रा सारख्या मंत्राचा जप केला. हवेत वेड्यासारखे हातवारे केले.

त्याक्षणी माझ्या मनात एकच विचार होता की सरांना वेडतर लागले नाही ना. सरांचा निरोप घेऊन मी बाहेर पडलो. कोलेजच्या व्हरांड्यातून जाताना सहजच माझे लक्ष गेले. तर लता उकिडवे आपल्या मैत्रिणींच्या घोळक्यांत उभी होती.

लता उकिडवे हे कॉलेजमधले बडे प्रस्थ होते. तिचे वडील म्हणजे सरदार उकिडवे. सरदार उकिडवे ह्यांच्या पूर्वजांनी कुठल्याशा लढाईत काहीतरी पराक्रम गाजवला म्हणून पेशवेसरकारने त्यांना आजूबाजूची काही गावे आंदण दिली. आता ती सगळी गावं बिल्डरच्या घशांत गेली पण कमावलेला गडगंज पैसा होता. तो शहाणपणाने इकडे तिकडे गुंतवल्यामुळे वाढत होता. कॉलेज मध्ये लांबलचक स्टुडबेकर गाडीतून येणारा एकच “विद्यार्थी” होता. तो म्हणजे लता! लता नुसतीच श्रीमंत नव्हती तर दिसायला लाखांत एक होती. आता तिच्याकडे मान वर करून बघायचे डेअरिंग नसल्यामुळे तिला मी कधी नीट बघू शकलो नव्हतो त्यामुळे तिच्या सौंदर्याचे पोकळ वर्णन करणे हा तिच्यावर सरासर अन्याय करणे होईल. ही माझी मैत्रीण असती तर कित्ती कित्ती मजा आली असती हा विचार कधी कधी मनांत आला असणारच. पण लगेच तिची स्टुडबेकर आणि माझी लंगडी “हंबर बरसोतक चलेगी” वाली सायकल डोळ्यासमोर यायची. तिचे वडील सरदार उकिडवे आणि माझे तीर्थरूप पी डब्ल्यू डी मध्ये डिवीजनल अकौंटटंट! कुठे इन्द्राचा ऐरावत आणि कुठे शामभटाची तट्टाणी. जाउदेत झाले.

नेहमीप्रमाणे त्या सुंदरींच्या ग्रुप कडे अर्धवट दुर्लक्ष करीत मी कटण्याचा विचार करत होतो

इतक्यांत लताने मैत्रीणींना सोडून माझ्याकडे मोर्चा वळवला. असा मला भास झाला असणार. म्हणून मी माझ्या मागे कोणी आहे का ते बघत होतो.

“अरे कुंदा, मी तुझ्याशी बोलते आहे.” असे गोड गोड लडिवाळपणे बोललेले शब्द माझ्या कानावर आले. आता माझे नाव मुकंद आहे हे खरं आहे. त्याचा कुंदा असा अपभ्रंश केलेला मी कधी ऐकला नव्हता. म्हणजे हे वाक्य माझ्यासाठी नव्हते तर लता कुणा कुंदा नावाच्या तिच्या मैत्रिणीला उद्देशून असावे.

“कुंदु प्रभुदेसाई, जागा हो माझ्या राजा, मी तुझ्याशी बोलते आहे,” तिने माझा हात पकडला. मला जणू काय चारशे चाळीस वोल्टस् झटका बसल्याची अनुभूती झाली. “तुला मॅथ्समध्ये डिस्टिंशन मिळाले हे मला मालनकडून समजले! ही गोड बातमी तू मला सर्वांच्या आधी का नाही दिलीस? तू फार लब्बाड झाला आहेस. आज कल तुझे माझ्याकडे म्हणावे तसे लक्ष नाहीये. तू त्या चेटकिणीच्या जाळयात फसला नाहीस ना?”

“नाही ग लतु. तू सोडून माझ्या डोक्यांत दुसऱ्या कुणाचाही विचार येत नाही.” मी आता प्रवाहाबरोबर वहात गेलो.

“चल तर माझ्या राजा. धिस कॉल्स फॉर सेलेब्रेशन, लेट अस सेलेब्रेट!” तिने माझा हात पकडून जबरदस्तीने तिच्या लांबलचक गाडीत बसवले, “ पार्ककडे घे.” अश्या त्रोटक शब्दांत ड्रायवरला हुकम दिला. तिच्या सहवासांत गाडीच्या एसी मुळे देखील मला घाम फुटला होता. हो माझ्या मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यांत तिच्या मैत्रीची इच्छा होती. पण हे जे काय चालले होते ते अघटीत होते. सरांच्या वरदानाचा परिणाम?

“कुंदा, काय हे शम्मी कपूर सारखे केस पिंजारले आहेस? तुला ही स्टाइल अजिबात शोभत नाही. लोक तुला मवाली लोफर समजले तर मला काय वाटेल? मी तुला हजारो वेळा सांगितले की तुला मिडल पार्टिंग कित्ती कित्ती छान दिसतं माझ्या राजा.” असे बोलून तिने पर्स उघडली आणि कंगवा काढला , डाव्या हाताने माझा चेहरा धरून माझे केस विंचरले. लहानपणी माझी आई असाच माझा भांग पाडत असे त्याची आठवण झाली. आता फक्त तिटी लावायचे राहिले होते.

“किती गोंडस दिसतो आहेस रे, त्या चेटकीणीची दृष्ट लागेल बघ. थांब तुला काळा टिक्का लावते,” तिने पर्स मधून एक पेन्सील काढली आणि माझ्या कपाळावर केसांच्या खाली काळा टिक्का लावला. इतक्यांत सुदैवाने पार्क आली आणि माझा मेकप प्रोग्राम थांबला. ड्रायवरने खाली उतरून लांबलचक गाडीचा दरवाजा उघडला. मी आणि लता गाडीबाहेर पडलो.

पार्कच्या मुख्य दरवाज्याबाहेर भेळेच्या, आईस्क्रीमच्या, वडा पाव, थंड आणि गरम पेयाच्या गाड्या लागलेल्या होत्या. हौशी शौकीन लोक बाजूला मांडलेल्या बाकड्यांवर आणि खुर्च्यांवर बसून खाण्यापिण्याचा आस्वाद घेत होते. सहजच माझे लक्ष चना शेंग विकणाऱ्या भैय्याकडे गेली. खांद्यावर गमछा टाकून तो भसाड्या आवाजांत “चना जोर गरम बाबू मै लाया मजेदार” असे गाणे गात होता आणि आजूबाजूला उभ्या चार पाच लोकांसाठी पुड्या बांधत होता. मला काहीतरी संशय आला म्हणून जरा निरखून बघितले तर ते आमचे गणिताचे सर होते. हो माझ्या मनांत कधीतरी विचार येत असत की “ह्यापेक्षा सर पार्कच्या बाहेर चणा शेंग का नाही विकत?” त्याचा हा परिणाम? मला माझा प्रचंड राग आला. शरम वाटली. सरांनी मला वर देऊन स्वतःची अशी वाट लावून घेतली होती. अर्थात त्यांनी मला लताच्या हवाली करून माझी पण वाट लावलीच होती. जे काय झाले होते आणि चालले होते त्याला मीच जबाबदार होतो. माझ्याच अंतर्मनातल्या अतृप्त इच्छा साकार होत होत्या. जवळ जाऊन सरांशी दोन शब्द बोलावेत असे तीव्रतेने वाटत होते पण बरोबर लता असल्यामुळे माझा नाईलाज होता.

लताने माझा हात तिच्या हातांत गुंफला. (जंगलात रानटी जनावरांना पकडण्यासाठी लावलेले सापळे असेच असतील का? त्यांत जनावरांचे पाय अडकतात, इथे माझा हात अडकला होता.) लता आता हळुवारपणे “जीवनांत ही घडी अशीच राहू दे.” असे काही गात होती. माझे रिस्टवाच मागत होती का? मी तिच्याकडे दुर्लक्ष केले.

“मग आपण केव्हा करायचे?” लता मला विचारत होती. मी दचकलो आणि हाय अॅलर्टवर.

“अरे असं काय बघतोस? कालच तर आपण सर्व चर्चा केली होती. तू प्रॉमिस केले होतस की आज निश्चित ठरवूया. तुझ्या आई बाबांची, माझ्या आईबाबांची संमती आहे. बाबांनी मुहूर्त पण निश्चित केला आहे. सतरा मे आपल्या दोघांनाही लाभतो आहे. कार्यालयाशी प्राथमिक बोलणी सुद्धा केली आहेत त्यांनी. फक्त तुझ्या ‘हो’ ची सगळे वाट बघत आहेत. आपल्याला स्वित्झर्लंडची तिकिटे बुक करायची आहेत.”

माझ्या डोक्यांत थोडा थोडा प्रकाश पडायला लागला होता. बापारे ही घोरपड गळ्यांत बांधून घ्यायची जन्मभर? मी होणार पामेरिअन लॅपडॉग? सावधान. सावधान प्रभुदेसाई.

मी नाटकीपणा दाखवत म्हणालो, “लतु, अग लग्न म्हणजे स्वातंत्र्याची आहुती. मला थोडा अजून विचार करू दे. उद्या अगदी म्हणजे अगदी निश्चित बर का. चल आता आई वाट पहात असेल.”

ती परत जायची गोष्ट काढली तेव्हा लता खट्टू झाली, “मुक्याला काय समजणार मुक्याची चव!”

ती काय बोलली ते मला समजले नाही. “काय काय?”

“मी तमिळमध्ये बोलले ना. तुला कसे समजणार?”

आम्ही तिच्या लांबलचक गाडीत बसून परतलो. गाडी माझ्या घराजवळच्या चौकांत आली तशी मी म्हणालो, “मला इथेच सोड. जाईन चालत घरापर्यंत.”

ती काय म्हणते, “आता आलेच आहे तर सासूबाईंना भेटून जाते.”

“लता प्लीज, ती माझी आई आहे. तुझी सासू नाही झाली अजून.”

“अरे तुझी आई म्हणजे माझी सासू ना. तू अगदी हा आहेस.” बरोबर आहे. मी हा च असणार. ही कसा असणार? काय मॅडकॅप मुलगी आहे ही.

आमच्या जुनाट वाड्यासमोर ड्रायवरने लांबलचक गाडी उभी केली. आळीतली खोडकर उपद्व्यापी पोरं गाडी भोवती घोटाळत गाडीला हाताळू लागली. त्यांनी जणू काय असा प्राणी आयुष्यांत पहिल्यांदाच बघितला. इकडे मला टेन्शन! लता मात्र बिनधास्त.

घरी आल्यावर लताने पदर खोचून स्वयंपाकघरात एन्ट्री मारली, “सासूबाई तुम्ही आराम करा .मी कांदा पोहे करते. माझ्या हातचे कांदापोहे ह्यांना फार आवडतात.”

“अग त्याला काय मला पण फार आवडतात.” आई लताकडे कौतुकाने बघत होती. आत दोघींचे खुसुरफुसुर चालले होते. थोड्या वेळाने आई बाहेर आली. “मुकुंदा, तुला गणितात चांगले मार्क मिळाले हे तू लताला सांगितले नाहीस? अरे, तिच्या पायगुणाने तुला एवढे यश मिळाले.”

म्हणजे मी कष्ट केले ते गेले उडत. गणितात चार वेळा नापास झालेल्या लताच्या पायगुणाने मला चांगले मार्क! लताला माझा “पायगुण” दाखवावा असे हिंस्र विचार माझ्या मनांत आले. पण आपण पडलो सभ्य. तो सभ्यपणा आडवा आला.

लता पोह्याच्या बश्या भरून घेऊन आली. मी पोह्याचा एक घास घेतला. आ रा रा रा रा. हे पोहे होते की बासुंदी होती. लताने पोह्यांत साखर घातली होती का साखरेत पोहे घातले होते.? बापरे असले पोहे ही मला आयुष्यभर खिलवणार?

“व्वा किती छान पोहे करतेस ग तू,” आईने लतावर स्तुतिसुमने उधळली. आई खरं खरं बोलत होती की शालजोडीतले देत होती? कळायला मार्ग नव्हता.

“आई ,तुम्ही किती मोकळ्या मनाने बोलता. आणि एक हे? पोहे चांगले झाले आहेत म्हणायला जीभ वळत नाही ह्यांची.” लता लटक्या रागाने बोलत होती.

“अग तो अजून लाजतो आहे. लहानपणापासून तो असाच लाजरा बुजरा आहे. तू काही मनावर घेऊ नकोस.”

आता लताने केलेला चहा कसा असणार ह्याचे वर्णन करायची गरज आहे काय? पुण्यांत म्हणे बासुंदी चहा असा काही प्रकार मिळतो असे ऐकले आहे. ते चहावाले देखील हा चहा बघून आपल्या कपबश्या फोडून दुकान बंद करून शरमेने गावी निघून जातील. लताचे काय पोहे गोड! चहा पण गोड! लताची फोड गोडच गोड!

ह्यातून सुटकेचा मार्ग म्हणजे सरांना शरण जाणे. घड्याळ्यात आठ वाजत होते. अजून वेळ होता. उठलो, कपडे केले, रिक्षा पकडली, सरळ पार्ककडे गेलो. सरांचा चनाशेंगचा धंदा चांगला जोरात चालला होता. मी जरा पुढे झालो.

“बोलो बेटा, चनाशेंग, वाटणा, मसूर क्या चाहिये.” सरांनी खापरांनी गरम केलेला मटका बाजूला करत फुटाणे सारखे केले आणि भसाड्या आवाजांत गाणे गायला सुरुवात केली, “चना जोर गरम बाबू मै लाया मजेदार.”

“सर मी प्रभुदेसाई, कृपा करा. मला ह्या लतावेलीच्या गोड विळख्यातून सोडवा.” मी काकुळतीला येऊन विनवणी करत होतो. सरांनी माझ्याकडे मुळीच लक्ष दिले नाही. त्यांचा धंद्याचा टाईम होता ना. दोन तीन गिर्हाईकं बाजूला उभी होती. ती माझ्याकडे विचित्र नजरेने बघत होती. त्यांना चना शेंग देऊन पिटाळले. आता माझ्याकडे लक्ष द्यायला सरांना वेळ मिळाला. एका कागदाच्या पुंगळीत फुटाणे भरून सरांनी माझ्या हातात दिले.

“खा म्हणजे बुद्धी तेज होईल.” ढणाण्याच्या प्रकाशांत सरांचा चेहरा उग्र दिसत होता, “त्याचे कसं आहे, प्रभुदेसाई “न जावे सुंदरपणावर, आधी गुण श्रवण कर.””

“बोल वत्सा, अजुनेक वर आहे तुझ्याकडे. काय मागायचे ते मागून घे.”

मी हात जोडून गदगदून सरांचे पाय पकडले. “चूक झाली माझी. मला ह्या गोड लता पासून सुटका द्या. आयुष्यभर हे साखरेचे पोते वहायची शिक्षा! आतापासून माझ्यामागे डायबेटीस लावू नका. ऐसा क्या गुन्हा किया की हम लता गये आय मीन लुट गये?”

“ठीक आहे. जशी तुझी मर्जी. पण एक प्रॉब्लेम आहे. मी तुझे वरदान रिवर्स केले तर मला पण पुन्हा कॉलेज मध्ये जाऊन गणित शिकवावे लागेल. इथे माझे बरे चालले आहे. आजूबाजूला लोक फिरतात, कधी गप्पा मारतात. गावाकडचा हाल विचारतात. शिवाय इन्कमटॅक्स भरावा लागत नाही. केव्हडा रिलीफ! ह्यापेक्षा माणसाला आयुष्यांत अजून काय पाहिजे !”

“सर, पण हे चांगले दिसतं का? तुम्ही एवढे गणितांत डॉक्टरेट झालेले. आणि इथे चना शेंग विकत बसला आहात? तुम्हीच विचार करा. हा काय न्याय झाला?” मी सरांच्या भावनेला हात घातला.

माझ्या स्तुतीने सर थोडे विरघळले, “मी असं करतो दिवसा कॉलेजमध्ये शिकवतो आणि संध्याकाळी इथे येऊन चना शेंग विकतो. तू माझ्या करिअरला चांगले वळण दिले आहेस. ते मला सोडवत नाही. मी हळू हळू धंदा वाढवत जाईन. गावाताल्या दुसऱ्या बागांसमोर शाखा उघडेन. कॉलेजमधली नोकरी सोडून देऊन हा धंदा मल्टीनॅशनल करेन. हाईड पार्क, सेन्ट्रल पार्क, फॉरेस्ट पार्क, लक्झेंबर्ग गार्डन, विला डोरिया पामफिली ह्याठिकाणी ठेले लावेन. कसा वाटतो माझा विचार तुला?”

सरांना स्वतःची काळजी वाटत होती मला माझी, “सर तुमचा विचार चांगलाच आहे. आपण मराठी लोक “आमची कोठेही शाखा नाही” असं गर्वाने लिहिण्यात धन्य मानतो. तर सर तुम्ही लंडन, पॅरीस, न्यू यॉर्क मध्ये धंदा कसा वाढवता येईल ह्याचा विचार आत्तापासून करून ठेवला आहे. पण त्याआधी माझा विचार करा ना जरा.”

“अरे विसरलोच. तू आता असं कर हे लता प्रकरण विसरून जा. शांत झोप काढ. तुझ्यापाशी अजून एक वर आहे त्याचे काय करायचे ते ठरव. व्यवस्थित विचार करून उद्या सकाळी कॉलेजमध्ये मला भेट.”

“धन्य हो गुरुद्याव.” एवढे बोलून मी उल्हसित मनाने सरांचा निरोप घेतला.
सकाळी उठलो. एक मन सांगत होते विसरून जा हे सगळे. काल जे झाले ते एक स्वप्न होते. कोणा लुंग्या सुंग्या प्राध्यापकाकडे अशी ताकद असणे कसे शक्य होते. विचार केला जरा तपासून पाहूया. काल माझी आई लताचे तोंड भरून कौतुक करत होती. बघूया तिला काही आठवतं काय. चहा पिताना खडा टाकला, “ आई, मला गणितात चांगले गुण मिळाले ते तुझ्यामुळे. तू माझ्यासाठी शनिवार करत होतीस ना.”

“अरे बाबा, मी शनिवार तू व्हायच्या आधीपासून करते आहे. तू अभ्यास केलास, तुझ्या नशिबाने तुला साथ दिली. तुला चांगले गुण मिळाले.” आईच्या तोंडून लताच्या नावाचा ल पण निघाला नाही. म्हणजे कालचे ते स्वप्नच होते.
असे माझे पण कॉलेजमधले "मोरपंखी" दिवस! गेले ते दिवस.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol Lol

मस्त!!
अगोदर पण पोस्ट केलीय का? वाचल्यासारखी वाटतेय.

मस्तच Happy

हो.आधी पोस्ट केली होती. त्या पूर्ण कथेतला हा एक भाग आहे. इथे गणेशोत्सवा निमित्त कॉलेजमधले दिवस सगळ्यांना आठवले. मग मलाही माझ्या पुर्वाश्रामाची आठवण आली. ते दिवस चिमणीसारखे भुर्कन उडून गेले. त्याच्यासवे मी आणि माझी कथाही उडाली. होते ते बऱ्यासाठीच होते.
जुने जाऊ द्या मरणालागुनी
जाळुनी किंवा पुरुनी टाका
सडत न एक्या ठायी ठाका
सावध!ऐका पुढल्या हाका