काकारहस्य

Submitted by केशवकूल on 14 September, 2022 - 02:52

“हेलो, नॅंसी, काय झालं?”
“बॉस, तीन सभ्य गृहस्थ आपल्याला भेटू इच्छितात. तुम्हाला वेळ असेल तर.....”
सेक्रेटरीने ‘सभ्य’ असा शब्द वापरून इशारा दिला होता. पण मी त्यांची भेट घायचे ठरवले. त्या आधी माझे पिस्तुल टेबलावर दिसेल अशा तऱ्हेने ठेवले. आणि सी सी टी वी वर नजर टाकली. खरेच जरा गुंडे दिसत होते खरे.
“ओके,” मी बेदरकारपणे नॅंसीला सूचना दिली.
“सर, पण जरा काळजी घ्या.”
तिघे जण माझ्या केबिन मध्ये घुसले.
“काय उकाडा आहे पुण्यात.” अस म्हणून एकाने फॅन फुल केला.
“अरे रूम एसी असताना फॅन कशाला लावलास?”
एकाने गॅलॅक्सी फोन काढून टेबलावर ठेवला. (हा फोन एका गॅलॅक्सीतून दुसऱ्या गॅलॅक्सीत बोलायला वापरतात. आपण जसं एका गॅलरीतून दुसऱ्या गॅलरीत बोलण्यासाठी “वायरलेस फोन” वापरतो तसं.)
तिसरा पाय लांब करून सोफ्यावर आडवा झाला. इतक्यात कुठूनतरी कोणीतरी अधिकार वाणीने बोलण्याचा आवाज आला.
“नंबर वन, हे मी काय बघतो आहे. तुम्ही काम सोडून हवा पाण्याच्या गोष्टी करत आहात?”
“येस्स सर,”
“नंबर झीरोला तुम्ही कामाची कल्पना दिली का? नंबर थ्री, शर्टाची बटणे लाव.”
“येस्स सर,”
“तू काय बायकोबरोबर हवा पाण्याच्या गप्पा मारतो आहेस? यू ऑल लिसन, यु आर ऑन ड्युटी. ऑन इंपॉर्टंट मिशन. काही जनाची नाही पण मनाची लाज ठेवा.”
तिघांनी “येस्स सर,” अस मिलिटरी खाक्यात म्हणून बुटांचा क्लिक असा आवाज करत कडक सल्यूट ठोकला.
“हा आपला इकडे टेरानवर देखील पिच्छा सोडत नाही. ‘वर्क फ्रॉम टेरान’! वाटलं होतं थोडा आराम मिळेल पण कसचे काय आणि कसचे काय!”
“आता थोडं गप्प बसायचं काय घ्याल?” सगळे शिस्तीत गप झाले. आता नंबर वन ने माझ्याकडे बघून बोलायला सुरवात केली, “मिस्टर झीरो सर, मंगळा वरून लोकशाहीच्या. शुभेच्छा. आपली पत्नी झ्झ्झ्झ आणि सुपुत्र व्व्व्वव आपली खूप आठवण काढतात. आपण काम संपवून परत केव्हा येणार याची वाट पहात आहेत.”

माझं अजून लग्न झालं नव्हतं. हे लोक माझं लग्न लावून मला सुपुत्र बहाल करून बसले होते. मजा आहे.
हे म्हणजे फारच झाले. कोण आहेत हे लोक? पण ह्यांना थोडी ढील दिल्याशिवाय काय चालले आहे त्याचा पत्ता लागणार नव्हता.
मी मनात विचार केला चालू द्या. उगाच त्यांना सावध कशापायी करा. जो पर्यंत खेचता येईल तो पर्यंत खेचूया. मी पण मंगळाची लाईन पकडली.
“मलाही त्यांची खूप आठवण येते, पण काय करणार. आपल्या प्रिय मंगल साठी आपण थोडा त्याग करायला पाहिजे न.”
आम्हा सगळ्यांचे ऊर देशप्रेमाने भरून आले.
“नंबर झीरो, आम्ही आपल्याला असा उघड उघड कॉंटॅक्ट करत आहोत, हे एसओपी/ओ२ओ/ ३०(अ) प्यारा २ च्या नियमाच्या विरुद्ध आहे हे तुम्हाला आणि मला चागलं माहित आहे. पण विषयच तसा गंभीर आहे. आम्हाला अशी खास खबर –ब्रेकिंग न्यूज- मिळाली आहे कि तुम्ही ज्या सोसायटीत रहाता त्या सोसायटीत शत्रूने म्हणजे केप्लर १८६-फ च्या हेरखात्याने चुंगलप्रवेश करून त्यांचा एजेंट रुतवला आहे.”
“रुतवला आहे? म्हणजे तुम्हाला “घुसवला” अस म्हणायचं आहे ना?” मी मधेच बोललो. हे लोक बहुतेक गूगल ट्रान्सलेट वापरत असावेत.
“तेच ते. तुम्हाला समजलं म्हणजे बस झालं. ही मराठी भाषा म्हणजे. त्यापेक्षा चीनी आणि जपानी सोप्पं आहे हो. तर मी कुठे होतो,,,,”
“सोसायटीत.” नंबर दोनने आठवण करून दिली.
वनला दोनचा आघाऊपणा आवडला नसावा. तो किंचित रोषाने म्हणाला, “माहित आहे मला.”
“सर, तुम्ही विचारलत म्हणून सागितले.”
“समजलं, काल मी विचारलं कि महात्मा गांधी रोड कुठं आहे? तर तू मला एम. जी. रोडला घेऊन गेलास. नो मोर चर्चा. तर मी काय म्हणत होतो, शत्रूचा हा जो एजेंट आहे त्यानं ‘काका’ अस नाव धारण केलं आहे असं आम्हाला आमचा पुन्याचा वार्ताहर कळवतो.”
टीवी पाहून मराठी शिकण्याचा प्रयत्न!
“आणि हा काका नेमका तुमच्या सोसायटीत टपकला आहे. नेमका म्हणजे बाय चान्स नाही, बाय पर्पज! तुमच्यावर डोळा ठेवन्यासाठी. तेव्हा स्वतःला पाळा.”
“पाळा? ओ तुम्हाला म्हणायचे आहे ‘सांभाळा.’
“सर, आमचं मराठी तुमच्या मराठी सारखं सफाईदार थोडच असनार? आम्ही अतात्तच शिखायला सुरुवात केली आहे. असो. तर हा काका तुमच्यावर काय डोळे ठेवनार? तुम्हीच त्यावर ठेवा नजर.”
“ऑफ कोर्स. तो डामरट काका शत्रूचा हेर आहे हे मला तुम्ही सांगायच्या आधीच माहित झालं होतं.”
“पहा, सर किती हुशार आहेत ते. उगाच नाही सर EB पास करून ग्रेड वन झाले.” सगळ्या हेरांनी माना डोलावल्या.
“तर मग आता आम्ही आपली रजा घेतो.”
“घ्या.”
“एक मिनिट. सर आपल्याला पुण्याची चांगली माहिती असनार. मला सांगा ही तुलासिभाग कुठे आहे? घरून निघताना बायकोने ही भली मोठी यादी हातात ठेवली. म्हणाली तुलासिभागेट मस्त आणि स्वस्त मिळेल. मी तुम्हाला वाचूनच दाखवतो.”
“ओ नो प्लीज. आम्हा सगळ्यांना यादी तोंडपाठ आहे. पोळपाट-लाटणे, नारळ खवणी, ठोक्याचे पातेले, क्रॉसस्टीचचे पुस्तक, हेच ना? आम्हाला आमच्या बायकांनी हीच यादी दिली होती. आणि हो, ‘कुछ कुछ होता है’ ची सीडी ती नाही सांगितली?”
एकूण तुळशीबाग म्हणजे “गॅलक्टिक बिसिनेस हब” झाला आहे तर. हे मला माहित नव्हते.
“ठीक आहे ठीक आहे.” तिकडे दुर्लक्ष करून नंबर तीन मला म्हणाला, “सर, तिकडे कसे जायचे ते प्लीज सांगणार काय? “
“अगदी सोप्पं आहे. कोपऱ्यावर तुम्हाला रिक्षा दिसेल. ती घ्या आणि जा.”
“रिक्षा नको. रिक्षावाले सुटे पैसे परत करत नाहीत.”
“नंबर तीन, तू टॅक्सी कर. आपली ती ‘सुका’ कंपनी आहे ना त्यांनी आता पृथ्वीवर शाखा अरे ती “शाखा” नाही रे. ही शाखा म्हणजे ब्रॅंच उघडली आहे. ‘कुबेर’ पण चांगली आहे. ती पण आपल्या इकडचीच.”
“आणि हो बर झाले आठवले. ते ‘क्युरीऑसिटी रोव्हर’ कुठे मिळेल? मुलाने खूप हट्ट धरला आहे.”
“???.” ही काय भानगड आहे? माझ्या डोक्यात काहीच शिरेना. बोध होईंना.
नंबर एकने सांगायला सुरवात केली. “इथल्या नासाने आपल्या ग्रहाकडे यान पाठवले होते. त्या यानाने ही खेळण्यातली गाडी आपल्या मंगळावर उतरवली होती. नासा मधे काम करणाऱ्या आपल्या हेराने ही बातमी आधीच आपल्याला कळवली होती. मग काय आपल्या शास्त्रज्ञांनी त्याचा कॅमेरा हॅक केला आणि त्यातून दगड, धोंडे, डोंगर आणि धूळ ह्यांची छायाचित्रं पाठवायला सुरवात केली. झाल. नासाच्या शास्त्रज्ञांनी त्यावर शोध निबंध लिहायला सुरुवात केली.”
“इकडे आपल्या इथे ते रोवर जिथे उतरवले होते तिथे लोकांची तुफान गर्दी! रोवर बघायला. रोव्हर पण खुळे चाळे करायचे. कॅमेरा इकडे तिकडे फिरव, मधेच अन्टेना वर करून पुढे मागे पळायचे. लोकांची हसता हसता पुरेवाट.”
आता मला तरी काय माहित? दिला मी त्याला एका खेळण्यांच्या दुकानाचा पत्ता.
“बर तर सर आम्ही आपली रजा घेतो. तेव्हढे ते काकांचे लक्षात राहू द्या.”
“प्लाटून आगे बढेगा पीछे मुड.” नंबर वनने ऑर्डर दिल्यावर “प्लाटून” लेफ्ट राईट करत निघून गेले. आगे बढेगा पीछे मुड!!! आगे बढाना है तो पीछे क्यू मुड?
नंबर वन मात्र मागे थांबला.
“सर, आपल्याशी माझे थोडं खाजगी काम आहे.”
“हा, बोला की.” मी.
“त्याचे काय आहे. माझ्या मुलीच्या पत्रिकेत “पृथ्वी दोष” आहे. त्यामुळे तिचे लग्न अडले आहे. आपल्या ओळखीत कुणी चांगला ज्योतिषी असेल तर....”
“इथले ज्योतिषी मंगळ दोषावर इलाज करतात”. मग मी त्याला “अंधश्रद्धा” ह्या विषयावर लेक्चर झाडले. त्याचे समाधान झाले नसावे.
“सर आपली पृथ्वीवरची असाईनमेंट संपली की आपण आपल्या कॉलनीत तुमचं व्याख्यान ठेवू.
मंगल ग्रहावरसुद्धा वधूपित्यांचे हाल होतात. मला वाईट वाटलं. कुठेही गेलात तरी पळसाला पानं तीनच! असो.
एकूण हा मिस्टेकन आयडेंटिटीचा मामला होता. “ते” मला त्यांच्यातलाच एक समजत होते.
मी काय करावे? एकदा वाटले कि पोलिसात जाऊन ही माहिती द्यावी. पण पूर्वीचा पोलिसी अनुभव खास उत्साहजनक नसल्याने हा बेत तहकूब केला. पोलीस उलट मलाच वेड्यांच्या इस्पितळात डांबतिल अशी खात्री होती. त्यापेक्षा त्यांच्याबारोर हा खेळ खेळत ह्या मंगळवासियांचे काय बेत आहेत ते जाणून घेऊन मग मत्प्रिय पृथ्वीचे कसे रक्षण करायचे ते बघू. असा मध्यमवर्गीय-आय मीन-मध्यममार्गीय विचार केला.
आता प्रथम ह्या काका नामक प्राण्याचा समाचार घ्यावा.

काकाला मी दुरूनच ओळखत होतो. सोसायटीच्या ऑफिसात एकदोन वेळा भेटलो होतो. इतकेच. सोसायटीचे काही जुने मेंबर संध्याकाळी बागेत खुर्च्या टाकून गप्पागोष्टी करत असतात. एक दिवशी काका तिथेच दिसला.
“नमस्कार. मी केशव कुलकर्णी.” मी बोलायला सुरवात केली.
“नमस्कार. मी काशिनाथ कानफाटे. मला काका म्हणालात तरी चालेल.
“मी ‘ए विंग’ मधे फ्लॅट क्रमांक २०३ मधे रहातो.”
“मी पण ‘ए विंग’ मधे फ्लॅट क्रमांक २०३ मधे रहातो.” काकाने निर्विकारपाने माहिती पुरवली.
त्याच्या त्या बोलण्याने मला धक्का बसला. “काका, तुम्ही फार जोकी आहात. अहो त्या जागेत मी राहत असताना तुम्ही कसे रहाल? No flat can serve two owners. माझी खेचता आहात तुम्ही. हो ना?”
“हा विनोद नाही. सत्य स्थिती आहे, केशव राव.”
“पण हे कस शक्य आहे!”
“का नाही? जेव्हा तुम्ही सकाळी नऊ वाजता ऑफिसला जाण्यासाठी बाहेर पडता तेव्हा मी घरात येऊन अंघोळ वगैरे उरकून ताणून देतो. तो एकदम संध्याकाळी सहा वाजता तुम्ही येण्याआधी बाहेर पडतो.”
“आणि जेवण? मी जेव्हा शनिवारी रविवारी घरी असतो तेव्हा काय करता?”
“जेवण मी ‘ला थाळी’ हॉटेलात करतो. शनिवारी रविवारी मी चवथ्या मितीत जातो. मग तुम्हा त्रिमिती –स्वतःला काय म्हणवता बरं, हा, ‘होमो सेपिअंस’ म्हणजे ‘ओव्हर स्मार्ट’- मर्त्य मानवांना मी कसा दिसणार? आम्ही तुम्हाला काय म्हणतो माहित आहे? द्विपादद्विचक्षु प्राणी- बायपेडल फूल्स! चौफेर दृष्टीशिवाय पुण्यातल्या ट्रॅफिकमध्ये कस निभावते हो तुमचे? आगे भी जाने न तू, पीछे भी जाने न तुम. अशी अवस्था.”
हे ऐकून चांगलाच टरकलो. ह्या “अलौकिक-पारलौकिक” काका समोर माझा कसा निभाव लागणार? उगाच मी वसुंधरेच्या (कोणी तरुणी नाही हो) प्रेमात पडलो आणि दोन ग्रहांच्या साठेमारीत फसलो. म्हणतात ना क्युरीआसीटी किल्ड द कॅट. त्यातली गत.
हल्लीहल्लीच मी पेपरात बातमी वाचली होती की बारामती जवळच्या एका शेतात रात्री म्हणे उडती तबकडी उतरली होती. शेतकरी शेतात उसाला पाणी द्यायला आला होता. त्याने त्या यानातल्या लोकांशी गप्पा मारल्या. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते लोक बॉलीवूडच्या चित्रपटासाठी शूटिंग करत होते. शेतकरी ही बातमी गावकऱ्यांना कळवण्यासाठी धावत ठेचकाळत गावात परतला. परत जाऊन बघतात तो काय तेथे कोणीही नव्हते. सगळ्या गावाची झोपमोड केल्याबद्दल गाववाल्यांनी त्या बिचाऱ्याला धारेवर धरले. शेवटी एका बकऱ्याच्या बोलीवर त्याची सुटका झाली. (जाता जाता. पवार साहेब मंगळावर एनसीपी ची शाखा उघडणार आहेत. त्याबद्दल बोलणी करण्यासाठी मंगळ ग्रहाचे प्रतिष्ठित नागरिक आले होते अशीही एक उडती वावडी सोडण्यात आली होती. अस झालं तर एनसीपी ही जगातील पहिलीच आंतरग्रहीय पार्टी ठरेल.) असो.
तर मी काय म्हणत होतो की हा काका त्यांच्यापैकी तर नसेल ना?
“”आम्ही’ म्हणजे कोण?” मी क्षीणपणे विचारले.
“घाबरलात. होय ना? अहो केशवराव मी गंमत करत होतो. लगेच तुम्ही खरं मानून घाबरलात.” काका गडगडाटी हसून बोलले.
माझा जीव भांड्यात पडला. मेरी जॉन मे जॉन आ गई.
ह्या काकाशी जरा जपून सावरून वागायला पाहिजे ह्याची मनाशी खूणगाठ बांधली.
आता विषय निघाला आहेच तर मी गाडी पुढे ढकलायची ठरवले.
“नाही म्हणजे, काका, तुमचा असल्या भाकड कथांवर विश्वास आहे?”
“असल्या म्हणजे कसल्या? पृथ्वी चपटी आहे, भुतं असतात, समांतर विश्व असतात, कुंडली असल्या...”
“तसल्या नाही हो. मंगळावर बुद्धिमान जीव आहेत आणि ते मधून मधून पृथ्वीला भेट देतात. उडत्या तबकड्यातून येतात. पृथ्वीच्या लोकांना पळवून नेतात आणि त्यांच्यावर शस्त्रक्रिया करतात. अमेरिकन सरकारला हे सगळे माहित आहे पण त्यांनी मुद्दाम दाबून ठेवले आहे. मी तर अस ऐकले आहे कि अमेरिकेचा अध्यक्ष हा मंगळी आहे म्हणून.”
“काहीच्या काही. अर्थात अमेरिकेचा अध्यक्ष कधी कधी असा वागतो की आपल्याला संशय यावा.”
“काका तुम्ही काहीही म्हणा पण माझा मात्र विश्वास बसायला लागला आहे.”
आजूबाजूला बघून खात्री करून घेतली की कुणी नाहीयेत, मग खुनाचा कट करणारे ज्या आवाजात एकमेकांशी बोलत असावेत त्या आवाजात मी काकांच्या कानात कुजबुजलो,
“अहो गेल्या आठवड्यात मला तिघेजण येऊन भेटले. म्हणाले कि आम्ही मंगळावरून आलो आहोत. मुद्दाम तुमची भेट घ्यायला.”
हे ऐकून काका फिदीफिदी हसायला लागले.
“केशवराव. ते लोक मंगळवारी आले होते ना. मंगळवार पेठेतून आले असणार. स्कीम वगैरे घेऊन आले होते? हे पहा स्कीम आणि स्कॅम मध्ये केवळ काळाचा फरक आहे. स्कॅम हा स्किमचा भूतकाळ आहे. स्किमचा अर्थ आहे मलई काढणे. तर तुम्ही भूतकाळ होऊ नका. काही पैसे-बैसे दिले नाहीत ना. सांभाळून राहा हो. हल्ली कोणाचा भरवसा नाही. आणि विज्ञान कथा वाचत असाल. तर ताबडतोब बंद करा. माझा एक मित्र होता...”
मी तिकडे दुर्लक्ष करून म्हटलं, “तुम्ही विश्वास ठेवणार नाही ह्याची मला शंभर टक्के खात्री होती. हातच्या कंकणाला आरसा कशाला. तुम्ही असं करा उद्या दुपारी माझ्या ऑफिसमधे या. ते लोक पण येणार आहेत. आमने सामनेच करून टाकू, हा सूर्य आणि हा जयद्रथ!”
नंतर मी आमच्या मंगल मित्रांना एकूण कल्पना दिली.
“मी त्या काकाला लाईनीत घेतले आहे. जरा बोल बच्चन आहे. बड़ी बड़ी छोड़ता है. पण आपण चौघे मिळून दमात घेऊ.”
“छान! वेल डन. नंबर झिरो.”

काका ठरलेल्या वेळेच्या दहा पंधरा मिनिटे आधीच आले. नॅंसीने त्यांच्या आगमनाची वर्दी दिली.
“पाठवून दे त्यांना आत.” काका आत येऊन सोफ्यावर बसले.
“काय घेणार काका? थंड गरम?”
माझ्या प्रश्नाला बगल देऊन काका म्हणाले, “केशवराव, पोरगी बरी पटवली आहे.”
मलाच काकांची लाज वाटली. हा काका म्हणजे पोचलेला दिसतोय.परग्रहावरून येणारा एजंट कमीतकमी जेम्स बॉंड इतका नाही पण थोडा तरी स्मार्ट असावा अशी माझी माफक अपेक्षा होती पण ह्याने बॉंडचा बॉंडपणा सोडून वांडपण मात्र नेमका उचलला होता.
मी काही काही कमी जास्त बोलणार तेवढ्यात नंबर एक ते तीन येऊन पोहोचले.
मी सगळ्याची ओळख करून दिली.
“हे काकाजी आमच्या सोसायटीत नव्याने आले आहेत. आणि काका, हे माझे मित्र. मी ह्यांच्या विषयीच तुम्हाला सांगत होतो.”
मी नॅंसीला चहा आणि बिस्किटांची व्यवस्था करायला सांगितले.
सुरवातीचे नमस्कार चमत्कार झाल्यावर नंबर वनने बोलायला सुरवात केली. नुकताच गणेश उत्सव पार पडला होता. नंबर वनने त्याचीच रेकार्ड वाजवायला सुरवात केली. थांबेच ना. गणपतीची आरास, विसर्जन शोभायात्रा. मी मनात म्हणालो, अरे मुद्द्यावर ये ना. बस झाले झुडपाभोवती काठी चालवणे. शेवटी काकानेच गाडी रुळावर आणण्याचा प्रयत्न केला.
“तुमच्या मंगळवार पेठेतली उडत्या तबकडीवरून उतरून पृथ्वीवरच्या मानवांना आशीर्वाद देणारी गणेशमूर्ति अप्रतिम होती.” मला चांगले माहित होते कि अशी काही मूर्ति नव्हती.
नंबर वनला हा जणू इशारा होता.
त्याने गॅलॅक्सी फोन काढून सुरु केला, मला बोलला, “बॉसला पण सर्किट मध्ये घेतो. मागून त्याची किच किच ऐकायला नको.”
“हेलो, गुड मॉर्निंग सर. सर पुण्याहून नंबर वन बोलतो आहे सर.”
नंबर वनचे गुड मॉर्निंग परत न करता बॉस म्हणाला, “गुड मॉर्निंग कसलं म्हणता. गुड इव्हिनिंग म्हणा. इकडे इव्हिनिंग चालू आहे. तुमची मीटिंग चालली आहे वाटत. छान छान. पण तुमच्या मीटिंगमधे तो टकलू कोण बसला आहे?”
“सर तो टकलू नाहीये. ते केप्लर१८६-फ वरून नंबर झीरोवर नजर ठेवण्यासाठी आलेले गुप्तहेर काका आहेत.”
“मित्रांनो, आपणा सर्वांचा काहीतरी गैरसमज होतोय. मी स्वामी करुणाकर महाराज को-ऑप. बँकेत कॅशिअर आहे. केप्लर१८६-फ वगैरे मी आज प्रथमच ऐकतो आहे. मी फक्त रॉ, सीबीआय, एनआयए, एफबीआय, केजीबी, सीआयए, एमआय8, मोसाद ह्यांच्या विषयी ऐकले आहे. मी बँकेत काम करतो. पण माझी पैशाची लॉंड्री नाही कि मी लांडोर नाही. तुम्ही काय इओडब्लू मध्ये काम करता? हे पहा तुम्ही माझ्या मागे लागून फुकाचा वेळ वाया नका घालवू.”
“काका, तुम्ही वेड पांघरून पेडगावला जाऊ नका. तुमचे नाव र्वि्च्क्रुइत आहे आणि तुम्ही केप्लर१८६-फ च्या सोलर आयबी मध्ये काम करत आहात. मंगळ आणि पृथ्वी ह्यांच्या सर्वांगीण सहकार्याच्या योजनेत विघ्न निर्माण करणे हा तुमचा हेतू आहे. आम्ही तुम्हाला मंगळावर चौकशीसाठी घेऊन जाणार आहोत.” नंबर वन ने खिशातून बॉलपेन सारखी वस्तू काढून काकावर रोखली.
“नंबर वन, तुमचे ते ब्लास्टर खूप जुने बेसिक मॉडेल आहे. ते बाजूला ठेवा. इकडे पहा माझे सुपर ब्लास्टर मार्क १. आता मी काय सांगतो तिकडे नीट लक्ष देऊन ऐका. तुम्ही कोण आहात ते मला माहित नाही. पण मी कोण आहे ते सांगतो. मी मंगल एअर फोर्सच्या स्ट्रॅटेजिक गॅलॅक्टिक कमांडचा एजंट आहे. मी इथे ऑफ़िशिअल ड्युटीवर आहे. तुम्ही माझ्या कामात अडथळा केलात तर आधी हे वाचून घ्या माझे लायसेन्स टू किल.”
ते ऐकून सगळे (मी धरून) अवाक झाले.
“सर, तुम्ही ऐकता आहात ना? हा इसम स्वतःला मंगळाचा आहे असं सांगतो. आपण ह्याच्यावर कसा विश्वास ठेवावा?” वन ने बॉसला साकडे घातले.
“आमच्या एअर फोर्स मध्ये म्हणतात कि आर्मीच्या लोकांची अक्कल गुढग्यात असते म्हणून. शुअर तुम्ही आर्मी इंटेलिजेंस युनिटचे असणार.” काकाने जखमेवर मीठ चोळण्याचा कार्यक्रम उरकून घेतला.
ते ऐकून नंबर वन बिथरला. भडकला. “सर, ह्याला इथल्या इथे कोर्ट मार्शल करायची परवानगी द्या...”
“नंबर वन, चिल. काका म्हणतात तसं असेलही. आपल्याकडे काय आहे ना कि उजवा हात काय करतो ते डाव्या हाताला माहित नसतं आणि एकूण हात काय करतात ते पायांना माहित नसते. मी हे एअर फोर्सशी बोललो तर ते मलाच मूर्खात काढतील. एनीवे, प्रथम काका मंगळी आहे कि नाही त्याची शहानिशा आपल्याला करायला पाहिजे.”
“आपण ह्याची कागदपत्रे तपासुया का?” नंबर वनने आयडीया काढली.
“अरेरे! नंबर वन इतकी वर्षे माझ्या हाताखाली काम करून तू हेच शिकलास काय? गुप्तहेर कामगिरीवर निघण्याआधी आपली कागदपत्रे ठीक ठाक करून निघतात हे तुला माहित नाही? माझ्याकडे एक जालीम उपाय आहे. काका, तुम्ही मंगळग्रहाचे नागरिक आहात न?”
“अर्थात. ह्यात काय संशय आहे?” काका ठासून बोलला.
“तर मग मंगळाचे राष्ट्रगीत तुम्हाला तोंडपाठ असणार. चला म्हणून दाखवा पाहू.”
“त्याची काय गरज आहे? मी सांगतो आहेना की मी मंगळाचा सभ्य नागरिक आहे म्हणून. कायदे कानून पाळणारा. नियमित टॅक्स भरणारा. ही पहा माझी कागदपत्रं. ही माझी फोटो आयडेंटिटी. हा माझा आयटी-जीएसटी-सीएसटी युनिवर्सल क्रमांक...”
“एव्हढे आहे तर एक राष्ट्रगीत म्हणायला काय प्रॉब्लेम आहे?”
“ठीक आहे. आता तुम्हा लोकांची एव्हढीच फर्माईश असेल तर म्हणतो बापडा.”
काकाने थोडं खोकून घसा साफ केला आणि राष्ट्रगीत म्हणायला सुरवात केली.
“हे मंगल देशा, पवित्र देशा, महान देशा.” काकांची गाडी इथेच थांबली. तीच तीच ओळ पुन्हा पुन्हा तीनदा म्हणून झाली.
“पुढे? हे मंगल देशा, पवित्र देशा, महान देशा ह्या पुढची ओळ?” बॉस गरजला.
“पुढची ओळ आठवत नाही.” कॉलेजच्या तोंडी परीक्षेत जशी अवस्था होते तशी काकाची अवस्था झाली. काका सपशेल फेल झाला होता.
आता नंबर वनला जोर चढला.
“काका, तुमचं पितळ उघडं पडलं आहे. बऱ्या बोलाने आमच्या बरोबर चला. इथं पृथ्वीवर रक्तपात व्हावा अशी माझी इच्छा नाही, पण वेळ पडली तर...”
“नंबर वन, तू फार घाई करतोस. मला बोलू देशील की नाही? ऑ?”
“सॉरी सर.”
“सगळ्यांनी कान देऊन ऐका. काका खचितच आपल्या मंगल देशाचे नागरिक आहेत.”
सगळ्यांना जबरदस्त धक्का बसला.
“कारण? माझ्या अनेक वर्षांच्या अनुभवावरून सांगतो की मंगल देशाच्या खऱ्या नागरिकाला पूर्ण राष्ट्रगीत पाठ नसते. हेच जर काका शत्रूराष्ट्राचा हेर असता तर त्याने आपले राष्ट्र गीत धडा धडा म्हणून टाकले असते. वाईट वाटतं पण ही सत्यस्थिती आहे. काकाच्या मागे लागू नका. त्याला त्याचे काम करू द्या. केस इस क्लोज्ड.”
बॉसनेच अशी मांडवळणी केल्याने टेन्शन दूर झाले.
सगळ्यांनी चहा बिस्किटांवर यथेच्च ताव मारला. इकडच्या तिकडच्या गप्पा होऊन मीटिंग संपली.
रात्री जेवण झाल्यावर मी माझा गॅलॅक्सीफोन चालू केला आणि टीओआय ७०० डी वरच्या माझ्या काउंटर काउंटर काउंटर एस्पिओनेजच्या होम ऑफिसला फोन केला.
“सर, मी केकुला पृथ्वीवरून रिपोर्ट करतो आहे...” अशी सुरुवात करून सर्व कथा-कथन केलं.
“ह्या मंगळी हेरांना कवडीचीही अक्कल नाही. एकमेकांवर हेरगिरी करतात.” असा शेवट केला. बॉस खुश झाला.
“गुड वर्क केकुला. कीप इट अप.” बॉसने पाठीवर रिमोट शाबासकी दिली.
(एक गोष्ट ह्या “मी”ला माहित नाही जी “म”ला माहित आहे. ती म्हणजे “मी”ला बॅॅक-अप म्हणून बॉसने काकाला पुण्याला पाठवले होते. केकुलाचा बॉस त्या काकाच्या फोनची वाट पहात बसला आहे.)
(समाप्त)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मजा आली.
अनेक बारीक बारीक चिमटे तर अफलातून जमले आहेत.

नुकताच गणेश उत्सव पार पडला होता. नंबर वनने त्याचीच रेकार्ड वाजवायला सुरवात केली. थांबेच ना.
>>>अशक्य आहे हे Happy

<<बस झाले झुडपाभोवती काठी चालवणे.>>
अशा रितीने मराठी भाषा समृद्ध करण्यात तुमचा मोलाचा वाटा आहे..

आभारी आहे सगळ्यांचा.
अशा रितीने मराठी भाषा समृद्ध करण्यात तुमचा मोलाचा वाटा आहे..>>>
कसच कसच. Thanks for the upper cut though!
सांगायला नकोच तरी पण दिवे घ्या!

गणेशोत्सव, बारामती, गूगल ट्रान्सलेट, सायफायचे तर कित्येक स्टिरिओटाईप, आर्मी, त्यांचा इंटेलिजन्स, भविष्य, सर्क्युलर डिपेंडंसी... अनेक प्रकार वाचायला मजा आली.
पुण्यात तुळसीभागेतून नंबर टू बाजीराव रस्त्यावर गेला आणि वाहनांच्या चक्रव्यूहात अडकला. त्याला आत येणे माहित होते, बाहेर जाण्यासाठी त्याने आता मंगळीच असल्याने काकाला वाचवायला सांगितलं. पण काका हा काका असल्याने वाचवा करुन कोणी बोंबललं की वाचवायचं नाही ही पद्धत त्याने पाळली. Proud

<<पहा, सर किती हुशार आहेत ते. >>
पुन्हा एकदा वाचताना हे वाक्य वाचून पोटात गोळा आला..
सरांची किर्ती मंगळावर पण पोहोचली की काय ????