वेगळा भाग - २७ (अंतिम)

Submitted by निशा राकेश on 6 September, 2022 - 08:07

हेमा ने तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला , आणखीन काही दिवस जाऊदे , आम्ही सर्व जाऊन रामशी बोलतो,
सुशीला बाईचा शब्द राम ने मोडला नसता , पण जयाला ते तस करण नको होत , तिने ह्या वेळचा सर्व निर्णय राम वर सोपवला होता , तिने ठरवलं तस झाल तर ठीक नाहीतर , अन्यथा जे काही होईल ते रामच्या मनाविरुद्ध असेल , आपल्या घरच्यांसाठी केलेलं असेल , आणि त्याला काहीही अर्थ नसणार होता ,

चौथा आणि शेवटचा दिवस, राम दत्त मंदिरात नुसता बसून होता , जणू दत्त महाराजांना त्याने काहीतरी विचारलं होत आणि त्यांच्या उत्तराची वाट पाहत तो थांबला होता , त्याच्या मागून कोणीतरी त्याच्या पाठीवर थाप मारली , राम ने चमकून मागे पाहिलं, मागे अशोक हसत उभा होता.

“बरा सापडलास ,आजकाल तुमचे दर्शन दुर्लभ झालेत” अशोक नेहमीसारखाच चेष्टेच्या स्वरात म्हणाला.

राम काहीहि बोलला नाही ,

“काय झाल तोंड का पडलंय तुझ “

“काही नाही रे , अशोक , तू बोल कसा आहेस तू , कसा चालू आहे कामधंदा ”

“काम आणि धंदा , दोन्ही करत नाय रे मी , बाप रोज नवीन नोकरी आणतो , पण मला इच्छाच होत नाही जायची “

“मग कस चालत तुझ ,पैसे वगैरे लागतच असतील ना”

“कधी कधी देते आई , कधी कधी ह्या राजकारण्यांची काम करतो ,”

“राजकारणी लोकांची कसली काम करतोस तू “

“हेच रे ते त्यांच्या निवडणुकीची पत्रक वाटायची , बॅनर लावायचे , माझ मरू दे , तुला बायडीचच समजल काय रे”

“बायडीच , तीच काय ,” राम ने घाईतच अशोकला विचारल.

“ अरे त्या दिवशी मी रेल्वे स्टेशन जवळ बॅनर लावत होतो , तर मला ती दिसली , नवरा आन पोरगा दोघ होते सोबत “

“त्या दिवशी , म्हणजे नेमक कधी रे “ राम ने अधिरतेने विचारल .

“झाले असतील रे आठ-पंधरा दिवस “

“म्हणजे हल्लीच कि , तू काही बोललास तिच्याशी”

“हो म्हणजे काय , अरे तीच किती बोलत होती, म्हणत होती, नशीब माझ वाचले त्या आगीतून , नाहीतर माझ्या ह्या पोराच कस झाल असत , आता सर्व ठीक आहे , नवरा पण चांगली काळजी घेतो म्हणाली, दुसरीकडे कुठेतरी राहायला जात होते”

“दुसरीकडे राहायला जात होती , मग इतके दिवस होती कुठे ती , तू विचारल का नाहीस तिला ” राम अजूनही संभ्रमात होता.

“आता नाय विचारल , नाय आल लक्षात आपल्या, तिला बघूनच मी खुश झालो ना”

“तू खर बोलतोयस ना अशोक “ राम आत्यंतिक आनंदाने म्हणाला.

“अरे खरच , मी कशाला खोट बोलू, “

“कोणत्या गावात गेली राहायला , तिला एकदा जाऊन भेटून येतो रे मी “

“येडा का खुळा तू बाब्या , आता तिला भेटायचा , तिच्याशी बोलायचा विचार पण करू नकोस , उगीच तिच्या नवर्याला पुण्यांदा संशय यायचा , तू कशाला आता निम्मित बनतो, माझी ओळख पण तीन तिच्या नवर्याला हा माझा वस्तीतला मानलेला भाऊ अशी करून दिली, तेव्हाच मी समजलो , तिला तुझ नाव घ्यायचं न्हवत,मनात म्हणलो आम्हाला ओळख पण नाही दाखवली तरी चालेल पण तू बाई सुखात राहा ,पुन्हा अस काही करू नकोस “मी जाताना तिला म्हणलो पण “

“काय म्हणालास“

“पुन्हा असा वेड्यासारखं वागायचं नाही , स्वतःला त्रास करून घायचा नाही, तर तिने मला वचन दिल, अस परत कधी करणार नाही म्हणून “

रामचा चेहरा खुलला, त्याने मनोभावे दत्त महाराजांचे आभार मानले, आणि तो मंदिरातून बाहेर पडला.

त्याला खरतर त्या रात्रीच जयाला भेटायचं होत पण आता इतक्या रात्री जाणं योग्य नाही म्हणून सकाळी जाऊ अस मनाशी ठरवून तो घरी गेला.

दुसर्या दिवशी सकाळी उठून , घाईघाईतच त्याने आवरलं आणि गाडीला किक मारून तो आनंदाने जयाकडे निघाला ,
जयाच्या घरी पोहोचून पाहतो तर काय घराला भलथोरल कुलूप , घरात कोणीही न्हवत , अरे बापरे हिची पहाटेची गाडी होती कि काय , रामला स्वतःचाच खूप राग आला , आपण रात्रीच तिला भेटायला का नाही आलो ह्याची खंत त्याला वाटू लागली ,
मन उदास झाल पण आता गप्प राहून चालणार न्हवत , त्याने पुन्हा गाडी सुरु केली आणि भरधाव वेगाने तो स्टेशन कडे जाऊ लागला.

स्टेशन वर पोहोचताच त्याने त्याची नजर भिरभिरवली , त्याला पुण्याची गाडी कुठे उभी आहे हे कुणाला तरी विचाराव हे देखील सुचेना , शेवटी खूप जणांना विचारून त्याला एकदाची पुणागाडी सापडली , त्याने प्रत्येक डब्यात डोकवायला सुरुवात केली , आणि अखेर ती त्याच्या नजरेस पडली, खिन्न मनाने शून्यात नजर लावून खिडकी बाहेर पाहत होती , डोळे रडून रडून लाल झाले होते, गालावरचे अश्रू सुकून गेले होते , त्याने तिला गाठल.

त्याला पाहताच तिचा चेहरा खुलला, दोघे एकमेकांकडे बघून हसू लागले , हसता हसता रडू लागले , तिने त्याचा हात घट्ट धरून ठेवला,

गाडी सुरु होण्याचा इशारा झाला , ती खाली उतरायला उठणार पण त्याने तिला थांबवलं ,

“आता काय झाल , अजूनही तुझ्या मनाची तयारी झाली नाही का “ जया ने काळजीने विचारल.

“माझ्या मनाची दोनशे टक्के तयारी झाली आहे, पण तू इतक्या मेहनतीने पोहोचलीस इथपर्यंत ते हातच असच घालवणार का , तू जा पुण्याला तिकडे तुझी शाळा वैगेरे सगळ सुरु होऊ दे , मी माझी इथली सर्व काम उरकतो , आणि दादांना घेवून कायमचा पुण्याला निघून येतो “

“अरे पण शोधीन ना दुसरी नोकरी, इतक्या प्रयत्नाने तू माझ्या आयुष्यात पुन्हा भेटला आहेस मी नाही तुला अस सहज सोडणार”

“नको..........माझ्यावर विश्वास नाही का तुझा , मी येतोय तिकडे , तुझी शप्पत घेऊन सांगतो हव तर , मग तर झाल ,” त्याने तिचा हात प्रेमाने दाबला , आणि तिचे अश्रू पुसले “

गाडी हलली , ती जशी जशी त्याच्या पुढे पुढे सरकत होती , तो त्या वेगाने तिच्या सोबत चालत होता , ती प्रसन्नतेने हसत त्याचा निरोप घेत होती ,

तो तिला परत परत पोहोचल्यावर आधी पत्र टाक, तुझा पत्ता कळव , मी लवकरच येतो , काळजी घे “ अस म्हणत तिला निरोप देत होता .

आणि इथे जया च्या घरी मात्र सुशीलाबाई, हेमा , विजय , रामचे दादा आणि अशोक ह्यांचा गप्पा रंगात आल्या होत्या .

हेमा म्हणाली,” तरी नशीब मी रामला दुरूनच येताना पाहिलं , म्हणून मग पटकन आम्ही जयाचा निरोप घेऊन निघालो”

“ हो ना , आपल्या समोर दोघ एकमेकांशी काहीच बोलले नसते “ विजयने पुस्ती जोडली .

“पण अशोक , काल रात्रीच तू इथे येऊन सर्व आम्हाला सांगितलंस हे फार बर केलस , आमच्या मनावरचा भार किती हलका झाला , तुला काय सांगू “ अस म्हणून सुशीला बाईनी प्रेमाने अशोकच्या पाठीवरून हाथ फिरवला.

“अहो आई , मी कुठे काय केल , हे आमचे दादा, त्यांचीच तर आयडिया , नाहीतर माझ कुठे इतक डोक चालतंय” अस म्हणून तो दादांकडे पाहू लागला.

“ अशोक , आर मी माझ्या लेकाला चांगलच वळीखतो , जीव गेला असता तरी बी , तो तयार झाला नसता , पण ह्यात जयाच , त्या सोन्या सारख्या पोरीचा काय दोष , त्याला कोणीबी , कितीबी समजवला असता तरी बी, त्यान कुणाच बी ऐकल नसत , ह्या येगळ्या माणसाच्या अविष्याला आपल्यासारख्या माणसाचे कायदे चालत नसत्यात , म्हणून मंग आपल्यालाच त्यांच्या भल्यासाठी खोट बोलाव लागत ,” दादा शांतपणे बोलत होते.

“पण दादा ती बायडा कि कोण तीच पुन्हा काही रामला समजल आणि त्याने त्याचा निर्णय बदला तर” हेमा ने काळजीने विचारल.

“काय न्हाय व्हत, ती भेटायची असती तर इतक्या वर्षात कव्हाच भेटली असती , ती जिथ कुठ असल तिला देवा न सुखात ठिवाव आणि सुशीला बाई , विजय आता आपल्याला घाई केली पाहिजे, इतक्या दिस आपण त्याचं समद ऐकत व्हतो, आता आपल त्यांना ऐकाया लावायच,महिनाभरातच त्याचं लग्न उरकून टाकायच ”

“हो हो बरोबर आहे “ अस सर्व एकत्र मिळून म्हणाले, आणि सर्वांची मने आनंदाने आणि उत्साहाने ओसंडून गेली.

राम खुशीतच कामावर पोहोचला , आणि सर्व कामे बाजूला ठेवून शर्टच्या खिशात ठेवलेलं पोस्टकार्ड त्याने आधी बाहेर काढल त्यावर तो काहीतरी लिहू लागला .

“प्रिय , झेंडू, अनेक आशीर्वाद ,

कशी आहेस , तुला सांगायला खूप खूप आनंद होत आहे , तुझा दादा आता लवकरच तुझ्या इच्छेप्रमाणे ....................................

समाप्त

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान झाली कथा. शेवटी शेवटी टिपिकल फिल्मी स्टाईलने वळणे घेतली.
पण तुम्ही कथेचे भाग नियमितपणे पोस्ट केलेत.. त्यामुळे वाचायला मजा आली

@निशा
अभिनंदन आणि धन्यवाद, एक सुंदर कथा पूर्ण करून आम्हा मायबोलीकरांना दिल्याबद्दल.
दोन भगांपूर्विच शेवट कसा असेल ह्याची कल्पना आली होती, टिपिकल असला तरी तुमच्या लेखन शैलीने तो छान झालाय. एकंदरीत कथा खूप सुंदर मांडली आहे, प्रत्येक पात्र, घटना अतिशय विचारपूर्वक लिहिल्या आहेत. फार twist किंवा surprises नसले तरी प्रत्येक भाग गुंतवून ठेवणारा होता, आणि ठराविक अंतराने नियमित पोस्ट केलात.

मी लेखक बिलकुल नाही, पण थोडस जे वाटलं ते मांडतो
बायडाच्या पात्रावर थोडा अन्याय झाला किंवा राम बरोबरच वाचकांनाही तिच्या बद्दल नीट closure मिळाला असं वाटलं नाही. पण अगदी रामायणातल्या उर्मिला पासून अशी काही पात्र कथानकात बाजूला राहतात... असो.
बायडाच्या वडिलांनी तिच्या मुलाला राम कडे सुपूर्द करून, रामने त्याला सांभाळावं ही तिची अखेरची इच्छा होती, तिने तिच्या आयुष्या बद्दल रामला जबाबदार धरलं नव्हतं अस सांगितलं असतं. आणि मग जया आणि राम दोघांनी ती जबादारी स्वीकारुन आपला संसार सुरु केला असा जर शेवट असता तर त्यांचा संसार एका खोट्या बातमी वर उभा राहणार आणि पुढे रामला ते कळलं तर काय होईल अशी थोडी रुखरुख जी आहे ती राहीली नसती

थोडी वेगळ्या धाटणीची कथा - पहिल्या भागापासून च आवडली होती आणि नियमित वाचतेय. प्रेडीक्टेबल शेवट आला तरी छान होता. खूप आवडली ही गोष्ट. आणि तुम्ही वेळ न लावता सगळे भाग रेग्युलरली टाकलेत आणि वेळेवर गोष्ट पूर्ण केलीत त्यासाठी मनापासून धन्यवाद!

सर्व प्रतिसाद कर्त्यांचे सर्वात आधी मनपूर्वक आभार ......शेवट काय करावा ह्या संभ्रमात होते खरतर मी ,,,,,,मी मला त्यावेळी जो सुचला तो मी लिहिला....पण मन्या ह्यांनी सांगितला शेवट हा मी लिहिलेल्या शेव्तापेक्षा खरच वाखण्याजोगा आहे..................पुढच्या वेळी जर मला शेवट सुचला नाही तर मी नक्की तुम्हा माय्बोलि करांचा सल्ला घेईल.....तुमचे सल्ले आणि प्रतिसाद हे नेहमीच प्रामाणिक असतात.............माझी कथा हि वेळ काढून वाचल्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा खूप खूप आभार

पूर्ण कथा भाग येतील तसतशी वाचत होते. शेवट प्रेडिक्टेबल असला तरीही सुखांत आहे ते छान वाटलं. चांगली होती कथा.