टेस्ला गं बाई टेस्ला (एक कोतबो लावणी)

Submitted by अस्मिता. on 25 July, 2022 - 18:34

आमच्याकडे एक बरीच जुनी मळकट कार आणि एक थोडी जुनी बेढब वॅन आहे. या दोन्हीही मी नियमित चालवत असते. पण दोन तीन वर्षात आमच्या नेबरहूडात हळूहळू सगळ्या टेस्ला दिसायला लागल्यात. किंवा साधुसंतांना सगळीकडे जसा ईश्वर दिसतो तशा मला ह्याच दिसत असतील. मागच्या वर्षीपासून तर ड्रायव्हिंग करताना दर तीन मिनिटाला एक टेस्ला बाजूने सुळकन निघून ही जाते. आणि मला आपोआपच हीन भावना येते. कसं ते सांगायला '3 ईडियट्स' मधल्या रँचो सारखा डेमो देते. त्याशिवाय काही ही हीन भावना तुमच्यापर्यंत पोचणार नाही.

   
 कल्पना करा, शेजारशेजारच्या दोन थेटरात दोन सिनेमे लागलेत , त्याचे पोस्टर बाहेरच्या भिंतीवर लावलेयं. एकात 'गहराईयां'ची दीपिका पडूकोण तर दुसऱ्यात कुठल्याही सिनेमाची काकुळतीला आलेली निरूपा रॉय आहे. निरूपांच्या सिनेमाचे तिकीट पन्नास रुपये व दीपिकाच्या सिनेमाचे हजार आहे, आणि तुमच्याकडे पंचवीस रूपये आहेत तर तुम्हाला सिनेमाला न जाताही हीन भावना येईल. शिवाय घरी येऊन टिव्ही बघावा तर आहेत त्या एक-दोन वाहिन्यांवर 'आमची माती-आमची माणसं' लागलेलं असंल, तर जे काय मनात तयार होईल. ती हीच भावना होय.

20220723_154053.jpg

आम्ही असेच कुठूनतरी कुठेतरी गाडीने जात होतो. मी ड्रायव्हिंग करत होते, तेव्हा रेड लाईटवर थांबून निघाल्यानंतर गाडीचा पिकप व समोरचा चढ चढताना म्हशीवर बसल्याचं फील आलं आणि दुर्दैवयोगाने निळी टेस्ला हरणासारखी टेकोव्हर करून गेली. मगं मी मुलांना विचारले, "तुमच्याकडचे सगळे पैसे मला देता का ? आपण पोटालाच नाहीतर सगळ्या अंगाला चिमटे काढून टेस्ला आणू. लेक , "मी काही ओवाळणीचे जमवलेले एकशे बत्तीस डॉलर देणार नाही. गेट युवर ओन", म्हणाली. मुलगा पार्टटाइम नोकरी करून पैसे जमवतोय म्हणून मला वेडी आशा होती. तो म्हणाला, मला केन्ड्रीक लमारच्या म्युझिक कंसर्टसाठी हवे आहेत, पुढच्या वेळी देतो." बघा आता, हा केन्ड्रीक लमार आला होता का याचे ढु धुवायला!!! कलियुगातील स्वार्थानी बटबटलेली मुलं कुठली आईच्या भौतिक इच्छा किंवा छोटेसे हव्यास पूर्ण करणार, आता आयांना आपापले पांग आपणच फेडावे लागणारे. (बायदवे, पांग म्हणजे काय आणि ते लुगडे किंवा धोतर असल्यागत फेडावे का लागते, शिवाय नेसलेले कधी असते ??)
most-dramatic-nirupa-roy-s-dialogues_139849803330.jpg

दुसऱ्या वेळीही व त्यानंतर दरवेळी टेस्ला बघून 'आमची माती, आमची माणसं'वालं गरीब व मंद फील व्हायला लागलं. तेव्हा दरवेळा 'बघा, बघा'वगैरे संवाद व 'मेरा नंबर कब आयेगा' ते 'अपना टाईम आयेगा' ह्या चर्चाही व्हायला लागल्या. कधी उरलेली वाटली डाळ सगळ्यांना तीन दिवस हफ्त्याहफ्त्याने संपवावी लागल्याने, कधी 'डॉक्टर स्ट्रेंज' बघायला नेण्याऐवजी घरीच 'मुंबईचा फौजदार' बघायला लावल्याने, कधी लेकीने दाखवलेल्या क्यूट भूभूचे कौतुक करताना कुत्र्यांमधला 'महेश बाबू' म्हणणे वगैरे आगावपणा केल्याने, माझ्याबद्दल सहसा कुणाचेही धोरण सहिष्णू वगैरे नसते. हळूहळू सगळ्यांनी माझ्याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली आहे. तुम्ही म्हणाल , नवऱ्याशी बोलावे, पण तो 'आशीर्वाद' कणकेपासून-टिव्ही पर्यंत सगळ्या गोष्टींना 'थोडं थांब' असंच म्हणतो. यासाठी थांबून राहीले तर स्वदेस सिनेमातल्या 'बिजली' म्हणणाऱ्या आजी सारखी अवस्था होईल.

      तरीही जेव्हा जेव्हा बाजूने टेस्ला जाते मीही 'अशीही बनवाबनवी' मधली मोलकरीण जशी संशय, असूया व असुरक्षित भावनेने , स्टिकर मिशीचे equilibrium हुकलेल्या धनंजय माने व त्याच्या 'भक्कम बाईमाणूस' ईत्यादी गँगकडे बघायची तसे बघते. तिलाही तिची कारणं होतीच, 'विजू खोटे' सारखा शोलेपासून मार खाऊन परत येणारा आद्य अपयशी बॉयफ्रेंड असल्यावर, ती तरी काय करणार ???

20220723_152919.jpg

तिला जशी तिची कारणं आहेत तशी मलाही , म्हणून माझ्यासारख्या मनाने कुठेतरी किंचितच पण मडोनाची 'मटेरिअल गर्ल' असलेल्या, चटकचांदण्या आणि भटकभवान्यांसाठी ही 'दिसला गं बाई दिसला' या गाण्यात बसवलेली टेस्लाची लावणी....;)

Wink टेस्ला गं बाई टेस्ला Wink

ईर्षेच्या जाळाची नजर नस्ती
चालं मी कडंनं ट्रॅफिकच्या रस्ती
ब्रेकं पुढं, गॅस मगं मागं, भोंगेही स्टायलिश गाती
ब्रेकं पुढं, गॅस मगं मागं, भोंगेही स्टायलिश गाती

लाईटचा दिलबर, वायरचा चार्जर, होs s
लाईटचा दिलबर, वायरचा चार्जर, होs s
का परवडंनं मला, बाई-बाई का परवडंना मला
डब्बा चालवना, पेट्रोल भरवना
घेऊ कसं, घेऊ कसं, घेऊ कसं ??

टेस्ला गं बाई टेस्ला
टेस्ला गं बाई टेस्ला
तिला बघून जीव हा जळला  , गं बाई जळला
तिला बघून जीव हा जळला  , गं बाई जळला

मस्क हा अंगानं उभा नी आडवा
गं ट्विटात त्याच्या मोहाचा चकवा
म्हणे घ्यावा नाही तर मंगळावर जावा
मस्क हा अंगानं उभा नी आडवा
म्हणे घ्यावा नाही तर मंगळावर जावा

पांढऱ्या कारा, डॉलर लाखाला
निळ्याला सव्वाचा बट्टा
पांढऱ्या कारा, डॉलर लाखाला
निळ्याला सव्वाचा बट्टा
काळजामधे ह्या घुस्ल्या, गं बाई-बाई काळजामधे घुस्ल्या
काळजामधे, काळजामधे, काळजामधे


टेस्ला गं बाई टेस्ला
टेस्ला गं बाई टेस्ला
तिला बघून जीव हा जळला , गं बाई जळला
तिला बघून जीव हा जळला , गं बाई जळला

______
कमेंट न करता जाताय, हे वागणं बरं नव्हं Wink
फोटो साभार# टेस्ला डॉट कॉम व इंटरनेट
©अस्मिता

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण जबरदस्त कॉम्प्लेक्स आला होता, कि हा लावणीचा प्रकार कधीच कसा ऐकला नाही ? नंतरच्या पिढीला पण माहिती आहे. >>>>>
Lol मला कुठले माहिती असायला.

एकदम तडका मारके झालाय लेख आणि लावणी दोन्हीत...

ह्या धाग्यावर प्रतिसाद देण्यासाठी पासवर्ड खणून खणून काढलाय..

दिपीकाची कपड्यांची (दुरा) अवस्था पाहून निरुपा(य) राॅय रडते आहे असे वाटले क्षणभर.. आखिर एक मां का दिल है, ऐसी काटकसर देखके रोयेगाच ना..

अरे काय धम्माल लिहलंय ! खूप दिवसांनी एकदम ख्याक करून हसलो ते हसतच राहिलो.
> मगं मी मुलांना विचारले, "तुमच्याकडचे सगळे पैसे मला देता का ? आपण पोटालाच नाहीतर सगळ्या अंगाला चिमटे काढून टेस्ला आणू.
हे सगळ्यात भारी आहे !

प्रज्ञा, धनवन्ती, किल्ली, किशोर मुंढे, स्वान्तसुखाय, मोरोबा, जाई, माझेमन, आरती, विकु आणि अजय....
मनापासून आभार. Happy

धनवन्ती,
ह्या धाग्यावर प्रतिसाद देण्यासाठी पासवर्ड खणून खणून काढलाय..>>>>सो स्वीट ऑफ यू !
काटकसर देखके रोयेगाच ना..>>> Lol

विजिगीषु,
अभिप्रायासाठी व सदिच्छांसाठी दुहेरी आभार. Happy

खरच भन्नाट
मजा आली वाचताना .. लावणी तर एकदम धमाल
फेटेवाला Elon दिसला
Lol
elon.JPG

i'm tesla girl
in the tesla world
life in electric
it's fantastic

१०० वर का नाय गेला अजून हा धागा??????
ही सिलोनाबाई स्पेनकरांची टेस्लाची आद्य लावणी...
____________________________
"पंजाबी पोरींना लँबोर्घिनीवाला जाणियो मिळून २-३ वर्ष झाली असतील, पण मराठी मुलींच्या नशीबात फार फार तर हिंदीतली जाऊ बायची फेरारी येते. कारची लावणी हवी!

येक लावणी 'आय माय इएमआय' करत दिवस काढणार्‍या चटकचांदण्यांसाठी -

चालः हेरला गं हेरला गं (किंवा तत्सम काही).

टेस्ला गं टेस्ला गं
मला पाहिजे ती गाडी ही टेस्ला गं
उरल्या ग उरल्या ग
हफ्त्यानंतर दोन नोटा उरल्या गं

उंचा पुरा दिसतोय बरा,
चार्जिंगचा ठेसन नवा नवा,
तीनशे मैल धावल्यावरी
डिस्चार्ज होतीया पुन्हा पुन्हा.
लै लै धमाल, लै लै कमाल,
कसा ह्यो दिस असा रंगला गं.
टेस्ला गं, टेस्ला गं ….

रॅप: (हो, हा लागतोच हल्ली जिथे तिथे… सबब गश्मीरची बुलेटवर एंट्री !!!)
सिग्नल लाल सिग्नल हिरवा
पिवळा असताच काय ते ठरवा
ऍस्सीलरेटर का ब्रेक-पेडल
Girl, your speed is too lethal…

झेब्रा क्रॉसिंग, झेब्रा क्रॉसिंग,
बँड, बाजा, आणि बाशिंग
पोरी, जरा थांब थांब,
तू है मेरी अँड तूच की लॅम्ब.

[End Rap]

[Music]

जपून मी घालते कव्हर,
कलरला तागा जुळंतोय ग,
गाडीच्या बॉनेटपाशी
कलिग भुंगा फिरतोय गं,
काय त्याचा रुबाब, खाऊ म्हणे कबाब,
स्टेरिंग दावताच कटला गं.

टेस्ला गं टेस्ला गं … “

Rofl
अफ्टरशॉक म्हणून हेच म्हणायला लागले मी....

छबीदारछबी रिमिक्स

हे हे हे आलिया पोरींची बारी रं
झालीया पोरं बाजारी रं
बघा शेजारी नवीन पुढारी नारी रं

त्या ज्या सांगत्यात ऐका शेट
हे वागणं बरं नव्हं
All you Boys Just
Get this straight
हे वागणं बर नव्हं

सुसाट सुटलेत सगळे . फेटे उडले #शिट्ट्या#
(ट्रेन मधून इतकंच लिहू शकले) तरी माबो फिवर बघ, सारखा मोबाईल काढून टाईप करतेच आहे. हसणं कंट्रोल करणं म्हणजे

Pages