टू बी ऑर नॉट टू बी (अर्थात या बी चे करायचे काय?)

Submitted by निमिष_सोनार on 12 August, 2022 - 02:34

"टू बी ऑर नॉट टू बी?" असा गहन प्रश्न रॉबर्ट वेलिंग्टनकर या माणसाला पडला होता म्हणे. अहो, "नावात काय आहे?" हेसुध्दा तोच म्हणाला होता ना!

पण हाच प्रश्न मला पोह्यांमध्ये लिंबू पिळतांना नेहेमी पडतो. पण मला पडलेल्या प्रश्नातील बी म्हणजे लिंबाची बी बरं का!

असो, तर मूळ मुद्दा असा आहे की पोह्यात लिंबू पिळण्याआधी बिया (कारल्याच्या सॉफ्ट बहिणी) निघून जाव्या म्हणून अर्धा कापलेला लिंबू जर आपण प्लेटबाहेर हलकाच दाबला तर हटकून त्यातील रस निघून वाया जातो पण बिया मात्र हट्टाने लिंबामध्येच राहतात. पण जर का डायरेक्ट प्लेटमधल्या पोह्यांवरच लिंबू हलका जरी पिळला तरी पहिल्याच प्रयत्नांत हटकून सर्वच्या सर्व बिया पोह्यांमध्ये पडतात! नुसत्या पडत नाहीत तर पोह्यांमध्ये आतमध्ये लपून दडून बसतात.चमच्याने शोध शोध केल्यावरही प्लेटमधील पोह्यांत त्या सापडत नाहीत आणि बरोबर पोहे खायला सुरुवात केली रे केली की पहिल्याच घासाला चमच्यामधून बेमालूमपणे घासात येतात आणि जिभेला कडवट करतात!

हेच थोड्याफार फरकाने लिंबू सरबत बनवताना अनुभवास येते. सरबतातील पेल्यातून बियांना काढायला गेले की बिया चमच्याशी खो खो आणि कबड्डी खेळतात करतात आणि चमचात येत नाहीत.

यावर अद्भुत वैज्ञानिक उपाय असा होऊ शकतो की, आपण एखाद्या ठिकाणी जमिनीवर पसरलेले किसलेले लोखंड (चुरा) किंवा बारीक खिळे जसे लोहचुंबकाद्वारे (म्हणजे सोप्या मराठीत "मॅग्नेट") ओढून घेतो तसे एखादे लिंबीचुंबक (लिंबी = लिंबाची बी) असले पाहिजे जेणेकरून ते कापलेल्या लिंबासमोर, पोह्यांसमोर किंवा सरबताच्या पेल्यासमोर धरले की बिया आपोआप ओढल्या जाऊन त्याला चिकटतील.

बाय द वे, एखाद्या गाळणीतून लिंबू पिळावा असा वास्तववादी एक उपायसुद्धा यावर आहे म्हणतात.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गाळने घेउन पोह्यांवर लिंबु पिळा नाहितर लिबु बाजु बाजुने कापा म्हण्जे फोडी पिळताना बिया येणार नाहित

आपण एखाद्या ठिकाणी जमिनीवर पसरलेले किसलेले लोखंड (चुरा) किंवा बारीक खिळे जसे लोहचुंबकाद्वारे (म्हणजे सोप्या मराठीत "मॅग्नेट") ओढून घेतो तसे एखादे लिंबीचुंबक (लिंबी = लिंबाची बी) >> लिंबीचुंबक हा शब्द आवडला. रोगापेक्षा इलाज भयंकर या प्रकारातला (अतिशयोक्ती) विनोद म्हणून हा वैज्ञानिक प्रकार लिहिला असेल तर भारी!

छान लिहिलंय.
एक उपाय- लिंबाची अर्धगोलाकार फोड हातात उलटी धरायची. म्हणजे कापलेली बाजू वर. मग फोड दाबायची. रस वरून बाहेर येतो आणि बाजूने खाली, म्हणजे पोह्यांवर पडतो. बिया जरी बाहेर आल्या, तरी खाली पडत नाहीत. थोडी तिरकी धरली, तर बोटांवर रस ओघळत नाही.

आम्ही लिंबू सरबत बनवताना सरळ गाळण्यात लिंबू पिळतो हाताने.मग ममव असल्याने सूड घेतल्या सारखे ते उलट सुलट करून पिळतो.मग अगदी प्रत्येक कणाचा रस निघाला की ती फोड बाजूला घेऊन चेहऱ्यावर चोळतो.मग शेवटी कुकरमध्ये टाकतो.कुकर झाल्यावर रिकामा करताना हे उकडलेले लिंबू अवशेष कंपोस्ट मध्ये टाकून देतो. Happy
हेच जीवनचक्र पोह्यांवर पिळायच्या लिंबू ला पण पाळता येईल.

Happy
छान लिहिलय
लिंबू अर्धे कापले की आधी सुरीच्या टोकाने सगळ्या बिया काढून टाकते मगच प्लेटमधे ठेवते. मग कधीही वापरताना नॉट बी च नशिबी येतं Wink

लिंबुयंत्र वापरा.

एकदम सुटसुटीत...मी देखील वापरतो.

बियाही पडत नाही आणि रसही जास्त मिळतो

इतकी प्रगती केली तरी असे मुलभूत प्रश्न काही सुटत नाहीत Lol

सीडलेस इटालियन लिंबू आणून कुंडीत लावा. >>> सीडलेस लिंबाच्या सीड्स कुठे मिळतील? Wink रच्याकने त्या तथाकथीत सीड्लेस लिंबातही बारीकशा बीया असतातच. आणि त्यातही कडवटपणा ठासून भरलेला असतो. एक छोटीसी बी पोहे को कडवा बना देती है (नाना पाटेकरच्या आवाजात वाचा).

लिम्बु आणि बी दोघेही नाहीत आता मायबोलीवर >>> Lol

सीडलेस लिंबाच्या बिया..
आजच्या दिवसाचा लोल !! Happy
मला असेच प्रश्न सीडलेस द्राक्षाबद्दल पडतात.

लिम्बु आणि बी दोघेही नाहीत आता मायबोलीवर >> Lol

लेख छान आहे बाकी.
पण मला का आजवर असा प्रश्न कधी पडला नाही असा प्रश्न मला आता पडला. (एक धागा हुकला यार Sad )
बहुधा मी ज्याप्रकारे नाजूक हातांनी लिंबू पिळतो त्यातून केवळ रसच गळत असावा. बिया लिंबातच राहत असाव्यात.
किंवा आमच्याकडे एका लिंबाचे छोटे छोटे आठ तुकडे करतात, त्यामुळे तुकडे करतानाच वर डोकावणार्‍या बिया घरचे काढत असावेत.
कारण पोहे, उपमा, मटण, मिसळ, सुखी भेळ, नावडती भाजी, कुठे ना कुठे तरी दिवसातून एकदा तरी लिंबू पिळला जातोच.