हिंडते माझ्या घरी मी वाट चुकल्यासारखे

Submitted by सुप्रिया जाधव. on 26 May, 2022 - 02:12

गच्च काठोकाठ भरुनी
हेंदकळल्यासारखे
दुःख डचमळतेय द्रोणातील मठ्ठयासारखे

ही खुली
आकाशगंगा भेट देण्याला तुला
भरदुपारी ती तळपते चक्क सूर्यासारखे

अंतरावर ठेवले की त्रास नसतो फारसा
वागते हल्ली स्वतःशी मी त्रयस्थासारखे

नेमका कोणी मनाचा उंबरा ओलांडला
हिंडते माझ्या घरी मी वाट चुकल्यासारखे

जायचे आहेच प्रत्येकास येथे शेवटी
ऱ्हायचे आहे मनांमध्ये रहस्यासारखे

सुप्रिया

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults