अस्थी कथा

Submitted by सतीशगजाननकुलकर्णी on 21 March, 2022 - 05:07

अस्थी

ड्रायव्हरने जेव्हा गाडी स्टार्ट केली तेव्हा घड्याळात सहा वाजले होते. हवेत बोचरी थंडी होती. गार वाऱ्याचा उगीचच त्रास नको म्हणून आदित्यनी गाडीच्या काचा वर केल्या. गळ्याभोवती मफलर गुंडाळली. आता तीन तासात का होईना आपण गावाकडे पोहचू. आदित्यनि स्वत:शीच विचार केला. तसे त्यांचे गावाकडे फार जाणे येणे नसे पण कारणपरत्वे कधी तरी जायला लागले तर ते टाळत नसत. “ हळू चालव रे बाबा. काही घाई नाही आपल्याला.” आदित्यनि ड्रायव्हरला सांगितले. फार नाही अगदी परवा परवा पर्यत आपलयाला वेगाचे आकर्षण किती होते ना आणि आता .. आदित्यनि दीर्घ सुस्कारा सोडला. शेजारीच ठेवलेल्या अस्थी कलशाकडे त्यांनी नजर टाकली. नानाना जाऊन तीनच दिवस झाले. त्यांनी तो अस्थिकलश स्वत:च्या मांडीवर घेतला. आणि त्याला कुरवाळत कुरवाळत ते भूतकाळात गढून गेले.
नाना शहरातील एक आदरणीय व्यक्तिमत्व. आपल खेड्यातील घरदार सोडून शहरात आले. शहर कसल त्यावेळी ते मोठ गावच होत. शहरात जायचं आणि शिक्षण क्षेत्रात स्व:ताला झोकून द्यायच असा स्वत:शी त्यांनी निश्चय केला होता. या समाजाच आपण काही देण लागतो अशी त्यांची धारणा होती. गांधीजी आणि विनोबा भावे यांच्या विचारसरणीचा त्यांचावर अतोनात प्रभाव होता.देशाला देश जर प्रगती पथावर न्यायचा असेल तर लहानपणापासूनच मुलांच्यावर चांगले संस्कार घडायला पाहिजे असे त्यांचे ठाम मत होते. नानांनी स्वत:च्या हिमतीवर मुलांच्यासाठी शहरात शाळा काढली. त्याचे नावही होते “संस्कार विद्यालय” तशी त्यांची परिस्थिती फार चांगली होती अस नव्हे. पण एखाद्या गोष्टीने ते झपाटले कि ती पूर्ण झाल्याशिवाय त्यांना चैन पडत नसे. नानांच्या शैक्षणिक कार्यात आईन नानांना साथ दिली. नानांनी नुसती शाळा काढली नाही तर ती वाढवली आणि संस्कारक्षम विध्यार्थी घडवले. पस्तीस वर्षे नानांनी शाळेची सेवा केली. आणि ते स्वेच्छेने बाहेर पडले.
शाळेच्या प्रांगणात नानांच्या सेवा निवृत्तीचा निरोप समारंभ झाला होता. सर्व वक्त्यांनी, गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी, नानांच्या आजी माजी विद्यार्थ्यांनी भरभरून भाषणे केली. आणि नाना भारावून गेले. पस्तीस वर्षाच्या सेवेचे फळ मिळाले असे त्यांना वाटले. आपल्या सत्काराला उत्तर देताना नाना उभे राहिले आणि एकही शब्द त्यांच्या तोडून फुटला नाही. एरवी भावनांच्यावर नियंत्रण ठेवणे म्हणजे विवेक अशी शिकवण देणारे नाना त्यादिवशी मात्र ढसाढसा रडले. पहिल्या रांगेत बसून आम्ही हे सर्व पाहत होतो. सर्व श्रोते हेलावून गेले आणि नाना त्यादिवशी एकही शब्द न बोलता उपस्थितांनी उभे राहून टाळ्यांचा कडकडाट केला. खर म्हणजे नाना भाषण उत्तम करायचे. पण त्यादिवशी त्याचे शब्द मह्वाचे नव्हते, भावना मह्वाच्या होत्या.काही न बोलता नानांनी सभा जिंकली होती.
आपणहि शाळेत शिक्षक म्हणून काम करावे, त्यांच्या संस्काराचा वारसा पुढे न्यावा असे त्यांना नेहमी वाटे.” तू चांगला बोलतोस. चांगला शिक्षक होशील” नाना नेहमी आपल्याला म्हणायचे. आपण चांगले बोलतो हे आपल्यालाही माहित होते. पण तरीही शिक्षक होण्यात आपल्याला रस नव्हता. लहानपणापासून घरची परिस्थिती आपण पाहिली होती. आणि त्यामुळेच त्यांचे मन शिक्षक होण्याची कल्पना मान्य करत नव्हते. आपल्याला श्रीमंत व्हायचे होते. भरपूर पैसा, बंगला गाडी या गोष्टी मिळवून आईच्या माघारी नानांना सुखात ठेवायचे होते.
“ नाना, मी शिक्षक होणार नाही. शिकवणे हि कला माझ्याकडे आहे अस वाटत नाही”
नानांनी क्षणभर विचार केला. आणि म्हणाले “ मग काय करणार आहेस? शिक्षक झालास तर आपल्याच शाळेत माझ कार्य पुढ नेशील”
“ मी स्वत:चा व्यवसाय सुरु करणार.”
“ पण त्यासाठी लागणार भांडवल बिंडवल काही विचार केलास?आणि व्यवसाय म्हटले कि पुन्हा अनावश्यक तडजोडी” नाना काळजीपोटी म्हणाले.
“ अस काही नाही. मी व्यवसाय सुद्धा प्रामाणिकपणे करू शकतोच कि” आपण नानांना विश्वास दिला.
नानांनी थोडासा विचार केला. कपाटातले चेकबुक काढले. आणि म्हणाले “ बोल, सगळे मिळून मी साधारण दोन लाख देऊ शकतो. माझा पीएफ सेव्हिंग वगैरे मिळून”
“ हे काय करता? ती तुमची म्हातारपणाची पुंजी आहे. ती का तुम्ही मला देता? काही लागलच तर तुम्ही आहेच कि” आपण निक्षून नानांना सांगितले. नानांना कर्ज बिर्ज या गोष्टी नको असायच्या. जुन्या काळातले त्यांचे संस्कार नवीन काळाप्रमाणे बदलू शकत नव्हते. नाना नाईलाजाने “ हो” म्हणाले.
आपण व्यवसाय सुरु केला आणि अपेक्षेपेक्षा लवकरच जम बसला. नानाहि खुश होते. व्यवसाय म्हटल्यावर छोट्या मोठ्या तडजोडी कराव्या लागतातच. पण नानांच्या संस्काराला धक्का लागेल अशी कोणतीही हद्द आपण ओलांडली नव्हती. आणि ओलांडणे शक्य नव्हते. एक दिवस नाना म्हणाले, “ तुझा व्यवसाय चांगला चालला आहे. आता तुझ लग्न करु म्हणजे एका मोठ्या जबाबदारीतून मी सुटेन”.
लग्न या भानगडीत आपल्याला पडायची बिलकुल इच्छा नव्हती. आपण नानांना थोडे ठामपणे सांगितले,” नाना, एक म्हणजे माझ प्रेमबीम काही नाही कुणावर. आणि दुसर म्हणजे मुली बघायला बिलकुल वेळ नाही मला. थोड थांबा”
“ कोण म्हणतंय तुला मुलगी बघ. फक्त आज एक मुलगी बघायची. फक्त अर्धा तास माझ्यासाठी काढ आणि तुला आवडली तर पुढे जाऊ. नाही आवडली तर पुन्हा कधीही मी लग्नाचा विषय काढणार नाही. माझ्या मित्राचीच मुलगी आहे” त्या दिवशी संध्याकाळी केवळ नाना म्हणताहेत म्हणून आपण मुलगी बघायला गेलो. आणि आपण लगेच तिला “ हो” म्हणालो. नाना विजयी मुद्रेने आपल्याकडे बघत होते.

खिडकीतून बाहेर बघताना आदित्यना हे सर्व आठवत होते. भावना दिसायला सुंदर आणि शिवाय संस्कारी. शिवाय नानांच्याच मित्राची मुलगी. त्यामुळे बाकी काही अडचण नव्हतीच. लगेच साखरपुडा आणि महिन्याभरात लग्न. आणि खरच भावना त्यांच्या आणि सर्व पालटूनच गेले. प्रत्येक दिवस वेगाने येत होता आणि वेगाने पुढे जात होता.याच वेगात पुढची दहा वर्षे कशी गेली ते कळल नाही. दहा वर्षात आपली मेहनत, नानांचे आशीर्वाद, भावनाची साथ आणि सुश्रुतचा पायगुण त्यामुळे त्यांचा धंदा दहा वर्षात खूपच वाढला. एका छोट्या घरातून मोठ्या बंगल्यात झालेले स्थित्यंतर, नानांच्या डोळ्यादेखत त्यांचा मोठा होत चाललेला त्यांचा नातू आणि सगळ्यात मुख्य म्हणजे भावना आणि नाना यांचे वडील आणि मुली सारखे प्रेम. नाना खुश होते आणि आदित्य आपल्या धंद्यात रममाण झाले होते . मधेच केव्हा तरी नाना विचारायचे” प्रगती चांगली आहे. पण ब्रेक वर पाय असू दे रे बाबा”
आणि आदित्य नानांना विश्वासाने सांगायचे , “ नाना, तुमची मान खाली जाईल असे काही माझ्याकडून होत नाही” नाना कौतुकाने हसायचे. आदित्यची श्रीमती वाढत चालली होती. आणि त्याचबरोबर गावातील प्रतिष्ठा सुद्धा. गावातल्या सामाजिक संस्था त्यांच्याकडे डोनेशन मागायला यायच्या. आणि रोज संध्याकाळी आदित्य नानांना सगळ काही भरभरून सांगायचे.
नाना म्हणायचे “ जो पर्यत हे डोनेशन तुम्ही लोक देत नाही तो पर्यत या सामाजिक संस्था चालणार नाहीत. पण ती संस्था चांगली पाहिजे. त्यात कोणताही गैरव्यवहार होता कामा नये. जे डोनेशन तू देशील त्याची रीतसर पावती घेत जा” आदित्य हे सगळ नेहमीच पाळायचे.

डायव्हरने ब्रेक दाबला. आणि गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली. “ सर, तुमच नेहमीच हॉटेल आल. चहा घ्यायचा असेल ना?” अरे हो, खरच कि. विचारात आदित्त्य त्या हॉटेल पर्यंत केव्हा पोचले ते कळलच नाही. पण आज त्यांना चहा प्यायचा नव्हता. ते ड्रायव्हरला म्हणाले “ तू जा. घेऊन ये चहा. मला नको आहे” ड्रायव्हर चहा घ्यायला उतरला. आदित्यची नजर दूरवर पसरलेले डोंगर, हिरवीगार झाडी कडे गेली. आता अवघ्या तासाभरात आपल गाव येईल. किती निसर्गरम्य गाव आहे आपल. शाळेच्या व्यापात नानांना गावाकडे जायला कधी मिळाल नाही. केवळ नानांना निसर्ग आवडतो म्हणून आदित्यनि नानांच्यासाठी आपल्या अलिशान बंगल्यात बाग माळ्याकडून करून घेतली. रोज रात्री नाना त्याला पाणी घालायचे आणि बागेत येरझाऱ्या घालत बसायचे.
त्या दिवशी सुद्धा नाना असेच बागेत येरझाऱ्या घालत होते. संध्याकाळी कितीही दमून आलो तरी नानांच्या शेजारी आपण बसायचो आणि दिवसभरात काय झाले ते नेहमीप्रमाणे सांगायचो हा त्यांच्या नेहमीच्या दिनक्रमाचा भाग. त्या दिवशी आपण असेच आनंदात होतो त्यापेक्षाही संभ्रमित जास्ती होते. नानांनी त्यांच्या मनातील खळबळ ओळखली होती. पण काय असेल ते आपला मुलगा आपल्यला सांगणार याची त्यांना कल्पना होती.
“ नाना, एक निर्णय घेताना द्विधा मनस्थिती झाली आहे. तुमचा सल्ला घ्यावा व मग फायनल डिसिजन घ्यावा अस वाटतय”
“ बोल. पण तुझ्या बिझनेस मधल काय कळणार? तरी पण बोल. जितक सांगता येईल तेवढ सांगतो”
“ माझा बिझनेस नाही. तुमच्या शाळेबाबत निर्णय घ्यायचा आहे” नाना विचारात पडले.
“ आज तुमच्या शाळेचे मुख्याध्यापक आणि बॉडी मधले काही मेबर्स माझ्याकडे आले होते. मी तुमच्या शाळेचा चेअरमन व्हावं अशी त्यांची इच्छा आहे”
“चेअरमन?” काही वेळ नाना काहीच बोलले नाहीत. पण ते बोलत नव्हते म्हणजेच काहीतरी विचार करत होते हे नक्की.
“ आदित्य, तू चेअरमन होतो आहेस या गोष्टीचा मला आंनदच वाटेल. कारण जी शाळा मी स्थापन केली त्या शाळेच्या चेअरमन पदी माझा मुलगा बसतोय हे चांगलच आहे. पण ज्या संस्कारांनी हि शाळा मी चालवली होती. ती तशीच चालवण्याची जबाबदारी तुझ्यावर आहे हे विसरून चालणार नाही. सध्या तिथे काय चालले आहे हे मला माहित नाही कारण ज्या दिवशी मी शाळा सोडली त्याच दिवशी मी तिथून मनानं सुद्धा बाहेर पडलो. त्यामुळे काही तत्व समोर ठेऊन ते तुला बोलावतायत का तुझा पैसा त्यांना पाहिजे आहे ते बघ”
“ ते कोणत्या हेतूने बोलावतायत इकडे लक्ष देण्यापेक्षा आपल्याला एखादी संधी मिळते आहे आणि त्या संधीच आपण सोन करू म्हणून हि जबाबदारी स्वीकारायला काय हरकत आहे?”नानानि थोडा विचार केला. आणि ते “ हो” म्हणाले. भावनाला आनंद झाला. आणि सुश्रुत सुद्धा आनंदाने नाचू लागला. त्याला काय कळले कुणास ठाऊक पण आपले बाबा आपल्याच शाळेत मोठे साहेब झाले इतक मात्र त्याला कळल.?
“ तुला काय झाल रे ठोम्ब्या नाचायला?” नानांनी त्याला प्रेमाने हातातली काठी मारली. “ बाबा चेअरमन झाले म्हणून काही अभ्यास संपणार नाही ह. उलट जास्ती करावा लागेल” नाना म्हणाले पण ते ऐकायला सुश्रुत होताच कुठे तिथे.?

ड्रायव्हरने गाडी चालू केली. आणि आदित्यनि गळ्याभोवतीचा मफलर बाजूला केला. वातावरणातील थंडी आता कमी झाली होती आणि खिडकीतून येणारा वारा त्यांना हवाहवासा वाटत होता.” का रे, तासाभरात पोचू ना आपण आता?” “ काही सांगता येत नाही साहेब. रस्ता कसा मिळतोय त्यावर सार अवलंबून आहे. आता सगळीकडे शहर काय, खेड काय गर्दी सगळीकडे.”खरच गेल्या दहा बारा वर्षात किती बदल होत चाललाय ना ? आदित्यच्या मनात विचार आला. आणि त्या विचारासरशी मनातील भूतकाळ अधिकच जागृत झाला.
“ सर. आपल शहर आता खूप वाढलय आणि त्यामुळे स्पर्धाही तितकीच वाढली आहे. शिक्षण क्षेत्र सुद्धा त्याला पर्याय नाही” शाळेच्या बॉडीची मिटिंग चालू होती आणि बॉडीच्या मेबर्सचे बोलणे आपण ऐकत होतो. खर तर ती काय पहिलीच मिटिंग होती अस नाही. पण ज्या ज्या वेळी आपण मिटींगला यायचो त्या प्रत्येकवेळी आपल्याला अभिमान वाटायचा. जी शाळा आपल्या वडिलांनी काढली.ज्या शाळेत आपण शिकलो, आपला मुलगा शिकतोय त्याच शाळेच्या चेअरमन पदी बसून मेब्र्र लोकांशी चर्चा करताना आपल्याला अभिमान आणि वेगळाच आत्मविश्वास वाटत होता.
“ तुमच नेमक म्हणण काय आहे ते सांगा”
“ आपली शाळा चांगली आहे. पण इतर शाळा जशा सुविधा देतात तशी आपली शाळा देउ शकत नाही कारण आपल्याकडे पुरेसे पैसे नाहीत.”
“अद्यावत सुविधा म्हणजे नेमक काय अपेक्षित आहे तुम्हाला?”
“सर, काळ खूपच पुढ गेलाय.पण आपल्या शाळेतील विध्यार्थी अद्यावत कॉम्प्युटर शिक्षण घेऊ शकत नाही. कधी काळी कुणीतरी मोडके तोडके कॉम्पुटर भेट म्हणून दिले आणि त्यावर कसे बसे काहीतरी शिकतो. शाळेत कॉम्पुटर लब असण गरजेच आहे” दुसर्या मेंबरने पुस्ती जोडली.
“ अद्यावत व्ययाम शाळा? कुणीतरी अजुनी म्हणाले.
“ त्याची गरज आहे का? इतक मोठ मैदान आहे. जोर बैठका हा व्यायाम काही वाईट नाही” आपण आग्रहाने सांगितले होते. नानांचे संस्कार इतके प्रभावी होते आणि त्याचमुळे आपली तब्बेत नेहमी ठणठणीत असते.
“ अद्यावत व्यायाम शाळा असली, त्यात एखादा ट्रेनर असला कि विध्यार्थी आकर्षित होतात” त्या मेंबरने मुद्दा लावून धरला होता.पण आपल्याला कॉम्पुटरचा मुद्दा मान्य होता पण अद्यावत व्यायाम शाळा? हि कल्पना रुचली नाही.
“ मी कॉम्पुटरचा मुद्दा मान्य करतो. पण इतके मोठे मैदान आहे. तुम्ही मुलांचा व्यायाम त्यावर घेऊ शकता. . आज व्यायाम शाळा. उद्या स्वीमिग टंक. इतक्या सुविधा आवश्यक आहे अस वाटत नाही. हि शाळा आहे. फाईव स्टार हॉटेल नाही” आपण आपला निर्णय सांगितला आणि म्हणालो, “ बोला, किती रुपयाची देणगी पाहिजे?”
काही वेळ कुणीच बोलले नाही. आणि थोड्या वेळाने कुणीतरी म्हणाले,
“ सर, तुम्ही आत्ता देणगी द्याल. पण मला वाटत शाळेकडे स्वत:चा असा फंड पाहिजे. ज्यातून विद्यार्थ्यासाठी, शाळेसाठी सातत्याने काही ना काही करता येईल”
“मग करायचं काय ?
“सर, मी सुचवू का? आपल्या शाळेची इमारत चांगली आहे. पण विद्यार्थी नाहीत. विद्यार्थी नाहीत कारण सुविधा नाहीत. हे दुष्ट चक्र आहे. आपण सुविधा सुरु करून दिल्या तर विद्यार्थी नक्की येतील आणि त्यांना शिकवण्यासाठी शिक्षकही भरती करावे लागतील. शिक्षकांची भरती करताना आणि विद्यार्थांना admission देताना सुद्धा त्यांच्याकडून डोनेशन घ्यायचे. त्यातून फंडस उभे राहतील.आणि सगळे प्रश्न आपोआप सुटतील.” इतका वेळ गप्प बसलेले मुख्याध्यापक एका दमात बोलून गेले. आपण गप्प होतो. ते मुख्याध्यापक सुद्धा त्याच शाळेचे विधार्थी होते आणि नानांना ओळखत होते. कदाचित त्याच मुळे त्यांनी आपल्या मनातील खळबळ ओळखली असावी.
“ यात कोणताच भ्रष्टाचार नाही. कारण जे पैसे आपण घेणार आहोत ते सर्व पैसे आपण शाळेच्या हितासाठी वापरणार आहोत”
आपण काहीतरी चुकतोय अस सारख वाटत होत. पण शाळेकडे पैसे नाहीत हि सुद्धा वस्तुस्थिती होतीच. आणि विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण देण्याशिवाय कोणताच पर्याय नाही हे सुद्धा पटत होत. नेहमीप्रमाणे हा विषय नानांशी बोलून चालणार नव्हता. आपण फार काही न बोलता फक्त मान डोलावली.
पुढच्या एक दोन वर्षात शाळेची भरभराट झाली.विद्यार्थी वाढले, शिक्षक वाढले आणि “ संस्कार विद्यालय” नावारूपास आले.
नानांना घारात बसून शाळेची प्रगती कळत होती. त्यांना वाईट वाटू नये म्हणून बऱ्याच गोष्टी आपण त्यांना सांगायचो नाही. पण त्या दिवशी ...

... त्या दिवशी आपण नेहमीप्रमाणे घरी आलो होतो. नेहमी बागेत येरझारया घालत बसणारे नाना त्या दिवशी हॉल मध्ये येरझाऱ्या घालत होते. त्यांच्या चेहऱ्यावर भयग्रस्त शांतता होती. आणि फेऱ्यांचा वेग वाढला होता. नानांना असे मी कधीच बघितले नव्हते.
“ नाना काय झाल? बर आहे ना?”नाना काहीच बोलले नाहीत. भावना हॉल मध्ये कोपरयात उभी होती.
“ भावना, काय झालय ?”नानांना बर वाटत नाहीय का?”आपण काळजीपोटी विचारले.
“ नाही रे, बराय सगळ. तू आधी फ्रेश हो. मग बोलू आपण”
“ नाही. आधी काय झालय ते सांग. आणि सुश्रुत कुठाय?” कुणीच काही बोलल नाही.
“ नाना, काय झालय?”
“ मी आज शाळेत गेलो होतो” मला आश्चर्य वाटलं. नाना आता घराच्या बाहेर फारस पडत नसत. आणि आज शाळेत?
“ जुन्या शाळेच अस्तित्व तुम्ही लोकांनी ठेवलच नाही. नवीन इमारत, हेडमास्तरांच ऑफिस साखर कारखान्याच्या चेअरमनला शोभेल अस. सगळ कस झाकपाक. मी शाळेला ओळखल नाही आणि शाळेन मला ओळखल नाही” दूरवर नजर ठेऊन नाना बोलत होते. नाना शाळेसाठी बरेच खपले होते हे खर होत पण आता शाळा सोडूनही त्यांना बराच काळ लोटला होता. त्यामुळे त्यांना तिथे कुणी ओळखल नाही याचे आपल्यलाला काहीच वाटले नाही.
“ नाना, तुम्ही शाळा सोडून बराच काळ लोटला. तुम्ही तुमच नाव सांगितल का तिथे? तुम्हाला कुणी ओळखणार नाही अस कस होईल? आणि त्याचे इतक वाईट काय वाटून घेता?”
“ कुणी मला ओळखल नाही म्हणून मी अस्वस्थ होईन? मी अस्वस्थ आहे कारण शिक्षणाचा तुम्ही लोकांनी व्यवसाय केला म्हणून. मी तिथे गेल्यावर माझ्या कानावर आल शाळेत शिक्षक भरती करत असताना तुम्ही त्याच्याकडून डोनेशन घेता म्हणून? हे नीतीला धरून आहे?”
“ नाना, शाळेकडे पैसे नाहीत म्हणून सुविधा नाहीत, सुविधा नाहीत म्हणून विद्यार्थी नाहीत, हे दुष्ट चक्र थांबवायचं कस? मुलांना अद्यावत शिक्षण देणे गरजेचे आहे असे वाटत नाही का तुम्हाला?”
“ शिक्षणाला माझा विरोध असण शक्य नाही हे तुलाही माहित आहे. म्हणून तुम्ही असा भ्रष्टाचार करणार का?”
“ आम्ही कोणताच भ्रष्टाचार केला नाही. जे पैसे शिक्षकांच्याकडून, विद्यार्थ्यांच्याकडून घेतले ते शाळेसाठी वापरले”
“ रिसीट त्यांना दिली.? त्यातील प्रत्येक पैशाचा हिशोब ठेवलाय तुम्ही?” आपण सडेतोड उत्तर देऊ शकत नव्हतो. काही तडजोडी कराव्या लागतात तशा केल्या होत्या. नाना म्हणतात त्याप्रमाणे शिक्षण हा व्यवसाय नाही हे मला पटत होते. पण याला इलाज काय?
“ मी पण पैसे उभे करून शाळेची छोटी का होईना इमारत बांधली होती. गावात इतके धनिक आहेत, तू सुद्धा धनिक आहेस त्यांना गाठून अधिकृत रित्या त्यांच्याकडून पैसे उभे करता आले असते. एखादा मोठा कार्यक्रम तिकीट लाऊन करता आला असता. बरेच मार्ग आहेत. पण तुम्हाला वेगाने पुढे जायचे आहे.” आपण गप्प बसलो.
“ ज्या शिक्षकांना तुम्ही भरती केले ते शिक्षक चांगले आहेत, चांगले शिकवतात, मुलांच्यावर चांगले संस्कार करतात याची खात्री आहे तुला?” विषयाला थोडी कलाटणी मिळते आहे हे बघून आपण घाईने म्हणालो “ हो नाना. त्याची खात्री आहे मला”
“ बोलूच नकोस तू या बाबतीत. एक शब्द बोलू नकोस. “ नाना असा कधीही आपल्यावर आवाज चढवत नसत. भावना घाबरली होती. सुश्रुत आत खोलीत झोपला होता.
“ आज शाळेतून बाहेर पडताना मी काय बघितल माहित आहे तुला? शाळेच्या कॅम्पौडला लागून पान पट्टीच दुकान आणि त्याच्या समोर काही अंतरावर बार” नानांनी आज शाळेच ऑडीटच केल होत.
“ पण नाना, ते शाळेच्या आवाराच्या बाहेर आहे. एका गुंडाचा तो बार. त्याला राजकीय पाठींबा. त्याला विरोध कसा करणार?”
“ गांधीजीनि ब्रिटिशाना विरोध केला. तुम्हाला एका साध्या गुंडाची तक्रार करता येत नाही” नाना भडभडा बोलत होते.
“ आणि या पेक्षाही भयानक गोष्ट म्हणजे, त्या पान पट्टीच्या दुकानात विद्यार्थी तंबाखू खात उभे होते आणि समोरच्या बार मधून दोन मुले बाहेर पडत होती”
“ नाना, एकदा शाळा संपली कि यांच्यावर आम्ही कस नियंत्रण ठेवणार?”
“ आदित्य, त्या दोन मुलांच्या पैकी एक तुझा सुश्रुत होता “संस्कार विद्यालय” मी काढले आणि तिथे माझा नातू दारू पिऊन बाहेर पडत होता. मी त्याच्या जवळ गेलो आणि हि काठी त्याच्या पाठीत घातली. ज्या वयात नातावन आजोबाला आधार देऊन घरी आणायचं त्या वयात नातवाला आधार देऊन मी रिक्षात बसवलं” इतक बोलून नाना हमसून हमसून रडत होते.
आपण नानांना थोपटत होतो. भावनाही रडत होती. डोळे पुसत नाना काही वेळाने बोलू लागले, “ आदित्य, तुझ्या वेगाने जाण्याला माझा विरोध नाही. काळाच्या गतीप्रमाणे जायलाच पाहिजे. पण त्यात काय भरडले जाते इकडे लक्ष तुम्ही द्यायला नको का? आगीचे लोण घरापर्यत आले तरी तुम्हाला लक्षात येत नाही. अशी कोणती रे धाव तुमची?सांभाळा बाबानो सांभाळा” नाना लहान मुलासारखे रडत होते आणि आपल्या मनातील निश्चय पक्का होत होता.

“ माझा निर्णय पक्का आहे. मी या शाळेच्या चेअरमन पदाचा राजीनामा देतोय”
“ सर असे तडकाफडकी जाऊ नका. तुमची गरज आहे शाळेला”
“ नाही. माझ्यापेक्षा चांगला कुणीतरी मिळेल. मी या क्षणापासून शाळा सोडतोय” आपल्या आकस्मित निर्णयाने सगळेच आवक झाले होते. पण नानांच्या भावना दुखावल्या जातील असे यापुढे काहीही करायचे नाही हा आपला निर्णय पक्का होता. आपण राजीनाम्यावर सही केली. मनातील अपराधाची भावना थोडी का होईना कमी झाली होती. आणि त्याचवेळी फोन वाजला. भावना फोनवर रडत होती.
“ अहो, लवकर या. नाना काहीच बोलत नाहीत. बहुतेक .. “ आपण धावत पळत घरी गेलो. आपण शाळा सोडली तेव्हा नानांनी जग सोडलं होत

“साहेब, नदी आली “ ड्रायव्हरच्या बोलण्याने आदित्य भानावर आले. गावातील ती खळाळती नदी. नानांच अस्थी विसर्जन या नदीतच करणे हे आदित्यना योग्य वाटले. नाना गेले हे मनाला पटत नव्हत.ज्यांनी आयुशाभर संस्काराची कास धरली, त्या संस्काराची राख झाली होती आणि शिल्लक राहिल्या होत्या त्या फक्त अस्थी. !आदित्यचे डोळे पाणावले होते. डोळ्याच्या कडा त्यांनी पुसल्या. आयुष्यभर हवेतला गारवा अजुनी संपला नव्हता. आदित्यनि मफलर बाजूला केला. आणि ते गाडीतून अस्थिकलश घेऊन खाली उतरले..
दूरवर पसरलेली नदी. आदित्यनि दोन्ही हातांनी अस्थिकलश हातात घेतला. आपल्या वडिलांच्या अस्थीला त्यांनी मनोभावे नमस्कार केला आणि समोरच्या नदीत विसर्जित केला. कितीतरी वेळ त्या तरंगत जाणाऱ्या कलशाकडे ते साश्रू नयनांनी बघत होते.

सतीश कुलकर्णी
९९६०७९६०१९

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सतीश जी, नक्कीच छान ललित कथा! चित्र उभं राहतंय, नानाचं, आधीच्या व नंतरच्या शाळेचं, आदित्य, भावना आणि सुश्रुतचं सुद्धा! फक्त, एक-दोन शंका -
सुश्रुत च वय काय अपेक्षितआहे ? १३? १४? आणि दुसरं, हि कथा आदित्यचे स्वगत आहे. पण जेंव्हा आदित्यला संबोधले जात आहे तेंव्हा आदरार्थी एक-वचनाच्या उपयोगामागे काही खास कारण?
अनेक शुभेच्छा!!!

कथा आवडली.
जरा अतिशयोक्ती वाटली (सुश्रुत दारू प्यायला लागणं ही).

अपुर्वजी,
उत्तर द्यायला थोडासा विलंब होतोय. दिलगीर आहे.
सुश्रुतच वय १३, १४ आहे.
आदित्य हि गावातील प्रतिष्ठित व्यक्ती आहे. जरी ते स्वगत असल तरी कथा लिहिताना मला त्या फॉर्म मध्ये लिहिणे योग्य वाटले इतकेच. बाकी काही नाही.