पॉपी फुलं ...स्मरण सैनिकांच्या बलिदानाचे

Submitted by मनीमोहोर on 23 June, 2022 - 08:58
Poppy flowers,  पॉपी फुलं

पॉपी फुलं ...स्मरण सैनिकांच्या बलिदानाचे

थंडीच्या दिवसात झाडांवर फुलं तर सोडाच पण एखादं पान ही न दिसणारं लंडन सध्या भरपूर सूर्यप्रकाश, मध्ये मध्ये पडणारा हलका पाऊस ह्यामुळे अक्षरशः बहरलं आहे. नजर जाईल तिथे दिसणारी हिरवळ मनाला सुखावते आहे. त्यावर फुललेल्या डेझी हिरवळीवर जणू कुणी मोती उधळून टाकावेत अश्या दिसतात आणि हिरवळीची शोभा द्विगुणित करतायत. डॅफोडिल्स किंवा ट्युलिप ह्यांचा बहर जरी गेला असला तरी विविध प्रकारचे गुलाब, झेंडू, लवेंडर, पॉपी, हनिसकल आणि आपल्याला नावं ही माहीत नसलेल्या अनेक फुलांनी रस्ते, ट्रेन स्टेशन, घरांपुढच्या बागाच नाही तर घरांच्या खिडक्या ही सजल्या आहेत.

पहिल्यांदा जेव्हा मी ही पॉपीची फुलं बघितली तेव्हा लगेच मला आपली खसखस आठवली. ती सुद्धा ह्या फुलांची जी बोन्ड असतात त्यातल्या बियांपासूनच तयार करतात पण त्याची वेगळी शेती करावी लागते. इथे जी पॉपी फुलं दिसतात ती फक्त फुलंच असतात त्यापासून खसखस वैगेरे नाही मिळणार. तरी ही आमच्या अंगणातील रोपांवर जी बोंडं धरली होती त्यातलं एक कुतूहलाने फोडून बघितलं तर आत खसखशी सारख्या असंख्य बिया होत्या. पण रंग काळा होता.

पॉपीची फुलं एकदम लालभडक रंगाची असतात. झाडाला मोठा दांडा फुटून त्याच्या टोकावर पाच सहा पाकळ्यांच पूर्ण उमललेलं फुल फुलतं. आत काळाभोर पुष्पकोश असतो. लांब दांड्याच्या टोकावर फुलं उमलत असल्याने लांबून बघितलं तर ट्युलिपचा भास होतो. ट्युलिपचे कळे असतात ही पूर्ण उमललेली असतात एवढाच फरक.

ह्यांचा रंग थोडा मॉडीफाईड आहे आणि त्यामुळे पराग कोष ही पिवळे आहेत. ही अंगणात मुद्दाम लावलेली आहेत.

20220621_182225~2_0.jpg

ही एका माळरानावर उगवलेली.

20220623_134858.jpg

आपल्या कडच्या तेरड्या सारखं हे झाड ही तसं रानटीच आहे. रस्त्याच्या कडेला, गवतात कुठे ही उगवतं आणि फुलतं ही. पण फुलं छान दिसतात म्हणून मुद्दाम बागेत, अंगणात , पार्कमध्ये वैगेरे लावलं जात.

मात्र पॉपी ची गोष्ट एक फुल म्हणून इथेच संपत नाही. इथल्या लोकांचं तिच्याशी भावनिक नातं जुळलं आहे. पॉपी फुलं हा त्यांच्या मनाचा हळवा कोपरा आहे. युरोपातल्या ज्या भूमीवर पहिलं महायद्ध लढलं गेलं ती भूमी सैनिकांच्या धावण्या, पळण्यामुळे, घोड्यांच्या टापांमुळे रणगाड्यांमुळे वैगेरे अगदी निकामी, नापीक होऊन गेली होती. आता तिथे काही ही उगवणार नाही इतकी उजाड झाली होती. पण युद्ध संपलं आणि नंतरच्या समर मध्ये ती जागा असंख्य पॉपी फुलांनी बहरून गेली. असं मानलं जातं की सैनिकांच्या सांडलेल्या लाल रक्ताचा रंगच ह्या फुलांना प्राप्त झाला होता. तेव्हा पासून पॉपी फुलं पहिल्या महायद्धत जीवाचं बलिदान दिलेल्या सैनिकांचं प्रतीक बनली आहेत.

जॉन मॅक्री हा कॅनडेनीयन मेजर पहिल्या महायुद्धा काळात युद्धभूमीवरील हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून सेवारत होता. सर्वत्र युद्धाचं वातावरण होतं. बंदुकीच्या गोळ्यांच्या आवाजात पक्ष्याचं कूजन जणू विरून गेलं होतं. सामान्य लोकांचं जगणं मुश्किल झालं होतं. गावच्या गावं बेचिराख झाली होती. जिकडे तिकडे मृत्यूचं तांडव सुरू होतं. युध्दामुळे सर्वत्र एक प्रकारची विष्षणता , निराशा दाटून राहिली होती. जीवनाची नश्वरता क्षणोक्षणी प्रत्ययास येत होती.

अनेक सैनिकांचे प्राण ह्या मेजर डॉक्टरने योग्य उपचाराने वाचवले होते तरी अनेक जण त्याच्या देखत हे जग सोडून ही गेलेले तो रोज बघत होता. आपण काही करू शकत नाही म्हणून हतबल ही होत होता. तशातच त्याच्या एका मित्राच्या मृत्यमुळे आलेल्या विमनस्क अवस्थेत फिरत असताना गावात जागोजागी उभारलेली थडगी आणि त्यातच मध्ये मध्ये फुललेली पॉपी फुलं पाहून त्याला in flanders field (flander हे युरोप मधल्या युद्धभूमीच नाव आहे ) ही गुढगर्भित अर्थ असलेली भावनाप्रधान कविता स्फुरली. तेव्हा पासून पॉपी फुलं हुतात्म्यांच्या बलिदानाचं, त्यांना वाहिलेल्या भावपूर्ण श्रध्दांजलीचं तसेच विश्वशांतीचं आणि विश्वसमृध्दीचं ही प्रतीक मानली जातात.

2014 च्या जुलै ते नोव्हेंबरह्या काळात ह्या घटनेच्या शतकपूर्तीप्रीत्यर्थ लंडनच्या टॉवर ऑफ लंडन किल्ल्याच्या प्रांगणात ( आपला कोहिनूर ह्याच किल्ल्यात आहे ) पहिल्या महायुद्धात कामी आलेल्या ब्रिटिश सैनिकांच्या संख्येएवढी म्हणजे साधारण 9 लाख सिरॅमिकची पॉपी फुलं खोवण्यात आली होती. हुतात्मा सैनिकांना भावांजली वाहण्याची किती ही सुंदर कल्पना ! त्याचं उदघाटन राणीच्या हस्ते झालं होतं. अनायसे आम्ही त्यावेळी लंडनमध्येच होतो त्यामुळे आम्ही ही ते क्षण अनुभवू शकलो. ते दृश्य प्रत्यक्ष बघताना सगळेच जण भावनिक होत होते. अक्षरशः लाल रंगाचा सागर समोर आहे असं वाटत होतं आणि ते पाहण्यासाठी बाहेर जनसागर उसळला होता.

DSCN1905.jpg

हा जनसागर

DSCN1912.jpg

गेली अनेक वर्षे सॅटिन, कागद किंवा प्लॅस्टिक ची कृत्रिम पॉपी फुल (मला वाटत नोव्हेंबर महिन्यात ) इकडे विक्रीसाठी उपलब्ध असतात. सामान्य जनताच नव्हे तर म्हणे राणी ही लावते आपल्या ड्रेसवर एखाद दिवस ते फुल. सगळं जिथल्या तिथे लागणाऱ्या मॅनर्स वाल्या इंग्रज लोकांनी हे फुलं ड्रेस वर कसं कुठे लावायचं ह्याबद्दल मात्र काही ही संकेत दिलेले नाहीत. Happy ज्याला जसं आवडेल तसं लावावं. जनरली पंडित नेहरू कोटावर जिथे गुलाब लावत असत त्या ठिकाणी लावलं जात हे फुल ड्रेसवर. सैनिकांना श्रद्धांजली म्हणून अबाल , वृद्ध, गरीब , श्रीमंत सगळेच जण विकत घेतात फुलं आणि लावतात ड्रेसवर. अर्थात त्यातून मिळणारा निधी हा सैनिकांच्या कल्याणकारी योजनांवरच खर्च केला जातो म्हणून ह्यांची विक्री ही खूप होते. असो.

आता जेव्हा माझी नजर पॉपी फुलावर जाते तेव्हा नकळतच पहिल्या महायुद्धातील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली जाते आणि जगातील सर्व हेवे दावे नष्ट होऊन, लढाया बंद होऊन सर्वत्र सलोखा आणि शांती वास करू दे अशी मनोमन प्रार्थना ही केली जाते.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पॉपीच्या फुलांशी असलेलं लेखिकेचं आणि दुसऱ्या महायुद्धातल्या सैनिकांच्या बलिदानाचं अनोखं नातं पाहून डोळे पाणावले. पॉपी बोलेना, पॉपी फुलली, तू तर पॉपीबोन्ड, ही

bhavsargham (भावसर्गहॅम) या अल्बम मधली गाणी आठवली.

मला वाटतं एक कविता आहे या फुलांवरती व सैनिकांच्या बलिदानावरती.
वेगळाच विषय आहे. मस्त मांडलेला आहे.

मस्त लिहिले आहेस गं.
नऊ लाख पॉपी फुलांबद्दल कुठेतरी वाचले होते. गेलेल्यांची
आठवण ठेवायची ही रित अगदी हृदय्स्पर्शी आहे.

रच्याकने, काळी खस्खस पण असते गं. आता परत बिया मिळाल्या की बघ निट.

खूपच आवडला लेख. पॉपी फुलंही माहिती नव्हती आणि अर्थातच सैनिकांच्या बलिदानाशी असलेला हा संबंधही.

पण यावरून एक आठवलं. आम्ही कॉलेजला असताना राजस्थानात हल्दी घाटीला गेलो होतो. तिथे राणा प्रतापचं अकबराशी अखेरचं युद्ध झालं. त्या परिसरात गुलाब उगवतात. तिथल्या माणसांनी आम्हाला सांगितलं होतं की ते फक्त युद्ध झालं त्याच परिसरात उगवतात. तेव्हा एकदम अंगावर काटा आला होता.

सुंदर लेख आणि परिचय.

ब्रिटिश राजपरिवाराचे लाल पॉपी फुले कोटवर लावून all black look वाले फोटो अनेकदा दिसतात.

छान. पॉपी म्हणजेच खसखस. (ना?)
पॉपी नोव्हेंबर मध्ये (इथे) विकत नाहीत. तर व्हेटरन फंडला ऐच्छिक देणगी द्यायला यंग कॅडेट्स आणि रिटायर्ड सैनिक उभे असतात. तेव्हा पॉपी घ्यायची आणि त्या खोक्यात काही पैसे टाकायचे असं साधारण अपेक्षित असतं. ११ नोव्हेंबरला (११ वा महिना) ११ वाजून ११ मिनिटांनी पाहिलं महायुद्ध संपलं म्हणून ११ नोव्हेंबर रिमेंबरंस डे साजरा करतात त्या दिवसांत पॉपी शर्ट .. खरतर त्या दिवसांत जॅकेटला लावायची स्टाईल आहे.
रच्याकने: पॉपी लावलेले बेगल छान लागतात. इथे हे आता अगदीच असंबद्ध वाटेल पण गरम गरम एव्हरीथिंग बेगल विथ अर्ब गर्लिक/ व्हेजी क्रीम चीज टोस्टेड भारी लागतं.
हीच पॉपी कॅलिफोर्निया मध्ये गोल्डन/ पिवळ्या रंगाची होते. तिकडचं स्टेट फ्लॉवर आहे गोल्डन पॉपी. एकतर तिकडे पाऊस पडत नाही आणि रखरखाट असतो. तरी रस्त्याच्या कडेला, माळरानात पॉपी मस्त उगवून येतात.

छान लेख आणि नवीन माहिती कळली. पण अमितव म्हणतोय तसं मला वाटलं कि पॉपी म्हणजेच खसखस ना? ( आणि मग अफूच्या बोंडांना काय म्हणतात? ह्याचाही काहीतरी संबंध आहे ना एकमेकांशी?)

सर्वांना धन्यवाद प्रतिसादाबद्दल.

रच्याकने, काळी खस्खस पण असते गं. आता परत बिया मिळाल्या की बघ निट. >>बघते साधना

तो पॉपी चा समुद्र पाहून डोळे निवले एकदम.त्याचे अजून जवळून फोटो आहेत का? >> अनु माझ्याकडे नाहीयेत पण नेटवर खूप आहेत तिथे बघू शकतेस.

अमितव छान माहिती दिलीस.

तिथे राणा प्रतापचं अकबराशी अखेरचं युद्ध झालं. त्या परिसरात गुलाब उगवतात. तिथल्या माणसांनी आम्हाला सांगितलं होतं की ते फक्त युद्ध झालं त्याच परिसरात उगवतात. तेव्हा एकदम अंगावर काटा आला होता. >> वाचून ही काटा आला अंगावर.

ब्रिटिश राजपरिवाराचे लाल पॉपी फुले कोटवर लावून all black look वाले फोटो अनेकदा दिसतात. >> अनिंद्य बरोबरे.

2014 मध्ये ती सिरॅमिक ची फुल बघितली तेव्हा थोडी माहिती मिळाली होती ह्या बद्दल पण ह्या वर्षी अंगणात फुललेली पॉपी बघून पुन्हा कुतूहल वाढलं.

सामो मी ही लेखात कवितेची लिंक दिली आहे , ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी बघावी. अजून ही कवितेचं रसग्रहण, पार्श्वभूमी अस बरच मटेरिअल आहे नेटवर.

देवकी, स्वाती लाड, अनंतयात्री आणि उदय धन्यवाद.

अनंत यात्री कवितेचा काव्यरूपी भावानुवाद फारच सुंदर जमला आहे. कविता तशी कठीण, गुढगर्भित अर्थ असलेली आहे त्यामुळे तिचा भावानुवाद करणं ही कठीण काम होतं. पण मूळ आशयापासून दूर न जाता तुम्ही अनुवाद केला आहे.
तिकडे ही लिहिते आहेच.

Pages