क्रिप्टो ( Crypto ) भाग - १४

Submitted by मिलिंद महांगडे on 31 May, 2022 - 11:04

₿₿₿

तीन दिशांना गेलेले तिन्ही ऑफिसर पुन्हा एकत्र आले . ज्याला जे काम नेमून दिलं होतं ते काम त्याने केलं होतं. सौदामिनी मॅडमनी श्रीमती रागिणी बाबत माहिती मिळवली होती , अमर लेहला जाऊन आला होता आणि वाघचौरे साहेबांनी मुंबईत राहूनच त्यांचे खबरी पेरलेले होते , त्यांच्या मदतीने त्यांनी बरीच माहिती मिळवली होती . वाघचौरे साहेबांच्या केबिन मध्ये तिघेही बसले होते .
" बोला , काय काय माहिती काढलीत ? तुम्ही सांगा सौदामिनी मॅडम ." वाघचौरे साहेबांनी विचारलं .
“ साहेब , त्या रागिणीबद्दल मी थोडी माहिती काढण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला सांगते , ही रागिणी म्हणजे एक गूढच आहे बाई ! "
" का ? काय झालं ? " , अमर आणि वाघचौरे दोघांनी एकदम विचारलं .
" रागिणी ही काही दिवसांपूर्वी आसरा नावाच्या लेडीज हॉस्टेलवर राहायला आली होती. ती तिथे कुठून आली हे होस्टेलच्या केअरटेकर , प्रमिलाबाई ह्यांनाही माहीत नव्हतं . तिच्या रूमपार्टनरशी बोलले, तिने सांगितलं कि ती फार कमी बोलायची. तिच्याच विश्वात जास्त असायची.. हॉस्टेलच्या केअरटेकर प्रमिलाबाई तिच्याबद्दल सांगत होत्या, ती बी कॉम झाली होती आणि तिने कॉप्युटर प्रोग्रामिंगचा आणि कोडींगचा कोर्स केला होता. ती काही दिवसांपूर्वी कुठे तरी जॉबला लागली, आणि तिने हॉस्टेल सोडलं. पण हॉस्टेल सोडताना तिने कुणालाच काही सांगितलं नाही , की ती कुठं जाणार आहे ते , अगदी तिच्या रुमपार्टनरला सुद्धा नाही . "
" आय सी … तिचे आई वडील कुठे असतात , किंवा तिला कोणी नातेवाईक आहेत का ? वगैरे … "
" तिचे कोणी नातेवाईक नाहीत , ती लेडीज हॉस्टेलवर होती तेव्हा तिला कोणी भेटायला सुद्धा आलेलं होस्टेलच्या केअरटेकर बाईंना आठवत नाही. तिच्याकडे साधा फोन होता , आणि त्यावर कधीच कुणाचा फोन आलेला पाहिला नाही , असं तिची रूम पार्टनर म्हणाली. ती कुणात मिसळत नव्हती. होस्टेलच्या मेसमधेही जेवायला उशिरा यायची, गपचूप जेवण करून निघून जायची. "
" स्ट्रेंज ! आणखी काही ? "
" आणखी तसं काही खास नाही , हो , एक सांगायचं राहून गेलं , लॉटरीचं तिकीट काढायची सवय होती तिला, बऱ्याचदा ती लॉटरीची तिकिटे काढून पेपरमध्ये नंबर चेक करत राहायची असं तिची रूम पार्टनर म्हणाली . ”
" ओके , हेही जरा विचित्र आहे . शक्यतो मुली , त्यातल्या त्यात तरुण मुली ह्या लॉटरी बिटरीच्या भानगडीत पडत नाहीत .बरं , तिचं आणि ओमी मिरचंदानीचं लग्न कसं झालं ? ते कुठे भेटले ? ह्याची काही माहिती काढलीत का ? "
" नाही , ते काही तिथल्या कुणालाच माहीत नव्हतं , कारण हॉस्टेल सोडून जाताना तिने कुणाला फारसं काही सांगितलं नव्हतं . पण एके दिवशी केअरटेकर बाईंना फोन आला होता , त्यात तिने फक्त त्यांना सांगितलं की तिने लग्न केलं . मुलगा कोण , तो काय करतो , कुठे राहतो वगैरे काही बोलली नाही . फक्त लग्न केलं असं सांगितलं आणि फोन ठेऊन दिला. आपण जनरली लग्नाला बोलावतो , पण तिने लग्न झाल्यानंतर हे सांगितलं , म्हणजे बघा कसल्या प्रकारची बाई आहे ही ! "
" ओके , म्हणजे ही रागिणी थोडीशी विचित्र स्वभावाचीच दिसतेय . लॉटरीचं तिकीट काढायची सवय आहे म्हणजे पैशाचा तिला हव्यास असणार, आणि तो कमी श्रमात मिळवावा , किंवा कोणता तरी शॉर्टकट वापरून मिळवावा असं तिच्या एकंदर वागण्यावरून दिसतंय. " , अमर म्हणाला .
" येस , आणि त्यासाठीच तिने ओमी मिरचंदानीशी लग्न केलं असणार . त्याला आपल्या जाळ्यात फसवून त्याची संपत्ती तिने आपल्या नावावर करून घेतली , मग व्यवस्थित त्याचा काटा काढला आणि त्याच्या संपत्तीची मालकीण झाली . " वाघचौरे साहेब तर्क करीत म्हणाले .
“ हम्म … तसंच वाटतंय सर . ”, सौदामिनी मॅडम म्हणाल्या.
" ठीक आहे . बरं … अमरबाबू , तुमच्याकडे काय नवीन ? " वाघचौरे साहेबांनी विचारलं.
" सर , मी लेहमधल्या त्या हॉटेलवर गेलो होतो , जिथे ते दोघे राहिले होते . शहराच्या बाहेर सुनसान जागी राहिले होते ते . हॉटेल पण अगदीच साधं होतं. ”
“ साधं होतं म्हणजे ? ”
“ म्हणजे आता समजा एखादं जोडपं , हनिमूनसाठी जाणार असेल , तर एखादं चांगलं हॉटेल बुक करेल , किंवा जिथे काही चांगल्या सोयी सुविधा असतील , अँबियन्स चांगला असेल , सर्व्हिस चांगली असेल , असं हॉटेल बुक करेल , पण इथे तसं काही नव्हतं , अगदीच साधं हॉटेल , आणि तेही मुख्य शहरापासून थोडं दूर अशा ठिकाणी ते हॉटेल होतं. अगदी सुनसान ठिकाणी हॉटेल होतं. बरं एखाद्याला परवडत नाही म्हणून त्याने असं हॉटेल निवडलं तर समजू शकतो . पण इथे तर एका क्रिप्टो करन्सी एक्स्चेंज कंपनीचा मालक , त्याला कसली आहे पैशांची कमतरता ? तो कोणत्याही फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहू शकतो , मग त्याने हे हॉटेलच का निवडलं ? हा प्रश्न आहेच ! ”, अमरने मुद्देसूद त्याचं म्हणणं मांडलं.
“ हम्म … तुझं म्हणणंही बरोबर आहे. कदाचित आपल्या रागिणी मॅडमना त्यांचं काम करायला आणखी सोप्पं पडलं. त्या सुनसान हॉटेलवर काय घडलं ते कुणालाच समजणार नव्हतं. ”
" आणखी एक गोष्ट सर , मी त्या हॉटेल मधून निघालो त्यावेळी त्या हॉटेलच्या मॅनेजर ने एक गोष्ट सांगितली की ज्यावेळी तो ओमी मिरचंदानीच्या रूम मध्ये गेला होता त्यावेळी त्याला टेबलवर नकली केसांचा एक विग ठेवलेला आढळला. "
" नकली केसांचा विग ! कुणाचा होता विग ? " , वाघचौरे साहेबांना आश्चर्य वाटलं.
" विग बारीक केसांचा होता , म्हणजे तो ओमीचा असला पाहिजे. "
" त्याला टक्कल पडलं होतं कि काय ? "
" तसंच असेल कदाचित … " , सौदामिनी मॅडम म्हणाल्या.
" हम्म … बरं हॉस्पिटलमध्ये चौकशी केलीस का ? "
" हो सर , तिथे डॉक्टर दोरजे यांना भेटलो , ते म्हणाले हॉस्पिटलमध्ये आणायच्या आधीच ओमीचा मृत्यू झाला होता. त्यांच्याकडे तसं रेकॉर्ड आहे . "
" ओके , तरी काही प्रश्न मला खूप सतावतायत ते म्हणजे त्याने लग्नानंतर लगेच आपलं मृत्युपत्र का केलं , बरं केलं तर केलं त्यात त्याच्या अस्थी सिंधू नदीत अर्पण कराव्यात असं तो का लिहिल ? आणि त्याच्या मृत्यूपत्रानुसार लगेच त्याचा मृत्यू झाला आणि मिसेस रागिणीने त्याचा अंत्यसंस्कार तिथेच उरकून घेतला आणि त्याच्या अस्थी सिंधू नदीत अर्पण केला सुद्धा ! म्हणजे आपल्या हाती त्याची बॉडी लागणं तर दूर , त्याच्या अस्थी सुद्धा बघायला मिळू नयेत ? हे मला काही केल्या हे पटेना . " , वाघचौरे साहेब सिगारेट पेटवत म्हणाले .
" हा सर , हे प्रश्न तर मलाही पडलेले आहेत . ", अमर म्हणाला .
" मिसेस रागिणीच काय ते उत्तर देऊ शकतील . मी सुद्धा इथे क्रिप्टो कोईन एक्स कंपनीच्या एक दोन इंजिनियर लोकांना भेटलो , त्यातले बरेच जण वर्क फ्रॉम होम करत होते . कंपनीची सर्व कामे ऑनलाइन असल्यामुळे ऑफिस असं काही आधी नव्हतं . नंतर एक छोटंसं ऑफिस भाड्याने घेतलं होतं , पण त्यात सुद्धा जे सॉफ्टवेअर इंजिनियर , किंवा कोडिंग करणारे होते , ते कधी कधी यायचे. जे काही संभाषण व्हायचं ते मिसेस रागिणी यांच्याशी व्हायचं . एक दोन वेळा ओमी मिरचंदानीशी ते व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे भेटले होते .पण तेही फार थोडा वेळ , त्यांच्या म्हणण्यानुसार मिसेस रागिणीच कंपनीचं सर्व काही बघत होत्या . "
" मग ओमी मिरचंदानी नक्की काय करायचा ? ", अमरला प्रश्न पडला .
" तो बऱ्याच वेळा बाहेरच असायचा , बिझनेस ट्रिपवर , किंवा क्लायंट मीटिंगसाठी … असं ते म्हणाले . ", वाघचौरे साहेब सिगारेटचा धूर हवेत सोडत म्हणाले.
" ह्यावरून लक्षात येतं की ती ओमी मिरचंदानीच्या बिझनेसमध्ये रागिणीच जास्त ऍक्टिव्ह होती , आणि कदाचित तिला ओमीच्या बिझनेसमध्ये जास्त रस होता . आणि जसं सौदामिनी मॅडम म्हणाल्या की तिला लॉटरी काढायची सवय होती, म्हणजे तिला पैशांचं खूप जास्त आकर्षण होतं , आणि ओमीच्या बिझनेसमध्ये तिला जास्त पैसा दिसला असणार . " , अमर म्हणाला , त्यावर दोघांनी त्याला दुजोरा दिला .
" म्हणजे आपण तिघांनी जी माहिती काढली आहे ती मिसेस रागिणीबद्दल जरा जास्तच शंका निर्माण करणारी आहे असं तुम्हाला नाही वाटत ? " , वाघचौरे साहेब म्हणाले आणि दोघांनी होकारार्थी माना डोलावल्या.
" होय सर , सगळ्या गोष्टी तिच्याकडेच बोट दाखवत आहेत ", अमर म्हणाला.
“ आपल्याला मिसेस रागिणीची जरा कसूनच चौकशी करावी लागणार आहे. ” , वाघचौरे साहेब खिडकीपाशी जात म्हणाले. सिगारेटचा धूर हवेत वर वर जात राहिला.

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान वेगात सुरू आहे - कथा आणि भाग, दोन्ही...

माबोकर वाचकांना एक वाचक म्हणून विनंती - या आणि इतर अशाच अनेक लेखनाला एखादा तरी प्रतिसाद द्या.
हे लेखक स्वतःचा वेळ देऊन लिहीतात. त्यांना प्रोत्साहन देऊन आपण त्यांचा हुरूप वाढवला पाहिजे.

इतर काही कल्पकताशून्य धाग्यांवर 200-300 प्रतिसाद येतात आणि या कथांवर तुरळक ... यामुळे अनेक लेखक माबो सोडून गेले आहेत.

त. टी. - मी कोणाचाही ड्यु आय डी नाही.

मस्त चाललीये कथा.
उत्तम!
फक्त वेग असाच ठेवा आणि नम्र विनंती, कृपया अर्धवट कधीच सोडू नका.
बर्‍याच लेखकांनी चांगल्या चांगल्या कथा अर्धवट ठेवल्यात म्हणून ही विनंती. गैरसमज नसावा. _/\_

छान वेगात सुरू आहे - कथा आणि भाग, दोन्ही...

माबोकर वाचकांना एक वाचक म्हणून विनंती - या आणि इतर अशाच अनेक लेखनाला एखादा तरी प्रतिसाद द्या.
हे लेखक स्वतःचा वेळ देऊन लिहीतात. त्यांना प्रोत्साहन देऊन आपण त्यांचा हुरूप वाढवला पाहिजे.

इतर काही कल्पकताशून्य धाग्यांवर 200-300 प्रतिसाद येतात आणि या कथांवर तुरळक ... यामुळे अनेक लेखक माबो सोडून गेले आहेत.

>>>>> अगदी सहमत.

छान वेगात सुरू आहे - कथा आणि भाग, दोन्ही...

माबोकर वाचकांना एक वाचक म्हणून विनंती - या आणि इतर अशाच अनेक लेखनाला एखादा तरी प्रतिसाद द्या.
हे लेखक स्वतःचा वेळ देऊन लिहीतात. त्यांना प्रोत्साहन देऊन आपण त्यांचा हुरूप वाढवला पाहिजे.

इतर काही कल्पकताशून्य धाग्यांवर 200-300 प्रतिसाद येतात आणि या कथांवर तुरळक ... यामुळे अनेक ले खक माबो सोडून गेले आहेत.

त. टी. - मी कोणाचाही ड्यु आय डी नाही. >>>>>> एखाद दुसर्‍या नवीन लेखकासाठी असे आवाहन केले तर समजू शकते. पण घाऊक करायचे असेल तर एक नवीन धागा उघडा. या कथा वाचल्यात का ? किंवा अशा प्रकारच्या नावाचा. तिथे तुम्हाला आवडलेल्या कथांच्या लिंक्स देत रहा जेणेकरून ज्यांच्या नजरेत आलेलं नाही त्यांना समजेल. बेफिकीर यांच्या कथेवर असा प्रतिसाद दिला तर तो अनाठायी होईल. त्यात त्या लेखकाचा कळत नकळत उपमर्द सुद्धा होईल. वाचकांना लेखकानेच ड्युआयडीने असा प्रतिसाद दिला आहे असे वाटू शकेल. मग काय, मत प्रतिकूल झाले कि मिळायचे ते सुद्धा प्रतिसाद मिळणार नाहीत.

<<<एखाद दुसर्‍या नवीन लेखकासाठी >>>
असेच केले आहे.
बेफिकीर यांच्या कथेवर याची गरज तरी आहे काय ?
बहुतांशी वेळेस वाचक कथा आवडली असे आवर्जून नमूद करत नाहीत म्हणून वरील पोस्ट टाकली होती.
या साठी नवीन धागा काढावा इतका उत्साह माझ्यात नाही.

खूप छान आणि वेगात चालली आहे कथा - दर दिवसा आड नवीन भाग येत आहे. त्यमुळे वाचताना लिन्क व्यवस्थित लागतेय.

इतर काही कल्पकताशून्य धाग्यांवर 200-300 प्रतिसाद येतात आणि या कथांवर तुरळक ... यामुळे अनेक लेखक माबो सोडून गेले आहेत.

>>>>> अगदी सहमत.

मिलिन्द खुप छान लिहिता तुम्ही.