क्रिप्टो ( Crypto ) भाग - ११

Submitted by मिलिंद महांगडे on 28 May, 2022 - 04:34

₿₿₿

पोलीस स्टेशनमध्ये आल्या आल्या वाघचौरे साहेबांनी कागदपत्रांचं ते फोल्डर जोरात टेबलावर आपटलं . वाघचौरे साहेब त्यांची टीम हात हलवत परत आली होती . ते चांगलेच वैतागले होते. कधी नव्हे ते ड्रॉवरमधून सिगारेटचं पाकीट काढून दोन - तीन सिगारेट्स एका मागोमाग एक शिलगावल्या . अमर आणि कवठेकर मॅडम हे सगळं पहात निमूटपणे समोरच्या खुर्चीत बसले होते . वाघचौरे साहेबांना एवढं चिडलेलं आजपर्यंत त्यांनी कधी पाहिलं नव्हतं . त्यांना बोलतं करणं भाग होतं . म्हणून अमरने थोडा घसा खाकरल्यासारखं केलं .
" सर … तुम्ही … " तो काही बोलणार इतक्यात तेच म्हणाले .
" जाम चालू बाई आहे ही … ”, सिगारेट चा धूर हवेत सोडत ते म्हणाले.
“ खरं तर ती बाई असल्याचा गैरफायदा घेतेय . " , सौदामिनी मॅडम म्हणाल्या.
“ एक्झॅक्ट्ली ! पण आता आपण तरी काय करणार ? ”
" सर, तिची एकदा पोलीस कस्टडी घ्याच मी म्हणते …, अशी कानफटवते ना , की पोपटासारखी बोलायला लागेल. सगळी नाटकं चालू आहेत हो तिची… " सौदामिनी मॅडम वैतागल्या होत्या.
" अतिशय हुशार आणि चाणाक्ष बाई आहे . आपण मागणार ती सगळी कागदपत्रे अगदी झेरॉक्ससकट तयार ठेवलीत तिने … " वाघचौरे साहेब म्हणाले.
" खरंच सर मलाही या गोष्टीचं फार आश्चर्य वाटलं. तिच्या वागण्यात एक प्रकारची सहजता होती. ती रडत होती पण त्यात काहीशी कृत्रिमता जाणवली मला. तिला दुःख झालं होतं पण त्यात खरेपणा किती होता हे सांगता येणं कठीण आहे. " अमर म्हणाला .
" वाटलं ना तुला तसं ? काहीतरी चुकतय… कुठेतरी नक्की पाणी मुरतंय. काय झालं असेल मी सांगतो तुम्हाला … आधी या बाईने ओमी मीरचंदानीशी लग्न केलं, त्यानंतर लगेचच गोड बोलून त्याची सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घेतली. हनिमूनला सुद्धा ती अशा ठिकाणी गेली की जिथे काहीही करणं तिला सहज शक्य होतं. आता ती सांगतेय की लडाखला जायची आयडिया ओमीची होती , पण हीच म्हणाली नसेल कशावरून ? तिथं गेल्यावर तिने ओमी मीरचंदानीचा काटा काढला आणि त्याचं प्रेतही आपल्या हाती लागू नये म्हणून त्याचं शेवटचं कार्यही तिथेच केलं ? सगळे पुरावे तिने मिटवून टाकले . आणि आता त्याच्या सगळ्या प्रॉपर्टीची ती एकमेव मालकीण झाली . "
" आणि साहेब , त्याचं कार्यही तिथेच उरकलं ह्या बयेने ? काय तर म्हणे सिंधू नदीत अस्थी अर्पण केल्या , त्याची शेवटची इच्छा ती होती … " सौदामिनी मॅडम चिडून म्हणाल्या .
" हे असं नुकतंच लग्न झाल्यावर मृत्युपत्र कोणी तरी करेल का ? तुला काय वाटतं अमर ? ", वाघचौरे साहेबांनी विचारलं .
" हो , मलाही हे थोडं विचित्र वाटतंय. " अमर विचारात असल्यासारखं म्हणाला .
" तिथल्या वातावरणानेही तिला साथ दिली … खूप मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली त्याच वेळी . पुन्हा एक महिन्याचा कडक लॉक डाऊन सुद्धा लागला , तिच्या ते पथ्यावरच पडलं . " सौदामिनी मॅडम म्हणाल्या .
" हम्मम …. त्याचा तर फायदा झालाच तिला. कदाचित त्या ओमीचा मर्डर करून तिने सगळे पुरावे नष्ट केले . खरं तर हा आपला अंदाजही असू शकतो . खरं काय ते शोधून काढणं गरजेचं आहे . ह्या रागिणीचा इतिहास जाणून घ्यायला हवा. म्हणजे ती कोण होती , लग्नाआधी ती कुठे काम करत होती वगैरे वगैरे … " वाघचौरे साहेब म्हणाले . " सौदामिनी मॅडम तुम्ही जरा ह्यात लक्ष घाला . त्या बाईची सगळी कुंडली मला हवी आहे … "
" हो सर … मी त्या कामाला लागते . " म्हणत सौदामिनी मॅडम तडक उठल्या , जणूकाही त्यांना त्यांच्या आवडीचं काम मिळालं होतं.
" आणि मॅडम, शक्यतो कुणाला कळणार नाही अशा रीतीने माहिती काढा . डोकं शांत ठेऊन काम करा ."
" येस सर … लवकरच मी तुम्हाला रिपोर्ट करते सर " म्हणत सौदामिनी मॅडम निघून गेल्या .
" अमर, लवकरात लवकर लेहला जावं लागणार आहे. तिथं नक्की काय घडलं हे आपल्याला जाणून घेणं खूप गरजेचं आहे. एक काम कर, तू तयारीला लाग . मी तुझी जायची व्यवस्था करतो. " वाघचौरे साहेब निर्धाराने म्हणाले . इतके दिवस ते ह्या प्रकरणाकडे तितक्या गंभीरतेने पहात नव्हते . पण आता मात्र त्यांनी ह्या प्रकरणाचा छडा लावायचा चंगच बांधला होता . त्यांच्यात आता खरा ऑफिसर शिरला होता. एखादा सेनापती जसा आपल्या सैन्याला संबोधित करतो तसं वाघचौरे साहेब बोलत होते. अमरलाही थोडं बळ मिळालं त्यांच्या ह्या वागण्याने .
" मी इथे माझ्या सगळ्या खबऱ्यांना कामाला लावतो , ह्या प्रकरणात लवकरात लवकर आपल्याला काहीतरी शोधून काढावं लागेल. इथे फक्त लोकांच्या बुडालेल्या बिटकॉईनस किंवा पैशांचा प्रश्न नाही तर एक कोल्ड ब्लडेड मर्डर सुद्धा झाला असण्याची दाट शक्यता आहे. " म्हणत वाघचौरे साहेब उठले . त्या बरोबर अमर देखील उठला . इतके दिवस एकत्र काम करणारी टीम आता एकाच वेळी तीन वेगवेगळ्या दिशांना काम करणार होती . पण हे प्रकरण जेवढं दिसत होतं तेवढं सोप्पं नव्हतं ह्याचा अंदाज तिघांनाही अद्याप यायचा होता .

₿₿₿

हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर एका आठवड्यातच जयसिंगने घराबाहेर पडायची तयारी सुरु केली. यमुना कटकट करत होती , पण आता रिसॉर्टचं खूप महत्वाचं काम असल्याने जावंच लागणार आहे असं त्याने तिला सांगून पटवलं आणि त्याने झिपऱ्याला फोन लावला. झिपऱ्या लगेच हजर झालाच ! जयसिंगचा ठरलेला बार होता - अप्सरा बार ! तिथं तो आणि झिपऱ्या नेहमी जायचे. तिथला मालक रघु शेट्टी चांगला ओळखीचा झाला होता . पहिल्यांदा जेव्हा जयसिंग त्या बार मध्ये गेला , तेव्हा त्याने आपल्या खासदार मेहुण्यांची ओळख सांगितली , आणि मग तेव्हापासून त्याला रॉयल ट्रीटमेंट मिळू लागली. तो आला कि बारचा मालक स्वतःहून त्याचे स्वागत करी , आणि त्याला काय हवं नको ते बघे . जयसिंगही मनातून सुखावून जात असे . सत्ता आणि पैशाचं महत्व किती आहे हे त्याला त्या बार मध्ये गेल्यावर समजत होतं. माणसाकडे ह्या दोन गोष्टींपैकी एक गोष्ट तरी असावीच ! असंच त्याचं मत बनलं होतं. सत्ता असली कि पैसा येतो , आणि पैसा असला कि सत्ता आपोआप मिळते. जयसिंग आणि झिपऱ्या दोघेही अप्सरा बार मध्ये गेले . बार मालक शेट्टीने त्या दोघांचे हसून स्वागत केलं .
" नमस्ते साब … कैसे है ? साब , बोत दिन हुआ, आपका दर्शन नय हुआ ..." काउंटरवरच्या मालकाने आस्थेने विचारपूस केली.
" जरा काम था … बार बंद है क्या ? " जयसिंगने आत डोकावत विचारलं .
" वो साब , कोरोना है ना , तो अभी सिर्फ पार्सल चालू है … अंदर बैठनेंके लिये अलाऊड नय है … थोडे दिन ऍडजस्ट करना पडेगा साब । " बारमालक शेट्टी कसनुसं तोंड करून म्हणाला .
" किती दिवस झाले बंद आहे बार ? " , जयसिंगने विचारणा केली.
" वो दुसरा लॉकडाऊन जबसे चालू हुआ ना , तबसे बंद था …. तीन हफ्ता हुआ रहेगा … अभी चार दिनसे पार्सल चालू किया है … थोडे दिन में बार भी चालू होयेगा …"
" अरे देवा ! झिपऱ्या , आता रे कसं व्हायचं ? त्यो टोन्या तर काय इथं यायचा नाय आता ! " , जयसिंग हळू आवाजात केवळ झिपऱ्याला ऐकू जाईल असं म्हणाला .
" व्हय की ओ मालक … त्याला भेटायचं तरी कसं आता ? आपण जरा बसून विचार करू … सुचल कायतरी " , झिपऱ्या म्हणाला.
" शेठ , थोडा देर इधर बैठते है … चलेगा ना ? " , जयसिंगने शेट्टीला विचारलं .
" बस क्या साब , आपकाच बार है … बैठो जितना चाहे … " , असं म्हणून तो त्याच्या पार्सल देण्याच्या कामाला लागला . जयसिंग आणि झिपऱ्या बाजूच्या टेबलावर बसले .
आज त्याला टोनीचा शोध घ्यायचा होता. जयसिंगच्या आयुष्यात आलेल्या वादळाला थोड्या फार प्रमाणात टोनी जबाबदार होता. तो टोनी नक्की कुठे राहतो हे त्याला माहीत नव्हतं, पण हा त्याचा नेहमीचा बार होता हे मात्र नक्की ! तो जवळपास रोजच संध्याकाळच्या वेळेत ह्या बार मध्ये पडलेला असायचा . बिटकॉईन मध्ये भरपूर पैसे कमावले होते , आता उर्वरित आयुष्यात पैसे मिळवण्यासाठी त्याला काहीही करायची गरज नव्हती . येणारा प्रत्येक दिवस त्याच्यासाठी एक हॉलिडेच होता . त्यात पिण्याचा नाद असल्याने तो ह्याच बार मध्ये यायचा . दररोज खूप पैसे खर्च करीत असल्याने बार मध्ये त्याला चांगली वागणूक मिळत होती . त्याची ऑर्डर घेण्यासाठी वेटर लोकांत चढाओढ लागत होती . तो टिपही भरपूर द्यायचा . दररोज नवनवीन आणि उंची दारू प्यायचा , आणि भरपूर खायचा , बिल भरपूर होत असे त्यामुळे मालकही खुश असायचा. त्याच्यासाठी एक टेबल रोज रिझर्व्ह असणारच ! त्याचा थाटच तसा होता . पण आता कोरोनामुळे बार बंद असल्याने तो काही येत नसावा …शहरातील सगळे हॉटेल्स आणि बार तर बंद होते , मग कुठे जात असेल तो ? घर सोडून तर तो ह्या कोरोनाच्या काळात कुठे बाहेर पडला नसेल . काहीही करून त्याच्या घरचा पत्ता कळायला हवा .
" झिपऱ्या , हिथं बसून कायबी फायदा व्हायचा नाय. तो काय हिथं येत नसनार … " , जयसिंग म्हणाला .
" व्हय , लॉकडाऊन पन व्हता महिनाभर . आपल्याला त्याचं घर शोधायला पायजेल "
" आत्ता कसं बोललास ! पण त्याचं घर कुणाला म्हैत असंल ? "
" मालकाला विचारायचं का ? "
" त्याला कसं माहीत असंल ? "
" विचारायला काय हरकत हाय मी म्हनतो !" ,
" डायरेक्ट शेट्टीला नको , एखाद्या वेटरला विचारू " , इतक्यात बाजूने जाणाऱ्या एक वेटरला जयसिंगने अडवलं .
" अरे , आपल्या बार मध्ये टोनी नावाचा माणूस यायचा बघ ! टक्कल होतं , काळासा होता , तो कुठे आहे ? " त्याने विचारलं .
" टोनी म्हणजे ते टकलू , बोकड दाढी ? " वेटरने विचारलं .
" हा , हा …. तोच ! "
" तीन चार आठवडे दिसला नाही तो . बार बंद होता ना कोरोनामुळे … " एवढं बोलून वेटर निघून गेला. जयसिंग आपल्या जागेवरून उठून थेट काऊंटरवरच्या मालकाकडे गेला . त्यालाही टोनीबद्दल काही माहीत नसल्याचे त्याने सांगितलं . आता मात्र जयसिंगला चांगलाच घाम फुटला. ज्याच्या भरवशावर त्याने रिसॉर्ट साठीची जवळपास सगळीच रक्कम बिटकॉईन मध्ये टाकली होती, तोच आता कुठेतरी गायब झाला होता. त्याने बार मालकाला त्याचा पत्ता विचारला . पण त्याला काही माहीत नव्हतं . त्याला तसं काही माहीत असण्याचं कारणही नव्हतं. तो फक्त त्याचा एक गिर्हाईक होता . त्याला त्याच्या धंद्यांशी मतलब . त्याने गोड बोलून माहीत नसल्याचं सांगितलं . हताश होऊन जयसिंग पुन्हा आपल्या टेबलपाशी येऊन बसला . झिपऱ्या त्याला विचारत होता काय झालं म्हणून , पण जयसिंगचं त्याच्याकडे लक्षच नव्हतं . त्याला आता खरोखर टेन्शन आलं होतं . झिपऱ्या त्याला तसाच सोडून कुठेतरी गेला , थोड्या वेळाने एका वेटरला घेऊन आला .
" मालक ह्या वेटरला माहीत हाय तो टोनी कुठं राहतो ते … " झिपऱ्या तसं म्हणाला आणि जयसिंगच्या चेहऱ्यावर चमक आली .
" कुठं राहतो त्यो टोनी ? आणि तुला कसा माहीत त्याचा पत्ता ? " जयसिंगने अधिरपणे त्याला विचारलं .
" मागे कधीतरी टोनी साहेबांना जरा जास्त झाली होती , उभं पण राहता येत नव्हतं , तेव्हा घरी पोचवायला गेलो होतो दोन तीन वेळा. त्यांनी पैसे पण दिले होते भरपूर मला , म्हणून लक्षात आहे . " तो वेटर म्हणाला.
" आम्हाला त्याचं घर दाखवशील का प्लिज … ? " , जयसिंगने काकुळतीने विचारलं.
" दाखवतो की , त्यात काय ! पण माझी ड्युटी…? मला पार्सल द्यायला जायचंय चार ठिकाणी. " , असं म्हणून तो जरा विचारात पडला .
" ड्युटीची काळजी करू नको , मी बोलतो तुझ्या मालकाशी . " असं म्हणून जयसिंग काऊंटर पाशी गेला . शेट्टीला त्याने समजावून सांगितलं . थोड्या वेळातच तो पुन्हा माघारी आला . अन म्हणाला , " तुझ्या शेठने परमिशन दिलीय , चल आता दाखव त्याचं घर … " तिघेही टोनीच्या शोधार्थ निघाले .

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users