मायबोलीकर मैत्रीणीशी भेट - (फोटोसह)

Submitted by ऋन्मेऽऽष on 2 May, 2022 - 10:30

अखेर, फायनली, आयुष्यात पहिल्यावहिल्यांदा ....
नुकतेच एका मायबोलीकर मैत्रीणीला भेटायचा योग आला Happy

तसे बघितले तर तुमचा अभिषेक आयडी कार्यरत असताना मायबोलीच्या वर्षाविहाराला एके वर्षी हजेरी लावली होती. आणि त्यानिमित्ताने काही सन्माननीय सभासदांशी भेटही झाली होती. पण तिथेही मी माझ्या माणूसघाण्या स्वभावाला अनुसरूनच वागलो होतो. वविला हजेरी लाऊनही तिथे मी जणू नव्हतोच. त्यामुळे टेक्निकली एखाद्या मायबोलीकराशी ठरवून भेट घ्यायची ही माझी पहिलीच वेळ. आणि आता भेट घेतलीय तर धागाही काढणारच ना. शेवटी धाग्यावेताळ आहे मी Happy

पण छे!.. असे डायरेक्ट कसे माबो मैत्रीणीचे नाव फोडणार.. त्या आधी पाल्हाळ लावणे गरजेचे. कारण हा (देखील) माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी बजावणारच Happy

तर, लहानपणापासून तसा मी मुलींशी बोलायला लाजणाराच. त्यात पुढे जाऊन या भित्यापाठी ईंग्लिश नावाचा ब्रह्मराक्षस आला. आणि जे मी मुलींपासून चार हात दूर राहायचो ते ईंग्लिश बोलणार्‍या मुलींपासून आठ हात दूर तोंड फिरवूनच राहू लागलो. अश्यातच माझे कॉलेजजीवन संपले.

जॉबला लागलो आणि ऑर्कुटला अकाऊंट उघडले. तो ऑर्कुटचा अखेरचा काळ होता. पण तिथे मला शोध लागला की मी मुलींशी प्रत्यक्ष बोलू शकलो नाही तरी चॅट नक्कीच करू शकतो. आणि ती फार सुंदर करू शकतो. थोडक्यात तिथे मुले मुली भेद मिटला. कालांतराने भिन्नलिंगी आकर्षणाचा फंडा काम करून गेला आणि मी मुलींशीच जास्त चॅट करू लागलो. पण तरीही प्रत्यक्ष आयुष्यात मुलींशी बोलायची बोंब कायम होतीच. अश्यात एका ऑर्कुट मैत्रीणीने समोरून पुढाकार घेतल्याने प्रत्यक्ष भेटायचा योग आला. मुळातच भाबडा बॅचलर असल्याने अगदी डेटला जातोय असे समजूनच गेलो. पण प्रत्यक्षात माझी तंतरलीच. यावरही विनोदी अंगाने ईथे लिहून झालेय.

माझी पहिली ऑर्कुट भेट.. नव्हे.. माय फर्स्ट ऑर्कुट डेट..!!
https://www.maayboli.com/node/40718

त्यानंतर असला आगाऊपणा कधीच करायचा नाही असे ठरवले. पण योग जुळून येतात तेव्हा भोग भोगावे लागतात.

वर्षभराने दुसर्‍या एका ऑर्कुट मैत्रीणीशी भेटायचा योग आला. त्या भेटीआधीच आमची घट्ट मैत्री जुळली होती. त्यामुळे ती भेट फर्स्टक्लास झाली. तीन प्रत्यक्ष भेटीनंतर तिने माझ्याशी लग्न करायची ईच्छा व्यक्त केली. त्यानंतर तीन महिने सतत भेट घेतल्यानंतर मी सुद्धा अखेरीस तिला होकार दिला. आज (तिच्या) दुर्दैवाने ती माझी बायको आहे.

पुढे आमच्या लग्नात बरेच ऑर्कुट मित्रमैत्रीण आले, काहींसोबत पिकनिकलाही जाणे झाले, त्यात मजाही आली. पण पुढे ऑर्कुटचा बाजार उठला आणि मी मायबोलीवर ऋन्मेष बनून अवतरलो.

तुमचा अभिषेकचे लग्न झाले असल्याने ऋन्मेष आयडीला मी गर्लफ्रेंड दिली. जेणेकरून तो कमिटेड आहे हे क्लीअर व्हावे. आयडीची गुप्तताही पाळायची होती. तसेच डुआयडी वापरून कोणाशी खोटे देखील बोलायचे नव्हते. त्यामुळे मायबोलीवर ईतकी सक्रियता दाखवूनही मी कधी ऋन्मेष आयडीतून कोणाशी वैयक्तिक संवाद साधायला गेलो नाही. कोणाशीही घनिष्ट वा कुठलेही वैयक्तिक संबंध बनवायला गेलो नाही. परीणामी ऋन्मेष म्हणून ईथे वावरताना कोणाशी प्रत्यक्ष भेट व्हायची शक्यता जवळपास शून्य होती.

मग हळूहळू ऋन्मेष हाच तुमचा अभिषेक हे लोकांना समजत गेले. काही मायबोलीकर माझे फेसबूकवर फ्रेंड झाले. तर काही व्हॉटसपवर आले. पण मुळातच माझा स्वभाव जसा आहे ते पाहता कोणाशी भेटीगाठीचा योग चटकन येत नव्हता. नाही म्हणायला फार वर्षांपूर्वी एकदा वर्षूदीला भेटायला जाणार होतो. तिनेच गेटटूगेदर ठेवले होते. पण ऐनवेळी अर्जंट काम निघाले. आणि तो योगही बारगळला. ऋन्मेषची एखाद्या मायबोलीकराला ठरवून भेटायची पाटी कोरीच राहिली.

त्यात मी मायबोलीवर ईतके किडे करत वावरणार की ईथे आपल्याबद्दलचे मत कधी कोणाचे काय असेल आणि ते कधी बदलेल हे सांगता येत नाही. त्यामुळे एखाद्या मायबोलीकराशी ठरवून भेट घ्यावी हे मी माझ्या बकेट लिस्ट मध्ये कधीच अ‍ॅड केले नाही.

आणि अश्यातच एके दिवशी फटा पोस्टर निकली हिरोईन स्टाईल तिने मायबोलीवर एंट्री मारली! Happy

मायबोलीवर कोणीही नवीन आयडी (अर्थातच जेन्युईन) आला तर मला आनंदच होतो. जसे ते घरातल्या अवलीगिरी करणार्‍या लहान मुलाला पाहुणे आलेले बघून आणखी चेव येतो अगदी तसे. नवीन वाचक, नवीन प्रतिसादक मायबोलीवर येतील तरच धागे काढण्याला अर्थ आहे असे मला वाटते. अश्यात नवीन सभासद देखील प्रतिसाद द्यायची आणि धागा काढायची आवड राखून असतील तर आणखी आनंद होतो. कारण लिहिणारे आहेत तोपर्यंत आपल्या आवडत्या मायबोलीचे चक्र चालू आहे. आयुष्यातला आनंद कायम आहे Happy

पण ती वेगळी होती. त्यामुळेच ती मला माझ्यासारखी वाटली. तिच्या एका धाग्यातील लिखाणाची शैली बघून तिला कोणीतरी चटकन `लेडी ऋन्मेष' म्हटले आणि आपल्यातील वेगळेपणातही काहीतरी साम्य आहे याची खात्री पटली. पुढे हळूहळू कासवाच्या गतीने बोलणे होऊ लागले, ओळख वाढू लागली, फेसबूक आणि व्हॉटसप चॅट / स्टेटस मधून तिच्याबद्दल आणखी समजू लागले तसे आणखी बरेच गोष्टीत साम्य आढळून आले. मैत्रीची केमिस्ट्री जुळू लागली.

मायबोली व्यतिरीक्त पर्सनल गप्पाही होऊ लागल्या. पण ठरवले असते तरी भेटणे शक्य नव्हते. कारण ती अमेरीकेत तर मी भारतात. आणि मुळात तसे ठरवून भेटायची गरज दोघांनाही भासत नव्हती. त्यामुळे मध्यंतरी जेव्हा ती भारतात आली, ते ही नवी मुंबईत, म्हणजे अगदी माझ्या बिल्डींगसमोरून, माझा घरासमोरून रिक्षाने पास झाली.. तेव्हाही फक्त "आपला ऋन्मेष ईथे राहतो बरं" अशी मनातल्या मनात म्हणत गेली... भेटावे असे दोघांनाही वाटले नाही.
चॅटवर औपचारीक बोलणे तेवढे झाले ..

अरे आज मी तुझ्या बिल्डींगसमोरून गेले..

अच्छा, मग कॉल करायचा ना, घरीच आली असतीस..

अरे, म्हणजे रिक्षात होते..

ओके पुढच्यावेळी नक्की येशील..

हो शुअर....
-------------

ईतके मिळमिळीत बोलणे झाले Happy

त्यानंतर काळ पुढे सरकला. मैत्रीतील घनिष्टता वाढली. तसे तिच्या यंदाच्या भारतभेटीत तिला हक्काने विचारले, यावेळी ईकडे येणे झाले तर नक्की भेटशील... आणि अपेक्षेप्रमाणे ती तयार झाली.

पण एक प्रॉब्लेम होता. गेले वर्षभरात आमच्या नवीन घरात कोणी पाहुणे आल्याचे आठवत नाही. पोरांनी घराची अशी हालत केलीय की आम्हीही कोणाला आवर्जून घरी बोलावत नाही. त्यात ही बाई, ऊप्स सॉरी, तिला आवडत नाही बाई म्हटलेले, तर ही मुलगी अमेरीकेहून येणार, तिला काय पोरांनी रंगवलेल्या सोफ्यावर बसवणार...

पण सुदैवाने तिने घरात भेटायला मला ऑकवर्ड वाटतेय म्हणत बाहेरच धावती भेट घेता येईल का म्हणून विचारले आणि मी उगाचच खट्टू झाल्याचे दाखवत आनंदानेच बाहेर भेटायला तयार झालो.

चॅटवरचे बोलणे वेगळे आणि प्रत्यक्षातले वेगळे हे मला अनुभवाने चांगले ठाऊक होते. प्रत्यक्षात माझ्या तोंडून शब्दही फुटणार नाही हे देखील माहीत होते. त्यामुळे विचार केला की सोबत लेकीला न्यावे. आपली जीभ थिजली तरी लेकीची टकळी चालू राहील आणि एकदाची भेट पार पडेल.

हो, एकदाची भेट पार पडेल ईतपतच उत्सुकता मनात होती. मला कुठल्याही सोमिमित्राशी भेटायला धाकधूकच वाटते. म्हणजे आपली सोशलसाईटवरच्या आभासी जगात झालेली एक ईमेज असते. त्यानुसार कोणी भेटायला आले आणि त्याला तसा मी आढळलो नाही तर त्याला पचका झाल्यासारखे नाही का वाटणार हा विचार मनात येतोच.

असो,

ऐनवेळी ठरलेल्या वेळेच्या तासभर आधी तिचा फोन आला. ती आमच्या ईथे नाक्यावर पाचच मिनिटात पोहोचत होती. तुला यायला जमेल का विचारत नव्हती, तर पाचच मिनिटात येच म्हणत होती. लेक कुठेतरी खेळायला गायब होती. माझे वर्क फ्रॉम होम नुकतेच आटोपले होते. आंघोळ करायची बाकी होती. पण आता तोंड धुवायलाही वेळ नव्हता. टीशर्ट अंगावर चढवतानाच चेहर्‍यावर पाण्याचे चार हबकारे मारले. त्यात केसही ओले झाले. ते तसेच बोटांच्या कंगव्याने विंचरले. घरी कोणाला काही सांगायचे टाळले. कारण पुन्हा तिचे नाव गाव फळ फूल सांगण्यात चार मिनिटे खर्च झाली असती. त्यामुळे थेट घड्याळ घातले, पाकिट घेतले, जे रिकामेच होते. त्यामुळे स्वतःवरच चरफडत शूज चढवले. त्याआधी सॉक्स स्वच्छच आहेत हे वास घेऊन चेक करायला विसरलो नाही. शू लेस बांधायचे काम लिफ्टमध्येच उरकले. लिफ्टमधून बाहेर पडल्यावर लॉबीमधील आरश्यासमोरून चालता चालताच पुन्हा एकदा बोटांनी केस सेट केले आणि एका मायबोलीकर मैत्रीणीच्या पहिल्या भेटीसाठी सज्ज झालो Happy

लांबूनच तिला पाहिले आणि छातीतील धडधडीवर नियंत्रण ठेवत तिला सामोरे गेलो, पण भेट झाल्यावर मात्र धडाधड सारे अंदाज चुकत गेले. सुरुवातीच्या दोनेक मिनिटात काय बोलावे आणि काय करावे, की नुसतेच हसावे हे न समजल्याने कुछ कुछ होता है मधील राहुल-अंजलीच्या समर कँप भेटीचा सीन कॉपी करून झाला. पण त्यानंतर मात्र कुठलीही बास्केटबॉल मॅच न खेळता तिसर्‍याच मिनिटापासून आम्ही व्यवस्थित न लाजता बोलू लागलो. दहा मिनिटांची धावती भेट घ्यायची असे ठरवले होते. पण गप्पांच्या विषयात शाहरूख, मायबोली, माझे वाढलेले केस, दाढी आणि डु आयडी असे सारेच विषय माझ्या आवडीचे आल्याने अर्धा तास उभेउभेच बोलण्यात गेला. पायाला तड लागली तसे कुठेतरी बसून गप्पा मारूया म्हणत मिनी सी शोअर गाठले.

उन्हाळ्यातल्या संध्याकाळी थंड वार्‍याची झुळूक, लोकांनी गजबजलेला तरीही शांत स्वच्छ परीसर, क्षितिजापर्यंत जाणारी नजर, हातात भेळ, समोर जलाशय आणि मित्रांसोबत कट्ट्यावर बसून मारलेल्या गप्पा. मला ही जागा नेहमी माझे दुसरे घरच वाटत आलेय. जसे मुंबईत आलेल्या माझ्या मित्रांना मी माझगावचा डोंगर फिरवून आणतो तसे ईथे मला भेटायला आलेल्या मित्रांना मी नेहमीच आमचे सी शोअर दाखवतो. छान सुर्य मावळेपर्यंत गप्पा मारू शकतो. त्यानंतर कंपलसरी कट्टा खाली करावा लागतो. नाहीतर मच्छर जमतात आणि गेटटूगेदर होते Happy

पण हो, तिथेही माझ्या अपेक्षांना तडा जात आमच्या छान गप्पा झाल्या. कारण विषय पुन्हा आपले तेच. या मायबोलीमुळे एक बरे होते, मुलगी अमेरीकेहून आली असली तरी मायबोलीचा धागा जुळल्याने शुद्ध मराठीतच बोललेले चालणार होते. त्यामुळे एकदा रंगात येताच मला शब्दांचा तुटवडा पडणार नव्हता. त्यातही ती जशी आजवरच्या ऑनलाईन भेटींत जाणवली, प्रत्यक्षातही तशीच निघाल्याने एखाद्या नवख्या मुलीशी पहिल्यांदाच भेटतोय असेही वाटले नाही. फक्त दिसायला तेवढी फोटोपेक्षा सुंदर होती. म्हणजे आतिशयोक्तीच करायची झाल्यास माधुरी दीक्षित लग्नानंतर अमेरीकेला गेल्याने भारतीयांचे जे मोठे नुकसान झाले त्यानंतर हेच Happy

अर्थात ईथे महाराष्ट्र सरकारचे आभार मानायला हवेत. कोरोनचे निर्बध शिथिल केल्याने आता मास्क घालायची गरज उरली नव्हती. अन्यथा सातासमुद्रापारची भेट होऊनही मास्कच्या आडूनच दर्शन घ्यावे लागले असते.

दहापंधरा मिनिटाच्या भेटीचे दिडदोन तास झाले पण गप्पांनी मन भरले नव्हते. आणि कुठलीही भेट जेव्हा अपुर्णच राहिली असे वाटते तेव्हा समजावे पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त... क्यों की हम एक बार जिते है, एक बार मरते है, प्यार भी एक ही बार करते है... पर दोस्त हजार करते है, और उनसे बार बार मिलते है Happy

थोडक्यात नशीबात अजून एका भेटीचा योग लिहिला होता...

पहिली भेट माझ्या ईलाक्यात झाली तर दुसरी तिच्या, म्हणजेच ठाण्याला ठरली.

या भेटीला खरे तर दोघांनी एकमेकांच्या मुलांना सोबत आणायचे ठरवले होते. कारण दोघेही आपापल्या मुलांसोबत रमणारे जीव. आणि दोघांनाही मुलांचे फोटो स्टेटसला टाकायची भारी आवड. हे वर उल्लेखलेले एक साम्य म्हणू शकता. पण त्यामुळे दोघे एकमेकांच्या मुलांना छान ओळखू लागलो होतो. त्यांना भेटायची उत्सुकता होती. पण नेमके त्याच विकेंडला माझी मुले महाबळेश्वरला गेली असल्याने ते राहिलेच. माझ्या मुलांसाठी तिने आणलेल्या गिफ्ट्स मग मीच स्विकारल्या. हो, तिने माझ्या मुलांसाठी चक्क भेटवस्तू आणल्या होत्या. हे माझ्यासाठी नक्कीच सरप्राईजिंग होते. असले काही मुलींनाच सुचू शकते. मी मात्र आपली भेट हीच भेटवस्तू म्हणत सोबत साधे चॉकलेटही नेले नव्हते..

दोघेही घरून भरपेट जेऊन आल्याने दोघांनाही भूक शून्य होती. पण तरीही आपल्याकडे भेटीगाठी गेटटूगेदर हॉटेलातच करायची पद्धत असल्याने तिनेच सुचवलेले एक हॉटेल गाठले. एक प्लेट कांदाभजी आणि मसाला ताक ऑर्डर केले.

यावेळी गप्पांचे विषय वाढले होते. समोरच्या टीव्हीवर सुरू असलेल्या आयपीएल मॅचपासून ते अमेरीकेतल्या आयुष्यावर बोलू काही म्हणून झाले. पोरांचे कौतुकच नाही तर ती छळतातही कशी याबाबतच्या सहवेदना वाटून घेतल्या. सासरच्या लोकांबद्दल केले जाते ते टिपिकल गॉसिप करून झाले. आपापल्या जॉबबाबत समोरच्याला टेक्निकली समजो न समजो चार गोष्टी सांगितल्या गेल्या. ठाणे आणि नवी मुंबई या शहरांबद्दलच्या चांगल्यावाईट मतांची देवाणघेवाण झाली. त्यात एकमताने नवी मुंबईला विजयी घोषित केले. थोड्याफार बालपणीच्या आठवणीही शेअर केल्या. आणि सरतेशेवटी आपली मैत्री मायबोलीमुळेच झाली म्हणून तिचेही आभार मानले गेले.

दुसरी भेट ही नेहमीच स्पेशल असते. पहिली भेट चला भेटूया म्हणून झाली असते. तिथे समोरच्याला केवळ चाचपले जाते. त्यात पुन्हा भेटावीशी व्यक्ती वाटली तरच ठरवून दुसरी भेट होते. जर ती झाली नाही तर हे मैत्रीचे नाते केवळ ऑनलाईनच होते असे समजण्यास वाव असतो.

मला पर्सनली ही भेट महत्वाची वाटली, कारण मी जरी कितीही म्हणत असलो की मायबोली हे मला माझे दुसरे घरच वाटते, तरी ऋन्मेष म्हणून ईथे वावरताना त्यामागच्या अभिषेक या व्यक्तीला कोणी कसलाही चांगला वाईट पूर्वग्रह न ठेवता एखाद्या मायबोलीकर मित्राला भेटावे तसे भेटू शकते का याबाबत मनात एक शंका होती. पण तसे होऊ शकते हा विश्वास या भेटीने दिला. कदाचित एक अढी समोरच्याच्या नाही तर माझ्याच मनात असावी ती निघाली. जे मी आता सहजपणे एखाद्या मायबोलीकराला भेटू शकतो. मला कल्पना आहे की असे म्हटल्याने लगेच काही मला भेटायला लाईन लागणार नाही Wink पण यापुढे मायबोलीवर वावरताना एक वेगळा आणि छानसा उत्साह नक्कीच माझ्यात असेल, आणि त्याबद्दल या मायबोलीकर मैत्रीणीचे आभार तर मानायलाच हवेत Happy

अरे हो, तिचे नाव घ्यायची तर गरज नाही. ते तुम्ही ओळखलेच असेल. पण आता ऋन्मेष जे लिहितो त्यावर शंका घ्यायची आपल्याकडे एक पद्धत आहे. त्यामुळे तिच्यासोबत एक सेल्फीही काढला. पण परवानगीशिवाय तो ईथे टाकू शकत नाही. त्यामुळे तुर्तास या कांदाभज्यांवरच समाधान मानूया. चला या, उचला एकेक Happy

IMG_20220502_053957.jpg

परवानगी मिळाल्याने फोटो धाग्यात अपडेटतो Happy

IMG_20220531_014001.jpg

धन्यवाद,
ऋन्मेष Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपलं काय ठरलं होय्त. जो पर्यंत खरे खुरे १०० प्रतिसाद होत नाहीत तोपर्यंत तु वृत्तांत लिहायचा नाही किंवा मी बॅगेचा फोटो टाकायचा नाही.
वर ते मागच्या वर्षीचा कुठेसा काढलेला भज्यांचा फोटो ही आपण(न) खाल्लेल्या भज्या म्हणुन खपवायचा नाही.
लोकं उचकवण्याचा प्रयत्न करतील आपण संयम बाळगायचा (हे मां मातारानी.....संयम).
कंट्रोल उदय कंट्रोल हे झालेले खरे खुरे १०० प्रतिसाद नाहीत.......

जंटलमॅन रिमाईंडर !

भारतात विकेंड सुरू झाला आहे. अमेरीकेचाही दूर नसेल.

- एक वृत्तांत चातक

बरं झाले तुम्हीच म्हटले.. किल्लीची गरज होतीच Happy

जंटलमॅन रिमाईंडर २
विकेंड सुरू झालाय अमेरीकेत..

आणि हो, मुलाचे गिफ्ट कारचेही उद्घाटन आज फायनली केले. त्याचा लॉक स्क्रू ड्राईव्हरने उघडायची गरज होती. घरात एक मरतुकडा स्क्रूड्राईव्हर होता. जो कामाचा नव्हता. अखेर आज सासुरवाडीला जाऊन लॉक ऊघडून आणला. छान आहे गाडी. धन्यवाद Happy

माझ्या साध्सासुध्या वृत्तांताची सुरूवात नक्की कुठून करावी कळत नाहीए पण चला, त्या दिवसाच्या सकाळपासून श्रीगणेशा करूयात ..
वार सोमवार
सकाळी उठून आधी मायबोली चेक केलं.. कारण भेटायचा दिवस, वेळ, जागा अगदी सगळंच फिक्स झालेलं असलं तरी हा कल्टी मास्टर आपल्याला कोणत्याही क्षणी टांग देऊ शकतो आणि ती ही जाहिररीत्या म्हणून आधी मायबोलीचे तीन्ही सेक्शन्स चेक केले.. तीथे “मैत्रिणीला भेटायला टांग कशी द्यावी?” या प्रकारात मोडणारा एकही धागा दिसला नाही तेव्हा वाटलं चला आजची भेट बहुतेक पक्की आहे ..
तसं भेटायला फार काही लांब प्रवास करून जायची गरज नव्हती कारण काही महिन्यांपूर्वीच आई डोंबिवलीहून कोपरखैराणेला रहायला गेली, जीथून त्याचं घर रिक्षाने म्हटलं तर पाच मिनीटांवर..

तर भेटायला , उन्हाळ्यातल्या संध्याकाळी थंड वार्‍याची झुळूक, लोकांनी गजबजलेला तरीही शांत स्वच्छ परीसर, क्षितिजापर्यंत जाणारी नजर, हातात भेळ, समोर जलाशय आणि मित्रांसोबत कट्ट्यावर बसून मारलेल्या गप्पा, अशी जागा माहित असतानाही, ती सोडून त्याने संध्याकाळच्या भर गर्दीत, अगदी चौकातल्या डिमार्टच्या प्रवेशद्वारावर भेटूयात म्हणून सांगितलं .. साहेबां पुढे मोठ्यामोठ्यांनी हात टेकले तीथे ह्या गरीबाचं काय चालणार होतं.. और उपरसे बोले तो इंडियाइच अपूनका कंट्री है, आपल्या कंट्रीतले सभीच लोग अपने दोस्त है..उनका पाईक होनेकी लेवल अपुनकी हेइच नय पण तरी अपून प्रयत्न करेगा म्हणून उकाड्यात आणि भर गर्दीत त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी वेळेच्या १० मि. आधी मरायला सॅारी भेटायला गेले..

तर आता पुढची काही मिनिटे डिमार्ट मधे आत बाहेर करणारे शंभरांच्या संख्येतले कष्टमर आणि त्या सर्वांना कष्टाने मरत बघणे माझ्या नशिबात होते .. बरं तितकंच नाही तर या सगळ्यातून एक दाढीवालाही हुडकायचा होता ..आता विचारा दाढीवालाच का ते? तर तो सध्या शाहरूखच्या चकदेवाल्या लूकच्या प्रेमात त्यामुळे त्याचे अलिकडचे सगळेच फोटो त्याच लूकमधले .. मक्काय, दाढीवाला दिसला रे दिसला की माझं बारीक निरीक्षण सुरू होत होतं.. आता तो नक्की कुठल्या दिशेने टपकतोय हे बघावं तर पुढे-मागे,आजू-बाजूला असे एकूण चार रस्ते दिसत होते ..
मग ये लेफ्ट से आएगा, या राईट से.. लेफ्ट राईट लेफ्ट राईट असं करता करता हाय अल्ला ये तो सीधा आते हुए दिखा.. आता डोक्यातल्या विचारांची जागा छातीतल्या धडधडीने घेतली होती आणि पाय आपसूकच डिमार्ट समोर असलेल्या पोलिस आयुक्तांच्या ॲाफिस जवळ वळले होते.. कारण तेच ओ.. ते म्हणतात ना, फोटोतले चेहरे फसवे असतात.. जो चेहरा फोटोत चकदे चा शाहरूख वाटला होता तो चेहरा दूरून खरा तर बेनाम बादशाहतल्या अनिल कपूर सारखा भासत होता .. बास, आता इथल्या पोलिसांनी ह्याला ओळख दाखवली नाही तरच आपण पुढे बोलायला सुरूवात करायची इतकं मनाशी ठरवलं..

(इथून पुढचं मीच लिहू का वर ठरल्या प्रमाणे कोणी वृत्तांत लिहायला मदत करणार आहे?)

अरे काय आने दो... एकदम काय ते लिही.. ईन्स्टॉलमेंटमध्ये ईज्जत काढू नकोस Lol मी विनोदानेच का होईना माधुरी वगैरे उल्लेख करून तुला रूप की रानी बनवलेले, आणि तू पोलिसांचा उल्लेख करून मला चोरोंका राजा Proud

येनीवेज, ईथपर्यंतचे डिटेल्स खरे. पण भेटायला कितीही गजबजलेल्या आणि गर्मीच्या प्रदेशात बोलावले असले तरी त्यानंतर तिथून थंड झुळूक, शांत, स्वच्छ जलाशयवाला सी शोअरही दाखवला होता हे कबूल करशील.... तेवढ्यासाठीच, पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत Happy

माबोकर एमी, सायो, वर्षा, स्वाती आंबोळे व मामी यांना मी भेटलेले आहे.

एमीला मला वाटतं २०१४ मध्ये भेटले. पुण्यात आम्ही भेटलो होतो. खरं तर धावती व चुटपुटती भेट झालेली. पुन्हा जर पुण्याला गेले तर खूप वेळ काढून तिला भेटायचे आहे. नंतर व्हॉटसअ‍ॅपवर गप्पा होतात. खूप मस्त आहे आमची मैत्री.

पुढे माबोवरती एका प्रसंगात मी 'ग्रोव्ह पाथ स्टेशनचा' उल्लेख केला होता तो धागा पकडुन मला वर्षाने कॉन्टॅक्ट केला व मॉलमध्ये आम्ही भेटलो. आणि दर वीकेंडला भेटतच राहीलो मला वाटतं २ वर्षे तरी हा सिलसिला चालला , म्हणजे वर्षा दुसर्‍या राज्यात कडे जाईपर्यंत. इतके नियमित आम्ही भेटायचो की मला सवय होउन गेली होती. तिचे दुसरीकडे जाणे, मला जड गेले. बागेत फिरणे, नदी काठाकाठाने फिरणे, बाकावर बसून गप्पा, गुरुद्वाराला जाणे - सवय होउन गेली होती. आमची चांगली मैत्री आहे आणि मेनी मोअर ईयर्स टु गो.

नंतर एकदा वर्षाबरोबर मामीला भेटले. पुढे सायो, स्वाती आंबोळे यांनाही भेटण्याचा योग आला. मामी-सायो, मी व स्वाती - गटगमध्ये प्रचंड मजा आलेली स्मरते. आम्ही आधी सायोच्या घरी भेटलो व तदुपरान्त. एका रेस्टॉरंटमध्ये गेलेलो. सर्वांचे पदार्थ मस्त मस्त होते. माझा भयंकर बेचव निघाला. सायोचा रेको न ऐकण्याचा परिणाम. सायो सेमायप्रेशिअस खड्यांची इतकी सुंदर खड्यांची ओवलेली बनवते. डोळ्यांचे पारणे फिटते. अक्षरक्षः आमची टॅक्सी आली व मामीला व मला निघावे लागले पण ज्वेलरी सोडून पायच निघेना. सगळ्यांमध्ये सर्वात कमी बोलणारी मी होते मग सायो. बाकी मामी व स्वाती - गप्पिष्ट आहेत.
मामी एकदम चिल आहे!!! एच आर मध्ये जायला हवी. म्हणजे सोशल अँग्झायटी असणार्‍या मला कंफर्टेबल करुन टाकलेलं. स्वाती आणि सायो - खूप आवडल्या. परत परत भेटायला प्रचंड आवडेल.

अरे फोटो टाका ना!!! काय नुसती थिअरी लावलीये? Wink
काय ओ सामो तुम्हीपण.
त्यांना माबोवर अजुन कोणी पाहिलेलं नाही. म्हणुन ते त्यांची आभासी जगतातील भासमान ओळख पडद्याआड ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसताय.

सामो अरे वाह छान अनुभव आहेत. मायबोलीकर ईथे कसे आणि प्रत्यक्षात तसेच की आणखी कसे हा छान विषय आहे. धागा काढा रे कुणीतरी Wink
तुम्ही लिहीलेले शांत कोण आणि गप्पिष्ट कोण यावरून आठवले, मी सुद्धा आपल्यासारखा शांतच असतो, आपण भेटलो तर दोघांची गोची होईल. हाय हेल्लो टाटा बायबाय. नाव गाव जे एकमेकांना माहीत आहे तेच पुन्हा विचारून भेट संपेल Happy

आणि आमच्या भेटीचा फोटो मी मध्यंतरी आठ दहा दिवसांसाठी लावलेला ईथे प्रोफाईल पिक म्हणून. बहुधा आपण पाहिला नसावा. तसेही मी कश्याला लाजतोय फोटो टाकायला. बरेच धाग्यांवर बरेच फोटो विडिओ टाकले आहेत माबोवर. ते तर फोटोत सोबत म्हाळसा होती म्हणून मोह आवरला Happy

पुढे माबोवरती एका प्रसंगात मी 'ग्रोव्ह पाथ स्टेशनचा' उल्लेख केला होता तो धागा पकडुन मला वर्षाने कॉन्टॅक्ट केला व मॉलमध्ये आम्ही भेटलो.>> सामो, २०१३ ला मी पण ग्रोव्ह स्ट्रीट स्टेशन समोरच्या २८० marin boulevard रहायचे.. पण तेव्हा मी मायबोलीवर नव्हते.. तू पण जर तेव्हा तीथेच रहात असशील तर आपण शेजारीच होतो Happy

अरे फोटो टाका ना!!! काय नुसती थिअरी लावलीये? >> पहिल्या भेटीच्या वेळेस फोटो काढायला विसरलेलो .. हा दुसऱयांदा भेटलो तेव्हाचा
49F95468-4177-497D-AF4D-74FA421AF07A.jpeg

हॉटेल ठाण्याचे आहे, गिटारवालाही तिथलाच असेल, नाव म्हाळसाच सांगू शकेल, माझा पास Happy

फोटो बाकी छान आलाय म्हाळसा तुझा.

एक सेल्फी उजवीकडून काढलेला, एक डावीकडून काढलेला.
एक चष्मा घालून काढलेला, एक चष्मा काढून काढलेला.
मग एक सोलो फोटो मी समोरून हिचा काढलेला, जो याहून छान आलेला.
पण ज्या अपेक्षेने काढलेला ती पुर्ण झालीच नाही. माझाही एक सोलो फोटो काढायचा सोडून हि बया तुटून पडली भज्यांवर Sad

म्हाळसा फार गोड दिसतेयस.

आता डोंबिवलीहून कोपरखैरणेला माहेर शिफ्ट झालं का तुझं.

बाकी ग्रेट भेट, ऋन्मेष तुझे डोळे छान आहेत. वाचलं नाही फार काही, फोटो बघायला आले.

म्हाळसा काय हे!!! अगं मी ही २८० च >>> सहीए .. म्हणजे आपण एकाच बिल्डींगमधे होतो तर.. आताही तीथे असते तर नक्कीच भेटलो असतो

धन्यवाद सुनिधी आणि अन्जू Happy

आता डोंबिवलीहून कोपरखैरणेला माहेर शिफ्ट झालं का तुझं>> डोंबिवलीचंही घर आहे अजून..अधूनमधून तीथेही आई असते.. मी पण भारतात आले तेव्हा दोन्ही घरी राहून आले

धन्यवाद, ज्यांना फोटोत मी सुद्धा आहे हे लक्षात आले त्यांचे Proud

हे हॉटेल ठाणे खादाडीत अपडेट करा >> हो चांगले होते, पण गधडे कॉफीच देत नव्हते. गयावया केले तरी दिली नाही. बाकी म्हाळसाने तिथे जास्त खादाडी केलीय. ती करेल ठाणे खादाडीत अपडेट, काय चांगले काय वाईट या सह ..

सामो आणि म्हाळसा, किती छोटी आहे दुनिया. तुम्ही एकाच बिल्डींगमध्ये / अपार्टमेंटमध्ये राहत होता म्हणजे. आणि ते आता कळतेय Happy

बास का ! मला तर गिटारवाला सुद्धा लक्षात आला कि. प्लेट्स रिकाम्या आहेत, टेबल रिकामे आहे, टेबल कोपर्‍यात आहे, बाजूला बाहेर पडायचा किंवा वॉश रूम कडे जायला रस्ता आहे हे सगळं नोट केलं राव. आमचे आभार मानायची पद्धत नाही. एक तर धागा पळवायला मदत करा ....
नेकी कर दर्यामे डाल हा बाणा स्विकारला आहे म्हणून निभावले.

सही, सॉलिड हॅपनिंग झाला हा धागा. म्हाळसे तू नावाला आणि तुझ्या कीर्तीला जागलीस, मस्त दिसतेयस. ऋन्म्या तुझाही फोटो आवडला बरं.
सामो किती मस्त तुझा सुध्दा वृतांत. माबोकरांशी भेट हेच खुप हॅपनिंग आहे. आणि तू म्हाळसा जवळच राहायचात हे सुद्धा किती छान.

Pages