अबोली ..!! ( भाग ३)

Submitted by रूपाली विशे - पाटील on 5 May, 2022 - 08:13

अबोली...!! ( भाग ३ )
_________________________________________

बधीर झालेल्या डोक्याने झोपडीबाहेर येऊन पुन्हा एकदा मी आवाजाचा कानोसा घेऊ लागलो. मी झोपडीबाहेर येताक्षणीच स्वर पहिल्यासारखेच् अचानक थांबले होते.

मला काही सुचेना. भानावर नसल्यागत मी सुन्नपणे झोपडीत बसून राहिलो.

दुपार उलटून गेली होती व दिवस बुडायच्या बेताला आला होता. घडणाऱ्या अकल्पित प्रकाराने माझ्या तहान- भुकेच्या जाणीवेला खीळ बसली होती.

त्यारात्री मला झोप लवकर येईना. शेवटी कसंबसं निद्रादेवीची आराधना करता - करता बऱ्याच उशिराने मला झोप लागली.

आकाशात अचानक ढगांचा गडगडाट आणि विजांचा लपंडाव सुरू झाला. बाहेर जोरदार पाऊस कोसळू लागला.

तेवढ्यात कुणीतरी झोपडीच्या दारावर हाताने थापा मारत असल्याचं मला जाणवलं.

ढगांचा गडगडाट आणि कोसळणार्‍या पावसाने माझी झोप उडाली होतीच, त्यात दारावर थापा मारत असल्याच्या आवाजाने मनातून मी थोडासा बिचकलो.

रात्रीच्या अवेळी, घनदाट जंगलात तेही एवढ्या भरपावसात इथे कोण आलं असेल बरं..??

स्वःरक्षणासाठी मी कोपर्‍यातली काठी उचलली.

झोपडीचं दार उघडलं , पाहिलं तर बाहेर कुणीही नव्हते. कदाचित मला भास झाला असावा , असा स्वतःशीच विचार करत मी मागे फिरलो,

__तेवढ्यात अचानक अंधारात दोन डोळ्यांसारखे काहीतरी चमकले. चमकणारं काय आहे हे पाहण्यासाठी मी पुढे सरसावलो. मात्र ते पाहण्याआधीच, दबा धरून बसलेले ते दोन डोळे अचानक माझ्यावर झेपावले.

__आणि डोळे गच्च मिटून घेत, किंकाळी फोडत मी खाली जमिनीवर कोसळलो.

__ आणि मग खाडकन् डोळे उघडत मी झोपेतून जागा झालो. पाहिलं, तर अंथरुण - पांघरुणासकट मी खाटेवरून खाली कोसळलो होतो. झोपडीचे दार आतून व्यवस्थित बंद होते. कंदिलाची वात मंद जळत होती. मी खिडकीतून पाहिलं, तर आकाशात टिपूर चांदणं पसरलं होतं.

अरेच्चा..!!

म्हणजे मी भयंकर स्वप्न पाहिलं होतं तर ..!

__आणि मग स्वप्नं पाहता - पाहता मी खाटेवरून खाली जमिनीवर कोसळलो होतो..

आता मात्र मला आपल्या झालेल्या अवस्थेवर हसू येऊ लागलं.

त्यानंतर स्वतःशीच हसत - हसत मी कधी झोपी गेलो, ते मला कळलंच नाही.

दुसऱ्या दिवशी सकाळी थोड्या उशिराने मला जाग आली.

आजची सकाळसुद्धा कालच्यासारखीचं प्रसन्न होती.

थोड्याशा आळसावलेल्या शरीराने मी झोपडीबाहेर आलो. सभोवताली पसरलेली धुक्याची चादर हळू-हळू विरू लागली होती.

चौफेर नजर फिरवित असतानाच माझी नजर अबोलीच्या ताटव्यावर पडली. तिथे नजर पडताक्षणीच मात्र मी डोळे फाड- फाडून समोर पाहू लागलो.

एकदा तर स्वतःला चिमटासुद्धा काढून पाहिला मी ..!!

समोर जे पाहतोय् ते सत्य आहे की स्वप्नं , की मला भास होतोय्..??

मी झोपडीच्या मातीच्या पायऱ्या उतरू लागलो.

विरळ होत जाणाऱ्या धुक्यात अबोलीच्या ताटव्याजवळ एक तरुणी उभी होती. आपल्या नाजूक, लांबसडक बोटांनी अबोलीची फुले ती खुडत होती. सावळ्या तुकतुकीत कांतीची ती तरुणी , स्वतःशीच गुणगुणत आपल्या कामात रमली होती. तिचे आजूबाजूला अजिबात लक्ष नव्हते. तिच्या तोंडून निघणारे गाण्याचे स्वर मला ओळखीचे जाणवले.

कुठे ऐकले होते हे स्वर आपण....??

हो... आठवलं, काल कानांवर पडणारे ते हेच स्वर होते...!!

टपोरे पण लक्षात ठेवण्याजोगे असलेले डोळे , नाजूक जिवणी असलेल्या त्या तरुणीने अंगात फक्त काचोळी आणि कमरेला लुगडं नेसलं होतं. तिच्या पेहरावावरून ती एखादी वनवासी स्त्री वाटत होती. आपल्या काळ्याभोर केसांच्या अंबाड्यावर तिने अबोलीचे गजरे माळले होते.

बघणाऱ्याची दृष्ट लागेल अशी ही लावण्यवती ह्या घनदाट जंगलात आकाशातून धुक्यात अवतरली की काय..??

नंदू सांगतोय् तसं मायावी रूप घेणारी हडळ तर नसेल..??

मला माझ्याच विचारांचे हसू येऊ लागले.

एखाद्या संगमरवरी शिल्पासारखी भासणारी ती तरुणी कोण बरं असावी..??

ह्या वनातली वनदेवता तर नसेल..??

मी विचारात गुंग झालो.

चित्रपटसृष्टीसारख्या वलयांकित चंदेरी दुनियेतल्या असंख्य सुंदर स्त्रिया मी पाहिल्या होत्या. स्त्री सौंदर्य दृष्टीस पडणे ही काही माझ्यासाठी नवीन गोष्ट नव्हती. मात्र हे दुर्मिळ देखणेपण, नजरेसमोर उभं असणारं अस्सल स्त्री सौंदर्य मी प्रथमच पाहत होतो. ती तरुणी निश्चितच वेगळी भासत होती.

पायऱ्या उतरताना होणाऱ्या आवाजाने, माझ्या लागणाऱ्या चाहुलीने त्या तरुणीची तंद्री भंग पावली.

तिचे लक्ष माझ्याकडे जाताच मला पाहून तिने स्मितहास्य केले.

तिचं हसणं विलक्षण आकर्षक होतं, बघणाऱ्याचं मन प्रफुल्लित करणारं...!!

चुंबकाने लोखंडाला आकर्षुन घ्यावं, अगदी तस्साच मी त्या तरुणीकडे आकर्षित झालो.

अरेच्च्या ..!! पण हे काय घडतंय्..??

मी तिच्या दिशेने जाऊ लागताच, ती तरुणी विरघळणाऱ्या धुक्यात अचानक दिसेनाशी होऊ लागली.

मला भास होतोय् का..??

ती आकर्षक तरुणी माझ्या डोळ्यांदेखत धुक्यात अदृश्य होऊ लागली.

कसं शक्य आहे हे....??

विरणाऱ्या धुक्यात मी वेड्यासारखा त्या तरुणीला शोधू लागलो. तिचा पाठलाग करू लागलो.

पण छे, तिचा जराही कुठे मागमूस नव्हता.

काय घडतंय् हे असं अकल्पित ..??

हे स्वप्नं आहे की... भास ..??

माझं मन कुठे भरकटत चाललंय्....??

गहिरी शांतता असलेल्या ह्या गुढ जागी येऊन आपल्या मनी साठलेले नैराश्य दूर व्हावे, अंगी उत्साह सळसळावा म्हणून लोकांनी वाळीत टाकलेल्या ह्या अनोळखी जागी येण्याची जोखीम आपण उचलली आणि प्रत्यक्षात इथे येऊन आपली उरली - सुरली मनःशांती ढळू लागलीय्..??..??..??.

हे कसलं लक्षण असावं ..??

__ कदाचित आपल्याला एखादा मानसिक आजार तर जडू लागलेला नाही ना ..??

__की कुणी खेळ खेळतंय् आपल्याशी..??

का होताहेत मला असे वेडेवाकडे भास..??

मधाच्या पोळ्यावर दगड बसताच मधमाश्यांचे मोहोळ उठावे, तसे विचारांचे मोहोळ माझ्या डोक्यात उठू लागले.

प्रश्नांचा भुंगा माझा मेंदू कुरतडवू लागला.

मी मटकन् खाली बसलो.

क्षणभर कळतच नव्हतं की , आपण नक्की कुठे आहोत. उन्हाचे चटके बसू लागताच मी भानावर आलो.

बाजूच्या ओढ्यावर गार पाण्याने स्नान केल्यावर अंगात थोडीशी तरतरी आली.

शेजारच्या कडुनिंबाच्या झाडाखाली बसून मी ध्यान करू लागलो. मला तंद्री लागली.

मनाशी चिंतन करता - करता मी स्वतःशीच संवाद साधू लागलो.

'मी स्वतःला असं घाबरवून घ्यायला नकोय्. भुता-खेतांवर माझा बिल्कुल विश्वास नाहीये. जे काही घडतंय् ते सारे माझ्या मनाचे खेळ आहेत. .!!'

मन स्वतःलाच समजावू लागले.

मात्र मला भीती वाटू लागली होती , मनाच्या ह्या वेडगळ चाळ्यांची...!

हे असले मनाचे वेडगळ चाळे आपल्याला परवडणारे नाहीयेत. आपल्या मनाला ताब्यात ठेवायला हवं. .. जर ते असंच भरकटत राहिलं तर आपल्या हातून उत्तम कलाकृती कशी घडणार ..??

आपल्याला प्रसिद्धी, यश, पैसा सारं काही हवं आहे तेही वैदेहीच्या प्रेमासकट..!!

पण मग आपल्या मनाची तयारी नाहीये का हे सारं मिळवण्याची..?? म्हणूनच हे असं अतार्किक , अकल्पित, आणि चमत्कारिक घडू लागलं आहे का आपल्यासोबत..??

__ की मग नैराश्याने दुबळेपणा आलायं आपल्या मनाला..??

एखाद्या स्त्रीच्या आवाजाचे, तिच्या अस्तित्वाचे भास का व्हावेत आपल्याला..?? काय अर्थ लावावा घडणाऱ्या ह्या गोष्टींचा..??

आपल्या मनाच्या तळकप्प्यात लपून बसलेलं कुठलं तरी एखादं सुप्त आकर्षण ह्या एकाकीपणात, घनदाट जंगलातल्या फक्त मला एकट्यालाच जाणवणाऱ्या ह्या विलक्षण स्तब्धतेत आता जोमाने उफाळून बाहेर येऊ पाहतेय् की काय..??

__ की मग आपलं मन एखाद्या स्त्रीला शोधू पाहतेय् म्हणून तिच्या अस्तित्वाचे हे सगळे वेडेवाकडे भास होताहेत आपल्याला..??

ह्या प्रश्नावर मात्र मनात द्वंद्व उभे राहिले.

वैदेही , तिचं प्रेमं आपल्या आयुष्यात असताना असं कसं आपलं मन भरकटू पाहतेय् ..?? दुसऱ्या एखाद्या स्त्रीचा शोध मन कसं घेऊ पाहतेय्..??..??

नाही.. नाही ... मन वेड्यावाकड्या दिशेने भरकटायच्या आता त्याला ताब्यात ठेवायला हवं .. हाती घेतलेली कथा आपल्याला पूर्ण करायला हवी.. डोक्यातला गोंधळ कमी करायला हवा ..!'

मी डोळे उघडले. मन चिंतनमुक्त झाले.

आत्तापर्यंत कथा निम्मी - अधिक लिहून झाली होती, ती पूर्ण करायला हवी ... !!

देवराजनने आपल्यावर टाकलेला विश्वास आपण सार्थ करायला हवा..!

मी दीर्घ श्वास घेतला.

मी झोपडीच्या आत आलो. डोक्यातला कोलाहल निदान व्हिस्कीमुळे तरी थंडावेल, ह्या आशेने मी व्हिस्की प्यायला सुरुवात केली. त्या पूर्ण दिवसात कागदावर साधी एक ओळही मी लिहू शकलो नाही.

त्या रात्री पुन्हा झोप लागेना. डोळे मिटू लागताच पुन्हा विचित्र स्वप्नं पडू लागलं.

बाहेर विजा आणि ढगांच्या गडगडाटासह कोसळणारा धुवांधार पाऊस.. झोपडीच्या दारावर हलकेच थापा मारल्याचा येणारा आवाज ..मग कुणीतरी येऊन दार उघडू पाहतेय्.. दार उघडणाऱ्या व्यक्तीचा चेहरा तर आपल्या ओळखीचा दिसत नाहीये. कोण असावी ती व्यक्ती..?? मी डोळे फाडून त्या व्यक्तीकडे पाहतोय्. पण तिची ओळख काही केल्या मला पटत नाहीये..

मी झोपडीचे दार उघडत नव्हतो.. तर मग ती दार उघडू पाहणारी व्यक्ती होती तरी कोण..??

त्या व्यक्तीसोबत अजून एक व्यक्ती होती, ती व्यक्तीसुद्धा ओळखीची वाटत नव्हती. त्या दोघांनी झोपडीचे दार उघडले.

स्वःरक्षणासाठी त्यांनी जवळ पिस्तौल बाळगले होते. पिस्तौल घेऊनच ते दोघे बाहेर आले.

त्या गडगडाटी मुसळधार पावसात झोपडीच्या दारात कोणीतरी उभे होते.

ओल्या अंगाने, थंडीने कुडकुडणारी दारात उभी असलेली ती एक तरुणी होती.

त्या तरुणीच्या चेहर्‍याकडे नजर जाताच मी चमकलो. तो चेहरा माझ्या ओळखीचा होता.

माझ्या लक्षात आलं, काल धुक्यात दिसलेली तरुणी ती हिचं होती.

आता पुढे काय घडणार हे मी श्वास रोखून पाहतच् होतो, तेवढ्यात माझी झोप चाळवली आणि झोपेतून डोळे चोळत मी जागा झालो.

मी खिडकीतून पाहिलं, बाहेर चांदण्याची दुधाळ चादर पसरली होती.

पहाटे - पहाटे पडलेल्या अश्या विचित्र स्वप्नांमुळे मी थोडासा अस्वस्थ झालो.

आपल्याला होणारे भास, पडणारी वेडी-वाकडी स्वप्नं म्हणजे आपल्या बाबतीत काहीतरी विलक्षण चमत्कारिक घडतं असावं की, मग आपल्यातल्या लेखकाच्या डोक्यात एखादी गूढकथा आकार घेऊ पाहतेय्..??

नंदूने आपल्याला ह्या घराविषयी, जंगलाविषयी जे काही सांगितलंय् ते आपण मनावर न घेता थट्टेने उडवून जरी लावले असले तरी, आपल्या सुप्त मनात ती कहाणी अगदी घट्ट रुतून बसली असावी आणि आता त्या कहाणीने आपल्या मेंदूचा , मनाचा पूर्ण ताबा घेतला असावा म्हणूनच ही अशी वेडी-वाकडी स्वप्ने आपल्याला पडताहेत आणि निरनिराळे भास आपल्याला होताहेत...!

रात्री झोपेत पडणार्‍या स्वप्नांचा तसेच धुक्यात आपल्याला त्या रहस्यमय तरुणीचं दिसणं, गाण्यांचे आवाज कानावर येणे, हे सारे भास असून , घडणारे सगळे प्रकार म्हणजे आपल्या सुप्त मनाचे खेळ आहेत असा निष्कर्ष काढून मी मोकळा होऊ पाहत होतो,

__तेवढ्यात अचानक तेच् मंजुळ स्वर माझ्या कानी पडू लागले. गाण्याचे बोल एखाद्या आदिवासी भाषेतले असावेत. सुरुवातीला उत्साहाने भरलेले आणि शेवटाला व्याकुळतेकडे झुकू पाहत जाणाऱ्या त्या स्वरांनी माझ्या मेंदूचा पूर्णपणे ताबा घ्यायला सुरुवात केली.

बधीर झालेलं माझं डोकं गच्च धरत मी झोपडीबाहेर आलो.

भवताली नेहमीसारखंच् धुकं पसरलेलं होतं.

जे घडतंय् ते स्वप्नं... भास... की वास्तव...??

माझं मन आणि मेंदू पूर्णपणे ताब्यात घेणाऱ्या ह्या सगळ्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष आज मला लावायचाच् होता...!

आवाजाचा कानोसा घेत मी पुढे निघालो.

क्रमश:

रूपाली विशे - पाटील
rupalivishepatil@gmail.com

_________________ XXX_________________

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

जबरदस्त.
पट्टकन रहस्यभेद केलेला नाही ते छान केले.

किशोरजी, च्रप्स, मामी, शर्मिलाजी धन्यवाद..!!
आज कथेचा अंतिम भाग टाकते...