दोन्ही पाटील आणि डीव्ह्याचा बाप हे ऐकून सुन्न झाले. डोळ्यात पाणी भरलं, तोंडातून शब्द निघेना. दोन मिनिटं कुणी कोणाशी बोललं नाही; बोलू शकलं नाही. त्याच्या बापाच्या अनावर हुंदक्यांनी शांतता भंग झाली. पाटील सरांच्या गळ्यात पडून बाप हमसाहमशी रडू लागला. पण आता ही वेळ निर्णय घेण्याची होती. विचार करायला वेळ होताच कुठं?
पाटील सरांनी रोकड जवळ ठेवलीच होती. ते पन्नास हजार त्यांनी बिनसळे वकीलांपुढं मांडले. बिनसळे वकीलांनी लावलेल्या ॲप्लीकेशनवर कोर्टानं आठ दिवसावरची तारीख दिली. तारखेवर सुनावणी झाली, पण जमानत नाकारली. आता बिनसळे वकील चिडीला आले. त्यांनी थेट हायकोर्टात अर्ज केला.
डीव्ह्याच्या आई-बापानं हाय खाल्ली. वकीलाला ५ लाख! सारी इस्टेट विकली असती तरी १ लाख म्हणजे डोक्यावरुन पाणी. आईची बुद्धी विचार करेना झाली. लहानपणी आईसोबत ती रामाच्या देवळात काकडआरतीला जाई. त्यावेळी नकळत्या वयात ऐकलेला अन् आईबरोबर म्हटलेला एक अभंग तिला कळत्या वयात आवडू लागला. गोविंदबाबांचं त्यावरचं निरुपण तिला अशा वेळी स्मरु लागायचं. तो अभंग ती रात्री अपरात्री उठून देवापाशी बसून म्हणू लागली.
याजसाठी केला होता अट्टाहास | शेवटचा दिस गोड व्हावा ||
आता निश्चिंतीने पावलो विसावा | खुंटलिया धांवा तृष्णेचिया ||
अभंग म्हणता म्हणता ती कोसळून जाई. “देवा का रे बाबा मला अभागिनीला हा दिवस दाखवलास? आयुष्यभर कष्टच उपसले, कधी कामाला नाही म्हटलं नाही. सारं आयुष्य मन मारुन मुर्द्यासारखं जगले. कशासाठी? हा दिवस दाखवणार होतास तू चांडाळा? माझं आयुष्य तर चुलीतल्या लाकडासारखं जाळलं, पण पोराची राख केलीस तू. काय म्हणून जगू आता? का रे माझी फरपट केलीस अशी?” तिनं एका रात्री तिरीमिरीत घरातून देव्हारा उचलला अन गावाबाहेर ओढ्याच्या डोहात फेकून दिला. “आजपासून देवदेव संपला.” त्यातल्या देवाच्या चार-सहा टाकांसह देव्हारा गटांगळ्या खात धारेला लागला. तिनं मागं वळूनसुद्धा पाहिलं नाही.
नवरा असून नसल्यासारखा झाला होता. दिवस-दिवस दोघं एकमेकांना एक शब्द बोलत नसत. आठ दिवसांत घराचं स्मशान होऊन गेलं. पाटील सर होते म्हणून कदाचित दोघं टिकले, नाहीतर ज्या डोहात देव्हारा गेला, त्या डोहात हे दोघं कधीच फुगून तरंगताना सापडले असते.
आबा पाटलांच्या घरी कधीच पाळणा हलला नाही. त्यांनी या पोरालाच आपलं मानलं होतं. त्या ५ लाखासाठी त्यांची वावर विकायची तयारी होती. पण त्यांना दुसरीच चिंता खात होती.
त्यांनी राजन वकीलांना बोलूनपण दाखवलं. “पाच लाख काय हो! आता देतो महिन्याभरात. आमच्या पोटी नाही आला म्हणून काय झालं? जमीन विकून मी त्याला सोडवीन. जमिनीला गि-हाईक शोधतोय. पण वकीलसाहेब, तो निर्दोष सुटला पाहिजे. का? सात वर्षं तरी का? साहेब, त्याच्या आयुष्याची मातीच ना शेवटी? गरीबाच्या पोटचं लेकरु साहेब, हिमतीनं इथवर आलं. असा कसा तुमचा कायदा? मी आयुष्यात खोटं बोललो नाही. आता बोलणार का? माझी साक्ष घ्या म्हणावं. हाय कोर्टात कशाला? सुप्रिम कोर्टात मी ओरडून सांगतो, माझं पोर निष्पाप आहे. पण साहेब, गरीबाचा आवाज ऐकणार कोण? साहेब, बारा खून करुन लोकं मोकाट फिरतात अन गरीबाला सुळावर? सत्याला वाली नाहीच का?” राजन वकीलांकडं याला उत्तर नव्हतं.
उत्तर कोणाकडंच नव्हतं. होते फक्त प्रश्न.
तो असा वाटत नव्हता. त्यानं केलं असेल का?
त्यानं का केलं असेल?
तो सुटेल का?
पेपरमुळं प्रकरण जिल्ह्यात गाजलं होतं. त्याच्या कॉलेजमध्ये चर्चा झाली नसेल असं थोडंच आहे? आबा पाटलांनी इतकं जीवाला लावून घेतलं होतं की ते आता कोणाला भेटणं, बोलणं टाळायचे. त्यांनी एक महिन्याची सुट्टीच टाकून दिली. ते दाराबाहेरसुद्धा पडत नसत. आताशा ते विचित्र वागत. सकाळी ५ वाजता उठून पूजा-अर्चा करण्याचा नेम त्यांनी इतक्या वर्षात कधीच मोडला नाही. आता पहाटे जागे झाले तरी आठ-आठ वाजेपर्यंत आढ्याकडे पहात पडून रहात. त्यांना हाताला धरुन उभं करावं लागे. जेवायला बसले तर घास हातात घेतला की त्यांना रडू फुटे. मोठ्या कष्टानं बाई त्यांना लहान लेकरासारखा एक एक घास भरवत. चार-सहा घास पोटात गेले की उठून दारं-खिडक्या बंद करुन बिछान्यावर अंधारात पडून रहात. त्यांना आजकाल प्रकाशाची भीतीच वाटू लागली होती. फोनची घंटी वाजली तरी त्यांचा थरकाप होई. ते कानात बोटं घालून बसत. फोनवरसुद्धा कोणाशी बोलायचे नाहीत. त्यांची पत्नी आता खंबीर होऊन त्यांची आई झाली होती. बिचारीची कूस देवानं उजवली नाही. आता म्हातारपणी नव-याचं सारं लहान बाळासारखं करायला लावून देव कशाचा सूड उगवत होता त्यालाच ठाऊक.
४-६ दिवस उलटले असतील नसतील. आज पहिल्यांदा आबा बाहेर पडले. जमीन पहायला गि-हाईक येणार होतं. पण भाव खूप पाडून मागितला. तीन तरी यायला पाहिजे होते. गि-हाईक बनेल होतं. आबा पाटील अडलेत हे त्याला माहित होतं. एक लाखावर बोलायला तयारच नाही.
आठवडाभर गेला असेल दोन-दोन दिवसाच्या फरकानं जमिनीला गि-हाईकं आली पण एकच बोट. आज हे चौथं गि-हाईक. आबा खचून गेले. ‘ख-याची दुनिया नाही. मी अडलोय. माझं पोर तिथं एकटं पडलंय हे चांगलं माहित आहे या गिधाडांना. पण हा म्हातारा असा घाबरणार नाही माझं पोर मी मरणाच्या दारातून खेचून आणीन. अरे समजता काय तुम्ही मला? मी सुप्रीम कोर्टात जाईन, राष्ट्रपतीकडं दारात जाऊन बसेल. हा म्हातारा थकला असं वाटतं की काय तुम्हाला? जमीन विकली नाही तर काय पोर घरी येणार नाही माझं हरामखोरांनो?"
मनातल्या मनात विचारांची वावटळ उठली. आबांचे हातपाय थरथरु लागले. ओठ हलू लागले. हाताच्या मुठी आवळल्या. चालता चालता एका पायातली वहाण निसटून गेली. आबा थांबले नाहीत. मागून येणा-या वसंतानं पाहिलं. हातात वहाण उचलून धावत त्यानं आबांना गाठलं, “आबा”.
“हरामखोर” असं ओरडून आबांनी वसंताच्या कानशीलात एक मारली आणि आबा तिथंच कोसळले.
दार वाजलं म्हणून बाईंनी उघडलं. पाच-सात लोक आबांना घेऊन घरी आले. आबा दाराशीच दोन पायावर बसले होते. बोट-बोट वाढलेली दाढी, विस्कटलेले केस, मातीनं भरलेले कपडे. लाल डोळे. आबा तोंडातल्या तोंडात काही पुटपुटत होते. वसंतानंच बाईंना कहाणी सांगितली. दोन मिनीटं लोक थांबले आणि ‘काही लागलं तर सांगाल’ म्हणून माघारी गेले.
बाईंनी आबांना उठवून त्यांच्या खोलीत नेलं. पाणी दिलं. तोंडावरुन पाण्याचा हात फिरवला. आबा नेहमीसारखे दारं-खिडक्या बंद करुन आढ्याकडं नजर लावून पडून राहिले. बाईंनी चहा विचारला. त्याला फक्त मान हलवूनच नाही म्हणाले. त्यांचा थरथरणारा हात हातात घेऊन बाई रडू लागल्या. किती वेळ गेला. बाईंनी भानावर येऊन पाहिलं. आबांना शांत झोप लागली होती. त्यांच्या खोलीबाहेर निघून बाईंनी दार ओढून घेतलं. एक डोळा आबांवर ठेवून काप-या मनानं बाई घरातली कामं उरकू लागल्या. आता म्हातारपणी बाईंकडून देव काय काय दिव्य करुन घेणार होता?
संध्याकाळी दिवेलागणीला त्यांच्या घराची बेल वाजली. स्वयंपाक करता-करता हात धुवून पदराला पुसत बाईंनी दार उघडलं. एक मुलगी आली होती. कॉलेजची विद्यार्थिनी.
“सर आहेत?”
बाईंनी तिला बसायला सांगितलं. आत जाऊन नव-याच्या खोलीच्या दिव्याचं बटण दाबलं, तसं आबा ओरडले, “बंद कर, बंद कर आधी ते.” बाईंनी पटकन दिवा बंद केला. हळू प्रेमळ आवाजात बोलल्या, “अहो, तुमची विद्यार्थिनी आली आहे. भेटायचं म्हणते.” त्यांची नजर वर. एक नाही न दोन नाही. बाईंनी विचार केला अशा स्थितीत भेटून बोलणार तरी काय आहे? त्यांनी बाहेर येऊन मुलीला सांगितलं,
“हे झोपलेत. काही निरोप असेल तर सांग. मी सांगते त्यांना.”
“मॅडम, मी झीनत खान. सिव्हील इंजीनिअरींग फर्स्ट इयरला आहे. ते जे डीव्हीची पोलीस केस सुरु आहे ना त्याबाबत बोलायचं होतं.”
मस्त कलाटणी मिळतेय कथेला.
मस्त कलाटणी मिळतेय कथेला. पुढचा भाग पण लवकर टाका.
उत्कंठा वाढली आहे. लवकर पुढचा
उत्कंठा वाढली आहे. लवकर पुढचा भाग येऊ द्या.
गुंतवुन ठेवलंय ह्या कथेने.
गुंतवुन ठेवलंय ह्या कथेने.
अरिष्टनेमी, रोज एक भाग टाकताय ते छानच आहे. कथा फुलवण्याची शैली जबरदस्त आहे. लिहित रहा.
काहीतरी कलाटणी मिळउन डिव्ह्या सुटुदे.
पुढे काय होईल ह्याची प्रचंड
पुढे काय होईल ह्याची प्रचंड उत्सुकता आहे...
जबरदस्त कलाटणी दिलीय..
जबरदस्त कलाटणी दिलीय..
पण एक आधार मिळतोय वाटलं तर एक तुटला. आता आबा पुन्हा उभे रहातील?
उत्कंठावर्धक!
डिव्ह्या, त्याचे आई-वडील, आबा
डिव्ह्या, त्याचे आई-वडील, आबा पाटील सगळ्यांची किती फरपट होत आहे. लवकर त्याची सुटका व्हावी.
अहो साहेब, लवकर येऊ द्या, असा
अहो साहेब, लवकर येऊ द्या, असा आमचा अंत पाहू नका प्लिज.
वळण आलं.
वळण आलं.
एक झटक्यात सर्व भाग वाचले
एक झटक्यात सर्व भाग वाचले,उत्कंठा वाढली आहे,येऊ द्या पुढचा भाग
काय भारी ट्विस्ट आणलाय!!!
काय भारी ट्विस्ट आणलाय!!!
या झीनत मुळे तरी डीव्ह्या सुटायला मदत व्हावी.
आज नवीन भाग आला का?
आज नवीन भाग आला का?
@सस्मित नाही.
@सस्मित नाही.