मग अंगावरच्या गोधडीचा बोळा दातात घट्ट दाबून तो पडून राहिला. त्याला वाटे आईनं नाही करू काही काम. बापानं नाही करू वॉचमनची नोकरी. सोसायटीच्या टाकीत पाणी किती आहे हे पाहणं काय वॉचमनचं काम आहे? ते करताना तोल जाऊन बाप पडला, पाय मुरगळला. सोसायटीवाल्यांनी त्याला फक्त रिक्षाने घरी आणून सोडलं. दवाखान्याचा खर्च बापानं स्वत: केला. दीड महिना घरी होता. त्याचा पगार गेलाच. बरा झाल्यावर कामावर गेला, सोसायटीवाल्यांनी उभंसुद्धा केलं नाही दारात. दुसरा वॉचमन ठेवला. साले हरामखोर, सात वर्षं बापानं ऊन पाहिलं नाही की पाऊस.कुत्र्यासारख्या इमानानं कामावर गेला. आईचा अॅक्सीडेंट झाला होता. बाजारातून येताना मोटरसायकलवाल्यानं उडवलं. डाव्या पायाला प्लास्टर घातलं. बाप हॉस्पिटलमधूनच थेट कामावर गेला. एक दिवसपण सुट्टी नाही. किती किती गोष्टी त्याला मग आठवत राहिल्या. बोटात घुसलेली शिरळक न दिसता सलावी, तशा सलत राहिल्या.
आई मानी होती. सारं सोसून उभीच होती. त्यानं कधी तिला त्रागा करताना पाहिलं नाही. बाप कधी-कधी कसल्या कसल्या टेन्शनमध्ये सटी-सहामासी पिऊन यायचा. क्वचित आईला लाथा-बुक्क्यांनी झोडपायचा. आईचा आवाज कधी चार भिंतीबाहेर नाही गेला. डोळ्यातल्या पाण्यानं कधी भुई पाहिली नाही. हे बळ तिला कुठून येत होतं देव जाणे! नाही म्हणायला आईला एखाद वेळी सोसवेना व्हायचं तेंव्हा डोळ्यात खळाळ पाणी असायचं. अशा वेळी ती त्याला पोटाशी धरून फक्त एवढंच म्हणे, "लेकरा, शिकून लवकर मोठा हो. मला तुझाच आधार. तुझ्याकडं पाहून मी आहे." मग तिला कढ अनावर व्हायचा. पुढचे शब्द आसवांच्या पुरात वाहून जात. ओठ घट्ट दाबून गदगदणारे हुंदके आणि केसात पडणारे आईचे उन उन अश्रू फक्त त्याला जाणवत. या आसवांच्या पाण्यावर त्याचं बालपण वयापेक्षा आधीच वाढून पोक्त झालं, निबर झालं. खेळणी-खाऊसाठी रडायच्या वयात न कंटाळता घरात आईला मदत करायला शिकला, वीटकरीच्या तुकड्याची गाडी खेळायला तो शिकला. गिरणीत सांडलेल्या आठ-दहा रुपये किलोच्या पीठात गुळचट पाणी टाकून केलेल्या पुरणपोळ्या खाऊन आनंदी व्हायला शिकला.
आजूबाजूच्या घरातल्या बायका अचकट-विचकट शिव्या देत कचाकचा भांडायच्या, ओक्सा-बोक्सी भेसूर रडायच्या. दिवस उगवला की हातावर तंबाखूची मशेरी घेऊन पिवळे दात काळे करत दाराशी बसायच्या. कुचुकूचू बोलत घाणेरड्या दातानं हसायच्या. दुपारी जेवणं-खावणं झाली की घरापुढं बसून तिसर्या बाईच्या चहाड्या करायच्या. त्याची आई या कशातच नव्हती. तिला कामाला दिवसाचे २४ तासही पुरत नव्हते. गल्लीतल्या बायका तिच्या या स्वभावामुळं तिला 'बामनीन' म्हणायच्या. आईला त्यानं फरक पडत नव्हता.
फाटका संसार ती थिगळं-थागळं लावून टुकीनं चालवत होती. आहे त्यात भागवत होती. कलिंगड कधी घेतलं तर खाल्ल्यावर त्याच्या पांढर्या भागाची भाजी त्या दिवशी करायची. भोपळ्या-कलिंगडाच्या सार्या बिया गोळा करून वाळवून प्लास्टीकच्या बरणीत भरून ठेवायची. बरणीत जरा ब-याशा साठल्या की कुटून,पाखडून साफ करून त्याला दुधासोबत खाऊ घालायची. शिळी पोळी-भाकरी राहिली तर तुकडे करून उन्हात छान कडक वाळवायची. कधी पोरानं भूक-भूक केलं की असे वाळवलेले कोरके खायला द्यायची.
दर वर्षाच्या शेवटी जुन्या वह्यांची कोरी पानं काढून, घरी सुई-दोर्यानं शिवून, एखादं कव्हर लावून नवीन वही तयार करी. रेशनच्या धान्याशिवाय कधी बाहेरचं धान्य त्यानं घरात पाहिलं नाही. दर दोन-तीन वर्षांनी मातीचा रंग विकत आणून सुट्टीच्या दिवशी पोराला हाताशी घेऊन घराच्या भिंती स्वत:च रंगवत होती. गरीबाची लेकरं म्हणून लोक जुने कपडे देऊ पहात, जुनी खेळणी देऊ पहात; आईनं कधी अशा गोष्टी घेतल्या नाहीत. फाटके कपडे छान थिगळं लावून, स्वछ धुवून पोराला घातले पण कोणाचे जुने कपडे नाही. घरीच काही ना काही युक्ती करुन पोराचं डोकं खेळण्यात गुंतवून ठेवी पण कोणाची जुनी खेळणी नाही घेतली. पण हा कट्टर स्वाभिमान आई कधीकधी अनाकलनीयरीत्या बाजूला ठेवून देई कोणी जुनी पुस्तकं दिली तर. पुस्तकाला आई कधी नाही म्हटली नाही. ते ती घेई. फाटकं-तुटकं चिकटवून पोरासाठी पुस्तक छान करून देई. जुनी-पानी करता करता आईनं घरी शंभरेक पुस्तकं जीव लावून सांभाळली होती. कधी क्वचित वेळ मिळाला तर स्वतः पुस्तकाची चार-दोन पानं वाचून टाकी.
अगदी नवर्याची नोकरी काय, आपली कुवत कशी याचा विचार करून पहिल्या पोरानंतर तिनं नवर्याशी भांडून, त्याचा मार खाऊन शेवटी कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन करून घेतलं. यापेक्षा जास्त पोरवडा आपण नाही पोसू शकत याची जाण तिला होती. अशा तिच्या वृत्तीमुळं तिला कधी काही जास्त झालं नाही अन् कधी काही कमी पडलं नाही. ‘बामनीन’ कोण्या मुशीत घडली होती देव जाणे!
या अशा हजारो आठवणी त्याला बळ देऊन सार्या वादळा-वावधानात स्थिर ठेवत होत्या.
आज शनिवार होता. रात्री मेस बंद. काही कारणानं मेस बंद असली की त्याचं जेवण पाटील सरांच्या घरी असे. सरांचा त्याला फार आधार वाटे. सात्विक आणि सोज्वळ स्वभावाचे सर आणि बाई त्याचे श्रद्धास्थान होते. पण दर शनिवारी जाणं त्याला बरं नाही वाटलं. आपल्यामुळं त्यांना उगीचच्या उगीच जास्तीचा स्वयंपाक करावा लागतो असं त्याला वाटे. नवीन नवीन सहा एक महिने गेला असेल, पण मग त्यानं सरांना काही ना काही कारणं सांगून शनिवारचं त्यांच्या घरी जेवायला जाणं जवळ-जवळ बंदच केलं. शनिवारी आताशा तो बाहेरच काही तरी इडली-डोसा, वडा-पाव असं हलकं-फुलकं खात असे. म्हणजे तेवढाच चवीत थोडा बदल, शिवाय पैसे वाचत.
त्याच्या इनिशीअल्सवरून पहिल्या वर्षी पोरांनी त्याचं बारसं केलं ‘डिव्ह्या’. पण तीन वर्षं झाली तरी यापुढं यापेक्षा त्याच्याशी फार जवळीक कोणाची झाली नाही. त्याच्या घुम्या, एकलकोंड्या स्वभावामुळं सोबत पिक्चर पहावा, खावं-प्यावं इतकीशीसुद्धा मैत्री त्याची कोणाबरोबर झाली नव्हती. त्याचं असं स्वत:मध्ये राहणं, दुसर्याच्या आयुष्यात न डोकावणं, अभ्यास म्हणजे अभ्यास आणि शिस्त म्हणजे शिस्त, या अशा स्वभावामुळं त्याला पोरं 'ब्रिटिश' म्हणत. खोलीवर एकटा असला की त्याला हसू येई. 'आई बामनीन आणि पोरगं ब्रिटिश'. तो विचार करी, बापच कसा सुटला यातून? अशाच विचारात एकदा बापाच्या मिशांमुळं यानं पटकन त्याचं नाव ठेवलं 'वीरप्पन'. त्याला हसू आलं. तो आता सुट्टीत घरी गेला की ही गंमत आईला नक्की सांगणार होता. मग आई कशी हसली असती या विचारानं त्याला अजून हसू फुटलं.
संध्याकाळचे सात वाजत आले होते. हात-पाय धुवून तो ताजा-तवाना झाला. काळी सिक्स पॉकेट जीन्स पॅंट आणि आवडता फिकट राखाडी चेक्स असणारा पांढरा हाफ बाह्यांचा शर्ट घातला. आज हलकीशी थंडी होती. रात्री गारठा जाणवला असता. डोकं हलकं दुखतंय, थंडीनं वाढायला नको. कानाला काही तरी बांधायला हवं. कपाटातला मोठा पंचा त्यानं काढला. खादी ग्रामोद्योगच्या प्रदर्शनात स्वस्तात मिळाला म्हणून घेतला होता. घेतल्यापासून एक-दोन वेळा वापरला असेल. सारे पंचे पांढरेच. धुवून वाळत घातला अन होस्टेलला हरवला तर पंचाईत. म्हणून त्यानं सुई-धाग्यानं मोठ्या मेहनतीनं स्वत: नाव त्याच्या टिपिकल स्टाईलनं टाकलं होतं. तो पंचा त्यानं गळ्यात टाकला. शिवाय गोळी न खाताच डोकं राहिलं तर बरंच. पण असावी म्हणून त्यानं खोलीवर पडलेली डिस्पिरीनची अर्धी स्ट्रीप उचलली. त्यात एकच गोळी शिल्लक होती. त्यानं ती स्ट्रीपच खिशात टाकली. सायकल काढून शहरात निघाला. टाईमपास म्हणून थोडं मार्केट हिंडून-फिरून मग आज रात्री सीसेम थिएटरला ९ ते १२ चा शो बघायचा होता. रिव्हयू चांगला होता.
फिरता फिरता तो शहीद चौकात आला. एक आईसक्रीमचं दुकान नव्यानंच झालं होतं. दुकानात लावलेल्या जुन्या हिन्दी गाण्यांचा आस्वाद घेत काउंटरवर नेहमी एक प्रसन्न पारसी बावाजी बसलेले असत. त्यानं इतक्या दिवसात त्यांच्याशिवाय कधी कोणाला त्या काउंटरवर बघितलं नव्हतं. दुकानाचं इंटीरियरसुद्धा अगदी चोखंदळ माणसानं केलेलं होतं; ‘अप्रतिम’ हा एकच शब्द त्याला लागू पडला असता. तिथं समोरच्या फुटपाथवरच्या बाकावर ती गाणी ऐकत बसणं हा त्याचा एक आवडता टाइमपास होता. तिथं खूप पॉझिटिव्ह वेव्ह्ज असतात आणि तिथं थांबल्यानं त्या वेव्ह्ज आपल्या शरीरात जातात, खूप एनर्जिटीक वाटतं असं त्याचं म्हणणं होतं. त्यानं कित्येकदा तो अनुभव घेतला होता.
आज तो तिथं पोहोचला तेंव्हा 'किसीकी मुस्कराहटोंपे हो निसार' सुरू होतं. बावाजी काउंटरवर होतेच. व्वा! वा! काय झकास गाणं होतं हे! कितीतरी दिवसांनी आज ऐकलं. तो भारावून दुकानासमोर बसून राहिला. म्हातार्यानं त्याला असं आत्ममग्नावस्थेत पाहिलं आणि त्याला काय वाटलं कोण जाणे? काउंटर वरुन उठून म्हातारा त्याच्याजवळ गेला. 'आवो डिकरा, अंदर आवो. बेसो.' त्याला बसवून म्हतार्यानं एक कसाटाची मोठी स्लाइस आणि एक थम्स अपचा कॅन दिला. तो एकदम हबकला, खिशात हात घालून त्यानं पैसे चाचपले. "नही काका, नही चाहीये!"
गोबर्या गालात म्हातारा हसला. त्याचे केस असे उगाचच उन्हात फिरून पांढरे झाले नव्हते. "बेटा,हूं तमे केटलाक वार जोऊ छू अंय्या. तुम हर हफ्ते यहीं बैठते हो. तुम कभी अंदर नाही आते. तो मै बाहर आ गया. आज मारु मन किधू तमारा जोडे वात करु. एटले. तुमसे बात करनेका मन हुआ आज. यह आइसक्रीम तो मेरे खुशीके लीये तुमको दे रहा हूं. पैसे थोडी देने है इसके? हं. पेसा नथी आपवाना." काउंटरवर लावलेल्या फोटोकडं बघत बावाजी स्वत:शीच बोलल्यासारखे पुटपुटले, "आज अगर वो होता तो बिलकूल तुम्हारी उमर का होता." त्याला गलबलून आलं.
बावाजींशी तुरळक बोलत आइसक्रीम संपवलं आणि तो निघाला. बावाजींनी टेबलवरचं थम्स अप त्याच्या हातात ठेवलं. “ले लो.” आईस्क्रीमवर त्याला ते प्यायला नकोसं वाटलं. तसं तो बावाजीला बोलला. बावाजी म्हणाले, “कोई बात नही. ले जाओ. थोडी देर बाद पी लेना.” त्यानं तो कॅन जीन्सच्या मोठ्या खिशात टाकला आणि निघाला. त्याच्या मनात बावाजींची गोष्ट खोल रूजली. आज बावाजींनी या परक्या गावात त्याच्या चेह-यावर हसू फुलवलं होतं. त्यानंही ठरवलं, ‘हे ऋण मी फेडीन. कोणाच्या तरी चेहर्यावर हसू फुलवीन.’
थिएटरवर पोहोचून तिकीट खिडकीच्या रांगेत उभा राहिला. आज गर्दी होती. त्यानं दोन तिकीटं काढली. तिकीटं संपल्यावर नाराज होऊन जाणार्या कोणालातरी तो ते तिकीट असंच देऊन टाकणार होता. त्या चेहर्यावर हसू फुललं की तो त्या पारसी बावाजीच्या ऋणातून मुक्त झाला असता. त्यानं घड्याळ पाहिलं, साडेआठ. अजून अर्धा तास होता. त्यानं तिकीट खिडकीजवळच पोस्टर पाहत अर्धा तास वेळ घालवला. नऊ वाजले. एकदम मागं हलकासा आवाज झाला.
छान.. कथा वेग घेतेय. पुढचा
छान.. कथा वेग घेतेय. पुढचा भाग लवकर येऊ द्या. लिंक तुटायला नको.
वाचतेय
वाचतेय
पुढच्या भागाची उत्सुकता आहे
पुढे?
पुढे?
छानच.. . पुढचा भाग लवकर येऊ
छानच.. . पुढचा भाग लवकर येऊ द्या.
असाच फ्लो ठेवा कथेचा.. पुढचा
असाच फ्लो ठेवा कथेचा.. पुढचा भाग येऊ द्या
छान सुरू आहे कथा. पहिल्या
छान सुरू आहे कथा. पहिल्या भागापासून गुंतले आहे. त्याच्या बाबतीत काही वाईट घडू नये असे वाटते.
पुढील भाग लवकर लिहा.
मस्त सुरू आहे.
मस्त सुरू आहे.
प्रतिसादांसाठी धन्यवाद
प्रतिसादांसाठी धन्यवाद
उत्साह दुप्पट झाला.