वांगे अमर रहे !

Submitted by अभय आर्वीकर on 5 December, 2009 - 05:33

वांगे अमर रहे…!

कॉलेज संपवून शेती करायला गेलो तेव्हा गावातील इतरांकडे नाही ते ज्ञान आपल्याकडे आहे असा माझा दृढ समज होता आणि त्याच आविर्भावात मी शेतीची सुरुवात केली. या सर्व जगाच्या लेखी मूर्ख असलेल्या शेतकर्‍यांना स्वानुभवाने शहाणे करण्यासाठी भरघोस उत्पन्न घ्यायचे ठरविले. दोन महिन्यांत नगदी पैसा मिळवून देणारे पीक म्हणून वांगीची निवड केली आणि ५ एकरात वांगीची लागवड केली. मेहनत,जिद्द सर्वस्व पणाला लावलं. मेहनत फळा आली. भरघोस पीक आलं. अन्य शेतकरी घेतात त्याच्या १-२ नव्हे चक्क ५-६ पट उत्पादन मिळालं. आणि इथेच माझे ग्रह फिरले.
माझी वांगी बाजारात गेली आणि स्थानिक बाजारात वांगीचे भाव गडगडले. ५ रुपयाला पोतं कुणी घेईना. वाहतूक,हमाली,दलाली वजा जाता जो चुकारा मिळाला ते पैसे बसच्या तिकिटालाही पुरले नाहीत. शेतात घेतलेली मेहनत आणि वांगी फुकटात गेली. असे काय झाले? काहीच कळत नव्हते. प्रारंभीच म्हटल्याप्रमाणे माझ्या नजरेत इतर शेतकरी अडाणी,मूर्ख असल्याने त्यांच्याशी सल्लामसलत करण्याचा प्रश्नच नव्हता. शेवटी निष्कर्ष निघाला की मार्केटमध्ये गरजेपेक्षा जास्त माल गेल्यामुळे भाव पडले. कारण ग्राहकाला जेवढी गरज असेल तेव्हढीच तो खरेदी करेल. माझी वांगी खपावी म्हणून ग्राहक पोळी, भात, भाकरीऐवजी नुसतीच वांग्याची भाजी खाऊन पोट थोडीच भरणार आहे? स्थानिक बाजारात गरज, मागणीपेक्षा जास्त माल गेल्याने ही स्थिती झाली त्याला जबाबदार मीच होतो. इतर शेतकर्‍यांनी सायकलवर आणलेली अर्धा पोतं वांगी सुद्धा माझ्या मुळे बेभाव गेली होती. सायकलवर अर्धा पोतं वांगी आणून उदरनिर्वाह करणारे माझ्यामुळे अडचणीत आले.
झाली चूक पुन्हा करायची नाही म्हणून दुसर्‍या खेपेस वांगी आदिलाबादला न्यायचे ठरवले. माझ्या गावाहून १५० किमी अंतरावर मोट्ठी बाजारपेठ असलेले आंध्रप्रदेश मधील आदिलाबाद शहर. ६० पोती वांगी न्यायची कशी? स्पेशल वाहनाचा खर्च परवडणार नव्हता म्हणून माल बैलबंडीने हायवे क्रं. ७ पर्यंत नेला. रायपुर – हैदराबाद जाणार्‍या ट्रकला थांबवून माल भरला. तिथे हमाल किंवा कुली नव्हताच त्यामुळे मीच ट्रकड्रायव्हरच्या मदतीने माल चढविला. ६० पोती प्रत्येकी वजन ५०-५५ किलो. अनुभव नवा होता. मजा वाटली (?) शेतकरीcumहमाल.Two in One.
आदिलाबाद गाठले.
तिथल्या मार्केटची गोष्टच न्यारी. मार्केटमध्ये पाय ठेवायला जागा नव्हती.
वांगेच वांगे.
अत्र तत्र सर्वत्र वांगेच वांगे.
जिकडे तिकडे चोहीकडे, वांगेच वांगे गडे, आनंदी आनंद गडे.
मार्केट वांग्यांनी भरलं होतं. त्या संदर्भात एका शेतकर्‍याला विचारले.
“यंदा हवामान वांगी साठी फारच अनुकूल असल्याने वांगीचं भरघोस उत्पादन आलंय.” तो शेतकरी.
“भाव काय चाललाय?” माझा प्रश्ऩ.
“सकाळच्या लिलावात ५-६ रुपये भाव मिळाला.” तो शेतकरी.
“किलोला की मणाला?” माझा प्रश्ऩ.
“किलोला? अरे यंदा किलोला विचारतो कोण? पोत्याचा हिशेब चालतो.” तो शेतकरी.
“म्हंजे? पोतभर वांगीला ५-६ रुपये?” माझा प्रश्ऩ.
“पोतभर वांगीला नाही, पोत्यासहित पोतभर वांगीला.” तो शेतकरी.
“रिकाम्या पोत्याची किंमत बाजारात १५ रुपये असताना पोत्यासहित पोतभर वांगीला ५-६ रुपये? “मी मलाच प्रश्न विचारीत होतो. हे कसं शक्य आहे?
"१५ रुपये किंमतीच्या रिकाम्या पोत्यात ५०-५५ किलो वांगी भरली की वांगीसहीत पोत्याची किंमत घटून ती ५ रुपये एवढी होते" हे समिकरण मला कुणी शिकवलंच नव्हतं.
विश्वासच बसेना, पण समोर वास्तव होतं.
“आता लिलाव केव्हा होईल?” माझा प्रश्ऩ.
“इथे नंबरवार काम चालतं, मी काल आलो, माझा नंबर उद्या येईल कदाचित.” तो शेतकरी.
“तोपर्यंत वांगी नाही का सडणार?” माझा प्रश्ऩ.
यावर तो काहीच बोलला नाही. मूक होता. डोळे पाणावले होते, एवढ्या मेहनतीने पिकविलेलं वांगं सडणार म्हटल्यावर त्याचा जीव कासावीस झाला होता.
आता माझ्याही मनात कालवाकालव व्हायला लागली.
आपला नंबर तीन दिवस लागला नाही तर अर्धी वांगी नक्कीच सडणार. डोळ्यादेखत वांगी सडताना पाहणं मानसिकदृष्ट्या पीडादायक ठरणार होतं. मी मनातल्या मनात गणित मांडायला सुरुवात केली. तीन दिवसात किमान अर्धी वांगी नक्कीच सडणार. उरलेली ३० पोती गुणिला ५ वजा तीन दिवस जेवणाचा, निवासाचा खर्च बरोबर उणे पंधरा ( -१५) म्हणजे वांगी विकण्यासाठी मला जवळून १५ रुपये खर्च करावे लागणार होते.
काय करावे मला सुचत नव्हतं, डोकं काम करीत नव्हतं, माझं सर्व पुस्तकी ज्ञान उताणं झोपलं होतं.
आता पुढे काय?
निर्णय घेतला. एकदा डोळेभरुन त्या वांगीकडे पाहिलं. गुलाबी-गुलाबी, तजेल आणि टवटवीत. कुणाचीही दृष्ट लागावी अशी. ते दृश्य डोळ्यात साठवलं, एका झटक्यात वांगीकडे पाठ फिरविली आणि गावाचा रस्ता धरला. गावाजवळ आलो तेव्हा दिवस उतरणीला आला होता. आणि आता मला एका नव्या समस्येने ग्रासले होते. गावांतील शेतकरी मला यासंदर्भात विचारतील त्याला उत्तर काय द्यायचे? मूर्ख शेतकर्‍यांच्या नजरेला नजर भिडविण्याचे धाडस विद्याविभूषित शहाण्याकडे उरले नव्हते. मग एका चिंचेच्या झाडाखाली विसावलो. तेथेच टाईमपास केला. गावातील सर्व लोक झोपी गेले असतील याची खात्री झाल्यानंतरच गुपचिप चोरपावलाने गावात प्रवेश केला.
आजही मला दिसतात.
..ते ..वांगे..
गुलाबी-गुलाबी, तजेल आणि टवटवीत. कुणाचीही दृष्ट लागावे असे, अजूनही न सडलेले.
आणी माझ्या दृष्टिपटलावर अमर झालेले.

गंगाधर मुटे
………… **…………..**…………..**…………..**………….
दिनांक : ११-०२-२०११

मेहता पब्लिकेशन हाऊस आणि मी मराठी.नेट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
लेखन स्पर्धा २०१० या स्पर्धेचा आज निकाल आला असून
या स्पर्धेत "वांगे अमर रहे...!"
या लेखाला उत्तेजनार्थ पारितोषक जाहीर झाले आहे.

माझी वांगंमय शेती तोट्यात गेली पण वांङ्मय शेतीला बरे भाव मिळत आहेत. Wink

----------------------------------------------------------------------------

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अत्यंत विदारक आणि विषण्ण करणारा आपला अनुभव आहे.

अडाणी लोकही व्यवहारज्ञान जाणत असतात.
आपण ते न जाणताच पंडीत होत असतो. असे वाटते.

जीवनाने जे धडे दिले ते विवेकाने ग्रहण केले तर आपला र्‍हास निश्चित टाळता येईल असे वाटते.

तरीही, त्याकरता आवश्यक ती उमेद, शक्ती आणि हुरूप आपल्याला मिळावा हीच प्रार्थना.

आपण आपल्या उत्पादकतेच्या ज्ञानात यशस्वी ठरला आहात.
मात्र, पणनविपणनाच्या दलाली कामात आपण अयशस्वी ठरला आहात असे दिसते.
ते अर्थातच तुमचे क्षेत्रही दिसत नाही.
ते काम कुणा प्रस्थापिताच्या/जाणत्याच्या साहाय्याने करावे.
कदाचित यश मिळू शकेल.

या व्यासपीठावर हा लेख लिहून आपण आपल्याला नक्की कोणत्या समस्येचा सामना करावा लागतो आहे याची सविस्तर कल्पना दिलेली आहेत. जाणते लोक जास्त उपयुक्त सल्लाही देऊ शकतील. मात्र, या लिहीण्यानेच तुम्हाला समस्येची नीट उकल आणि उपायही स्वतःसच दिसू लागले तर नवल वाटू नये. तेव्हा आपल्याला माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा!

नरेंद्रजी,
आपल्या अभिप्रायाबद्दल आभारी आहे.
मायबोलीवर मागोवा मध्ये मी "शेतकरी आत्महत्त्यांवर तज्ञांची मुक्ताफळे" हा लेख लिहीला आहे. त्यावर आलेल्या एका प्रतिक्रियेवर खुलासा करतांना मी स्वतःचा अनुभव विषद केला. नंतर लक्षात आले की हा अनुभव म्हणजे एक स्वतंत्र लेखच तयार झालेला आहे.म्हणुन इथे दिला आहे.
संदर्भा साठी आपण तो लेख अवश्य वाचावा.
परत एकदा धन्यवाद!
गंगाधर मुटे

एकदा डोळेभरुन त्या वांगीकडे पाहिलं. गुलाबी-गुलाबी,तजेलं आणि टवटवित. कुणाचीही द्रुष्ठ लागावे अशी. ते द्रुष्य डोळ्यात साठवलं, वांगीकडे पाठ फिरविली आणि गावाचा रस्ता धरला>>>>
किती अवघड असेल हे ! Sad

५ रू ला पोते!?
वांग्याची बाजारातली किंमत ५रू किलो एव्हढी खाली आल्याचंही मी कधी पाहिलेलं नाही.
अवघड आहे.

गंगाधर बरे झाले वेगळा लिहीला, तेथे तो हरवला असता. खूप छान लेख आहे. शेतकरी भाज्या तशाच टाकून परत गेले वगैरे बातम्या वाचल्यात पण एका शेतकर्‍याच्या नजरेतून असा अनुभव वाचला नव्हता. शेतकर्‍याची मेहनत फुकट गेली आणि एखाद्या भुकेल्याला मिळू शकणारे अन्न ही वाया गेले हे वाचताना वाईट वाटते.

तुमचे वैयक्तिक किंवा पाहिलेले इतर अनुभव ही वाचायला आवडतील.

पिकतं तेथे विकत नाही. हे किती खरं आहे. शेतकर्‍याच्या आयुष्यातला नाउमेद करणारा अनुभव. भाज्यांच्या किमती वाढल्या की सामान्य माणूस बिथरतो पण अशावेळी शेतकर्‍याचा विचार मनात येतो का?

गंगाधर जी,
खरच अत्यंत विदारक आणि विषण्ण करणारा अनुभव आहे तुमचा, लेख वाचल्यावर शेतकर्‍याच्या वेदनेची जाणीव झाली, डोळे पाणावले...

तुम्ही गावात गेल्या वर काय झाल? आणि तुमचे ईतर अनुभव वाचायला आवडेल, जमल तर तुमचे आणखी अनुभव लिहा... तुम्हाला खुप खुप शुभेच्छा Happy

गंगाधर जी,
वाचुन सुन्न झाले...काय लिहाव कळत नाही...तुमची लिहण्याची शैली जबर्दस्त आहे...तुमचे अनुभव वेगळे आहेत्...जरुर लिहा..भरपूर लिहा..

सहावी की सातवीला आम्हाला मराठीच्या पाठ्यपुस्तकात 'लाल चिखल' नावाचा एक धडा होता.
त्यात असाच टोमॅटोला आठाणे किलो ही भाव न मिळाल्याने प्रचंड निराश झालेला शेतकरी भर बाजारात, स्वतःचा घाम गाळून पिकवलेला टोमॅटो स्वतःच्या पायांनी तुडवून वेड्यासारखा त्या लाल चिखलात नाचतो, आणि केवळ बाजाराला जायला मिळणार या आशेवर महिनोनमहिने आपल्या चिमुकल्या हातांनी बापाला जमेल तशी मदत करणारा चिमुरडा, बापाच्या पायदळी आपल्या स्वप्नांचा चिखल हताश होऊन बघत बसतो.
हे असे खूप लिलाव मी फार जवळून बघितले आहेत, केलेही आहेत आणि घेतलेही आहेत.
ही साखळीच असते, मागणी-पुरवठ्याचं समीकरण बिघडलं की त्याचे भोग सगळ्यांच्याच नशिबी येतात.
शेतकरीच असं नाही लहान सहान व्यापारीही ह्यात प्रचंड कर्जबाजारी होतात, त्यातल्या त्यात नाशवंत मालाचा क्रय्-विक्रय करणारे.

छान लिहिलंय्..मार्केट आणि मार्केटिंग कमिटीशी संबंधित लोकांना हे अनुभव प्रत्येक ऋतूचक्रात येतातच.

हं...फार फार कठिण आहे हे. Sad

असं काही नाही का करता येणार की तो माल गोरगरीबांना अर्ध्या किमतीत विकला जावा? नुसता तिथेच टाकून देण्यापेक्षा कुणाच्या तरी मुखी पडेल आणि शेतकर्‍यांना थोडेफार पैसेही मिळतील. अर्थात तो गोरगरीबांच्या वस्तीपर्यंत नेणे हा मोठा प्रश्न आहे हे मान्य आहे. समाजसेवा करणार्‍या संस्थानी यात पडले पाहिजे.

हम्म्म. मला पण चमन म्हणतोय तोच धडा आठवला शेतकर्‍याचा, तो लाल टोमॅटो घेवुन जातो बाजारात आणि त्याच्या मालाला भावच मिळत नाही. हे नुसते अनुभव वाचून इतक हतबल आणि असहाय वाटते, तिथे ज्यांच्यावर ही परिस्थीती येत असेल ते लोक कसे हाताळत असतील हे सगळे. Sad

शेतकर्‍यांच्या आत्म्हत्यांच्या समस्येचे मूळ इथेच आहे. आता तर बीटी वांगी येणारेत म्हणे. बीटी कापसाने शेतकर्‍याची वाट लावली, आणि अनेकांनी जग सोडले. वांग्यांच्या बाजारची हीच तर्‍हा असेल, तर बीटी वांग्यानी हलाखीत आणखी भर पडणार.
(मलाही कधीकधी वाटते, लोकं ऊस घेतात, आपण वांगी-टोमेटो का घेऊ नयेत. मागे आम्ही पपईचा प्रयोग केला होता. पण तो फक्त अनुभवातून शहाणपणा शिकण्यासाठी....)

ह्म्म्म..... लाल चिखल आठवला.
कांद्याला चांगला भाव मिळतो म्हणुन आमच्या मामाने एकदा दीड एकर कांदे लावले होते. त्यावर्षी १० पैसे किलो झाले कांदे ते आठवले.

खूप प्रभावी लिहीलं आहे गंगाधरजी!

शेती म्हंजे लै मोठा जुगार हे अन शेतकरी म्हंजे जुगारी!
आता जुगार खेळणारा कधी श्रीमंत होतो का? नाही....... कॅसिनो चे मालक मात्र गब्बर होतात.

(शेतकर्‍याला जुगारी म्हणालो म्हणुन आरडायचं काम नाय! )

उसाची उभी पिकसुद्धा यासाठीच जाळली जातात .लेख आवडला .कृषीप्रधान देशात शेतकरीच जर
हवालदिल झाला तर कस व्हायच ? घाऊक बाजारात सरकारतर्फे कोल्डस्टोरेजची व निर्यातिची व्यवस्था
झाल्यास हा प्रश्न सुटू शकतो का याचा विचार व्हायला हवा .गेली वीस वर्ष कोल्डस्टोरेज रिसिट्सना
चलनी मान्यता आहे त्यामुळे त्या तारण ठेवून निर्यातिचा खर्च शेतकरी करू शकतो किंवा भाव जास्त
येईपर्यंत तो थांबू शकतो अस वाटत .

वाईट वाटलं Sad
सद्ध्या अगदी असंच चित्र सगळीकडे दिसत आहे. टमॅटो, कांदा- ह्यांना एकदा भाव आले, की सगळे तिकडे वळतात, आणि पुढल्या हंगामाला भाव अगदी पडेल मिळतो. त्यातून शेतक्री-ग्राहक थेट माल विकता येत नाही, ह्यामुळे पिकवणार्‍यांचे अधिकच हाल. मला नेहेमी प्रश्न पडतो, की भाज्यांसारखा नाशवंत माल- महाग म्हणून कोणी घेतला नाही, तर सडवून टाकून देण्यापेक्षा, थोडा कमी किंमतीला का विकत नाहीत? हातात काहीतरी पडेल ना? मध्ये कांदा २४रू. किलो झालेला असताना, एका शेतकर्‍याने सरळ (पुण्यात) नदीपात्रात १०रू. किलोने कांदा विकला होता- आणि त्याला चांगला प्रतिसादही मिळाला होता.

हे लेखाशी संबंधित नाही, पण सध्या भाज्यांचे गगनाला भिडलेले भाव बघता, पुण्यामध्ये मार्केटयार्डातल्या कृषी उत्पन्न बाजार समितीने थेट शेतकर्‍यांचा माल ग्राहकाला विकायची परवानगी दिली आहे. वेबसाईटही उघडली आहे, मोबाईलनंबरही दिलाय. किती चालतोय हा उपक्रम बघायचं!

अरेरे Sad
पण तुम्ही निराश होऊ नका. अनुभव (तुमचे व जुन्या जाणत्यांचे) व पुस्तकी ज्ञान या दोन्हीच्या मिलाफाने वाटचाल सुरु ठेवा.

आपल्या सर्वांच्या सह्रुदय अभिप्रायाबद्दल आभारी आहे.
... "शेतकरी आत्महत्त्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे" यालेखावर आलेल्या एका प्रतिक्रियेवर खुलासा करतांना मी स्वतःचा अनुभव विषद केला. हा अनुभव जुना आहे. काळाच्या ओघात बरेच पाणी वाहुन गेले आहे.
.
<< फारएन्ड >><<तुमचे वैयक्तिक किंवा पाहिलेले इतर अनुभव ही वाचायला आवडतील.>>

<< sas >><< तुमचे ईतर अनुभव वाचायला आवडेल, जमल तर तुमचे आणखी अनुभव लिहा... तुम्हाला खुप खुप शुभेच्छा>>

<<एक मुलगी>> <<...तुमचे अनुभव वेगळे आहेत्...जरुर लिहा..भरपूर लिहा.>>.

<< vijaykulkarni >><<अजून लिहा. आम्हाला वाचायचे आहे.>>

.... यापुर्वी मी काही कविता आणि व्रुत्तपत्रीय लेखन केले आहे. परंतु कथा किंवा ललित स्वरुपाचे लेखन कधिही केलेले नाही. प्रतिक्रियात्मक स्वाभाविक अनुभव कथन केला आणि अनपेक्षीतपणे या ललित लेखाचा जन्म झाला.
ठरवुन लिहायचे म्हटल्यावर कथा किंवा ललित स्वरुपाचे लेखन मला करता येइलच याची खात्री नाही.
तरीपण मी लिहायचा प्रयत्न करणार आहे.

परत एकदा धन्यवाद !!

गंगाधर मुटे

वाईट वाटले वाचून. या प्रश्नावर उपाय काय? शेतकर्‍याला माल ग्राहकाला थेट का विकता येत नाही? निदान काही तरी भाव मिळेल.

ह्म्म.. आमच्या बटाट्यांच्या वेळेस झालेलं असं..
आणि एकदा अगदी काढायला आलेल्या भाताचा अचानक आलेल्या पावसानं घात केलेला.

मोहंमद युनुस ह्यांची मुलाखत एबीसी न्युज चॅनेल ने दाखवली.ही मुलाखत चंपक यांनी "मोहंमद युनुस ह्यांची मुलाखत" या शिर्षकाखाली अपलोड केली आहे,अवश्य पहावी.
धन्यवाद चंपकजी...!
" Poverty is not created by the poor people. It is not their fault that they are poor. Poverty is created by the system, imposed on good blooded human beings and we can peel it off. " मोहंमद युनुस.

Pages