शेजाऱ्याचा डामाडुमा- 'जाहिलिया' इतिहास आणि इस्लामी सत्तावतरण - मालदीव भाग ४

Submitted by अनिंद्य on 15 March, 2022 - 05:34

लेखमालेचे आधी प्रकाशित केलेले भाग येथे वाचता येतील:
शेजाऱ्याचा डामाडुमा - संवाद चित्रे - मालदीव भाग १
https://www.maayboli.com/node/81160
शेजाऱ्याचा डामाडुमा - हायो धुआ सलाम - मालदीव भाग २
https://www.maayboli.com/node/81193
शेजाऱ्याचा डामाडुमा - मास, अहारू, गारुनु - मालदीव भाग ३
https://www.maayboli.com/node/81246

4F9241C3-1F7E-45BB-9EC2-71A2FD7850D9.jpeg

मालदीवमधल्या काही कट्टर इस्लामधर्मीय लोकांच्या मते इस्लामच्या आगमनापूर्वी सगळीकडे 'जाहिलिया' काळ म्हणजे अज्ञान-अनागोंदीचे वातावरण होते. त्यामुळे त्याआधीचा इतिहास हा काही फारसा महत्वाचा नाही. पण तसे अर्थातच नाही. काळाच्या ओघात मालदीवच्या सांस्कृतिक मुख्य धारेला वेगवेगळ्या धर्म-वंश-जमातीच्या लोकसंस्कृतींचे प्रवाह येऊन मिळाले आहेत. तसेही धर्म आणि संस्कृती एकमेकांत गुंफली गेली तरी स्वतःचा वेगळा सुवास जपणारी फुले आहेत - एकमेकांना पूरक असली तरी एकमेकांचा पर्याय नाहीत.

म्हणून मालदीवमध्ये इस्लामच्या प्रचार- प्रसाराची चर्चा करण्यापूर्वी ह्या दुर्लक्षित मूळ घटकांबद्दल थोडेसे :-

ऐतिहासिक नोंद असलेले मालदीवचे सर्वात पुरातन रहिवासी म्हणजे 'गिरावरू' (उच्चारी - तीवरु) या जमातीचे राजधानी मालेजवळील तत्कालीन 'गिरावरू' नावाच्या बेटावर राहणारे लोक. इस्लामपूर्व मालदीवमध्ये त्यांची भाषा, संस्कृती आणि चालीरीती अन्य स्थानिकांपेक्षा वेगळ्या होत्या. हे लोक भारतातील तामिळनाडूच्या किनारी भागातून आले असावेत असे एक मत आहे. पुढे ह्या लोकांना सक्तीने दुसऱ्या 'हुलहुले' नावाच्या बेटावर वसवण्यात आले. आज ह्याच हुलहुले बेटावर मालदीवचा प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. मालदीवच्या सुलतानाला आणि मालेतील त्याच्या दरबाऱ्यांना ह्या लोकांचे आणि त्यांच्या वेगळेपणाचे खूप आकर्षण होते, विशेषतः त्यांच्या स्त्रियांची वस्त्रे आणि आभूषणे अगदी वेगळी असल्यामुळे तो सर्वांच्या कौतुकाचा विषय होता. काहीसे आपल्याकडच्या लमाण/बंजारा बांधवांसारखे.

37431466-7AFB-4D5B-A716-A343D377664C.jpegपारंपारिक वेशात एक गिरावरू स्त्री

ह्या गिरावरू लोकांबद्दल मला माझ्या एका स्थानिक मैत्रिणीच्या वयोवृद्ध आजीने एक वेगळीच गोष्ट सांगितली. जुन्याकाळी ह्या लोकांचे जसे आकर्षण होते तसे त्यांच्याबद्दल रागही होता. ह्यांना म्हणे बेडूक ह्या प्राण्याची किळस होती. त्याच कारणाने अन्य लोक त्यांच्यावर मुद्दाम बेडकांची पिल्ले फेकत, त्यांना त्रास देण्यासाठी. आणिक एक वेगळेपण म्हणजे मालदीवमध्ये वसलेल्या पुरातन जमातींपैकी फक्त ह्याच जमातीमध्ये घटस्फोट घ्यायची मुभा नव्हती. आता ह्या जमातीचे लोक मुख्य धारेत (!) मिसळून गेले आहेत आणि पूर्णपणे मालेच्या शहरी जीवनात समरसून जगताहेत. त्यांची वेगळी भाषा-संस्कृती आता अर्थातच नाश पावली आहे. अगदी काही वृद्ध लोक सोडले तर खुद्द मालदीवमध्ये कोणी तुम्हाला यांच्याबद्दल फार काही सांगू शकणार नाही.

मालदीवची दुसरी एक अति-प्राचीन रहिवासी जमात म्हणजे हूवधू अटॉलवर राहणारी जमात. त्यांच्या राजधानीच्या शहराचे पुरातन नाव 'सुवा दीपा' किंवा सुवादीव (शुभ द्वीप?). त्यांची स्वतःची भाषा आहे, मुख्य धिवेही भाषेपेक्षा बरीच वेगळी - हूवधू भास ('भास' हा शब्द इथे वाचून 'भाषा' हा बोध सहज होतो). ह्या लोकांचा माले आणि मालदीवच्या अन्य द्वीपवासीयांशी संबंध फार कमी आला. त्यामुळे की काय, त्यांच्या प्रथा-परंपरा आणि चालीरीती श्रीलंकेतील सिंहली लोकांशी जवळीक असलेल्या आहेत. मालदीवमध्ये अन्य कोणालाही नसलेला एक विशेष अधिकार ह्या जमातीच्या नेत्याला आहे - ह्या जमातीच्या प्रमुखाला स्वतःचा ध्वज आहे, त्याच्या मालकीच्या सर्व बोटींवर (त्यांच्या हूवधू भाषेत होड्यांना 'ओडी' असा शब्द आहे, मला गमतीशीर वाटला) आणि अटॉल मधल्या अनेक इमारतींवर तो फडकावण्याची मुभा आहे. आश्चर्य म्हणजे हा ध्वज दिसायला नेपाळच्या एका प्राचीन प्रांतीय ध्वजासारखा आहे.

FB450043-7812-4100-BC70-FD998B110F17.jpeg

ह्या हूवधू अटॉलच्या मध्यावर एक नांदते बेट आहे - देवधू नावाचे. मालदीवचे अनेक सुलतान ह्या देवधू बेटाला स्वतःचे आद्य स्थान म्हणवत. त्यामुळे की काय आजही मालदीवच्या अनेक पावरबाज घराण्यांमध्ये, श्रीमंत व्यापारी, समाजातील मानांकित आणि राजकारणी लोकांमध्ये आपले मूळ स्थान हे देवधू असल्याचे सांगण्याची 'फ्याशन' आहे, इतका त्याचा मान.

ह्या हूवधू लोकांची वेगळेपणाची भावना मात्र प्रखर आहे. आधी भारतीय समुद्रात सगळ्या भूमीवर आणि समुद्रावर ब्रिटिशांचे राज्य असल्यामुळे हूवधू, कराची, कोलंबो, कोचीन आणि तुतिकोरिन बंदरांमध्ये नियमित व्यापार आणि संपर्क होता, त्याला सीमेचे कुंपण नव्हते. पण ब्रिटिश गेले आणि स्थिती बदलली. ब्रिटिशांनी मालदीव सोडले आणि मालेतील स्थानिक सरकारला व्यापार आणि करविषयक धोरण ठरवण्याचे अधिकार मिळाले. त्यांनी हूवधूच्या सागरी व्यापारात लुडबुड सुरु करताच हूवधूच्या लोकांनी आजूबाजूचे काही अन्य अटॉल मिळून एक वेगळा देश स्थापण्याचे आंदोलन जोरात सुरु केले - सुवादीव रिपब्लिक नावाने. त्यांना बराच पाठिंबाही मिळाला. मालदीव स्वतंत्र राष्ट्र म्हणून आकारास येत असतांना १९५९ मध्ये हे लोक स्वतःला वेगळे राष्ट्र घोषित करते झाले होते.

83DEC7DD-622E-4D80-A61F-66CF59B6582F.jpegवेगळ्या सुवादीव रिपब्लिक या अल्पजीवी राष्ट्राचा ध्वज

पुढे सहा-सात वर्षे बऱ्याच जाळपोळी - राजकीय हत्या - सैनिक कारवाई - वाटाघाटी इत्यादी होऊन बरेच उशिराने म्हणजे १९६६ मध्ये हे लोक मालेतील मध्यवर्ती सरकारच्या अधिपत्याखाली आले. आता तिथे काही वेगळेपण जाणवत नाही पण वेळोवेळी होणाऱ्या उत्खनन आणि संशोधनात त्यांच्या वेगळ्या संस्कृतीचे पुरावे सापडतात. स्थानिक कारभारात आता त्यांना बऱ्यापैकी स्वायत्तता आहे.

* * *
मालदीवमधे इस्लाम - एक आढावा

मालदीवमध्ये इस्लामचा प्रवेश आणि वाटचाल समजून घ्यायची झाली तर भारतीय उपखंडाच्या इतिहासात थोडे मागे जावे आणि आजूबाजूच्या भूमीवर काय काय आणि कसे कसे घडले त्याकडे एक कटाक्ष टाकावा.

अरब व्यापारांनी श्रीलंकेत थोडीफार वस्ती करायला सुरवात केली ती ८ व्या शतकाच्या शेवटी शेवटी. त्यांच्यासोबत त्यांचा धर्म आला, स्थानिक लोकांशी झालेल्या संकरामुळे इस्लामचे अनुयायी वाढले. सातव्या शतकात मालदीवच्या बाजूच्या लक्षद्वीप बेटांवर इस्लामी संत-धर्मप्रचारक उबेदुल्लाह स्थायिक झाले. त्यांच्या प्रभावाने स्थानिक लोकांपैकी काही इस्लामचे अनुयायी झाले. सातव्याच शतकात मुहम्मद बिन कासिमने सिंधच्या राजा दाहीर ला आऱोरच्या युद्धात हरवून त्याच्या ताब्यातला प्रदेश इस्लामच्या पूर्ण प्रभावाखाली आणला होता. ह्यात आजच्या पाकिस्तानातील आणि अफगाणिस्तानातील काही बुद्ध धर्मावलंबी प्रदेशही होते. सिंधच्या कराची बंदरातून मालदीवला जहाजे नियमित जात, पण तेथील इस्लामिक धर्मप्रचारक काही मालदीवला गेले नाहीत.

आठव्या शतकात आपल्याकडे केरळच्या मलबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अरब व्यापारी वसले. ह्या श्रीमंत व्यापारांच्या प्रभावा-आग्रहामुळे चेरामन पेरुमल सारखे काही स्थानिक राजे इस्लाम धर्मानुयायी झाले. त्यामुळे इस्लामी धर्म-प्रचाराला गती आणि धन - प्रतिष्ठा प्राप्त झाली. पुढे काही वर्षातच त्यांच्यापैकी काही मलबारी-अरबी लोक मालदीवमध्येही राहायला आले, त्यांच्यासोबत इस्लामिक धर्माचरण मालदीवच्या काही बेटांवर प्रवेशले.

पण हे सर्व झाले तरी मालदीवच्या बहुसंख्य लोकांनी धर्म बदलला नाही, तिथे बुद्धाचा धम्मच प्रभावी होता. मालदीवमध्ये इस्लाम स्वीकृत व्हायला आणि रुजायला बराच काळ जावा लागला - सिंध, केरळ आणि लक्षद्वीपमध्ये इस्लामच्या आगमनाच्या सुमारे ५००-६०० वर्षानंतर थेट ११९३ मध्ये मालदीवच्या राधून नी इस्लाम कुबूल करेपर्यंत.

थिमुगे-होमा वंशाच्या ह्या राधूनचे नाव रासगेफानू-महाराधून 'धोवेमी'. त्याला इस्लामची दीक्षा कोणी दिली ह्याबद्दल थोडा संभ्रम आहे. दोन नावे प्रमुखतः घेतली जातात, पहिले मोरोक्को येथून आलेले सुन्नी संत - अबू अल बरकत आणि दुसरे इराणहून आलेले धर्मप्रचारक योसुफ शमसुद्दीन तबरीझ.

7520BD70-5481-45C3-8BBC-CC2685F31FBB.jpegदोघांचीही स्मृतिस्थळे माले शहराच्या हुकुरू मिस्की मशिदीनजीक बांधलेली आहेत.

(अलीकडच्या काळापर्यंत भारत-पाकिस्तान-श्रीलंका-बांगलादेश प्रमाणेच ह्या मजारींवर दुवा मागण्याचे आणि उर्स साजरे करण्याचे कार्यक्रम होत असत. जहाल विचारांच्या वाढत्या प्रभावामुळे आता बंद पडले आहेत.)

मालदीवच्या राजाच्या धर्मपरिवर्तनाला हिंसक घटनांची पार्श्वभूमी नाही. पुढे हा राधून 'सुलतान मोहम्मद अल-अदिल -धर्मवंथ रासगेफानू’ - म्हणजे दयाळू राजा म्हणून प्रसिद्धी पावला. लवकरच सुलतानाने स्वतः सर्व मोठ्या बेटांवर प्रत्यक्ष जाऊन जनतेला इस्लामची दीक्षा दिली.

आधीच्या भागात लिहिल्याप्रमाणे ह्या लोकांनी बौद्ध धर्माची अहिंसेची शिकवण मनापासून स्वीकारली असल्याकारणाने बहुतेक बुध्दविहार आणि मंदिरे तोडफोड न करता त्यावर दगड-माती रचण्यात आली.

त्यापुढे ८४ वेगवेगळ्या सुलतानानीं मालदीवच्या बेटांवर राज्य केले आणि ह्यामध्ये बऱ्याच स्त्री शासक सुद्धा आहेत.

4A2EABD7-C08A-485F-B3C7-10D3A4EC18C0.jpegबुद्धविहाराची झाली मशीद - लामू बेटावरील एक प्राचीन मशीद

राजा आणि सर्व प्रजेने बौद्ध धर्म टाकून इस्लाम स्वीकारला तरी मालदीव मध्ये धार्मिक वातावरण कट्टर नव्हते. उदा: १९४३ मध्ये पदच्युत झालेला शेवटचा सुलतान नुरुद्दीन दुसरा याची पदवी बघा - 'कुलसुद्धा सर्वरसासथुरा आयुध भवनाकीरथी महाराधून (कुलशुद्ध सर्व-शास्त्र सुरा आयुध भुवन कीर्ती महा राजन). हे इस्लाम स्वीकारल्याचे शेकडो वर्षानंतर !

मुळातच स्वच्छंदी- साधी सोपी माणसं इथं असल्यामुळे येथील धर्म आणि धार्मिक वातावरण बरेचसे मुक्त - भारतीय उपखंडातील सूफी मतासारखे - स्थानीय प्रथापरंपरांना सामावून घेणारे, इथल्या लोकांप्रमाणेच थोडे अघळपघळ होते.

धर्माचरण बरेच ऐच्छिक होते. समाजात स्त्रियांचे मानाचे स्थान आणि त्यांचा राजकारणात, अर्थार्जनात आणि एकूणच समाज जीवनात मुक्त आणि ठळक सहभाग, एकपत्नित्व, बुरखा पद्धतीचा अभाव, नृत्य-गायनादी कलांना असलेली प्रतिष्ठा असे थोडे वेगळे वातावरण इथे होते.

CE52A390-7952-45F6-9BE1-352BF8D3F54D.jpegबोडू-बेरू वर हाताची थाप पडली - नृत्यमग्न तरुणींचा समूह.

भारतातल्या केरळ भागातून येऊन वसलेल्या काही लोकांमुळे असेल पण बरीच कुटुंबे मातृसत्ताक पद्धतीचीही होती. त्या प्रभावामुळे अनेक बेटांवर स्थानिक सरकारच्या प्रमुखपदी स्त्रिया असणे आणि मालदीवच्या सर्वोच्च शासक 'सुलताना' असणे नवीन नव्हते. स्त्रियांनी प्रार्थनेसाठी मशिदीत जाणे अगदीच सामान्य बाब होती.

भुताखेतांवर विश्वास असलेले, पीर - मजार - चादर - नवस - दुआ - मिरवणुका - उरूस असे सगळे 'गैर-इस्लामी' आणि 'जाहिल' रीती-रिवाज पाळणारे लोक बहुसंख्य होते, पण त्यात भाबडेपणा जास्त होता. अगदी १००% मुस्लिमधर्मीय जनता असली तरी साधारण सार्वजनिक जीवन बऱ्यापैकी मोकळे-ढाकळे आणि पुढारलेले होते.

पण हे सगळे झपाट्याने बदलते आहे. गेल्या एक-दोन दशकातच सौदी अरेबिया आणि पाकिस्तानसमर्थित सलाफी-वहाबी जहाल मतांच्या प्रचारकांनी आणि मौलवींनी मालदीवला धार्मिक कट्टरतेकडे ढकलले आहे. त्याबद्दल पुढे.

थोडे अवांतर:

मागच्या भागाच्या शीर्षकामधे धिवेही भाषेत महिने, वर्षे आणि शतकं झालीत, मग आठवड्याचे सर्व दिवस नकोत?
हे घ्या -

आधीतथा - रविवार (त चा उच्चार हलन्त - आदित्य)
होमा - सोमवार (स' ला 'ह' म्हणायचं)
अंगारा - मंगळवार (अंगारकी आठवली, राईट ?)
बुधा - बुधवार (सोप्पं आहे हे)
बुरासफथी - गुरुवार (बृहस्पतीवार, बरोबर ?)
हुकुरू - शुक्रवार (तेच ते, 'स' ला 'ह' म्हणायचं)
होनीहिरू - शनिवार (हे जमलं हो आता)

क्रमश:
(मालिकेतील काही चित्रे / नकाशे जालावरून साभार)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ SharmilaR
@ कुमार१
@ रागीमुद्दे
@ वीरु
@ आबा.
@ देवकी
@ देवभुबाबा

प्रतिसाद म्हणजे लेखकाचे परिश्रमिक.
एकाधिक असतील तर पारितोषिकच Happy

आपणा सर्वांचे अनेक आभार.

@ समाधानी,

तुम्हाला लेखन आवडते आहे याचे समाधान वाटतेय Happy

छान

मला दोनच शब्द आठवतात

किरू - दूध ( क्षीर ?)

काळुसा - काळा चहा

@ BLACKCAT,

तुम्ही चहाप्रेमी असावात, योग्य तेच शब्द लक्षात ठेवले आहेत Happy