
पुणे - कुरवपूर सायकल यात्रा संपन्न झाली होती. २६ जानेवारी रोजी अतुलजी सुबंध आणि प्रफुल्ल जी डांगे अभिनंदन करण्यासाठी घरी आले होते. चहा पिताना मोरगाव निवास करण्यासारखी सायकल यात्रा करावी असं प्रफुल्लजींनी सुचवलं.
१२-१३ फेब्रुवारी चा विकेंड निवडला गेला. शनिवारी अतुलजींचा हाफ डे ऑफिस. मग संध्याकाळी निघायचं, रात्री चा मुक्काम, सकाळी दर्शन घेऊन परतीची वाट धरायची अस ठरलं. या वेळी श्रेयस सिद्धपाठकी पण येणार होते. त्यांच्याबरोबर पहिल्यांदाच सायकल स्वारी होणार होती. प्रफुल्ल जींचा कोकण यात्रेचा अनुभव, अतुलजींचा पंढरपूर यात्रेचा अनुभव गाठीशी होता.
सगळं कीट तयारच होतं. एकच दिवसाची यात्रा असल्याने कीट पण हलकं झालेलं.
निवासाची सोय प्रफुल्लजी करणार होते. संध्याकाळी ४ वाजता निघायचं असं ठरलं. दिवे घाटाची चढण टाळण्यासाठी यवत मार्गे जावं असं मी सुचवलं. १० किलोमीटर लांबचा पल्ला पडणार होता. पण उन्हात घाटाची चढाई करावी लागणार नव्हती.
१३ फेब्रुवारी -
सकाळी सर्व कीट रिचेक केलं आणि बांधाबांध उरकली. दुपारी ३:४५ ला घरून निघालो आणि निरोप आला निघायला १५ मिनिटे उशीर होणार.
४:१५ ला प्रफुल्लजी आणि मी निघालो. थोड्याच वेळात अतुलजी आणि श्रेयस पण आले. हडपसर गाठलं आणि ट्रॅफिक जॅम सुरू झाला. हडपसर ओलांडायला ६:३० झाले.
पुढे यवत आलं. माझी एकादशी होती. आणि भूकेचा त्रास मला सहसा होत नाही. पण बाकिच्यांना होत होता. थोडासा अल्पोपहार झाला. रात्री पोहोचायला ११:३० होणार असं जाणवायला लागलं. प्रफुल्ल जींनी निवासस्थानी फोन करून कल्पना दिली.
केडगाव चौफुला आला. उजवीकडे वळण घेतलं आणि जेवणाची चौकशी केली. चौफुल्याला जेवण नव्हतं पण पुढं ढाबे आहेत असं सांगितलं. पुढचे ढाबे बंदच होते. उपाशीपोटी मोरगाव गाठावं लागतंय असं वाटायला लागलं. एक ढाबा उघडा होता. तिघांची सोय झाली. ढाब्यावर खिचडी नव्हती. खारे शेंगदाणे घेतले. जेवणं उरकली. फोटो सेशन झालं. पुढचा प्रवास सुरु झाला.
रात्रीची वेळ. रहदारी कमी. पण मोठ्या गाड्या वेगाने जात होत्या. रस्त्यावरील गावाशेजारी शेकोट्या पेटलेल्या. शेकोटीला बसलेले "चहा घेणार का?" असा आवाज द्यायचे. इच्छा खूप होती पण वेळेच बंधन होतं.
मोरगाव पोहोचायला १२:३० वाजले. श्री भक्तनिवास शोधून तिथल्या "गोट्याभाऊ"ला उठवलं. चावी घेतली. सायकल राईड ची १०० किलोमीटर पूर्ण व्हायला ३ किलोमीटर शिल्लक होते. परत हायवे गाठला. १०० पूर्ण केले.
मंदिरासमोर फोटोग्राफी झाली. आणि रूम गाठली. झोपायला २ वाजले. ४ वाजता परत उठायचं होतं.
१३ फेब्रुवारी -
पहाटे ४ ला उठून प्रफुल्लजींची झोपमोड केली. गोट्याभाऊला मेनगेटची चावी देऊन पाण्याचा बंब चालू करायला प्रफुल्लजींनी सांगितले. आन्हिकं उरकून ५:३० ला आम्ही दोघे मंदिरात गेलो. जास्त वर्दळ नव्हती. अतुलजी आणि श्रेयस येईपर्यंत मंदिरात वाट बघत बसलो. थोड्याच वेळात अष्टविनायक दर्शन यात्रेची गर्दी झाली. शांतता संपली होती. ते दोघेही आले. दर्शन घेऊन बाहेर येईपर्यंत सहस्त्ररश्मी डोकावू लागलेला.
चहा पोहे झाले. आता नारायणपूर करून घरी जायच ठरलं. सायकली जेजुरी - सासवड मार्गाला लागल्या.
सासवड जवळच आलेलं पण श्रेयस ला भूक लागली. वडा सॅंपल, वडा पाव झाला. पाणी भरून घेतलं.
पुढचा प्रवास सुरु झाला. ग्रॅज्युअल क्लाईंब, ऊन सतावत होतं. नारायणपूर गाठलं देवदर्शन झालं. उसाचा रस घेतला.
चांगवटेश्वर मंदिरात जायचं होतं. प्रफुल्लजींचा तोल ढळला. त्यांनी सायकल बरोबर जमीनीवर साष्टांग दंडवत घातलं. फोर्क, रीम डॅमेज झालं. नशीब बलवत्तर म्हणून काही दुखापत नव्हती झालेली. पुढं काय करायचं हा प्रश्न होता.
इंडो ॲथलेटिक्स सोसायटीच्या गजू भाऊंना आणि सायकल मित्र मनोज जगताप यांना फोन केले. मनोज यांच्या काकांचे घर जवळ होते.
तोपर्यंत पुऱदर सायकल क्लबचे शंतनू यांचा फोन आला. गजू भाऊ बरोबर कॉनकॉल वर होते. परिस्थिती थोडक्यात सांगितली.
चांगवटेश्वर मंदिरात शंतनूजी आले. पुरंदर सायकल क्लबच्या केतन भाऊंना फोन केला आणि प्रफुल्लजींना सायकलीबरोबर घेऊन गेले.
बाकीचे आम्ही संगमेश्वर मंदिराजवळ आलो. केतन जींच्या घरी सायकल ठेऊन तिघही मंदिरात आले. पुरंदर, सासवड चा इतिहास कळला.
मोहिनी मध्ये जेवण झालं. प्रफुल्ल जी बसने आणि आम्ही तिघे सायकलवर परत निघालो.
दिवेघाट ओलांडला.
एव्हाना श्रेयस आणि अतुलजींचा संयम संपत आलेला. दोघाना थकवा जाणवत होता. हळूहळू चालवत, छोटे टप्पे आणि मोठी विश्रांती करत येत होतो. सोबत हडपसरला ट्रॅफिक जॅम.
रात्री घरी पोचायला ८ वाजून गेले.
सलग दोन दिवस शतकी सायकलींग झाली होती.
पुरंदर सायकल क्लब, आणि विशेषतः केतन जी जगताप, सायकल एव्हरेस्टींगवीर शंतनूजी, इंडो ॲथलेटिक्स सोसायटीचे गजू भाऊ, आमचे सायकल मित्र मनोज जी जगताप यांचे आभार आणि धन्यवाद. यांच्या सहकार्यानेच ही यात्रा सुखरूप पणे पूर्ण झाली आहे.
विजयश्रीनंदन
चांगले वर्णन केले आहे.
चांगले वर्णन केले आहे. मित्रांना इतके जी जी का बरे? तब्येतीची काळजी घ्या खूप स्ट्रेन घेउ नका. अजून वर्णने लिहा.
अभिनंदन. छान वाटले वाचून.
अभिनंदन.
छान वाटले वाचून.
अभिनंदन
अभिनंदन