प्रतिशोध...!! (भाग-१)

Submitted by रूपाली विशे - पाटील on 3 February, 2022 - 01:42

प्रतिशोध..!! ( भाग-१)
__________________________________________

आजही तो दिवस मला सूर्यप्रकाशाएवढा लख्ख आठवतोय्. आठ वर्षाचे होते मी त्यावेळी...!!

खरं तर बालपणीच्या बऱ्याचश्या आठवणी ह्या आपल्याला आप्तजनांनी कौतुकाने सांगितलेल्या असतात , काही आठवणी ह्या अंधुक आठवतात; तर काही आपल्याला आठवतही नसतात; पण काही अश्या आठवणी असतात ज्या काळजात अगदी घट्ट रुतून बसतात, नकोश्या वाटत असूनही..!!.

एखादा लाकडाचा ओंडका नदीत बुडवावा आणि त्याने पुन्हा - पुन्हा वर तरंगत यावे; अगदी तसंच त्या आठवणी मनाच्या गहिऱ्या तळातून वर येत राहतात..!

जूनचा पहिला आठवडा असावा तो..!!. गावाबाहेरच्या बस थांब्यावर मी, आई आणि रजूआत्या बसची वाट पाहत उभ्या होतो.

अजूनही डोळ्यांसमोर तो सारा प्रसंग तरळतोय्. अगदी कालच घडून गेल्यासारखा...!

काळ्याकुट्ट मेघांनी आभाळ भरून आलेले... कधीही पाऊसधारा कोसळतील असा भारलेला आसंमत, वातावरणात गारवा पसरलेला...!!

" मधू, आता शहाण्यासारखं वागायच्ं बरं का...! आत्याकडे वेड्यासारखा हट्ट करायचा नाही...!" आईच्या डोळ्यांत आकाशातल्या ढगांनी गर्दी केलेली.

मी तिच्या डोळयांत पाहत नुसती मान डोलवली.

घरावर ओढवलेल्या बिकट परिस्थितीने मला अवेळी शहाणपण शिकवलं होतंच्..!!

" खूप अभ्यास करायचा ... पहिला नंबर सोडायचा नाही...!" आईच्या डोळ्यांतून पाऊस कोसळू लागला.

आई डोळ्यांच्या कडा पदराला पुसू लागल्यावर, मग मलाही रडू आवरेना.

" आक्का, मधू आता तुमचीच मुलगी, सांभाळा तिला..!"

" वहिनी, काळजी सोड तू, जशी माझी वैशू तशी मला मधू...!" रजूआत्या आईची समजूत घालत म्हणाली.

तसं रजूआत्या खरं तेच म्हणाली होती. तिने माझ्यात आणि वैशूत कधी चुकूनही दुजाभाव केला नव्हता.

" चला, लवकर बसून घ्या, एस्.टी सुटायची वेळ झाली; चला, आटपा लवकर.. लवकर...!"

कंडक्टरने आरोळी ठोकली , तशी मी आणि रजूआत्या लगबगीने एस्.टीत चढलो.

एस्.टी. सुटली. बाहेर पाऊस कोसळू लागला होता. तो अगदी तसाच कोसळू लागला; खिडकीबाहेर हात हलवित उभ्या असलेल्या आईच्या आणि खिडकीतून मागे वळून पाहत तिचा निरोप घेणाऱ्या माझ्या... आमच्या दोघींच्याही डोळ्यांतून... अगदी धुवाँधार..!!

कारखान्यात मशीनवर काम करत असताना अपघात घडला आणि बाबांच्या पदरात कायमचे अपंगत्व आणि परावलंबी जीवन आले.

दोन चाकांच्या सायकलवरून सकाळी कारखान्यात कामावर गेलेले माझे बाबा, दवाखान्यातून चार चाकांच्या अॅम्बलून्समधून घरी परतले.

__आणि त्या दिवसापासून अनपेक्षितपणे आम्हां तिघांच्या आयुष्याचे चक्र विरुद्ध दिशेने फिरू लागले. हसरे, जे आहे त्यात समाधानी असलेले आमचे 'घरकुल' काळ्याकुट्ट ढगांनी झाकोळल्या आभाळासारखे अंधारून आले.

बाबांच्या ह्या जीवघेण्या अपघातात दैवाने आईचं कपाळावरील कुंकू जरी शाबूत ठेवलं असलं , तरी तिचं उभं आयुष्य मात्र खाटेवर खितपत पडलेल्या बाबांच्या आयुष्याशी पूर्णपणे जखडून टाकलं.

दुर्दैव ... दुर्दैव..म्हणतात ते अजून काय वेगळं असतं का..??.

आपल्या भावाचे आणि त्याच्या कुटुंबीयांचे होणारे हाल, त्याची खालावत जाणारी आर्थिक परिस्थिती पाहून मला सांभाळण्याची जबाबदारी रजूआत्याने आपल्या शिरावर घेतली.

रजूआत्या सोबत मी तिच्या सासरी आले. आत्याचे सासरचे घर म्हणजे एक भला मोठा वाडा होता. स्वातंत्र्यपूर्व काळात त्या वाड्याने जहागीरदारीची गादी सांभाळली होती. आजही तो वाडा गतवैभवाच्या खूणा आपल्या अंगा- खाद्यांवर दिमाखात मिरवित होता.

देश स्वतंत्र झाल्यावर जहागीरदारी , संस्थाने यांना पूर्वीइतकी किंमत उरली नसली, तरी आत्याच्या सासरी जहागीरदारी सांभाळताना बक्षिस म्हणून मिळालेली जमीन मात्र अफाट होती आणि ती जमीन सांभाळण्याचे काम आत्यावर एकटीवर पडले होते, कारण पाच वर्षापूर्वी दुर्दैवाने आत्याचे पती शेखररावांचे अकस्मात निधन झालेले...!!

पतीच्या निधनाने खचून न जाता रजूआत्या वैशूसकट सगळ्या मालमत्तेचा व्यवस्थित सांभाळ करत होती. जहागीरदारांच्या संपत्तीची एकटी मालकीण असलेली माझी आत्या एक जहागिरदारीणच् होती.

__ पण जसं स्त्रीशिवाय घराला शोभा येत नाही हे जितकं खरं, तेवढेच पुरुषमाणसांशिवाय असलेला जहागीरदारांचा तो वाडा कधी - कधी अगदीच पोरका , बापुडवाणा भासत असे.

ते काही असलं तरी, मला आत्याचा वाडा खूप आवडला होता. हुंदडायला वाड्याच्या मागे - पुढे प्रशस्त अंगण होते. अंगणात बरीच फुलझाडे - फळझाडे होती. जुनाट वृक्ष होते. त्या वास्तूची , जागेची भव्यता पाहून माझ्या लहानग्या मनात आश्चर्याची लहर उठत असे.

माझ्या पुढच्या शिक्षणासाठी आत्याने माझं नाव तिच्या गावातल्या शाळेत घातलं. माझं पुढचं भवितव्य आता त्या वाड्याच्या छत्रछायेतच् घडणार होतं. .. हे आता नियतीने निश्चित केलेलं...!!

शाळा सुरु झाली. मी शाळेत , वाड्यात रमत चालले होते. शाळेतून घरी परतल्यावर वाड्यात, अंगणात भान हरपून मी एकटीच खेळत असे. वैशू माझ्यासोबत कधीच खेळत नव्हती. लहानपणापासूनच ती माझ्यापासून अंतर राखून होती, माझी .समवयस्क असूनही..!!

"खबडक्.. खबडक् घोडोबा...
घोड्यावर बसले लाडोबा...
लाडोबाचे लाड करतंय् कोण ...
आजोबा - आजी, मावश्या दोन...!!"

ओटीवर ठेवलेल्या खेळण्यातल्या शिसवाच्या लाकडी घोड्यावर बसून मी जोर- जोराने गाणे म्हणत होते.

__ अचानक माझ्या पाठीत जोरदार बुक्का बसला. मी कळवळले. बसलेल्या माराने माझा हात माझ्या हुळहुळत्या पाठी गेला.

मी रडण्यासाठी ' आ ' वासलाच् होता तेवढ्यात__

" लाड करायचे आत्याबाईने आणि कौतुक चाललंय् मावश्याबाईंचे.... भामटी कुठली... चल ऊठ इथून....!!" माझी वेणी खेचत समोर येत वैशू खेकसली.

माझ्या डोळ्यांतून भळभळ पाणी वाहू लागले.

" नाटकी, रडायचं नाटक करू नकोस आता आणि जर माझ्या आईजवळ तू माझी चुगली केलीस ना , तर याद राख ; तुझी सगळी पुस्तकं उचलून नदीत फेकून देईन मी... समजलीस्.??"

वैशूच्या धमकीने मी प्रचंड घाबरून गेले. वैशूच्या मोठ्या, करड्या रंगाच्या डोळ्यांची मला भयंकर भीती वाटू लागली.

माझं वाड्यात राहायला येणं वैशूला अजिबात आवडलं नव्हतं , हे तिच्या वागण्यावरून माझ्या लक्षात येऊ लागलं होतं.

पुढे- पुढे तर तिने माझा अक्षरशः छळ मांडायला सुरुवात केली. आत्यासमोर मात्र ती अगदी साळसूदपणे वागे , पण आत्याच्या पाठी मात्र मला सळो की पळो करून सोडी.

कधी - कधी वाटे की, आपल्याला होणारा त्रास आत्याला एकदाचा सांगून टाकावा, पण वैशूच्या भीतीने मला आत्याला सांगण्याची कधीच हिंमत झाली नाही.

तसं पाहायला गेले तर मी वैशूच्या घरी आश्रित होते. ती त्या घराची एकटी वारस होती. आत्याची जरी मी भाची असले तरी वैशू तिच्या पोटची पोर होती. वैशूने माझ्याविषयी काही खोट-नाटं सांगून आत्याकरवी मला जर परत आई - बाबांकडे पाठवलं तर ...??

कदाचित माझं शिक्षण बंद झालं असतं , माझ्या खाण्या-पिण्याची आबाळ झाली असती.. आत्याकडे मिळणाऱ्या साऱ्या सुख-सोयींपासून मी वंचित झाले असते... अश्या अनेक भीती माझ्या बालमनात पिंगा घालू लागत असत.

तसाही मनुष्य स्वभावतः स्वार्थी, सुखलोलुप , ऐश्वर्यलोलुप असतो; हे मी आता माझ्यावरून ठामपणे सांगू शकते. आत्याकडे मिळणाऱ्या सुख-सोयी मला त्या अजाणत्या वयातही गमवायच्या नव्हत्या. फिरून पुन्हा दरिद्री जीवनात मला जायचे नव्हते.

एकाच छपराखाली वैशू आणि मी वाढत होतो. जसं - जसं वय वाढत होतं , तसं - तसं वैशू माझा अधिकच तिरस्कार करू लागली. माझ्या बाबतीत तिचा आक्रस्ताळेपणा जास्तच वाढू लागला होता.

वैशूकडून पदोपदी होणारा , जिव्हारी लागणारा अपमान पचवायची आताशा मी सवय करून घेऊ लागले होते,
पण कधी-कधी नेहमीच्या होणाऱ्या अवमानाने मन इतकं उद्विग्न होत असे की, मनात येई, देवा रे ... असं दरिद्री करण्यापेक्षा तू रोज चाबकाचे फटके मारले असते तरी बरं झालं असतं..!!

कधी - कधी मन उचल खाई की , आईला पत्र लिहून आत्याच्या घरी बोलावून घ्यावे आणि इथून सरळ आपल्या घरी परतावे; परंतु दारिद्र्यातून येणारी अगतिकता, लाचारी मनुष्याला मिंधेपणाचा मुकूट बहाल करते.

__ आणि मिंधेपणाचा तो मुकूट डोक्यावर ठेवून मी वाड्यात सराईतपणे वावरायला शिकले होते. परिस्थितीने एवढं शहाणपण .. नव्हे. ...कोडगेपण मला अजाणत्या वयात नक्कीच शिकवलं होतं.

रजूआत्या जरी माझी आत्या होती, तिची माझ्यावर माया जरी होती; तरी वैशू मात्र माझ्याशी कधीच सलगी दाखवत नसे. नात्याने, रक्ताने मी तिची बहिण असूनसुद्धा...!!

जहागीरदारीचा रुबाब, तोरा दाखवताना माझं त्या वाड्यात आश्रित असणं, ती मला पदोपदी जाणवून देई. तिच्या धमन्यांतून जहागीरदारांचे रक्त वाहत होते. जहागीरदारी खालसा होऊन बरीच वर्षे लोटली असली तरी रुबाब तोच होता. ' सुंभ जळला तरी पीळ गेला नव्हता'.. हे वैशूच्या बाबतीत तंतोतत खरे होते.

आत्याच्या घरी मदतनीस म्हणून काम करणाऱ्या पार्वती मावशींच्या दृष्टीस माझ्यावर होणारा अन्याय पडत असे, पण त्याही माझ्यासारख्या त्या वाड्यात आश्रित होत्या.
पिढ्यान-पिढ्या मिंधेपणाचे ओझे उचलून वाड्यात चाकरी करीत होत्या. त्यांची जीभ कापली गेली होती .. तोंड शिवलं गेलं होतं ;. मिंधेपणाच्या ओझ्याखाली दबून..!!

तो दिवस आजही माझ्या लक्षात आहे. त्या दिवशी आमच्या दोघींच्याही वार्षिक परिक्षेचा निकाल लागला होता. मी सातवीत तर वैशू नववीत होती. वैशू अभ्यासात यथातथाच होती. ती नेहमीच काठावर पास होत असे.

मी वर्गात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. घरी आल्यावर अत्यानंदाने ही बातमी आत्याला कधी एकदा .सांगत्ये, असं मला झालं होतं. आई- बाबांनासुद्धा पत्र लिहून कळवायला हवं होतं, पण त्याआधी गुणपत्रक देवापुढे ठेवण्यासाठी म्हणून मी देवघरात गेले. देवापुढे गुणपत्रक ठेवतच होते, तेवढ्यात अचानक मागून येऊन वैशूने माझ्या हातून गुणपत्रक खेचून घेतले.

" पहिला नंबर आला का आमच्या नकटीचा..?? बघू.. बघू... किती गुण मिळाले ते...!! " गुणपत्रकावरून आपले डोळे गरागरा फिरवित ती म्हणू लागली.

" एक नंबरचे बिनडोक आहेत शाळेतले सगळे शिक्षक.. ह्या भामटीला पहिला नंबर देतात काय..!!" ती तिरसटपणाने हसू लागली.

" देवाला दाखवतेय् का हे गुणपत्रक..?? एक मिनिट थांब हं .. ते देवाकडेच पोहचते करते मी...!!" माझ्याकडे पाहत चमत्कारीक हसत, माझे गुणपत्रक ती पेटत्या समईपाशी नेऊ लागली.

माझे गुणपत्रक जाळून टाकायला वैशू मागे-पुढे पाहणार नाही, ह्या भीतीने मी जीव खाऊन तिचा विरोध करू लागले.

देवघरातल्या आवाजाने पार्वती मावशी धावत आत आल्या. त्यासुद्धा वैशूला समजावू लागल्या.

" ए पार्वती, तू मला शिकवू नकोस. नोकर माणसाने आपल्या औकातीत राहायचं.. समजलीस का..??" वैशू पार्वती मावशींवर उखडली.

__ नेमकं त्याचवेळेस आत्याने घरात पाऊल टाकलं आणि वैशूचे हे शब्द तिच्या कानावर आदळायला काळ - वेळ एकत्र आली.

मागचा-पुढचा कुठलाही विचार न करता आत्याने दोन सणसणीत थपडा वैशूच्या कानशिलात लगावल्या. वैशूच्या बोलण्याची तिला विलक्षण चीड आली. मी आणि पार्वती मावशी तिथे आहोत ह्याचे भान सुद्धा आत्याला राहिले नव्हते.

सगळ्यांसमोर घडलेल्या ह्या अनपेक्षित प्रसंगाने वैशू स्तंभित झाली. असं काही घडू शकेल अशी तिला जराही अपेक्षा नव्हती. तिच्या आसवांनी भरलेल्या डोळ्यात अंगार फुलला होता. त्या मोठ्या,करड्या , तपकिरी डोळ्यांत माझ्याबद्दल, पार्वती मावशीबद्दल आणि आपल्या आईबद्दल विलक्षण द्वेष, तिरस्कार दाटून आलेला...!!

मी भीत-भीतच तिच्याकडे नजर फिरवली. आम्हां दोघींची नजर एकमेकींवर पडली आणि जळत्या निखाऱ्यासारखी वैशूची नजर पाहून भीतीची विलक्षण शिरशिरी माझ्या अंगभर पसरली.

वैशूपासून चार हात पूर्वीपासून लांब राहणारी मी ... आता त्यापेक्षा अंतर दुपटीने वाढवून तिच्या पासून लांब - लांब पळू लागले.

कालचक्राची पावले झपाझप उचलली जात होती.

आम्ही दोघींनीही यौवनात पदार्पण केलं होतं. वाढत्या वयाबरोबर वैशू आणि माझ्यातलं अंतर गुणाकाराने वाढत चाललं होतं. तिला मी डोळ्यांसमोर ही नकोशी झाले होते. आत्यापुढे तिचं काही एक चालत नव्हते, नाहीतर तिने माझी वाड्यातून कधीच हकालपट्टी केली असती.

वैशूने पदवीपर्यंतचे शिक्षण कसंबसं पूर्ण केलं. तिच्या अहंकारी, आत्मकेंद्रीत स्वभावामुळे तिचे कुणाशी जास्त पटत नसे. तिच्या मित्र-मैत्रिणींचा गोतावळाही तसा कमीच होता.

वैशूने घराबाहेर पडून चार लोकांत राहून व्यवहार शिकावा असं आत्याला मनापासून वाटत होतं. तशी घरात पैश्यांची निकड कधीच नव्हती , पण बाहेरच्या जगात जाऊन तिने दुनियादारी शिकावी एवढीच आत्याची रास्त अपेक्षा होती. तिने वैशूला ' बाबापुता ' करून एका कंपनीत कामाला जाण्यास भाग पाडले.

वैशू आपल्या कामात रमत चालली होती. माझा तिच्याशी तसा संबंध कमीच येत होता.

__ आणि एके दिवशी भरदुपारी अचानक थकलेल्या, घामेजलेल्या चेहर्‍याने वैशू कामावरून घरी परतली.

क्रमशः

©रूपाली विशे - पाटील
rupalivishepatil@gmail.com
__________________________________________
( टिप - सदर कथा काल्पनिक असून कथेचा वास्तविक जीवनाशी कुणाचा काहीही संबंध नाही. कथेत साध्यर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. )

_________________ XXX________________

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

किती छान सुरुवात आहे. खरे तर मधुचे हाल वाचुन वाईट वाटले, देव असे जीवन अगदी शत्रुला सुद्धा न देवो. कथेच्या पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.

छान सुरुवात , प्रतिशोध आणि वाडा वाचून आधी भयकथा वाटली.
मधुसाठी वाईट वाटले, वैशूचा दुःस्वास कोणत्या थराला जाईल ?
पण दुनियादारी समजण्यासाठी प्रत्येकाने किमान दोन / तीन वर्ष तरी नातेवाईकांकडे शिक्षणासाठी राहावेच

रश्मीजी धन्यवाद , माझ्या कथेवरचा तुमचा प्रतिसाद मला नेहमीच आवडतो.
मनस्विता , मोहिनी, शर्मिलाजी , खूप धन्यवाद...!!
अज्ञान बालक, धन्यवाद...!!
मधुसाठी वाईट वाटले, वैशूचा दुःस्वास कोणत्या थराला जाईल ?>>> उद्या अंतिम भाग टाकते...!

खूप छान लेखन . उत्सुकता वाढवणारी कथा . पण लगेच अंतिम भाग ? गोष्ट अजून मोठी असायला हवी .

धन्यवाद जाई, योगी, मामी, साधा माणूस, बिपिनजी, दिपक...!!

बिपिनजी - तीन भागांची लिहिलीयं कथा.. वेळेअभावी जास्त लिहायला जमत नाही..!