निर्णय

Submitted by SharmilaR on 11 January, 2022 - 06:17

निर्णय

“आई, आज मी जरा बाहेर जाऊन येऊ का? चालेल नं?” विशाखाने सकाळचे चहाचे कप आवरता आवरता विचारलं.

“अगं, जा नं. मी तर म्हणतेय, तू आता तुझ्या घरी पण जायला हरकत नाही. किती दिवस रहाणार अशी इथे..” आई म्हणाली.

“घरी जाण्याचं नंतर बघेन. आज जरा थोडी बाकीची कामं करायची आहेत. येतांना पूजाकडे पण जाणार आहे. जेवायला थांबू नकोस. मी येईन सावकाश.”

“बरं. पण का गं, मंदार आला नाही एवढ्यात? माझंही लक्ष नव्हतं.” आईने काळजीने विचारलं.

“आला होता तो. तू झोपली होतीस.” पुढचे प्रश्न टाळण्याकरिता विशाखा पटकन बाथरूम कडे वळली.

मंदार फक्त एकदाच आला होता इथे. बाबा गेले त्या दिवशी. त्यालाही आता महिना होऊन गेला होता. मध्ये दोनदा त्याचे आईवडील येऊन गेलेत, आईला अन् तिला भेटायला म्हणून. घरात तेव्हा बरीच लोकं होती ते बरंच होतं. तिला त्यांच्याशी फार बोलायला लागलं नाही.
बाबांचे सगळे दिवस वगैरे करून झाल्यावर जातांना दादाने तिला विचारलं होतं, ती इथे किती दिवस राहणार आहे ते. ‘सध्या तरी आहे. तू नको काळजी करूस आईची.’ असं मोघम उत्तर दिलं होतं तिने त्याला. काय सांगणार होती, तिचं काहीच ठरलं नव्हतं तर.

पण आता काहीतरी नक्की ठरवायला हवं होतं. त्याकरिता आधी तिला नोकरी शोधायला लागणार होती. म्हणजे मग पुढचं सगळं सोपं होईल. बरं झालं, सगळी सर्टिफिकेट्स वगैरे इथेच होती ते. इतक्या वर्षात नेण्याची कधी गरजच वाटली नव्हती नं. खरं तर डोक्यात बरेचदा आलं होतं नोकरी करण्याचं, पण दरवळेही सासुबाईंनी मोडता घातला, कधी नुसतच बोलून, तर कधी चिडून. म्हणायच्या ‘चांगली घडी बसलिय संसाराची. उगाच कशाला बदल? आमचं जे आहे ते आता तुमचंच आहे नं?’ मग तीही गप्प बसायची. मुळात त्यांना ती स्वतंत्र व्हायला नकोच होती कधी.

तीचं ग्रॅजुएशन होईपर्यंत घरच्यांनी वाट बघितली, आणि नंतर लगेच तिच्याकरिता स्थळ शोधायला सुरवात केली होती. तरी बरं, स्थळ मिळेपर्यंत वेळ घालवायला म्हणून तिने एक अर्धवेळ नोकरी धरली होती आणि उरलेल्या वेळात कॉम्प्युटर चा कोर्स करून टाकला होता. आता येईल तो कामात. कुठेतरी अकाऊंटसला, डेटा एंट्री ऑपरेटर, नाही तर शाळेमध्ये कॉम्प्युटर टीचर म्हणून पण जॉब मिळू शकेल.

मंदारचं स्थळ आलं तेव्हा घरचे सगळेच खुश झाले होते. अगदी गावातलंच स्थळ, एकुलता एक मुलगा. वडील एका मोठ्या कंपनीतून चांगल्या पदावरून निवृत्त झाले होते. मंदारचा जॉब पण त्याच कंपनीत होता. वडिलांचा बंगला, गाडी. लग्नाच्या अपेक्षेत जे लागतं, ते सर्व होतं. शिवाय मंदार दिसायला तिच्यापेक्षा खूपच उजवा होता. नकार आला असता तर तो त्यांच्याकडूनच असं वाटत होतं. पण त्यांचा होकार आला आणि ठरलं विशाखाचं मंदारशी लग्न.

लग्न ठरल्यानंतर ते होईपर्यंत सहा महिन्यात, ती दोघं अधून मधून भेटत होती. आपल्याला त्यानं पसंत केलं, ह्याच धन्यतेत विशाखाचे ते दिवस सरले. म्हणजे विशाखात काही कमतरता होती असं नाही, ती होती आपली चार चौघी सारखी. पण तो जास्त हॅंडसम होता. तसं त्याचं गप्प गप्प राहणं खटकायचं कधीतरी तिला, पण आहे तो अबोल, असं वाटून मग ती काही ते फार खटकून घ्यायची नाही. मुळात ती उत्साही होती. त्यामुळे मैत्रिणी, नवीन संसाराची स्वप्न.. हयात ती छानच रमली होती.

लग्न झाल्यानंतरही चार सहा महीने छानच गेले. नवीनच होतं सगळं, तरी एक-एक करत तिने संसाराची सगळीच कामं मागे लावून घेतली होती. शिवाय गावातच माहेर, मैत्रिणी, सासरच्यांच्या ओळखीचे पण सगळे इथलेच. नोकरीची खास आवड नव्हतीच तिला, आणि पूर्ण वेळ छान संसार सांभाळायचा म्हणून तिने ती सोडलीच होती, तरी तिचा वेळ छान जात होता. पण मंदारच जास्तच अबोल असणं, कशातच भाग नं घेणं आता थोडं जाणवायला लागलं होतं.

तो नुसताच अबोल नव्हता, तर कायमच निरुत्साही असायचा. कंपनीतून आल्यावर जेमतेम पेपर वाचणं, मग थोडा टीव्ही.. की दिवस संपून जायचा. ‘तो मला कधीच वेळ देत नाही.’ वगैरे पद्धतीच्या तक्रारी तिला खूप पोरकट आणि फिल्मी वाटायच्या पूर्वीपासूनच. पण अगदी थोडंही हिंडा-फिरायचा त्याला अजिबातच उत्साह नसायचा. कायम उदास बसलेला असायचा. असतील त्याला बाहेर खूप कामं, असं वाटून विशाखा स्वत:च समाधान करून घ्यायची. शिवाय त्याचे आई बाबा होतेच सतत त्याला सावरून घ्यायला. त्याला घेऊन कधी माहेरी किंवा गावातच कुठल्या कार्यक्रमाला ती गेलीच, तर त्याचं कशात भाग नं घेणं, कुणात नं मिसळणं ती सांभाळून घ्यायची.

पण इतर लोकांकडे बघितलं, की मंदारचं वागणं नॉर्मल नाही, हे जाणवायला लागलं होतं. मग ती जरा जास्तच जाणीवपूर्वक त्याला समजून घ्यायचा प्रयत्न करायला लागली. एकदा असच त्याच्या थोड्या बोलण्यातून तिला कळलं, त्याला कुणी दुसरीच मुलगी आवडत होती. पण नाही जमल ते. त्याचंही तिला विशेष काही वाटलं नाही. म्हणजे आवडू शकतं नं कुणी. ठीक आहे. तरुण वयात होतंच असं. मग ती जरा आणखी जास्त प्रयत्न करायला लागली त्याच्या जवळ जाण्याचे, त्याला समजून घेण्याचे, त्याने आपल्याला आवडून घेण्याचे. पण हळू हळू त्याच्या तक्रारींचा सुर वाढायलाच लागला. आयुष्यात काहीच मनासारखं नाही मिळालं म्हणे!

दिवस जायला लागले, तसे तिच्या सासूबाईंना नातवंडांचे वेध लागले. निर्मितीची जबाबदारी अर्थातच बाईची. आई असो की सासू, विचारणार, सांगणार बाईलाच. त्यांच्या आग्रहाने तिच्या डॉक्टरांकडे खेपा सुरू झाल्या...

बेल च्या आवाजाने ती भानावर आली. कामवाल्या मावशी आल्या वाटतं. तिने चटकन आंघोळ आटपली. भराभर आवरून ती निघाली. आधी जिथे काम करत होती, तिथे अर्ज देऊन ठेवला. गेल्या आठवडाभरात तिने ‘पाहिजेत’ च्या जाहिराती बघून ठेवल्या होत्या. तिथे अर्ज दिले. शिवाय दोन तीन शाळांमध्ये पण बायोडेटा अन् अर्ज देऊन ठेवले. सध्या तर कुठेही सुरवात झाली तरी चालणार होतं.

पूजाकडे ती पोचली तेव्हा पूजा घरीच होती. पूजाचा नवरा सकाळीच कंपनीत जायचा अन मुलगा शाळेला गेला होता. पूजाकडे ती नेहमी ह्याच वेळेला जायची. दोघींना निवांतपणे गप्पा मारता यायच्या. पूजा अगदी शाळेपासूनची जिवाभावाची मैत्रीण. विशाखाच्या वर्षभर आधी तिचं लग्न झालं होतं. गावातच होती, त्यामुळे जाणं येणं टिकून होतं. पण गेल्या काही महिन्यात बाबांच्या आजारपणामुळे निवांत गप्पा झाल्या नव्हत्या.

“पूजा, मी कायमचं आईकडे रहायचं ठरवलय.” विशाखाने कॉफी चे दोन घोट घेतल्यावर सांगीतलं.

“आणि काय करणार आहेस पुढे? डॉक्टर काय म्हणताहेत?” पूजा जवळ ती नेहमी मन मोकळं करत असल्यामुळे तिला बऱ्याच गोष्टींची कल्पना होती.

“आत्ता, आधी तर मी नोकरी शोधतेय. आज खास त्याकरिताच आले मी तुझ्याकडे. तुझ्या नवऱ्याच्या कंपनीत पण बायोडेटा देऊन ठेवशील का? कदाचित ओळखीनं लवकर मिळेल जॉब.”

“ते करते मी. आणि संजूला सांगते पण, चार लोकांकडे शब्द टाकायला. तो सहज मॅनेज करेल तुझ्या जॉबचं. पण मला सांग आता आणखीन काय झालं?”

“नवीन वेगळं काहीच नाही गं. मलाच वेळ मिळाला महिनाभर, शांतपणे विचार करायला. अगदी थंड डोक्याने विचार करून मी हा निर्णय घेतलाय. तुला सांगू? नाही मला मूल झालं, ते योग्यच झालं. नाही तर मुलाकरिता म्हणून उगाच अडकून पडायला झालं असतं.”

“हं..”

“तुला माहीतच आहे, तो तयार नव्हताच नेहमीप्रमाणे डॉक्टरकडे यायला. मलाच मागे लागायला लागलं खूप. आमच्या सगळ्या टेस्ट झाल्या, आणि कुठेच काही प्रॉब्लेम नव्हता.”

“हो. तू बोलली होतीस मला. ”

“डॉक्टरानी मग मंदारशी बोलून त्याला मानसोपचार तज्ञा कडे जायला सांगितलं होतं. तुला माहीत आहे, मी जेव्हा आईंना हे सांगितलं न, तेव्हा त्यांना अजिबातच धक्का वगैरे बसला नव्हता. जसं त्यांना ते माहीतच होतं. मंदारच्या आई बाबानीच सुचवलं कुणाकडे जायचं ते. मला त्या म्हणाल्या, की लहानपणी त्याला जरा प्रॉब्लेम आला, तेव्हा त्यांच्याकडेच नेलं होतं.

मला खूप उशिरा लक्षात आलं, कदाचित त्याला पूर्वीपासून ट्रीटमेंट चालू होती. मग त्यांना वाटलं असेल लग्ना मुळे फरक पडेल. मध्ये मेडिसीन्स बंद होती.

“तू बोललीस का डॉक्टरांशी? ”

“ते म्हणताहेत क्रोनिक डिप्रेशन आहे. औषध कायम घ्यावी लागतील.”

“पण बरा होईल नं तो? तू विचार केलाय का नीट?”

“कदाचित होईल, कदाचित नाही पण. पण हा आजार असा बरा होणारा नसतो गं. मला सतत त्याला सांभाळून घेण्याचा खूपच ताण येतो गं. कंपनीत त्याच्या बाबांनीच त्याला लावून घेतलं होतं. तिथे त्याला मिडल लेव्हल ची पोस्ट आहे. त्याला तिथे खूप जबाबदारीची कामं नाही देत, सांभाळून घेतात.

आणि तुलाही माहीत आहे, निव्वळ नवरा आजारी पडला म्हणून घर सोडणाऱ्यातली मी नाही. माझ्या आयुष्यातली सहा वर्ष दिलीत मी इथे. कित्ती दिवस एकटीने विचारात घालवले, किती रडण्यात घालवले. रोजच आयुष्य जगण्यातच माझी सगळी शक्ति खर्च होतेय गं. एकेकदा झोपेतून उठायला पण नको वाटतं. मला मीच मंदार बनतेय की काय ह्याची भीती वाटते.”

“माहीत आहे गं मला.” पूजाने तिला थोपटलं.

“कितीदा वाटलं, घर सोडून निघून जावं. पण माहेरी जायची हिम्मत नव्हती. मग इथे यायचे मी. माझ्या बाबांच्या तब्येतीकडे बघून गप्प बसावं लागत होतं. त्यांना नसता हा धक्का सहन झाला. आता मी आईकडे राहू शकते. आई खंबीर आहे, सांगितलं सगळं तर ती समजून घेईल मला.”

“हो गं..”

“ आयुष्याबद्दल माझ्या खूप अपेक्षा कधीच नव्हत्या गं. अगदी चार चौघी सारखं सामान्य आयुष्य हवं होतं मला. आणि पूजा, मी तिथे राहिलेही असते गं, मंदारचा एक जरी प्रेमाचा शब्द मला मिळाला असता तरी. पण एवढ्या वर्षात एकदाही तो माझ्याशी प्रेमाने बोलला नाही. जे काय बोलायचं ते फक्त त्याचं दुःख, त्याची आयुष्याबद्दल तक्रार ह्याच स्वरूपात. किती समजून घ्यायचं मी?

आणि त्याचे आई-बाबा आधी खूप प्रेमळ वाटायचे, पण नंतर माझ्याकडून त्यांच्या अपेक्षा वाढतच चालल्या. आता त्या दोघांच वागणं, मंदारच्या अशा वागण्याला मीच कारण असल्यासारखं असतं. ती दोघं त्याला खूप जपतात आणि मी पण आयुष्यभर तेच करत राहावं ही अपेक्षा.

त्या घरात मी राहायचं, तर फक्त मुकाट्याने काम करणारी एक कामवाली म्हणून. आणि मंदारची केअरटेकर बनून राहायचं. कधी तरी त्याचे दोन कौतुकाचे, प्रेमाचे शब्द हवे होते. आणि माझ्याकडून मी खूप प्रयत्न केलेस गं.
असं वाटायचं, आपण आपल्या प्रेमाने त्याला बरं करू. चार-चौघांसारखा आयुष्य जगू. पण नाही. कदाचित मेडिसीन्सने थोडा फरक पडेल, नाही असं नाही. पण त्याला मनातून तर वाटायला हवं नं, हयातून बाहेर पडावं असं?

डॉक्टर म्हणाले, क्रॉनिक डिप्रेशनच्या केसेस पूर्ण बऱ्या होतातच असं नाही. औषध तर आयुष्यभर घ्यावीच लागतील. तुला माहिती आहे, पूर्वी तो ऑफिस मधून यायच्या वेळेला मी छान तयार व्हायचे. आता त्याची यायची वेळ झाली, की माझ्यावर पूर्ण उदासी पसरते गं.” विशाखा घळघळा रडायला लागली.

“नको काळजी करूस. आम्ही आहोत नं?” पूजा म्हणाली.

पूजाच्याही डोळ्यात पाणी आलं. इतके दिवस ती बघतच होती विशाखाचं सहन करणं. पूजाने खूप आग्रह केला म्हणून विशाखा मंदारला घेऊन आली होती इथे दोन चार वेळेला. पण मंदार नुसताच बसून असायचा कशातच इंट्रेस्ट नसल्यासारखा. पूजा-संजू ने त्या दोघांना बाहेर नाटक सिनेमा करता पण विचारलं, मंदारच वागणं बघता दर वेळी मग विशाखाच काही कारण सांगून टाळायची. पण खरं कारण त्या दोघींनाही माहीत होतं.

“आणि आता मी त्या घरातून बाहेर पडले ना पूजा, तर या संधीचा मी आत्ताच फायदा करून घेऊ शकते. एकदा गेले ना मी तिथे, की परत तिथे अडकून बसेन. परत माझी बाहेर पडायची हिंमत नाही होणार. माझा सामान्य आयुष्य जगण्याचा हक्कही तिथे नाकारल्या गेलाय गं. सतत त्याची काळजी आणि त्याचेच विचार करायचे.
पुढे काय करणार मी, मला माहीत नाही, पण निदान मला माझी मन:शांती तर मिळेल. काढली एवढी वर्ष, हे खूप झालं. का म्हणून मी माझं आयुष्य फक्त ह्या तिघांची सेवा करण्यात घालवायचं? आतापर्यंत प्रेम नाही मिळालं.. कुठल्या आशेवर आणि किती वर्षे मी पुढे प्रेम मिळेल ह्याची वाट बघू?
अजुन मी तिशीच्या आत आहे. नोकरी मिळवण्याचा, करण्याचा कॉन्फिडन्स आहे. तो गेल्यावर काय? खूप पैसे नाही मिळणार मला कदाचित आत्ता. पण निदान नवीन आयुष्याची सुरुवात तर करू शकते मी.
आत्ता मदतीला आई आहे. अजुन मी दादा-वहिनीला सांगितलं नाही. थोडं माझं बस्तान बसलं की त्यांना पण सांगेनच. सगळ्यांना थोडा धक्का बसेल, पण मला खात्री आहे त्यांचाही मला पाठिंबाच राहील.
इतकी वर्ष सगळं ठीक होईल अशी एक आशा होती. शिवाय बाबांची तब्येत. नको वाटत होतं त्यांना आणखी त्रास द्यायला. केवढ्या हौसेने आणि उमेदीने त्यांनी माझं लग्न केलं होतं. आईवर पण बाबांच्या आजारपणाचा खूप ताण होता. पण आता ती मोकळी झाली आहे. आम्हा दोघींना एकमेकींचा आधार आहे.
मला आता असह्य झालय गं असं आयुष्य काढणं. आत्ता निर्णय घेतला मी, तर तो आत्ताच शक्य आहे निभावणं. आणि माझा निर्णय पक्का झालाय. मी आता घराबाहेर पडलेय..परत नं जाण्यासाठी.”
आता डोळे पुसून बोलणाऱ्या विशाखाच्या चेहऱ्यावर, तिचा निर्णय पक्का झाल्याचं तेज दिसत होतं .

*******************

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

कथा आवडली आणि पटली सुद्धा..
एकमेकांबद्दल प्रेम आणि वाटणारी ओढ हा पाया असतो संसाराचा. तेच नसेल तर बाकी डोलारा पोकळच राहतो...

कथा आवडली.
नायिका समतोल विचार करून निर्णय घेते आहे.

माझ्या मते मंदारला मानसोपचारा संदर्भात, योग्य व पुरेशी मदत मिळत नाहीये. किंवा दिलेल्या औष धांच्या प्रमाणात किंवा सातत्यात तसेच एका विशिष्ठ वेळी औषधे घेउन, त्या वेळा सांभाळण्यासंदर्भात, तो हयगय करतो आहे. त्याला उपचार हवेत. तो बदलू शकतो - १००% ही व्याधी मॅनेज करु शकतो.
बाकी नवर्‍याला साथ द्यायची की वेगळा रस्ता पकडायचा हा विशाखाचा निर्णय असणार आहे. न जाणो तिला चांगला जोडीदार मिळेलही - किंवा ती स्वतंत्र व खंबीर राहीलही. उद्या ती एखाद्या व्याधीची शिकार झाली असती तर तिने नवर्‍याकडुन काय अपेक्षा ठेवल्या असत्या? विवाहोपरान्त आपण जोडिदारावरती १००% दबाव घालू शकतो - भल्याकरता अथवा बुर्‍याकरता. तसा बदल जर दुसर्‍यात घडवता येत नसेल तर मन मारुन, किंवा सतत लढत रहाण्यात अर्थ नाही हेही खरे आहे.

छान कथा. मन सुद्ध तुझे मध्ये अशा माण सा वर एक एपिसो ड आहे जरुर बघा. त्यात त्या आजाराचे नाव दिले आहे. व त्यातली बायको पन
फारच क्युट व उत्साही आहे.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद एस, सामो, x man, वावे, आबा, अमा.

एकमेकांबद्दल प्रेम आणि वाटणारी ओढ हा पाया असतो संसाराचा. तेच नसेल तर बाकी डोलारा पोकळच राहतो...>> अगदी खरं आहे धनवन्ती.

सामो, मला वाटत मानसोपचाराचे सगळेच आजार बरे होतात असे नाही. त्यापैकी काही म्हणजे सीझोफ्रेनिया, क्रोनिक डिप्रेशन. ह्या आजारांमध्ये कधी कधी तात्पुरता औषधांचा चांगला परिणाम होतो पण काही वर्षांनी परत ते उभे रहातातच. (अर्थात हे माझे, माझ्या अनुभवातून झालेले मत आहे). आणि ह्या आजारांमध्ये पेशंट पेक्षा त्याच्या बरोबर रहाणाऱ्यांचा कस लागतो. आत्तपर्यंतच्या पिढ्यांमद्धे बायका सगळं सहन करत रहायच्या, त्यातही आर्थिक दृष्ट्‍या परावलंबी असणं, हे मुख्य कारण असायचं.
मला स्वत:ला, आताची जी साधारण तिशीच्या पुढची मागची जी पिढी आहे, त्यांचा दृष्टिकोन जास्त पटतो. तो म्हणजे ‘प्रत्येकाला शांत आणि सुखी आयुष्य जगण्याचा हक्क आहे.’ म्हणूनच माझी नायिका विशाखा घराबाहेर पडण्याचा निर्णय घेते.
अर्थात ही फक्त कथा आहे. प्रत्यक्षात आणखी काही वेगळं होऊ शकत.

कथा आवडली.
मंदारच्या आईवडिलांना सगळं माहीत असूनही लग्न लावून दिले ही विशाखाची फसवणूक झाली. त्यामुळे विशाखाचा निर्णय योग्य वाटतो.
अशी एककेस माहीत आहे. त्यामुळेच का होईना विशाखाबद्दल सहानुभूती वाटली

सामो, मला वाटत मानसोपचाराचे सगळेच आजार बरे होतात असे नाही. त्यापैकी काही म्हणजे सीझोफ्रेनिया, क्रोनिक डिप्रेशन. ह्या आजारांमध्ये कधी कधी तात्पुरता औषधांचा चांगला परिणाम होतो पण काही वर्षांनी परत ते उभे रहातातच. (अर्थात हे माझे, माझ्या अनुभवातून झालेले मत आहे). आणि ह्या आजारांमध्ये पेशंट पेक्षा त्याच्या बरोबर रहाणाऱ्यांचा कस लागतो. आत्तपर्यंतच्या पिढ्यांमद्धे बायका सगळं सहन करत रहायच्या, त्यातही आर्थिक दृष्ट्‍या परावलंबी असणं, हे मुख्य कारण असायचं.
मला स्वत:ला, आताची जी साधारण तिशीच्या पुढची मागची जी पिढी आहे, त्यांचा दृष्टिकोन जास्त पटतो. तो म्हणजे ‘प्रत्येकाला शांत आणि सुखी आयुष्य जगण्याचा हक्क आहे.’ >> प्रतिसाद ऑफ द इअर. हा पिन करून ठेवा. हे समजावून सांगायलाच मी दाताच्या कण्या करत असते. सहन करणॅ इज नॉट द करेक्ट चॉइस.

करेक्ट सहन करण्याचा अट्टाहास नकोच. झेपत असेल तरच रहावं. आपल्याला काय परवडतं - हे जितकं खरं आहे तितकच काहीजण नेटाने व्यक्तीला सपोर्ट करुन दोघेही सुखी सहजीवन जगतात हेही खरेच आहे. ;फरफट करुन घेणे' शहाणपणाचे नाहीच. विशाखाकरताही तसेच मंदारकरताही हो. विशाखाने भीक घातल्यासारखा सपोर्ट देउच नये मंदारला.

बाकी बरं होत नाही यात तुम्ही काही नवीन सांगत नाही आहात. काही व्याधी या डिसॉर्डर्स असतात. त्या सो कॉल्ड 'बर्‍या' नाहीच होत. पण त्या १००% मॅनेज होतात. पुन्हा काही वर्षांनी जर काही ट्रिगर्समुळे, ती व्याधी उद्भवली तरी परत ती मॅनेज करता येतेच.
यामध्ये विशाखाला लग्नापूर्वी कल्पना न देणे हा गुन्हा आहे.
शिवाय तिला जर नवीन कोरे आयुष्य हवे असेल तर खरे आहे तिलाच खंबीरपणे उभे रहावे लागेल.

छान कथा!
अनेक मानसिक आणि शारीरिक व्याधींबाबत आयुष्यभर औषधे घेवून मॅनेज करणे हाच उपाय असतो. मात्र भावी जोडीदाराला याची पूर्ण कल्पना देवून त्याने आयुष्यभर साथ द्यायचा समजुन-उमजून निर्णय घेणे वेगळे किंवा लग्नानंतर काही कारणाने व्याधी उद्भवल्यावर प्रेम आहे, जीव गुंतलाय म्हणून जोडीदराला साथ देणे वेगळे. इथे विशाखाची फसवणूक आहेच आणि तसेही ते नाते जोडीदाराकडून प्रेमाचा अभाव, म्हणजे पोकळ आहे. मानसिक व्याधी नसती तरी अशा पोकळ नात्यातून बाहेर पडणेच श्रेयस्कर.

>>>>>>>>>>>तसेही ते नाते जोडीदाराकडून प्रेमाचा अभाव, म्हणजे पोकळ आहे. मानसिक व्याधी नसती तरी अशा पोकळ नात्यातून बाहेर पडणेच श्रेयस्कर.
पोकळपणा हा प्रेमाचा अभाव आहे की आजाराचे लक्षण आहे ते मॅरेज काउन्सिलिंगने कळू शकेल. कारण हे जे सततचे असमाधान आहे, वैफल्य/शैथिल्य आहे ते आजाराचा परिपाक असावे.
बाकी त्यांनी मॅरेज काउन्सिलिंग ला जावे की विभक्त व्हावे याबाबत काहीच आग्रह नाही. परवडेल ते करावे.

छान कथा आहे. आवडली.

यातला निर्णय सिंपल आहे. तिला याबाबत लग्नाआधी कल्पना नव्हती. तिचे त्याच्यात मन गुंतले नव्हते. ईतकेच काय त्याचेही हिच्यात मन गुंतले नव्हते. त्यामुळे जे केले ते योग्यच असेच सर्व वाचकांना वाटणार.

कहाणीत मजा तर तेव्हा आली असती जेव्हा दोघांनी प्रेमाच्या आणाभाका घेऊन लग्न केले असते. त्यानंतर हा आजार उद्भवला असता वा समोर आला असता. ज्यात तिची फसवणूक त्याने नाही तर नशीबाने केली असती. आणि त्यानंतर जेव्हा तिने आता नाही सहन होत म्हणत वेगळे व्हायचे ठरवले असते आणि त्याने आपल्या प्रेमाचा वास्ता देऊन तिला थांबायची विनंती केली असती.

अर्थात कथेतील केस जरी जेव्हा प्रत्यक्ष आयुष्यात घडते तेव्हा असे लग्नानंतर नवऱ्याला आजारी आहे म्हणून सोडतात का म्हणून त्या बाईला दोष देणारा समाज आहेच आसपास. तिला लग्नाआधी हे माहीत नव्हते वगैरे डिटेल्सचा विचार करून तार्किकदृष्ट्या तिच्या निर्णयाचे विश्लेषण करायचा पेशन्स समाजाकडे नसतो. ते झटकन जज करून मोकळे होतात.

घटस्फोट हा आपल्याकडे फार मोठा गॉसिपचा विषय आहे. त्यात कोणा एकाची वा दोघांची चूक लोकांना शोधायला आवडतेच. परीस्थितीचा दोष वा सिंपली दोघांनी आपसात ट्युनिंग जमत नाही यावरून वेगळे झालेले कोणाला समजूनच घ्यायचे नसते. त्यातही सेलिब्रेटी असतील तर सॉफ्ट टारगेट. अरे हे लोकं तर असेच असतात. आज ह्याच्या/हिच्या बरोबर तर उद्या त्याच्या/तिच्या बरोबर...

सॉलिड प्रतिसाद आहे ऋन्मेष. विविध अंगानी विचार करुन लिहीलेला. सेलेब्रिटीजचा मुद्दा प्रचंड खरा आहे. सेलिब्रीटी असण्याची फ्लिप साईड ही आहे की - कोणीही ताशेरे मारावे, थुंकुन पुढे जावे.
एखादी सेलिब्रिटी ही अगदी जवळून दिसल्याने 'अ‍ॅक्सेसिबल' वाटते लोकांना.
हेच ऑफिसातही होते. शेजारी शेजारी बसले असता, नाक खुपसण्यात, पर्सनल प्रश्न विचारण्यात लोकांना काहीही वाटत नाही. का तर जवळ दिसणारी व्यक्ती वी पीपल टेक फॉर ग्रांटेड. 'अ‍ॅक्सेसिबल' वाटते. पण ती व्यक्ती माफक खाजगी गरज असलेली असू शकते. तुमच्या शेजारी बसण्याचा चॉइस तिचा नसतो.