माई

Submitted by द्वैत on 8 January, 2022 - 23:33

माई

ती शिकवून गेली दुःख कसे सोसावे
दैवाशी झुंजत खडकातून उगवावे
कोण्या निराधार पक्षाचे घरटे व्हावे
डोळ्यांतील अश्रू लपवून गोड हसावे

ती शिकवून गेली माणूसकीची शाळा
जो खरा अर्थ जगण्याचा तिला कळाला
ती माय अनाथांची झाली प्रेमाने
गुंफून वाहिलेल्या पुष्पांच्या माळा

ती शिकवून गेली प्रेमाची परिभाषा
मायेची असते तळहातावर रेषा
चितेची धगही देते ऊब जीवाला
तू ठेव अंतरी जीवनवेडी आशा

द्वैत

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर ! खूप आवडतं तुमचं लेखन..
तुम्ही जरी स्वतःला द्वैत म्हणत असलात...
तरी तुमच्या कविता मात्र अद्वैताकडे धाव घेणाऱ्या आहेत !
Happy