स्मृतिशेष कथा

Submitted by सतीशगजाननकुलकर्णी on 24 December, 2021 - 06:08

स्मृतीशेष

चार तासांच्या प्रवासानंतर आण्णा सावंत आनंदपुरला पोचले. इतका दूरचा प्रवास करण्याची त्यांना आता सवय राहिली नव्हती. प्रवासामुळे त्यांचे शरीर आंबलेले होते. पण ते आंनदपुरला पोचले आणि त्यांचा सारा शीण नाहीसा झाला. कितीतरी वर्षात त्यांना या गावात येता आले नव्हते. कधीतरी कारण परत्वे एखादी चक्कर होई तेवढेच. कितीदा तरी त्यांना वाटायचे आपल्या गावात जाऊन भरपूर हिंडावे, जुन्या मित्रांना भेटावे पण आपल्या शाळेची ओढ त्यांना इतकी होती कि आनंदपूर मध्ये त्यांना राहणे होतच नसे.

पस्तीस वर्षापूर्वी एका सध्या शिक्षकाची नोकरी करण्यासाठी आण्णांनी आनंदपूर सोडले. त्यांची घरची परिस्थिती उत्तम होती. वडिलांचा किराणा मालाचा आनंदपूर मध्ये मोठा व्यवसाय होता. गावात पत होती. आण्णा एकुलते एक. आपल्या मुलाने हाच व्यवसाय पुढे चालू ठेवावा असे त्यांच्या वडिलांना वाटत होते. पण आण्णाना शिक्षक व्हायचे होते तेही कोकणातील एका खेड्यात. पस्तीस वर्षे आण्णा त्या खेड्यात राहिले. त्या गावालाच त्यानी आपले मानले. आंनदपूर मध्ये स्वत:चे घर असूनहि त्यांनि कोकणात दोन खोल्यांचे घर बांधले. शाळेवर, विद्यार्थ्यांच्यावर आपल्या मुलांसारखे प्रेम केले. आणि आण्णा खऱ्या अर्थाने कोकणवासी झाले.

पण रिटायर झाल्यावर मात्र आण्णांनी ठरवलं होत आपण आनंदपुरला स्थायिक व्हायचे. पाच वर्षापूर्वी त्यांची पत्नी गेली मग मात्र अरविंदने आणि प्रतीक्षाने त्यांना निक्षून सांगितले होते “ ज्या दिवशी रिटायर व्हाल त्या दिवशी आनंद्पुरला यायचे आणि स्थायिक व्हायचे”. अरविंद आणि प्रतीक्षा बँकेत नोकरी करायचे. दोघे मिळवतात, पण कुठेही गर्व नाही. किती प्रेम करतात आपल्यावर, किती काळजी करतात ते आपली ! अशी सून आणि मुलगा मिळणे खरच भाग्याच लक्षण. आपल्या एकटे राहण्यामुळे मुलांना उगीच काळजी नको हा विचार आण्णानि केला. आणि त्यात आनंदपूरची ओढ तर होतीच.!आण्णा आनंदाने तयार झाले.
“ अहो, आजोबा कुठे जायचे तुम्हाला?” मघापासून विचारांच्या तंद्रीत असलेले आण्णा भानावर आले.
“टिळक चौक. चल लवकर” आण्णांनी उतावळेपणाने सांगितले.
रिक्षातून घरी जात असताना आण्णा कुतूहलाने आपल्या गावाकडे बघत होते. आनंदपूरचा पुरता कायापालट झाला होता. मनात असलेले त्यांच्या स्मुतीतले आनंदपूर आठवत आठवत ते त्यांच्या घराजवळ कधी पोचले हे त्यांना कळले नाही.
आपल्या घराकडे त्यांनी नजर फिरवली आणि ते खुश झाले. गाव कितीही बदलले तरीसुद्धा आपला हा जुना वाडा मात्र तसाच आहे याचा त्यांना अभिमान वाटला. वाडवडिलांची स्मृती आपण नाही तर कुणी जपायची ? अरविंद आपल्या संस्कारात वाढला आहे. आणि प्रतीक्षा गोड मुलगी आहे. तिच्या आईवडिलांनी चांगले संस्कार केले आहेत तिच्यावर. नाहीतर आजकालची मुले.! एव्हाना हा वाडा पाडून येथे कमर्शियल कॉम्प्लेक्स उभे केले असते. पण हा वाडा मात्र पहिल्यापासून तसाच उभा आहे आणि राहणार. कदाचित म्हणूनच त्याला पणजोबांनी वाड्याचे नाव “ चिरंतन सदन” ठेवले होते.
आणांची चाहूल लागताच अरविंद आणि प्रतीक्षा बाहेर आले. त्यांच्या हातातली सुटकेस घेतली आणि आनंदाने स्वागत केले “ आण्णा या” आत येताच दोघांनी वाकून नमस्कार केला आणि अण्णांनी कौतुकाने त्यांच्याकडे पाहत त्यांना आशीर्वाद दिला.
“ आण्णा थोडावेळ बसा. मग फ्रेश व्हा. मी दडपे पोहे करते. आणि मग आलं घातलेला चहा” प्रतीक्षा म्हणाली आणि आण्णा मनापासून हसले. आपली दडपे पोहे आणि आल्याचा चहा हि आवड अजुनी सुनेच्या लक्षात आहे याचा त्यांना मनोमन आनंद वाटला. दडपे पोहे पुढे असले कि आण्णा खुश असायचे. नाहीतर अलीकडचे एकेक पदार्थ ! काय मिळत ते खाऊन कुणास ठाऊक ? नुसते जिभेचे चोचले.
संपूर्ण घरावर त्यांनी नजर फिरवली. घरात आल्यावर त्यांना काहीसे वेगळे जाणवत होते. पण आपण बर्याच वर्षानंतर आलोय म्हणून असेल कदाचित म्हणून त्यांनी दुर्लक्ष केले. आता येथेच राहयचे आहे. होईल सवय या वातावरणाची.
वाड्याचा प्रशस्त सोपा. आण्णांना हॉल म्हटलेले आवडायचे नाही. माणसाने प्रगती करावी नाही अस नाही पण ओढूनताणून ब्रिटीश संस्कृतीला आमंत्रण द्यायचे काहीच कारण नाही असे त्यांना वाटायचे.
“ काय म्हणती तुमची बँक ? चाललंय सगळ व्यवस्थित? “ पोहे खात खात आण्णांनी विचारलं.
“ हो. मस्त चाललय” अरविंदने सांगितलं.
“ पण काय रे, तुम्ही मधे संप का केला होता?”
“ पगारवाढ दुसरे काय? “
“ किती पगार वाढवायचे तुमचे ? आता बँकेत लागलेल्या नवीन मुलांना तीस पस्तीस हजार रुपये मिळतात. माझा सुरवातीचा पगार किती होता माहित आहे ? फक्त पाचशे रुपये.”
“ काळ बदलला आहे आण्णा. महागाई किती वाढली हे मी तुम्हाला सांगायला नको. आणि बँकेतले पगार तुम्हाला दिसतायत पण कामाची जबाबदारी. याला काहीच महत्व नाही?
“ ते मानण्यावर आहे. शिक्षकांना जबाबदारी नाही असे थोडेच आहे.? आमच्यामुळे तर मुले घडतात. शिक्षक नसते तर तुम्ही चांगले शिकला कसे असता आणि चांगल्या नोकर्या कशा लागल्या असत्या ? खर तर, तुमच्यापेक्षाही शिक्षकांना पगार जास्ती पाहिजेत. तुम्हा लोकांना आवश्यकतेपेक्षा जास्ती पगार आहे असे वाटत नाही?”
“ आण्णा, आजकाल तांदूळ आणि गहू इतकेच फक्त जगण्यासाठी आवश्यक नाही. या तणावपूर्ण आयुष्यात टी. व्ही., सिनेमा, बाहेर जेवण याची सुद्धा तितकीच आवश्यकता आहे. आयुष्यात थोडी तरी करमणूक पाहिजे का नको?” इतका वेळ आतून गप्पा ऐकणारी प्रतीक्षा चहा बाहेर आणत आण्णाना म्हणाली.
“ करमणूक फक्त टी.व्ही. मुळेच होते अस नाही. आमच्या वेळी रेडीओ होता. तो बघ .. “ आण्णांनी त्यांच्या सवयीप्रमाणे रेडीओ कडे बोट दाखवले. पण त्या जागेवर रेडीओ नव्हता. रेडीओची जागा टी व्ही ने घेतली होती. पूर्वी त्या घरात टी व्ही होता पण हा नवीन टी व्ही आणलेला दिसत होता. अण्णांचा टी व्ही ला विरोध नव्हताच. पण त्यांचा रेडीओ मात्र त्यांना जागच्या जागी पाहिजे होता. कदाचित मुलाने रेडीओ ची जागा बदलली असेल म्हणून त्यांनी विचारले,
“ तू हा टी व्ही नवीन घेतलास का रे ? आणि येथे माझा रेडीओ होता तो कुठे आहे? “
“ पहिला टी, व्ही ओउटडेटेड झाला होता म्हणून हा घेतला आण्णा. अरविंद, जरा लाऊन दाखव ना आण्णाना. पिक्चर क्वालिटी रिच आहे एकदम” विषय बदलण्यासाठी प्रतीक्षा बोलली.
“ तू टी.व्ही घेतलास घे. पण माझा रेडीओ कुठे ठेवलास ते सांग? कुठे वरच्या खोलीत ठेवला आहेस का ?”
क्षणभर प्रतीक्षाने आणि अरविंदने एकमेकाकडे बघितले. सांगावे कि नाही या संभ्रमात अरविंद होता. पण शेवटी एकदाचे बोलून टाकावे म्हणून अरविंद म्हणाला.
“ आण्णा, तो रेडीओ पन्नास वर्षापूर्वीचा. तो धड लागतहि नव्हता. कोणता दुकानदार तो रिपेअर करून सुद्धा द्यायला तयार नव्हता. मग तो घरी ठेवायचा कशाला?”
“ मग, तू काय केलस त्याच?” आण्णांनी काळजीच्या स्वरात विचारलं.आपल्या घरच्या माणसाच्या बाबतीत काही संकट आल्यावर जितकी काळजी वाटेल ती काळजी आण्णाना वाटत होती.
“ एक भंगारवाला रस्त्यावरून जात होता. त्याला घरातल्या सगळ्या वस्तू देऊन टाकल्या. एक पैसा त्याचा आला नाही. भांडून भांडून कसेबसे दोनशे रुपये मिळाले. तुमचा तो रेडीओ, बंब, पाटावरवंटा, या जुन्या पुराण्या वस्तू अडगळ करून किती दिवस ठेवायच्या”
मुलाच्या उत्तराने आण्णा दु:खीच नाही तर रागावले होते.
“ या सगळ्या वस्तू तू भंगारवाल्याला देऊन टाकल्यास? भंगारवाला? ज्या वस्तू मी प्राणपणाने जपून ठेवल्या त्या वस्तू तू अशा कशा देऊन टाकू शकतोस? आणि ते सुद्धा मला न विचारता ? तू भांडून दोनशे रुपये घेतलेस. शाबास ... ! पण त्या वस्तूची किंमत माझ्यासाठी अनमोल होती.
“ अहो, त्या मोडलेल्या रेडीओत ना कधी गाणी लागली ना कधी बातम्या. असला मोडका रेडीओ ठेऊन काय करायचे आहे सांगा बर ? रेडीओ म्हणजे तुमच्या वेळची करमणूक होती ना? मला सांगा मी तुमची करमणूक करतो. कुठल गाण लाऊ ? किशोर, आशा? कोणता सिनेमा लाऊ? बच्चन का राजेश खन्ना ? तुमच्या रेडीओ वर खरखर लागत असेल पण मी तुम्हाला चांगल्या आवाजात हि गाणी ऐकवू शकतो. जगाबरोबर राहा थोडे आता आण्णा.” अरविंदचा आवाजही आता थोडा वाढला होता.
आणांची नजर शून्यात होती. आपल्या घरातल्या वस्तू एका भंगारवाल्याला विकल्या हि गोष्ट आणांच्या मनाला लागली होती. स्वत:शीच बोलल्यासारखे आण्णा बोलत होते
“ त्या रेडीओ वरून मला गाण कधीच ऐकू येत नव्हते. पण त्याच्याकडे बघितल्यावर मला वाटायचे जसे मी माझ्या वडिलांना मी भेटतोय. त्यांच्या प्रेमळ सहवासात मी राहतोय. त्या रेडीओमुळे या घरातल त्याचं अस्तित्व जाणवायचं. तुमचा गिजर खूप नंतर आला पण तू भंगारात घातलेला बंब हा माझ्या आजोबांच्या काळातला होता. माझे आजोबा बंबफोड आणून द्यायचे आणि माझी आजी मला अंघोळीसाठी गरम पाणी आणून द्यायची. तो पाटावरवंटा .. बोलता बोलता आणांचा आवाज गहिवरला. स्वत:च्या भावनांना आवर घालीत ते म्हणाले,
“ तुमच्या आधुनिकतेला माझा विरोध नाही. पण या माझ्या आठवणी होत्या. त्या एका कोपऱ्यात पडून राहिल्या असत्या तर काय झाल असत? त्यांना तू भंगारात टाकलस. म्हणजे एका दृष्टीने त्या आठवणी भंगार होत्या”
आण्णांच्या पुढे अरविंद काहीच बोलू शकत नाही. प्रतीक्षाला सुद्धा वाटू लागत कि आपण कुठेतरी चुकलो आहोत.
“ कोण आहे हा भंगारवाला? मी त्याला शोधून काढतो. त्या वस्तू पुन्हा विकत घेतो”
“ या वस्तू विकून दोन वर्षे झाली. तो असा सापडतोय होय? “ अरविंदने पडलेल्या आवाजात सांगितले.
आण्णा काहीच बोलत नाहीत पण त्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावलेल्या असतात. अरविंदला अपराधी वाटू लागत.
“ सॉरी आण्णा. चूक झाली. पण तुमच्या भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता.”
आण्णांना माहित होते कि मुलगा चुकला असेल पण तो स्वभावाने वाईट नव्हता. मुलगा जवळ आल्याने त्यांना अधिकच भडभडून आले. आपल्या भावनांना आवर घालीत आण्णा बाहेर गेले.
घराच्या बाहेर गेल्यावर त्यांना थोडे हलक वाटलं. गावात एक फेरफटका मारून स्वत:ला शांत करू आणि मग घरी जाऊ असे त्यांनी ठरवलं. आजूबाजूला कुतूहलाने बघत आण्णा चालले होते. उंचच उंच इमारती. प्रत्येक इमारत बघितल्यावर येथे पूर्वी काय होते हे आण्णा मनाशी आठवत होते. पण गावाचा कायापालट इतका झाला होता जुन्या गोष्टी आता कुठेच दिसत नव्हत्या. क्वचित ठिकाणी त्यांना जुनी दुकाने दिसायची. पण त्या दुकानाचेही स्वरूप बदलल्यासारखे वाटत होते.
रस्त्यांची भव्यता आणि वाहनांची ये जा. चालत जात असतानाही त्यांना अवघड जात होते आण्णाना त्यांना सायकलचे दिवस आठवत होते. या पुढे सिग्नल लाईटच्या ठिकाणी उभा असलेला हाफ चड्डीतला पोलीस. चौकात उभे राहून उगीचच शिटी वाजवायचा आणि त्याच्याकडे मान वळवून बघितले कि संशय घेऊन पकडायचा. एकदा मित्राला घेऊन डबल सीट चाललो होतो. येथेच पकडले पोलिसाने आणि सायकल मधली हवा सोडली. तोच रस्ता किती गजबजलाय ना? सायकल दिसतच नाही. सायकल कशाला लुनाही दिसत नाही. या नवीन मोठ्या मोठ्या गाड्या आणि आधुनिक फोर व्हीलर्स.
जुन्या आठवणींच्या पाउल खुणा शोधीत आण्णा चालले होते. समोर असणारे हे टोकिज. काय नाव याच माया ना ? हो, माया. आणि त्याच्या शेजारी उभी असणारी चहाची गाडी. ती बहुदा नसेल आता. इतक्या आधुनिकतेत ती गाडी काय तग धरणार? आणांची नजर त्या गाडीच्या जागेकडे गेली. आण्णाना आश्चर्य वाटले आणि त्याहीपेक्षा आनंद वाटला. ती चहाची गाडी तिथच होती ...या टोकीजवर बघितलेल्या सिनेमापेक्षाहि त्यांना आठवत होते रात्री स्टडीरूम वरून परत येत असताना या गाडीवर घेतलेला चहा, मित्रांशी झालेल्या करिअरच्या गप्पा आणि त्याचवेळी आपण शिक्षक होणार आणि कोकणातच जाणार हे मित्राना सांगितलेले ध्येय. इतका वेळ शांतपणे चालणारे आण्णा धावतच त्या गाडीकडे गेले.
चहाच्या गाडीवर पस्तीस वर्षापूर्वीचा तरुण चहा करीत होता. त्याच्या वागण्याबोलण्यात तत्परता होती. दिसायला शिकलेला वाटत होता.
“ बोला काका, कोणता चहा देऊ ? मसाला टी घेणार का ? कडक एकदम?”
“ टक्कर चहा मिळेल? “ आण्णांनी थोडेसे बिचकतच विचारले.
तरुणाने थोडेसे आश्चर्याने त्यांच्याकडे बघितले. आण्णाना कळून चुकले त्याच्याकडे टक्कर चहा नाही.
“ काही हरकत नाही. जसा असेल तसा चहा द्या”
“ काका, आहे टक्कर चहा. पण तुम्हाला कसे माहित या ठिकाणी टक्कर चहा मिळायचा ते. आजकाल कोण पीत नाही असा चहा”
आण्णाना आपला भूतकाळ पुन्हा आठवला.
“ साधारण पस्तीस वर्षापूर्वी, मी स्टडीरूममधून अभ्यास करून परत येताना या गाडीवर चहा घेत असे. या गाडीवर एक मावशी असायच्या आणि टक्कर चहा चांगला करायच्या. जवळ जवळ चार वर्षे या गाडीवर टक्कर चहा मी आणि माझे मित्र प्यायलोय.”
“ काका, ती मावशी म्हणजे माझी आई. आता पंचाऐंशी वर्षाची आहे. मीच तिला सांगत असतो तू येत जाऊ नकोस म्हणून. तिच्या आशीर्वादाने माझी पाच रेस्तोरंट आहेत. पण आईने सांगितले कितीही मोठा झालास तरी हि गाडी विकू नको. हाताखाली माणसे ठेव. पण निदान दोन तास तरी या गाडीवर येत जा” आण्णांना समाधान वाटले. कुणीतरी आपल्या विचारांच आहे अजुनी. त्या समाधानाने आण्णांनी चहा प्याला. आण्णा पैसे देऊ लागले. पण त्या तरुणाने ते घेतले नाहीत.
“ काका, एक विनंती करू. मला पैसे नकोत. एक सेल्फी काढतो. माझ्या आईला बरे वाटेल बघा”
त्याने सेल्फी काढला आणि आण्णाची पदयात्रा चालू झाली. खर तर त्यांचे पाय दुखत होते. पण अजुनी आनंदपूर हिंडावे असे मात्र त्यांना वाटत होते. माया टोकीजच्या समोर असणारे ते झाड. आण्णा घाईने तिथे गेले व झाडावर नजर टाकली. ती जागा तशीच रिकामी होती. कितीतरी नाटकांच्या जाहिरातीचे बोर्ड येथे लागत होते. आणि मनसोक्त नाटक आपण बघत होतो. आणि त्याच्याच मागे असणारी व्यायाम शाळा. तरुणपणी किती व्यायाम केला ना? स्वता:च्या शरीराकडे त्यांनी नजर टाकली.
“ कांता , ए कांता” कांता ? नक्कीच कोणीतरी कॉलेज मधील मित्र हाक मारतय. निशिकांत या नावामुळे कॉलज मधील मित्र त्यांना कांता म्हणत असत. आण्णांनी आवाजाच्या दिशेने वळून बघितले.
“ ओळखलस का नालायका? “
“ तू मान्या तर नाहीस? अरे हो, मान्याच कि. नाहीतर तुझ्याशिवाय मला नालायक कोण म्हणणार?”
“ माघासपासून तुला बघतोय येथे उभे राहून. त्या मावशीच्या गाडीवर चहा ढोसतोयस तेव्हा पासून तूला बघतोय. पण हे टक्कल बघून गोंधळ होत होता. चल चहा घेऊ”
खर तर मावशीच्या चहा नंतर आण्णाना दुसरा चहा प्यायचा नव्हता. पण माने ऐकणार नाही याची त्यांना कल्पना होती.
“ बोल, साल्या केव्हा आलास? “
“ येऊन दोन एक तास झाले. चहा पोहे खाल्ले आणि बाहेर पडलो बघ. फिरतोय गावातून. पण किती बदल झालाय रे ?”
“ तू ते पस्तीस वर्षापूर्वीच डोक्यात घेऊन बसला असशील. इतक तरी बदलणारच ना?”
“ पण आपल आनंदपूर डोळ्यासमोरून जात नाही रे.”
“ अजून काय डोळ्यासमोरून जात नाही तुझ्या” मानेनी डोळे मिचकावत विचारले.
“म्हणजे?”
“ साल्या, रेखा देशपांडे विसरलास? पाच वर्षे मागे होतास तिच्या. वासावर होतास बेट्या नुसता”
आण्णाच्या मनात खोलवर कुठेतरी असणारी एक स्मृती ताजी झाली. रेखा देशपांडे. खर तर इतकी काही सुंदर नव्हती. पण मोहक नक्कीच होती. बसस्तोप वर नेहमी दिसायची. तिच्या सौंदर्यात एक लोहचुंबक होता ज्यामुळे आपण ओढले जायचो. मनात कुठेतरी रेखाची आठवण नेहमी राहिली. आणि आज हा मान्या आला आणि ती आठवण पुन्हा वर आली.
“ कुठे असते रे ती ? “
“ मला काय माहित? काढ शोधून. नाहीतर तुला काय काम आहे? शाळा संपली ना आता?”
संध्याकाळ संपून रात्र होत होती. आण्णा थकले होते.

त्या रात्री आण्णाना झोप आली नाही. आपला रेडीओ,.. बंब,.. पाटा वरवंटा,... चुलीवरच्या भाकरी... गाडीवरचा चहा .. सेल्फी .. रेखा देशपांडे ....सगळ्या आठवणी त्यांना बेचैन करत होत्या. रात्री उशिरा त्यांना केव्हातरी झोप लागली.

सकाळी नउ वाजले आणि आण्णा घाईघाईने बाहेर पडले. रात्रीच्या आठवणीनि आण्णा अस्वस्थ झाले होते. आपल्या विचारांच्या नादात ते त्या बसस्टोप वर उभे राहिले. त्यांच्या डोळ्यासमोर रेखाचे चित्र होते. येथेच आपण उभे असायचो. आणि रेखा बरोबर याच वेळेला येत असायची. “ अजुनी ती तशीच असेल”? छे : कस शक्य आहे ? आपण आता म्हातारे झालो म्हणजे तीही म्हातारी झालीच कि!. पण काही झाले तरी मी तिला ओळखेनच. रेखाला भेटण्याची त्याच्या मनात तीव्र इच्छा निर्माण झाली. हे काय आलीच कि रेखा... तीच चाल.... तेच हसणे. आण्णाना भास झाला. इतक्यात वेगाने बस आली. मिनिटभर थांबली. आणि प्रवाशांची एकच गडबड झाली. रेखाच्या दिशेने आण्णा बघत राहिले. ती जवळ येईल आली कि आपण बसमध्ये चढायचे या पवित्र्यात आण्णा उभे होते.
“ ओ आजोबा चला कि आत” लोकांची एकच धक्काबुक्की झाली. आरडाओरडा.
“ अहो थांबा,” आण्णा ओरडत होते. पण एकच गडबड. आण्णा त्या बसमध्ये चेंगरले आणि दुसऱ्या क्षणाला त्यांचा चष्मा बाजूला पडला. गर्दीतील कुणीतरी ओरडल
“ अरे त्या म्हाताऱ्याला बाजूला न्या” तुटलेला चष्मा आणि आण्णा दोघेही बाजूला पडले

“ आण्णा, मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय. तुम्ही आता विश्रांती घ्या. आज सकाळी नऊ वाजता तुम्ही बाहेर गेलात. काय नडल होत? या माने काकांनी बघितलं आणि तुम्हाला आणून सोडलं म्हणून बर झाल. नाहीतर आम्ही काय करणार होतो? कुठे शोधायचे तुम्हाला?”
आण्णा अपराधीपणे बसले होते. अरविंदकडे त्यांना बघणे अवघड झाले होते.
“ कांता, अरे कुठे गेला होतास तू ?” माने
“ काही नाही रे. आपल्या गावात जरा चक्कर टाकण्यासाठी बाहेर गेलो होतो.”
“ बघितलत काका, यांच्या डोळ्यासमोर अजुनी जुने आंनदपूर, जुना वाडा या गोष्टी आहेत. आण्णा बदलल सगळ आता. भूतकाळ विसरा तुम्ही. तुम्ही जे आनंदपूर शोधताय ते पस्तीस वर्षापूर्वीच आहे. आता त्यातलं काही शिल्लक नाही.” अरविंद बराच वेळ बोलत होता. आपल्या मुलाला आपली काळजी आहे याचे आण्णाना बरे वाटत होते. पण जुन्या आनंदपुरची स्मृती मात्र त्यांच्या मनातून जात नव्हती. अण्णांचा निरोप घेऊन माने निघून गेले. त्या रात्री तिघेही अस्वस्थ होते. आनंदपूरच्या आठवणींनी अण्णा आणि आण्णाच्या काळजीने अरविंद आणि प्रतीक्षा.

“डॉक्टर, काही काळजीच नाही ना?” आपल्या डॉक्टर मित्राशी अरविंद बोलत होता. डॉक्टर प्रशांत अरविंदचा मित्र आणि मानोसोपचार तज्ञ. आणांच्या काळजीन अरविंदने आपल्या डॉक्टर मित्राचा सल्ला घ्यायचे ठरवले.
“ अरे नाही. अजिबात नाही. काल मी तुझ्याकडे ठरल्याप्रमाणे आलो होतो तुला माहित आहेच. आण्णाशी बराच वेळ बोलत होतो. छान गप्पा झाल्या.”
“ त्यांना औषध वगैरे चालू करायचे मग ?” अरविंदने काळजीपोटी विचारले.
“ पण त्यांना झालय काय औषध चालू करायला ? हि इस परफेक्ट”.
“प्रशांत, आण्णा येऊन फक्त दोन दिवस झालेत. या दोन दिवसात मी बघितलं ते नेहमी रेस्टलेस असतात. भूतकाळातल्या आठवणी येण हे मी समजू शकतो. पण त्याचं प्रमाण जास्त आहे. अस वाटत, यांच्या आयुष्यातला वर्तमान काळ नाहीसा झाला आहे कि काय अशी शंका सुद्धा मला अलीकडे बऱ्याचदा येते. अरे, जेवणातला सुद्धा प्रत्येक पदार्थ खाताना माझी आई असा पदार्थ करायची म्हणून सुरु होतात आणि त्यातच रमतात.. “
“ अरविंद ,भूतकाळ आठवण्यात वाईट काय आहे पण?”
“ पण त्याच अवडंबर .. “
“ तू ज्याला अवडंबर म्हणतोस ती त्यांची गरज आहे . याला तू मनोविकार म्हणू शकत नाहीस. भूतकाळातल्या आठवणी सगळ्यांनाच येतात. फक्त त्याच प्रमाण व्यक्ती सापेक्ष आहे. मनाच्या आत या आठवणी खोल रुतून बसलेल्या असतात. आणि त्यांच्या मनाप्रमाणे त्या बाहेर येतात. विशेषत: मन रिकाम असल तर जास्त. आण्णा आता निवृत्त झालेत. मन भरपूर रिकाम आहे. त्यामुळे आठवणी खेळत राहतात त्यांच्या मनात आणि आण्णा रमत जातात. त्यात काय गैर आहे?”
“ अरे पण आण्णा रात्री जागे असतात. मधेच उठतात. सकाळी बाहेर जातात. एकदा कोणत्यातरी बसमध्ये चढताना चष्म्यासकट पडले. चहाच्या गाडीवर जाऊन चहा पिऊन आले. हे सगळ काळजीच नाही. काही औषध , निदान झोपेची गोळी?”
“ यावर एकच औषध आहे अरविंद. त्यांना भूतकाळात रमू दे. ते सांगत असलेल्या आठवणीत तुम्हीहि रमून जा. या वयात हेच त्यांना सुख आहे .झोपेच्या गोळ्यांची सवय उगीच कशाला लावायची? बाकी त्यांची तब्बेत ठणठणीत आहे. त्यांच्या आठवणीत तू सुद्धा थोड रमत जा.त्यांचा काळ त्यांच्यानंतर तुला कोण सांगेल?” प्रशांतने सल्ला दिला आणि अरविंदला हलके हलके वाटू लागले. आपण उगीचच आण्णाची काळजी करत होतो असे त्याला वाटू लागले.

“ आण्णा, कुठे चालतात तुम्ही सकाळी सकाळी. ? आणि हि सुटकेस घेऊन ..?”
“ थोड कोकणात गावाला जाऊन येतो. तिथही आपल घर आहे. तुझ्या आईने फुलवलेली बाग आहे. छान फुलली आहे बघ बाग. गुलाब, मोगरा सगळी झाड आहेत त्या बागेत. चाफ्याचा वास तर इतका मस्त येतो बघ तिथे... “ आण्णाच्या डोळ्यसमोर आता कोकणातलं घर दिसत होत.
अरविंदने क्षणभर विचार केला.आणि तो म्हणाला
“ आण्णा, थांबा. आम्ही सुद्धा येतो. बरेच दिवस आम्ही कुठे गेलो नाही आईची बाग आम्हालाहि बघायची आहे.”
“ खरच येशील तू?
“ हो. आपण लगेच निघू.”
थोड्याच वेळात अरविंद आणि प्रतीक्षा तयार झाले.आण्णा त्या दोघांच्याकडे कौतुकाने बघत होते. त्यांचे डोळे पाणावले होते. पण त्यांनी ते पाणी पुसले नाही तसेच वाहून दिले. अरविंदची गाडी सुसाट वेगाने रस्ता कापत होती,

सतीश कुलकर्णी
९९६०७९६०१९

Group content visibility: 
Use group defaults

धन्यवाद