
झी मराठी वर नुकतीच येऊ कशी तशी मी नांदायला ही नवी मालिका सोमवार ते शनिवार रोज रात्री ८ च्या टाईम स्लॉटवर सुरू झाली. मालिकेचं टायटल साँग सुद्धा बरंच बरं जमलंय कि बघताना मिसेस मुख्यमंत्रीच्या ठसकेदार टायटल साँगची आठवण आल्याशिवाय रहात नाही इतकं ते कॉपी झालंय..!
मालिकेतील लिड स्टारकास्ट अगदीच नवीन परंतु चॅलेंजिंग आहे. स्वीटु (अन्विता फलटणकर) आणि ओंकार (शाल्व किंजवडेकर) हे दोघे या मालिकेचे लिड आहेत तर त्यांना साथ द्यायला खंबीर आधारस्तंभ म्हणुन स्वीटुची आई नलू साळवी (दिप्ती केतकर), ओमची आई शकुंतला खानविलकर (शुभांगी गोखले), ओमची बहीण मालविका खानविलकर (आदिती सारंगधर) आहेत. त्याच सोबत स्विटुचे बाबा, काका, काकू, चुलत भाऊ चिन्या हे सर्व साळवी कुटुंबीय दहा बाय बाराच्या हॉल अन सहा बाय सहाच्या किचन या वन आरके मधे रहात आहेत(हेच घर झीमच्या बर्याच सिरियल मधे या आधिही पहायला मिळालेलं आहे..!)
तिकडे खानविलकरांच्या घरात ओमसोबत त्याचे आई-बाबा-बहीण, त्याची होऊ घातलेली इंडो-अमेरिकन बायको, बहिणीचा होऊ घातलेला नवरा (याला या आधी कुठे बघितला आहे हेच आठवत नाही..
) अन बहिणीचा ऑफिस कम घरातील चमचा/नोकर असे कलाकार आहेत. खानविलकरांचा व्हिला जबरदस्त आहे. त्यांच्या घराची, अंतर्गत सजावटीची अन समस्त खानविलकर कुटुंबियांच्या ड्रेपरीची रंगसंगती ही फिकट रंगससंगतीत आहे ज्यातुन त्यांच्या रहाणीमानावर गडगंज संपत्तीचा अन हाय क्लास जीवनशैलीचा प्रभाव जाणवतो.
सो मिडलक्लास साळवी कुटुंबीय अंबरनाथ मधे रहात आहेत. कर्मदरिद्री स्वभावामुळे आठराविश्व दारिद्र्य हे त्यांच्या पाचवीला पुजलेले असते (कसे ते कालच्या भागात कळाले.. पुढे सांगतोच..!). या कर्मदरिद्री कुटुंबात सर्वांचे खायचे वांधे झालेले असतात पण दोन्ही साळवी जोड्यांची मुले - स्विटू अन चिन्या हे मात्र खात्या-पित्या घरातले ओव्हरवेट वाटावेत असे कसे हे मात्र न सुटलेलं कोडंच आहे. सगळे साळवी स्वभावाने चांगले असतात त्यामुळे त्यांना कशातच वाईटपणा दिसत नसतो. अगदी बिनकामाचे आयुष्य कंठण्यात देखील त्यांना काहीच वाईट वाटत नसतं. स्वीटूच्या बाबांची नोकरी अगदी पहिल्याच भागातच जाते अन ते हताश होऊन दुसर्या नोकरीसाठी कसलेही प्रयत्न न करता नुसते सुतकी चेहर्याने घरी बसुन असतात. त्यांना साथ देणारी नलू ही अंबरनाथमधे चपात्या बनवून विकत असते. स्विटु कुठेतरी थातूर-मातूर नोकरी करत असते अन या दोघींच्या पैशांवर हे सगळे साळवी आयते गिळत असतात. स्विटूचा काका हा एक नंबरचा आळशी अन फाल्तू कामं करणारा इसम असतो (जो कुठल्याही अँगलने अंबरनाथमधे रहणारा मराठी माणुस वाटत नाही - ठार गुज्जु वाटतो..!) ज्याची बायको दम्याचा रोग घेऊन उसउसत जगत असते अन जावेला (नलुला) पडेल ती मदत करण्याची कसरत करत असते. अशा या माठ काका-काकुचा मुलगा चिन्या हा महामाठ असतो अन गुंडांकडून २ लाख रुपये हारलेला असतो. घरात खरेतर हार्पिकची देखील गरज लागु नये अशी गांजलेली परिस्थिती असताना चिन्याच्या उद्योगाला वैतागून घरात सगळे चिंतेत असतात. हाता-तोंडाची गाठ पडण्याचे वांधे झालेल्या साळवींना खानविलकरांच्या कृपेने देव तारायला बघत असतो.
नलूची बालमैत्रीण शकुंतला खानवीलकर ही मोठ्या हेल्थ केअर प्रॉडक्ट उद्योगाची मालकीण असते. हिने देखील नलूसारखाच संसार रेटत मार्गी लावलेला असतो. तिची मुलगी - मालविका ही हाय क्लास सोसायटीची प्रतिनिधी असते अन तिचे विचार शकुला (ती स्वतःच्या आईला ''आई'' असं न म्हणता मिसेस खानविलकर म्हणत असते यावरून त्यांच्या नात्याची कल्पना येऊ शकते..!) आजिबात पटत नसतात. मालविका अजुन अविवाहित असते पण तिचा होऊ घातलेला नवरा - रॉकी कायम तिच्या आगेमागेच असतो अन पडेल ती कामे करत असतो. त्याला जिमचे खूप वेड असते.
नलू-शकु ची मैत्री या दोन कुटुंबियांना जवळ आणते. शाळेत असताना नलूच्या घरची परिस्थिती उत्तम अन शकूच्या घरी खाण्याचे वांधे असतात. काळानुसार परिस्थिती बदलली परंतू दोघींच्या घट्ट मैत्रीत त्या बदललेल्या परिस्थितीचा लवलेशही नाही हे आईसोबत एकदा साळवींच्या घरी आलेला ओम बरोब्बर हेरतो. साळवींच्या दळभद्री आयुष्याची कणव येऊन चांगल्या मनाचा ओम त्यांना चकल्या-शेव-शंकरपाळ्या अस्ल्या ऑर्डरी मिळवून देऊन ४ सुखाचे घास खाऊ घालण्याचे पुण्य पदरात पाडून घेतो. त्याला नलू मावशी अन साळवींबद्दल नितांत आदर असतो.
असा हा ओम्या मनाने अन रुपानेही खरंच खूप चांगला असतो. त्याच्या चांगुलपणावर जाडी अन मनमिळावू स्वीटु भाळते. तिचा सर्वांची काळजी घेणारा, कामसू स्वभाव शकुलाही खूप आवडतो अन ती परिस्थितीने (खरेतर कर्मदरिद्रीपणामुळे) गांजलेल्या साळवींना अजून थोडी मदत व्हावी या हेतुने स्वीटुला 'खानविलकर हेल्थ प्रॉडक्ट्स'च्या बिझनेस युनिट मधे नोकरीला बोलावते. एवढेच नव्हे तर स्वतःच्याच बंगल्यात रहायला सांगते. शकुच्या मुलीला - मालविकेला मात्र हे आवडत नाही अन ती स्विटूला भयंकर पिडू लागते. मालविकेने भावासाठी एक माठ इंडो-अमेरिकन मुलगी (मोमो) शोधलेली असते जिचे पिताश्री एक वेलनोन बिझनेस टायकून अन ६०० करोड की कायशा संपत्तीचे मालक असतात. त्यावर डोळा ठेऊन मालविका ही मोमो-ओम्याची सोयरीक जुळवण्याच्या प्रयत्नात असते अन ती मोमोला सतत सोबत घेऊन तिला काय हवं काय नको याची काळजी घेत असते. तर अशा या इंग्रजाळलेल्या कम भंजाळलेल्या अतार्कीक मोमोची अटेंडंट म्हणुन स्विटूचे वर्णी लागते.
त्यानंतर एकेदिवशी शकू अन ओम्या साळव्यांना थोडा चेंज म्हणुन स्वतःच्या व्हिलात पाहुणचारासाठी बोलावतात. या भेटीत साळाव्यांच्या कर्मदरिद्रीपणाच्या कडक आवरणाखाली खळाळणार्या चांगुलपणाची झलक ओम्याला दिसते. आपल्या कुटुंबियांना शकु मावशीने अन ओम्याने चांगला पाहुणचार दिला हे बघून स्विटूही सुखावते. त्याचवेळी मालविकाला व्हिलाची धर्मशाळा झाल्याचा संताप अनावर होऊन ती साळव्यांना सळो की पळो करून सोडते. साळव्यांना त्यांची जागा दाखवायचा प्रयत्न करते परंतु साळवे इतके इतके नतद्रष्ट असतात की त्यांना त्यांची जागाच माहित नसते
. त्यामुळे मालविकेकडून साळवी यथेच्छ सळो-की-पळो करून घेतात
. शेवटी हायक्लास असलेल्या ३ मैत्रीणींना बोलावलेल्या जंगी(?) पार्टीत मालविका साळव्यांना अपमानीत करु लागते त्यावेळी लेकीचे प्रताप हताशपणे पहात उभ्या असलेल्या शकूला स्विटूची साथ मिळते अन मालविकेचा डाव तिच्यावरच उलटवत थोड्या विनोदी अंगाने तो कसनुसा प्रसंग अन साळव्यांचा खानविलकर व्हिला मधला स्टे एकदाचा संपतो अन आपणाला हुश्श वाटतं. 
खरं सांगायचं तर पहिले काही भाग अतिशय बाळबोध वाटत होते परंतु त्यात पुढील भागांची बिजं खुबीने पेरण्यात दिग्दर्शकाला यश आलं. जाडी स्विटु अन शेलाटा ओम्या यांचं कसं काय बुवा जमणार. कैच्या कै सिरियल दिसते असं वाटत असतानाच स्विटू अन ओम्या आपल्याला आवडू लागतात यात दिग्दर्शन, संवादलेखन अन कॅमेर्याचाही हात आहे.
दिप्ती केतकर यांनी नलूच्या गेटअपवर खरेच खूप कष्ट घेतले आहेत. त्या अगदी नलूच वाटतात इतकं बेअरिंग त्यांनी पकडलं आहे त्याबद्दल त्यांचं विषेश कौतुक..! शुभांगी गोखलेंची शकू देखील अगदी सफाईदार आहे. मालविकेचं कॅरेक्टर लाऊड आहे पण आदिती सारंगधरने ते बरोब्बर साधलं आहे. अन्विता फलटणकर अन शाल्व किंजवडेकरचे स्विटू-ओम्या अगदी पर्फेक्ट आहेत असं जाणवतं याचा अर्थ त्यांची केमिस्ट्री चांगलीच जुळली आहे. झी मराठीवर असं जाडं-शेलाटं प्रकरण पहिल्यांदाच आल्यामुळं काहीतरी नवीन आहे या उत्सुकतेपोटी आपण त्यात गुंतू लागतो. आपल्याप्रमाणे शकूला पण स्विटूच ओम्यासाठी योग्य वाटू लागते जेणेकरून खानविलकरांच्या घराला घरपण देण्यासाठी (डि.एस.कें.च्या घरांना डावलून
) एक चांगली सून मिळेल हे त्यामागचं कारण असतं.
स्विटू अन ओम्याच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन शकु अंबरनाथच्या चपातीवाल्या साळव्यांच्या घरी मिठाईचे बॉक्स अन भेटवस्तू घेऊन पोचते. किचन ओट्याशी थांबून अगदी आनंदात शकू-नलू या घट्ट मैत्रीणी स्विटूच्या लग्नाबद्दल सेम पिंच सेम पिंच करत बोलत असतात. नलू-शकूची मैत्री त्या दोघींच्या मुलांना बांधतेय असं वाटत असतानाच कर्मदरिद्री साळव्यांची नलू बावळटासारखी शकूसमोर स्वतःचा फोन धरत त्या फोन मधे कुणा स्थळाचा फोटो दाखवत हे स्थळ स्विटूसाठी किती योग्य आहे ते दाखवते अन ते बघून आपलीही अवस्था शकूसारखी (काय ही नली दलिंदर आहे बघा.. कुबेर शकुच्या रुपाने नलीच्या पदरात आपले धन टाकू पहात आहे अन ह्या कर्मदरिद्री नलीचा पदर फाटका रे बाबा..!!) होते. शकू आवंढा गिळत नलीच्या हो ला हो-हो (हे शुभांगी गोखलेंना नेहमी छानच जमतं
) करत रहाते अन आपण मात्र दळभद्री नलीला लाखोल्या वाहत उद्या पासून नकोच बाबा ही येऊ-कशी-तशी असा विचार करतो खरा पण 'आज काय होणार?' ही उत्सुकता पुन्हा उद्या रात्री ८ वाजता आपली बोटे रिमोटवरील १२०४ हा आकडा दाबून आपला मोर्चा झी मराठीकडेच वळवणार हे माहित असुनही उद्याचा प्रीकॅप बघून झाला की आजच्या पुरतं तरी आपण चॅनेल बदलतो. 
अशा या नवीन सिरियल वर चर्चा करण्यासाठी हा धागा थोडा उशिराच उघडला असला तरी सिरियलची खरी सुरुवात तर आजच्या भागापासून होणार आहे 
शकू बदलली म्हणे
शकू बदलली म्हणे
हो. किशोरी आंबिये असणार आता
हो. किशोरी आंबिये असणार आता शकूबाई.
लेखकाच्या सुमारपणाला दाद द्याविशी वाटतेय. रोज. ओम्याचं हे बॅडबॉय नाटक पाहून स्विटू त्याच्यापासून लांब जाणार म्हणे. कोंबडा कुठला. जरा बरंं काही जमत नाही लिहायला. तेचतेच नुसतं. बाकी काही सुचत नसेल तर त्या मोहितची आणि स्विटूची लव्हस्टोरी चालू करा आणि संपवून टाका विषय एकदाचा. स्लॉट खाली करा आणि दुसरी एखादी बरी(चांगली म्हणवतंच नाहीये-साभार झी मराठीचा इतिहास) सिरियल चालू करा.
स्विटू बेस्ट सून म्हणे..झी
स्विटू बेस्ट सून म्हणे..झी मराठी award...
कुणाची सून..? मोहितच्या आईची.
कुणाची सून..? मोहितच्या आईची..??
काल तर नेहमीची शकू होती. ती बदलणार म्हणून टायटल साँग लागत नाही वाटतं. आता त्या अंबियेला कशी काय शकू जमेल कुणास ठाऊक. एक वेळ तिला तायडा जमली असती.
किशोरीने सहकुटुंब सोडली का.
किशोरीने सहकुटुंब सोडली का. असं तर नाही की शुभांगी चालली तिकडे मामी म्हणून, अदलाबदल. बिग बॉस मध्ये तर नाही ना येणार शुभांगी. काही सांगता येत नाही या लोकांचं.
शुभांगी गोखले कुठेही गेल्या
शुभांगी गोखले कुठेही गेल्या तरी तिकडे हो हो हो हो च करणार आहेत.. फार फार तर मालिकेचं नाव अन् पात्र वेगळं..!!
पण गोखले बाईंना आताच अवॉर्ड
पण गोखले बाईंना आताच अवॉर्ड मिळालं ना भावी सासूचं
भावी सुनेला पोरकं करून कशा गेल्या त्या की फक्त अवॉर्ड घ्यायलाच थांबल्या होत्या.
आता त्या अंबियेला कशी काय शकू
आता त्या अंबियेला कशी काय शकू जमेल कुणास ठाऊक. >>>>>>>> अगदी अगदी. सुप्रिया पिळगावकर किव्वा सुचित्रा बान्देकर हवी होती शकू साठी.
किशोरीने सहकुटुंब सोडली का. असं तर नाही की शुभांगी चालली तिकडे मामी म्हणून, अदलाबदल. बिग बॉस मध्ये तर नाही ना येणार शुभांगी. काही सांगता येत नाही या लोकांचं. >>>>>>>> राजा राणीची जोडी मध्ये आहे ना ती.
भावी सासू सून वगैरे अवॉर्ड
भावी सासू सून वगैरे अवॉर्ड देतात
कोण का कशासाठी?
सर्वोत्कृष्ट आतेबहीण, चुलत सासरे, मावस दिर असे नसतात का अवॉर्ड?
लेखकांनाही द्या की काहीतरी
सर्वोत्कृष्ट पाणी घातलेल कथानक, सर्वोत्कृष्ट लॉजिक, कोणताही रिसर्च न करता लिहिलेला प्रसंग
ओम्याला भावी सर्वोत्कृष्ट
ओम्याला भावी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार दिला नाही का?
राजा राणी च्या जोडीत गोखले
राजा राणी च्या जोडीत गोखले आईसाहेब म्हणुन चांगलं काम करतात. ती सिरीयल एकुणातच चांगली आहे इतर सिरीयल पेक्षा
आली एकदाचि किशोरी आंबिये...
आली एकदाचि किशोरी आंबिये... काय ते ध्यान... काय तो अभिनय... शकु करतेय कि शकिरा हेच कळेन...!!
कालचा एपिसोड बघून माझ्या
कालचा एपिसोड बघून माझ्या आईबाबांचं माझ्यावर प्रेम नाहीच की काय अशी शंका यायला लागलेय. एवढं कौतुक आमचं उभ्या जन्मात झालं नाही बाई! घरगुती हिंसाचाराची पोलिस कंम्प्लेंट करता येते हे लेखकाच्या लक्षात नसणार, किती काम आहे बिचार्याला.
शिरेल संपत आहे की काय..? कोणी
शिरेल संपत आहे की काय..? कोणी पाहत आहे का सद्ध्या..??
काल मी बर्याच दिवसांनी पाहिली तर धक्क्यावर धक्के बसले... एकाच एपिसोड मधे सगळं आटोपल्या सारखं दिसलं म्हटलं शिरेल संपली वाटते..!
काल कुठल्याशा इमारतीच्या टेरेसवर शुटिंग सुरू होतं. मोहित अन तायडा दोघे मिळून बिना मेकप वाल्या ष्वीटूला झाप झाप झापत असतात. झापण्याच्या ओघात तायडा ष्वीटुला तिने आजवर कशा प्रकारे तिला अन ओम्याला वेगळं करण्याचा प्रयत्न केला हे ऐकवत असते परंतु थोडं लांब ओम्या डझनभर पोलिसांना घेऊन हे सर्व ऐकतोय हे तायडाच्या गावीही नसतं. ओम्या अन पोलिसांच्या सोबतीला समस्त दळभद्री साळवी, रॉक्या अन बदललेली शकूआई आंबियेही असतात. एकाच वेळी हे सगळे तायडाचा पोलखोल स्वतःच्या कानाने ऐकतात अन विस्फारल्या डोळ्यांनी बघतात तेंव्हा कुठं तायडाच्या हे लक्षात येतं. बिना मेकपवाली ष्वीटू रड रड रडत असते.
तायडाचा पोलखोल झाल्यावर ओम्या तोंड कसनुसं करत लै जोराची लागलेली असताना टॉयलेट आतून बंद आहे अशा प्रसंगी जी अॅक्टिंग अपेक्षित असते तशी अॅक्टिंग करतो..!. तायडाला "मला एक बहीण होती हे विसरून जाईन" असं सांग्तो. मग तायडाला भावनिक करंट बसतो. अशा प्रकारे करंट बसलेल्या तायडाला पोलिस अटक करु पहाणार तोच एकेक जण तायडाला शेवटचे ज्ञान पाजायची संधी सोडत नाहीत. लगे हात दळभद्री साळव्यांच्या घराण्यातील महामेरू दादा साळवी तायडाला तिची औकाद दाखवून देतात. म्हणे त्यांनी तायडाला खूप आधीपासून सांगितलं होतं की अशा प्रकारे कोणाला त्रास देत जाऊ नका. तरिही तायडाने ऐकलं नाही अन आता त्यांच्याकडे एवढे पैसे असुनही घरचा एकही माणुस तिच्या सोबत नाही.. उलट ष्वीटुकडे बघा... तिच्याकडे भलेही पैसे नाहीत परंतू सर्व कुटुंब तिच्यासोबत आहे वगैरे वगैरे... मागोमाग महामाठ काकू पण घालून पाडून बोलण्याच्या अविर्भावात पुढे येते अन कसेबसे एक वाक्य फेकते.
मग तायडा शकू आयांबियेकडे जाते अन तिच्या पायावर लोटांगण घालते. परंतू शकू आयांबिये डाव्या अक्कलदाढे पासुन उजव्या अक्कलदाढेपर्यंत स्वतःची पूर्ण बचाळी दिसेल इतके वीतभर ओठ फाष्टत तायडाच्या खाडकन कानाखाली ठेऊन देते (केवळ या शॉटसाठी शुभांगी गोखलेला बदलुन किशोरी आंबियेंना घेतलं असणार असं जाणवतं... शुभांगी गोखलेनी या शॉटला नुसतं "हो..हो.. बाळा.." म्हणत स्वतःचा एकही दात दिसू न देता तायडाचा गाल कुरवाळला असता हे आपल्या चाणाक्ष नजरेतून सुटत नाही...!!). आधीच करंट लागलेली तायडा ह्या अनपेक्षित मुस्काडफोडीने थिजून बर्फ होते. अन मग हीच संधी पकडत पोलिस इंस्पेक्टर समीर वानखेडेच्यावर तोरा दाखवत काँस्टेबलला ऑर्डर सोडतो की तायडाला पकडून घेऊन चला. थिजून बर्फ झालेली तायडा भेलकांडत पोलिसांसोबत जाते अन इकडे स्वीटू, शकू आंबिये, रॉकी रडू लागतात. ही संधी साधून मोहीत पळून जातो ज्याला थरारक स्टाईलने पाठलाग करून रॉक्या पकडतो अन त्याच वेळी ष्वीटू डिव्होर्स पेपर्स घेऊन मोहितकडून त्यावर सह्या घेते..!!
नंतर काहीतरी तत्त्वज्ञान पाजळत ष्वीटू अन ओम्या रडत बसतात. (संपली का शिरेल..?
)
इतक्यात सुटका नाही. पाण्याचा
इतक्यात सुटका नाही. पाण्याचा नवीन टँकर मागवण्यात आलेला आहे. उद्यापासून सढळहस्ते प्रत्येक एपिसोड पाणचट(आधीपेक्षा जास्त) करण्यात येईल हो!!!!!!!!!!!!!!!!!!
स्वीटू ज्या टोनमधे 'मला जायला हवं' वगैरे बोलतेय त्यावरून घरी जाऊन एकतर ती १५० चपात्या करेल किंवा ४०० कोटींचा बिझनेस उभा करेल. बघू आता.
अरे बापरे... म्हणजे शकू
अरे बापरे... म्हणजे शकू आयांबियेला अजुन बघावं लागणार तर..!!
मग हीच संधी पकडत पोलिस
मग हीच संधी पकडत पोलिस इंस्पेक्टर समीर वानखेडेच्यावर तोरा दाखवत काँस्टेबलला ऑर्डर सोडतो की तायडाला पकडून घेऊन चला. थिजून बर्फ झालेली तायडा भेलकांडत पोलिसांसोबत जाते ...
Submitted by DJ....... on 7 December, 2021 - 19:57
इथेतरी तायडीला पकडण्यासाठी महिला पोलीस आहेत की पुरुष पोलीस दाखवले आहेत??? मागे त्या विमानतळ प्रकरणात दाढी वाढवलेले पोलीस दाखवणाऱ्या डायरेक्टरकडून इतक्या बारीक तपशिलाची काय अपेक्षा ठेवणार म्हणा!
बाकी आता पुरुष पोलिसाने तायडीला पकडून नेले असेल तर मग एका महिलेचा विनयभंग झाला, ही संपूर्ण कारवाईच बेकायदेशीर आहे वगैरे कांगावा करणाऱ्या महिला अधिकार संघटनांना यात आणून अजून ५-२५ एपिसोडची सोय नक्कीच होईल!!!
बाकी त्या मोहितने चिन्याला ट्रेनमधून जाणीवपूर्वक पाडले होते ते उघडकीस आले का?
बाकी त्या मोहितने चिन्याला
बाकी त्या मोहितने चिन्याला ट्रेनमधून जाणीवपूर्वक पाडले होते ते उघडकीस आले का?>>>>> या घटनेचा एकदम उच्च दर्जाचा विडिओ तायडाने सोशल मीडियावर व्हायरल केला
शुभांगी गोखले ची रिएक्शन
शुभांगी गोखले ची रिएक्शन
अगदी अगदी हुबेहूब
इथेतरी तायडीला पकडण्यासाठी
इथेतरी तायडीला पकडण्यासाठी महिला पोलीस आहेत की पुरुष पोलीस दाखवले आहेत???>> आल्या होत्या २ लेडी पोलिस पण तायडाला घेऊन जायला त्या पुरेशा नव्हत्या म्हणुन सर्वांनीच थोडाफार हातभार लावला.
आज स्वीटूने बैलाला पळसाची
आज स्वीटूने बैलाला पळसाची पाने खाऊ घातली
का बरं..?
का बरं..?
काल मी फार दिवसांनी एपिसोड
काल मी फार दिवसांनी एपिसोड बघितला त्यामुळे कशाचा कशाला मेळ लागला नाही. हल्ली इथेही कोणी अपडेट्स देत नाहीए म्हणजे माझ्याप्रमाणे इतर देखील किकले असावेत
काल एपिसोड सुरू झाला तेव्हा ष्वीटू शिफॉनचं झगझगीत बेडशीट नेसून अंबरणाथला आली होती. तिच्याबद्दल पेपरात म्हणे काहीतरी छापून आलं होतं त्यामुळे ती साळव्यांना कसं तोंड दाखवावं या विचाराने भयंकर चिंतेत होती (ज्यांना कुठलंच तोंड नाही अशा दळभद्री साळव्यांना काय घाबरते ही..!!). ती साळव्यांकडे आल्यावर मग सगळे एकाचढ एक माठपणा करू लागतात. माठ चिन्या, महामाठ काकू, माठातला माठ काका, नली अन दादा साळवी ष्वीटू भोवती गोळा होउन आनंदाचे उधाण आणतात.. ते बघून प्रेक्षक उधाणात वाहून जातात. ष्वीटू दादांना अन नलीला पेपरात छापून आलेल्या बातमी बद्दल विचारते तर ते "ह्या: .... त्यात काय एवढं..!" म्हणुन पत्रकार दिनाच्या संध्येलाच पेपरवाल्यांची पुरती वेशीला टांगून ठेवतात..!! ते ऐकुन ष्वीटू खुश होते अन लगेच पोळ्या लाटायला घेते.. मग घडीच्या पोळ्याच लाटू लागते त्यावर नली करवादते. बिना घडीच्या लाट म्हणुन सांगते तर त्यावर ष्वीटु "आमच्याकडे अशाच पोळ्या असतात" असं म्हणते. ते ऐकुन महामाठ काकी अन नली एकमेकींकडे बघून दात काढू लागतात. (आता मला सांगा.... यात नलीला अन महामाठ काकीला दात काढण्यासारखं काय आहे..? हे काही नव्या नवरीचं कौतुक लावलंय या साळकाया-म्हाळकायांनी..?? ष्वीटूला झी सलामत तो लग्नं पचास असा वर मिळाला आहे. ती पुढे अजुन ४८ लग्नं करेल अन यांच्या घरी पोळ्या लाटायला येईल म्हणुन काय या दोघी ४८ वेळ अशाच दात काढणार का आता..??
)
शेवटी तायडा शकू आयांबियेचे कान भरत असते. शकू आयांबिये एकदम आयांबियेच वाटत असते मात्र तायडा एकदम गरीब घरची गाय सारखे कपडे घालून बसलेली असते.. अगदी पहावलीच नाही मला.. ज्या ठिकाणी फुले वेचली त्या ठिकाणी तायडाला गोवर्या गोळा करतान बघून कसंसंच झालं..!!
खाली गार्डन मधे शिफॉनचं बेडशीट नेसलेली श्वीटू मिडियाला चावत असते (बाईट देत असते..!). मिडियावाले तिला काहीही प्रश्न विचारत असतात पण श्वीटू मात्र इमाने-इतबारे एकेकाला चावून चोथा करत असते. एका निबरट प्रश्नाला मात्र घुम्यासारखा उभा असलेला ओम्या तोंडात घेतो.. काहीबाही बरळत प्रश्न दाता वेगळा करतो..! (काय दिसू लागलाय ओम्या.... पुरता निब्बर..! काय करेल बिचारा... शिफॉनचं बेडशीट समोर असल्यावर त्याला देखील मांजरपाटाचं पोतं झाल्याचा फील येत असावा..!!)
नक्की काय झालंय इथे..? कसली बातमी छापली गेली होती पेपरात..?? अन ही ष्वीटू कशाला साळव्यांच्या घरी पोळ्या लाटायला जाते आता..??? तायडा अशी का सडाकली गेली आहे..???? आयांबियेला शकू करायला जमत नाही का...???????
शकु ला अचानक व्हिलन केलय...
शकु ला अचानक व्हिलन केलय... अंबिये बाईंना गोखले बाईंसारखा मायाळु पणा झेपणार नाही म्हणुन लेखकाने त्यांचं कॅरॅक्टर च बदललय...
तायडा ने तात्पुरतं सगळ्यांनी तिला माफ करुन घरात घ्यावं म्हणुन गरीब पणाचं पांघरुण घेतलंय...
आता स्वीटु चा घरी हळुहळु सासुरवास चालु आहे...
लवकरच ओम्या ला पण गैरसमज करुन देतील आणि स्वीटु च्या विरुद्ध उभा करतील... मग ती बिचारी कशी बरं लढते या लोकांशी दाखणार आणि लेडीज बायकांची सिंपथी मिळवणार
हे सगळं... रोज " पुढील भागात " एवढंच बघुन कळालय...
मी पण कालच अचानक थोडा वेळ
मी पण कालच अचानक थोडा वेळ एपिसोड पाहीला.
नली स्विटूला सांगते की अगं घडीची पोळी नको करूस. तेल जास्त लागतं. मग ती श्रीमंताघरची सून अगंबाई आम्ही अशाच करतो नेहमी असं म्हणते. श्रीमंतीच्या कल्पनाही किती दरिद्री असाव्यात ह्या लेखकाच्या असं वाटलं. चपातीवाले साळवी फुलकेच देतात की काय मग इतके दिवस? हे चिटींग आहे.
इकडे dj तिकडे अमा....
इकडे dj तिकडे अमा....
शप्पथ सांगते या दोघांची फटकेबाजी च वाचायला मी हे दोन्ही धागे उघडते.....
God bless
तायडा आता भारतीय कपडे तेही
तायडा आता भारतीय कपडे तेही साधे सुती घालते. मागे काही बायका आलेल्या असताना (हळदीकुंकू सारखं काहीतरी) तायडा सांगते त्यांना की मी सहा महिने तुरुंगात होते. सहा महिन्यात तायडाच्या दणदणीत तब्येतीत काही फरक नाही. शकू सारखी आता तू खानविलकरांची सून आहेस म्हणून स्वीटूला छळत असते. मध्येच एक दुध उतू जाऊ देण्याचा ओम आणि स्वीटू महापांचट सीन होता. ओम स्वीटूला हिऱ्याचे कानातले घेऊन देतो. तायडा त्यांच्या रूममध्ये जाऊन स्वीटूच्या कानाला हात लावून एक हिरा काढून घेते असा अ आणि अ प्रसंग होता. तो हिरा ती स्वीटूच्या चहा कॉफी कशाततरी घालते. पुढे मी बघितलं नाही पण ज्या अर्थी स्वीटू जिवंत आहे त्या अर्थी ते ट्रेन मध्ये मिळणारे पाच रुपयाचे कानातले होते.
काही दिवसापूर्वी ओम आणि स्वीटू पुढे आणि बाकी वरात मागे असे बराच वेळ चालत होते. स्वीटू म्हणते आता आपले रस्ते वेगळे आणि ओम पण जा जिले अपनी जिंदगी म्हणत तिला निरोप देतो. लगेच ओम एका मोठया गाडीत बसलेला अतिशय श्रीमंत, लगेच स्वीटू परत आली आणि दोघांचे लग्न. ह्याच वेगाने मालिका संपवत का नाही. वैताग नुसता.
तायडा त्यांच्या रूममध्ये जाऊन
तायडा त्यांच्या रूममध्ये जाऊन स्वीटूच्या कानाला हात लावून एक हिरा काढून घेते असा अ आणि अ प्रसंग होता. >>
हा हा ..हे मी पण पाहिलं होतं प्रोमो मधलं.... एक माणूस जवळ येउन कानाला हात लावुन खडा काढुन नेतो तरी स्वीटु ढिम्म हलतं पण नाय... कुंभकर्णाची बहीण आहे का काय.... ? ..इथे आम्हाला रात्रीच्या वेळी बाथरुम मधल्या नळातुन सूक्ष्म आवाजात थेंब टपकत असला तरी जाग येते.... ... जवळ येउन कोणी अंगाला असं हात लावला तर किंचाळुन पुर्ण सोसायटी जागी करेन मी
हे सगळं... रोज " पुढील भागात
हे सगळं... रोज " पुढील भागात " एवढंच बघुन कळालय...>>




चपातीवाले साळवी फुलकेच देतात की काय मग इतके दिवस? हे चिटींग आहे.>>
इकडे dj तिकडे अमा....>>
तो हिरा ती स्वीटूच्या चहा कॉफी कशाततरी घालते. पुढे मी बघितलं नाही पण ज्या अर्थी स्वीटू जिवंत आहे त्या अर्थी ते ट्रेन मध्ये मिळणारे पाच रुपयाचे कानातले होते.>>
थे आम्हाला रात्रीच्या वेळी बाथरुम मधल्या नळातुन सूक्ष्म आवाजात थेंब टपकत असला तरी जाग येते.... ... जवळ येउन कोणी अंगाला असं हात लावला तर किंचाळुन पुर्ण सोसायटी जागी करेन मी>>
रॉकी पण बदलला आहे का?
रॉकी पण बदलला आहे का?
बाकी प्रतिसाद
Pages