बिबट्या !

Submitted by Kavyalekha on 12 December, 2021 - 15:24

बिबट्या !
सारं गाव चिंतेत पडलं होतं…. त्याने भयंकर उच्छाद मांडला होता…शहरापासून बऱ्याच आत असलेल्या त्या छोट्या गावात सध्या चर्चेला एकच विषय होता…तो म्हणजे गावा बाहेरील रानातल्या बिबट्याचा ...!
आज पारावर सगळी मंडळी जमली होती. साऱ्यांच्या तोंडी एकच गोष्ट होती. लक्ष्मणची आणि त्याच्यावर हल्ला करणाऱ्या बिबट्याची ...सरपंचासहित गावातली बुजुर्ग मंडळी काळजीत होती.
" पन म्या म्हनतो .. काय करायचं काय आता .. आपुलं गाव तसं छोटूस .. आडवाटेला .. गावात मानस बी कमीचं हाय ती .. त्यातनं पन त्या बिबट्याने मारली , तर काय व्हणार गावाचं ? ? "सरपंच वैतागत म्हणाले .
त्यांच्या बोलण्यात तथ्य होतं. गाव तसं लहानचं होतं. इनमीन पाच-पन्नास घरांच .. शहरापासून पार आत असल्यामुळे सरकारी नकाशावर त्याचा उल्लेख सुद्धा होता की नव्हता कोण जाणे.
.. सारे जमले होते पण किसन अजून काही आला नव्हता. प्रवीण आणि सचिन त्याचीच वाट बघतं होते. किसनच्या जिगरी दोस्तावर काल रात्री बिबट्याने हल्ला केला आणि अपररात्री तालुक्याहुन गावाकडे येणारा लक्ष्मण यावेळेस बिबट्याचे भक्ष्य ठरला. किसनला कुणी भाऊ अथवा बहीण नव्हते . लक्ष्मणचं आणि त्याच चांगलं जमायचं. लक्षमण वर झालेल्या हल्ल्यामुळे त्याला फारच मोठा धक्का बसला होता. लक्ष्मणच्या म्हातारीला आता कसे सांभाळायचे हे त्याला कळत नव्हते. सगळी क्रियाकर्म दुपारपर्यँत आटोपून मंडळी आपापल्या घरी गेली. पण लागलीच सरपंचानी ही मीटींग बोलावली. बिबट्याचं काय करायचं ह्यावर चर्चा रंगात आली असताना दूर वरून साऱ्यांना किसन येताना दिसला.
त्याच्या साऱ्या दोस्तांमध्ये तोच काय तो चार यत्ता जास्त शिकला होता. तालुक्याच्या लायब्ररीमध्ये जाऊन तो काय काय पुस्तक वाचत बसे. त्याच्या कडे काहीतरी हमखास उपाय असेल या आशेने साऱ्यांचे चेहेरे पल्लवित झाले.
लक्ष्मणच्या मृत्यूच्या धक्क्यातून अजून ही न सावरलेला किसन .. स्वःतच्याच तंद्रीत पारापाशी पोहोचला. उदासीच्या एका गाढ छायेने त्याचा मूळचा उजळ चेहरा प्रचंड काळवंडला होता.
‘’ या किसनराव समदी तुमचीच वाट बघत व्हते. ... झालं ते लई वाईट झालं बघा... पन त्येच्या मनात काय हाय ते कुणास ठावं असणार ... आपल्याला चांगलचं माहिताय कि लक्ष्मण तुम्हांस्नी धाकल्या भावासारखा व्हता. ..." सरपंचानी किसनच्या दुःखावर फुंकर मारायचा एक निष्फळ प्रयत्न केला.
... किसनचं मात्र कशातचं लक्ष नव्हतं. .. लक्ष्मण खरंच गेला यावर त्याचा विश्वासचं बसला नव्हता. त्याचे मन हे मानायला तयार होतं नव्हते. पण असं घडलं होतं खरं... ! त्यामुळे आज गावात लहान थोर साऱ्यांच्या तोंडी ' बिबट्या ' हा एकचं विषय होता. आताही बिबटयाच्या निकाल कसा लावायचा या चर्चेला पारावर उधाण आले होते.
आजपर्यंत त्या गावात असे कधीही घडले नव्हते . इतकी वर्ष त्या गावात जंगल जवळ असूनही कोणाही प्राण्याचा काही उपद्रव नव्हता आणि वाघ , सिंह , बिबटे तर कधीच त्या जंगलात नव्हते... त्यामुळे कोणालाच काळात नव्हतं कि हा आगन्तुक पाहुणा कुठून आलाय ते... ! प्रथम शेळ्या मेंढ्या .. आणि आतातर लक्ष्मण आणि एक वाटसरू, अशा दोन माणसांचा जीव गेला होता. आता तो माणसांच्या रक्ताला चटावाला होता का ?. ... काळजीच खरं कारण हे होतं सर्वांच्या...!
गावकऱ्यांनी वन विभागाला अनेक पत्रे लिहिली. पण एकाचेही धडं उत्तर आले नाही. काही पत्रे तर वेळेत पोहोचली कि नाही हेही त्यांना माहित नव्हते....
... '' अरे बेटा किसन , आता सरकार कडून काहीही अपेक्षा करणे व्यर्थ आहे. ... आपण पाठवलेली पत्रं तिथे कुणी वाचतं तरी का ह्याची मला शंका आहे. त्यातल्या अर्ध्या-अधिक पत्रांना त्यांनी केराची टोपली दाखवली असेल..... '' गावातले आणि एक बुजुर्ग नाना पाटलांनी लक्ष्मणच्या विचारात गुंतलेल्या किसनला भानावर आणायचा प्रयन्त केला.
'' पनं मग आपनं काय करायचं म्हणजे ठीक हुईलं ?? ... '' सरपंचानी आशेने नाना पाटील आणि किसन दोघांकडे बघितले.
'' अहो सरपंच , सरकार दरबारी आपला गाव खिजगणतीत पण नसेल... त्यांना आपल्या या छोट्याश्या गावाचा काही फरक पडत असेल असे काही वाटत नाही. मी म्हणतो आता आपणचं सर्वानी काय ते ठरवायला हवं . किसन तु तर खुप पुस्तकं वाचतोस . सारखा तालुक्याला येत-जात असतोस. तुझ्याकडे आहे का काही मार्ग त्याचा बंदोबस्त करण्याचा ?... " सरकारी अनास्थेमुळे हतबल झालेल्या नाना पाटलांनी किसनवरचं सारी जबाबदारी सोपवली. त्यांना खात्री होती , तो नक्की काही तरी करेल याची. किसन हुशार आणि चलाख होता. नेहमीच्या विषयांसहित सतत विविध पुस्तकं तो वाचत असे. जगातल्या गूढं आणि अकल्पित गोष्टी त्याला फार आकर्षित करतं. प्राण्यांची त्याला आवड होती. त्याबद्दलचे त्याचे वाचनहीं अफाट होते.
लक्ष्मणच्या अकाली मृत्यूने हादरलेल्या किसनने मनोमन ठरवलं होतं की या गोष्टीचा आज ना उद्या काय तो सोक्षमोक्ष लावायचा. ...तो बहुदा कुठल्याश्या पक्क्या इराद्याने पारापाशी आला होता. ...
'' मला माहित आहे ह्या सगळ्यावर आता आपल्यालाचं काय तो उपाय शोधावा लागणार.... अजून दुसऱ्या कुणाचा लक्ष्मण होण्या आधी लवकरात लवकर आपल्याला काहीतरी ठोसं पाऊलं उचलावी लागणारं .. !! मी हि ह्या साऱ्याचा फार दिवसांपासून विचार करतं होतो. .. मला एक कल्पना सुचलीये. थोडं लक्षं देऊन सर्वानी एकसाथ काम केलं ... तर कदाचित आपण त्या बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करण्यात यशस्वी होऊ . ..." असे म्हणून किसनने जमलेल्या सर्वांकडे एक नजर टाकली. किसन आता आपल्याला काय करायला सांगणार आहे , इथे साऱ्यांचे डोळे लागले . सरपंच हातावर हात चोळत अधीरतेने त्याच्याकडे बघत होते. प्रवीण , सचिन , नयन ह्या किसनच्या दोस्तमंडळींच्या चेहऱ्यावर नेहमीचीच उत्सुकता होती. .. त्या साऱ्यांमधला तो हिरो होता.... तो जे बोलेलं ते करायला ते एका पायावर तयार होते. '' आम्ही सारं काय तुझ्या शब्दाबाहिर न्हाईत . तू सांग फक्त.. ." नयन तरातरा पुढे येऊन म्हणाला.
" हो किसन , तु जे म्हणशील त्यात आम्ही तुला साथ देऊ. कारण मला विश्वास वाटतो की तु जे सांगशील ते साऱ्या गावच्या भल्याचंच असेलं..''. नाना पाटलांनी नयनची री ओढतं , जणू किसनच्या योजनेला आधीच होकार भरला होता. ...
गेला एक महिना तो आणि लक्ष्मण या योजनेचा चा विचार करत होते... पण सर्व तडीस नेण्याआधीचं लक्ष्मणवर काळाने घाला घातला. आत जे करायचे ते त्याला एकट्याला पुढाकार घेऊन करावे लागणार होते....
किसन बोलू लागला ...
'' उद्या रात्रीचं आपल्याला हे काम फत्ते करायचे आहे.... " .. गोंधळलेल्या गावकऱ्यानां हात वर करून दिलासा देतं त्याने बोलणे पुढे चालू ठेवले.... '' आज आपण सगळा फायनल प्लॅन बनवूया .. कोणी काय करायचं ते मी आधीचं ठरवलेलं आहे . तर सारे नीट ऐका, तसा हल्ली तो गावातून रोज काहीतरी पळवतोचं ... कधी कुणाची कोंबडी ... तर कधी कुणाची बकरी .. त्याप्रमाणे उद्या रात्री हि तो नेहमींसारखा गावात शिरेल. तेव्हा आपण त्याच्यासाठी गावाबाहेर वेशीवर सावज बांधून ठेवायचं . ... एकदा का तो झडप घालायला आला की , त्याच्या अंगावर वर बांधलेलं जाळं टाकायचं आणि एकदाका तो जाळ्यात अडकला की पाटलांच्या जुन्या बंदुकीने मी त्याला संपवेन.... कोणाला तरी हे धाडसं करावंच लागेलं.. दुसरा काहीचं इलाज नाही ए आपल्याकडे. "
किसनची योजना एकूण सगळे एकदम चूप झाले. त्याला नाही म्हणणं शक्य नव्हतं .. पण ' हो ' तरी कसं म्हणायचं ,अशा संभ्रमात सगळे एकमेकांकडे बघू लागले.... नाना पाटील आणि सरपंचांना मात्र किसनच्या हुशारीचं कौतुक वाटलं. त्यांनी लागलीच ह्या कामगिरीला होकार दिला. नाना पाटलांची बंदूक ह्या आधीही बरोबर नेम धरून चालवणारा किसनचं होता .... हो ना करता नाईलाजाने का होईना सर्व तयार झाले. ... भीती तर खूप वाटतं होती... पण लक्ष्मण नंतरचा बळी आपण नसावं असही प्रत्येकाला वाटतं होतं. ... त्याचं भीतीच्या सावटाखाली सर्व किसनच्या सूचना ऐकत होते... किसन त्यांना धीर देत होता. अखेर एकमतानं दुसऱ्या दिवशी रात्री साऱ्यांनी गावच्या वेशीपाशी जिथून जंगल सुरु होतं तिथं भेटायचं ठरलं. एक विचित्र हुरहूर घेऊन सारे घरी गेले... आणि किसन .. त्याने तर पक्क ठरवलं होत... उद्या काहीही झालं तरी त्याला एकदाचं भिडायचं... इतरांप्रमाणे तोही घाबरला असला .. तरी तेवढाच तो उत्सुक होता. अशा साहसाचा त्याच्यापाशी एक अनुभव होता. .. एकदा अपरात्री तालुक्यावरून येताना गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर त्याचा दोन चोरांशी सामना झाला ... त्या अनपेक्षित हल्ल्याने प्रथम बावरलेला किसन डबल ताकदीने त्यांच्यावर धावून गेला. शिवाय जवळ बाळगलेल्या सूऱ्याने त्याने त्यांना जखमी करून घाबरवून , पळवून लावले. .. हाच धीटपणा आणि प्रसंगावधान त्याला उद्याही दाखवायचे होते.
साऱ्या तयारीनिशी दुसऱ्या दिवशीचा सूर्योदय होण्याची वाट बघत तो झोपी गेला.... नेहमीच्या कामांमध्ये दिवस कसा गेला कळलेच नाही.
अखेर एकदाची ती रात्र उजाडली. कोणाचेच जेवणात लक्ष्यं नव्हते. .. सर्व कामं आटोपून सारे ठरल्या जागी जमले.
पोर्णिमेचं सुरेखं टिपूरं चांदणं पडलं होतं... हवेत बराच गारठा होता. . सारा गावं निपचित पडून होता. रातकिड्यांची किरकिर सोडता सारं कसं निश्चल होतं.
.. सावज ठरल्या ठिकाणी बांधण्यात आलं ..... कोणीही कुणाशी जास्त काही बोलत नव्हतं ... पुढे काय होईल ह्याची एक भीती मिश्रित उत्सुकता साऱ्यांना होती. .. तालुक्याहुन आणलेले मासे पकडण्याचे जाळे वर बांधण्यासाठी दोघेजण झाडावर चढले... जाळे बांधून झाले....
इतक्यात त्याची चाहूल लागली . ... दूर कुठेतरी पानांची सळसळ ऐकू आली . झाडावरची मंडळी फांदी आडून काही दिसतंय का ते बघू लागली. नाही म्हणता आता सारे धास्तावले. जोवर ' त्याला पकडणे ' हि एक कल्पना तोवर ठीक होते. .पण आता प्रत्यक्षात काहीही होऊ शकते , हे जाणवल्यावर साऱ्यांचे धाबे दणाणले.... आधीच ओढून ताणून आणलेले अवसान गळून पडले..
.. तो जवळ येत होता. अंतर हळूहळू कमी होतं होते... साऱ्यांचे श्वास रोखला गेले ... आणि अंधारात दोन पिवळीधम्मक काजव्यासारखी बटणं चकाकली. सगळीकडे स्मशानशांतता पसरली... तो अजून काही पाऊलं पुढे आला.... आता सर्वांनाच तो लख्ख दिसला.
सगळ्यांना पुरून उरेल इतका तो ताकदवान होता.
.. त्याची ती मर्दानी चाल ; आपल्या सावजाचा माग घेणारी धुर्त नजरं ; एका दमात नरडीचा घोट घेणारे सुळ्यासारखे श्वेतवर्णी दात ; त्याचा डौल वाढवणारे ते मांसल पाय आणि जणु पाचवा पाय वाटावा अशी लांबलचक झुपकेदार शेपटी. ...!
पौर्णिमेच्या पांढऱ्या शुभ्र प्रकाशात एखाद्या अनभिषिक्त सम्राटासारखा तो धीम्या गतीने पुढे येत होता. ..
आता तो क्षण जवळ आला होता. .. त्याने शिकार पकडण्याच्या वेळेस त्याचीच शिकार करण्याचा !
परंतु निसर्गाचे वर्चस्व अबाधित आहे ..याच सृष्टीतला प्रत्येक प्राणी सुद्धा याला अपवाद नाही. माणसाने कितीही जरी प्रयन्त केले आपली सत्ता गाजवण्याचा तरीही निसर्ग माणसापेक्षा नेहमीच मोठा ठरला आहे. माणूस भूतलावर सर्वश्रेष्ठ असूनही असा एकमेव प्राणी आहे जो आपल्या सहज प्रवृत्तीप्रमाणे वागत नाही. जो आपल्या अंत: प्रेरणेला बरेचदा धुडकावून लावतो. बाकीचे प्राणी मात्र याला असा नाही करत. त्यांचे जगणे ; त्यांचे वागणे ; सवयी सारे त्यांच्या नैसर्गिक वृत्तीला साजेसेच असते ... हाही काही वेगळा नव्हता .त्याच्या चाणाक्ष नजरेला काहीतरी कळले असावे.... त्याला पकडण्याचा घाट घालणाऱ्या माणसांपेक्षा तर तो नक्कीच हुशार होता..
जणू सगळे आडाखे चुकले होते. .. त्याने दगा दिला की त्याने आपले खरे सावजं बरोबर ओळखले कुणास ठाऊक !..
कुणाला काही कळण्याअगोदर त्याने लपून बसलेल्या किसनवरचं झेप घेतली. त्याक्षणी बाकी सारे तिथून जीव मुठीत घेऊन पळाले. किसनचं काय होतंय हे बघायला कुणी सुद्धा थांबलं नाही .
आणि किसन .. तो .. तो प्रथम जिवाच्या आकांताने ओरडला. परंतु असं काही होईल अशी त्याला पुसटशी कल्पना असावी म्हणून तो सावध झाला. त्याने खुबीने बिबट्याची उडी चुकवली. .आणिक जवळच्या बंदुकीच्या मागील भागाचे दोन जोरदार फटके त्याच्या डोक्यात मारले . या अनपेक्षित प्रतिहल्लयाने बिबट्या गोंधळला. त्याच्या नाका -तोंडातून रक्ताची धार लागली. जखमी तो आता चांगलाच चवताळला. गुरगुरू लागला . परत नवीन हल्ला करायच्या प्रयत्नात तो असताना किसनने बरोबर नेम धरून त्याच्या डोक्यात मधोमध एक गोळी झाडली.पाठून अजून दोनदा बंदूक चालवून किसनने त्याला पुरते गारद केले. ..
आणि अचानक सगळा थरार संपला. सारं काही स्तब्ध झालं. मगापासून चाललेला जीवन मरणाचा खेळ एकाएक बंद पडला. काही क्षण आपण मेलो आहोत की जिवंत हेच किसनला कळेना. त्याचा श्वास फुलला होता.. वेगात धावणाऱ्या ट्रेनसारखे काळीज अजुनही धडधडत होते. पाय लटपटत होते. एकही पाऊल पुढे उचलवत नव्हते. त्याने तिथेच बसकण मारली. भीती ; आनंद ; आश्चर्य अशा सगळ्या भावना जशा काही एकत्र उचंबळून आल्या होत्या . त्याची परिणीती म्हणून त्याचे डोळे वाहू लागले. त्याने नकळत आकाशाकडे बघून हात जोडले. तेव्हा त्याच्या लक्षात आले की जाता जाता बिबट्या त्याला त्याच्या नखांच्या ओरखड्यांचा प्रसाद देऊन गेला आहे . त्याच्या थरथरणाऱ्या हातांवर चार रक्तवर्णी समांतर रेषा उमटल्या होत्या. शिवाय चेहऱ्यावर एक मोठा लालसर व्रण उठला होता. .. बधिर झालेल्या मनाला आता कुठे झाल्या प्रकाराची जाणीव होत होती. त्याची नजर जवळच्या मृत बिबट्याकडे गेली. काही क्षणांपूर्वीचे मृत्यूचे तांडव त्याच्या डोळ्यांपुढून एखाद्या सिनेमासारखे येऊन गेले. तो स्वतःच्याच विचारात गढून गेला.
'' आपण अखेर त्याला संपवले. .. आपण एकट्याने हे केले .. बाकी सारे घाबरून पळून गेले.. सगळे सारे डरपोक ..! अरे माणसाने कसं हिंम्मतवान असावं . समोर आलेल्या संकटाला अंगावर घेण्याची दानत असायला पाहिजे माणसात !!..." तो स्वतःवरच खुश झाला. एरव्ही अख्ख्या गावाला हादरवून सोडणारा हा बिबट्या आता कसा गप्पगार पडला होता.
" किती रुबाबदार आहे हा ... ! एक माज आहे याच्यात ...एक अनोखा डौल आहे याच्या चालीत !.''.. कुठल्याश्या पुस्तकात वाचलेले बरेच काही त्याला आठवू लागले.
" मार्जार जातीतला हा सगळ्यात जलद आणि भयंकर शक्तिशाली प्राणी जगातल्या ताकदवर जनावरांपैकी एक !......त्याचा माग काढणं अतिशय कठीण .. ! ताशी ५८ किमी वेगाने पळणारा ... सर्वात उंच उडी मारणारा ... झुंडीत न राहता एकेकटा राहणारा ... शिकारही एकटाच करणारा .. इतकेच काय तर स्वतः च्या वजनापेक्षा जड शिकार घेऊन झाडावर चढणारा असा अवलिया !..
दिवसा आराम तर रात्री काम करणारा .. उत्तम पोहणारा .. कधी बर्फात राहणारा ; कधी रानात संचार करणारा ; कधी काळंकुट्ट तर बहुत करून अंगावरच्या मऊ केसांमध्ये गुलाबाच्या पाकळ्यांसारखे ठिपके असलेलं मायावी आणि गूढ असा हे मांजर !!"
" वेगवान ; उग्र ; रानटी अश्या ह्या आपण आज संपवून टाकलं !"
तो भारावल्या सारखा निष्प्राण बिबट्याकडे बघु लागला.
त्याच्या संवेदना जशा परत येऊ लागल्या तसे त्याचे पूर्ण अंग ठणकू लागले. उठवत नसतानाही कसाबसा चालत धडपडत तो गावाकडे परतु लागला .
पारापाशी संबंध गाव गोळा झाला होता . बंदुकीच्या फैरींचा आवाज सर्वांनी ऐकला होता. .. गावकऱ्यांमध्ये चाललेली कुजबुज किसनला येताना बघून थांबली. किसनला जिवंत पाहून सारे आनंदित झाले. कुणी त्याला पाणी आणून दिले ;; कुणी त्याच्या जखमा साफ करू लागले. लहान थोर जमलेले सारे त्याच्या नावाचा जयजयकार करू लागले. गावावरचे एक मोठे संकट टळले होते.
त्या रात्री तो गाव फार दिवसांनी शांततेत निजला. ...
नंतरचे काही दिवस किसनची शौर्यगाथा किसन सोडून जो तो रंगवून सांगत होता. प्रत्येकाच्या तोंडी किसनचेच नाव होते. असेच काही दिवस गेले.
आता त्याच्या जखमा तशा भरत आल्या होत्या. पुरेशी विश्रांती घेऊन झाली होती.
आज मात्र किसन जरा जास्तच बैचेन होता. त्यालाही खरं कारण काही कळतं नव्हतं. आजचा दिवस त्याला जरा विचित्रच वाटत होता. सकाळपासून मनाला एक अनामिक हुरहुर लागून राहिली होती.संध्याकाळी सूर्य अस्ताला गेल्यावर त्याची बैचेनी अजून वाढली. त्याला कसे नुसे होऊ लागले. आता ही कुठल्या नवीन अशुभाची चाहूल तर नाही ना ह्या विचाराचा भुंगा डोक्यात भुणभुणु लागला.
रात्र चढत होती. .. पौर्णिमेचा चंद्र आकाशात खुलून दिसत होता. त्याच्या शीतल प्रकाशात बरे वाटेल म्हणून किसन माळरानावर भटकत होता. ..
त्याने एक मोक्याची जागा निवडली. आभाळाकडे नजर लावून एका दगडाच्या आडोशाला तो पहुडला.
वर दिसत असलेलं काळेकुट्ट आकाश आणि त्यात तो पांढराफटक गोळा !..
काळा आणि पांढरा दोनच रंग ..!
जशी कि सारी सृष्टी कृष्णधवल रंगाचीच होती. एखाद्या ब्लॅक अँड व्हाईट सिनेमासारखी. ...
माळरानावर दुसरे कुणीच नव्हते .. थंड वारं सुटलं होत. दूर कुठेतरी जंगलात कोल्हेकुई तेवढी ऐकू येत होती.
रात्र पुढे पुढे सरकत होती. पौर्णिमेच्या चंद्राचा मंद उजेड किसनच्या चेहऱ्यावर पडला होता. आणि ...
अकस्मात रानातून येणार ते सारे आवाज बंद झाले. सारं काही शांत ; स्तब्ध झालं. काही क्षण असेच गेले.
... आणि त्या ओसाड माळरानावर पुन्हा एकदा पिवळीधम्मक काजव्यासाखी बटणं लखाखली. पुढचे मांसल पाय ताणून त्याने अंग झटकले . मिशांवरून जीभ फिरवत , झुबकेदार शेपटी हलवत तो संथ गतीने गावाच्या दिशेने चालू लागला.
त्याला प्रचंड भूक लागली होती.
मांजरीच्या पावलाने चालत तो गावाच्या वेशीजवळ आला . .. कुणाचं तरी वाट चुकलेलं जनावर तिथे चरत होतं. इतक्यात त्याने एका झटक्यात चपळाईने उडी मारून त्याच्या नरडीचा घोट घेतला. ... आपली केलेली पहिली शिकार तोंडात गच्च धरून तिला ओढत नेत तो जंगलातल्या काळोखात नाहीसा झाला....
किसनला जाग आली तेव्हा लख्ख उजाडलं होतं . घाईघाईने उठून कपडे झटकून तो घराकडे निघाला. वाटेत पारापाशी चाललेला गोंधळ ऐकून तो थांबला .. त्याच्या शेजारच्या मंगेशची एक शेळी काल संध्याकाळपासून गायब होती. त्याविषयीचं सगळे बोलत होते. अखेर वाट चुकून ती जंगलात गेली नसेल ना असेच सगळ्यांचे मत पडले. हळूहळू मंडळी आपल्या कामाला गेली. दिवस नेहमीसारखा सुरु झाला. .. आणि किसन ...
तो .. त्याला आज काहीच करावेसे वाटतं नव्हते... मटणाचे भरपेट जेवण झाल्यावर एक सुस्ती येते .. तसेच काहीसे त्याला वाटत होते. अंगणातल्या बाजेवर आळसात ऊन खात पडावे अशी एक जबरदस्त उर्मी त्याच्या मनात दाटून आली. तो आज काहीच करणार नव्हता.
मंगेशच्या हरवलेल्या शेळीचा किस्सा आठवावा असेच काहीतरी पुढच्या पौर्णिमेला घडले.
काल रात्री नाना पाटलांची म्हैस कुणीतरी मारली होती. .. शेतावरच्या गोठ्यात दुसऱ्या दिवशी सगळा रक्ताचा सडा पडला होता. जनावर गोठ्यात एकटीच होती . सोबतीला कुणी राखणदार नव्हता. कोल्हे - लांडगे इतक्या वर्षात कधी शेतात आले नव्हते. साऱ्यांचे धाबे दणाणले . बिबट्या तर मरण पावला होता. मग अजून कुणी नवीन वाघ , नवीन बिबट्या तर आला नाही ना जंगलात या विचाराने सारेच चिंताक्रांत झाले. आता कुठे एकाचा बंदोबस्त केला होता. परत आणखी काय विघ्न उपटलं होत कोण जाणे , याकरता परत एकदा पारावरती बैठक जमली.
नाना पाटील ; सरपंच ; किसनची दोस्त मंडळी सारीच हजर होती. नव्हता तो फक्त किसन.
आज त्याला काहीच करावेसे वाटत नव्हते.
नुसतं आळसात लोळावं... कुणाशी न बोलता ऊन खात पडून रहावं. दिवसभर झोपा काढाव्यात .. असचं काहीस त्याला वाटत होतं.
आता दर पौर्णिमेनंतर हे असचं होणार होतं. तो दुसऱ्या दिवशी काहीच करणार नव्हता.
भरल्या पोटी अंगणातल्या खाटेवर आरामात सूर्यस्नान करत पहुडणार होता !!! ...

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त

वाह ! छान कथा आहे, खेडवळ बाज अजून देता आला असता तेवढा स्कोप "बोली लिहिताना" नक्कीच असतो, पण एकंदरीत वातावरणनिर्मिती आणि कथाबीज आवडले, भरपूरच आवडली कथा.