#हेल्पलाईन_155260

Submitted by Kavita Datar on 30 November, 2021 - 07:04

दिनकर राव आज आनंदात होते. थोड्या वेळापूर्वी पेन्शन जमा झाल्याचा बँकेकडून एसेमेस आला होता. चांगल्या मार्क्स नी ग्रॅज्युएट झालेल्या त्यांच्या नातीला, सुमेधाला लॅपटॉप घेऊन देण्याचे त्यांनी कबूल केले होते. अचानक त्यांचा मोबाईल फोन वाजला. स्क्रीन वर अनोळखी नंबर झळकला. त्यांनी फोन घेतला.

"गुड इव्हिनिंग सर ! मी बीएसएनएल ऑफिस मधून बोलतेय.."

"बोला..."

"सर, आपलं केवायसी अपडेट पेंडिंग आहे. त्यासंदर्भात कॉल केलाय..."

"तुम्ही उद्या कॉल करा ना..आत्ता मी घाईत आहे..."

"सर, आज लास्ट डेट आहे...केवायसी अपडेट झालं नाही तर तुमची मोबाईल फोन सर्विस उद्यापासून बंद होईल.. फक्त दोन मिनिटांचं काम आहे..."

"ओके... मला काय करावं लागेल ?"

मोबाईल फोन बंद होण्याच्या भीतीने दिनकर रावांनी केवायसी अपडेट करायचं ठरवलं.

"तुम्हाला एक एसएमएस येईल... त्यातील लिंक वर क्लिक करून एक फॉर्म दिसेल तो भरायचा आहे. मी फोन चालू ठेवते, तुम्ही बघा एसएमएस आलाय का ?"

तिचं बोलणं सुरु असतानाच त्यांनी मेसेजेस चेक केले. BZ-BXNLKC या नावाने एसएमएस आलेला दिसत होता.

"हो...आलाय एसेमेस..."

त्यांनी फोनवर बोलणाऱ्या मुलीला सांगितलं.

"ओके...त्यात एक लिंक असेल, ती ओपन करा."

त्यांनी एसएमएस मधली लिंक क्लिक केली. एक फॉर्म ओपन झाला. त्यात त्यांचे पूर्ण नाव, पत्ता आणि आधार कार्ड नंबर टाकायचा होता. फॉर्म भरल्यावर खाली एक बटन ऍक्टिव्हेट झालं. त्यावर Submit & Pay असं लिहिलेलं दिसत होतं.

"ते खाली बटन दिसते...त्यावर Submit & Pay लिहिलंय... ते कशासाठी आहे ?"

"सर तुमचा फॉर्म सबमिट होईल. तुम्हाला फक्त दहा रुपये लेट चार्जेस भरावे लागतील. त्यासाठी ते बटन क्लिक करा."

फक्त दहा रुपये भरावे लागतील, म्हणून फारसा विचार न करता दिनकर रावांनी ते बटन क्लिक केले. बटन क्लिक केल्यावर नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि यूपीआय असे पर्याय समोर आले. त्यांनी नेट बँकिंग चा पर्याय निवडला.

कस्टमर आयडी आणि पासवर्ड टाकून त्यांनी दहा रुपये भरले. त्याबरोबर त्यांना एसएमएस आल्याचे नोटिफिकेशन मिळाले.

"थँक्यू सर ! आता आपले केवायसी अपडेट झालेय. आपला बहुमूल्य वेळ आम्हाला दिल्याबद्दल धन्यवाद."

एवढे बोलून तिने फोन कट केला.

मघा आलेला मेसेज कसला आहे? ते बघण्यासाठी म्हणून दिनकर रावांनी सहज मेसेज उघडला. मेसेज वाचून त्यांचे हात पाय थरथरू लागले... त्यांच्या बँक अकाउंट मधून दोन लाख डेबिट झाल्याचा तो मेसेज होता. बँकेतील आधी जमा असलेले दीड लाख आणि आत्ताचे पेन्शनचे पन्नास हजार असे एकूण दोन लाख कोणीतरी काढून घेतले होते.

थरथरत्या आवाजात त्यांनी सुमेधाला हाक मारली. सुमेधा धावतच त्यांच्या खोलीत आली.

"काय झालं आजोबा ? बरं वाटत नाही का?"

त्यांनी तिला झालेला प्रकार सांगितला.

अलीकडेच भारत सरकारच्या गृह खात्याने कुठलातरी हेल्पलाइन नंबर आर्थिक सायबर गुन्हा झाल्यानंतर वापरण्यासाठी लॉन्च केल्याची माहिती तिने कुठेतरी वाचली होती. पण नेमका तो नंबर तिला आठवत नव्हता. तिने ताबडतोब इंटरनेटवरून तो नंबर शोधून काढला 155260.

दिनकररावांना त्यांच्या बँकेचे पासबुक मागून घेऊन, तिने तो नंबर डायल केला. तीन-चारदा डायल केल्यावर तो नंबर एकदाचा लागला. पलीकडून बोलणाऱ्या ने सुमेधाला दिनकर रावांचे पूर्ण नाव, त्यांच्या बँक अकाऊंट चे डिटेल्स आणि किती वाजता, किती पैसे काढले गेल्याचा एसेमेस आला ते विचारलं. सुमेधाने त्यांना पाहिजे ती माहिती दिली.

थोड्या वेळाने दिनकर रावांच्या फोनवर या हेल्पलाइन कडून एक मेसेज आला. त्यात एक युनिक नंबर दिला होता. हा नंबर वापरून सायबर क्राईम पोर्टलवर वर तक्रार नोंदवावी असे निर्देश त्या मेसेज मध्ये दिले होते.

त्याप्रमाणे सुमेधाने त्यांच्याच मोबाईल वरून https://cybercrime.gov.in हे पोर्टल ओपन करून सगळी माहिती भरून, हेल्पलाइन कडून आलेला युनिक तिकीट नंबर टाकून तक्रार नोंदवली.

सायबर चोराने काढून घेतलेले दिनकर रावांचे सर्व पैसे तीन दिवसांतच पुन्हा त्यांच्या खात्यावर जमा झाले.

भारत सरकारच्या गृहमंत्रालयाने 2020 मध्ये 155260 ही हेल्पलाईन आर्थिक सायबर गुन्ह्यांचा तपास लावण्यासाठी सुरु केली आहे. https://cybercrime.gov.in या पोर्टलशी ही हेल्पलाईन संलग्न आहे. दिल्ली, राजस्थान, उत्तराखंड, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, आसाम, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांत ही हेल्पलाइन 24 * 7 कार्यरत आहे. बाकीच्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात दहा ते सहा या वेळेत की हेल्पलाईन चालू असते. या हेल्पलाईन द्वारे बहुतेक बँका, काही मोठी व्यापारी प्रतिष्ठाने आणि वॉलेट जोडले गेले आहेत.

हेल्पलाईन चे काम कसे चालते?

आर्थिक फसवणूक झालेल्या व्यक्तीला फक्त हेल्पलाईन 155260 डायल करावी लागेल. त्यानंतर, एक पोलिस ऑपरेटर फसवणूकी च्या व्यवहाराचे तपशील आणि फसवल्या गेलेल्या व्यक्तीची मूलभूत वैयक्तिक माहिती नोंदवेल.

त्यानंतर हे तपशील सिटीझन फायनान्शियल सायबर फ्रॉड्स रिपोर्टिंग आणि मॅनेजमेंट सिस्टमवर तिकिटच्या स्वरूपात सबमिट करतील.

पीडित व्यक्तीच्या बँकेकडून माहिती घेऊन, फसवणूक केलेले पैसे ज्या बँक/वॉलेटमध्ये गेले आहेत, त्यावर अवलंबून हे तिकीट संबंधित बँका, वॉलेट, व्यापारी इत्यादींना पाठवले जाईल.

क्रमांकासह तक्रारीची पोचपावती पीडित व्यक्तीला एसएमएसच्या स्वरूपात पाठवली जाईल. नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर (https://cybercrime.gov.in/) 24 तासांच्या आत, पावती क्रमांक वापरून फसवणुकीचे संपूर्ण तपशील सबमिट करण्याचे निर्देश देखील यात असतील.

संबंधित बँकेला रिपोर्टिंग पोर्टलच्या डॅशबोर्डवर तिकीट दिसेल. त्या अनुषंगाने ती बँक सिस्टममध्ये व्यवहाराचे तपशील तपासू शकेल.

फसवणूक केलेले पैसे अद्याप उपलब्ध असल्यास, बँक ते होल्डवर ठेवते, म्हणजे फसवणूक करणारा हे पैसे काढू शकत नाही. तथापि, फसवणूक केलेले पैसे दुसर्‍या बँकेत गेले असल्यास, तेच तिकीट पुढील बँकेकडे पाठवले जाते ज्यामध्ये पैसे गेले आहेत.

फसवणूक करणार्‍यांच्या हाती पैसे जाण्यापासून वाचवण्यापर्यंत प्रक्रिया पुन्हा केली जाते.

सध्याच्या डिजीटल युगात, सायबर चोरांना बळी पडणाऱ्या पीडित व्यक्तींसाठी ही हेल्पलाईन म्हणजे एक मोठे वरदान आहे. शक्यतो या हेल्पलाईनचा वापर गुन्हा घडल्या बरोबर लगेच केल्यास नुकसानी टाळता येऊ शकेल. आर्थिक सायबर गुन्ह्याला बळी पडलेल्या व्यक्ती बँक अकाउंट बंद करण्यात, पोलिस स्टेशनच्या चकरा मारण्यात बहुमूल्य वेळ गमावतात. तोवर सायबर चोर त्यांचे पैसे घेऊन गायब झालेले असतात.

काही कारणाने या हेल्पलाइन चा वापर करता आला नाही तरीही, आर्थिक गुन्हा घडल्यानंतर ज्या बँकेतून पैसे गेले आहेत, त्या बँकेच्या तीन कामाच्या दिवसांमध्ये सायबर पोलिसांकडे केलेल्या एफ आय आर ची सही शिक्क्या सह असलेली कॉपी जरूर सबमिट करावी आणि पोच घ्यावी. असे केल्यास बँकेला 90 दिवसांच्या आत चोरी गेलेले पैसे परत द्यावे लागतात. तसे रिझर्व बँकेचे सर्व बँकांना आदेश आहेत. बँकेने पैसे परत न केल्यास फसवणूक झालेली व्यक्ती ग्राहक न्यायालयात देखील दाद मागू शकते.

सुरक्षित आणि सजग राहून टेक्नॉलॉजी चा वापर करा.

©कविता दातार

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

धन्यवाद मोलाची माहिती दिल्याबद्दल!
सायबर क्राईम ब्रांच बद्दल माहिती होते पण या पोर्टल आणि हेल्पलाईन क्रमांकाविषयी ठावूक नव्हते.

<< केवायसी अपडेट झालं नाही तर तुमची मोबाईल फोन सर्विस उद्यापासून बंद होईल. >>
किती मूर्खपणा आहे. मोबाईल फोन सर्विसला केवायसी कशाला लागते दरवेळी? फोन सर्विस देताना व्हेरिफिकेशन केले की प्रश्न मिटला. मुळात आलेल्या फोनवर नाव, पत्ता आणि आधार कार्ड नंबर अशी महत्वाची माहिती का देतात हे लोक आणि क्रेडिट कार्ड वापरायचे सोडून जिथे तिथे डेबिट का वापरायचे? अशा मूर्ख लोकांबद्दल अजिबात सहानुभूती नाही.

ता. क. : https://cybercrime.gov.in ही साईट चालत नाही आणि साईट सिक्युर नाही, असा मेसेज आला. एकंदरीत सगळीकडेच आनंदीआनंद आहे.

https://cybercrime.gov.in ही साईट चालत नाही आणि साईट सिक्युर नाही, असा मेसेज आला. एकंदरीत सगळीकडेच आनंदीआनंद आहे. >>

Site is perfectly secured and working. Sometimes helpline connects after 2-3 attempts. but it is also properly working and proving useful. It's an admirable step of home ministry against cyber crime.

दुसऱ्या एखाद्या कामासाठी दिलेल्या आधार कार्ड वा तत्सम कागदपत्रांचा दुरुपयोग करून कोणी भलत्याच लोकांनी सिम कार्ड घेऊन त्याचा दुरुपयोग केल्याचे प्रकार मागे घडले होते. आपल्या बाबतीत असे होत नाही ना हे पडताळून पाहण्यासाठी :
तुमच्या नंबरवर किती लोक मोबाईल सिम वापरताहेत, या वेबसाईटवरून कळेल माहिती - दैनिक सामना

https://tafcop.dgtelecom.gov.in/

हा ही लेख छान आहे व अश्या केसेस जवळ जवळ रोज पेपर मध्ये येत आहेत. मला पण असा फोन आलेला. मी ब्रांच मध्ये जाउन काय ते करीन म्हटले व नंतर अशी काय खरडपट्टी काढली आहे . इथे लिहूच शकत नाही.

स्मार्ट फोन मध्ये कॉल रेकॉर्डिन्ग सुविधा असते व त्या द्वारे तुम्ही सर्व कॉल रेकॉर्ड करून ठेवु शकता. एकदम हैबत मध्ये येउन काही करू नये. टेक अ डीप ब्रेथ. आपण ब्रांच मध्ये जाउच शकतो फिझिकली.

चांगले सटकावा त्या कॉलरला.

धन्यवाद या माहितीबाबत. सायबर क्राईमच्या इतर गुन्ह्यांबाबत कारवाई होत नाही असे अनुभव मित्र, ओळखीचे यांना आले आहेत. अपुरे मनुष्यबळ आणि वाढत्या तक्रारी यामुळे ते खरे असावे असे वाटते.
अशा एका अनुभवाच्या वेळी मी स्वतः पोलीस ठाण्यात गेलो होतो. तिथे चांगलाच अनुभव आला.

@कविता दातार, नमस्कार!
मला तुमच्याकडून एक माहिती हवी आहे. माझा मोबाईल नंबर DND (DO NOT DISTURB) मध्ये नोंदणीकृत आहे. मात्र ही DND settings WhatsApp ला लागू होत नाहीत.
एक व्यक्ती मला WhatsApp वर marketing msg पाठवत असतो. नको पाठवूस असे सांगितले तर उर्मटपणे (तुला msg नको असतील तर) Block Me असे उत्तर देतो. एक नंबर block केला तर दुसर्‍या नंबर वरुन msg पाठवतो. पुन्हा नको सांगितले तर Block me असे म्हणतो. तर या व्यक्तीच्या विरोधात तक्रार दाखल करता येऊ शकते का??? त्याच्यावर कोणत्या कलमांखाली कारवाई होऊ शकते? हे मी यासाठी विचारतो आहे कारण तो ज्या builder चे मेसेज पाठवतो त्या builder च्याच office मध्ये कायदेशीर पत्र पाठवून त्याची तक्रार नोंदवण्याचा मी विचार करतो आहे.

बॅंकेला ई-मेल पाठवून ३६ लाख रुपये दुस-याच्या खात्यात वर्ग केल्याची बातमी नुकतीच वाचली. बहुतेक ई-मेल हॅकींगचा प्रकार असावा...

ई-मेल वरुन बॅंक असे पैसे वर्ग करु शकते ?
RBI guidelines नुसार खातेदाराकडून खातरजमा करायला नको का?

@वि.मु. उत्तर देण्यास विलंब झाल्याबद्दल क्षमस्व. जाहिरात आक्षेपार्ह किंवा दिशाभूल करणारी असल्यास DoT कडे तक्रार नोंदवता येते. सर्वसामान्य जाहिराती बद्दल मात्र कायदेशीर तक्रार करता येत नाही. Block आणि report करणं, जाहिरातदार व्यक्तीला खडसावून जाहिरात न करण्याबाबत सांगणं किंवा तुम्ही म्हणता तसं पत्र देणं हेच उपाय आहेत.

जेव्हा केवाय सी अपडेट फोन वरून करा असा फोन येतो तेव्हा सावध वहा. हे कागदपत्र बँकेत देउन त्याची फिजिकल पोच पावती( शिक्का व घेणार्‍या ऑफिसर बाईची सही) डेट आप न मागू शकतो..

जर फोन वरची व्यक्ती टीम व व्युअर व एनिडेस्क डाउन् लोड करा म्हणाली तर तो नंबर लिहून घ्या व पोलिस कंप्लेंट करा. ही सोफ्ट वेरे
तुमच्या फोन चा लँप्टॉ प चा कंट्रोल घेतात.

ऑनलाइन फोन नंबर शोधुन कॉल करू नका. ब्रांच मध्ये जाउन काम करून या.

क्रेडिट कार्द डेबिट कार्ड लोक नुसते डीटेल शेअर करत नाहीत तर ओटीपी पण देतात तो ही तीन चारदा. हे मला कळत नाही.

फोन वरुन दारु मागवू नका हा मेजर फ्रॉड आहे. तेच परत नाक्यावर दुका नात जाउन आणा.

एक व्यक्ती मला WhatsApp वर marketing msg पाठवत असतो. नको पाठवूस असे सांगितले तर उर्मटपणे (तुला msg नको असतील तर) Block Me असे उत्तर देतो. एक नंबर block केला तर दुसर्‍या नंबर वरुन msg पाठवतो. पुन्हा नको सांगितले तर Block me असे म्हणतो. तर या व्यक्तीच्या विरोधात तक्रार दाखल करता येऊ शकते का??? त्याच्यावर कोणत्या कलमांखाली कारवाई होऊ शकते? हे मी यासाठी विचारतो आहे कारण तो ज्या builder चे मेसेज पाठवतो त्या builder च्याच office मध्ये कायदेशीर पत्र पाठवून त्याची तक्रार नोंदवण्याचा मी विचार करतो आहे.------ त्याला म्ह्ण जो मले मासेज करिन त्याच्या आयला घेतला श्र्श्र नि रातभर
मंग बघ