सोनल - भाग ६

Submitted by Kavita Datar on 17 November, 2021 - 08:42

ती अशी विचार करत बसलेली असतानाच फोन वाजला. अपरिचित नंबर दिसत होता. आधी तिने दुर्लक्ष केलं. पण नंतर कॉल घेतला.
"हॅलो... हो... मीच सोनल देशमुख... बोला."
फोन वरच्या व्यक्तीचं बोलणं ऐकून सोनलच्या चेहऱ्यावरचे भाव झरझर बदलत गेले. कधी भीती तर कधी चिंता तिच्या चेहऱ्यावर झळकत होती.

*****

"हॅलो ! मला सोनल देशमुख यांच्याशी बोलायचंय,"
"हॅलो... हो...मीच सोनल देशमुख... बोला."
"नमस्कार मॅडम मी एसपी प्रशांत जोग बोलतोय. डीएसपी अजय देशमुख आज दुपारी ऑफिस मध्ये असतानाच चक्कर येऊन बेशुद्ध होऊन पडले. त्यांना मंगेशकर हॉस्पिटलला एडमिट केलं आहे, त्यांची कंडीशन क्रिटिकल आहे मॅडम.... कॉन्स्टेबल विश्वनाथ तुमच्या घरी गेले, तेव्हा घर बंद होतं. तुमच्या शेजारील बाईंनी तुमचा नंबर दिला."

तिला आठवलं, तिची पुण्यातील शेजारीण संगिताला काही दिवसांपूर्वी तिने फोन करून ती मुंबईत असल्याचं सांगितलं होतं. तिच्याकडून जोग साहेबांना नंबर मिळाला असणार. अजय-सोनलच्या आयुष्यातील घडामोडी त्यांना माहीत असण्याचं काहीच कारण नव्हतं. म्हणून अजयची तब्येत बिघडल्यावर त्यांनी तिला कळवलं होतं.

सोनल च्या मनात एकाच वेळेस चिंतेचे, दुःखाचे ढग दाटून आले. अजयच्या वागण्यामुळे तिचा त्याच्यावर कितीही राग असला तरी अजूनही तो तिचा पती होता. तिच्या प्रिय मुलांचा पिता होता. बारा वर्षं, आनंदात जरी नाही तरी, त्याच्या सोबत तिने घालवली होती. त्याचं काही बरं वाईट व्हावं असं कधी तिच्या मनात देखील आलं नव्हतं.

तिला लगेच पुण्याला निघावं लागणार होतं. तिने स्वप्नाला फोन करून परिस्थितीची कल्पना दिली. तन्वी आणि नीलला तिच्याजवळ सोडून, सोनलने एकटीनेच पुण्याला जावं, असं स्वप्नाने सुचवलं. सोनलने हाताला लागतील ते कपडे बॅग मध्ये भरून, जरुरी वस्तूंसह तिची बॅग पॅक केली. त्यासोबत मुलांचीही बॅग पॅक केली.
"पप्पांची तब्येत बरी नाहीये, म्हणून मी पुण्याला जातेय तुम्हाला स्वप्ना मावशीकडे सोडतेय."
असं मुलांना समजावून तिने त्यांना स्वप्नाकडे सोडलं आणि जी मिळाली त्या बसने ती पुण्याला पोहोचली.

मंगेशकर हॉस्पिटल मधल्या आयसीयूमध्ये अजयला ठेवलं होतं. नाकातोंडात नळ्या घातलेल्या अजयकडे आयसीयू च्या बाहेरून ती पाहत होती. तो काहीसा कृश झालेला वाटत होता. त्याचा चेहरा निस्तेज, पिवळसर पडलेला दिसत होता. त्याच्याकडे पाहून तिच्या मनात कणव दाटून आली.

"मिसेस देशमुख..."
डॉक्टरांच्या आवाजाने ती भानावर आली.
"काय झालंय डॉक्टर...?"
"या...बसा..."
डॉक्टरांच्या केबिनमध्ये ती त्यांच्यासमोर बसली होती. "तुमच्या मिस्टरांचे रिपोर्टस आलेत... त्यांना लिव्हर सिरॉसिस आहे. अती मद्यपानामुळे त्यांचे ८०% लिव्हर खराब झालंय."
"यावर काय उपाय आहे ?"
"सांगतो... खरं तर यावर लिव्हर ट्रान्सप्लांट हा खात्रीचा उपाय आहे. पण ते तेवढं सोपं नाही. सध्या मी अँटिबायोटिक्स, अँटीवायरल मेडिसिनस् सुरू केलीयेत. डिस्चार्ज मिळाल्यावर सुद्धा त्यांचं पथ्यपाणी नीट सांभाळावं लागणार आहे."

अजयचा आजार गंभीर आहे, आणि तो त्यानं ओढवून घेतलाय, हे सोनलला कळून चुकलं. त्याच्या सोबत राहत असताना देखील त्याच्या पिण्या वरून ती त्याला सतत टोकत असे. पण ते त्याला सहन व्हायचं नाही आणि परिणती भांडणात व्हायची.

आता पुढे काय ?? हा तिच्या समोरचा मोठा प्रश्न होता. अजयला जवळचं असं कोणीच नव्हतं. त्याची आई खूप पूर्वीच देवाघरी गेली होती. मोठी बहीण होती, पण त्याच्या स्वभावामुळे तिने त्याच्याशी असलेले संबंध तोडून टाकले होते. त्याचे वडील आधी अजय - सोनल सोबत पुण्यात राहत, पण एकदा अजयच्या वागण्यावरून त्यांचे त्याच्याशी कडाक्याचे भांडण झाले आणि ते कायम साठी मुलीकडे निघून गेले.

अजय उपचारांना प्रतिसाद देत होता. दोनच दिवसात त्याला आयसीयूमधून स्पेशल वॉर्डमध्ये हलवण्यात आलं. सोनल ला आपल्या सोबत असलेलं पाहून त्याच्या चेहऱ्यावर क्षीणसं हास्य पसरलं. सोनल निर्विकार मनाने त्याच्या सोबत हॉस्पिटल मध्ये वावरत होती.

आठ दिवसांनी त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. खूप अशक्त झाल्याने त्याला सुश्रुषे ची गरज होती. इथे त्याचं करणारं कोणीही नव्हतं. सोनल ला मुलांना सोडून जास्त दिवस पुण्यात राहणं शक्य नव्हतं. तिने विचार केला, आणि काही दिवस त्याला आपल्यासोबत मुंबईत नेण्याचं ठरवलं.

पुण्यातल्या घरी त्याचं सोबत नेण्याजोगं जरुरी सामान घ्यायला ती जेव्हा आली, तेव्हा तिला त्या घराची दुर्दशा बघवत नव्हती. अस्ताव्यस्त पडलेल्या वस्तू, कित्येक दिवस न झालेली साफसफाई यामुळे त्या घराला अवकळा आली होती. तिथे जास्त वेळ थांबणं तिला असह्य झालं. तसंही आता जुन्या आठवणी तिला नकोशा वाटत होत्या. अजय ची तब्येत बरी होईपर्यंत त्याला सोबत ठेवून नंतर ती त्याच्याशी कुठलाही संबंध ठेवणार नव्हती.

"आपण कुठे जातोय ?"
टॅक्सी पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वर आल्याचं पाहून अजयने तिला विचारलं.
"मुंबईला... माझ्या घरी..."
"तू मुलांना घेऊन पुण्यात परत का येत नाहीस ? आपल्या घरी ??"
अजयने मोठया अपेक्षेने तिला विचारलं.
"नाही... आता परत येणं मला शक्य नाही. तू पूर्ण बरा होईपर्यंत मुंबईत रहा, मग इथं परत ये."
त्याच्याकडे न पाहता सोनल म्हणाली.
"परत ये सोनल...ऐक ना... तुम्हा तिघांशिवाय मला कोण आहे?"
"म्हणून तर आपण मुंबईला जातोय ना..."
तिच्या बोलण्यावर तो निरुत्तर झाला.

अजय ला घेऊन ती मुंबईतील घरी आली. तिने तिच्या बेडरूम मधला बेड त्याच्यासाठी तयार केला आणि त्याला आराम करायला सांगितलं. प्रवासानं तो खूप थकल्यासारखा दिसत होता. त्याला धापही लागली होती. संध्याकाळी स्वप्नाने तन्वी, नीलला घरी पोहचवलं. अजयला आलेला पाहून ती दोघं काहीशी बुजल्यासारखी झाली.

"मम्मा !!! पप्पा आता इथेच राहणार आहे का ?"
नील ने तिला विचारलं.
"नाही बाळा... पप्पा ची तब्येत बरी झाली की तो परत पुण्याला त्याच्या घरी जाईल. तोपर्यंत इथंच राहील."

मुंबईतील लीलावती हॉस्पिटल मधल्या डॉक्टर कडे सोनल अजय ला घेऊन गेली. त्याचे सगळे रिपोर्टस् त्यांनी पाहिले. पुण्यातल्या डॉक्टरची ट्रिटमेंट त्यांनी चालू ठेवली. मात्र तब्येतीत सुधारणा होण्याऐवजी त्याची तब्येत दिवसेंदिवस खालावत होती. अशक्तपणामुळे त्याला उठून उभं राहणं देखील कठीण होऊ लागलं. दिवसाचा बहुतेक वेळ तो बेडवर पडून रहायचा. दोन-तीन वेळेस त्याला हॉस्पिटल ला ॲडमिट केलं, पण तब्येतीत फारसा फरक पडत नव्हता.

सोनल ची खूप धावपळ होत होती, सकाळी लवकर उठून स्वतःचं, अजयचं आवरून, मुलांसोबत शाळेत जाणं, परत आल्यावर स्वयंपाक, जेवणं, आवरणं ... त्यात त्याचं पथ्यपाणी सांभाळावं लागत होतं. त्याचं हवं-नको बघणं, त्याची सुश्रुषा यात ती थकून जाई. कर्तव्य म्हणून का होईना ती मनापासून त्याचं सगळं करत होती. बऱ्याचदा उठता येत नसल्यामुळे त्याचं सगळंच तिला करावं लागे.

अर्जुनशी तिचं दर दोन-तीन दिवसांआड फोनवर बोलणं होत असे. तेवढीच काय ती जमेची बाजू तिच्या आयुष्यात होती. अर्जुन ला तिने अजय बाबत सगळी कल्पना दिली होती. त्याला तिच्या कर्तव्यतत्परतेचं फार कौतुक वाटलं. तसं त्याने तिच्याजवळ बोलूनही दाखवलं.

एक दिवस अजयला लीलावती हॉस्पिटल मध्ये रुटीन चेकअप साठी नेलं असताना, तिने डॉक्टरांना लिव्हर ट्रान्सप्लांट बद्दल विचारलं.
"लिव्हर ट्रान्सप्लांट यशस्वी झाल्यास काही महिन्यांच्या विश्रांतीनंतर पेशंट नॉर्मल लाईफ जगू शकतो. मात्र डोनर मिळणं आणि त्याचं लिव्हर पेशंटशी मॅच होणं, या गोष्टी जुळून याव्या लागतात. लिव्हर ट्रान्सप्लांट ची शक्यता यांच्याबाबतीत आम्ही तपासून बघत आहोत. पण अजून यांना योग्य ठरेल असा डोनर आम्हाला मिळाला नाहीये."
डॉक्टर म्हणाले.
"डॉक्टर तुम्ही माझी तपासणी करून माझं लिव्हर यांना
मॅच होतं का ? ते चेक करा ना.."
सोनल काही वेळ विचार करून म्हणाली. अजयने चमकून तिच्याकडे पाहिलं. तिच्याबद्दलच्या कृतज्ञतेने त्याचे डोळे भरून आले.
"चालेल... ही शक्यता आपल्याला पडताळून पाहता येईल. तुमच्या काही तपासण्या कराव्या लागतील."

सोनलच्या काही तपासण्या केल्या गेल्या. योगायोगाने सोनल चा ब्लड ग्रुप आणि बाकी जरुरी पॅरामीटर्स अजयशी मॅच झाले आणि सोनल च्या लिव्हर चा काही भाग काढून अजयचं लिव्हर ट्रान्सप्लांट करायचं ठरलं.

त्या दिवशी दुपारी सोनल अजयला जेवण भरवत असताना अचानक त्याचे डोळे भरून आले. लहान मुलाप्रमाणे मुसमुसत तो बोलला,
"किती करतेस सोनल माझ्यासाठी ? स्वतःचं लिव्हर सुद्धा डोनेट करायला निघाली आहेस तू ...आणि मी ? मी काय केलंयं ? फक्त त्रास दिला तुम्हाला... लाज वाटते मला स्वतःची... जगायला नालायक माणूस आहे मी.."
त्याचं हे असं रूप पाहून मुलं भेदरली. सोनलने त्याच्या हातावर थोपटलं. रुमालाने त्याचे डोळे पुसत म्हणाली,
"मी काही विशेष करत नाही अजय... तू माझ्या मुलांचा बाप आहेस, तुझी काळजी घेणारं दुसरं कोणी नाही आणि अजूनही कायद्याने आपण वेगळे झालेलो नाहीये. म्हणून कर्तव्यभावनेने मी तुला इथे आणलं. तसंच तुला पुण्यात सोडून आले असते तर माझ्या सद्सद्विवेकबुद्धीला ते पटलं नसतं."

त्या संध्याकाळी अजयला थोडं बरं वाटत होतं. घरात पडून राहून त्याला कंटाळाही आला होता. सोनल त्याला हळू हळू चालवत खाली गार्डन मध्ये घेऊन आली. तिने त्याला बाकावर बसवलं. जवळच खेळणाऱ्या तन्वी, नील कडे कौतुकाने पहात तो विचार करू लागला,
'खरंच किती करंटा आहे मी ? इतकी गोड मुलं माझी... पण कधी त्यांच्यावर माया केली नाही. स्वतःच्याच तारेत जगत राहिलो...'

बागेत असताना सोनलला अर्जुन चा फोन आला.
"हॅलो अर्जुन..."
"हॅलो... काय करतेयस सोनल ?"
"अजयला गार्डन मध्ये घेऊन आलेय..."
"That's great...ऐक ना.. अक्काने, अम्माला तुझ्या भेटीसाठी तयार केलंय. उद्या त्या दोघी तुला भेटायला तुझ्या घरी येणार आहेत."
"अरे सध्याच नको ना... काही दिवसांनी मी जाऊन भेटेन त्यांना..."
"अगं मुश्किलीने ती तयार झालीय, तर येऊ देत ना."
"बरं... ठीक आहे."
"That's like my sweetheart...love you...bye..."
असं म्हणून अर्जुन ने फोन बंद केला. अर्जुन शी बोलणं झाल्यावर नेहमीच तिला खूप बरं वाटायचं. तिच्या खुललेल्या चेहऱ्याकडे पहात अजयने विचारलं,
"कोणाचा कॉल होता सोनल ?"
"माझ्या मित्राचा, अर्जुनचा..."
"सोनल, मला नाही वाटत या दुखण्यातून मी उठेन. माझे फार दिवस राहिले नाहीयेत, असं वाटतंय. मी असाच राहिलो तरी माझ्यात अडकू नकोस... माझ्यापासून लवकर डिवोर्स घेऊन लग्न कर. तू सुखी व्हावं, असं मनापासून वाटतंय मला..."

तिचे डोळे भरून आले. त्याच्यापासून अश्रू लपवत तिने विषयांतर केलं.
"चल, जाऊयात का ? डास आहेत फार इथं..."

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी अम्मा आणि अर्जुन ची बहिण अदिती, सोनल ला भेटायला आल्या. तन्वीने दार उघडलं आणि त्यांना बेडरूम मध्ये घेऊन आली. सोनल अजयला चमच्याने सूप भरवत होती. तिनं त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना बसवलं.
"एक मिनिट हं... एवढं संपवून आपण बाहेर बसूया..."
सूप संपवून तिने बाऊल बाजूला ठेवला आणि अजयचं तोंड ओल्या रुमालाने पुसुन त्याला झोपवून ती त्यांना घेऊन बाहेर आली.

"आपण पहिल्यांदा भेटतोय असं वाटतंच नाहीये. कारण अर्जुन नेहमी तुझ्याबद्दल बोलत असतो."
अदिती हसून म्हणाली.
अम्मा एकटक तिला न्याहाळत होत्या.
"आत आहेत, ते कोण आहेत ?"
त्यांनी विचारलं,
"माझा नवरा अजय... अजून आमचा डिव्होर्स झाला नाहीये. तो आजारी आहे म्हणून त्याला इथे घेऊन आलेय."
सोनलने स्पष्टच सांगितलं. त्यानंतर त्या फार काही बोलल्या नाहीत. अदितीच बोलत राहिली.

त्यादिवशी शाळेला कसलीतरी सुट्टी होती. त्यामुळे सोनल निवांत उठली. सकाळचे सात वाजून गेले होते. अजयला सकाळी सहा वाजताच टॉयलेटला जायचं असायचं. तेव्हा तो सोनलला हाक द्यायचा. पण आज त्याच्या खोलीतून कसलाच आवाज येत नव्हता. स्वतःचं आवरुन ती त्याच्यापाशी आली. तो शांत झोपलेला पाहून तिला आश्चर्य वाटलं. तिने त्याला हलवून जागं करण्याचा प्रयत्न केला. बेडच्या कडेला असलेला त्याचा हात खाली लोंबकळला. त्याचं शरीर थंड पडलं होत.
"अजय...ऊठ अजय... "
सोनल ओरडली. पण तो केव्हाच हे जग सोडून निघून गेला होता.

(क्रमशः)
©कविता दातार

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults