कविता एक प्रवास (५)

Submitted by अज्ञात on 28 June, 2008 - 12:17

कविता एक प्रवास (५)-

पावलं चालतात, वळतात, नाचतात, थिरकतात, स्थिरावतात. काळ मात्र अथक आक्रमत रहातो विस्मरणाची वाट; पुढच्या आव्हानांना सामोरं जात.

रोज उगवणारा दिवस नवीन. दहा दिशांतला हा प्रवास मात्र दिशाहीन. कधी आशा कधी निराशा. ओसांडणारा उत्साहपण विरजला जाऊ शकणारा. त्याची पुढची प्रक्रिया उसळत घुसळत ताक-लोणी वेगळं करण्याची. अस्तित्वाची अस्मिता आणि नास्तित्वाची ओढ अशा विविध रंगी विविध ढंगी जादूच्या दुनियेतलं हे मार्गक्रमण करतांना उमटलेल्या छटाही वेगळ्याच ! प्रत्येक क्षण, प्रत्येक अनुभव, प्रत्येक प्रत्यय वेगळा. शंका कुशंकांच्या भेंडोळ्यातून उमलणारी एखादी विलोभनीय अनुभूती, तिची उत्पत्तीही वेगळीच. या सर्वांना पूर्णविराम आपल्याबरोबरच !! त्या पूर्वीच्या अर्ध, स्वल्प, उद्गार, प्रश्न पैकी 'विसर्ग' हा विराम जरा अजून वेगळा. विचारांची परिभाषा पूर्णत्वाला गेल्यासरखा भासणारा, क्षणिक आनंद्/संवेदना/वेदना कागदावरती उतरवून ठेवायला थबकणारा आणि म्हणून मन, बुद्धी, अंतःकरण मोकळं करू शकणारा.........!!!
........... आणि पुन्हा पुढे चालू देणारा.

आयुष्यात आपण किती वर्ष-महिने-दिवस-तास-मिनिटे-सेकंद चालतो/जगतो इ. चा हिशेब एक सहज प्रवृत्ती अथवा गरज आणि इतिहास म्हणून ठेवतो. पण त्याच्या सोबत आणि साक्षीने आजुबाजूला काय काय घडतं आणि त्याचे आपल्यावर उमटणारे सर्वच पडसाद जाणत असूनही व्यक्त करून ठेवत नाही. कधी लाज आडवी येते, कधी संकोच.

पण एकांतात कसला संकोच ? अव्यक्तातलं व्यक्तात आणणं, आपलं आपल्याशीच बोलणं, हाच खरा मझ्या कवितेचा बाज आणि साजही.

मी तरी असंच मानतो; आणि उन्मळून येतं ते लिहून काढतो. जसं येतं तसं येऊ देतो. जपून ठेवतो ते. न जाणो एखाद्या व्यक्त न होऊ शकणार्‍याला मदत झाली तर !!

तुम्हाला त्याला कविता म्हणायचं तर म्हणा नहीतर नाही.

स्वप्न पहाणे नको किनारा
आकाशाला कुठे सहारा
क्षितिजाचेही भास नको
वार्‍याला नको निवारा

मन हलके चौफेर फिरू दे
कोते बंध नकोत जिवाला
मनू एकला जग भवतीचे
पाश हवेत कशाला

नको परीक्षा, स्पर्श सुखाचे
नकोत अर्जव खोटे नाते
मीच दंग वैभवात मझ्या
काय कुणाचे जाते ??

लिखाणाच्या सातत्याप्रमाणेच "रोबा"चं 'इन टाईम' डायरी देणं कौतुकास्पद आहे. तसं पाहिलं तर मी काही तिला नियमित माझ्या कविता वाचून दाखवतो किंवा तिला त्या फार आवडतात वगैरे असं कांही नाही. पण एखाद्या 'उपक्रमाला' तिने दिलेलं 'आवरण' हेच महत्वाचं. या प्रामाणिक प्रोत्साहनाचाही मझ्या लिखाणाला एक मोठा आधार आहे.

न्याय द्यायलाच हवा,
आदर करायलाच हवा,...
आतुरलेल्या शब्दांना
साज चढवायलाच हवा

अर्थात हा सर्व योजनाबद्ध योगायोग आहे / असावा असं मला वाटतं.

शाळेत, कविता आणि रसग्रहण कायम अडगळीला ठेवणारा मी, एक आयोजक या नात्याने, 'कला अर्घ्य' या संस्थेने, कवि कुसुमाग्रजांचा 'अमृत महोत्सव' आणि त्यांना 'ज्ञानपीठ' मिळाल्याचा उत्सव म्हणून, 'लेणी तेजामृताची' ह्या, 'दृकश्राव्यनाट्यसंगीत' पद्धतीने सादर केलेल्या, फक्त कुसुमाग्रजांच्या निवडक कवितांच्या एकसंध कर्यक्रमाचा साक्षीदार आणि सतत महिनाभर रोजच्या तालमींचा प्रेक्षक म्हणून वावरलो आणी एक दिवस बघता बघता चक्क बसल्या जागी भावनाविवश होऊन ढसढसा रडलो. सहकार्‍यांनी विचारल्यावर, "कुसुमाग्रजांना लोक एवढे ग्रेट का मानतात हे मला आत्ता कळतंय" ह्या माझ्या उत्तराला, सहजिकच, सर्वजण खदखदून हसले ! पण खर्‍या अर्थाने, " हा मला झालेला, कवितेचा पहिला स्पर्श होता."

"लेणी तेजामृताची" चा पहिला प्रयोग १ फेब्रुवारी १९८८ रोजी कालिदस कलामंदिर नाशिक येथे झाला. त्यानंतर विविध ठिकाणी एकून २५ प्रयोग झाले. शिखर प्रयोग ३० एप्रिल १९८९ रोजी महाराष्ट्र मंडळाच्या वतीने, अमृता प्रीतम यांच्या अध्यक्षतेखाली, ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्याबद्दल आयोजित कुसुमाग्रजांच्या सत्कारनिमित्ताने, पंतप्रधान नरसिंह राव, वसंत साठे इ. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत दिल्लीच्या फिकी सभागृहात झाला. यावेळी आमचा संच तिथे विशेष आमंत्रित होता. आमचा नशिक दिल्ली नाशिक प्रवास आणि महराष्ट्र सदनातील तात्यांचा ( कुसुमाग्रजांचा ) पूर्णवेळ सहवास हा अत्यंत चिरस्मरणीय होता.
तात्या त्यांचा व्ही आय पी सूट सोडून आमच्या सोबत खोलीत राहिले होते.

१९९५ मधे, चांदीची नाणी बनविण्यासाठी, व्यवसाय निमित्ताने, इंदोरच्या प.पू. भक्तराज महाराजांशी, त्यांच्या अमृतमहोत्सवाचे वेळी संपर्क आला आणि मिळायची ती अनुभूती मिळाली. ते स्वतः उत्तम भजनं लिहीत आणि सुश्राव्य गात असत. एकदा स्वप्नात, मी त्यांच्या मागे मागे गेलो. सहज बोलता बोलता, मी काही लिहितो का, असं त्यांनी विचारलं. मी म्हटलं, ''तसं कांही विशेष नाही'', त्यावर, 'मग मी सांगतो ते लिही' असं म्हणून, एका कुठल्याशा भजनाच्या दोन ओळी सांगितल्या. त्या लिहून झाल्यावर पुढच्या दोन ओळी मीच सहज सुचल्या तशा पुटपुटल्या, तेंव्हा, "येतं तर काय तुला; लिहीत जा" असं म्हणाले आणि स्वप्न संपलं. काय लिहिलं होतं मला कांहीच आठवत नाही मात्र "लिहीत जा" हे शब्द आज आठवतायत. हा मी आशीर्वाद समजतो.

सुरुवातीला धनंजय गोवर्धनेनी "लिहिल्याने मोकळं होता येतं" असं सांगितलेलं, त्या वेळी नुसतंच "कळलं" होतं पण आज ते "आकळतं" आहे. "संवादानं विसंवाद मिटतात" असंच "माझं माझ्याशी" होतंय आणि ही प्रक्रिया मी अनुभवतोय. हाच माझा पथदर्शक आहे.

यात मला एकच म्हणायचंय की , मी कविता करतो असं जर कुणी म्हटलं तर ते मात्र खोटं आहे. ज्या वेळी जे खळखळून येतं आणि जसं येतं तसं मी लगेच लिहून ठेवतो आणि लिहिल्या 'नंतर' त्यावर विचार करतो त्यातल्या गर्भितार्थाचा !! आहे हे असं आहे आणि हेच खरं आहे.

हे सांगण्यात लिखाणाचा किंवा लेखकाचा मोठेपणा दाखविण्याचा हेतू मुळीच नाही कारण आपल्याला कुठे हे कुणाला सांगायचंय ! आपण आपल्यासाठी लिहितोय. कुणाला त्याचा उपयोग झाला तर झाला. आनंदच आहे. असो.

१९६६ मधे चेष्टा म्हणून सुरु झालेला, १९७६ मधे भावनिक मूळ धरलेला आणि २००० नंतर अंतरिक ओढीस लागलेला हा पसारा येवढ्या प्रमाणात विस्तारेल असं कधीच वाटलं नव्हतं. तसंच संचिताचं ओझं इतकं जास्त असेल असंही कधी जाणवलं नव्हतं. आज जुनं कमी होतंय आणि नव साचत नाहीय हे मात्र कुठेसं थोडं थोडं कळतंय.

"जुनं सगळं संपलं अशी अवस्था आणि व्यक्त होण्यासाठी फक्त वर्तमानच" अशी वेळ आली तर ती निश्चितपणे प्रासादिक असेल. ती लवकरात लवकर येवो. चालत रहणं आणि वाट पहाणं हे आपलं काम. जे होईल ते होईल. पुढचं पुढे.......

***

अनपेक्षित हळव्या काळीजस्पर्शाने उठलेली वलये काठावर विरण्याऐवजी खोल तळाकडे झेपावतील असे वाटले नव्हते. रंग उमटत गेले, तरंग उमलत गेले, प्रत्येक संवेदनेला शब्दात बांधत गेले. कसे ते त्यांनाच माहित. त्यांचे नातेही तेच जाणोत.... मला हे कोडे उलगडलेले नाही.

उर्मी बरोबर जे येते ते कगदावर उतरवणे आणि नीट जपून ठेवणे हे माझे काम.

ती येते तिच्या वेगाने, वेळी अवेळी केंव्हाही, आणि कुठलाही विषय घेऊन; लाटेसारखी !! प्रत्येक लाट वेगळी. वेगळ्या विचारांची, वेगळ्या अविष्कारांची. तिच्या सारखी तीच. एकदाच !!!

आता मीच माझ्यात शोधतोय, हे सगळे येते कुठून??

आजूबाजूच्या इतर संवेदनांशी, माझ्या संवेदनांचा, नकळत चाललेला हा संवाद किती आणि कशी रूपं धारण करतो याचं मला कुतुहल वाटतंय.
माझ्या असं लक्षात आलंय की, ह्या सर्व गोष्टी मनाच्या कुठल्याशा आतल्या कप्प्यात सुप्तावस्थेत अखंड चालू असाव्यात. कारण त्या, विचार करायला थोडीही उसंत न देता, स्वतःहून बाहेर पडू बघतात, ठसठसून अस्वस्थ करतात, आणि प्रसवल्यावर चित्त शांत करतात.

बळंतीण जसं आपत्याचं निरिक्षण नंतर करते, तसंच कांहीसं इथे होतं.

गर्भ आपोआप त्याच्या पद्धतीने "मातापितानुरूप" संस्कार झेलत विना नियंत्रण वाढत असतो आणि त्या प्रक्रियेच्या आणि कुंभाच्या क्षमतेप्रमाणे पूर्णत्व धारण करून योग्य वेळी बाहेर पडतो. त्याच पद्धतीने हेही घडतं असं मला प्रत्येक वेळी जाणवतं.

कधि कधी तर, बाळ बघितल्यावर, आईला पान्हा फुटतो म्हणजे काय, याचाही प्रत्यय येतो.

आपत्याच्या प्रत्येक हालचालीच्या निरिक्षणातून, आपण अपल्यालाच प्रत्यक्ष समोर दृष्यरूप बघणं खूपच सुखावह असतं.

नाटकात भूमिका वठवतांना अंगवळणी पडलेला "पर काया प्रवेशाचा"सरावही अशा प्रसवांना उद्विपीत करतो.

दुसर्‍याची एखादी भावना काळजाला भिडली की, त्याची ती वेदना जगण्याचं खूळही असंच अधून मधून शब्दांतून निथळत रहतं.

कांही निवडक लोकांना SMS द्वारे पाठविलेल्या रचनांना जेंव्हा पलिकडून उत्स्फूर्त आणि समर्पक प्रतिसाद मिळतो तेंव्हा ती माझ्या पुढच्या पाउलासाठी मिळालेली ऊर्जा असते.

आपलं आपत्य आपल्याला संदरच. इतरांनाही ते तसं वाटलं तर दुधात साखर !!

****

नित्य नेमाने रहटाबरोबर दिवस्-रात्री-आठवडे-महिने उलटत गेले आणि चवथी डायरी संपली.

प्रत्येक डायरीची सुरुवात आणि समारोप हा त्या त्या काळात अनुभवलेल्या अनुबंधांचं च्यवन आहे.

इतर कुणाचं असं असतं की नाही मला माहित नाही.

बर्‍याचदा दिलदार, दिलखुलास, सखोल लिखाण करणारा मनुष्य मला प्रत्यक्षात तसा आढळला नाही. किंबहुना लिलिखाणात आजू बाजूचं आवर्त मांडतांना.मला त्यात तो स्वतः सापडला नाही.

कुणाचं काहीही असो, मी मात्र आंतर्बाह्य सारखाच आणि असाच आहे. कदाचित १/३ वर आणि २/३ आत. विरघळल्यावर वेगळं दृष्य अस्तित्व नसलेला, एकरूप, तुमच्याच सारखा.

कवितेबद्दल अथवा कवितेविषयी बोलण्याइतका माझा अधिकार नाही.

वार्‍याला मोकळं रान मिळालं की तो वहणारच आणि त्याच्या नैसर्गिक वहण्याचा काहींना त्रासही होणारच.
मला मी उडू लागलो तसं अचानक एक आकाश सापडलं एकांताचं, जिथे खूप कांही आहे, रंजनासाठी, गुंजनासाठी, कुणालाही, केंव्हाही, कुठेही आणि कसंही भेटण्यासाठी !!!

ह्या अस्पर्श जगाचे सिद्धांत आणितिथून आलेल्या उर्मींचे आशय प्रत्येकासाठी वेगवेगळे आहेत. ज्याला जसे हवेत तसे त्याने घ्यावेत / तो घेतो.

अशा ह्या स्वतंत्र प्रवाहात कुणी धुणी-भांडी करतील. कुणी अंघोळी-कुणी पूजा, कुणी मशागत करतील कुणी गाणी गातील. स्वभावधर्मानुसार काठावर वस्त्या होतील. कधिकाळी एखादी संस्कृतीही रुजेल तिथे!!

किमान सांडपाणी वाहून नेण्यासाठीतरी ह्याचा निश्चित्च उपयोग होईल.

वेग आहे मोकळी दिशा आहे
भूक आहे पोटात जागा आहे
संवेदनांचे खत-पाणी; स्वप्नांसाठी पागा आहे
हृदयातल्या हळुवार श्वासांसाठी रांगणार्‍या रेघा आहेत

सल असह्य झालेल्या भेगा; तशाच जखमा आहेत
त्यावर काळानुरूप सुकल्या सुरकुतलेल्या खपल्या आहेत
करपलेल्या व्रणांच्या हळव्या वेदना आहेत
आणि सोबतीला
भातुकलीतल्या न बोलणार्‍या बाहुलीच्या वंचना आहेत

ह्या सर्व गोष्टी कशा बोलू मी कुणाशी ??

खरं तर हे सारे माझेच माझ्याशी झालेले संवाद आहेत; ओघळलेल्या अनोळखी विचारांना चिकटून आलेल्या ओळखीच्या शब्दात. त्यांवर आसपासच्या संदर्भांचे संस्कार आहेत. त्यात तुम्हीही कुठेतरी लपलेले आहात. "माझ्यातला" "तुम्ही" तुम्हाला गवसला की मी संपन्न झालो समजायचे.

केलेल्या ह्या उठाठेवीचा योग्य आणि पारदर्शक निवाडा नीर-क्षीर विवेकाने व्हावा म्हणून आजपर्यंत ह्या लिखाणाचं सदरीकरण कुठल्याही 'प्रस्थापित' कवीसमोर मी केलेलं नाही.

धनंजय गोवर्धनेने ह्या संपादनाची जबाबदारी घ्यावी असे वाटल्यावरून ही गोष्ट मी त्याच्याजवळ बोललो. मात्र तो आधीच मला पूर्णपणे ओळखत असल्याने आणि ह्या विषयीचं संपादन तो तटस्थपणे करू शकणार नाही असं 'त्याला वाटल्यावरून' त्यानेच मुक्त विद्यापीठाचे डॉ. रमेश वरखेडे यांच्याजवळ शब्द टाकला. मी, धनंजय व श्री. वरखेडे यांनी एकत्र बसून शंभरेक 'प्राथमिक वाचन' केलं. सुदैवानं वरखेडेंनी संपादनाची जबाबदारी स्वीकारली. 'निकालाची वाट पहातोय !!!

वाटचाल पुढे सुरू आहे अनंत ...............................

आकाश खोल आहे; पृथ्वी गोल आहे
पैठणीच्या पदराला मायेचा झोल आहे
उघड्या डोळ्याच्या कडांना काजळाची ओल आहे
म्हणून,
सारे काही मातीमोल आहे
हे म्हणणे कपोल आहे.........

सध्या इथे विसर्ग. मुक्कम !! काही काळापुरता. !!!!!

***************************************************************

गुलमोहर: 

माझ्या मयबोलीकर मित्रांनो,
माझे "कविता एक प्रवास १ ते ५ भाग" वाचल्यावर मला खरं खरं काय ते नक्की कळवा. कृपया कंटाळा करू नका. या संदर्भात तुमचे असे कांही अनुभव असतील तर ते जाणून घेण्याची माझी प्रामाणिक इच्छा आहे. मी जिथे असेन तिथे आहेच, पण तुमच्या सोबत किती आहे ह्याची उत्सुकता लागून राहिली आहे. मायबोलीवरच्या, माझ्या वास्तव्यात मी अतिशय समधानी आहे. इथल्या सर्वच ओळखी ह्या बिनचेहर्‍याच्या पण हृदयाशी आणि साहित्याशी प्रामाणिक आहेत. त्यात कुठलाच वैयक्तिक आकस, हेवा-दावा अथवा ग्रुपिझमचा दर्प मला जणवला नाही. आणि म्हणून मी आपणाकडून केलेली ही अपेक्षा गैर नाही असं मला वाटतं.

........................................अज्ञात

अज्ञात खुप सुंदर लिखाण!
आपले प्रत्येक भाग मी सावकाश आणि मन लावून वाचले. मनापासुन सांगतो कि सगळे लेख आवडले.
आता आमच्या (निदान माझ्यातरी) अपेक्षा अजुन वाढल्या आहेत आपल्या लिखाणाबद्दल.
असेच लिहित रहा..........

मायबोलीवरच्या, माझ्या वास्तव्यात मी अतिशय समधानी आहे. इथल्या सर्वच ओळखी ह्या बिनचेहर्‍याच्या पण हृदयाशी आणि साहित्याशी प्रामाणिक आहेत. त्यात कुठलाच वैयक्तिक आकस, हेवा-दावा अथवा ग्रुपिझमचा दर्प मला जणवला नाही.......

अगदी माझ्या मनातल. जेमतेम ६ महिन्यापूर्वी मायबोलीचा सदस्य झालो. सुरुवातीला प्रकाशचित्र विभागात काहि फोटो अपलोड केले त्याला आलेला प्रतिसाद बघुन आणि आपल्या इतर सदस्य मित्रांची लिखाणे वाचुन मलाहि काहितरी लिहावेसे वाटले. मी काहि प्रोफेशनल रायटर नाहि त्यामुळे इतर काहि लिहिण्यापेक्षा मला माझ्या भटकंतीबद्दल लिहावेसे वाटले. (तुमच्या सर्वांचे लिखाण पाहता माझे लिखाण म्ह़णजे सूर्यापुढे दिवा दाखवण्यासारखे) आणि मी माझा पहिला लेख "निळ्कंठेश्वर" लिहिला. सर्वांचे प्रतिसाद बघुन मला खरंच खुप हुरुप आला आणि दिसामाजी काहितरी लिहावे प्रमाणे लिहित राहिलो (अर्थातच ते सर्व माझ्या भटकंतीबद्दलच).
तेव्हा तमाम मायबोलीकरांचे मी सुद्धा मनःपूर्वक आभार मानतो.

कांही निवडक लोकांना SMS द्वारे पाठविलेल्या रचनांना जेंव्हा पलिकडून उत्स्फूर्त आणि समर्पक प्रतिसाद मिळतो तेंव्हा ती माझ्या पुढच्या पाउलासाठी मिळालेली ऊर्जा असते.
आपलं आपत्य आपल्याला संदरच. इतरांनाही ते तसं वाटलं तर दुधात साखर !!

अज्ञात खुपच सुंदर......

अज्ञात
तुमचे लेख, कविता वाचतेच वाचते. हा कवितेचा प्रवासही वाचला. पुन्हा पुन्हा वाचला. हे देवदत्त देणं असल्यासारखं जे उमळून आलेलं लिहिता.... रोखत नाही, लिहिता. त्यासाठी तुमचे अनेक आभार.

एखादी गोष्टं आपल्याला का आवडली (योग्य शब्दच सुचत नाहीये) हे सांगता न येण्यासारखं तुमचं लिखाण आहे.
नाही. तुमची अपेक्षा गैर नाही. पण नुस्तं 'आवडलं' ह्या पलिकडे शब्दात सांगता येत नाही... अशा वेळी 'आवडलं' हे सांगणंही आपल्याशीच 'दगा' वाटतो.
वाचल्यावर जेव्हा 'व्वा' म्हणण्याइतकही डहुळणं मानवत नाही.... तेव्हा ते आपसूक या हृदयीचे त्या हृदयी गेल्याची पावती असते. तुमच्या लिखाणाच्या बाबतीत (हे महत्वाचं.) हे माझं मत.
ह्यातच काय ते समजा.
लिहिते रहा.
माझी एक विनंती आहे - शक्य झाल्यास प्रकशित करा. तुमच्यासाठी नव्हे. वाचणार्‍यांसाठी. चांगलं वाचायला मिळणं ही प्रत्येक पिढीची गरज आहे, राव. तुमच्यासारख्यांच्या योगे हे व्हावे.

योगेश आणि दाद,
मी ८ तारखेपासून आजपर्यंत गावी गेलो होतो. आज अत्यंत उत्सुकतेने पान उघडले. तुम्हा दोघांची मनस्वी दाद वाचून तृप्त वाटले. ही माझ्या पुढच्या प्रवासाठीची सकस शिदोरी आहे.

हृदयतळावर कोरुन गेले शब्द, नव्हे ते वार
ओसंडुन गेले रुधिरातिल अमृत चारहि द्वार

मनःपूर्वक आभार. असाच आधार देत रहा.

............................अज्ञात

अज्ञात, मी शब्दबंबाळ असं काही लिहू शकत नाही (म्हणजे मला ते लिहीताच येत नाही अर्थात) पण तु माझ्या खरडवहीत लिहीलेले वाचले आणि कसे बसे शोधुन काढले तुझे लेख. कदाचीत तुझा विश्वास बसणार नाही पण गेले जवळपास दोन तास मी ते लेख वाचत होतो. मी म्हणजे एक टवाळ मला गंभिर असं काही भावत नाही हा माझा समज धुळीला मिळाला. अप्रतिम दोस्त केवळ अप्रतीम.
महत्वाच म्हणजे दाद सारख्या दर्दी व्यक्ती कडून तुला इतका छान प्रतीसाद मिळाला यात तु भरुन पावलास.
असो या पुढे कधीही कुठलेही लेखन केले की मला सांगायला विसरायच नाही. ही विनंती समज किंवा धमकी Happy

.................................................................................................................................
** आयुष्य म्हणजे एक फार मोठी गुंतागुंत आहे, ती सोडवत बसण्यापेक्षा त्यात गुंतुन मनमुराद जगावे **

नमस्कार अज्ञात.. मी तुमची ही सिरीज वाचतच होते.. अनवधानाने हे १-२ भाग राहीले वाचायचे.. आत्ता वाचले आणि खूप आवडलं.. खरंतर कविता माझा प्रांत नाही.. मला कविता कळुन घेण्यासाठी लागणारा पेशंस नाहीये अजिबात.. त्यमुळे मी वाट्याला जात नाही.. गेले तरी मला ते शब्दात व्यक्त नाही करता येणार काय आवडलं. त्याबद्द्ल क्षमस्व.. पण लिहीत रहा इथे मायबोलीवर नक्की! आम्ही वाचत राहू!

सी.एल जी !
अगदी खरं सांगायचे तर मी अजुन तुमचे सर्व भाग वाचले नाहीत कारण जे काही थोडेफार वाचु शकलो (फारसा वेळ हाताशी नसल्याने) त्यावे़ळेस असे वाट्ले की नाही .. हे घाईगड्बडीत वाचण्याचे संचित नाही. आत्ताच पाचवा भाग वाचला आणि असं जाणवलं की तुम्हाला भेटावे आणि मगच प्रतिक्रिया द्यावी पण असं वाटलं की तेही राहुन गेलं तर ? म्हणुन हा त्रोटक अभिप्राय .......
१९६६ मधे चेष्टा म्हणून सुरु झालेला, १९७६ मधे भावनिक मूळ धरलेला आणि २००० नंतर अंतरिक ओढीस लागलेला हा पसारा येवढ्या प्रमाणात विस्तारेल असं कधीच वाटलं नव्हतं. तसंच संचिताचं ओझं इतकं जास्त असेल असंही कधी जाणवलं नव्हतं. आज जुनं कमी होतंय आणि नव साचत नाहीय हे मात्र कुठेसं थोडं थोडं कळतंय.

अंतरीचा प्रवाह असाच वाहत राहु द्या !
नवं ही साचत राहो ही माझ्या अंतरीची सदिच्छा !

खुप सुरेख आहेत सगळेच भाग........

आणि इतक्या सहज्-सुंदर शब्दात तुम्ही तुमचा प्रवास मांडलात आणि वाटलं जणू आम्ही देखील तुमच्या सोबत तिथेच हजर आहोत....
:).......

सी. एल.
भाग पहिला आणि दुसरा हा आधीच वाचला होता. अगदी प्रामाणिक प्रतिक्रीया देतो.

पहिल्या दोने भाग वाचुन हे तुम्ही का लिहीत आहात हे कळाल नव्हत. कविता कशी जन्मते हे सांगता आहात की तुमची कविता कशी जन्मली हे सांगता आहात की कवितेच रसग्रहण कस कराव हे सांगता आहात, की तुम्हाला आवडलेल्या कविते रसग्रहण करता आहात? नाही पण हे नक्की ह्या सर्वापासुन वेगळ होत.

एका कविने आपल्या कवितेशी आणि आपल्या आंतरमनाशी सादलेला प्रामाणिक संवाद आहे हा.. कविता सुद्धा हेच असते नाही का?

खर सांगायच तर पहीले दोन भाग वाचुन मी थांबलो.. मला नो जेप्स.

तुमचा आज निरोप मिळाला आणि योगायोगे वेळही. उगाच वरवर वाचुन छान म्हणयला ऑफीशिय डॉक्युमेंट थोडी ना आहे. आज निवांत सगळ वाचल आणि तुमच्या लिखाणातला धागा माझ्या हाती लागला मग काय झिरपत गेल सगळ. तरी मला सगळ कळल आणि अनुभुती मिळाली अस नाही.

तुम्ही सर्वच बाबतीत वडिल आहात तेंव्हा तुम्ही सादलेला हा संवाद मला आत्ताच पुर्ण अनुभुती न देता गेला. आजुन काही वर्ष अजुन बरेच जिवनानुभव नंतर तुमच्या ह्या प्रवासाची अनुभुती मला नक्की मिळेल अस वाटत. तुम्ही लिहीलेल मला पुर्ण कळो न कळो, पण ते मार्गदर्शक मात्र नक्कीच आहे.

आपल्याला कळो न काळो आपला हात धरुन अक्षरं गिरवणारा आईचा हात किंवा अगदी जन्मल्या जन्मल्या बाळच्या ओठांना पान्ह्या पर्यंत नेणारी आई ही जिवन जगण्याच पहिल-वहिल आणि खरखुरं मार्गदर्शन करते. पण तेव्हांच ते मार्गदर्शन मला तेव्हांच कळाल नव्हत पण आज ते मला ख-या अर्थानी कळतय, म्हणुनच आजही मी तिच्याच पदराल धरुन जगतो आहे आणि जगत राहीन.

का कुणास ठाउक पण तुमच लिखाण देखिल मला तसच वाटल.

आकाश खोल आहे; पृथ्वी गोल आहे
पैठणीच्या पदराला मायेचा झोल आहे
उघड्या डोळ्याच्या कडांना काजळाची ओल आहे
म्हणून,
सारे काही मातीमोल आहे
हे म्हणणे कपोल आहे.........
मी तर म्हणतो हे सारच अनमोल आहे...

तुम्हा गुरुजनांचा आशिर्वाद सदैव असावा येवढीच प्रार्थना...

आज सगळं बाजुला सारुन तुमच्या पायवाटेकडे वळलो. याचि देहा याचि डोळा ...कविजन्म पाहीला. तृप्त झालो.

ती वाकडी वाट त्यांची
फक्त आम्ही शहाणे

सरळधोपट मार्गाने जाण्यातच शहाणपणा मानतो आम्ही. वळणावरची प्रत्येक पायवाट एका नव्या जगात नेईल याची आम्हाला शाश्वती नसतेच. तुमच्या प्रवासात कुठेतरी मला मी ही भेटलो. मी माझा प्रत्येक अनुभव शब्दबद्ध करताना तो गद्य होतोय की पद्य याचाही आता विचार करत नाही. जे वाटलं, जे पटलं ते उतरवलं. बस्स इतकच!

तुमच्या या सुरेख अन सुरेल प्रवासाला माझ्या अनंत शुभेच्छा !!!

व्वा, सी एल ! तुमची पाचही बाळंतपणं पाहीली. प्रसववेदना पाहील्या पण त्यापुढे आमचं आम्हाला 'सिझरीन' की काय? ते केल्यासारखं वाटायला लागलं.... गंम्मत छोडो !! पण सर्व लेख मस्तच झालेत आणि प्रतिक्रीया पण छान तितक्याच दर्जेदार वाचायला मिळाल्यात. कवितेचं रसग्रहण कींवा त्याचा अर्थ यावर लिहीणं समजू शकतो. पण त्यामागची स्फूर्ती कींवा त्या काळातली कवीची मनस्थीती, अस्वस्थता, जाणिव, विचार करण्याची पध्द्त इत्यादी हे सहसा वाचायला मिळत नाही. तुम्ही हे सारं थर्ड एन्गलने विचार करुन तुमच्या स्टाईलने मांडलं याला सलाम!
हे म्हणजे, फायनल प्रॉडक्टसाठी काय कच्चा माल लागतो ? आणि पुन्हा तो कच्चा माल कसा तयार होतो ? इथपर्यंत बारकाईने विचार झाला. मस्तच... लढो.

चाफा,
तुझ्या प्रतिसादाने माझी झोळी श्रीमंत झाली. Happy
...........................अज्ञात

बीएसके,
कविता हा माझाही प्रांत कधी नव्हता. कदाचित म्हणूनच माझ्याच उत्सुकतेपोटी हे सगळं प्रकरण जन्माला आलं असावं. इतरांचा प्रवास असा असतो की नाही माहित नाही पण "चंद्रावर प्रत्यक्ष जण्यापेक्षा त्या प्रवासाचं वर्णन जसं जास्त रंजक असावं" तसं वाचकाला हे वाटलं तरी ते पावलं अस मला वाटलं. Happy
.............................प्रतिसादाबद्दल आभार.

.........................अज्ञात

ultimatebipin,
"एखाद्या वाचकाला लेखकाला भेटावसं वाटणं" यातच मला सारं भरभरून पावलं. Happy
....................................अज्ञात

snehajawale123,
तुमच्या सोबतीने आमचा प्रवास किती सुखावला असेल काय सांगू ! खूप खूप आभार. Happy
..................अज्ञात

सत्यजीत,
तुझा अभिप्राय अतिशय प्रामाणिक आहे यात वादच नाही. तू माझी केवळ अपेक्षाच पूर्ण केली नाहीस तर मला न उमजलेलंही छान समजावून दिलंस !!
"आपल्याला कळो न काळो आपला हात धरुन अक्षरं गिरवणारा आईचा हात किंवा अगदी जन्मल्या जन्मल्या बाळच्या ओठांना पान्ह्या पर्यंत नेणारी आई ही जिवन जगण्याच पहिल-वहिल आणि खरखुरं मार्गदर्शन करते. पण तेव्हांच ते मार्गदर्शन मला तेव्हांच कळाल नव्हत पण आज ते मला ख-या अर्थानी कळतय, म्हणुनच आजही मी तिच्याच पदराल धरुन जगतो आहे आणि जगत राहीन".
याच प्रेरणेने "मी लिहीतो आहे आणि काय लिहीलं आहे याचा निरागस शोधही घेतो आहे " आपल्या आणि निसर्गाच्या अवस्था यातलं साम्य गिरवत बसतो. "एका कविने आपल्या कवितेशी आणि आपल्या आंतरमनाशी सादलेला प्रामाणिक संवाद आहे हा.. कविता सुद्धा हेच असते नाही का?" नेमकं हेरलंस. तू अत्यंत संवेदनशील कवी आहेस. तुझं निरिक्षण वाखाणण्यासारखं आहे. लिखाण बोलकं आहे. या अभिप्रायाने मी समृद्ध झालो आहे.
धन्यवाद.
.........................अज्ञात

kautukshirodkar,
" तुमच्या प्रवासात कुठेतरी मला मी ही भेटलो." यातच मी तृप्त झालो.
.........................अज्ञात

मन्या,
कवितेचं रसग्रहण कींवा त्याचा अर्थ यावर लिहीणं समजू शकतो. पण त्यामागची स्फूर्ती कींवा त्या काळातली कवीची मनस्थीती, अस्वस्थता, जाणिव, विचार करण्याची पध्द्त इत्यादी हे सहसा वाचायला मिळत नाही. तुम्ही हे सारं थर्ड एन्गलने विचार करुन तुमच्या स्टाईलने मांडलं याला सलाम! हा पैलू मलाच प्रथम कळाला. यासाठीच प्रतिसाद हवा असतो. लिहिणारा लिहीत जातो पण वाचणार्‍याला काय वाटलं हे कळणं हे यासाठी महत्वाचं. भरून पावलो. धन्यवाद.
.........................अज्ञात

एका कवीने स्वत:च्या आंतरमनाशी साधलेला संवाद खूपच मनाला भावला....... खरंच खूपच छान लिखाण..... विचार..... अन् आत्मपरिक्षण....... खूप काही छान वाचायला दिल्याबद्दल धन्यवाद...... ५ वा भागाचा हा प्रतिसाद..... उरलेले लवकरच वाचीन....... कल्पना.....

थँक्स कल्पना. उरलेल्या प्रतिसादांची वाट पहात आहे.
.......................अज्ञात

अज्ञात,
आज बर्‍याच दिवसांनी मायबोलीवर आलो आणि तुमचा निरोप पाहिला. तुमच्या कवितेचा प्रवास वाचुन काढला. सर्व लेख छान झाले आहेत. वाचताना मजा तर आलीच, शिवाय तुमच्या एकूण काव्यप्रवासाविषयी उत्सुकताही वाढत गेली. गेली अनेक वर्षे तुमचे जे लेखन सुरू आहे, त्याचा मागोवा घेण्याचा एक प्रामाणिक (आणि यशस्वी) प्रयत्न तुम्ही केला आहे. काव्यनिर्मितीची प्रक्रिया प्रत्येकासाठी वेगळी असू शकते. तुमच्या बाबतीत ती बहुधा 'जगण्यातून आलेल्या नाना प्रकारच्या अनुभवांतून निर्माण झालेल्या भावनांचा शोध आणि आविष्कार' अशी आहे असे मला वाटले. चांगली कविता लिहिण्यासाठी "अनुभवविश्व संपन्न असलं पाहिजे" असं आमच्या मराठीच्या शिक्षिका सांगत. त्याचा पुनःप्रत्यय आला. शिवाय कवितेला नुसतीच "स्वांतः सुखाय" न ठेवता, आपले अनुभव, विचार, व एकुणच सृजन इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी काही विशिष्ट काळजी घेणे आवश्यक आहे हेही तुमच्या लेखांवरून जाणवले. लेखांत आलेली कवितांची अवतरणे सुंदरच आहेत. छान!