कविता एक प्रवास (६)

Submitted by अज्ञात on 30 June, 2010 - 10:21

कविता एक प्रवास (१) http://www.maayboli.com/node/2360
कविता एक प्रवास (२) http://www.maayboli.com/node/2388
कविता एक प्रवास (३) http://www.maayboli.com/node/2407
कविता एक प्रवास (४) http://www.maayboli.com/node/2429
कविता एक प्रवास (५) http://www.maayboli.com/node/2480
यापुढे..............................

पहाता पहाता पाचवी डायरी संपली १४५५ व्या मैलावर. ११६६ ते १४५५ ह्या कळात माझ्या विचारांच्या प्रवाहात कांही अत्यंत संवेदनशील उपनद्या येऊन मिळाल्या. इथे कदाचित " यमुनेला गंगा येऊन मिळाली" असं उलटं विधान झालंय पण हे "मी" प्रथम पुरुषी असल्याने, माझ्या प्रवाहावर त्यांचा झालेला संस्कार हा प्रमुख मानलेला आहे हे त्यामागचं कारण आहे.

नव्या संवेदनांतून नवे ऋतू उमललले. मग ओघाने नवे रंग नवे गंध नवे फुलोरे आणि नवे ढंगही बहरून आले.

अंतराला अनामिक ओढ, विरहाला सुखाची किनार, कल्पनांना अकल्पित झळाळी आणि शब्दांना आगळा डौल मिळाला.

हुरहुरत्या काळजाला पाखरांची साद, खळखळत्या पाण्याला घुंगुरांचा नाद, पापणीच्या कडांना हुळहुळता अल्हाद, श्वासांना ध्यास, उश्वासांना वेदनांचा सहवास मिळत गेला आणि रेषा रेखत राहिल्या.

हा काळ अत्यंत समृद्ध वाटला मला. त्यातल्या भरार्‍या इतक्या अनोळखी प्रदेशात वावरल्या; की त्यांची वर्णने; साधारणतः कुणालाही अनाकलनीय वाटावीत. तशी ती वाटलीपण. " पृथ्वी गोल आहे आणि अधांतरी तरंगतेआहे", या विधानाला त्या वेळी जितकं वेड्यात काढलं गेलं असेल, तितकंच वेडं माझ्याही लिखाणाला काढलं अनेकांनी.

"मायबोली", एक, "मराठी साहित्याकृती निश्चितपणे प्रसिद्ध करून जगाच्या अवलोकनाला उपलब्ध करून देणारी समृद्ध वेबसाईट..!!"

इथे मिळालेल्या प्रतिसादांमधून मला बरेच चांगले आणि क्वचित व्यथित अनुभव आले. रचना, " नाही आवडली- नाही समजली-अनाकलनीय आहे असे म्हणणे", म्हणजे वाईट अनुभव नव्हे; तर, " न कळालेल्या कवितांविषयी कुणी अर्थ किंवा उत्पत्ती विचारल्यास त्याची टिंगलटवाळी करणे, तिचं अर्वाच्य बिभत्स रसग्रहण-विडंबन करणे, त्यवर अपमानास्पद भाष्य करणे, तिथे कवितेचा विषय सोडून इतर चर्चा करत बसणे, जिव्हारी लागेल असे टोमणे मारणे, पाणउतारा करणे इ. प्रकार घडले. मात्र या सर्व प्रकारात त्या रचनांमधली संवेदना आवडणार्‍यांची अस्मितापण पणास लागली. कांहींनी प्रतिसाद देणे बंद केले; नको उगाच आपल्यावर बालंट म्हणून. कांहींनी; मी कांही दिवस लिहू नये; असं सुचवलं. कुणी थेट प्रतिकार केला आणि हल्ला चढवला आक्रमकांवर. तसं पाहिलं तर यात कुणीच मला वैयक्तिक ओळखणारं असं नव्हतं. असो.

ज्या वृत्तींचा "लौकिक" ऐकून होतो, त्या, प्रत्यक्ष कुठलीही झळ न लागता अनुभवायला मिळाल्या. असा प्रसंग जेंव्हा एखाद्या कवीला; समोरासमोर समक्ष सहावा लागत असेल तेंव्हा त्याची काय मानसिक अवस्था होत असेल ह्याची कल्पनाच करवत नाही.

कुठलाही कलाकार हा कधीच एकसारखा असू शकत नाही. त्यामुळे, "स्वतःला तज्ञ समजणारे अथवा दुसर्‍याला अकारण प्रतिस्पर्धी मानण्याचा गंड बाळगणारे" मुळातच मला मला केविलवाणे वाटले.

खरं तर यातून मी गमावलं कांहीच नाही उलट "खरे नितळ प्रांजळ मित्र" मात्र नक्कीच मिळवले.

या संपूर्ण प्रवासात प्रकर्षानं जाणवलं ते,......... वयातीत प्रेम !! " कवीला जात पात लिंग वय" हे भेद नसतात ह्याची प्रचिती. सशक्त विचारांची देवाण घेवाण. असूनही नसलेल्या आणि नसूनही खूप कांही असलेल्या ऋणांची माया. न भेटताही दृढ झालेली अलौकिक मैत्री. अरूपातली एकता. एक आपलेपणाची जिव्हाळ्याची दृष्टीपलिकडली मानसिकता !! त्यामुळे पडलेला वयाचा विसर !!! आणि रसिक रोमहर्षक काळातला स्वैर स्वच्छंद वावर !!!.

ह्या सोबतीनं पावलागणिक एकेक दालन आपोआप उघडतंय. प्रत्येकाचा अस्वाद घेत त्याच्या खुणा मागे सोडत पुढे पुढे चाललो आहे. कदाचित मागून येणार्‍याला त्याचा उपयोग होईल; किमान त्याच्या स्वप्नरंजनासाठी.!!

होवो असेच होवो. तसं झालं तर अवर्णनीय समाधान मिळेल उमटलेल्या ह्या प्रत्येक पाऊलठश्याला !!

शुभम भवतु.

योगायोग असा की, वर्षातला सर्वात लहान दिवस ओलांडून २३ डिसेंबरला, कवितेचं नवं पाऊल पुढच्या डायरीत पडलं.

नव्या प्रदेशात नवी अवधानं आहेत. येणारे उद्देश अजून निराळे असणार आहेत. वाढत्या वयाबरोबर बाळपण आणि तारुण्य जपण्याची प्रक्रिया वेगळं वळण धारण करणार आहे. कधी खंत कधी उसंत शब्दांमधून ओघळणार आहे एकांतात रवंथ करण्यासाठी !!....

हळवेपणा वाढणार आहे. त्याला अभिप्रेत प्रतिसादाची अपेक्षा आणि उपेक्षा दोहोंच्या परिणामांची तीव्रता अधिक जाणवणार आहे. सांत्वन मिळेल तिथे जीव विरघळणार आणि समर्पित होणार, नाही तिथे व्यथा कुरवाळणार ! एक आनंद, दुसरा; खपलीखालची कंड !! दोन्हीही सुखावहच !!!..........

असो. पुढचं पुढे. साचलेलं जवळ जवळ निवळलंय. दिसतंय ते वर्तमान आणि भविष्य ! नवीन रोपं नवी रूपं !!! चालूया पुढे............ कधी आत्मपरिक्षण करत तर कधी दुसर्‍याच्या अंतरंगात शिरत ...................

**************************************************************************************************************

चंद्र अंबरी साक्षीला
तू का करतेस बहाणे
उचंबळे माझ्यातिल मी
तुजसाठी माझे जगणे

किती युगे हे असे चालले
प्रतिबिंबातिल असणे
रित्या कवेतिल अस्तित्वाचे
खूळ पाहुनी हसणे

भरतीला नयनी काठांवर
लाट सागरी ओघळते
ओहटीत सुकल्या अश्रूंवर
तुझी आठवण दरवळते

***************************************************************************************************************

आकड्यांच्या बेरजा करत गुच्छ बांधले गेले. ओथंबलेले शब्द गुंफले गेले. कांहींनी उराशी लावले. कांहींनी तुच्छ लेखले. कांही अवघडले तर कांही उलगडलेही गेले. १७५० व्या संधीवर ६ वी डायरी संपली.

प्रवास चालूच..........
दिशा ?.... निसर्ग !!.......................
निसर्गाचे फोटो... फोटोंवरच्या कविता !!................................
........................ एका छंदाकडून दुसर्‍या छंदाकडे. वाट तीच. वळण वेगळे.................................

ABSTRACT-027.jpgसुका देठ सुटला
धरे पाश तंतू
थांबला प्रवास असा
आधांतरी

कसे क्षेम मानू
इथे ना तिथेही
पराधीन मी
प्राण गेला तरी

*****************************************************************************************

IMGP5863.jpgअशी माणसांची हृदये जुळावी
फुलोर्‍यास अवघी नाती मिळावी
नवी पालवी जून मातीत यावी
कुबेरास ही माया ठेवा ठरावी

किती कोपरे असे; दृष्टी खळावी
खलांची शिवारे सुगीने जळावी
लमाणांपरी पाउले चालवावी
हरी प्रार्थितो; तूस किमया कळावी

************************************************************************************************

markat_chaalhe.jpgकिती रानवेडा
सुखाचा प्रवेश
कधी आद्य मी असा
होतो कपी

खुळ्या मानवाला
मिळे आज हे ना
बिना शेपटीच्या
व्याधी किती !!

***********************************************************************************************

_IGP4279.jpgपश्चिमेची वेस
पेटले आकाश
गुदमरे श्वास
घन मेघांमधे

अंधाराचा वेष
रात्रीचा प्रवेश
किरणांची रेष
बघ अडवू पाहे

******************************************************************************************

तसाही रोजचा उदयास्त वेगळाच असतो. बघणार्‍याची दृष्टी आणि संवेदना जागृत होणं महत्वाचं. त्या तशा झाल्या तर त्यावर विचार येणं गरजेचं. आलेला विचार लिहिला गेला तर पुनःप्रत्ययाचा आनंद, लिहिणार्‍याला आणि अस्वाद घेणार्‍यालाही !!

पाडव्याला, २७ मार्च २००९, माझ्याच वयाची माझी मामेबहीण कँसरने गेली. जाण्याआधीच्या भेटीत बरीच बोलली. मग तिचं जाणं हाही कवितेचा विषय झाला.

नवे वर्ष प्रतिपदा नवी झाले हे आता परके
होत्याचे होउन नव्हते हरली शब्दांची गांवे
जन्माचा सोस निवळला सरली भोगांची नांवे
पाहिले मि जे जे दिसले; होते ना किंचित ठावे

मृत्युच्या घाटावरती उरले ते कांगावे

***********************************************

एक एक जडले पाउल; पाकळी फुलाच्या देही
उन्मळून गेली स्वप्ने; गवसले न उरले कांही

निद्रेतच गळून पडली; व्याधींची लाही लाही
ज्योती थिजता विझतांना; श्वासांना कळले नाही

भोगांचे सर्ग वितळले; विरघळली पाश-जराही
शरिराविण झाले आता; विश्वातिल खोल निळाई

**********************************************

मधल्या कांही काळात कांही अनोळखी गावं परिचित वाटायला लागली. कवितेला कविता भेटली. आणि दिशा बहरू लागली.

मूक दृष्य मन स्पर्शुन गेले
काळजात गलबलले
कोण कशास्तव जगले वास्तव
काव्यातुन उलगडले

पडद्यापलिकडल्या रमणीचे
व्यक्त पुढे ठाकले
हरखुन झरले चित्त गोजिरे
काहुर हुरहुरले

जाणुन सरले अजाणतेपण
कांहितरी पण चुकले
भेटुनही ना कुणि भेटले
शब्द स्तब्ध राहिले

स्मृतीत आता चिन्ह हेच की
रूप रंग पाहिले
अंतरंग परि बंद कुपीतच
अंगण हिरमुसले.

*************************************

रम्य तरी हे कातर का मन
काहुरलेले 'मी'पण
हिरवळलेल्या कुशीत उलगडते
माझे हळवेपण

धडधड कोर्‍या श्वासांची
हृदयात स्वरांची राखण
मिटल्या डोळ्यांमधून
पाझरते स्वप्नांची वणवण

हलणारे तळ डोहाचे
मन असेच हे का असते
ओटीत सांडलेले अक्षत
काळजात मणभर भिजते ??

****************************

जरी नकळले वा आठवले
का सापडले नाणे हे
स्मरणामधली परतफेड जणु
गतजन्मीचे देणे हे

उधार व्याजासवे साचले
न चुकणारे असणे हे
भरून ओसंडल्या स्मृतींचे
विरघळून ओघळणे हे

नसे कुणी मी घडे तसे ते
नियतीचे झिंगवणे हे
चालावे चालते जसे
संचितातले उलगडणे हे

****************

मन तरंगते
किती उंच उंच ह्या लाटा
हृदयात उमललेल्या
स्वर्गाच्या अमृत वाटा

गंधर्वफुले या वळणावरती
नाही कुठेहि काटा
अस्तित्व-विरह सण भेटीचा
ना किंचित वा बोभाटा

नयनांतुन भेटे खोल काळजातला,...
स्वरांचा भिंगोटा
डोळ्यांच्या कठड्यांवरती अन
सागरफौजेचा फाटा

गलबला कुठेसा उरात-
डावा उजवा उलटा सुलटा
संदर्भाच्या पाकळीतला
हा गोड हवासा चिमटा

********************************

विरून गेले धुक्यात सारे जिरून उरले कांही
स्मरून गेले जुने पुराणे संदर्भातिल कांही

कळले नाही कोण कुणाचे असे भेटले कांही
काळजातुनी सुटलेले पापणीत जडले कांही

चिरंजीव क्षणस्मृती अखेरी शिदोरीच आहे ही
चालण्यास मुक्कामच नाही श्वास हा सदाही

*******************************

हळूच येई झुळुक हवेची स्पर्श खुणेचा घेऊन
नकारातला सकार हळवा जाई तळ हलवून

कधी कुंद श्वासात मुक्याने खुळे ध्यास रुंदावून
अकल्पनेचे असे रोप हे कुणि आणले वाहून

अज्ञाताचा रंग कसा हा गळा पापणी दाटून
गंध साजरा आयुष्यातिल कळीत आला उमलून

झरून गेली सर करणीची श्रावण मास चिथावून
मखर जिवाचे सजले हिरवा जाळ अंगभर लेवून

*******************

संध्येला बघ उषा मिळाली दिवस उरे ना रात्र
हरवल्यापरी चित्र बावळे बधीरली मन गात्र

क्षितिजावर पाऊलठसे हृदयी चाहूल विचित्र
अस्तित्वाच्या खुणा सभोवर तरी रिकामे चित्र

हुरहुर चळली हवी हवीशी इंद्रधनुष्य पवित्र
कधी भेटला कसा कुठे अंतरी बिलगला मित्र

******************

उगवतीस मावळे चंद्र ही पुनवेचीच वरात
अवसेला एकाच घरी मिटल्या डोळ्यात पहाट

शकुन जिवाच्या मनास वेढा घाली एक चर्‍हाट
बघता बघता नीर अचानक होई रेशिमगाठ

कुंद हवेतिल पिसाट वारा फिरवी तेच रहाट
उन्मेषांची गंधफुले हृदयात उमलती दाट

हळवी चाहुल पुढचे पाउल मेघ झरे घाटात
ओघळ हसर्‍या गालांवर डाळिंब फुटे ओठात

इथे जसे ते तसे तिथेही गाणे एक सुरात
हे द्वैत कुण्या अद्वैताचे जरि वेगवेगळी वाट

*******************************

आकंठ समृद्ध अनपेक्षित कल्पनातीत स्वप्नाळलेला प्रवास.....................................

तरुणाईला जिवंत करणारा झरा आटल्यावर, भावनांशी निगडित निवारा ढळल्यावर, स्वप्नांच्या पतंगाचा दोरा कटल्यावर, घरट्यातलं पाखरू उडून गेल्यावर, धबधबणारा शब्द अचानक मुका झाल्यावर आलेलं एकाकीपण, ह्यातून हरवल्यागत उमटलेली संवेदना वय वाढवून गेली ती अशी........

आज अचानक वृद्ध जाहलो
परकी झाली गात्रे
गेले आपलेपण हिरावले
नीरस झाली सत्रे

श्वास तेवढे आता
बाकी विस्कटलेली चित्रे
खंत पाहते अनंत रंगित
दुरावलेली पात्रे

विस्मरणाचा शाप तरी
स्मरतात जुनीच चरित्रे
कोण मी कसा कुणा भेटलो
मोडुन पडली छ्त्रे

इथे एकमेव "कविता" हाच आधार होता. ह्या आंतरिक बाबी दुसरं कोण समजू शकणार होतं ?????................

**************************************************************************************************************

भारावलेल्या अवस्थेत सैरभैर वहातांना प्रवाहाला काठ दाखवायचं अतिशय महत्वाचं काम कांही हितचिंतकांनी प्रांजळपणे केलं. त्यांचं ऋण मी कधीच फेडणार नाही करण मला त्यांना कधीच विसरायचं नाहीये.........

त्यांच्या अनमोल विचारांचं स्मरण केल्याशिवाय ह्या प्रवासाला सदगती मिळणार नाही. पुढे त्यांच्याच शब्दात..................

कविता पोस्टताना कौतुक कधी तर कधी टिका दोन्ही आलंच. तयारीत रहावं लागेल बाबा. मला स्वतःला ही कविता आवडली नव्हती, कळली तर मुळीच नव्हती

वटवाघुळही मला झेपली नव्हती. पण तुझ्या सर्वच वाईट असतात असे मला तरी वाटत नाही. तुझ्या इतर कविता छान असतात. काही समजतात तर काही समजायला भला वेळ लागतो. कदाचित थोडं आत्मपरिक्षण कर. तुलाच बरं वाटेल. इतरांच्या कविता वाच. ग्रेस, सुरेश भट, पाडगावकर, कुसुमाग्रज, अनिल, अरुणा ढेरे सारखे अजुन इतरही खूप सारे दिग्गज आहेत ज्यांनी मराठी श्रीमंत बनवली. कुणाला दाखवण्यासाठी नव्हे, बहुतांशी स्वानंदासाठी.

तुझ्या कविता खरंच मला तरी आवडतात.पण अलिकडे जरा ट्रॅक गडबडल्यासारखं वाटत होतं, मला कळत नव्हतं हे तुला कसं सांगावं. शब्दांची पुनरावृत्ती होउ लागली होती. उदा. विकल, रुधिर, हुळहुळ, कळा, काहुर, बुलबुल, प्राजक्त, लय, हिरवळलेले, जिव्हाळा, सल, येळकोट, गाभुळलेले, एकांत, लळा ..... पण तुझे बरेचसे इतर शब्द मनांत दिवसभर रुंजी घालतात, ती यादीही खुप मोठी आहे. तुझी शब्दसंपदा खुप प्रगल्भ आणि चांगली आहे.

 1. दंवाचा वानोळा काळजात गोळा पापणीस जाळे पाणी असूनही.'
 2. हवे हवे; पण नको; हळहळे हळवी रेशिमगाठ विकलत'
 3. 'हे बंद दारा उघडून दे रे सावलीत क्षणभर निवारा;
 4. मेघा विनवतो बरसून ये रे विझवून दे हा निखारा'

 5. हिंदोळा जाणीव अधांतरि दिशाहीन अंदोलत आहे,
 6. झुलण्यासाठीही उधार अन हात कुणाचा मागत आहे',

 7. नाहि पोरकी मुकी आंसवे प्राजक्ताची कवने ही
 8. एकांती जळल्या रात्रीची गंधित ओली वचने ही',

 9. 'अंत न ह्याला स्तर अनंत मन व्याकुळ कोळुन झाले
 10. रोज नव्याने रचते बुलबुल स्वप्नामधले इमले',

 11. 'रोज येउनी गाते बुलबुल गाभुळल्या गाभारी
 12. अलगद घेउन जाते मजला हिरवळलेल्या माघारी',

 13. अंगि दुरावा मन विणलेले' हे किती छान आहे.,
 14. स्वप्नस्थळ - माघारी - कधीतरी - स्वयंभू - घरटं - झोपू दे - विरंगुळा - नंदनवन - माणूसपण - एकाच नभावर - तेच माझे - करू काय ? - वाटेवरची माती - पण तुझी आठवण येते - मुळात सारे असुनी - ---- अजुन यादी बरीच होइल!

  हे सगळं तु लिहिलयस, अभिमान वाटावा असं.

  काही लोक कधीच कुणाला चांगलं म्हणत नाहीत. फक्त वाईट / अवघड कवितांवर टीकास्त्र. इतकं स्पष्ट की जीवघेणं.पण.... नाराज होउ नकोस. काही वेळा मला त्यांचंही म्हणणं पटलं. पण मित्रा, लिहायचं थांबवु नकोस. ते टॉनिक आहे. दुर करु नकोस शब्दांना.

  एका अजस्त्र टीकेनंतर मिळालेला हा केवळ दिलासा नव्हता तर अज्ञातालाच करून दिलेली अज्ञाताची एक विलोभनीय ओळख होती. चांगलं वाईट प्रत्यक्ष समोर जसंच्या तसं दाखवणारा स्वच्छ बोलका आरसा होता.
  एका हळुवार क्षणी, कवितेवर, जाणीवपूर्वक; नेमका पण अलगद वार करून आकर्षक पैलू पाडण्याचा हा प्रकार होता. स्वयंभू अधिकार होता. बुडत्याला वेळीच मिळालेला आधार होता. कवितेला मिळालेला नवा आकार होता. सहज.... त्यांच्याही नकळत कदाचित, पण भरकटू शकणार्‍याला योग्य दिशेकडे वळवणारा ...........दरबार होता.

  *******************************************************************************************************************

  अशीच एकदा मधेच एका संभ्रमित अपेक्षाभंगाची कविता झाली. "अनाकलनीय" च्या शिक्याला ओलांडून, मायबोलीवर, मे (२००९) च्या वाचनीय कवितांमधे थँक्स फॉर एव्हरी थिंग !!... निवडली गेली. चार लोकांनी अभिनंदन केलं तेंव्हा कळलं. फारच अनपेक्षित.

  थँक्स फॉर एव्हरी थिंग..!!

  मात्र आज ती आधीसारखी
  मनमोकळी, खळखळून
  आत-बाहेर बोलली नाही

  लिंगातीत-वयातीत मैत्रीच्या
  वास्तवाची जाणीव झाली असावी का तिला ?
  की त्याच्या वागण्यात आपलेपणाचा
  नकोसा अतिरेक झाला असेल ?
  तो अगंतुक होता का ?

  की ती स्त्रीसुलभ संशयाची बळी ?

  कुणास ठाउक

  असेल किंवा नसेलही

  पण तिच्या म्हणण्याप्रमाणे,
  खरं प्रेम हृदयात चिरंजीव असतं
  त्यासाठी,
  वारंवार भेटण्याची अथवा बोलण्याची गरज नसते

  असेल, तसंही असेल

  तसंच असो.

  थँक्स फॉर एव्हरी थिंग !!...

  ....................................................................प्रवासातला हा एक वेगळा टप्पा होता.

  *****************************************************************************************

  जून (२००९) महिन्यात अजून एक कविता, "कळले नाही", महिन्यातील सर्वोत्कृष्ठ म्हणून निवडली गेली.

  कोण सुचवितो कळले नाही
  कोण लिहवितो कळले नाही
  विस्मय हा इतुकाच
  खेळणे; युगे सरूनही गळले नाही

  मी न मला आठवतो किंचित
  कुणी तरी पण येतो अवचित

  कोण कशास्तव धुक्यात फिरतो
  ओळख अजून पटली नाही,....
  अखंड हा झरस्त्रोत तरीही
  नाळ गोत सापडले नाही,...
  झिजून गेले खडक
  तळाशी; कितीक उरले कळले नाही..

  इथे, आपल्या प्रांजळ व्यक्ताला एका अनोळखी प्रदेशात उभं रहायला स्थान मिळाल्याची हलकीशी सुखद जाणीव झाली.

  पुढे जेंव्हा मायबोली अ‍ॅड्मिन कडून, जुलै महिन्याच्या; कविता निवड समितीवर काम करावं असा प्रस्ताव आला, तेंव्हा, आपल्याला खरंच कांही कळतं कि काय ? असा अजाण विचार मनांत आला. तरीही, प्रत्यक्ष कुणाशीही संबंध येणार नसल्याने, एक अनुभव म्हणून, मी स्वीकारला आणि पूर्णही केला. निकाल तटस्थपणे लावण्यात मी यशस्वी झालो; असं मला वाटलं. इतरांना वाटलं की नाही कळलं नाही.

  ह्याच पद्धतीने, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नाशिक आयोजित, "यशवंत काव्योत्सवात", वाचनीय कविता निवडीचा प्रयोग, एक आयोजक-स्मन्वयक ह्या नात्याने (कवी म्हणून नव्हे), मी अलिप्तपणे केला.

  सर्व कविता, कवीच्या संदर्भाशिवाय, पांच वेगवेगळ्या परिक्षकांकडून वाचून घेऊन; प्रत्येकी २५ निवडून घेतल्या. परिक्षकांत ; (१) संगीतकार (२) कवी (३) समीक्षक (४) रसिक पुरुष (५) रसिक महिला, असे होते.
  परीक्षकही, पांचही वर्गांच्या याद्या करून, (सर्व कविता आल्यावर- प्रवेशिकेची मुदत संपल्यावर), चिठ्या टाकून निवडले जेणेकरून परिक्षकांचाही अंतर्भाव स्पर्धेत व्हावा.

  मिळालेल्या याद्यांवरून; पांचही जणांच्या सामायिक -------- प्रथम दर्जच्या
  चौघांच्या सामायिक------------------------------------------दुसर्‍या दर्जाच्या
  तिघांच्या सामायिक------------------------------------------तिसर्‍या दर्जाच्या
  दोघांच्या सामायिक-------------------------------------------चौथ्या दर्जाच्या
  आणि उरलेल्या सर्वांच्या सर्व ---------------------------------उत्तेजनार्थ
  अशा आपोआप ठरल्या गेल्या.

  ह्या पद्धतीत, वेगवेगळ्या मानसिकतेच्या, विचारसरणीच्या, आवडी निवडीच्या व्यक्तींकडून, स्वतंत्रपणे मूल्यमापन झाल्याने, सामायिक कवितांची सर्वसमावेशकता पणाला लागून त्या तौलनिक परिमाणदृष्ट्या निर्विवाद श्रेष्ठ ठरल्या. शिवाय ह्यात कवी ऐवजी कवितेची निवड झाली हे महत्वाचे. इथे मला कामाचे पूर्ण समाधान मिळाले. प्रस्थापित कवींच्या वहिवाटीला छेद दिल्या गेल्याने त्यांच्यात कांहीशी नाराजी असावीशी जाणवली. पण सहभागी कवी, निवड प्रक्रियेने प्रभावित वाटला. अशी कुणाच्या मर्जीशिवाय आणि सर्वानुमते झालेली निवड, निवडल्या गेलेल्या कवितांच्या कवींना निर्विवाद आत्मविश्वास देऊन गेली.

  जुलैच्या निवड समिती सदस्यत्वामुळे, जवळपास तीनशे कविता सक्तीने पुन्हा पुन्हा वाचाव्या लागल्या आणि माझ्याच स्वतःभोवती फिरणारा "मी" आपल्या कोषातून थोडासा बाहेर पडला.

  त्याच वेळी मे आणि जूनच्या निवड समितीच्या चर्चा, विशेषतः माझ्या त्या महिन्यातल्या कवितांबरोबर इतरही कविता आणि काव्यशैली यांवरच्या परिक्षकांच्या मार्मिक टिपण्ण्या वाचायला मिळाल्या. त्या अत्यंत उत्साहवर्धक होत्या. ज्यातून मला वेगळीच उभारी मिळाली.

  मागे एका प्रतिसादात, मायबोलीवरच्या, " दाद " ह्या सर्वमान्य नि:पक्षपाती-स्पष्ट्वक्त्या-सिडनी स्थित आय डी ने, माझं लिखाण, " स्वतःसाठी नव्हे तर इतरांना चांगलं वाचायला मिळावं म्हणून छापावं" असं लिहिलं होतं.

  प्रकशनाची ही कल्पना, मनांत; आता कुठेतरी, नकळत मूळ धरायला लागली होती. परंतु, जगन्व्यापी मायबोलीवरचे सर्वमान्य साहित्यिक आणि त्याबाहेरचेसर्वशृत साहित्यिक ह्यांचे तुल्यमापन करण्यास माझ्या अनभिज्ञतेमुळे मी असमर्थ होतो. मायबोलीवरचा उत्तम हा प्रस्थापितांमधेही उत्तम असेल का ? याबाबत, माझ्या वाचनदुर्बळतेमुळे माझ्याबाबतीतही मी साशंक होतो. कदाचित म्हणूनच माझ्या आसपास अनेक कवी-साहित्यिक
  मित्र असूनही, "माझे ललित आणि काव्य उन्मेष", कुणाजवळही कधीच व्यक्त झाले नसावेत.

  आता आपल्या उत्तमाचं इतरांसाठी साहित्य व्हावं असं वाटायला लागलं होतं. पण हे ठरवणार कोण ?? डॉ. रमेश वरखेडे यांना संपादनासाठी दिलेलं "बाड" त्यांच्याकडे त्यांच्या व्यस्त कार्यबाहुल्यामुळे तसंच अर्धलक्षित पडलं होतं. डॉ. वरखेडे स्पष्ट्वक्ते आहेत. न आवडलेली किंवा इच्छा नसलेली गोष्ट त्यांनी नि:संकोच नाकारली असती. पण तरीही माझ्या मनात शंका चुकचुकत होती.

  एक दिवस माझा प्रिन्टिंग क्षेत्रातला सृजनशील निर्भिड एकारांत मित्र; रानडे, " आता छापून टाका ना " असं बोलला. त्याच सुमारास जाहिरात क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमठवून नावारुपास आलेल्या क्रिएटो अ‍ॅड्वर्टाइजिंग्चा, दूराक्षी, स्वछ सरळ विचारांचा मिलिंद जोशी, यानंही याविषयी आग्रहाचा सूर लावला.

  पावसाच्या एका थेंबाने मातीला शहारा यावा आणि अंगभर मखमल पसरावी असं झालं मला आणि एक जाणकार म्हणून धनंजयलाही मत विचारलं. त्याचाही कल दोघांसारखाच वाटला म्हणून प्रथमच, , एक कवी-लेखक-छायाचित्रकार-रेखाचित्रकार-मुखपृष्ठकार "धनंजय", उत्तमाभिमुख प्रिंटर "रानडे", कल्पक "मिलिंद जोशी" आणि कृपाभिलाषी "मी" असे चौघे जमलो. मी कांही कविता वाचल्या. भावनांचा समतोल राखून विचार विनिमय झाला. मी तिर्‍हाइतासारखा तटस्थपणे ऐकत होतो.

  जन्माला येईपर्यंत माझी अन कवितेची नाळ एक होती. आज ती तिच्या स्वकर्तृत्वाने स्वयंभू वाटचाल करीत होती. तिला मिळणार्‍या सौहर्दाची झुळुक माझं सर्वांग कुरवाळत होती.

  पुस्तकापेक्षा ऑडियो-व्हिडिओ जास्त प्रभावी आणि वेगाने रसिकांपर्यंत पोहोचेल ह्या मिलिंद जोशीच्या म्हणण्याला सर्वांचं अनुमोदन मिळालं. चाली लावण्यासाठी संगीतकार म्हणून मकरंद हिंगणेचं नांव मीच सुचवलं. त्याने स्वरबद्ध केलेली "मेघपक्षी" ही कॅसेट मला मनापासून आवडली होती. फोटोग्राफीसाठी धनंजयसारखा नेमकेपण हेरणारा; अनुभवी संवेदन्शील योजक होता. जाहिरात- संपर्क- मर्केटिंग सांभाळण्यासाठी रानडे-जोशी होते. आता उरला होता कविता निवडीचा प्रश्न. डॉ. वरखेडेंना वेळ नव्हता. माझ्या डोळ्यासमोर धनंजयव्यतिरिक्त कुणी येत नव्हता. शिवाय सुरुवातीलाच गवगवा नको म्हणून चौघातच काय ते करायचं यावर एकमत झालं. मी वाचायची आणि धनंजयने "हो" "नाही" ठरवायचं असं ठरलं.

  वरखेडे सरांकडून गठ्ठा घेऊन आम्ही दोघं, आमचं श्रद्धास्थान, प.पू. भक्तराज महाराजांच्या, "मोरचुंडी" येथील गादीकडे झेपावलो. बाबांच्या पादुकांवर सर्व लिखाण समर्पित केलं आणि निवड प्रक्रिया सुरू झाली. तिथून परततांना योगीश्वर श्री निवृत्तीनाथांच्या समाधीला सहित्याचा स्पर्श करून आशीर्वाद मागितला. आठवड्याभरात तीनशे निवडक, विषयानुरूप; त्यतल्या त्यात धनंजयला उत्तम वाटलेल्या कविता घेऊन मकरंद हिंगणेकडे गेलो.

  मकरंद, एक कवी मनाचा रसिक तरूण संगीतकार. तशी आमची जुनी सांस्कृतिक आणि कौटुंबिक ओळख, पण सांगितिक प्रतिमा मात्र "मेघपक्षी" ने रेखाटली होती. स्वतः संगीत अध्यापक प्रध्यापक आणि सचरिणी चित्रकार, अशा कलाविभूषित मकरंदकडे, विषयाची प्रस्तावना करून, कवितांचा संच सुपूर्द केला. स्वरबद्ध केला तर आनंदच होईल आणि नाकारला तरी वाईट वाटणार नाही असं सांगून; त्याचा पाहुण्चार घेऊन परतलो.

  मकरंदने, चाराठ दिवसात सर्व कविता वाचून त्यातल्या काहींना चालीही लावल्या होत्या. झलक म्हणून तानपुर्‍याच्या वलयांत, एक दिवस, त्यांचा स्वरारव ऐकला. प्रसन्न वाटलं. मन भरून आलं. शब्दांना लाभलेला स्वरांचा साज, " वधूला अनुरूप वर मिळाल्यासरखा" वाटला. पहिल्या टप्यातील आठ कवितांच्या पुढच्या प्रक्रियेचे सर्वधिकार मकरंदला दिले. " या घरची लाडकी लेक आता त्या घरची झाली होती"

  मकरंदच्या तत्पर आणि नियोजनबद्ध कामाच्या पद्धतीमुळे, मी दीड महिन्याच्या परदेश दौर्‍याहून परतेपर्यंत कोरस आणि वाद्यवृंदाचे सर्व ट्रॅक्स तयार झाले होते. त्यात गाणं भरणं बाकी होतं.

  एका रात्री अचानक अल्हाददायक बातमी आली. दोन गाणी शौनक गायला होता. कार्यक्रम निमित्ताने एक दिवस आधीच नाशिकला आला असतांना, झालेले ट्रॅक्स मकरंदने त्याला ऐकवले, त्याला ते आवडले आणि बोलता बोलता त्याच दिवशी, सुदैवाने स्टुडियो मिळाल्याने, दोन गाणी गाऊनही टाकली. बाकी गाण्यांसाठी तारखा दिल्या आणि ठरल्यानुसार तीही गायला.

  शेवटच्या गण्याच्या रेकॉर्डिंगच्यावेळी, मकरंदच्या सांगण्यावरून, आतापर्यंत सर्वांसाठी "सर्वार्थाने अज्ञात असलेला मी" प्रथमच स्तुडिओत गेलो. ओळख-गप्पा-कौतुक-फोटो झालं. सासरच्यांनी मुलीचं कौतुक केल्यावर होतं तसं गलबललं.

  **************************************************************************************************

  हार्मनी बेसगिटार भरून बॅलन्स केलेली सी डी, ... उत्तम सी डी प्लेअर असलेली काचबंद ए सी स्कोडा फॅबिया गाडी,.....त्र्यंबक जव्हारचा घाट,....... नि:शब्द मी, धनंजय आणि मकरंद,........... तृप्तीचं मौन सोबत डोळ्यांतून सांडणारं आभाळ,...........काळजातला अस्वस्थ सागर त्यावर उसळणार्‍या हुंदक्यांच्या मुक्या लाटा................

  काठ असीमच !!........ शोधक वारा सैरभैर,.............. स्मृती विस्मृतींचा उर्दाळ,.............शब्दांचा लगाम आणि स्वरांचा साज असूनही समाधानच्या आवाक्याबाहेरचा.

  चैतन्याची आभा भावनांचं सौंदर्य,.............. एक विलक्षण भावसमाधी,.......... परिपूर्ण मानसिक संभोग !!!......

  कविता "प्रयेसी" आणि "अपार विरह" अशी कांहीशी अवस्था. किंबहुना याही पलिकडले काही.... जे मला वर्णन करता येत नसावं कदचित..........................

  गाडी थेट मोरचुंडी. आळवलेलं सर्व गादीवरच्या पादुकांवर समर्पित. आत बाहेर स्वस्थ अस्वस्थ हातात हात घालून चौफेर . तिथून त्र्यंबकेश्वरी निवृत्तीनाथ महाराज समाधीवर अंतःकरणपूर्वक कृतज्ञ सिंचन ....... एक महानुभव.

  भावनिक आवेशाला व्यवहारिक कोंदण म्हणून फौंटन म्युझिक कंपनी पुणे यांच्याशी आरती डिस्ट्रिब्युटरचे रवी बारटक्के यांच्याकरवी संवाद. सी डी आवडली. प्रसिद्धी आणि वितरणासाठी मान्यता. " जगाचा अनुभव नसलेल्या वधूचं अजून एक यशस्वी पाऊल". अकल्पित- सुखावह....................

  माझ्या, दुबईच्या आणि जपानहून नुकत्याच परतलेल्या अशा दोन्ही मुलींना सी डी च्या प्रती पाठवल्या. त्यांचा प्रतिसाद फारच उत्साहवर्धक होता. दोन्हीही जावई संगीताचे भोक्ते. मोठ्याचा दुबईहून आणि धाकट्याचा जपानहून फोन आला. आता जरा, माझ्या कवितेपासून अलिप्त असलेल्या आणि मी धारण केलेल्या " अज्ञात " नांवामुळे नाराज असलेल्या माझ्या सौ. ला माधुरीला, सी डी विषयी थोडी आस्था वाटायला लागली होती. दिवाळीच्या पाडव्याला, सी डी ची पहिली प्रत, मी तिला ओवाळणीत घातली होती. त्या दिवशी सी डी ऐकण्यापेक्षा इतर चर्चाच अधिक झाली कारण तोपर्यंत सर्वांनाच सर्वच गोपनीय होतं.

  दुबई फेस्टिवल साठी आम्ही दोन महिने दुबईत होतो. त्याचवेळी ४ मार्चला तिथे " २ रे विश्व मराठी सहित्य संम्मेलन होते. मुलगी जावयाचा त्यात प्रत्यक्ष सांस्कृतिक सहभाग होता. अशात धनंजयने नाशिकहून फोन करून संमेलनात सीडीचे विमोचन करावे असे सुचवले.

  चक्र फिरली, चीडीज कॉपी झाल्या, प्रथेनुसार संम्मेलनाध्यक्ष महराष्ट्रभूषण कविवर्य मंगेश पाडगांवकर यांच्या शुभहस्ते सी डी चे विमोचन झाले. फोटो आणि चित्रफीतीत नोंदणी झाली. तिथे उपस्थित सर्वश्री गायक-कवी-लेखक-सादर्कर्ते अरूण दाते, सौमित्र, शिलेदर, सोमण, खरे यांना सी डीज दिल्या. कवितेचं अजून एक पाऊल पुढे पडलं.

  भारतात बातमी झाली. सकाळ -लोकसत्ता -लोकमत -गांवकरी रसरंग या वृत्तपत्रांत रसिक तज्ञांची परिक्षणे आली. मार्च मधे संपूर्ण महारष्ट्रात वितरित झाली. परिक्षण रसग्रहण समीक्षणांनी, आजपर्यंत "अज्ञात" असलेल्या कवीला, त्याची सामाजिक व्यावहारिक ओळख देऊन, प्रथमच सन्मानानानं प्रकट केलं.

  विश्वास ठाकूर यांनी विश्वास दाखवून, विश्वस ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट तर्फे निर्मिती स्वीकारली.

  प्रा. डॉ. वेदश्री थिगळे, काव्यचित्रकार धनंजय गोवर्धने, सिनेमॅटोग्राफर कौतुक शिरोड्कर, कवी किशोर पाठक, नट- निवेदक सदानंद जोशी यांनी अभ्यासपूर्ण लेख लिहून कविता मोठी केली.

  आजचं , " आपण लाँग ड्राइव्हला जाऊ, मला सी डी ऐकायची आहे " हे तिचं वाक्य म्हणजे माझ्यावर वळवाचा धुवाधार शिडकावा होता.

  आता सौ माधुरी, तिची ओळख " सौ माधुरी अज्ञात कुलकर्णी" अशी करून द्यायला संकोचत नाही. स्वतःहून सी डी लावते, गाण्याबरोबर गुणगुणते, मान डोलवत ताल धरते.

  ह्या बदलाचे सर्व श्रेय, "अज्ञाताची कविता", तिच्यावर प्रेम करणार्‍या रसिकांना आणि तिला त्यांच्यापर्यंत सालंकृत पोहचविणार्‍या संगीतकार आणि गायकाला देते.

  ***********************************************************************************************************

  आता चाल मंदावल्यागत वाटते. डायरी क्रमांक सात कुठे नेईल माहित नाही. आतापर्यंत दडलेली कविता लोकांसमोर येऊ पहातीय. कवी "अज्ञात"च असला तरी कर्ता अनावृत्त झालाय.

  घडून गेलेल्या गोष्टी सोप्या वाटतात. मागे वळून पाहिलं की झालेल्या वाटचालीचा अभिमान वाटू लागतो. पुढे चालतांना जुन्या अनुभवांचा आधार असतो परंतु येणारे अडथळे निराळे असतात. पोलिसांपेक्षा चोर हुषार असतात म्हणे पण पोलीस त्याहीपेक्षा हुषार असतात असं मी मानतो. कारण कुठलीही गोष्ट नव्याने आपोआप होत असते पण ती केल्यावर कशी केली / कशी झाली हे शोधणं अवघड असतं. तसंच हेही. घडलेल्या घटनांचा कुतुहलाने कविता शोध घेत रहाते गतकाळाच्या अंतरंगात.

  पुढे बरीच शिखरं आहेत पादाक्रांत करण्याजोगी. काळपरत्वे तीही होतील. एकाच भरारीत थेट पोहचण्याऐवजी वाटेवरची घाट्वळणे - टक्के टोणपे पार करत निसर्गाच्या सलगीनं त्याच्या लीला अनुभवत झालेली वाटचाल जस्त समृद्ध असते. "अवघडावर" मात करू पहणारी "ओढ" अधिक संपृक्त असते. मिळालेल्यापेक्षा अपूर्ण इच्छेची सृजनशीलता प्रबळ असते. "सहवासापेक्षा" "विरह", बंधन जास्त घट्ट करतो. हवी हवीशी वाटणारी पण कधीच न जुळु शकणारी नाती चिरंजीव असतात.

  पाऊस पडला की नको असतो आणि नसला की अस्वस्थ करतो.

  जखमेची वेदना आणि गाभुळ्लेल्या खपलीखालची कंड ह्या दोन्हीत फरक आहे. जखम "थेट शरिराला वेदना देते" तर खपलीखालची, "वेदना शरिराला पण संवेदना मनाला" अशी असते.

  अबोल अवर्णनीय व्यक्ताला , " कविता" आपल्या ओंजळीत, अमृतमय करते. सम दु:खी- समविचारी ऋणकांना संजीवनी देते. किमान, " अजून कुणीतरी आपल्यासारखं आहे", या अधाराने दिलासा देते.

  नुसतं चंदन उगाळल्यावर जास्त सुगंधी होतं. अत्तराचा फाया चुरगळल्याशिवाय दरवळत नाही.

  प्रेम हे दुरूनच चांगलं कारण तेंव्हा ते "अपरिमित" असतं निसर्गासारखं. त्याच्या हव्यासाची उत्तेजना प्रचंड उर्जित असते. सकस स्कलनशील असते.

  प्रेमभंग तितकाच तीव्र पण तो "उद्रेक" असतो. उर्जा हीही तितकीच प्रबळ पण "विध्वंसक" असू शकतो.

  प्रेमाचा अभाव म्हणजे नीरस आयुष्य.घालमेलच नाही. मरेपर्यंत जगायचं एवढंच.

  अव्यक्त प्रेम हाही एक स्फोटक गुदमर असतो. त्याचा दबाव कमी करण्यासाठी "समागम" ही निसर्गदत्त सोय आहे; जी सर्व प्राणीमात्रांमधे समान आहे. माणसांसाठी मात्र ह्या, शारिरिक समागमाव्यतिरिक्त " मनसिक" आणि "वैचारिक" असे दोन "समागम" अनिवार्य असतात जे प्रेमाशी घनिष्ट निगडित आहेत.

  "सृष्टीची" निर्मिती शरिरिक; तर "साहित्य कलांची" मानसिक्/वैचारिक मैथुनातून होते. दोन्हीही सुंदरच आपापल्या संस्कारानुरूप.

  मानसिक - वैचारिक मैथुनाला गरज असते संवादाची आणि व्यक्त होण्यासाठी मुभा असते चौसष्ट कलांची !!
  त्यातला एक अंश म्हणजे "कविता', जी दुसर्‍या श्रोत्याशिवाय स्वतःशीच मनमोकळा संवाद साधून संवेदना गोंजारू शकते, ताब्यात ठेऊ शकते, उद्रेकापासून संरक्षण देऊ शकते केंव्हाही- कुठेही- कितीही,.. विनासंकोच... न कंटाळता......................... आणि म्हणून अविभाज्य........................

  **************************************************************************************************************

गुलमोहर: 

एक नखशिखांत वेड लावणारा प्रवास....
तुमचा प्रवास असाच निरंतर सुखाच्या, समाधानाच्या, पुर्णत्वाच्या दिशेने चालत राहो हिच सदिच्छा ! Happy

तुमचं कवितेवर आणि शब्दांवर असलेलं प्रेम लेखातून जाणवतंय. खूप संयतपणे व्यक्त झाला आहात...आणि तुमच्या कवितांमधूनही नेहमी होता. अज्ञात, तुमच्या कवितेचा हा प्रवास दुसर्‍यांसाठीही नक्कीच प्रेरणादायी आहे.

मनापासून शुभेच्छा!!... तुमच्या आणि अज्ञातांच्या कवितेच्या प्रवासाला!

वेळ काढून वाचून काढलं सगळं.
कवितांवर निस्सिम प्रेम आणि त्यांच्याबद्दल भरभरून लिहिलंयत Happy

पुढील प्रवासासाठी अतोनात शुभेच्छा! Happy

तुमच नांव जरि अज्ञात असल तरि तुमच्या शब्दातिल भाव नुसता डोळ्यांना नाहि तर मनाला भावतो, कळतो , ज्ञात होतो. खुपच छान.

व्वा सीएल,
कवितेच्या प्रवासाचा 'सिक्सर' मस्तच ! तुमच्या कवितांबद्दल नव्याने (अर्थातच कौतुकाचं!) बोलायची गरज नाही. बाकी मॅटरमधून तुमची संवेदनशीलता... प्रतिभा... शब्दप्रभुत्व... (हा लेख वाचल्याचा परीणाम !!) जाणवतं. भाग १ ते ६ पुस्तक रुपाने छापायचा नक्की विचार करा. बाकी टीकेपुढे तुम्ही टीकलात, यातच तुमच्यातील संवेदनशील 'कवी' - 'वीक' नाही हे कळलं. पुढील प्रवास चालू द्या असाच जोरात....

खूपच सुंदर वाटले. विशेषत: तू आपल्या कवितेच्या प्रवासाची नोंद ठेवतोस हे खूपच चांगले आहे. नाहीतर माझ्यासारखे कवी (आणि शेकडा ९५ असतील) कविता लिहितात आणि विसरून जातात, क्वचित प्रसिद्ध करतात पण कालांतराने विसरून जातात. तसे व्हायला नको.

पुलेशु. Happy

गुरुजी :

" आपकी जिंदगी की बात सुन कर क्या कहें...
इक तमन्ना थी... जो अब तकाझा बन गयी !!!! "

हे सगळ लिखाण... हा प्रवास जो शब्दबध्द केलायत...आमच्यासारख्या रांगणार्‍यांसाठी भांडार मोकळ केलयत तुम्ही.. सगळ अगदी मनातनं आलय हे जागोजागी जाणवतं...तुम्हाला मी भेटलोय..बोललोय त्यामुळे मी या लिखाणाशी अधिकच रिलेट करु शकतो....तुमच जीवनाच तत्वज्ञान आकर्षक आहे.. सर्वंकष तर आहेच आहे.

यातनं हेही जाणवल की तुम्ही ललीत लेखनाकडेही वळायला हव.. एका समृध्द आयुष्याचे अनुभव लोकाभिमुख व्हायला काहीच हरकत नाही... जरुर विचार करा !!!

तुमच्या कवितेचा मी वाचक-विद्यार्थी अन चाहता आहेच... त्यामुळे त्यावर फार बोलणार नाही... इथे वकुबाने वागलेलेच बरे Happy

असेच लिहीत रहा...

सस्नेह

गिरीश

अप्रतिम व्यक्तव्य! आपल्या मनातील विचारांचे खंडन (?) करणे सर्वांनाच जमते असे नाही.
आपला नविन छंदही सुंदर. दुसर्‍या फोटोवरील कविता अधिक आवडली.
आपण खरेच बहुरंगी आहात ह्याचा प्रत्यय येतोय!

अक्षरशः वेड आहे हा लेख म्हणजे..
तुमच्या प्रतिभेला किती मुजरे करावेत!! ___/\___

- प्राजु

अज्ञातजी...एक अतीशय सुरेख, सर्वांग सुंदर प्रवास...शब्दांचे, कल्पनांचे तुम्ही कुबेर आहेत हे पावलोपावली तुमच्या कवितेतुन जाणवत आलंयच...पण तुमच्या विचारांच्या गर्भश्रीमंतीचे दर्शन ह्या संपुर्ण प्रवासात,शब्दाशब्दात घडले...तुम्हाला फक्त शुभेच्छाच देऊ शकते..तोही खारीचाही वाटा ठरणार नाही..

तुमचा हा प्रवास असाच चालु रहावो आणि अजुन अजुन समृद्ध होत जावो हि कामना करते.
All the best.

ज्यांना माहीत नाही त्यांना सांगते अज्ञात एक चांगले अभिनेते देखिल आहेत. He is a good theatre artist. Happy