आंधळा

Submitted by SharmilaR on 11 October, 2021 - 01:51

आंधळा

“हत्ती भिंतीसारखा आहे.” आंधळ्या ने परत रोजच्या प्रमाणे कितव्यांदा तरी सांगीतलं.
रोजचं त्याचं बोलणं ऐकणाऱ्यांनी रोजच्या सवई प्रमाणे त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. कारण त्याला काही सांगून उपयोग नव्हता.

आंधळा परत जायला निघाला, तसं एकाला राहवलं नाही,
“अरे, ऐक माझं. तुला अजून पूर्ण हत्ती माहीतच नाही.”
“नाही कसा? मी काय वेडा आहे का?” चिडून आंधळ्यानं विचारलं.
“नाही. तू वेडा नाही. पण तू रोज एका ठराविक जागीच उभा राहून हत्तीला हात लावतो. मग तुझ्या हाताला फक्त हत्तीची पाठच लागते. आणि तू फक्त पाठीलाच पूर्ण हत्ती समजतोस.”
“मला कळतं सगळं. तू मला काही शिकवू नकोस. एवढी वर्षे झालीत मी रोज येतोय इथे.”
“अरे, पण तू आंधळा आहेस. मी डोळसपणे जग बघतोय. निदान म्हणून तरी विश्वास ठेव. ऐक माझं” तो डोळस माणूस म्हणाला.
“डोळस म्हणजे?”
“मला जग दिसतं.”
“दिसतं म्हणजे?”
आता डोळस माणसाला पुढे काय बोलावे ते कळेना. बाकीचे गप्प का राहिलेत ते त्याला कळलं.

“हे बघ..,” इथे डोळस माणसाने जीभ चावली. “दिसणं म्हणजे काय ते मला तुला समजावता येत नाहीय. पण प्रत्येक गोष्टीला खूप पैलू असू शकतात. तू दुसर्‍यांच बोलणं ऐकून तरी घे.”
“मला काही ऐकायचे नाही. माझा इतक्या वर्षांचा अनुभवच बरोबर आहे.” आंधळा हट्टीपणे म्हणाला.
“सगळ्या एकत्रित अनुभवाने एखादी गोष्ट बनते. एकाच जागीच्या एकाच अनुभवाला तू पूर्ण सत्य मानत आलास. निदान अनुभव घेण्याची जागा तरी बदल. तुला संपूर्ण सत्य कदाचित कधीच कळणार नाही. पण निदान तुझ्याकडे पूर्ण सत्य नाहीय ह्याची तुला जाणीव होईल. मग कळूंन घेण्याचा तू प्रयत्न तरी करू शकतोस.”
“मला काही जागा-बिगा बदलायची नाहीय.” आंधळ्याला अजूनही डोळस माणसाचं म्हणण पटेना. शिवाय इथून घरी गेल्यावर तो त्याच्या शिष्यांना त्याचा अनुभव रोजच सांगत होता. तो बदलायची त्याची इच्छा नव्हती.

“मी तुला मदत करतो. संपूर्ण हत्तीला हात लावायला. एकदा बघ तरी.....”
“नाही. मी जातोय.”
“ठीक आहे. तुला संपूर्ण सत्य जाणून घ्यावसं वाटेल तेव्हा मला सांग. मी रोज तुझी इथेच वाट पाहीन.”
तो डोळस माणूस अजूनही उभा आहे त्याच जागेवर रोज आंधळ्याची वाट पहात.
********************************

(टीप :- वरील कथेत आंधळा हा शब्द शारीरिक व्यंग्य म्हणून वापरला नसून स्वत:तल्या उणिवांची जाणीव नसलेला या अर्थी वापरला आहे. आणि डोळस हा शब्द गुरु या अर्थी वापरला आहे ह्याची कृपया नोंद घ्यावी.)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान रुपक कथा. जुनी कथा कालानुसार नव्या पॅकेजमध्ये.
अश्या आंधळ्यांमध्येही दोन प्रकार असतात.
एक ज्यांना ईतर बाजू जाणूनच घ्यायच्या नसतात आणि आपल्या आंधळेपणातच खुश असतात.
दुसरे जे आपण आंधळे आहोत हे कबूल न करता स्वत:ला डोळसच समजत असतात.

थँक्स आसा, ऋन्मेऽऽष.

एक ज्यांना ईतर बाजू जाणूनच घ्यायच्या नसतात आणि आपल्या आंधळेपणातच खुश असतात.
दुसरे जे आपण आंधळे आहोत हे कबूल न करता स्वत:ला डोळसच समजत असतात.>> अगदी. अगदी.