लेखन स्पर्धा : माझे कोविड लसीकरण - सामो

Submitted by सामो on 16 September, 2021 - 21:21

कोव्हिडचा उच्छाद सुरु झाला आणि रोज रात्री झोपताना, श्वास लागत असल्याचे भास होउ लागले. आपल्याला उद्याचा दिवस दिसेल का की असा श्वास लागुन आपला आजच रात्री मृत्यु ओढावेल असे विचार अक्षरक्ष: जवळजवळ रोज येऊ लागले. हे श्वास लागणं वगैरे सर्व सायकोसोमॅटिक होते. थोड्याच वेळात पेंग आली की श्वास बरोबर नियंत्रित होत असे व सकाळी उठल्यानंतर हायसे वाटत असे. वर्ल्डोमीटरवरती प्रेत्येक देशामधील मृत्युमुखी लोकांची संख्या कळत होती, दिवसेंदिवस धास्ती वाढत होती.

मात्र शेवटी लस सापडली असल्याची बातमी आली. हायसेच झाले. लसीकरता ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरु झाले. ऑनलाइन, रांगा लागू लागलेल्या होत्या. परंतु त्या काळात फक्त अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्यांना व को-मॉर्बिडिटी असणाऱ्या लोकांनाच लस दिली जात होती. आपण स्वत: ओव्हरवेट असल्याचा आनंद पहील्यांदा अनुभवत होते. त्या काळात सकाळी सकाळी वॉलग्रीन्स, सी व्ही एस वगैरे साईटसवरती रिफ्रेश करत बसत असे की बाबा आपला नंबर लागो. नवऱ्याच्या काही मित्रांनी ते 'अत्यावश्यक सेवा' पुरवत असल्याचे सांगून लस घेतल्याचे कानी आलेले होते परंतु नवऱ्याचे व माझे म्हणणे हे पडले की असा विश्वासघात करुन, फसवुन आपल्याला लस नको. ज्यांना म्हणजे अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या लोकांना आधी लस मिळू देत. आपण त्यांची लस स्वार्थीपणे हापसायची नाही. त्यामुळे अनेक ठिकाणि रजिस्टर करुन ठेवेलेले होते की ब्वॉ लसीकरण सर्वांकरता खुले झाले की ताबडतोब आपल्याला कॉल यावा.

काही दिवसातच लस सर्वांना म्हणजे कोमॉर्बिडिटी असो नसो वगैरे सर्वांना खुली झाली. आमचा नंबरही लागल्याचा कॉल आला. नवऱ्याचा नंबर पहीला लागला आणि तो उबर घेउन न्यु यॉर्कला जाउन मॉडर्नाची लस घेउनही आला. उबर कारण न्यु यॉर्कमध्ये कार पार्किंग मिळणे म्हणजे दुर्मिळ असे उंबराचे फूल सापडण्यासारखे होते/आहे. त्याला लस घेतल्यानंतर काहीही त्रास झाला नाही.

आता माझ्या फायझर लशीचा किस्सा. माझा नंबर जवळच म्हणजे कारने २० मिनीटावर असलेल्या एका सेंटर`वरती लागला. पॅनडेमिकमध्ये घरात अडकुन पडलेल्या मला त्या दिवशी कारमधुन भटकायला म्हणजे सेंटरपर्यंत जायला मिळणार हीच हर्षवायु होण्यासारखी गोष्ट होती. डॉक्टरांकडे जाणे, लस टोचण्याकरता जाणे याबाबतीत मला फार उत्साह असतो. कारण तिथे सर्व डल चेहऱ्याचे रोगी बसलेले असतात. वैतागलेले असतात. तिथे आपण जामनिमा करुन, पर्फ्युम वगैरे शिडकावा करुन गेलो की भारी वाटतं. आपण उठुन दिसण्याची ती एक संधी असते असा माझा विचित्र ग्रह आहे Wink जो की सार्थदेखील आहे.

त्या दिवशी सकाळी मी लाल चुटुक टिशर्ट व टाइटस घातल्या. लाल रंग फार आवडतो आणि जर एखादा दुर्मिळ ॲप्रिशिएटिव्ह लुक मिळाला तर तो लाल रंगातच मिळतो असा अनुभव आहे. मस्त डुल वगैरे घालुन, नटूनच निघाले. तर असो. आम्ही कार काढली. आणि काय मस्त वाटलं. किती तरी दिवसांनंतर मागे पळणारी झाडे, फुले, पक्षी, लोक ..... एकदम उत्साही वाटले. सेंटरवर प्र-ह-चं-ड लाईन होती. ती लाईन पाहून एक्साईटमेन्टमध्ये मी लाइनीचे, सेंटरचे फोटो फोनवर काढू लागले तर समोरची माणसे कुतूहलाने आपल्याकडे पहात आहेत असे निदर्शनास आले. लाल टी शर्ट आज आपल्याला फारच खुलुन दिसतोय असा आनंद होतो न होतो तोच् पाठीवर थाप पडली. पहाते तो एक भरभक्कम, रुंद शरीरयष्टीच्या महिला पोलिसने माझे लक्ष मागे असलेल्या एका पाटीकडे वेधले ज्यावरती लिहीलेले होते 'ॲट नो सर्कम्स्टन्सेस, फोटोग्राफी अलाउड' ताबडतोब समोरील गर्दीच्या लुक्सचा उलगडा झाला आणि मुकाट्याने लाईनीत चिडीचूप उभी राहीले. लाइन भराभर पुढे सरकत होती. जिकडेतिकडे मिलिटरीचे जवान तैनात होते. व काम करत होते जसे - आय डी तपासणे, काहीतरी टिपून घेउन त्यावर सही घेणे वगैरे. अक्षरक्ष: २५-३० बुथ होते. त्यामुळे पटापट काम होत होते. माझ्या वाट्याला एक बुथ आला ज्यामध्ये एक तरुण, काळा, तरतरीत मिलटरी जवान तैनात होता. त्याने मला नाव व जन्मतारीख विचारली. माझे वय ऐकून तो म्हणाला "रियली? यु डोन्ट लुक दॅट एज. नो व्रिंकल्स" मी मनात म्हटले 'अरे चम्या नीट तरी कॉम्प्लिमेन्ट द्यायचीस. या मास्कमधुन चेहऱ्यावरच्या काय सुरकुत्या दिसणार रे तुला कप्पाळ! त्यापेक्षा डोळे सुंदर आहे म्हणाला असतास तर तुझ्या तीर्थरुपांचे काही गेले असते का? " उघडपणे त्याला धन्यवाद देउन आणि लस टोचून घेउन, पुढे गेले. पुढे मग ॲलर्जिक रिॲक्शन तर येत नाही ना हे बघण्याकरता १० मिनिटे थांबवुन ठेवले गेले. नंतर एक बाई चौकशी करत आली की पुढील लशीचे स्केड्युल मिळाले का वगैरे. मग ते स्केड्युलही फिक्स केले.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.
देशी लोकाना जुगाड करायची सवयच आहे. भारतात पण बरेच जण अहा जुगाड करुन लस घेतली होती.

छान
दुसऱ्या लशीबद्दल पण लेख हवा.

सामो
छान खुसखशीत लेख . मजा आली वाचताना .
हसताना माझ्या चेहऱ्याला रिंकल्स पडल्या .

ते लाल टि शर्ट वगैरे ग्रेट आहे . असे आपले काही ग्रह असू शकतात . प्रत्येकाचे वेगळे . अन त्याच्या पुरते अगदी खरे .
मस्त

धनयवाद बिपीनजी.
>>>>>आपले काही ग्रह असू शकतात . प्रत्येकाचे वेगळे . अन त्याच्या पुरते अगदी खरे .
Happy खरे आहे.

किशोर धन्यवाद. दुसरी लस अगदी वेळेवर तर मिळालीच पण अज्जिबात गर्दी नव्हती. आता लोक ५०-५० आहेत. अर्धे मास्क्वाले अर्धे बिन्धास्त. आम्ही ८०% पहील्या अर्ध्यात असतो तर २०% दुसर्‍या. अर्थात ८०% वेळा मास्क लावतो. २०% वेळा म्हणजे आसपास गर्दी नसताना काढतो.

पण एकंदर न्यु जर्सीत बरे आहे.

अभिनंदन सामो...!
ह्या गणेशोत्सवात तुझा उत्साह वाखाणण्याजोगा होता...