मेलनी

Submitted by SharmilaR on 5 October, 2021 - 03:04

मेलनी

प्रत्येकाच्या आयुष्यात एक मेलनी असावी, जवळची मैत्रीण म्हणून, जिवाभावाची सखी म्हणून. स्वत: पडद्यामागे राहून सतत पाठराखण करणारी मेलनी. गरज पडेल तेव्हा जगाची पर्वा नं करता खंबीर आधार बनून पुढे येणारी मेलनी. कायम निरपेक्ष वृत्तीनं वागणारी मेलनी. मैत्री वर गाढ श्रद्धा आणि विश्वास असणारी मेलनी. मैत्रीकरिता प्रसंगी जगाशी टक्कर देणारी मेलनी.

सगळ्यांना हवीहवीशी वाटणारी गोड मेलनी ही व्यक्तिरेखा आहे, “गॉन विथ द विंड” या सुप्रसिद्ध कादंबरीतील. ती कादंबरीची नायिका नाही, तर सहनायिका आहे. खरं तर नायिकेच्या अगदी विरुद्ध स्वभावाची आहे. पण ही लहानखुरी, अशक्तशी मेलनी कायमची आपल्या मनात घर करून बसते ती आपल्या ऋजु स्वभावाने अन् प्रेमळ गोड वागण्याने.

लेखिका मार्गारेट मिशेल यांनी १९३६ मध्ये लिहिलेल्या "गॉन विथ द विंड" या कादंबरीतील या मेलनीची आपल्याला ओळख होते, तीच मुळात सगळ्यांनी तिच्याबद्दल काढलेल्या “ती गोड मुलगी..” या उदगारांनी. तिच्या सहवासात आलेल्या प्रत्येकाला ती आवडते, हवीहवीशी.

मेलनी दिसायला अतिसमान्य, सरळ साध्या स्वभावाची, जरा घाबरटच मुलगी आहे पण तिचे मोठे मोठे डोळे बघणाऱ्याच लक्ष वेधून घेतात. तिच्या डोळ्यात शांत, आश्वासक भाव आणि समजूतदारपणा आहे. तिच्या आयुष्यात वाईटपणा...... दुष्टपणा यांचा कधी शिरकावच झालेला नाही. त्यामुळे समोर आलेल्या वाईट, दुष्ट प्रवृत्ती तिच्या नजरेला कधी दिसतच नाही. ती स्वत: जितकी साधी सरळ आहे, तितकंच साधं सरळ जग तिच्या दृष्टीने आहे. ती स्वत: तर आनंदी आहेच आणि जगाने पण आनंदीच असावं असं तिला मनापासून वाटतंय.

कादंबरीची नायिका स्कार्लेट ही मेलनी च्या हयात नसलेल्या भावाची बायको. मेलनी आयुष्यभर स्कार्लेटच्या पाठीशी उभी राहिली, एक चांगली मैत्रिण बनून. मग स्कार्लेटचं वागणं लोकांना आवडो, न-आवडो... तिने घेतलेले निर्णय चूक असोत की बरोबर.

मेलनी अतिशय प्रेमळ आणि सेवा भावी आहे. ती सगळ्यांना कायमच समजून घेते. कुणाचेच वागणं तिला कधी चुकीचं वाटत नाही. आणि कुणी चुकीचं वागलं, तरी तिला त्यात चांगलाच हेतु सापडतो. कारण मुळात लोकांच्या चांगुलपणा वर मेलनीचा प्रचंड विश्वास आहे.

मेलनी एका बाबतीत अति भाग्यवान ठरलीय, ती म्हणजे तिला मिळालेल्या जोडीदाराच्या बाबतीत. दोघांचही परस्परां वर प्रेम आहे, परस्परां बद्दल आदर आहे. दोघांच्याही आवडी सारख्याच आहेत. दोघांनाही साहित्य, संगीत यांची आवड आहे. दोघं एकमेकांशी बरोबरीनं चर्चा करू शकतात, वाद घालू शकतात. अशा अनुकूल परिस्थितीत मेलनीला ‘मेलनी’ असणं सोपं होतं. पण प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा मेलनी ‘मेलनी’च राहते. तिचा शांतपणा ढळत नाही, की सतत दुसर्‍यांचा विचार करण्याची सेवा भावी वृत्ती बदलत नाही.

मेलनी आणि स्कार्लेट या दोघींची आयुष्य एकत्र बांधल्या गेलेली आहेत. या दोघी अगदी दोन परस्पर विरोधी वृत्तीच्या प्रतिनिधी आहेत. स्कार्लेट प्रवाहाविरूद्ध पोहून स्वत:ला हवं ते साध्य करून घेते, आणि साध्य साधतांना जगाचा विचार करत नाही. किंवा लोकं आपल्याला किती नावं ठेवतात ह्या कडे पूर्ण दुर्लक्ष करू शकते. तर मेलनी प्रवाहाच्या दिशेने जाते, पण गरज असेल तेव्हा ठामपणे उभी राहते आणि लोकांना आपल्या निर्णयात सामील करून घेते.

एरवी सशासारखी घाबरट वाटणारी मेलनी, प्रसंगी वाघासारखी शूर होते. शारीरिक दृष्ट्‍या अशक्त आणि आजारी असली तरी, स्कार्लेटच्या हातून झालेल्या शत्रू सैनिकाच्या हत्तेत त्याच्या प्रेताची विल्हेवाट लावायला मदत करते. आणि एरवी चूक बरोबरचा विचार करणारी ती, काळाची गरज म्हणून प्रेताची विल्हेवाट लावायच्या आधी त्याचे खिसे तपासून रोकड पण काढते.

पुढे एकदा शत्रू सैनिकांनी घराला लावलेली आग विझवतांना स्कार्लेट आगीत सापडते, तेव्हा आधी स्कार्लेटने घरातल्या सगळ्यांना घराबाहेर पाठवलेलं असतांनाही, स्कार्लेटला वाचवायला येते ती मेलनीच. स्कार्लेटला दोन्ही प्रसंगात मेलनीच्या प्रेमाची, पाठिंब्याची प्रकर्षाने जाणीव होते.
स्कार्लेट ला मेलनी अजिबातच आवडत नाही, ह्याचं मुख्य कारण मेलनी ऐशलेची बायको आहे. जो ऐशले स्कार्लेटला मिळाला नाही तो मेलनीला मिळाला आहे. मेलनी ला अर्थातच स्कार्लेटच्या ऐशले वरच्या प्रेमाची जाणीव नाही. मेलनी अगदी मनापासून स्कार्लेट वर प्रेम करते. स्कार्लेटचं आपल्यावर प्रेम आहे की नाही, याचा विचार पण तिच्या मनात कधी येत नाही. मुख्यतः मेलनीला कधीच कुणाकडून तिच्यावर असलेल्या प्रेमाच्या चौकटीची गरज वाटत नाही. ती स्वत: दुसऱ्यांवर प्रेम करण्यात, दुसऱ्यांचाच विचार करण्यात मग्न आहे.

मैत्रीण म्हणून तर मेलनी आयुष्यभर स्कार्लेटवर प्रेम करतेच, पण शहर शत्रू सैन्याने ताब्यात घेतल्यावर.. बाहेर सगळीकडे जाळपोळ चालू असतांना...... स्कार्लेटने कुणाच्या मदतीशिवाय केलेलं तिचं बाळांतपण, एकटीने तिला तिथून सुरक्षितपणे बाहेर काढणं, त्यानंतर तिला दिलेला आसरा, तिची घेतलेली काळजी ........ आयुष्यभर तिला स्कार्लेटशी बांधून ठेवते. स्कार्लेटने नाईलाजाने तिला मदत केली असेल, अशी पुसटशीही जाणीव तिला नाही.

भरपूर पैसा, श्रीमंती, वैभव असून स्कार्लेट पुढे एकटी पडत जाते. तर भौतिक सुखाची साधनं जवळ नसली तरी प्रेमळ मेलनी सतत सगळ्यांना हवीहवीशी वाटते. आणि त्याचा उपयोग करून ती स्कार्लेटलाही कधी एकटं पडू देत नाही. मेलनी मध्ये परिस्थितीतून आलेला सोशिकपणा नाही तर परिस्थितीबद्दल तिला अभिमान आहे. स्कार्लेटने तिला केलेल्या मदतीची तिला कायम जाणीव आहे.

स्कार्लेटवर झालेल्या हल्ल्याचा बदला घ्यायला मेलनीचा नवरा ऐशले इतर लोकांबरोबर जातो, तेव्हा त्याचा जीव धोक्यात येऊ शकणार असतो.. .. त्याला जेल होऊ शकते...... पण मेलनी एकदाही तक्रारीचा सुर लावत नाही की स्कार्लेटबद्दल मनात वाईट भावना ठेवत नाही. “ज्याला ज्या वेळी जसं योग्य वाटतं , तसं तो वागतो.... स्कार्लेट तिला योग्य वाटलं तसं वागली.... ” हे तिचं सूत्र.

मेलनीने तिच्या आयुष्यातल्या प्रत्येक भूमिकेतून जगावर फक्त प्रेमच प्रेम केलं. पती ऐशले ह्याची बरोबरीच्या नात्याने ती सखी होती. तरुण वयातच स्वर्गवासी झालेल्या भावाची, चार्ल्सची त्याच्या वस्तूतून आठवणी जपणारी बहीण होती. स्कार्लेटची नणंद असली, तरी तिची ती मैत्रीणच अधिक होती. स्कार्लेटच्या नवऱ्याचा, ऱ्हेटचा ती आधार झाली. तिच्याच मांडीवर डोकं ठेवून घळघळा रडत तो आपलं दुःख व्यक्त करू शकला. मेलनीशी मनमोकळं नातं तो जपू शकला. तिच्या आँटी च्या मैत्रिणींच्या वर्तुळात ती प्रत्येकिला हवीहवीशी होती तर तिच्या मैत्रिणींमध्ये ती लाडकी मैत्रिण होती. स्कार्लेटच्या मुलाची , मेलीआंटी लाडकी खेळगडी होती. युद्धातून परतलेल्या जखमी सैनिकांचा ती आधार होती. अनाथांचा ती आसरा होती तर ज्यांना कोणीच नाही त्यांच्या ती निवारा होती.

ऐशले आणि स्कार्लेटवर असणारा मेलनीचा अति विश्वास आपल्याला बुचकळण्यात पाडतो. आणि त्यावर ती इतकी ठाम आहे की अख्खं जग विरोधात गेलं तरी तिला त्याची पर्वा नाही. आत्ता पर्यंत सगळ्यांना सांभाळून घेणारी मेलनी या दोघां करता तिच्या जगातली सगळी माणसं तोडायला पण तयार होते. तिच्या अशा वागण्यामुळे इतर कुणाचाच कधी विचार नं करणाऱ्या स्कार्लेटला काळजी आहे ती फक्त मेलनीच्या भावनांची. स्कार्लेट विचार करते ते फक्त ‘मेलनी काय म्हणेल?’ ह्याचा. मेलनी ही कायमच स्कार्लेटची कवच कुंडल होती.

भावनिक दृष्ट्‍या स्कार्लेटला जिंकण सोपं नव्हतं. पण ते साधलं फक्त मेलनीला, तिच्या अखंड निस्वार्थी प्रेमाच्या झऱ्याने. तसच इतर सगळ्यांना उद्धट वाटणारा, स्कार्लेटचा नवरा ऱ्हेट नतमस्तक होतो तो फक्त मेलनी पुढे.

अशी ही मेलनी, मरणाच्या दारात असतांना, शेवटच्या क्षणांमध्ये आपलं मूल स्कार्लेटकडे सोपवून जाते ते तिच्यावर असलेल्या गाढ विश्वासपोटीच. एवढंच नाही तर आपण नसतांना ऐशले पण पोरका होईल ह्याची तिला जाणीव आहे. आत्तापर्यंत त्याला ठेच नं लागू देता, नं दुखावता त्याचा आत्मसन्मान जपलाय तो मेलनीनंच. त्याचीही काळजी स्कार्लेटकडे सोपवते ते अगदी निशंक मनाने. आणि मुख्य म्हणजे आयुष्यभर ऐशले च्या प्रेमाची भुकेली असलेल्या स्कार्लेटला तिच्या नकळत जाणीव करून देते तिच्या खऱ्या प्रेमाची. स्कार्लेटला जाणीव करून देते ती ऱ्हेटच्या स्कार्लेटवर असलेल्या प्रेमाची.

मेलनी होणं सोपं असेल, पण आयुष्यभर मेलनिपण टिकवून ठेवणं अवघडच नाही तर अशक्य आहे. विनाअट निस्वार्थी प्रेम, अखंड प्रेमाचा झरा म्हणजे मेलनी. प्रत्येकाला मिळावी अशी एक मेलनी.
--------------------------

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

धन्यवाद अज्ञातवासी, आर्या, सामो.

मेलनी मला फार लेम वाटत असे.>>

मलाही आधी तसंच वाटायचं. पण परत परत पुस्तक वाचलं तेव्हा ती जास्त कळली असं वाटलं. तरी माझी आवडती स्कारलेटच.

शर्मिला खरच मस्त लिहीलयस तू. मला स्कार्लेट आवडत असे. हा लेख वाचून मला प्रकर्षाने जाणवले की मेलनी ही सुद्धा एक अनसंग हिरोच आहे. तिच्या व्यक्तीमत्वाचा रंग स्कार्लेटच्या सारखा गडद व वारुणी लाल नसेल पण तिलाही मोत्याच्या रंगाची झळाळी आहे Happy एक सॉफ्ट ग्लो आहे.
- निवडक १० त

कित्येक वाचकांना स्कार्लेटने भुरळ घातली. मराठी भाषेतच तुला स्कार्लेट बद्दल लेख सापडतील पण मेलनीचा हा पहीला लेख आहे.

>>>>>>>>>मेलनी होणं सोपं असेल, पण आयुष्यभर मेलनिपण टिकवून ठेवणं अवघडच नाही तर अशक्य आहे. विनाअट निस्वार्थी प्रेम, अखंड प्रेमाचा झरा म्हणजे मेलनी. प्रत्येकाला मिळावी अशी एक मेलनी.
__/\__
क्वचित काही लेख असतात जे परत परत वाचावेसे वाटतात. हा त्यातलाच एक.

मानव बहुतेक युट्युबवर ऑडिओ बुक आहे. पूर्वी तरी होतं. कन्साईझ = छोटेखानी नका ऐकू. संपूर्ण ऐका. पीडीएफ आहेच. काही दिवसांपूर्वी मी डाउनलोड केली होती.

अर्थात पुस्तक हातात घेउन वाचायची गोडीच न्यारी.

अर्थात पुस्तक हातात घेउन वाचायची गोडीच न्यारी. > exactly. समहाउ मला स्क्रीनवर पुस्तकं वाचायला, आवडत नाही आणि ऑडियो सुद्धा छोटे मोठे ठीक वाटतात अर्धा एक तास फार तर.

>>>exactly. समहाउ मला स्क्रीनवर पुस्तकं वाचायला, आवडत नाही
मला असा ब्लॉक पूर्वी होता पण मग एकदा ययाती घेतलं किंडलवरती आणि देवा! हाततून ठेवलच नाही. अक्षरक्षः २ दिवसात सेल फोनवरती वाचून काढलं.
तेव्हापासून तो ब्लॉक गेला तो गेलाच. मग मृत्युंजय, शांता शेळके, खेकडा, अंधारवारी अशी बरीच पुस्तके किंडलवरती घेतली गेली.

धन्यवाद सामो आणी मानव.
माझं हे अत्यंत आवडीचं पुस्तकं.
मार्गारेट सारखं ग्रेट लिहिता येणार नसेल तर काही लिहूच नये असं वाटायचं आत्तापर्यंत.
पण आपलं लहानपण मान्य करून शेवटी लिहायला लागले.

मार्गारेटला शर्मिला किंवा सामोसारखं लिहीता येइल का? Wink
हाहाहा
जरुर लिहीत रहा शर्मिला. प्रत्येकाची बलस्थाने असतात.