बाधा

Submitted by SharmilaR on 23 September, 2021 - 02:57

बाधा

सकाळी उठल्यापासूनच आज घरात गोंधळ सुरु होता. पाहुणी म्हणून आलेली नंदा आज सकाळी उठल्यापासून मुसमुसत होती. मामा - मामीने खूप विचारलं पण ती काही बोलायलाच तयार होईना. शेवटी मामीनं तिला एकटीला स्वयपांक घरात नेलं, जवळ घेतलं आणि अगदी खोदून - खोदून रडण्याचं कारण विचारलं. तरी कारण काही कळलं नाही पण तिला आजच्या आज तिच्या घरी जायचंय एवढंच समजलं. या गडबडीत घरातली इतर मुलं बावरली होती. एकटा सतीश तेवढा बिछान्यातच होता.

सातवीची परीक्षा आटपून नंदा मामाकडे म्हणजे भाऊरावांकडें सुट्ट्यांना म्हणून आली होती. यावेळी एकटीच. मामाकडे चांगलं महिनाभर राहायचं ठरवून आली होती. आत्यानं आधी पत्र टाकून तिच्या येणाची तारीख आणि वेळ कळवली अन सांगितलेल्या दिवशी तिला एसटीत बसवून दिलं. इथे बस स्टेशन वर घ्यायला भाऊराव गेले होते. तिच्या येण्याचं खूपच जंगी स्वागत झालं सगळ्यांकडून. संजू, सतीश, सोना, बेबी आणि छोटी सगळेच आनंदून गेले. नंदा वयानं संजू आणि सतीश च्या मधली. त्यामुळे त्यांना बरोबरीची आणि मुलींना तर काय, मोठी ताई मिळाली खेळायला. सुट्ट्यांनमध्ये असं कुणी राहायला आलं कि खूपच मज्जा येते. दिवसभर पत्ते - बित्ते खेळायला नवीन मेंबर मिळतो. रात्री जास्त वेळ खेळत बसलं तरी कुणी रागवत नाही.

पण आज सकाळपासून काय बिनसलं होतं कोण जाणे. राधाक्कांनी म्हणजे मामीनं खूप विचारून बघितलं, समजावून बघितलं. रविवारी सुट्टी असेल तर त्या दिवशी मामा स्वतः घरी पोचवून देईल असं पण सांगितलं. पण नंदा ऐकायलाच तयार होईना. आली असेल तिला तिच्या घरची खूप आठवण म्हणून मग भाऊराव शेवटी एसटीत तिला एकटीला बसवून द्यायला तयार झाले. तिला तयार व्हायला सांगितलं अन त्यानीं बहिणीकरता चिठ्ठी लिहिली तिच्याबरोबर द्यायला. राधाक्कांनी घाईघाईनं स्वयंपाक करून कसंबसं नंदाचं अन भाऊरावांचं जेवण उरकलं अन भाऊराव तिला घेऊन निघाले. तिला बस मध्ये बसवून ते परस्पर ऑफिस ला जाणार होते. मुलींना तर खूपच वाईट वाटलं नंदाताई अचानक जातेय म्हणून. पण ती शेवटी निघालीच. घरातून निघेपर्यंत एकदाही ती हसली नाही. संजूला आश्चर्य वाटलं, जरा रागही आला तिचा. आता एवढी घरी तर निघालीय.

"पोचल्या बरोब्बर पत्र टाकायला सांग आईला " असं चारदा बजावून नंदाला निरोप दिला आणि आता राधाक्कांच्या लक्षात आलं सकाळपासून या सगळ्या गडबडीत सतीश गायब आहे. म्हणजे तसं एकदोनदा लक्षात आलं होतं त्यांच्या, पण वाटलं कुणाचं लक्ष नाही बघून गेला असेल सकाळपासून समोरच्या देशमुखांकडे खेळायला. देशमुखांचं घर म्हणजे मोठंच खटलं . त्यामुळे घरात भरपूर मुलं.

"जा गं , सत्याला बोलावून आण. " त्यांनी सोनाला सांगितलं.

"घरीच आहे तो. झोपलाय अजून." सोना म्हणाली.

"अजून? का रे उठवलं नाहीस त्याला?" आता त्या संजूवर चिडल्या.

रात्री जरा झोपण्याचा गोंधळ झाला, पण म्हणून काय एवढा वेळ लोळायचं? उन्हाळ्यात रात्री सगळे गच्चीवर झोपायचे. काल मध्यरात्री अचानक पावसाची झड आली, अन मग गाद्या, मुलं सगळं घरात आणतांना जरा तारांबळ झाली. मुलांच्या गाद्या मधल्या खोलीत घातल्या अन झोपवलं त्यांना तिथे.

"मी म्हंटल त्याला. तर पांघरूण परत परत ओढून घेत होता. नंदा निघालीय हे पण सांगितलं मी त्याला. पण उठलाच नाही." संजू म्हणाला.
आता राधाक्का त्याला उठवायला गेल्या. चार आवाज दिले. पण हुं नाही की चूं नाही. अंगाला हात लावून बघीतला. ताप पण नाही. मग मात्र त्यांनी रागानेच पांघरूण हिसकलं.

"मुझे नही उठना, मुझे सोना है." डोळे मिटूनच सतीश बोलला.

"आता हे काय नवीन नाटक काढलं? उठा आता. वेळ नाही, काळ नाही .....जरा आई कामात आहे म्हंटल्यावर हवं तस्स वागायचं....... हि काय पद्धत झाली .....ती पोरगी एवढी गावाला निघाली, तिला निरोप देणं नाही.....", राधाक्कांची आरडा-ओरडी सुरु झाली. ह्याची नेहमीच काहीतरी नाटकं असतात. जर्रा वेळेचं काळाचं भान नाही. आधीच सकाळपासून सगळंच बिनसलं होतं . शिवाय नंदाची आई काय म्हणेल याचं टेन्शन होतंच. काय बिनसलं त्या पोरीचं कुणास ठाऊक.......काही बोलायलाही तयार नव्हती......एरवी तशी गुणांची पोर आहे.....

सतीश चे डोळे बंदच अजून होते.
त्यांनी रागारागाने सतीश चे दोन्ही हात धरून त्याला उभं. डोळे बंद अवस्थेतच सतीश उभा राहिला.

"जा , आता आवरून घ्या. " त्यांनी त्याला मोरीकडे ढकललं.
दिवसभर मग हे असंच चाललं. सतीश पलंगावरून हलायला तयार नव्हता. जेवण - खाणं सगळं डोळे बंद करूनच चालू होतं. मग मात्र राधाक्कांना जरा काळजी वाटायला लागली.

"अरे, डोळ्यांना काही झालंय का तुझ्या?"

"नही , कुछ नही. मुझे सोने दो. " परत हिंदीत उत्तर.
त्यांना कळेचना आता काय करावं? मग त्यांनी समोरच्या मोठया देशमुख काकूंना बोलावणं पाठवलं. मोठ्या काकू एवढ्याकरता , की त्यांच्याकडे एकत्र कुटुंब होतं. घरात खूप बायका होत्या. पण मोठ्या काकू त्यातल्या जरा जाणत्या आणि अनुभवी. मुलं त्यांच्या धाकात होती.
काकू आल्यावर त्यांनी आधी परिस्थिती बघितली, घरातल्या इतर सगळ्या मुलांना आपल्या घरी पिटाळलं. आईला धीर दिला आणि त्या सतीशशी बोलायचा प्रयत्न करायला लागल्या.

"काय झालं बाळा?"
"कुछ नही. मुझे मत उठाओ . " परत तेच.

"जेवलाय का हो हा?" त्यांनी राधाक्कांना विचारलं .

"हो, अहो जेवण नेहमी सारखंच जेवला. इथून हात धरून नेला. आंघोळीला पण पाठवलं. बाकी सगळं ठीक . पण डोळे उघडत नाही आणि बघा नं, हे असं हिंदी बोलणं."

"चालतोय न तो? आणि खाणं - पिणं पण झालंय नं ? मग काळजी करण्यासारखं काही नाही. आपल्याला माहित आहे नं , तो किती नाटकी आहे? हे त्यातलंच एक......"

"पण हे असं काय हो..... काळजी वाटते. हे पण संध्याकाळी लवकर नाही येणार आज...."

"ते कशाला हवेत? आपण आहोत ना... चला आपण घेऊन जाऊ डॉक्टरकडे तुम्हाला एवढं वाटतंय तर..... कोपऱ्यावर तर आहे दवाखाना. एखादं इंजेकशन दिलं की उघडेल आपोआप डोळे." मोठ्याकाकूंना अजिबातच काळजी वाटली नाही.
"मुझे नही जाना डॉक्टर के यहा ." सतीश मोठ्यानं बोलला.

"बघा. सगळं व्यवस्थित ऐकतोय आपलं बोलणं. काही झालं नाही त्याला." काकू राधाक्कांना म्हणाल्या. पण तरी त्यांची काळजी बघून त्यांनी बोलणं पुढे वाढवलं नाही.

राधाक्का आणि काकू जरा बळजबरीनेच सतीश चे हात धरून डॉक्टरकडे गेल्या. हे नेहमीचेच फॅमिली डॉक्टर. कुटुंबातल्या सगळ्यांना व्यवस्थित ओळखून असणारे.

"या..... आज काय नवीन उद्योग केले पोरांनी? आणि हा तर महाउद्योगी." डॉक्टर हसत म्हणाले. मुलांच्या जन्मापासून ते त्यांना ओळखत होते.

"बघा नं हो हा कसं करतोय? " राधाक्कांनी सगळी कथा सांगितली.

डॉक्टरांनी सतीश ला आत टेबल वर तपासायला घेतलं. आई आणि काकूंना बाहेरच थांबायला सांगितलं.

"अगदी ठणठणीत आहे तो. काही झालं नाही. डोळे उघडले बघा त्यानं आता. न दिलेल्या इंजेकशन चा परिणाम. बोलण्याकडे लक्ष नका देऊ त्याच्या. काहीतरी खूळ डोक्यात असतं. तो तर आहेच जन्मापासून नाटकी. येईल लवकर नॉर्मलला, कुणी लक्ष नाही देत म्हंटल्यावर...." दहा मिनिटांनी डॉक्टरांनी दोघींना सांगितलं.
उघड्या डोळ्यांच्या सतीशला घेऊन दोघी घरी आल्या.

"मुझे सोना है." आल्या-आल्या सतीशनं सांगितलं.

"सोना तर सो. कुणी अडवलं? उलट तेवढीच आईला शांती." काकू त्याला म्हणाल्या.

"तुम्ही जेऊन घ्या हो. सक्काळपासून काही खाल्लं नसणार तुम्ही. मी बसते हवं तर. " त्या राधाक्काला म्हणाल्या.

राधाक्कांनी त्यानांही आग्रहानं जेवायला वाढलं. आता काळजी कमी झाली होती. दोघी पानावरच गप्पा मारत बसल्या. राधाक्कांनी सकाळपासूनची नंदाची गडबड ऐकवली. एकावरून दुसरी कथा.....बराच वेळ झाला तसं काकू म्हणाल्या, "निघते हो मी. तुम्हीही पडा जराश्या. मुलांना खेळू देत आमच्याकडेच."

"निघाले रे मी.... आईला त्रास नको देऊस आता. " निघतांना काकूंनी मधल्या खोलीत डोकावून सांगितलं.

"मुझे मरना है. " आतून सतीश चा आवाज आला.

"आता हे काय नवीन?" आई आणि काकू आतल्या खोलीत धावल्या.

"कुठे मरना है तुला?" काकूंनी रागानी विचारलं.

"कुए में. ये घर मेरा नही ...." सतीशचे डोळे बंदच परत .

मागच्या अंगणात विहीर होती. काकूंना आता जरा काळजी वाटली. पण -
"तुम्ही नका हो काळजी करू. मी आहे इथेच " त्या राधाक्कांना म्हणाल्या. दोघी तिथेच पलंगावर बसल्या.

मधेच छोटी खेळ सोडून घरी आली. काकूंना बरंच वाटलं.
"जा गं, बाळा, आबाकाकांना मी बोलावलं म्हणून सांग. आणि बरोबर कुणाला तरी आणा म्हणून पण सांग. आणि तू तिथेच खेळ. लगेच घरी नको येऊस. " काकूंनी छोटीला सांगितलं.
गेल्या वर्षी शिक्षकी पेशातून निवृत्त झालेल्या आबाकाकांचा जास्तीत जास्त वेळ मुलांबरोबरच जायचा. मुलं त्यांच्याबरोबर खेळायची आणि तरी त्यांना जरा वचकूनच असायची. खेळता - खेळता केव्हा अभ्यासाचं विचारतील नेम नाही.
छोटीने निरोप दिल्यावर आबाकाका मधूदादाला घेऊन आले. काय झालं बघायला मधूदादाची आई सीताकाकू पण आली.

सतीश चा "मुझे कुए में जाना है ...ये घर मेरा नही ....... मुझे जाना " चा पालुपद चालूच होता. मोठयाकाकूनी आबाकाका , मधुदादा आणि सीताकाकूना जरा बाजूला घेऊन सकाळपासून काय झालं ते सांगितलं.
आबाकाका सतीश जवळ गेले.

"हं , बोला सतीशसर काय म्हणताय? आज काय हिंदीचा अभ्यास का? जोरात चालू दिसतोय...."

"मुझे कुए में जाना है ..." बंद डोळ्यांनी सतीश बोलला.

"मला आधीच का नाही बोलावलं? " आबाकाका मोठ्याकाकूंना म्हणाले. "डॉक्टर कडे पण जायची गरज नव्हती. मी सरळ करतो त्याला. तुम्ही सगळ्या जरा बाहेर जा बरं. मधू तू थांब इथे." आबाकाकांनी सगळ्यांना खोलीबाहेर पिटाळलं.
सगळ्या बाहेरच्या खोलीत गेल्यावर त्यांनी मधू ला आत घेऊन मधलं दार लावून घेतलं.

"मधू, मागे जाऊन विहिरीवरचा दोर घेऊन ये. आपण जरा बघूच ह्याच्याकडे." काकांनी मधूला सांगितलं.
बाहेर तिघी आतला कानोसा घेत हळू आवाजात बोलत होत्या.

"मी काय म्हणते, म्हणजे बघा ...जरा डोक्यात आलं....... तो असा अचानक हिंदी बोलतोय म्हणून ........" सीताकाकू जरा चाचरत म्हणाली.
"बोल... बोल... काय म्हणायचं तुला?" मोठ्याकाकूंनी विचारलं.

"म्हणजे जरा शक्यता..... शिवाय एवढा लहान मुलगा...... मरणाच्या गोष्टी करतोय....ये घर मेरा नही म्हणतोय...."

"अगं , सांग." आईने काळजीने विचारलं.

"काही बाहेरचं तर नसेल?" सीताकाकू एकदम म्हणाली.

दोघीही एकदम चमकल्या. हा तर विचारच केला नाही आपण.

"म्हणजे बाहेरची बाधा?" राधाक्कांनी धसकूनच विचारलं.
"अ ....नाही म्हणजे मागच्या वर्षी मी माहेरी गेले होते नं , तेव्हा तिथे शेजारची मुलगी असंच बरळत होती.....आणि वेड्यासारखीच वागायला लागली अचानकच.......बाधा झाली होती म्हणे तिला. आदल्या रात्री लिंबाच्या झाडाकडे गेली होती.... मग मांत्रिक बोलावला... अन त्यानं काय काय केलं..... आता चांगली आहे ती. लग्न पण झालं तिचं. जास्त येत नाही म्हणे परत घरी गावाकडे. वाहिनी भेटली न सुशिंच्या लग्नात तेव्हा सांगत होती ....."
राधाक्का तर घाबरूनच गेल्या. मुलं दिवसभर कुठे कुठे खेळत असतात....ती नंदा पण अचानक रडायला लागली....सगळ्या आतल्या आवाजाकडे कान लावून बसल्या.
"चांगली पक्की आहे नं गाठ ........ तू ते टोक धर. चल ह्याला घेऊन जाऊ मागे. कसं कुए में मरना है बघूच."
बराच वेळ गेला. भाऊराव ऑफिस मधून यायची वेळ पण होऊन गेली होती.
आबाकाकांनी दार उघडलं. ते आणि मधू घामाघूम झाले होते. सगळ्या आत गेल्या सतीश जमिनीवर होता. कंबरेपर्यंत ओला झाला होता. "मुझे कुए में जाना है ...... मुझे छोड दो ....मुझे यहा नही रहना...... " चालूच होतं .
"वहिनी, त्याला बदलायला कपडे द्या." मागच्या दाराला कडी लावत आबाकाका म्हणाले.
आई सोडून सगळे बाहेर येऊन बसले.
"आम्ही त्याला विहिरीत सोडलं दोर बांधून . पण तेव्हाही तेच बोलणं चालू. मुझे छोड दो ..... त्याला खात्री आहे, कुणी खरंच विहिरीत टाकणार नाही म्हणून." आबाकाका सांगत होते.
आता भाऊरावही घरी आले. बाहेर सगळे बसलेले. वातावरण गंभीर. मधुने आतून पाणी आणून दिलं. सगळ्यांकरता चहा आणायला आबाकाकांनी त्याला त्यांच्या घरी पाठवलं. सकाळपासून घडलेलं सगळं आबाकाकांनी आणि मोठयाकाकूंनी सांगितलं.
"मी काय म्हणते, काही वेगळा उपाय करू या का? डॉक्टर पण काही नाही म्हणताहेत...." सीताकाकू म्हणाल्या.
"नको. बघूया एक दोन दिवस अजून." आबाकाका म्हणाले.
"कसला वेगळा उपाय?" भाऊरावांनी विचारलं.
"ती मांत्रिकाला बोलवायचं म्हणतेय..... तिला वाटत काही बाहेरची बाधा आहे." आबाकाकानी सांगितलं.
भाऊराव विचारात पडले. मधू चहा घेऊन आला. सगळ्यांचा चहा झाल्यावर परत हळू आवाजात चर्चा सुरु झाली.
"तूम्ही सगळे घरी जा. मी इथेच राहते आज. आणि मुलांना नका पाठवू इथे. घाबरतील बिचारी." मोठ्याकाकूंनी बाकीच्यांना सांगितलं.
भाऊरावांनी मागच्या दाराला कुलूप लावलं. रात्री सगळे तिथेच झोपले. झोपले कसले सगळे या कुशीवरून त्या कुशीवर करत होते. एकटा सतीश मात्र झोपला होता.
"सकाळी होईल सगळं व्यवस्थित." भाऊराव राधाक्कांना म्हणाले.
दुसऱ्या दिवशी सकाळी सतीशन डोळे उघडले पण कालच्यासारखाच जागचं हलायला तयार होईना.
"मुझे कुए मे जाना है......ये घर मेरा नही ..न ... मुझे छोड दो " परत चालू झालं. आता अधून - मधून मागच्या दाराकडे धावण्याची भर पडली. आज भाऊराव घरीच थांबले. आता त्यांनाही भीती वाटायला लागली, एकटा विहिरीकडे जातो कि काय? सतत त्याच्यावर लक्ष ठेवायला हवं.
राधाक्कांनी बळबळ काकूंना घरी पाठवलं. मी लगेच येते आंघोळ वगैरे करून असं सांगून त्या घरी गेल्या. येतांना सगळ्यांकरता जेवण पण आणते म्हणाल्या. मुलं सगळी तिकडेच राहणार होती. राधाक्कांनी मुलांचे कपडे पण पाठवून दिले तिकडेच.
संध्याकाळपर्यँत सतीशच्या परिस्थितीत काहीच फरक पडला नाही म्हंटल्यावर भाऊराव आणि राधाक्कांना सीताकाकूंचं म्हणणं पटायला लागलं होतं. मोठ्या काकूंना राधाक्कांजवळ थांबवून भाऊराव आबाकाकांबरोबर मांत्रिकाच्या शोधात निघाले. आबाकाकांचा खरंतर विरोध होता या सगळ्याला पण शेवटी भाऊरावांना सोबत म्हणून तेही तयार झाले.
इतके दिवस गावाबाहेरच्या मांत्रिका बद्दल ऐकून होते, मग दोघांनी तिकडेच जायचं ठरवलं. जरा एकटा भाग होता, पण एकाला दुसऱ्याची सोबत होती. तिथे पोचेपर्यंत अंधार झाला होता. तिथल्या एका माणसांनी सांगितलं, मांत्रिक बाबा म्हणे फक्त सकाळीच लोकांना भेटतो. आणि अंगातलं काढण्याचं काम फक्त शुक्रवारीच करतो. आज बुधवार होता.
दोघेही उद्या सकाळी लवकर भेटायला यायचं ठरवून परत आले. आबाकाकांना बरं वाटलं. तेवढाच एक दिवस जास्तीचा मिळाला. झाला सतीश तसाच बरा तर बरंच आहे. पण गुरवार पण बुधवारसारखाच उजाडला. सतीशच वागणं बदललं नव्हतं. आबाकाकांना अजूनही वाटत होतं , थोडं थांबावं. पण सीताकाकू पण म्हणाली, आजचा दिवस गेला आणि नाही सतीशमध्ये काही फरक पडला तर? परत पुढच्या शुक्रवार पर्यंत वाट बघायला लागेल. मग ते नाइलाजांन च निघाले भाऊरावांबरोबर.
दोघंही तिथे पोचले तेव्हा सकाळ असून पण सन्नाटा होता. उद्या इथे आणायला लागेल सतीशला? या एकट्या भागात? मांत्रिका जवळ दोन माणसं बसली होती. भाऊराव पुढे झाले. त्यांनी वाकून नमस्कार केला, फुलं पुढे केली, अन सतीश बद्दल सांगितलं. मांत्रिकानं उदी पुढे केली अन दुसऱ्या माणसाला खूण केली. तो दुसरा माणूस पुढे झाला.
"बाबा उद्या तुमच्या घरी येतील, झाड बघायला."
"कशाचं झाड? आमच्याकडे झाडं नाहीत. छोटासच अंगण आहे." भाऊराव म्हणाले.
"तुळशी वृंदावन आहे मागच्या अंगणात." कळून सवरून आबाकाकांनी वेड्याचं सोंग पांघरलं.
"ओ.....तसं झाड नाई ..... झाड म्हनजे पोरगं. तितच मंग सगळं करतील. म्हन्जे पोराचा विलाज. मी सांगतो ते सामान तयार ठेवा. आनि नेवेद्य बी लागल . "
"कशाचा नेवेद्य?" आबाकाकांनी विचारलं.
"ह्याले फकस्त कोंबडीचा नेवेद्य लागते. आमी दोगंबी येऊ सकाळच्या टायमाला." असं म्हणून त्याने लागणारं सामान सांगितलं, फुलं, पानं, धूप, पाच किलो तांदूळ, कणिक, तेल...........
तसं बरंचसं सामान घरात होतंच . पण थोडे काळे तीळ.... पाच नारळ ... अन मुख्य म्हणजे "नेवेद्य " आणायचा होता.
शुक्रवारी सकाळी राधाक्का अन भाऊराव लवकरच तयार होऊन बसले. झोप तर तशीही येत नव्हतीच . सतीशचं मागच्या दरवाजाकडे धावणं वाढलं होतं. आबाकाका अन मोठ्या काकूही येऊन बसले. मुलांना अजिब्बात इकडे फिरकू द्यायचं नाही असं घरी सांगून ठेवलं होतं. मदतीला असावी म्हणून सीताकाकू पण आली. "नेवेद्य" तिचं तयार करणार होती.
अकराच्या सुमारास मांत्रिक अन त्याच्याबरोबरचा माणूस आला. "झाडाला " बाहेर बोलावलं. बाहेरच्या खोलीत तिळ टाकून मोठा गोल केला. सतीशला त्यात बसवलं. त्याचे डोळे परत बंदच होते.
"इथे कोनी थांबायचं नाई. फकस्त आमी आन ह्यो राइल. " मांत्रिकानं सतीशकडे बोट करून सांगितलं. सगळे मधल्या खोलीत जाऊन बसले.
मांत्रिकाचं जोरजोरात मंत्र पठण सुरु झालं . तो जरा थांबला की सतीश "मुझे जाना है. ये घर मेरा नही " म्हणत होता.
आतल्या खोलीत सगळे तणावात होते. मधेच मांत्रिकाचा आवाज वाढत होता. "छोड दो .....छोड दो......"
आत सीताकाकू एकटी स्वयंपाक करत होती. तिलाही जरा भीतीच वाटली. "आपणच हा उपाय सुचवला काही वेडंवाकडं नको व्हायला." तिला वाटत होतं
तासाभराने सगळं आटपलं. मांत्रिक अन त्याच्याबरोबरचा माणूस "नेवेद्याच" जेऊन अन पुरेशी "दक्षिणा" घेऊन निघाले. बरोबर तांदूळ कणिक बांधून घेतलंच होतं .
"आमी केलं सगळं बराबर. अजून कदी असं बोलला तर पारावर करू पुडची पूजा." जातांना तो माणूस बोलला.
सतीश गप्प झाला होता. अर्धवट झोपेत दिसत होता. त्याला मधल्या खोलीत नेलं. राधाक्का आणि काकू तिथेच बसल्या.
"आई , आत्याचं पत्र आलं. " संजू धावत घरात येत म्हणाला.
"अरे, तू कशाला आला इथे? " काकूंनी विचारलं.
"आम्ही बाहेर खेळत होतो, तर पोस्टमन नी पत्र दिलं. म्हणून ते द्यायला आलो. " संजूच्या हातात कार्ड होतं.
"बरं , आणलंय तर वाच मोठ्यानं. काय म्हणते नंदा? ." भाऊराव म्हणाले. चार दिवसात सतीश च्या भानगडीत नंदाबद्दल विसरायला झालं होतं.
"मध्ये उभा राहून वाच रे. मलाही ऐकू दे." राधाक्का आतूनच म्हणाल्या.
"प्रिय भाऊस,
नंदा इथे सुखरूप पोचली. तू तिच्याबरोबर बरोबर पाठवलेलं पत्र मिळालं. लगेच उत्तर लिहिणार होते. पण म्हंटल ही एवढी लगेच का आली, सांगते का बघावं. ती काहीच बोललं नाही. पण अगदी गळ्यात पडून रडली. मी आता कुठे कुठे जाणार नाही एवढंच बोलली. नंतर मैत्रिणीत रमली. कदाचित इथली आठवण आली असावी. तुम्ही काळजी करू नका. सविस्तर पत्र नंतर पाठवेन . राधावहिनींना नमस्कार. लहानास आशीर्वाद. कळावे. - सौ. शालू "
संजूचं पत्र वाचून संपलं. भाऊरावांनी निश्वास सोडला. राधाक्का सतीशचं पांघरूण सारखं करायला गेल्या. सतीशची गुंगी ओसरली होती. तो उठून बसत होता.
"आई जेवायला वाढते? खूप भूक लागलीय. " सतीश म्हणाला .
राधाक्कांनी आणि काकूंनी एकमेकींकडे बघितलं. सीताकाकूंच्या चेहऱ्यावर आनंद पसरला.
"जरा थांबायला हवं होत, मांत्रिकाला बोलवायला जरा घाईच झाली." आबाकाकांना वाटलं.
********************

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

कथा आवडली
पण कळली नाही
भूत नक्की होतं की नव्हतं?
नंदा च्या घरी पोहचण्याचा आणि सतीश च्या बाधेचा काही संबंध होता का?

नंदा च्या घरी पोहचण्याचा आणि सतीश च्या बाधेचा काही संबंध होता का?>>
हो. रात्रीच्या अंधारात सतीश ने नंदाबरोबर गैर प्रकार करायचा प्रयत्न केला.(पौगंड अवस्था. ) नंदा कुणाला काही सांगेल ह्याची त्याला भीती वाटली. पण नंदा घरी पोचली आणि अजून तिने कुणाला काही सांगितलेलं पत्रावरून दिसलं नाही. त्यामुळे त्याचं नसलेलं भूत उतरलं.

सतीश झोपून राहिला.. आणि नंदा रडून आपल्या घरी गेली.. तेव्हाच मला वाटले सतीश ने तिच्याशी अतिप्रसंग करायचा प्रयत्न केला असेल..

पण नंदा घरी पोचली आणि अजून तिने कुणाला काही सांगितलेलं पत्रावरून दिसलं नाही. त्यामुळे त्याचं नसलेलं भूत उतरलं.>>>>>>>>हे गोष्टी त कुठे आलय? अर्धवट बंद केलीये गोष्ट
असं वाटतय

हं, पूर्ण पोस्ट झाली नाहीये बहुतेक. चांगली कथा आहे पण.>>

मंडळी,
क्षमस्व.
पूर्ण टाइप केलेली कथा अर्धी डिलिट कशी झाली ते कळलंच नाही. आता परत टाकलीय.

ओह ओके
हा कंटेक्स्ट लक्षात आला नाही.मी नंदा मेलेली आहे आणि तिचं भूत सतीश मध्ये, किंवा नंदाच्या गावाचं नाव कुवा असेल असे काहीही भंपक विचार करत बसले Happy

पण तो विहिरीजवळ का जात होता..आणि डोळे उघडेच का ? हे प्रश्न मला पडले..>>

तो वेगवेगळ्या प्रकारची नाटकं करून सहानभूती गोळा करून ठेवत होता. नंदाने काही संगीतलच तर भुतामुळे झालं असं दाखवता आलं असतं.

हो. रात्रीच्या अंधारात सतीश ने नंदाबरोबर गैर प्रकार करायचा प्रयत्न केला.(पौगंड अवस्था. ) >> माफ करा पण दोनदा वाचूनही दोघात असे काही घडले असेल हे अनुमान काढायला कुठलाही सबळ आधार कथेत मिळत नाही.

चांगलीच आहे कथा. पण मांत्रिक, बाधा उतरवण्याचा प्रसंग वगैरे जरा कमी केला असता तर चाललं असतं असं मला वाटलं. म्हणजे गोष्टीचा मुख्य मुद्दा पौगंडावस्थेतील मुलाने त्याच वयाच्या मुलीशी केलेलं गैरवर्तन, त्याचा त्या मुलीने घेतलेला धसका आणि मुलालाही झालेली आपण केलेल्या चुकीची जाणीव असा आहे म्हणून. (अंधश्रद्धा आणि तिचे परिणाम असा विषय असता तर चाललं असतं वर्णन) त्याऐवजी एखाद्या जाणत्या मोठ्या माणसाने त्याला विश्वासात घेऊन खरी गोष्ट समजून घेतली/ घरातल्या दुसऱ्या एखाद्या मुलाला हे कळलं आणि त्याने आईला सांगितलं आणि मग गंभीर काही केलेलं नाही आणि नंदाही सावरली आहे हे पाहून सतीशला परत असं न करण्याबद्दल आईने किंवा बाबांनी किंवा तिसऱ्या कुणीतरी समजावलं असं चाललं असतं. (अर्थात परत हे माझं मत. Happy )

दोघात असे काही घडले असेल हे अनुमान काढायला कुठलाही सबळ आधार कथेत मिळत नाही.>>

अगदी डायरेक्ट नाही लिहिलं, पण झोपण्याची जागा बदलल्याचा उल्लेख केला -

उन्हाळ्यात रात्री सगळे गच्चीवर झोपायचे. काल मध्यरात्री अचानक पावसाची झड आली, अन मग गाद्या, मुलं सगळं घरात आणतांना जरा तारांबळ झाली. मुलांच्या गाद्या मधल्या खोलीत घातल्या अन झोपवलं त्यांना तिथे.

वावे,
तुमची सूचना चांगली आहे.
पण कथेचा काळ जुना आहे. (त्यात पत्र आहेत, फोन नाही ) त्या काळात मुलांना समजून घेण्याचा प्रकार फ़ार होत नव्हता.
आणी तेव्हा मुलांच्या बघण्यात, 'अंगात देवी /भूत येणं" असं यायचं. म्हणून सतीश ने तो आधार घेतला असं दाखवलं.

नंदाची घालमेल घालमेल पाहून माझ्याही मनात तशीच कुशंका आलेली होती. सगळ्यांना एकाच्ग खोलीत झोपवण्याची आयडीया बंडलच आहे - तो मुद्दा आवडला शर्मिला.

कथा आवडली. थोडी लांबड लागली, पण साधारण असे काहीतरी असेल ह्याचा अंदाज येऊ लागला होता. तसा नाजुक पण महत्वाचा प्रश्न मांडता आहात आणि थेट उल्लेख न केल्यामुळे त्याला बाजुला ठेवून पुढे गेल्यासारखं वाटलं.
घरातल्या, जवळच्या जाणत्या माणसांना, विशेषत: शाळेत अनेक वर्षे गुरुजींचे काम केलेल्या व्यक्तीला सुद्धा अंदाज येऊ नये हे जरा विचित्र वाटले.
पु.ले.शु.

बरोबर आहे सस्मित. गुरुजीना काही वेगळं असल्याचा अंदाज आला होता. पण त्या काळात हा विषय कुणी उघडपणे मांडत नव्हतं.

वातावरणनिर्मिती चांगली केली आहे. परंतु सतीश आणि नंदा यांच्या मध्ये घडलेल्या प्रसंगाचा काही संदर्भ किंवा भाष्य केले असते तर परिपूर्ण झाली असती.
तुम्ही अतिशय नाजूक आणि वेगळा विषय हाताळला आहे. काहीतरी स्पष्टीकरण अपेक्षित होते. कथा अधांतरी सोडल्यासरखी वाटते .
असो.
तुमची शैली चांगली आहे, कथाबीज उत्तम आहेच. वाचकांच्या आपेक्षा वाढल्या आहेत.
पू. ले.शु.

कथा ‌आवडली. घटनाक्रमावरून संबंध जाणवलाच होता. आणि शेवटच्या पत्राच्या घटनेवरुन त्यावर शिक्कामोर्तब झाले.
तुम्ही खूप कौशल्याने फुलवली आहे कथा.