लेखन स्पर्धा : माझे कौटुंबिक कोविड लसीकरण - {ऋन्मेऽऽष}

Submitted by ऋन्मेऽऽष on 16 September, 2021 - 18:56

लेखन स्पर्धा : माझे कौटुंबिक कोविड लसीकरण - {ऋन्मेऽऽष}

मला माझ्या लसीकरणापेक्षा जास्त चिंता माझ्या आईवडीलांच्या लसीकरणाची होती. आता तुम्ही म्हणाल तुच काय एक मोठा श्रावण बाळ लागून गेला आहेस, आम्हाला नाही का आमच्या आईबापाची चिंता? पण मला चिंता होती ते त्यांचे लसीकरण करण्यासाठी आधी त्यांचे वशीकरण करणे गरजेचे होते याची..

गोंधळलात,
तर यासाठी आधी माझ्या वडिलांबद्दल जाणून घेऊया.
मायबोलीवर मी या ऋन्मेष आयडीमधून ईतके सारे वैयक्तिक किस्से, कहाण्या, अनुभव लिहून ठेवले आहेत. पण वडिलांबद्दल फारसे असे कधी लिहिणे झालेच नाही. ते म्हणतात ना, पोरगा वयात आला की बापापासून थोडा दूरच जातो. त्यातलीच केस समजा. पण प्रत्यक्षात जर 'सात जन्म हाच नवरा हवा' यासारखे 'सात जन्म हेच वडील हवेत' असे काही व्रत असते तर मी ते नक्कीच केले असते. ते का, आणि त्यांनी माझ्यासाठी काय काय केले आहे हे पुन्हा कधीतरी जाणून घेऊया. सध्या लसीकरणासंबंधित ते कसे आहेत एवढेच फक्त सांगतो.

तर मी फक्त सोशलसाईटवरच बोलीबच्चनगिरी करत फिरतो. प्रत्यक्ष आयुष्यात मात्र अगदी माणूसघाणा म्हणावे ईतपत मूकबधीर बनून जगतो. आणि ते मात्र याच्या अगदी एकशे ऐंशी अंशात भिन्न आहेत. त्यांना कोणाशीही बोलायला कारण आणि ओळख लागत नाही. टॅक्सीवाल्याच्या बाजूला बसले, तर थोड्यावेळात आम्हाला त्याची सारी जन्मकुंडली समजते. तसेच आमचीही त्याला समजते. हेच ते बसमध्ये उभ्या उभ्या कंडक्टरशीही करतात. सलूनमध्येही न्हावी कमी आणि तेच जास्त बोलतात. वयाची सत्तरी उलटली पण पेंशनर कट्टा हा त्यांचा अड्डा कधीच नव्हता. ते नेहमी माझ्या वयाच्या मुलांसोबत रमतात. जे खरे तर माझे मित्र असायला हवेत ते त्यांचे आहेत. कारण ते आजही डाय केलेल्या मिशीला पीळ भरताना स्वत:ला तिशीतलेच समजतात. मी मुंबईतून शिफ्ट झालो पण त्यांना मुंबई सोडवत नाही. आई माझ्यासोबत राहते, पण ते त्यांच्या किशोरवयीन मित्रांच्या टोळक्यासोबत मुंबईलाच राहतात. त्यांच्यासोबतच पार्ट्या करतात, जेवतात, ड्रिंक्स घेतात, पिकनिकला जातात, नाचतात, पत्ते खेळतात, कोणाकोणाचे बड्डे सेलिब्रेट करतात, सण साजरे करतात. एकंदरीत वयाची पर्वा न करता साधारणपणे त्यांच्या वयाला न शोभणारे असे जे समजले जाते ते सारे करतात.

जेव्हा कोरोनाची पहिली लाट आली आणि सगळीकडे लॉकडाऊन लागले तेव्हाही ते आमच्यासोबत नव्हते. त्यांचा स्वभाव पाहता त्यांना लॉकडाऊनचे निर्बंध कितपत जमतील आणि मास्क लावणे, हात सॅनिटाईज करणे या सारखे सोपस्कार ते कितपत गंभीरपणे घेतील ही आम्हाला शंकाच होती. आणि त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे सोशल डिस्टंन्सिंग पाळणे त्यांना जमणारच नाही ही भिती होती. कारण पहिल्या लाटेत बहुतांश वृद्धच बळी पडत होते. आणि मनाने नसले तरी शरीराने ते वृद्धच होते.

पण ते मात्र रोज फोन करून आम्हालाच उलट सांगायचे की मुलांची काळजी घ्या. त्यांना बाहेर पाठवू नका. माझी चिंता करू नका. माझी रोगप्रतिकार शक्ती अफाट आहे. मला काही होत नाही. गेले ईतक्या वर्षात मी डॉक्टरची पायरीही कधी चढलो नाही ते आता काय होतेय. जणू त्यांच्यासाठी कोरोना म्हणजे साधा सर्दी खोकल्याचाच आजार होता.

पहिली लाट आली आणि गेली. त्यांना कधी साधी शिंकही आली नाही. झाले, स्वतःच्या प्रतिकारशक्तीवरचा त्यांचा विश्वास आणखी दृढ झाला. त्यांच्या पार्ट्या पिकनिक पुन्हा सुरु झाल्या. आम्ही सांगतो, हट्ट धरतो म्हणून आमच्यासमोर मास्क वापरतात. पण आमच्या पश्चात काय काळजी घेतात याची आम्हाला आजही कल्पना नाही. बस्स अश्याच पार्श्वभूमीवर मग एक दिवस हे लसीकरण सुरू झाले.

"मी लस घेणार नाही. मला त्याची गरज नाही. लसींचा तसाही तुटवडा आहे तर माझ्यापेक्षा ज्या वृद्धांना याची खरेच गरज आहे त्यांना पहिले घेऊ देतो.." लसीकरण सुरू झाल्याझाल्याच त्यांनी हे स्पष्ट केले.

आजूबाजूचे एकेक वृद्ध एकापाठोपाठ एक धडाधड लस घेत होते. कालांतराने वृद्धांपाठोपाठ तरुण जनताही लस घेऊ लागली. पण आमच्या घरातील दोन बुजुर्ग मात्र लसीशिवाय होते आणि निष्काळजीपणाचा ठपका मात्र माझ्यावर येत होता.

हो, दोन बुजुर्ग कारण वडीलांनी लसीला नकार दिला तर आई कशी घेणार?
तसेही आमच्या संस्कारी कुटुंबात वडिलांना ऊशीर झाला तर आई कधी आधी जेवल्याचे आठवत नाही. तसे ती माझ्यासाठीही जेवायचे थांबते. मग तो उशीर कितीही होऊ दे. आता हे आमचे संस्कारी कुटुंब पुरातन नसून आधुनिक असल्याने हे जेवणाला सोबत द्यायचे संस्कार बायकाच नाही तर पुरुषही पाळतात. जिथे चहाही कधी कोणी एकट्याने घेत नाही तिथे लस कशी कोण एकट्याने घेणार होते? थोडक्यात लस घेणे तर दूर, आमच्या घरात कोणाच्या फोनवर आरोग्य सेतू अ‍ॅपही डाऊनलोड नव्हते.

आणि मग एके दिवशी आमच्या ऑफिसनेच सर्व स्टाफच्या लसीकरणाची मोहीम हाती घेतली. अर्थात मग ते प्रत्येक कर्मचार्‍यासाठी अनिवार्यच होते. आईवडिलांनी नाही घेतली तरी मला आता लस घ्यावीच लागणार होती. नाव तर मी नोंदवले होते, पण आईवडीलांच्या आधी आपण घेतोय हे काही मनाला पटत नव्हते. मग कोणीतरी समजावले की देव न करो उद्या तुमच्या घरावर कोरोनाचा अटॅक झाला, तर आईवडीलांची काळजी घ्यायला तू तरी धडधाकट आणि समर्थ असशील. हा विचार पटला आणि लस घेण्याबाबतचे किंतु परंतु मनातून निघून गेले.

आयुष्यात पहिल्याच फटक्यात मला कधी काही मिळालेच नाही. ना पहिल्याच फटक्यात दहावी झाली, ना बारावी झाली ना डिग्री झाली. ना पहिल्या फटक्यात कुठल्या मुलीने होकार दिला. तसेच जिला मी होकार दिला तिच्याशीही काही पहिल्या फटक्यात माझे लग्न झाले नाही. मग लस तरी कशी मला पहिल्याच फटक्यात मिळणार होती. माझ्या या पहिल्याच फटक्यात काही न मिळण्याचा फटका पुर्ण ऑफिसला बसला आणि म्युनसिपल कॉर्पोरेशनची कसलीशी परवानगी न मिळून आमचे लसीकरण रद्द झाले. पण चांगली गोष्ट म्हणजे, दोन आठवड्यांपुरतेच.

त्यानंतर मात्र छोटीमोठी धांदल वगळता माझे लसीकरण सुरळीत पार पडले. आणि धांदलही कसली तर माझ्या बॅगेत असलेले बायकोचे आधार कार्ड माझेच समजून तेच सोबत नेले आणि तेच खुशाल दाखवले. आता आधार कार्डवरचा फोटो रंग-रूप-लिंग-निरपेक्ष असतो, सगळ्यांचा एकसारखाच दिसतो, हा काय माझा दोष. असली चूक कोणीही करू शकते. पण वॅक्सिन घेतल्यानंतरचा फोटो मात्र मी न चुकता काढला. आणि पुढच्या परीणामांची चिंता न करता फेसबूक-व्हॉट्सपवरही शेअर केला.

पण परीणाम व्हायचे तेच झाले. छे, आईवडीलांच्या आधी पोरं कशी वॅक्सिन घेतात म्हणून अप्रत्यक्ष टोमणे ऐकू येऊ लागले. मग आता आईवडीलांना कधी नेतोयस असे खोचक प्रश्न विचारले जाऊ लागले. काही मित्रांच्या घरातील कोणी कोरोनाने दगावलेही होते, त्यांच्या सांगण्यातील कळकळही दिसत होती. त्यामुळे मग आता बस्स झाले म्हणून आईला लस घ्यायचेच म्हटले. बायकोने लगेच बूकिंग केले. पण पहिल्याच फटक्यात कधी आपले काही होतच नाही ना. स्टॉक संपलाय असे कारण येत ते बूकींग ऐनवेळी कॅन्सल झाले. मधल्या काळात वडिलांनी येऊन पुन्हा लस म्हणजेच सर्व काही नाही हा वैचारीक विचार मांडला. आणि आता आईचे लसीकरण पुन्हा बारगळतेय की काय अशी स्थिती निर्माण झाली. पण पुन्हा एकदा ऑफिसच मदतीला धाऊन आले. कर्मचार्‍यांपाठोपाठ आता त्यांच्या फॅमिली मेंबर्सनाही ऑफिसतर्फे लस उपलब्ध करून देण्यात येणार होती.

लस उपलब्ध होणे एक गोष्ट, आणि त्यासाठी आईला तयार करणे दुसरी गोष्ट. पण गेले ## वर्षे ती माझी आई आहे आणि मी तिचा पोरगा. (## - छे छे, ऋन्मेष आपले वय कधीच सांगत नाही). तर सांगायचा मुद्दा हा की मी तिला माझ्या जन्मापासून ओळखून आहे. एखादी गोष्ट चार पैसे स्वस्त मिळत असेल तर चार मैल चालत जायचीही तिची तयारी असते अशी काटकसरी बाई आहे. बाहेरून जेवण ऑर्डर केले की सोबत मिळणार्‍या मोफत लिंबातून शेवटचा थेंब निघेपर्यंत ती पिळून घेते आणि उरलेले लोणचे दुसर्‍या दिवशी खायला म्हणून फ्रिजमध्ये जपून ठेवते. जर तिला सांगितले की ही लस मोफत आहे. आज ना उद्या घ्यायचीच असेल तर उद्या पैसे भरून घेण्याऐवजी आज मोफत का नाही? तर ती माझ्यासोबत ऑफिसला यायला एका पायावर तयार होईल.

खरे तर आम्हा कर्मचार्‍यांसाठी लस मोफत होती, आणि फॅमिली मेंबर्सचे पैसे भरावे लागणार होते. पण ते थेट पगारातून कापून जाणार असल्याने तिला शेवटपर्यंत ते कळणार नव्हते. मग दिले तिला मोफतचे टोचण, आणि ते काम करून गेले. आई तर तयार झालीच, पण सोबत माझी पोरगीही पप्पांचे ऑफिस बघायचेय म्हणून हट्ट धरून बसली. कधी नव्हे ते सकाळी आठचा अलार्म लाऊन झोपली. मग म्हटले चला जाऊया आता तिलाही घेऊन. मारूया आणखी एखादी थाप.

ऑफिसला असे लसीकरणाच्या दिवशी मुलीला न्यायची परवानगी होती की नाही याची कल्पना नव्हती. मग एक खोटी सिच्युएशन तयार केली ज्यानुसार मुलीला घरी सांभाळायला कोणी नसल्याने तिला सोबत आणावे लागले. ती थाप द्रुश्यममधील अजय देवगणसारखे सकाळीच आईला आणि लेकीला एकत्रपणे पढवली जेणेकरून कोणी वेगवेगळे सांगू नये. पण एक प्रॉब्लेम झाला होता, तो म्हणजे आईचा गेटपास अजून माझ्या मेलवर आला नव्हता. आणि त्यामुळे सर्वात बाहेरच्या मेन गेटवरच आमची गाडी अडवली.

झाली पंचाईत. ज्या बाईला लस द्यायला आणले आहे तिचा गेटपास तर नाहीच वर आणखी एक अनाहूत पाहुणी सोबत. गेटवरच्या सिक्युरीटीने कंपनीचे नाव विचारले. म्हटले आता हा फोन लावेल आणि चौकशी करेल. कंपनी कदाचित आईचा गेटपास त्यांना मेल करेल, पण लेकीचे काय?

पण यातले काही झाले नाही. कारण एका ओळखीच्या सिक्युरीटी गार्डची तेवढ्यात आमच्यावर नजर पडली आणि त्याने ईशार्‍यानेच आपल्या साथीदाराला जाऊ दे म्हटले. मग त्यानेही माझे नाव तेवढे विचारून मला आत सोडले. पण आत बिल्डींगखालच्या रिसेप्शनवरची मुलगी मात्र ओवरस्मार्ट निघाली. म्हणजे अशी म्हणायची पद्धत असते. आपण नियम तोडायच्या प्रयत्नात असताना जे हट्टाने आपल्याला नियम समजावत असतात ते सारे ओवरस्मार्टच असतात.

पण मी सुद्धा तयारीतच आलेलो. मुलीला घरी एकटे कसे सोडणार म्हणत तिला सारी द्रुश्यम सिच्युएशन समजावू लागलो. पण कसले काय, तिला ते ऐकण्यात रसच नव्हता. सगळी स्क्रिप्ट फुकट घालवली मेलीने. पण अखेरीस मुलीची सारी जबाबदारी तुमची म्हणत सोडले आम्हाला. आता माझ्या मुलीची जबाबदारी तिला कोण घ्यायला सांगत होते? असो, थोडक्यात सिक्युरीटी वगैरे अंधश्रद्धा असतात हे आता मला कळून चुकले होते.

पुढचा टप्पा आता सोपा होता. मेन गेटपासून ईथवर आल्यावर आता आमचेच ऑफिस काही माझ्या पोरीला बाहेर काढणार नव्हते. ते या अपेक्षेला जरा जास्तच जागले. ऑफिसस्टाफने मुलीचे हसून स्वागत केले. नाव गाव विचारले. रिसेप्शनवरच्या नवीनच जॉईन झालेल्या सुंदरीने तिला गोड स्माईल देत एक चॉकलेट दिले. त्यानिमित्ताने मलाही तिच्याशी बोलायची ईतके दिवस शोधत असलेली संधी मिळाली.

आत गेल्यावर मी मुलीला टाईमपास करायला माझा फोन देत माझ्या जागेवर बसवले आणि आईसोबत आत एका हॉलमध्ये रजिस्ट्रेशन करायला गेलो. तुरळक गर्दी होती, पण माझ्यासोबत आई बघून आम्हाला थेट पहिला नंबर दिला. पुन्हा एकदा रजिस्ट्रेशन पहिल्या फटक्यात न होणे याला माझे पांडू नशीब जागले. कारण आईचा कागदोपत्री जन्मदिवस वेगळा होता आणि आम्ही साजरा करत असलेला वाढदिवस वेगळा होता. त्यामुळे आधार कार्डवरची तारीख आणि मी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना टाकलेली तारीख भिन्न निघाली. पुन्हा रजिस्ट्रेशन करण्यात दोन मिनिटे गेली. जे ऑफिसच्याच मुलीने चटचट करून दिले अन्यथा मी पाच मिनिटे खर्ची पाडली असती.

तिथून रवानगी थेट लसीकरण विभागात झाली. तिथेही असाच सुखद अनुभव आला. तिथल्याही लाईनला ओलांडून आईला थेट एंट्री मिळाली. मी बाहेरूनच आईला लस घेताना पाहिले. तिथून तिला वेटींग रूममध्ये अर्धा तास थांबायचे होते. काही अ‍ॅलर्जिक रिअ‍ॅक्शन होते का हे या वेळेत बघितले जाते. त्या वेटींग रूममध्ये न्यायलाही आईला रस्ता दाखवत एक ऑफिसबॉय तत्परतेने धावला. कधी नव्हे ते मला अगदी भरून आले. पण दूरचा विचार करता हे तेच ऑफिस आहे जे आम्हाला कामाच्या नावावर पिळून काढते हे आईला आता कधीच समजावू शकणार नव्हतो हा तोटाही झाला.

दहा एक मिनिटातच मी मोकळा झालो आणि बाहेर आलो तर पोरगी गायब !

ऑफिसमध्ये दूरदूरवर नजर जाईल तिथे कोणीही बसले नव्हते. पोरीला लपाछुपी खेळायचा मूड आला आणि लपून माझी मजा घेत असेल म्हणून एकदोन आवाज देऊन पाहिले, हरलो बोलून झाले, ओरडून झाले, पण काही रिस्पॉन्स नाही. बाहेर येऊन वॉचमनला विचारले तर म्हणाला, मगाशी त्या खिडकीच्या काचेजवळ ऊभी राहून बाहेरचे फोटो काढत होती, त्यानंतर आत गेली असावी. पण आत तर नव्हती. म्हणजे लिफ्ट पकडून खाली गेली असावी. त्याला काही न बोलता मी सुद्धा लिफ्ट पकडली. एकतर मुलीला परवानगी न घेता सोबत घेऊन आलेलो, त्यात ती हरवली असा आरडाओरडा मला नको होता.

लिफ्टमधून बाहेर पडलो तेच समोर खालच्या रिसेस्प्शनवरची मुलगी दिसली. आता हिला विचारावे की नाही या द्विधा मनस्थितीत मी पडलो. जी तिने अचूक ओळखत हातानेच मला माझी पोरगी कुठल्या दिशेने गेली हे दाखवले. हे करताना तिच्या चेहर्‍यावर एक विजयी हास्य होते. आणा अजून आपल्या पोरांना ऑफिसला.

तिने दाखवलेल्या गेट मधून बाहेर पडताच मात्र आणखी कुठलेही शोधाशोधीचे नाट्य न घडता मुलगी समोरच दिसली आणि माझा जीव भांड्यात पडला. ती रस्त्याकडेच्या फुलझाडांवर झुकून माझ्या मोबाईलने सुर्यफुलांचे फोटो काढत होती. काही गळालेली फुले वेचूनही झाली होती. मला पाहताच कौतुकाने ती दाखवून झाली. तिच्यावर फारसे ओरडणे झाले नाही. कारण चूक माझीच होती. ज्या पोरीला गार्डनमध्ये आणि मोकळ्या जागांवर फिरायला आवडते तिला ऑफिस नावाच्या तुरुंगात नेऊन बसवले होते.

या छोट्याश्या शोधमोहीमेची आठवण म्हणून तिचे एकदोन फोटो काढले. ऑफिस आवारात लागणार्‍या एका फास्टफूड कॉर्नरवर फ्रेंच फ्राईज आणि आईसक्रीम हादडून झाले. खाता खाता तिला ऑफिस कॅम्पस फिरवून झाले. आमची जेवल्यावर फिरायची जागा आणि गार्डनमधील बसायचा कट्टा दाखवून झाला.

1631831156565.jpg

हे सारे करताना मला माझे बालपण आठवत होते. तेव्हा मला माझ्या आईच्या ऑफिसमध्ये जायची फार क्रेझ होती. दिवसभर टाईमपास म्हणून तिच्या टाईपरायटरवर बसून दोनचार पेपर खराब करायचे. कंटाळा आला की सोबत आणलेले पुस्तक वाचत बसायचे. आणि भूक लागली की तिच्यासोबत कँटीनमध्ये जाऊन मसाला डोसा हादडायचा. सेंट्रल टेलिग्राम ऑफिसच्या एका भल्यामोठ्या सरकारी ईमारतीत माझी आई काम करते याचे मला फार कौतुक वाटायचे. तेच कौतुक मी सतत माझ्या मुलीच्या चेहर्‍यावर शोधायचा प्रयत्न करत होतो.

ईतक्यात आईचा फोन आला, आणि आम्ही वर गेलो. पण मुलगी वर जायला नाखूशच होती. तिला माझ्या चकाचक एसी ऑफिसमध्ये जराही रस नव्हता. तिचे मन खालच्या आवारातच रमले होते. पण आजीला आणायला वर जायचेच होते. गेल्याचा फायदाच झाला. कँटीनमध्ये मोफत चहापाणी झाले, मुलीलाही तिच्या आवडीची बिस्कीटे मिळाली.

निघण्याआधी आईचा सक्तीचा असा कोरोना लस घेतल्याचा फोटो काढण्यात आला. लेकीनेही तिला सोबत दिली.

मी जेव्हा लस घेतलेली तेव्हा मला रात्री छानसा सडकून ताप आलेला. पण आईला साध्या आरामाचीही गरज भासली नाही. तिचे नेहमीचे दिनक्रम लस घेतल्यानंतरही चालूच होते. माझेच काळजीने आराम कर, आराम कर चालू होते. पण बहुतेक माझे आईवडिल बरोबरच म्हणत होते. हा कोरोना त्यांचे काही वाकडे करू शकणार नाही. मग लस तरी काय त्रास देणार होती.

अश्याप्रकारे आईचा पहिला डोस झाला. बाबांचा शिल्लक आहे. आणि ते प्रकरण जास्त अवघड आहे. पण एक आयड्या आहे. अर्थात, माझी आईच. जी एकावर एक फ्री मिळत असेल तर अपना बाजारातून गरज नसताना दोन किलो फरसाण घेऊन येते Happy

IMG_20210917_040049.jpg

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

प्रत्येकाचे लसीचे अनुभव बरे वाईट भिन्न असतीलच. पण मनात कुठलेही किंतू परंतु न ठेवता आपल्या सर्वांना लस घ्यायचीच आहे, ते सुद्धा एकच नाही तर दोन डोस घ्यायचे आहेत हे सर्वांनीच ध्यानात ठेवा.

माझा अनुभव ज्यांनी ज्यांनी वाचला, तसेच जे वाचण्यापासून वाचले त्या सर्वांचेच ...
धन्यवाद आणि आभार,
ऋन्मेऽऽष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगला लिहिलाय अनुभव
हा रिलायबल टेक पार्क वाटतोय(मी मुंबईत तेवढ्या एकाच ठिकाणी गेलेय)

माझ्या वडलानी लस जरी लगेच घेतली आणि पार्टी करत नसले तरी बाकी अनुभव घरचेच वाटले. पुर्ण कोविड च्या काळात वडिल मुंबईत एकटे राहिले. मला काय होतय हाच अ‍ॅटिट्युड होता. सुरवातिच्या काळात essential service मध्ये काम करातात म्हणुन पास काढुन घेतला. न्हावी कडे मागच्या दाराने जायचे. रोज वॉकला जायचे. मागच्या वर्षी ६५ च्या वरील लोकाना बस मध्ये प्रवास करायला बंदी होती त्यावेळी कित्येक वेळा त्याना बस मधुन खाली उतरवले होते. ७८ वर्षाचे असले तरी कंडक्टर ला ६४ वय सांगुन प्रवास करायचे. ह्या वर्षी मात्र वय चेक करत नाहीत.

लस मात्र लगेच घेतली. पहिल्या लसी करिता आम्ही पुण्यात बोलवले होते. दुसरी लस मुंबईतच घेतली.

सर्वांना लस घ्यायचीच आहे, ते सुद्धा एकच नाही तर दोन डोस घ्यायचे आहेत हे सर्वांनीच ध्यानात ठेवा. >>+१ लस घेउन आपण आपले तर भले करतच आहोत पण समाजाचे पण भले करत आहोत. अमेरिकेत ज्या राज्यात लसीकरणाचे प्रमाण कमी आहे त्या ठिकाणी परत केसेस वाढुन हॉस्पिटल्स पुर्णपणे भरली आहेत आणि लोकाना बेड मिळत नाही आहेत.

धन्यवाद सर्वांचे

मातृमुखी आहेस, सदासुखी रहाशील. >>> हो, मातृप्रेमीही आहे Happy
वडिलांनाही लवकर लस मिळू दे. >>>आमीन. ऑफिस दाखवायचा पुढचा नंबर त्यांचाच आहे.

हा रिलायबल टेक पार्क वाटतोय >>> हे माईंडस्पेस जुईनगरचे आहे. हे असले बिजनेस पार्क साधारण एकसारखेच दिसत असावेत. मी याआधी कोपरखैरणेच्या रिलायन्स डीएकेसीमध्ये काम केलेले. ते मस्त होते. डीएकेसीचे दिवस म्हणून लेख बनेल त्यावर.

+१ लस घेउन आपण आपले तर भले करतच आहोत पण समाजाचे पण भले करत आहोत. >>> येस, म्हणूनच आईवडीलांची प्रतिकारशक्ती मान्य करूनही लस घेण्यास आग्रही आहे, आणि ती घेण्यास उशीर करणे हा निष्काळजीपणाच होता हे मान्य आहे. अजून कोण आमच्या कॅटेगरीत असेल तर त्यांनी आणखी उशीर करू नये अशीच ईच्छा आहे.

धन्यवाद वावे, शर्मिला आणि सर्वच प्रतिसाद.

घरचे गणपती गेल्यानंतर काल पहिल्यांदाच असा सलग वेळ मिळाला आणि जे घडले होते तेच सुचेल त्या शब्दात लिहीत गेलो. लिहीतानाच जास्त होतेय असे वाटत होते आणि एवढ्या असंख्य लेखात ईतके लिहिलेले कोणी वाचेल का शंकाच होती. पण काटछाट करायच्या भानगडीत पडलो नाही. कारण यात आठवणी दडलेल्या असतात, त्यामुळे पुढे काही वर्षांनी हेच लेख वाचून नॉस्टेल्जिक व्हायला बरे पडते Happy

खूप छान गमतीशीर सचित्र अनुभव लिहिला आहे. शेवटचे तळटीपेतील सर्वांनी ध्यानात ठेवायचे आवाहन खूप प्रेरणादायक.

तुमच्या आईच्या लसीकरणाच्या अनुभवाचे चित्र डोळ्यांसमोर उभे राहिले...
लेकीची मस्त सहल झाली...!

धन्यवाद किशोर, ममोताई, रुपाली..

@ रुपाली, हो. मी नाक्यावर पानबिडी घ्यायला जरी जात असेल तरी लेकीला सोबत यायचेच असते.. आणि मलाही तिला न्यायचेच असते Happy

भक्ती धन्यवाद Happy

सामो धन्यवाद, मुलगी माझ्यावर गेल्याने सुंदर आहे आणि यात चूकभूल काही नाही Wink
डोळे घारे असे नाही. पण रंग वेगळा आहे. छान आहे. लोकांच्या चटकन लक्षात येते आणि बोलून दाखवतात.

>>मुलगी माझ्यावर गेल्याने सुंदर आहे आणि यात चूकभूल काही नाही<<
ऋन्म्या, स्टेटमेंट लोडेड आहे, तुझ्या बायकोची याला कदाचित हरकत नसेल पण इथल्या यशस्वी खेळाडुंना ते कांडिसेंडिंग वाटुन बबाल होउ शकतो... Wink

पण इथल्या यशस्वी खेळाडुंना ते कांडिसेंडिंग वाटुन बबाल होउ शकतो..
>>>>>
छे हो. या गणपतीच्या रणधुमाळीत सर्व काड्या अगरबत्तीसारख्या विझतात.
पण तसेही सायंटीफिकली प्रूव्ह आहे की मुली दिसायला सहसा वडिलांवर जातात आणि मुले आईवर.
आणि आम्ही एक ॲप वापरून हे चेक सुद्धा केले होते. म्हणजे मी बाई असतो तर कसे दिसलो असतो आणि माझी मुलगी २५ वर्षांची झाली तर कशी दिसेल. दोन्ही फोटो जुळ्या बहिणींसारखे आले Happy

जोक्स द अपार्ट आपले अपत्य आपल्यासारखे दिसते यापेक्षा जास्त आनंद ते आपल्यासारखे वागते याने होतो Happy

Pages