शशक पूर्ण करा - अधुरी एक कहाणी - स्मिताके

Submitted by स्मिताके on 12 September, 2021 - 12:17

अधुरी एक कहाणी..

काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो....कित्येक रात्री या दुःस्वप्नाने दचकून उठत होते. आज ते सत्यात उतरलं.

खरोखरच दार सताड उघडं आहे. मध्यरात्रीच निघून गेलात, राजपुत्र?

थोरले राजे "परवानगी नाही" म्हणाले, तरीसुद्धा.

आणि मी? मी "संमती नाही" म्हटल्याने दुःख टळलं असतं?

मला आणि बाळाला झोप लागल्यावर जावं म्हणजे क्लेश कमी होतील, असं वाटलं तुम्हांला?

अनोमा नदीच्या पाण्याचा आवाज खरंच इथवर ऐकू येतोय की भास होतोय मला? कंथका, तुझ्या टापा का रे त्या दूर दूर नेणाऱ्या?

जा.. जगाचं दुःख, वेदना समजून घ्या... यशोधरेचं दुःख राहीना बापडं!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान..

छान.

खुप सुंदर जमलीय...

राम व बुद्धाच्या जोडीला आयुष्याला पुरले इतके दु:ख झेलीत सीता व यशोधरा ऊभ्या होत्या... अवतारी पुरूषांना वरले एवढाच त्यांचा अपराध Happy

सुरेख, बुद्धाचं सगळंच शांतवणारं असतं पण यशोधरा अव्यक्तच राहिली.... खरच की!
शशक मस्त आहे.शेवटी नि:शब्द व्हायला होते.

सुरेख जमली आहे.

अनंत कालापासून पुरुष कर्तव्य बजावण्यासाठी संसार सोडून जातच आला आहे. मग ते युद्ध, समाजसेवा, पुत्रधर्म अशा उदात्त हेतूने किंवा खुणावणारे साहस, परस्त्री, बेजबाबदार वर्तन अशा स्वार्थी हेतूंनी.
स्त्रीच्या गृहीत धरलेल्या स्थायीभावाचे (निभावून नेण्याची भावना) कौतुक करण्याची जाणीव अलिकडची आहे.

अवांतर वाटल्यास क्षमस्व पण ....

मध्य वयात्/तरुणपणी म्हणा बुद्धाला त्याचे "कॉलिंग" सापडले. व त्याने निग्रहाने (त्यालाही सांसारीक पाश अन मोह याचा सामना करावाच लागला असणार) अन मनस्वीपणे निर्णय घेतला. यात नक्की काही चुकलं का ?
त्याला २ पर्याय (चॉइस) होते - (१) यशोधरेचं मन मोडायच, तिच्यावर अन्याय करायचा किंवा (२) स्वतःच्या पारलौकिक महत्त्वाकांक्षेस मुरड घालून, स्वतःवर अन्याय करायचा.
मग यशोधरेवरचा अन्याय हा अन्याय अन स्वतःवरचा अन्याय मात्र स्वीकारार्ह (अ‍ॅक्सेप्टेबल) असं आपण का समजतो?

स्वतःशी प्रामाणिक रहावं की अन्य लोकांशी? किंबहुना एक पराभूत सांसारीक होणं हे बुद्धाने विचारानिशी टाळलं अन तो स्वतःशी प्रामाणिक राहीला हा मोठेपणाच नाही का? कोणी म्हणेल की आधी लक्षात आलं नाही का? तर समजा नाही आलं मग पुढे काय? स्वतःच्या महत्त्वाकांक्षेशी, स्वप्नांशी प्रतारणा करायची? अन त्यागास महत्त्व देऊन संसारात अनमनाने रहायचे होते?

छान जमली आहे.

त्याचं मन संसारातून उडालंच असेल तर शरीराने घरात राहूनही तो त्यांना दुरावलाच असता, तेव्हा बहुधा हे ठीकच झालं.
बायकामुलांची काही व्यवस्था लावून तो गेला का हे मला माहीत नाही - निदान तितकं केलं असेल तरी ठीक.
तिचं दुसरं लग्न लावून देण्याइतका आधुनिक तो नसणारच. बंडखोरी आपलंच कॉलिंग कुरवाळण्यापुरती!

प्रश्न कठीण आहेत.. मीराबाईच्या बाबतीत तिच्या नवऱयावर यशोधरेसारखीच परिस्थिती ओढवली. आणि मीरेचा आधीपासुनच कृष्णाकडे ओढा असुनही तीने भोजराजाशी विवाहाला संमती दिली. आता हे सगळे खरे की रचलेल्या कथा ते देवाला ठाऊक.

साधना, माझ्याही डोक्यात नेमकं मीरेचंच उदाहरण आलं होतं.

मजा म्हणजे बोहल्यावरून पळालेल्या रामदासस्वामींनी संसारी जनांना 'आधी प्रपंच करावा नेटका' असं बजावलं. Happy

प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार.
सामो च्या प्रश्नांना उत्तरं देणं कठीण आहे.
वरची चर्चा वाचून जालावर पुन्हा शोध घेतला. विकिपीडियावर सापडलं, की इतर नातेवाईकांनी यशोधरेची जबाबदारी घेण्याची तयारी दाखवली होती, काही विवाहाचे प्रस्तावही आले होते पण नकार देऊन ती साधेपणाने जगत राहिली. बुद्धांशी तिची नंतर एकदा भेट झाली होती. ती आणि मुलगा दोघेही भिक्षु झाले.

फार खोल माहिती किंवा विचार नसताना फक्त "दरवाजा उघडला" म्हणजे कोणीतरी बाहेर गेलं.. विरह.. इतकीच कल्पना केली होती!

मैथिलीशरण गुप्तांची प्रसिद्ध कविता आठवली यावरून.

सखि, वे मुझसे कहकर जाते,
कह, तो क्या मुझको वे अपनी पथ-बाधा ही पाते?

मुझको बहुत उन्होंने माना
फिर भी क्या पूरा पहचाना?
मैंने मुख्य उसी को जाना
जो वे मन में लाते।
सखि, वे मुझसे कहकर जाते।

स्वयं सुसज्जित करके क्षण में,
प्रियतम को, प्राणों के पण में,
हमीं भेज देती हैं रण में -
क्षात्र-धर्म के नाते
सखि, वे मुझसे कहकर जाते।

हु‌आ न यह भी भाग्य अभागा,
किसपर विफल गर्व अब जागा?
जिसने अपनाया था, त्यागा;
रहे स्मरण ही आते!
सखि, वे मुझसे कहकर जाते।

नयन उन्हें हैं निष्ठुर कहते,
पर इनसे जो आँसू बहते,
सदय हृदय वे कैसे सहते ?
गये तरस ही खाते!
सखि, वे मुझसे कहकर जाते।

जायें, सिद्धि पावें वे सुख से,
दुखी न हों इस जन के दुख से,
उपालम्भ दूँ मैं किस मुख से ?
आज अधिक वे भाते!
सखि, वे मुझसे कहकर जाते।

गये, लौट भी वे आवेंगे,
कुछ अपूर्व-अनुपम लावेंगे,
रोते प्राण उन्हें पावेंगे,
पर क्या गाते-गाते ?
सखि, वे मुझसे कहकर जाते।

छान जमलीय.

पण आपण आपले सुख दु:ख मुळात दुसर्‍याशी का जोडावे?
आपल्या आयुष्यात एक व्यक्ती आहे तर आपण सुखी आणि ती नसल्यास दु:खी हे ठरवून आपण त्या व्यक्तीवर आपल्या सुखदु:खाची जबाबदारी का टाकावी?
प्रॅक्टीकली अवघड असले तरी आयडीअली प्रत्येकाला आपले स्वतंत्र आयुष्य जगता आले पाहिजे आणि दुसर्‍याला त्याचे जगू देता आले पाहिजे. मग ती दुसरी व्यक्ती नवरा, बायको, आई-वडील, मुले कोणीही असोत.
जगात आपले आपल्याशी असलेले नाते सोडून ईतर कुठलेही नाते शाश्वत नाहीये हे स्विकारता यायला हवे.
आईवडील आणि मुले ही तरी निसर्गाने रचलेली रक्ताची नाती आहेत. नवरा-बायको हे नाते तर आपणच नियम बनवून रचलेले आहे. मग हे नाते सुखासोबत दु:ख आणि क्लेशसुद्धा आपल्या वाट्याला घेऊन येणारच.

गौरी, सुंदर कविता दिलीस. आभारी आहे.

ऋन्मेऽऽष, प्रॅक्टीकली अवघड >> खरं आहे.

प्रतिसादांबद्दल सर्वांचे आभार.

राम व बुद्धाच्या जोडीला आयुष्याला पुरले इतके दु:ख झेलीत सीता व यशोधरा ऊभ्या होत्या... अवतारी पुरूषांना वरले एवढाच त्यांचा अपराध ---- +111111

ऋन्मेष यांचा प्रतिसादही आवडला. + 111111

फार खोल माहिती किंवा विचार नसताना फक्त "दरवाजा उघडला" म्हणजे कोणीतरी बाहेर गेलं.. विरह.. इतकीच कल्पना केली होती --- मस्त जमली आहे कथा.. मायबोलीवर कमेंट्स वाचून पण ईतके वेगवेगळे पैलू कळतात विचारांचे.. खूपच आवडतं म्हणून वाचायला सगळचं...