माझ्या आठवणीतली मायबोली- अतरंगी

Submitted by अतरंगी on 10 September, 2021 - 06:20

वय वर्षं २४, २००६ साली आयुष्यात पहिल्यांदाच मी देशाबाहेर पडलो. भारताबाहेरचा पहिला जॉब सौदी अरेबिया. हातात एका कंपनीचे ऑफर लेटर घेऊन मी सौदीला पोचलो. माझ्या अगदी लांबच्या ओळखीतले सुद्धा कोणी सौदीला नव्हते. त्या एवढ्या मोठ्या देशात मी एकाही व्यक्तीला ओळखत नव्हतो. कंपनीने पहिला एक महिना हॉटेलवर रहायची सोय केली होती. ते सुरुवातीचे काही दिवस फक्त कामावर जाणे आणि घरी येऊन टिव्ही बघत बसणे एवढेच करायचो. तिव्हीवर पण सगळे ईंग्रजी कार्यक्रम. ऑफिस मधे दिवसभर ईंग्रजी, अरबी भाषा रुमवर आल्यावर ईंग्रजी चित्रपट. दिवसेंदिवस मराठी कानावर पडायचे नाही. नाही म्हणायला कंपनीत दुसर्‍या डिपार्टमेंटला दोन जण मराठी होते, पण दोघेही वय वर्षं ३५-४० च्या दरम्यान. त्यांची फॅमिली तिथे असल्याने ते माझ्यासारखे रिकामे नसायचेच. त्यामुळे मी एकटाच असायचो. ऑफिस आणि हॉटेल एवढेच माझे जग झाले होते.
स्मार्ट फोनचा जमाना अजून यायचा होता. ईमेल वगैरे करायला नेट कॅफे वर जायला लागायचे. ऑर्कूटने हातपाय पसरायला सुरुवात केली होती. पण मला त्यात फार काही स्वारस्य नव्हते. ईमेल करण्यापुरते नेट कॅफे वर जायचो. असंच एकदा एक मैत्रीण ऑनलाईन येणार होती पण ती न आल्याने नेट वर टिपी करता करता सहज मराठी वेबसाईट असे गुगल केले. पहिली वेबसाईट आली ती मराठीवर्ल्ड.कॉम. तीच ओपन केली. त्यावर अशाच काही टाईमपास कविता, लेख होते. ती सगळी वेबसाईट वाचून काढली. नंतर मग हे रोजचंच झालं. मी रोज ईंटरनेट वर वेगवेगळ्या मराठी वेबसाईट शोधून वाचत रहायचो. त्या अनोळखी देशात, जिवघेण्या कंटाळ्यात मला माझ्या मातृभाषेशी जोडणारं काहीतरी सापडलं होतं.

अशाच एका विकेंडला सर्च मधे मायबोली आली. My Crushes, https://www.maayboli.com/hitguj/messages/644/104621.html?1141938098 हा धागा. मी वेड लागल्यासारखा तो पुर्ण धागा वाचून काढला. त्यानंतर हळूहळू आख्खी मायबोली पालथी घातली. मी तो पर्यंत जितक्या वेबसाईट पाहिल्या त्यात असे काही नव्हते. ईतके सदस्य, ईतके वेग्वेगळे विषय, ईतक्या छान चर्चा.... सुरुवातीचे काही दिवस नुसता वाचनात गेले. रोज तासंतास मी मायबोलीवरचे धागे वाचत बसायचो. माझा वेंधळेपणा, मी केलेला ईब्लीसपणा, मराठी लोकांचे हिंदी अशा कित्येक धाग्यांनी मला खळखळून हसवलं. तेव्हापासून जी मायबोली माझ्या आयुष्याचा, माझ्या दैनंदिन आयुष्याचा भाग झाली ती आजतागायत. मी कितीही बिझी असलो तरी असा दिवस सरत नाही की मी मायबोलीवर एकही चक्कर टाकली नाही.

मायबोलीचे माझ्या आयुष्यात सगळ्यात मोठे योगदान आहे ते माझे विचार परिवर्तन करण्यात. माबोवर येण्याआधी मी एक पठडी बद्ध विचार करणारा, हिंदुत्ववादी, स्त्री पुरुष समानता काय असते हे याचा गंधही नसणारा एक संकुचित विचारसरणीचा अतिसामान्य माणूस होतो.
माबो वरिल चर्चांनी मला साचेबद्ध विचारसरणी मधून बाहेर काढले. विचार करायला लावले. संतुलित विचारसरणी कशी असावी हे शिकवले. यात माबोवर वाचलेल्या अनेक चर्चांचा महत्वाचा वाटा आहे. कित्येक वर्षांपुर्वी तर मी वृत्तपत्र वाचणे सुद्धा सोडून दिले. महत्वाचे काही असेल तर माबोवर कोणी ना कोणी त्यावर धागा काढतेच, शिवाय वृत्तपत्रांमधे फक्त बातमी वाचता येते, माबोवर त्याच बातमीची चिरफाड आणि त्याच्यावर वेगवेगळ्या लोकांचे विचार पण वाचता येतात. पण आजकाल चर्चांपेक्षा चिखलफेकच जास्त चालते. बातमी किंवा काहीही असो, ठराविक आय डी रोज रोज येऊन त्याच त्याच पोस्ट ओकार्‍या केल्या सारखे लिहित असतात. रोज तेच तेच लिहून त्यांना कंटा ळा कसा येत नाही हे एक मला आजपर्यंत न ऊलगडलेले कोडे आहे. आणि त्याच त्याच विखारी, द्वेषपुर्ण पोस्ट लिहून पण त्यांना काय मिळते हे सुद्धा. जशा संयत चर्चा आधी वाचायला मिळत तशा आता दुर्लभ होत जात आहेत. असो. या विषयावरपण माबो वर चर्चा झाल्या आहेत त्यामुळे त्यावर अजून काही लिहिण्यासारखे नाही.

जेवढं मला माबो ने हसवलं, विचार करायला शिकवलं तेवढंच माबो वरच्या गुलमोहर विभागाने मनोरंजन केलंय . मी माबोवर आलो त्यानंतर काहिच दिवसात बेफिकीर माबोवर लिहायला लागले. त्यांच्या कथा मला भयानक आवडायच्या. त्यांची कथा लिहायची शैली आणि झपाटा, दोन्ही जबरदस्त होते. बेफि, नंदिनी यांच्या कथा, दाद, स्वप्ना-राज यांचे हृदयस्पर्शी लिखाण, हवाहवाई यांचे सगळ्यांना कोपरखळ्या मारणारे लेख हे माझे माबोवर सर्वात आवडते. अजुनही अनेक जण होते की ज्यांचे लेख आवर्जुन वाचायचो. यातले बहुतेक जण आता माबोवर लिहित नाहीत. या सगळ्यांचे लेखन, गुलमोहर विभागातील ऊत्तम प्रतीचे लिखाण आता फारच रेअर झाले आहे.

माबोच्या २५ वर्षातील प्रवासात, मी गेली १७ वर्षे माबोवर आहे. ऑगस्ट २००६ मधे साधारण मी माबोवर आलो. माझा पहिला आयडी manyah होता. तो जो ईमेल आयडी वापरुन काढला होता तोच गंडला मग त्यानंतर मी हा आयडी काढला, आधी बहुतेक या आयडीचे नामकरण अभिजीत२५ कि कायसे होते. नंतर एके दिवशी काय वाटले, माहित नाही, मी हेच बदलून अतरंगी केले आणि आता गेली कित्येक वर्षे तेच आहे. जुन्या आयडीने एक की दोन लेख लिहिल्याचे आठवत आहे. पण आपल्याला पण कधी लिहावेसे वाटू शकेल, लिहिता येईल असे मनात आले नव्हते. पण का काय माहित एके दिवशी सहज कुठे तरी वाचलेली एक बोधकथा ईथे अनुवाद करुन शुद्धलेखनाच्या भरमसाठ चुका करत टाकली. त्यानंतर कधीच काही लिहावेसे वाटले नाही. पण का काय माहित अचानक एके दिवशी ठरवलं की लेखन करुन बघायचे. म्हणून मग लिहायला सुरुवात केली. माझ्या कडे लेखन कला नाही याची जाणीव आहेच पण तरी मला एक प्रयत्न म्हणून करुन पहायचेच होते. त्यानंतर प्रत्येक लेखन प्रकारात काही ना काही सुचेल तसे लिहित गेलो.

माझे आजवरचे लिखाण...
ललित:- वूडलँडचे सँडल आणि BMW 1300S, मी आणि दांभिक ??? छ्या !, खरडवही भाग एक ते पाच,

विनोदी लेखनः- विवाहोत्सुक तरुणांसाठी मार्गदर्शिका, आदर्श पती स्पर्धा, No Pun Intended,

विडंबनः- एक गोंधळ- पप्पी कोणाला? कशी द्यावी? वा देऊ नये? हे कसे ओळखावे ?

कथा:- भोज्या भाग एक ते पाच.
मागचे काही महिने फक्त शेअर मार्केट विषयकच लिखाण होत आहे, जे पुढचे काही महिने चालू राहील. ते सुद्धा कधी करेन असे वाटले नव्हते.

मायबोली नसती तर मी कदाचित कधीच काहीच लिहिले नसते. त्यामुळे त्यासाठी सुद्धा मी माबोचा ऋणी आहे. गेल्या १७ वर्षात माबोने खुप शिकवलं, मनोरंजन केलं, व्यक्त व्ह्यायला व्यासपीठ दिलं. ईतक्या वर्षात मायबोली भरपुर बदलली पण आजही मायबोली वर आल्याशिवाय चैन पडत नाही.

हा लेख लिहावासा वाटला तेव्हा वाटलं होतं की भरपुर काही लिहिता येईल, गेल्या अनेक वर्षात मायबोलीवर झालेले बदल, तेव्हाचे- आत्ताचे लेखक यावर विस्तृत पणे लिहिता येईल, पण लेख लिहिताना बर्‍याच गोष्टी टाळत गेलो. शिवाय आता लेख लिहित बसण्यापेक्षा परत जुन्या हितगुजवर जाऊन माझा वेंधळेपणा, मी केलेला ईब्लीसपणा, My Crushes वाचत बसावे किंवा मामीच्या धमाल धाग्यांच्या बीबीवर जाऊन परत एखादा खळखळून हसवणारा धागा वाचत बसावे असे वाटू लागले आहे. त्यामुळे लेख थोडक्यात आटोपता घेतो.....

ईतकी सुंदर वेबसाईट तयार करुन गेली २५ वर्षे यशस्वीरीत्या चालवल्या बद्दल माबोच्या संस्थापकांचे आणि सर्व नेमस्तकांचे मनःपुर्वक आभार !!!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच!
तुम्ही दिलेली ती लिंक पण धमाल आहे.

माबोवर येण्याआधी मी एक पठडी बद्ध विचार करणारा, हिंदुत्ववादी, स्त्री पुरुष समानता काय असते हे याचा गंधही नसणारा एक संकुचित विचारसरणीचा अतिसामान्य माणूस होतो. माबो वरिल चर्चांनी मला साचेबद्ध विचारसरणी मधून बाहेर काढले. विचार करायला लावले. संतुलित विचारसरणी कशी असावी हे शिकवले. >>> हे मस्त Happy

छान

मस्त लिहिलंय.

इथल्या चर्चांमुळे आपलेच विचार पडताळले गेले, काही बदललेही हे जवळपास सगळ्या लेखांत दिसलं मला.
मला त्याचं फार अप्रूप वाटतंय.

छान लिहिले आहे
वर लेखात दिलेले तुमचे सारे लिखाण वाचून एंजॉय केले आहे Happy

खूप आवडलं. खरंच मायबोलीवर लेख, चर्चा, अनुभव वाचून बहुश्रुतता आली, त्यामुळे कित्येक विचार गळून पडले, कित्येक उत्क्रांत झाले.