माझ्या आठवणीतली मायबोली- अमितव

Submitted by अमितव on 10 September, 2021 - 15:35

मला मायबोलीची पहिली ओळख २००३-०४ ला झाली असेल. तेव्हा कॉलेजमध्ये हॉस्टेलवर रहात होतो. लॅब मध्ये आणि रुमवर अनलिमिटेड इंटरनेट होतं, तेव्हा हितगुज मधील काही धागे वाचलेले. तेव्हा देशाबाहेरील लोकांचा सहभाग जास्त असावा म्हणून असेल, वाचता तर येतंय त्यावर प्रतिक्रिया द्यावी ही निकड वाटत नाही म्हणून असेल... का आठवत नाही पण आयडी काढलेला आठवत नाही.

आत्ता माझ्या आयडीचं वय बघितलं तर २००७-८ च्या सुमारास आयडी काढला असावा असं दिसतंय. तेव्हा जवळचा एक मित्र मायबोलीवर रात्रंदिवस उंडारायला आणि मुख्यत्त्वे दुसर्‍यांच्या चुका काढायला आणि भांडायला जात असे. मलाही पहिल्यापासून भांडणं, वादविवाद, आपल्यालाच कशी जगातली सगळी अक्कल दिली आहे हे पाजळण्यात फार रस! परत इंटरनेटवर कोणी काही चुकीचं बोललं की ते सुधारलंच पाहिजे याचं बाळकडू अगदी सुरुवातीपासून बरेच फोरम वाचल्याने मिळालेलं. त्या उर्मीत बहुतेक आयडी काढला असावा. पण वापर मोस्टली चर्चा, वादविवाद वाचन या पुरताच सीमित होता. अर्थात कथा, कविता, ललितेही वाचत होतोच. पण रोज उठल्यावर त्याकाळी जसं केल्विन, डीलबर्ट, एक्सकेसिडी किंवा सॅवेज चिकन बघायचो तशी मायबोली जीवनाचा भाग काही झाली न्हवती.
आज विचार केला तर मुख्य कारण देशात रहात होतो, सिंगल होतो, नवी नोकरी होती आणि माबोबाह्य बरीच आकर्षणे होती असं वाटतं. मराठी वातावारण आजुबाजूला होतं आणि मराठी वाचनाची आणि मराठीत परस्परसंवादाची गरज प्रत्यक्ष आयुष्यात भागत होती. हे ही एक कारण असेल.

मग काही वर्षांनी कॅनडात आलो, जरा स्थिरस्थावर झालो आणि मायबोली वाचन (आणि थोडंफार प्रतिक्रिया लेखन) नियमित चालू झालं. मायबोली रोज उघडली जाऊ लागली. मला दिवसाच्या ज्यावेळात ऑनलाईन रहायला जमायचं त्याकाळात टीपापा, बेकरी आणि पु.पु हे बाफ हलते असायचे. म्हणजे दुसरे नसायचे असं नाही, पण समविचारी Wink जन्ता इथे असायची. बेकरी, पुपु वर काही थोडा सहभाग घेतला असेल पण टीपापावर काही कमेंट टाकायची माझ्यात हिम्मत न्हवती. तिकडे धाडस करुन लिहिलं आणि तिकडेचे लोक अगदीच प्रेमळ निघाले. असं प्रेमळ म्हटलेलं त्यांना आवडत नाही, पण फाटक्या तोंडाचे प्रमेळ आहेत ते. त्या आधी गणेशोत्सवात १ -२ वेळा, लेखन स्पर्धेत, दिवाळी अंकात संपादक, मराठी भाषा दिन इत्यादी मध्ये खारीचा वाटा उचलावासा वाटू लागला. अजुन मायबोलीवरुन ओळख झाली म्हणून प्रत्यक्षात कुणाला भेटलो न्हवतो. पण अनेक आयडी न भेटताच ओळखीचे झाले होते. आयडी मागचा चेहरा माहित नसुनही बुजलेपणा राहिला न्हवता. अनेक आयडींनी मी फक्त टीपापात लिहितो या एका क्वालिफिकेशन वरुन माझ्याशी बायडिफॉल्ट वितुष्ट घ्यायला सुरुवात केली होती. पण आत मी इंटरनेटवर नवखा न्हवतो आणि आपण कोण आहोत, इथे का येतो याची थोडीफार मनाशी ओळख पटल्याने काहीही मनावर घ्यायचे नाही, आणि आपल्याला ज्यावेळी जे वाटेल तेच बिन्धास करत रहायचे हा कोडगेपणा आला होता.

आता प्रश्नोत्तरे!

- तुम्ही मायबोलीवर यायला लागल्यापासून तुम्हाला काय बदल जाणवले,
फार काही नाही. टेक्निकली काही अप्स/ डाऊन्स झाले. पण अजुनही तावातावाने चर्चा होतात. लोकांची पातळी सुटते. आयडी उडतात. पण जनरली सगळे गुण्यागोविंदाने रहातात. एरवी फार प्रेमात नसलेले आयडी गणपतीत/ दिवाळीत (आता अंक नाही! हा एक मोठा बदल आहे. तो प्रतिसादाअभावी बंद केला असेल तर परत एकदा रिव्हाईव्ह .. नव्या रुपात असेल... करता येतो का याची चाचपणी करा की अ‍ॅडमिन्स!) एकमेकांच्या धाग्यांना समायोचित सणाचे भान ठेवत प्रतिसाद देतात. अनेक आयडी सुंभ जळला तरी मोडात... फिरुनी नवे जन्मुन तसेच वागतात. काही पातळीसोडून लिहायचा विडा उचललेले तसंच लिहितात.. त्यातही एक मजा असते. पण पातळी न सोडता, जेव्हा शालजोडीतले मिळतात तेव्हा सगळ्यात जास्त मजा येते. ते साभार परतवता आले आणि रिसिव्हिंग पार्टीने परत मजेत टोलवले की दिवस सार्थिकी लागल्याचे समाधान मिळते. हल्ली पूर्वी इतक्या कथा येत नाहीत, पण थोडा उपक्रमांचा बूस्ट दिला तर येतील याची खात्रीही वाटते.
आणि नाही आल्या तरी आता मायबोलीचे व्यसन लागल्याने हाकलुन देई पर्यंत रोज येत राहू. आणि हाकलले तरी फिरुनी नवा जन्म आहेच!

- इथली कुठली सोय तुम्हाला एकदम आवडली,
वेगवेगळे ग्रुप्स आणि त्यातील नवीन लेखन आणि ग्रुप बाहेरील मायबोलीवरील नवीन लेखन.

- कुठली सोय तुम्हाला कित्येक दिवस माहितच नव्हती,
आठवत नाही.

- गेल्या २५ वर्षात मायबोलींनं तुम्हाला काय दिलं,
अनेक चर्चांतुन दुसर्‍या बाजुचे विचार दिले. अनेकदा पूर्वी असलेल्या ठाम मतांतील फोलपणा समजला. दुसर्‍या बाजुने विचार करायची सवय मनाला लागली. पूर्वी मी कॉन्झर्वेटिव्ह होतो, आता बर्‍यापैकी लिबरल विचार मनाला पटतात. पण परत त्यातही दुसर्‍या बाजुचा विचार करण्याच्या या नव्या सवयीने लंबक पुन्हा डावीकडून थोडा उजवीकडे सरकतोय असं हल्ली वाटू लागलंय. तर थोडक्यात लंबक कुठल्याही एका बाजुला न जाता मध्मममार्गी विचार करायची सवय लागली असं म्हणू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेक आयडींशी ओळखी झाल्या. अमेरिकेच्या उत्तर-पूर्व आणि पश्चिम किनार्‍यावरील अनेकांना प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला. काही मदत लागली (म्हणजे हातरुमाल घेणे वगैरे Wink ) तर मायबोलीवर नक्की मिळेल याची खात्री दिली.

- तुम्ही मायबोलीला काय दिलं ,
माहित नाही. हा प्रश्न वाचुन काहीच दिलेलं नाही याची जाणिव परत एकदा झाली.

- तुमचं कुठलं लेखन गाजलं,
- कूठल्या लेखांनी तुम्ही मायबोलीकरांना गांजलं
काही फार कॉट्रिब्युट न केल्याचे खंत आहे. बघु पुढे-मागे काही बदलता आलं तर!

मला व्यक्त व्हायला, समविचारी लोक मिळाले. जे फेसबुकवर किंवा इतर सोमीत जगासमोर लिहू का नको असा विचार येतो तो विचार मायबोलीत बिलकुल येत नाही. आपलेच लोक आहेत ही भावना आजपर्यंत तशीच आहे आणि पुढेही राहो.
मायबोलीला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सही!
'फाटक्या तोंडाचे' म्हटल्याबद्दल आभार मानावेत की प्रेमळ म्हटल्याबद्दल निषेध करावा काही समजेनासं झालं आहे! Proud

बरं, तो जवळचा मित्र कोण?

छान!

तुम्ही मायबोलीला काय दिलं ,
माहित नाही. हा प्रश्न वाचुन काहीच दिलेलं नाही याची जाणिव परत एकदा झाली.
>>>
ऐसा क्यू बोल रहे हो? तू (आणि मी आणि बरेच) एका गणेशोत्सवात होतो की संयोजनात. तो सहभाग नाही का ?

लेख आवडला

अमितव, मनोगत आवडलं.
विचार परिवर्तन याबद्दल असंच काही लिहिणार होते
पण आता रिपीट होईल म्हणून लिहिणार नाही. Happy

जे फेसबुकवर किंवा इतर सोमीत जगासमोर लिहू का नको असा विचार येतो तो विचार मायबोलीत बिलकुल येत नाही
+७८६
सेम हिअर
छान प्रामाणिक लिहिले आहे

छान लिहीलं आहेस अमित!
थोडक्यात लंबक कुठल्याही एका बाजुला न जाता मध्मममार्गी विचार करायची सवय लागली असं म्हणू शकतो.>> हे अगदी रीलेट झालं, पटलंच Happy

छान मनोगत.
मराठी वातावारण आजुबाजूला होतं आणि मराठी वाचनाची आणि मराठीत परस्परसंवादाची गरज प्रत्यक्ष आयुष्यात भागत होती. हे ही एक कारण असेल. >>
15 वर्षे झाली, पण मला सगळ्या मराठीच्या गरजा पूर्ण होऊनही इथे पडीक राहायला आवडायला लागलं होतं. आताही तुम्ही मराठी घोळक्यात राहायला लागलात तर माबो सोडाल असं वाटत नाही (दुसऱ्या व्यापात व्यग्र नसाल तर)

मस्त लिहीलंय अमित!

सिंगल होतो, नवी नोकरी होती आणि माबोबाह्य बरीच आकर्षणे होती >>> 'आणि' च्या जागी 'त्यामुळे' पण चाललं असतं का इथे? Wink

लिखाण आवडले.

पण पातळी न सोडता, जेव्हा शालजोडीतले मिळतात तेव्हा सगळ्यात जास्त मजा येते. ते साभार परतवता आले आणि रिसिव्हिंग पार्टीने परत मजेत टोलवले की दिवस सार्थिकी लागल्याचे समाधान मिळते. >>>> पटले

'फाटक्या तोंडाचे' म्हटल्याबद्दल आभार मानावेत की प्रेमळ म्हटल्याबद्दल निषेध करावा काही समजेनासं झालं आहे! Proud>>>>>>>>>> Lol

मस्त अमितव!!

मस्त लिहीले आहे. प्रकाशित झाला तेव्हाच वरवर चाळला होता पण प्रतिक्रिया द्यायची राहून गेली. तो "काय बदल झाला" वाला पॅरा सर्वात मस्त आणि चपखल आहे.

अनेक चर्चांतुन दुसर्‍या बाजुचे विचार दिले. अनेकदा पूर्वी असलेल्या ठाम मतांतील फोलपणा समजला. दुसर्‍या बाजुने विचार करायची सवय मनाला लागली. >>> +१

तेव्हा जवळचा एक मित्र मायबोलीवर रात्रंदिवस उंडारायला आणि मुख्यत्त्वे दुसर्‍यांच्या चुका काढायला आणि भांडायला जात असे. >>> Lol याबद्दल कोणीच कसे विचारले नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त करून सध्या थांबतो Wink

त्या खंत लिस्ट मधे कोणाला गांजलं नाही याचीही खंत आली आहे Happy

आता पुन्हा तुझे लेखन चेक केले तर झक्कींना परत बोलवावे का, "शंभर अपराध" (हे दोन्ही रिलेटेड नाही Wink ), "स्कीम्स" बद्दलचा लेख, भाई- व्यक्ती की वल्ली वगैरे चर्चेत राहिलेले लेख आठवले.

प्रतिक्रियेबद्द्ल सगळ्यांना धन्यवाद Happy

>> खंत लिस्ट मधे कोणाला गांजलं नाही याचीही खंत आली आहे>> हो हो! लिहिताना स्विच-केस प्रमाणे ब्रेक आलेला नसल्याने फॉल थ्रू होणार हे डोक्यात आलेलं Proud
हे दोन्ही रिलेटेड नाही >> Wink प्रसंगानुरुप ब्ला. ब्ला.... Proud मागेवळून बघताना टोटल मलाही कदाचितत लागणार नाही. त्यावेळी प्रामाणिकपणे लिहिलं. नंतर विचार बदलले ते ही तिकडेच प्रामाणिकपणे सांगितले.
आत्ता तो शंभर अपराध धाग्याचा हेडर वाचला तर इतकं कन्वोल्युटेड का लिहिलंय? आधी तर हे मी लिहिलंय हेच आठवत न्हवतं मला. तर ते असो. Proud

छान लिहीलय

गेल्या २५ वर्षात मायबोलींनं तुम्हाला काय दिलं,>> याच उत्तर विशेष आवडलं

अमितव, छान लिहिलंय! तुझे सर्व धाग्यांवरचे प्रतिसाद वाचनीय असतात. तुझ्या प्रतिसादात विचारलेल्या प्रश्नामुळे मी अनेकदा त्या विषयाच्या अधिक खोलात जाऊन वाचन केलं आहे ज्याने माझ्या ज्ञानात आणि आकलनात भर पडली आहे. सो, तू प्रश्न विचारत रहा!
तुझा व्हेन देअर आर नाईन! हा आर बी जी यांच्या स्मृत्यर्थ लिहिलेला लेख आवडला होता फार.