पाककृती स्पर्धा १: उपवासाचा आरोग्यपूर्ण पदार्थ

Submitted by संयोजक on 4 September, 2021 - 12:25
Sabudana khichadi

नमस्कार मायबोलीकरहो!

गणेशोत्सव आला की मायबोलीवर सर्वात जास्त उत्सुकता असते ती पाककृती स्पर्धेची!
दरवर्षी संयोजक मायबोलीकरांसमोर आव्हान ठेवतात आणि सगळी कल्पनाशक्ती आणि कौशल्य पणाला लावून अनेक मायबोलीकर उत्साहाने सहभागी होऊन भरभरुन प्रतिसाद देतात.
अनेक शंका-कुशंका, नवनवीन पाककृती, पदार्थांचे रंगीत सजवलेले फोटो आणि शेवटी मतदानाद्वारे स्पर्धेचा निकाल!
पाककृती स्पर्धेचे नियम ठरवण्यापासून ते विजेता घोषित होईपर्यंत सगळ्यांसाठीच ती एक मोहीम झालेली असते.

आणि का नाही होणार..? मायबोली वरचा गणेशोत्सव हा प्रत्येकाला आपल्याच घरचे कार्य आहे इतका आपलासा वाटतो

यंदाही आम्ही प्रयत्न केलाय थोडी अवघड, थोडी सोपी अशी पाककृती स्पर्धा आयोजित करण्याचा!

चला तर मग, बघूया काय आहेत यंदाचे विषय आणि अर्थातच नियम!

एकादशी दुप्पट खाशी....... हि म्हण आता लवकरच सत्यात येईल कारण मायबोली गणेशोत्सव २०२१ मध्ये आहे;
पाककृती स्पर्धा क्र. १ - उपवासाचा आरोग्यपूर्ण पदार्थ.

चला तर मग मंडळी, बघुयात ह्या स्पर्धेचे नियम;

१. उपवासाचा एकच पदार्थ करावयाचा आहे.
२. महाराष्ट्रात उपवासाला चालणारे कोणतेही आणि कितीही पदार्थ वापरुन नाविन्यपूर्ण पदार्थ बनवायचा आहे. (उदा, बंगालमधे मासे उपासाला चालत असतील तरी या स्पर्धेत चालणार नाहीत)
३. उपवासाचा पदार्थ ,कमी साखर/कमी कर्बोदक/कमी तूप/ कमी पीष्ठमय पदार्थ/जास्त फायबर/जास्त प्रोटीन इत्यादी वापरून, आरोग्यपूर्ण करण्यावर भर द्यावा.
४. पाककृती कशामुळे " आरोग्यपूर्ण " आहे याचा उल्लेख पाककृतीमधे शेवटी देणे आवश्यक आहे.
उदा: ही पाककृती गोड असली तरी साखर न वापरता नैसर्गिक गोडवा असलेल्या पदार्थांनी केली आहे. म्हणून आरोग्यपूर्ण आहे
५. उपवासाला चालणारे सर्वमान्य घटक पदार्थच असावेत. उदा. कोथिंबीर चालेल पण धने पावडर चालणार नाही.
६. साहित्य, पदार्थ बनवतानाची एखादी स्टेप, आणि पूर्ण झालेला पदार्थ अशी किमान 3 प्रकाशचित्रे देणे आवश्यक आहे.
७. साहित्याचे प्रमाण आवश्यक आहे.
८. प्रवेशिकेचे शीर्षक पुढील प्रकारे द्यावे - पदार्थाचे नाव - तुमचा आयडी
९. प्रत्येक प्रवेशिकेला "मायबोली गणेशोत्सव २०२१" अशी शब्दखूण द्यावी
१०. प्रवेशिका पाठवायची शेवटची तारीख रविवार २६ सप्टेंबर २०२१ रात्री १२ पर्यंत (भारतीय प्रमाणवेळ)

उपवासाचे पदार्थ म्हणजे आरोग्याला संकट असे जगातल्या अनेक डॉक्टरांचे म्हणणे आहे. पण तुम्ही आरोग्यपूर्ण उपवासाचे पदार्थ शोधून काढा आणि जगातल्या सगळ्या आरोग्यप्रेमी मराठी मंडळीचे आणि डॉक्टरांचे दुवे घ्या !
(वर दिलेला साबुदाणा खिचडीचा फोटो , उपवासाचा पदार्थ म्हणून उदा. दिला आहे. या फोटोमधली साबुदाणा खिचडी नुसती पिष्ठमय पदार्थानी भरली असून अजिबात आरोग्यपूर्ण नाही)

!!! गणपती बाप्पा मोरया !!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नमस्कार मंडळी,
स्पर्धांबद्दल काही शंका, प्रश्न असल्यास संयोजकांना या पानावर विचारा. आपल्या प्रश्नांचे शक्य तितक्या लवकर उत्तर द्यायचा संयोजक प्रयत्न करतील.

(वर दिलेला साबुदाणा खिचडीचा फोटो , उपवासाचा पदार्थ म्हणून उदा. दिला आहे. या फोटोमधली साबुदाणा खिचडी नुसती पिष्ठमय पदार्थानी भरली असून अजिबात आरोग्यपूर्ण नाही) >>> Sad मायबोलीवर सुखवस्तू, मध्यमवर्गातील/उच्च श्रीमंत वर्गातील लोक असतात म्हणून म्हणा ही आरोग्याची व्याख्या जामच संकुचित आहे. बालकाला किंवा अ‍ॅथलीटसला किंवा जिथे जिथे "एनर्जी" हवी तिथे तिथे साबुदाणा खिचडीचा फार चांगला उपयोग होवू शकतो. ८ तास स्क्रिन टाईम नि रिमोट उचलायला पण सून अशी जीवनशैली असेल तर साबुदाणा खिचडी आरोग्यपूर्ण नाही हे बरोबर आहे. घ्यायची स्पर्धा घ्या पण उगा सरसकट नका बै नावं ठेवू खिचडीला.... . Wink Happy

.. असेल तर साबुदाणा खिचडी आरोग्यपूर्ण नाही हे बरोबर आहे.>>> अश्या तर्कानुसार कोणताही पदार्थ एकासाठी आरोग्यपूर्ण असू शकतो तर दुसऱ्यासाठी नसू शकतो.
उपवासाच्या पदार्थात फायबर कसे वाढवायचे?

छान.
लोकहो! आरोग्यपूर्ण म्हटलंय.. इम्युनिटी बूस्टर नाही! Wink Proud Light 1
बाकी माबोवर मंगळावरचे लोक नाहीत त्यामुळे माबोवाचकांना अनारोग्यपूर्ण असेल तर तितकं सामान्यिकरण ठीक आहे की!
आता साबुदाणावडे डीप फ्राय करायच्या ऐवजी माबोफेम आप्पेपात्रात करा, किंवा एअरफ्रायर मध्ये करा. ढीगभर तुपा ऐवजी तीन थेंब तुपात होतील. झाले की नेहेमीपेक्षा आरोग्यपूर्ण!
कोथिंबीर वड्यात राजगीरा पीठ टाका. आला फायबर!
हे खाऊन कोणी खरंच आरोग्यपूर्ण जीवन जगणार नाही आहे हे सगळ्यांनाच माहित आहे. Happy स्पर्धा आहे फक्त!

खाद्यपदार्थांसाठी आरोग्यपूर्ण विशेषण योग्य की आरोग्यदायक?
आरोग्यदायक अन्नपदार्थ खाल्याने आपले जीवन आरोग्यपूर्ण होते...असे.

उपक्रम छान आहे. अशातून नवे पदार्थ सुचून (याच स्पर्धेत ते होईल असे नाही) कदाचित आरोग्यदायी पदार्थही सुरू होतील उपवासासाठी.

(त.टी. मला उपवासाला काहीही चालत नाही, आणि उपवास सोडायला काहीही चालतं, तेव्हा मी भाग घेईन की नाही सांगता येत नाही हं. नाहीतर म्हणाल असं लिहितो आहेस मानवा तर आता टाकच चार-पाच रेसप्या!)

ओह खरच की.
"आता टाकच चार-पाच आयड्या काढुन चार-पाच रेसप्या" असे वाचावे.

ओह खरच की.
"आता टाकच चार-पाच आयड्या काढुन चार-पाच रेसप्या" असे वाचावे.>>>>> Lol

स्पर्धेचं नाव "आरोग्यपूर्ण उपवासाचा पदार्थ" असं की "उपवासाचा आरोग्यपूर्ण पदार्थ " असं हवं?
आरोग्यपूर्ण उपवास म्हणजे माझ्या मते फक्त पाणी पिऊन केलेला. त्यामुळे पदार्थ फक्त बर्फ.

मस्त स्पर्धा, शुभेच्छा भाग घेणाऱ्या सर्वांना.

छ्या... माझी कोथिंबीर वडीची आयडीया फोडली... नायतर भाग घेणार होते >>> हाहाहा.

"आता टाकच चार-पाच आयड्या काढुन चार-पाच रेसप्या" असे वाचावे. >>> हाहाहा.

साखि फक्त पिष्ठमय म्हणणं आणि कोथिंबीर सूप ईम्युनिटी बूस्टर सारखच आहे.
रुजुता दिवेकरला तरी विचारायचं...
मग फोटो तरी कशाला द्यायचा? Wink

आता, भरपूर नट्स घातलेलं बनवलेले पदार्थ येतील.

मायबोलीवर पूर्वप्रकाशित असलेली स्वतःची रेसिपी चालेल का? नवीन Submitted by आ.रा.रा. on 11 September, 2021 - 19:53 >> जर आधी स्पर्धेत वापरली नसेल तर चालेल.

मतदानाच्या धाग्याची लिंक इथे किंवा मायबोली गणेशोत्सव २०२१च्या मुख्य पानावर दिली तर बरे होईल.
इतर धाग्यांमधे पटकन सापडत नाही.