निळा फ्रॉक

Submitted by SharmilaR on 1 September, 2021 - 01:41

निळा फ्रॉक

"चला ज....रा पडावं बाई आता"

मागच्या अंगणातून आईचा आवाज आला. शेजारच्या काकुंशी रोजच्यासारख्या दुपारच्या गप्पा संपवून आई घरात येत होती. आता ती आत येणार अन रोजच्यासारखी खाली सतरंजी घालणार. हातातली बाहुली तशीच खाली ठेऊन कुट्टी जागची उठली. पटकन कंगवा अन तेलाची बाटली हातात घेतली अन ती आईसमोर जाऊन बसली.

गेले काही दिवस हा तिचा रोजचा कार्यक्रम झाला होता. रोज दुपारी आई झोपायची. कुट्टीला मग अजिबात करमायच नाही. मग वेण्या घालायच्या निमित्ताने ती तेवढाच आईचा वेळ घ्यायची. खरंतर कुट्टीच्या केसांचा बॉबकट होता. अजिबात नीट वेण्या यायच्या नाहीत. दर महिन्याला बाबा कटिंगला निघाले कि ते तिलाही जबरदस्तीने घेऊन जायचे. पण आता तिनं ठरवलं होतं, यापुढे बाबांच मुळीच ऐकायचं नाही. केस चांगले लांब वाढवायचे अन ताईसारख्या छान लांब - लांब वेण्या घालायच्या. मग तिनं हा रोजचा वेण्यांचा कार्यक्रम ठरवून टाकला. रोज दुपारी दोन छोट्या - छोट्या वेण्या घालायच्या, त्यावर छान लाल रिबिनींची फुलं बांधायची अन मग रात्रीपर्यंत, अगदी केस ताणले गेले तरी तसंच राहायचं.

खरंतर रोज एकटं - एकटं खेळायचा पण कुट्टीला आता अगदी कंटाळा येऊन गेला होता. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तिलापण ताई-दादांबरोबर आजीकडे जायचं होतं. पण तिला कुणी पाठवलंच नाही. उगाच रडेल म्हणे. ह्या! रडायला ती आता काय लहान होती? चांगली दुसरीत गेली होती ती आता.

"माझ्याकडे सगळेच नेहमीच दुर्लक्ष करतात." परत तिच्या मनात आलं. आज बाबा ऑफिस मधून आले कि त्यांना अगदी सांगायचंच मला आजीकडे पोचवून द्या म्हणून. कुट्टीने मनाशी अगदी पक्क ठरवलं.

कुट्टीच्या रोजच्या भुणभुणीला कंटाळून शेवटी रविवारी आजीकडे पोचवायचं असं बाबांनी कबूल करून टाकलं.
"फारच हट्टी आहे बुवा हि पोरगी!" असं म्हणायला ते विसरले नाहीत. आनंदाच्या भरात कुट्टीने आज त्याचं फार वाईट वाटून नाही घेतलं मग. तसंही हे नेहमीचंच झालं होतं म्हणा.... आधी लक्ष द्यायचं नाही अन मग मागे लागलं की हट्टी आहे म्हणायचं. पण जाऊंदे! आता गावाला जायला तर मिळणार नं! तिचं सगळं लक्ष रवीवारकडे लागलं.

रविवारी बाबांबरोबर कुट्टी आज्जीकडे जायला निघाली. ती आनंदात इतकी मग्न होती कि मागे वळून आईला टाटा करायचं सुद्धा तिच्या लक्षात आलं नाही. आगगाडीच्या प्रचंड गर्दीचा अन चेंगराचेंगरीचा तिला त्रास वाटला नाही की कडाक्याचं ऊन असून पण तहान लागली नाही.

आगगाडीतून उतरून गावाकडची एसटी पकडून ते आजीकडे पोचले तेव्हा अंधारगुडुप्प झालं होतं. ओसरी समोरच्या मोठ्या अंगणात जाड जाजमावर सगळी मुलं गाढ झोपली होती. हात-तोंड धुणं होतंय तोवर आजी जेवण वाढायच्या तयारीला लागली. कुट्टीही अगदी पेंगुळली होती. बेबीमावशीनं मग तिला कसबसं खायला घातलं. केव्हा आपण झोपलो हे कुट्टीच्या लक्षातही आलं नाही.

सकाळी उठल्यानंतर मात्र अगदी मजाच मजा सुरु झाली. इथे खेळायला कित्ती - कित्ती जणी होत्या. सगळ्या मामे मावस बहिणी मिळून पंधरा-सोळा जणी तरी सहज होतील. सगळ्या मुलींच्या गर्दीत मुलगे मात्र दोनतीनच असायचे. अन ते तर दिसायचे पण नाही. दिवसभर ते आपले शाम्याच्या नाहीतर पुर्ष्याकाकाच्या मागं-मागं शेतावर नाहीतर इकडं-तिकडं काहीबाही करत फिरायचे. सगळी मोठी माणसं सुट्ट्यांमध्ये मुलांना इथं पाठवून द्यायची अन मग सुट्ट्या संपता - संपता त्यानां घ्यायला यायची. बेबीमावशी अन दोन माम्या मात्र इथेच राहायच्या.

इथे सगळी कामं घोळक्याने व्हायची. कुंदाताई वेण्या घालायला बसली की सगळ्या मुलींच्या वेण्या घालून द्यायची. मावशी सगळ्यांच्या आंघोळीचं बघायची. नंतर सगळ्या मोठ्ठा गोल करून कण्हेरी प्यायला बसायच्या. मग लपाछपी नाहीतर कापसाच्या खोलीत काहीतरी खेळं. सगळी मज्जाच मज्जा!

संध्याकाळी सगळ्यांचं नदीकडे फिरायला जायचं ठरलं. कुट्टीनं पिशवीतला फ्रॉक काढून आपला आपला घातला. बाकी सगळ्यांचे कपडे माजघरात दोरीवरच होते. ताईनं घातलेला फ्रॉक कुट्टी पहिल्यांदाच बघत होती. तस्सेच फ्रॉक मेघाताई सोडून बाकी सगळ्यांच्या अंगावर पण होते. मेघाताई म्हणजे मामाच्या घरातली ताई. तिचा रुबाब काही वेगळाच असायचा. तिला एकटीलाच जेवायला तिचं ठरलेलं नक्षीच ताट मिळायचं .

"फ्रॉक नवा आहे?" कुट्टीनं ताईला विचारलं.

"नाही. मेघाताईचा आहे.". ताईनं सांगितलं. त्याचवेळी आजीने मेघाताईला डोळ्यांनी खुणावतांना कुट्टीनं बघतलंच. कुट्टीला काहीतरी सललं.

दोन दिवासांनी संध्याकाळी ताईनं परत तोच फ्रॉक घातला तेव्हा मात्र कुट्टीची खात्रीच पटली. नेहमीप्रमाणे आपल्याला फसवल्याचं तिच्या लक्षात आलं.

"रोज-रोज मेघाताई तुलाच फ्रॉक घालायला कशी देते? " कुट्टीनं विचारलं तेव्हा ताई काहीच बोलली नाही. सगळ्यांनी आपल्याला फसवाल्याच्या दुःखानं तिला भरून आलं. ती आजीकडे गेली.

"मलापण सगळ्यांसारखा नवीन फ्रॉक का नाही?" तिनं आजीला विचारलं.

"अगं , बाकी सगळ्यांकरता कापड आणलं तेव्हा तू इथे नव्हतीस नं ..." आजीनं समजावलं.

"पण माझ्याकरता का नाही आणून ठेवलं?"

कुट्टीला फ्रॉकपेक्षा आपल्याला कुणी लक्षात ठेवलं नाही याचं खूपच दुःख होत होतं. अन फसवण्यामध्ये आजी अन ताई सामील आहेत याचं खूप रडू येत होतं. आपलं इथं कुणीच नाही. सगळ्या बहिणी आपल्याकडे बघून हसताहेत असं वाटत होतं.

एक-दोन दिवसात सगळ्या मामामावश्या आल्या. पाचसहा दिवसांनी आईबाबा पण आले. आई दिसल्याबरोबर कुट्टी धावतच आईकडे गेली.

"आत्ता आली का आईची आठवण? अगं, निघतांना हिनं मागं वळूनसुद्धा बघितलं नाही. मी आपली कित्ती वेळ दारात उभी होते." आई मावशीला म्हणाली.

"मला सगळ्यांसारखा नवीन फ्रॉक हवा." कुट्टीनं आल्या-आल्या लगेच मागणी केली.

"अंग, ही आली तेव्हा सगळ्यांचं कापड आणून झालं होतं. आता फक्त एकटीच्या कापडासाठी कोण तालुक्याला जाणार?" आजीनं सांगितलं.

आजीचं गाव अगदी छोटं होतं. गावात एकपण दुकान नव्हतं. मामा वर्षातून दोनदाच तालुक्याला जाऊन सगळ्यांकरता एकसारखं कापड घेऊन यायचा अन मावशी मशीनवर सगळ्यांचे कपडे शिवायची. कापड जरी एकच असलं तरी कुणाच्या फ्रॉकला झालर, तर कुणाला उडत्या बाह्या असं प्रत्येकीला वेगवेगळं असायचं.

आईनं कुट्टीची समजूत काढायचा प्रयत्न केला. पण सगळ्यांसाठी फ्रॉक शिवले तेव्हाच माझ्यासाठी का नाही शिवुन ठेवला हे कुट्टीला कळत नव्हतं. दोन-चार दिवस तिची आईमागची भुणभुण बघून...... म्हणज खरंतर बाकीच्यांना ती भुणभुण वाटत होती, तर तो कुट्टीला आपल्यावरचा अन्याय वाटत होता, अन आतापर्यंत तिला कळून चुकलं होतं, मागे लागल्याशिवाय कुणीच आपल्याकडे लक्ष देत नाही. तर बेबीमावशीला उपाय सुचला.

"माझ्याकडे एक ब्लाऊजपीस आहे. त्यात फ्रॉक बसतो का बघते." बेबीमावशीने पेटीतून निळ्याशार रंगाचा ब्लाऊजपीस काढला. त्यावर कुट्टीचा जुना फ्रॉक ठेऊन ती मोजमाप करतेय तोवर ताईमावशी तिचे दोन ब्लाऊजपीस घेऊन आली.

"हे बघ, हे निळं कापड अगदी तुझ्याच ब्लाऊजपीस सारखं आहे. ह्या दोन कापडांमध्ये छान घेरदार फ्रॉक तयार होईल. अन या लाल रंगाची पुढच्या बाजूला छान झालर कर म्हणजे फ्रॉक फार पातळ वाटणार नाही." ताईमावशीनं बेबीमावशीला सांगितलं.

त्यादिवशी दिवसभर बेबीमावशी सारखी कुट्टीला जवळ बोलवत होती, केव्हा अर्धवट फ्रॉक अंगाला लावून बघायची तर केव्हा फक्त बाही घालून बघायला लावायची. आज कुट्टी प्रचंड खुश होती. सारखी गिरक्या घेत होत. तिच्या एकटीकरता दोन-दोन मावश्यांनी कापड दिलं होतं.
तिला एकटीला सगळ्यांपेक्षा वेगळा लाल झालरीचा निळा निळा फ्रॉक मिळाला होता.
---------------------

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

खुपच गोड गोष्ट. मला अतिशय आवडली.

आणि हो कुट्टी अगदी बरोबर होती, सगळ्या कझिन्ससाठी फ्रॉक्स शिवले तर तिच्यासाठी शिवायला हवाच होता किंवा कापड ठेवायला हवं होतं ही लॉजीकल डिमांड होती. Happy

छानच. आमचे सगळे ड्रेस आईच शिवायची. आणि आम्ही मुली म्हणजे जास्त करून मी आणि माझी धाकटी बहिण जीव खायचो आईचा, ड्रेस च्या फॅशन वरून. मला आठवतय मला एक यलोऑकर रंगाच्या कापडाचा घेरदार फ्रॉक आईने शिवला होता. चक्राकार उडत्या बाह्या आणि खाली फ्रिल. तो फ्रॉक घालून घरभर "मी गोल्डन मी गोल्डन मी गोल्डन ओरायल " असं म्हणत नाचले होते.

खूप छान गोष्ट !! कुट्टी चे मनातले भाव अगदी पटले. ज्यांना असे रहायला जायला मिळणारे आजोळ आहे ते भाग्यवान आहेत असे वाटते . कारण माझे माहेर एकाच गावात... एकाच सोसायटी मध्ये.....एकाच बिल्डिंग मध्ये आहे . त्यामुळे सुट्टीची अशी मजा मी खूप मिस करते.

छान हलकीफुलकी गोष्ट. आवडली.
जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
पूर्वी असच असायचं. एकच तागा आणून एकसारखे फ्रॉक . लेस , फ्रील फक्त वेगवेगळी. मला तेव्हा ते अजिबात आवडायचं नाही. बँडवाल्यासारखं. पण आता ते जुने फोटो ,तेही सठीसामासी काढलेले बघून छान वाटतं.

खूप गोड आहे ही गोष्ट.
अशा गोष्टी लहान मुलांच्या मनाला लागून रहातात. ती नसती आली तरी तिचा फ्रॉक मावशीने शिवून ताईबरोबर पाठवायला हवाच होता खरं म्हणजे.
पण असं करतात मोठी भावंडं आणि माणसं पण.

अगदि कुट्टी डोळ्यासमोर आली..बरोबर वाटलं तिच वागणं..आपलं अस्तित्व जांणवुन देणारी गोड कुट्टी Happy
छान लिहिलय.

ही लॉजीकल डिमांड होती.>>> लहान मुलांचं लॉजिकल वागणं... त्या करता अडून बसणं... मोठयाना हट्टीपणाचं वाटतं.