छटाकभर लेख!

Submitted by shabdamitra on 22 July, 2021 - 17:05
1kg weight

जुनी वजन मापे आठवताना अडीशेर किवा अडीसेर, अडीसरी हे चटकन आठवते. त्यातही लब्बा म्हणत असे ती हाक “छलो अडकी कुडरी अडीसरी वेंकटीऽ!” ही आजही ऐकू येते. त्यातला कानडी हेलातून म्हणलेला अडीसरी शब्द फार गोड वाटे! पासरी व धडा. किती अडीसरी म्हणजे पासरी? दोन? का ….? तसेच किती पासरी म्हणजे धडा?

मला बरोबर माहिती असलेली वजन मापे रुक्ष वाटली तरी वाचनीय आहेत.

धान्ये, मटकी चवळी सारखी कडधान्ये,डाळी, पीठे मोजण्याची मापे: सर्वात लहान माप चिमूट व नंतर मूठ . पण ही फक्त सोयीची व अंदाजाची. त्यामध्येच माशीच्या पंखाइतकी, नखभर, किंवा ‘ किंचित’ ह्यांचा समावेश करता येईल.

पण प्रमाणित मापे म्हणजे सर्वात लहान निळवे/ निळवं. २ निळवी = १ कोळवं. २ कोळवी = १ चिपटं . २ चिपटी= १ आठवा किवा आठवं. २ आठवी = १ शेर ही मापी वजने. चिपटे व शेर प्रत्येक घरात असे. लोखंडी पत्र्याचा किंवा काही ठिकाणी लाकडी. साधारणत: वाळूच्या घड्याळाच्या किंवा डमरुच्या आकाराचे. मान अवटाळली तर हा शेर डोक्याखाली घेऊन झोपले तर मान मोकळी होऊन दुखणे हमखास थांबायचे. दुखण्याच्या शेरावर हा शेर सव्वाशेर असायचा!
४ शेर = १ पायली. १६ पायल्या = १ मण. २० मण= १ खंडी.

दुधा तेलाची मापे: दूध मापून देत व तेलही. १ पावशेर ; २ पावशेर = १ अच्छेर (बहुधा अर्धा शेर ह्या अर्थी) २ अच्छेर = १ शेर.
तेल मोजून देताना १ १/२,(दीड पाव) पाव = १ अडीशेर (अडीच शेर) किंवा अडीसरी , २ अडीशेर किंवा अडीसरी = १ पासरी. २ पासरी = १ धडा. नमनाला धडाभर तेल तो हाच धडा!

मिठाई तोलताना (तराजूत वजने ठेवून) छटाक (हे लहान माप तेल मापतानाही असायचे.) हे सगळ्यात लहान माप होते; ४ छटाक = १ पावशेर. २ पावशेर = अर्धा शेर. २ अर्धा शेर किंवा ४ पावशेर = १ शेर , मिठाई नंतर शेराच्या पटीतच मागत. पण तेही फार थोडेजण.

वर सांगितलेली दीड पाव = १ अडीशेर किंवा पासरी ही मापे वांगी भेंड्या गवारी घेवडा ह्या सारख्या भाज्या तोलून देतानाही वापरत. तसेच सुपारी तीळ खोबरे साखर वगैरे वजन करून देतानाही वापरत.

सरपणाची लाकडे, कोळसा मोठ्या तराजूत तोलून देताना धडा, मण ही वजने असत. सोने तोलताना गुंज हे सर्वांत लहान माप. गुंजा दिसायलाही सुंदर असत. केशरी लाल व त्यावर देठाच्या जागी काळा ठिपका. गुंज चमकदार असे. सशाच्या डोळ्यांनाही गुंजेचीच उपमा आहे. ‘गुंजेसारखे लाल ( व लहान)डोळे लुकलुकत होते’.

तर अशा ८ गुंजा= १ मासा. १२ मासे= १ तोळा.

एखादी वस्तु अगदी थोडी घ्या किंवा द्या म्हणायचे असेल तर आधी म्हटल्याप्रमाणे, दोन बोटांच्या चिमटीत मावेल, चिमूटभर, माशीच्या पंखाएव्हढी, गहूभर, गव्हा एव्हढी म्हणले जात असे. कमी लांबीची सांगताना “ उगीच बोटाचे अर्धे किवा एका पेरा एव्हढे घ्या /द्या म्हटले जाई. नाहीतर “ एक टिचभर म्हणजेच अंगठा ते तर्जनी एव्हढे अंतर, जर त्या पेक्षा जास्त असेल तेव्हा एक वितभर म्हणत. विटी दांडू किंवा गोट्या खेळताना ही दोन मापे वारंवार उपयोगात यायची. पण कुणाची हेटाळणी करण्यासाठीही ह्याचा सढळ ‘हाताने’ वापर होत असे.

कापडाच्या दुकानात गज (तीन फुटाची धातूची,इंचाच्या व फुटांच्या खुणा असलेली जाड पट्टी ;आठवा रामसे बंधूंचा भयानक सिनेमा ‘ दो गज नीचे’ !!) सापडला नाही तर दुकानदार ‘हातभरा’चे माप काढून कापड मोजून द्यायचा. हातापासून खांद्यापर्यंत कापड ताणून घडी घालत एक, दोन अगदी अडीच ‘वार’ सुद्धा मोजून द्यायचा! दुकानदार किंवा नोकर लहान चणीचा असला तर त्यांचा फायदा! उंचापुरा मालक किंवा नोकर कधी ‘हातभर’ कापड मोजून देत नसे. पक्के गिऱ्हाईक त्याच उंचापुऱ्या नोकराकडून मोजा म्हणायचे. “ मोजून देताना हा दीड ऱ्फूट बांबू मोजणार; आम्ही परत आणले तर हा ताडमाड मोजणार. आणि तुम्ही निम्मेच पैसे देणार ! अरे वा!” असे सिनेमा छाप संवाद म्हणत लगेच दुसरे दुकान गाठले जायचे तिरिमिरीत ! आठवडे बाजारात बरीच वर्षे ही मापाची ‘हस्तकला’ मान्यता प्राप्त प्रथा होती. पण लवकरच हे हातघाईचे मोजमाप बंद झाले.

तराजूंचीही गोष्ट सुरस आणि चमत्कारिक आहे. तराजूची मधली दांडी गोल सळईसारखी असे. त्यावर मध्ये काटा.काटाही स्वयंभू असे. तो मखरात नसे. गिऱ्हाईकाच्या अंगावर हाच काटा येत असे. म्हणजे काय स्थिती असेल बघा तराजूची! वाळलेल्या तांबड्या मिरच्या मोजणाऱ्या तराजूंच्या करामती विचारू नका. तराजू टांगलेले नसत. फक्त किराणा दुकानात दर्शनी एक तराजू टांगलेला असे. त्यात एका तागडीत कायमचे वजन ठेवलेले असे. तुम्हाला पाहिजे असलेल्या भाराचे वजन ठेवल्यानंतरच ते अढळपद लाभलेले वजन काढले जाई. केव्हाही दोन्ही तागड्या रिकाम्या दिसणार नाहीत.”बाजारपेठेत भोसकाऽऽ भोसकी” ही बातमी दुसऱ्या दिवशी आली तर समजायचे की त्याने रिकामी तागडीचा तराजू पाहिला होता !

बहुतेक व्यापारी, भाजीवाले हातात तागडी धरूनच वस्तू मोजून देत.ती त्यांची खरी हात चलाखी. दोन चार वांगी टाकली नाहीत तोवर ते तागडं खाली आलंच. अरे थांब पुन्हा बघू म्हटल्याव एक दोन वांगी टाकायला परवानगी मिळे गिऱ्हाईकाला. काय तो झटका किंवा पुन्हा बघू म्हणल्यावर मधल्या काट्यामागे तळहाताचा जोर लावून तो काटा वस्तुच्या तागडीकडे ढकलला की काटा साष्टांग नमस्कार घालतोय की काय वाटायचे. वा! किती ढळढळीत माप करून घेतले ह्या समाधानात अडीसरीत अदपाव वांगी घेऊन घरी आलो की फुगा फुटायचा.

तिखटाच्या मिरच्या मागितल्या तेव्हढ्या कुणाला मिळाल्या असतील ह्यावर श्रद्धाळू आस्तिकही विश्वास ठेवणार नाही. कुणी स्वस्त देऊ लागला तर “ माप बरोबर देणार ना? “ असे विचारून व्यवहारात किती मुरब्बी आहोत हे दाखवणारेही धडाभर मिरच्याचे पैसे देऊन पासरीभरच घेत आले आहेत! तिथे त्या तिखटाच्या खाटांत, नाक पुसत, शिंकत कुणाचे लक्ष तागडीकडे जातेय! गिऱ्हाईक आल्याबरोबरच विकणाऱ्याची बायको सुपात मिर्च्यांचे तुकडे बिया गिऱ्हाईकाच्या तोंडावर पाखडायला सुरुवात करायची. कधी पोरगं मिरच्याचा डोंगर खालून वर सारखा करायला लागे! साट् साट् शिंकत, रुमाल काढतांना पैशे खाली पडत नाहीत ना ह्या धसक्यात पुन्हा डोळे मिटून शिंकताना धडाभर मिरच्यांनी अर्धी(च)पिशवी भरलेली असे. मिरच्या चांगल्या वाळलेल्या आहेत ना म्हणून पिशवी हलकी लागते असं म्हटल्यावर लहान भाऊ म्हणायचा , “मग तर जास्तच भरल्या पाहिजेत ना?” विषय बदलत, फसलेले वडील आपण पेरू घेऊ या म्हणत तिकडे वळायचे.

हे सगळे फार लहान व्यापारी असत. गुळाच्या दोन चार ढेपी घेऊन बसलेले किंवा भाजी बाजारात गवारीच्या शेंगा,मटार विकणारे तर नैतिक सफाई दाखवत. गुळवाला सुरुवातीला एकदम मोठेच ढेकूळ टाकायचा. आम्हाला आनंद व्हायचा. हा सढळ दिसतो बरं का. मग ते मोठ्ठे ढेकूळ काढून त्याहून बरेच लहान, ते काढून मध्यम आणि वर तुकडा तुकडा, चुरा टाकत निमिषार्धात ती तागडी खाली वज्रासन घालून तिचे कपाळ जमीनीला कधी टेकली समजायचे नाही. कारण तोपर्यंत डबल कागदात तुकड्यां- चुऱ्यासह तो खडा दोऱ्ऱ्याने गुंडाळलाही असे.

हीच तऱ्हा सोन्याच्या भावाचे मटार किंवा जवारी गवारीची. तागडी भसकन् त्या ढिगाऱ्यात खुपसली जायची. शिगोशिग भरलेली तागडी एकदाच दिसे त्यामुळे ती डोळे भरून पाहताना हा इकडे हाताने त्यातली तितक्याच वेगाने भसा भसा खाली टाकत असे. राहिले ते गंगाजळ म्हणत पिशवीत घ्यायची. तोपर्यंत तराजूच्या दोन्ही बाजूला असलेल्या कड्यांच्या भिकबाळ्यांचा आवाज करत तागडी घडी घालून निमूट बसलेली असे. वजनांकडे पाहिले तर अडीसेराची बरोबर असत. “पुन्हा मोज;”थांब थांब; “घाई नको करू “ ह्या विनवण्या प्रत्येक ओट्याकडून ऐकू येत.पण हे असे होणारच. ते भाजीवालेही हे आपले रोज फसवून घेणारे गिऱ्हाईक म्हणून अधून मधून मूठभर घेवड्याच्या शेंगा, तीन चार वांगी “राहू द्या, घ्या, आज बक्कळ हैत” म्हणत पिशवीत टाकत.

मोठ्या व्पापाऱ्यांपुढे किंवा कधी जायची पाळी आलीच तर सराफा- सोनाराकडे, तिथे शब्द काढायची हिंमत नसलेले आम्ही गिऱ्हाईक मंडळी आपला धीटपणा भाजीबाजारात दाखवण्याचा प्रयत्न करीत असू. इतकाच सारांश.

असाच काहीसा प्रकार लाकडाच्या वखारीत व्हायचा. मालकाचा विश्वासू नोकर सरपणाची लाकडे, किंवा साली, बंबफोड तागडीत टाकायचा. खंडी भराची वजने बाहेर ठेवायचा. की लाकडांनी भरलेली तागडी खाली यायची. मग आमच्या सारख्या गिऱ्हाईकाला पाहिजे तितक्या भाराची वजने टाकायचा. काटा पूर्ण मागे जाण्या पूर्वीच लाकडाची चौकोनी तागडी सराईत पणे ओतायचाही!
पावसाची वाट शेतकऱ्यांपेक्षा लाकडाची वखारवाले आतुरतेने पाहात. सुक्याबरोबर चार ओलीही वजनात भर टाकता यायची नां!

लेखकाने शक्यतो तोलून मापून लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. पण टीकाकार ‘दीड दांडीचा तराजू वापरून’ लिहिले अशी टीकाही करतील. सध्या न्यायालयांचा तराजूही झुकलेला आहे तिथे माझ्यासारख्या छटाकभर लेखणीच्या लेखकाची काय कथा! वजन मापाच्या तपशीलातील चु. भू. द्यावी घ्यावी!

You can read this blog and additional blogs at: https://sadashiv.kamatkar.com/blog/

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१ किलो = २.२ रत्तल
१ रत्तल = ०.४५ किलो

रत्तल म्हणजे पाऊण्ड दिसतय.

छान लेख.

एकदम 'वजन'दार लेख.

धडाभर -- नवीन माहिती
मी आधी घडाभर वाचलं होतं

>>रत्तल म्हणजे पाऊण्ड दिसतय.<< +१

पाउंडचं रत्तल कसं झालं हे जाणुन घ्यायला आवडेल. (कॉलिंग हीरा Happy ) बाकि लेख मस्तंच. तेलाच्या दुकानांत (घाण्यात?) असणारी ती सिलेंड्रिकल मापं लक्षात आहेत. यानिमित्ताने, कॉलेजमधे बहुतेक फिजिक्स लॅबकरता एक इंस्ट्रुमेंट बॉक्स घेतलेला आठवतोय. त्यात लहान-सहान वजन करण्याची मापं असायची. हवाबंद काचेच्या पेटित फोर्सेपने उचलुन स्केलवर टाकावी लागायची... Proud

छटाकभर नाव लिहीता अन वरती एक किलो टाकता व्हैय?
एखाद्या वस्तूविक्रेत्याप्रमाणे उलट तुम्ही छटाक नाव लिहून १० ग्राम चे वजन दाखवायला हवे होते!!
असो.

लेख भन्नाट झाला आहे. तुम्हाला हा लेख लिहीतांना जुने संदर्भ, अभ्यास करावा लागला असेल हे जाणवतेय.

या लेखात वजनांची जी कानडी नावे आलीत ती स्थानिक, कन्नडपुरती मर्यादीत असावी ना?

मग प्रत्येक प्रांतांची तेथील स्थानिक नावे मापन परिमाणाला असावीत? बरोबर ना?

दुसरे असे की, विक्रेत्यासारखी चलाखी करून लेखाच्या प्रतिसादादखल केवळ "छटाकभर" प्रतिक्रीया देण्याचे ठरले होते, पण उदार दुकानदारासारखी किलोभर प्रतिक्रीया दिली!!!

'रत्तल' हा शब्द जुन्या काळाच्या आधीच्या जुन्या काळी ' रतल' असा लिहिला जात असे. मग जुन्या काळी कधीतरी तो ' रत्तल ' झाला.
मूळ अरबी भाषेत.

खूप सुंदर आढावा आणि माहितीपूर्ण लेख
जुन्या काळी रतनगुंजा सुद्धा सोने मोजण्यासाठी वापरत होते का?
आपल्या नेहमीच्या गुंजा (काळे ठिपकेवाल्या) सोने मोजण्यासाठी वापरताना मी पाहिल्या आहेत.

वा! तुम्हा सर्वांचे वैशिष्ठ्यपूर्ण अभिप्रायआणि लेखाच्या संदर्भाने तुम्ही एकमेकांना दिलेली नविन माहिती वाचून, उत्तम वाचक मिळाल्याचा आनंद मला झाला. तुम्ही दिलेल्या आनंदाबद्दल तुमचे मन:पुर्वक आभार.

— सदाशिव कामतकर

मी आजीच्या तोंडून, पायली, मण, शेर, तोळा, टिपरी, रत्तल, पेरभर,
पासरी वगैरे एकलीत. “ गुंजभर पण सोनं नाही दिलं अंगावर“
“ त्यांच्याकडे काय, पासरीभर आहेत कामाला...” असेही ती म्हणायची.
“छटाकभर सुटत नाही“ वगैरे सुद्धा एकलय.
एक आजोबातर, छाटभर पण अक्कल नाही आणि हुशारी फुकटची.
आणि, रागामध्ये तर मध्ये,” छाटाची नाही पत, नाव गणपत“ असे ते म्हणत.

@ shabdamitra ,

'वजनदार' दुनियेची सफर झकास ! आभार.
उंचापुरा माणूस कापडाच्या दुकानात मोजमापाला नको हे भारी Happy

आमच्या आजीकडे साधारण ५ किलोची 'पायली' धान्य मोजायला होती. शेतमजुरांना काही रोकड + ह्या पायलीने धान्य असे दुहेरी पेमेंट करतांना पाहिलेय.

@ जिद्दु, तुमच्या छापील पुस्तकात दिलेल्या प्रमाणात काहीतरी चुकलेले वाटते आहे.

@ झंपी, 'वजनी' म्हणींचा मोठा संग्रह आहे तुमच्याकडे Happy मराठी / हिंदीत शेकड्यांनी म्हणी या विषयावर असाव्यात Happy

पहिल्यांदाच मायबोलीवर प्रतिक्रिया देत आहे.
यातली काही मापं कुठं कुठं ऐकली होती पण नक्की माहिती नव्हती. फार मस्त लेख.

Pages