अफिम

Submitted by ashish.damle on 22 March, 2008 - 11:13

३ नोव्हेंबर २००७, काबुल, अफगाणिस्तान.
ओफिसमधे हा माझा तिसरा दिवस. कितितरी दिवसांपासून चाललेली तयारी, मनाची घालमेल, अफगाणिस्तान ऎकुन लोकांच्या होणार्र्या नाना तह्रेच्या चोकशा या सगळ्यांनी मिळून एक वादळ केलं होतं. या वादळानन्तरची शांतता मी ईथे या नविन ओफिसमधे अनुभवत होतो. नविन असल्यामुळे तसा कुणाशी फारसा परिचय नव्हता आणि कामही विशेष नव्हतं. स्वतःच्याच विचारांमधे मी व्यस्त झालो होतो.
ईथे येण्यापूर्वी एक विचित्र उत्कंठाही होती आणि एक सूक्ष्मशी भीति. Afterall मला “अफगाणिस्तान”ला जायचं होतं. ऎक असा देश, जिथे गेली ३५ वर्षे युध्दाशिवाय दुसरं काहिही घडत नव्हतं. एक कट्टरपंथी मुस्लिम राष्ट्र म्हणून ओळखला जाणारा देश, तालिबान आणि ऒसामासाठी ओळखला जाणारा देश, अफिमसाठी प्रसिध्द असणारा देश, आंतर-राष्ट्रीय आतंकवादाचे केन्द्र म्हणून बदनाम झालेला देश. हिंसा, असुरक्षितता आणि गरिबीने ग्रासलेला एक देश. अशा देशात लोक-कल्याणाच्या कुठल्या कामासाठी मी जातोय, असा प्रश्न प्रत्येकजण विचारित होता आणि प्रत्येकाच्या विचारण्याचा भाव जणू मी हेवानांच्या देशात आत्मह्त्या करण्यासाठी जात आहे असा होता. कळत-नकळत प्रत्येकजण अस्प्रूश्यतेच्या भिंती उभ्या करत होता, जणू या देशात माणसं रहातच नाहित असा एक द्रूष्टिकोन आपोआपच तयार होत होता… पण माझा निश्चय झाला होता. माझा ठाम विश्वास होता, माणसांवर, माणुसकिवर, जी कुठल्याही जाती-धर्मापेक्षा मोठी होती. लोकांचे प्रश्न आणि त्यांचे हावभाव आठवून मनातल्या मनात मी हसत होतो.
१० वाजले होते. मला निघायला हवं होतं. साडेदहा वाजता Drug Deadiction centre मधे माझी पहिली भेट होती. इथल्या Human Rights Commission चे काम समजून घेण्याच्या कार्यक्रमाचाच तो एक भाग होता. Programme Manager परवेज़ माझ्या बरोबर होता. तसं Deadiction centre फार लांब नव्हतं, पण सेक्युरिटी क्लिअरन्स आणि काबुल ट्राफिकमुळे कधी कधी ४-५ कि.मी.साठीही पाऊण तास प्रवास घडतो हे मी गेल्या दोन दिवसांत अनुभवलं होतं.
गाडीमधे बसल्याबरोबरच गप्पा सुरु झाल्या. दोन विभिन्न देशातले लोक एकत्र आले की तुमच्याकडे-आमच्याकडे असं अगदी स्वभाविकपणे सुरु होतं. परवेज़चं ईंग्रजी तसं मोडकं-तोडकंच होतं, आणि माझं फारसीचं न्यान नसल्यातच जमा. पण तरीही न राहवून त्यानं मला विचारलंच, “सर, तुलसीजी कॆसी हे”. मी जरा चक्रावलोच…
“तुलसीजी, कॊन तुलसीजी?”
“अरे, सर, आप ईंडियन ड्रामा नही देखते? तुलसी, प्रेरणा… हम तो दिवाने हॆ उनके! इन्शाअल्ला, कभी हिंदुस्थान जाना हुआ तो तुलसीजी को मिलनेकी बडी ख्वाईश हॆ”.
या सासु-सुनांच्या मेगा सिरिअल्स बद्दल ऎकलं जरुर होतं, पण इथे अफगणिस्तानमधे असं काही ऎकिवात येईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. परवेज़ सुरुच होता आणि सेंटर येईपर्यंत तो थांबेल असं काही वाटत नव्हतं.
“सर, हमे ईंडिया बहुत पसंद हॆ. हिंदुस्थान ऒर अफगाणिस्तानकी सदियोंसे दोस्ती रही हॆ. हम हिंदुस्थान के बडे शुक्रगुजार हॆ, ये देखिये सर, यह हबिबा स्कुल, अभी दो साल पहलेही हिंदुस्थान के वज़िर-ए-आलमने इसे तोह्फेमें हमे दिया. खरच, स्कुलच्या नावाच्या बोर्डाखाली लिहिले होते, Renovated by Govt. of India. . भारतीय असण्याचा अभिमान काय असतो, हे मला तेव्हा प्रखरतेनं जाणवलं.
अफगाणिस्तानला समुद्र किनारा नाही. ३० वर्षांच्या अराजकतेत उद्योगधंदे जवळ जवळ बंद पडले आहेत. त्यामुळे जिवनावश्यक छोट्या छोट्या गोष्टींसाठीही अफगाणिस्तानची जनता बाहेरच्या जगावर अवलंबून आहे. हे परावलंबीत्व कधी कधी एक विरोधाभासही निर्माण करतं. काबुलच्या खडबडित रस्त्यांवर जगातिल सर्वाधिक महागड्या गाड्या सर्रास दिसतात. लैन्ड क्रुझ्रर, टोयोटा कोरोला, अगदिच सामान्य. मारुती आल्टो, ईंडिका पाह्ण्याची सवय असलेले आपण, काबुल मधे आल्यावर एक अनपेक्षित झटका जरुर अनुभवतो.
ब्रिटिशांनी आपल्यावर १५० वर्षे राज्य केलं. त्यांच्या राजवटीचे छाप आपल्या कायदे व्यवस्थेवर, नागरी सुविधांवर अजुनही दिसतात. त्यामुळेच आपल्याकडील वाह्तुक व्यवस्था ब्रिटिश पध्दतीची आहे. जवळ जवळ सर्वच पूर्व ब्रिटिश वसाहतींमधे अशी ’राईट हैंन्ड साईड’ वाहतुक व्यवस्था आहे. पण अफगाणिस्तान याला अपवाद आहे. अफगाणिस्तान हा ब्रिटिश राजवटीतून मुक्त होणारा पहिला देश. १९१९ मधे अफगाणिस्तान स्वतंत्र झाला. सुरुवातीपासूनच ईथली वाहतूक व्यवस्था ’लेफ्ट हैंन्ड साईड’ होती. ब्रिटीश राजवट त्यात बदल करु शकली नाही. हा अनुभवही आपल्यासारख्या नवप्रवासी भारतीयांसाठी नविनच.
खिडकीबाहेर पाहताना, नाविन्य अनुभवताना, आणि परवेज़कडून वेगवेगळ्या जागांची माहिती करुन घेताना, वाटत होतं, आपण ईथे दोन वर्षे टिकू शकू? पूर्णतः वेगळी संस्क्रुती, अशी संस्क्रुती जिच्याबद्दल सर्वाधिक गैरसमज पूर्ण जगात आहेत. तथाकथित लोकशाही राजवटीत इथे स्त्रियांवर असणारी बंधनं, इस्लामिक राष्ट्राच्या धार्मिक परंपरा, इस्लामिक शिष्टाचार, दाढी – अफगाण पगडी आणि पठाणी वेशात आजुबाजुला दिसणार्र्या या अडदांड लोकांबरोबर आपण जुळवून घेउ शकू? हळू हळू मला कळत होतं की मानवतावादी म्हणवणारे आपण, धर्म आणि धर्मांधतेवर तावातावाने चर्चा करणारे आपण, आपल्याच मनात ही शंकेची पाल चुकचुकावी? म्हणजे कुठेतरी आपल्या मनातही सूक्ष्म भेदभाव आहेच. कुठेतरी मनाच्या कोपय्रात आपणही हिंदू आणि मुस्लिम अशी दुफळी करतोच आहोत. माणसांच्या मनापेक्षा त्यांची राहणी आणि वेशभूषा आपल्याला आकर्षित किंवा अनाकर्षित करते…
स्वतःचं असं स्व-मुल्यांकन चालू असतानाच आम्ही Deadiction Centre च्या गेटपाशी पोहचलो. ओळखपत्र दाखवणे, सुरक्षा तपासणी आदि ऊपचार आटोपल्यानंतर आम्ही सेंटर व्यवस्थापक श्री. नादेरींच्या ओफिस केबिनमध्ये स्थानपन्न झालो. परवेज़नी ओळख करुन दिली. मी भेटीचा उद्देश सांगितला, मला इथे असणार्र्या मुलांशी बोलायचं होतं, कुठल्या परिस्थितीत ही मुलं या विनाशकारी व्यसनाच्या मागे लागली हे समजावून घ्यायचं होतं, किती आणि कुठल्या प्रकारे त्यांच शोषण झालं आहे हे अभ्यासायचं होतं…
नादेरी खुपच चांगल्या स्वभावाचे ग्रूहस्थ. युध्दकाळात लंडनला वस्तव्याला असल्याने शिक्षण आणि इंग्रजी भाषेनी सम्रुध्द. तशी छोटीच अंगकाठी, गोरापान चेहरा आणि घार्र्या डोळ्यांमधे ते अगदी युरोपिअनच वाटत होते.
“ मिस्टर दामले, इथे या मुलांबरोबर काम करताना जाणवतं की जे अत्त्याचार त्यांनी आत्तापर्यंत सोसले आहेत त्यापेक्षा जास्त शोषण इथून बाहेर पडल्यानंतर त्यांचं होतं.” नादेरींचं म्हणणं मला पटत होतं. मी स्वतः अशा मुलांना भारतामधे पाहिलं होतं. पुर्नवसनाची काहीही योजना नसलेल्या या संस्थांमधे वर्षानुवर्षं ही मुलं आपलं आयुष्य जेलमधे असल्यासारखं बंदिस्तं करतात आणि १८ वर्षांचे झाल्यानंतर, जेव्हा त्यांचा हाही निवारा जातो, तेव्हा पुन्हा व्यसन किंवा गुन्हेगारी जग त्यांची वाट पाह्त असतं. समाजाचा उपेक्षितपणा हा भारतमधे काय कींवा भारताबाहेर काय सारखाच आहे.
नादेरी तसे कायद्याचे अभ्यासक. आंतर-राष्ट्रीय कायद्यामध्ये त्यांचं पांडित्य, शिक्षण अणि पुर्वानुभव होता. त्यांनी आंतर-राष्ट्रीय कोर्टात सल्लागार म्हणून ८ वर्षं काम केलं होतं. एवढा अनुभवी माणूस पुन्हा आपल्या देशात परत येऊन एका सेंटरच्या व्यवस्थापनाची जबाबदारी स्वीकारतो, हे पाहून मला थोडं आश्चर्य वाटलं. मी जरा स्पष्टच विचारलं, “नादेरी साहेब, तुम्हाला नाही वाटत की जे काम तुम्ही करत आहात त्यापेक्षा तुमची योग्यता जास्तच आहे म्हणून?” …
“… हा…हा…हा!!” त्यांच्या छोट्या शरीरयष्टीमधे असा धिप्पाड आवाज असेल असं वाटत नव्हतं.
“प्रत्येक नविन माणूस, ओळख झाली की हेच विचारतो, म्हणून हसलो… राग मानून घेऊ नका…हंऽऽऽऽऽ! तुम्ही म्हणताय ते खरं आहे… हा प्रश्न मला बाहेरचेच नाही पण कधी कधी घरचेही करतात. पण खरं सांगू आमच्या सारख्या शिकलेल्या लोकांनिच जर आमच्या देशाला नकारलं तर सर्वस्व गमावलेले कसं स्वीकारतील? आणि प्रत्येक शिकलेला अफगाणी उच्चाधिकारीच होईल; असं कसं शक्य आहे? या देशात रस्त्याच्या सफाईपासून ते राष्ट्राध्यक्षापर्यंत सर्वच कामं महत्वाची आहेत. सर्वानाच एक उन्न्त, प्रगतीशील आणि मानवीय अफगाणिस्तान पहायचा आहे. आणि योग्यतेचं म्हणाल तर योग्यता तुम्ही केलेल्या सकरात्मक बदलानी मिळते. मग तो बदल या मुलांमधेच का नाही? या सेंटरमधेच का नाही? प्रत्येक क्षेत्रात आज सकारात्मक बदल जरुरी आहे, आणि ही बदलाची प्रक्रीया तितकिच आव्हानत्मक आहे. इस्लाम आम्हाला हेच सांगतो.”
मी अगदिच भारावून गेलो होतो. खरंच अशिही माणसं असतात…?
चला तुम्हाला सेंटर दाखवतो असं म्हणत नादेरी उठले. मी आणि परवेज़ त्यांच्या मागे होतोच. सेंटरची ईमारत तशी जुनीच होती, पण डागडुजी केलेली. आतमधे, तीन भाग होते. एका इमारतीत मुलांच्या राहण्याची सोय होती, एका भागात किचन आणि डायनिंग हॊल आणि एक भाग व्यवस्थापन आणि डॊक्टरांसाठी राखीव होता.
“सध्या १६ मुलं आहेत.” नादेरी माहिती देत होते. “तुम्हाला आश्चर्य वाटेल, यातील चारजणांचं वय दहापेक्षाही कमी आहे.” …एवढ्या लहान वयात ही मुलं व्यसनाधीन कशी झाली?....
“कुटुंबापासून दुरावलेली ही मुलं पाकिस्तानच्या सीमारेषेजवळ भटकत राहीली आणि ड्रग माफियांच्या जाळ्यात सापडली. सुरवातीला ड्रग स्मगलिंगसाठी त्यांचा वापर केला गेला आणि नकळतच ही मुलं कधी व्यसनी झाली हे त्यांनाही कळलं नाही… अफू ही जगातील आतंकवादाची आर्थिक ताकद आहे आणि दुर्दैवानी अफगाणिस्तानची भूमी ही अफूची मदिना आहे… आता सरकारने कायद्याने बंदी केली आहे पण अजुनही बराचसा भाग सरकारच्या नियंत्रणाखाली नाही…”
नादेरींकडून बर्र्याचशा गोष्टींचा उलगडा होत होता. अफगाणिस्तानची लढाई ही केवळ धार्मिकतेच्या आधारावर नव्हती, एक छुपं अर्थकारणही त्या मागे होतं. एक विनाशकारी अर्थकारण…
सेंटर पाहून झाल्यानंतर आम्ही मागच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत बसलो. तशी थंडी प्रचंड होती, पण बाहेर बसण्याची मजा जरा निराळीच. बर्फाच्छादित पर्वतराशी, निळेभोर आकाश, पर्वतांवर स्थिरावलेली छोटी छोटी घरं… सगळंच अनोखं होतं. या मोकळ्या जागेत कोपर्र्यात एक छोटीशी खोली होती. सुरक्षाकर्मींची खोली! आतमधे वायरलेस खणखणत होता. बाजुच्या कुंपण भिंतीही २० फुट उंच होत्या. ६-७ अत्त्याधुनिक बंदुकधारी गार्डस आजुबाजुला फिरत होते…हे सगळं पाहून आपण युद्धभूमीत असल्याची आठवण ताजी होत होती…
नादेरींनी सेंटर पर्यवेक्षकाला बोलावलं. “मि. दामले, हा अली. इथेच राहतो आणि मुलांची देखभाल करतो. खुप छान उर्दु बोलतो. मुलांशी बोलण्यात हा तुम्हाला मदत करेल. मला थोडं काम आहे, मी आपली रज़ा घेतो”, असं म्हणून नादेरी आपल्या ओफिसकडे रवाना झाले.
“अली कैसे हो आप? ऒर उर्दु कैसे बोल लेते हो?” … आमचा संवाद सुरु झाला.
“जनाब, ये जंग के दॊरान ह्म पाकिस्तान में थे! बस रहैते रहैते जबान सिख गये! आपभी पाकिस्तानसे हो?”
“नही में हिंदुस्थानी हूं!”
“बहुत खुब! हमें हिंदुस्थानी लोग बहुत पसंद है! ऒर मैं इसिलिए नही कहता कि आप हिंदुस्थानी है! यह तो हमारी बदनसिबी थी जो जंग के दोरान हिंदुस्थानी सफारात (राजदूतावास) यहा थी नही, जो हम पाकिस्तानके मुहाजिर (शरणार्थी) होनेमें मजबूर हो गये! ऎसी कयामत थी साहब जो यहा रहे तो मॊत ऒर वहा जाय तो ख्वॊफनाक दर्द! पाकियोंने ऎसे जुल्म ढायें है हमपर की आप सोच नही सकते!”
हा एक नविनच पैलु मी ऎकत होतो. शरणार्थींवर होणार्र्या अन्यायाच्या कथा मी ऎकुन होतो पण धार्मिक समानता असलेल्या दोन राष्ट्रांमधे अशी स्थिती असेल असं वाटलं नव्ह्तं. या विषयावर तसा मी खोलवर जाणारच होतो. पाकिस्तान आणि ईराणच्या शरणार्थी शिबिरांना माझी भेट भविष्यात होणारच होती…
एक मात्र नक्की, कि माझ्या ’भारतियत्वाच्या’ ओळखीमुळे इथली लोकं खुलत होती, माझ्याशी मनमोकळं बोलत होती.
“अली में कुछ बच्चोंको मिलना चाहता हू! जानना चाहता हू की ये बच्चे कॊनसी ऎसी मजबुरी में ये अफिम के आदि हो गये हॆ!”
“क्यो नही साहब, एक एक बच्चे कि अपनी दास्तान है! आपके फिल्मवाले आये तो हर बच्चे कि दास्तान पर एक फिल्म बनायेंगे! ये देखो साहब, ये सलिम है! वैसे, उम्रका कोई दस्तावेज़ तो नही है इसके पास, लेकिन, डोक्टर कि जांच के मुताबिक ९ साल का बताते है! अभी छे महिनेसे इसका इलाज चल रहा है! लेकिन अभी भी इसको टर्की आती है! पागल हो जाता है!
माझ्या समोर खरच एक ९ वर्षाचा, भुरे केस असणारा, नेपाळ्यांसारखे डोळे असणारा गोरापान मुलगा होता. तो व्यसनाधीन असेल यावर विश्वासच बसत नव्हता.
“सलामवालेकुम” सलीम खालच्या आवाजात मला उद्देशून म्हणाला
“वालेकुम-अस्सलाम बेटा! हमारा नाम आशिष है ऒर हम हिंदुस्थानसे आये है आपको मिलने…क्या आप हमसे दोस्ती करना पसंद करेंगे?”
सलीमला उर्दु समजत नव्हतं…आणि आता अली आमच्यातला दुभाषा होता.
माझ्या प्रश्नावर सलिमने होकारार्थी मान डोलावली…
पुढे काय विचारावं, काय बोलावं, मला काही सुचंत नव्हतं. ज्या वयात मुलं शाळेत दंगा-मस्ती करताना पाहिली होती, ज्या वयात मुलांना मनसोक्त हुंदडताना पाहिलं होतं, अशा वयातल्या मुलांना मी व्यसनाधीनतेबद्दल काय विचारावं?...
काहितरी विचारावं म्हणून मी अलीलाच विचारलं…
“ये बच्चोंका कोई केस फाईल, कुछ रेकार्ड रखते हो?”
“हां हां साब क्यू नही, लेकीन वे दस्तावेज़ ओफिस में है, ऒर नादेरी साब के हुक्म के बिना हम किसिको दे नही सकते.”
या गुप्ततेच्या धोरणाबद्दल ऐकुन मला थोडं बरं वाटलं…
“अली क्या तुम सलीम के बारे में जानते हो?”
हां साब, लेकीन ये भी बोलेगा, आपको पहिली बार देखकर शर्मासा गया है. “
“नही कोई बात नही, सलीम बेटे तुम जाओ…हम आपसे फिर मिलेंगे…अली आपही मुझे बताओ…”
एका नऊ वर्षाच्या मुलाला मला माझ्या कामाचं सब्जेक्ट बनवायचं नव्हतं.
“क्या कहे साब…” असं म्हणत अलीनं सलीमची कहाणी मला सांगितली…
सलीम उत्तर अफगणिस्तानातील फैज़ाबादचा. घरात नऊ भावंडामधे सगळ्यात छोटा. तालिबान काळात झालेल्या हिंसेमधे दोन भावांची हत्त्या झाल्यानंतर वडील सगळ्यांना घेऊन पाकिस्तानमधे शरणागत झाले. तेव्हा सलीमचं वय असेल एक-सव्वा वर्षांचं. घरात गरीबी..उद्योगधंदा नाही…अशात मोलमजुरीसाठी वडील आणि तीन भाऊ पेशावरला गेले. सलीमची अम्मी बाकी भावंडाना घेऊन शरणार्थी शिबिरात होती. एवढ्या छोट्या मुलाला घेऊन कुतुंबाची बाकी जबाबदारी कशी पार पाडावी तिने. तो सतत झोपेत रहवा म्हणून तिने अफूची गोळी द्यायला सुरुवात केली आणि कळत-नकळत हे मुल अफूच्या अधीन झालं. आता त्याचे आई-वडिल परत मायदेशी आले आहेत; पण इतकी वाताहात झाली आहे की, सलीमला परत आपल्यापाशी नेण्याची त्यांची कुवतच नाही. त्यात सलीमची अम्मी कसल्याशा रोगाने आजारी आहे आणि बाप दुसर्र्या लग्नाची तयारी करतो आहे…
हे सगळं ऐकुन माझं मन व्याकुळ झालं.
“ये तो कुछ भी नही साब! ये अजमल देखो…” एक सोळा-सतरा वर्षांचा मुलगा आपल्या जेवणाची थाळी घेऊन चालला होता…
“इसकी बहेन की तलाशमें ये पाकिस्तान की सरहद पहुंचा…”
“बहेन की तलाशमें? क्या हुआ इसकी बहेन को?”…या नंतर अजमलची कथा ऐकुन मी भांबवूनच गेलो.
अजमल मुळ्चा जलालाबाद्चा…जलालाबाद पाकिस्तानच्या सीमारेषे जवळचं शहर… वडिलांचा कपड्याचा व्यवसाय होता. धंद्यामधे कधी कधी कर्ज, उधार घ्यावं लागतच… प्रत्येकवेळी अडि-अडचणीला बैंकेमधे तर जाता येत नाही आणि त्यावेळी बैंका तरी कुठे होत्या फारशा…नव्हत्याच जवळ जवळ…
पाकिस्तानहून माल आणण्यासाठी काही कर्जं अजमलच्या वडिलांनी एका सावकाराकडून घेतलं… त्याचवेळी झालेल्या लढाईत दुकानं जळून राख झाली आणि ते कर्जाची परतफेड करण्याची क्षमता हरवून बसले. शेवटी कर्जाच्या बदल्यात अजमलच्या १० वर्षाच्या बहिणीचं लग्न त्या ५० वर्षाच्या सावकाराशी ठरलं… या प्रथेला इथे बाद म्हणतात. बहिणीचं लग्न झालं तेव्हा अजमल १२-१३ वर्षांचा होता. त्याला हे पटत नव्हतं पण विरोध करण्याचं त्याचं वय तरी कुठे होतं.
लग्नानंतर तो सावकार बहिणीला घेउन पाकिस्तानला गेला. बहिणीचा शोध घ्यावा म्हणून अजमलनी घर सोडलं ख्ररं; पण नकळतच तो या अफूच्या सोदागरांच्या जाळ्यात अडकला आणि व्यसनधीन झाला. आता त्याच्या कुटुंबातील कुणाचाही मागमूस लागत नाही.
मी आचंबित झालो. वडिलांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड एक १० वर्षाची मुलगी आयुष्यभर करणार होती. भारतामधे मुलांच्या बळी देणार्र्या कथा ऐकल्या होत्या. त्या बळी जाणार्र्या मुलांमधे आणि इथल्या ’बाद’ नावाच्या प्रथेला बळी पडणार्र्या मुलांमधे काय फरक होता?
“साब मुझे अगर मेरी बेटी को ’बाद’ देना हो तो मैं उसका गला घोटकर उसे मार डालना बेहतर समझूंगा. रोज रोज के मरनेसे अच्छा है एक दिनका मरना.”
मला कळत होतं अली काय म्हणत होता ते.
अजुन काही ऐकण्याची सहनशक्ती मझ्यात नव्हती… त्या दिवशी मी सेंटरमधेच मुलांबरोबर जेवलो. त्यांनाही खुप आवडलं. मला कशी त्यांची भाषा येत नाही यावर मजा होत होती. कुणी सुनिल दत्त, अमिताभ बच्चन विषयी काही विचारत होतं, तर कुणी हळूच सिगारेट आहे क याची चाचपणी करत होतं.
मी पुन्हा ओफीसकडे जाण्यासाठी निघालो. मला बाहेर निघताना बघताच निवांत झालेले माझे ड्रायव्हर आणि सुरक्षारक्षक आपापल्या बंदुका सरसावून उठले. ’ठक ठक’…त्यांच्या बुटांचे आवाज होत होते. मी गाडीच्या मागच्या सीटवर मधोमध बसलो. दोन्ही बाजूला सुरक्षारक्षक आणि पुढे परवेज़ होता. वायरलेस खणखणत आमची गाडी निघाली…
मला जाणवलं मीही माझं स्वातंत्र्य कुठे ना कुठे हरवून बसलो होतो. कुणितरी केलेल्या युध्दाचा मीही शिकार झालो होतो. मीही ’बाद’ झालो होतो.
काय वाटत असेल अशा मुलीला, जिला तिच्या भावंडानी किंवा वडिलांनी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा सारं जीवन भोगावी लागते… गेलो होतो काही प्रश्नांची उकल करण्यासाठी… पण परत येताना असंख्य प्रश्न मी बरोबर आणले होते…!

गुलमोहर: 

आशिष, तुमचे कामाचे स्वरूप खूप वेगळ्या स्वरुपाचे आहे. अशा क्षेत्रात काम करणारी माणसं फार कमी भेटतात. तुम्ही अफगाणिस्तानला जायचे जे धाडस दाखविले ते खरच प्रशंसणीय आहे. माझ्याकडून तुम्हाला भरपूर शुभेच्छा.

वर दिनेश जसे म्हणालेत त्याप्रमाणे कामाच्या व्यक्तीरिक्त मला खालील गोष्टीदेखील जाणून घ्यायला आवडेल--

तिथला:
१) निसर्ग
२) आहार
३) सणवार
४) सामाजिक जनजीवन
५) साहित्य
६) पर्यटन
७) स्त्री
८) शिक्षण
९) आधुनिक बदल

- बी

सगळ्यांप्रमाणे मी पण सुन्न झालीये हे वाचून.
अफगाणिस्तानचे काही फोटो टाकता येतील का तुम्हाला? अर्थात टाकण्यासारखे असतील तर.

खरंच.. सगळे अनुभव सुन्न करणारेच आहेत.
आपण भारतात जन्माला आलो हे आपलं सुदैवच म्हटलं पाहिजे.

~~~
मन उधाण वार्‍याचे, गूज पावसाचे,
का होते बेभान कसे गहिवरते...

बिचारी ती मुलं! काय आयुष्य आहे. काही सुचेनासं होतं असं वाचलं, ऐकलं की.

फारच सुन्न करणारे अनुभव आहेत एक एक. नॉट विदाऊट माय डॉटरची आठवण झाली. नादेरींसारख्या माणसांबद्दल मात्र कायम आदरच वाटत आला आहे तो असे काही वाचले की द्विगुणीत होतो. कालच दूरदर्शनला डॉ. नरेंद्र जाधवांची मुलाखच चालु होती, त्यात त्यांना एक प्रश्न विचारला की तुम्हाला बाहेरच्या देशात अनेक संध्या असताना इथे येऊन काम करावेसे का वाटले. त्यावरचे त्यांचे उत्तर होते की देशाबाहेर राहुन देश कसा सुधारेल, देश कसा रसातळाला गेलाय हे बोलण्यापेक्षा मी देशात राहुन तो कसा सुधारता येईल हे बघायचे ठरवले. सिस्टीममधे स्वःताला गोवले तरच मला देशाबद्दल बोलायचा अधिकार आहे. काही लोक ऊंटावरुन शेळ्या हाकतात त्यांच्यापुढे डॉ. नरेंद्र जाधवांसारखे लोक म्हणजे खरच आदर्श आहेत.

आशिष तुमच्या कामाला शुभेच्छा व मनःपूर्वक अभिनंदन अशी वेगळी वाट निवडल्याबद्दल. Happy

अतिशय माहीतीपूर्ण आणि ह्र्द्य हेलावून टाकणारे लेख.
तालीबानच्या दुष्ट राजवटीतून अफगाणिस्तानला मुक्त करण्यासाठी अमेरिकेने युद्ध पुकारले. या युद्धाच्या बरया-वाईट परिणामांबद्द्ल वाचायला आवडेल. तिथल्या लोकांची अमेरिकेविषयी काय मतं आहेत? अमेरिका त्यांना खरचं मित्र वाटते का? तेथे पुनर्वसन आणि शांतता प्रस्थापित करण्यात अमेरिकेचा सहभाग किती व कसा आहे?

आषिश,
लेख खुप touching आहे.
वाचताना अन्तर्मुख करणारा...
खरेच ...१ पुस्तक लिहा.

अफगाणिस्तानात परत भयंकर काहीतरी घडतेय आणि पुर्ण जगाने तिकडे पाठ फिरवायचा निर्णय घेतलाय. प्रत्येकजण आपापल्या नागरीकांना सुखरूप परत आणण्यात गुंतलाय. अफगाणी नागरिक कुठे जाणार? तिथल्या स्त्रिया व मुलांबद्दल विचार करुन खुप अस्वस्थ वाटतेय.

काही महिन्यांपुर्वी इस्राईल-पॅलेस्टाईनच्या वादात जगभरातुन जसा इस्राईलचा निषेध केला गेला तो आवाज यावेळी दिसला नाही.

धन्यवाद शांत माणुस. चांगला लेख वाचायला मिळाला तुमच्या कृपेने. जुने धागे कोणी खणुन काढले की रत्ने सापडतात.

आशिष दामले, जमल्यास पुढे लिहीत रहा. बर्‍याच दिवसात तुमचे लेखन नाही असे दिसतेय. ती अल्लाबक्ष वाली कथा पण अपूर्ण आहे.

Pages