३ नोव्हेंबर २००७, काबुल, अफगाणिस्तान.
ओफिसमधे हा माझा तिसरा दिवस. कितितरी दिवसांपासून चाललेली तयारी, मनाची घालमेल, अफगाणिस्तान ऎकुन लोकांच्या होणार्र्या नाना तह्रेच्या चोकशा या सगळ्यांनी मिळून एक वादळ केलं होतं. या वादळानन्तरची शांतता मी ईथे या नविन ओफिसमधे अनुभवत होतो. नविन असल्यामुळे तसा कुणाशी फारसा परिचय नव्हता आणि कामही विशेष नव्हतं. स्वतःच्याच विचारांमधे मी व्यस्त झालो होतो.
ईथे येण्यापूर्वी एक विचित्र उत्कंठाही होती आणि एक सूक्ष्मशी भीति. Afterall मला “अफगाणिस्तान”ला जायचं होतं. ऎक असा देश, जिथे गेली ३५ वर्षे युध्दाशिवाय दुसरं काहिही घडत नव्हतं. एक कट्टरपंथी मुस्लिम राष्ट्र म्हणून ओळखला जाणारा देश, तालिबान आणि ऒसामासाठी ओळखला जाणारा देश, अफिमसाठी प्रसिध्द असणारा देश, आंतर-राष्ट्रीय आतंकवादाचे केन्द्र म्हणून बदनाम झालेला देश. हिंसा, असुरक्षितता आणि गरिबीने ग्रासलेला एक देश. अशा देशात लोक-कल्याणाच्या कुठल्या कामासाठी मी जातोय, असा प्रश्न प्रत्येकजण विचारित होता आणि प्रत्येकाच्या विचारण्याचा भाव जणू मी हेवानांच्या देशात आत्मह्त्या करण्यासाठी जात आहे असा होता. कळत-नकळत प्रत्येकजण अस्प्रूश्यतेच्या भिंती उभ्या करत होता, जणू या देशात माणसं रहातच नाहित असा एक द्रूष्टिकोन आपोआपच तयार होत होता… पण माझा निश्चय झाला होता. माझा ठाम विश्वास होता, माणसांवर, माणुसकिवर, जी कुठल्याही जाती-धर्मापेक्षा मोठी होती. लोकांचे प्रश्न आणि त्यांचे हावभाव आठवून मनातल्या मनात मी हसत होतो.
१० वाजले होते. मला निघायला हवं होतं. साडेदहा वाजता Drug Deadiction centre मधे माझी पहिली भेट होती. इथल्या Human Rights Commission चे काम समजून घेण्याच्या कार्यक्रमाचाच तो एक भाग होता. Programme Manager परवेज़ माझ्या बरोबर होता. तसं Deadiction centre फार लांब नव्हतं, पण सेक्युरिटी क्लिअरन्स आणि काबुल ट्राफिकमुळे कधी कधी ४-५ कि.मी.साठीही पाऊण तास प्रवास घडतो हे मी गेल्या दोन दिवसांत अनुभवलं होतं.
गाडीमधे बसल्याबरोबरच गप्पा सुरु झाल्या. दोन विभिन्न देशातले लोक एकत्र आले की तुमच्याकडे-आमच्याकडे असं अगदी स्वभाविकपणे सुरु होतं. परवेज़चं ईंग्रजी तसं मोडकं-तोडकंच होतं, आणि माझं फारसीचं न्यान नसल्यातच जमा. पण तरीही न राहवून त्यानं मला विचारलंच, “सर, तुलसीजी कॆसी हे”. मी जरा चक्रावलोच…
“तुलसीजी, कॊन तुलसीजी?”
“अरे, सर, आप ईंडियन ड्रामा नही देखते? तुलसी, प्रेरणा… हम तो दिवाने हॆ उनके! इन्शाअल्ला, कभी हिंदुस्थान जाना हुआ तो तुलसीजी को मिलनेकी बडी ख्वाईश हॆ”.
या सासु-सुनांच्या मेगा सिरिअल्स बद्दल ऎकलं जरुर होतं, पण इथे अफगणिस्तानमधे असं काही ऎकिवात येईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. परवेज़ सुरुच होता आणि सेंटर येईपर्यंत तो थांबेल असं काही वाटत नव्हतं.
“सर, हमे ईंडिया बहुत पसंद हॆ. हिंदुस्थान ऒर अफगाणिस्तानकी सदियोंसे दोस्ती रही हॆ. हम हिंदुस्थान के बडे शुक्रगुजार हॆ, ये देखिये सर, यह हबिबा स्कुल, अभी दो साल पहलेही हिंदुस्थान के वज़िर-ए-आलमने इसे तोह्फेमें हमे दिया. खरच, स्कुलच्या नावाच्या बोर्डाखाली लिहिले होते, Renovated by Govt. of India. . भारतीय असण्याचा अभिमान काय असतो, हे मला तेव्हा प्रखरतेनं जाणवलं.
अफगाणिस्तानला समुद्र किनारा नाही. ३० वर्षांच्या अराजकतेत उद्योगधंदे जवळ जवळ बंद पडले आहेत. त्यामुळे जिवनावश्यक छोट्या छोट्या गोष्टींसाठीही अफगाणिस्तानची जनता बाहेरच्या जगावर अवलंबून आहे. हे परावलंबीत्व कधी कधी एक विरोधाभासही निर्माण करतं. काबुलच्या खडबडित रस्त्यांवर जगातिल सर्वाधिक महागड्या गाड्या सर्रास दिसतात. लैन्ड क्रुझ्रर, टोयोटा कोरोला, अगदिच सामान्य. मारुती आल्टो, ईंडिका पाह्ण्याची सवय असलेले आपण, काबुल मधे आल्यावर एक अनपेक्षित झटका जरुर अनुभवतो.
ब्रिटिशांनी आपल्यावर १५० वर्षे राज्य केलं. त्यांच्या राजवटीचे छाप आपल्या कायदे व्यवस्थेवर, नागरी सुविधांवर अजुनही दिसतात. त्यामुळेच आपल्याकडील वाह्तुक व्यवस्था ब्रिटिश पध्दतीची आहे. जवळ जवळ सर्वच पूर्व ब्रिटिश वसाहतींमधे अशी ’राईट हैंन्ड साईड’ वाहतुक व्यवस्था आहे. पण अफगाणिस्तान याला अपवाद आहे. अफगाणिस्तान हा ब्रिटिश राजवटीतून मुक्त होणारा पहिला देश. १९१९ मधे अफगाणिस्तान स्वतंत्र झाला. सुरुवातीपासूनच ईथली वाहतूक व्यवस्था ’लेफ्ट हैंन्ड साईड’ होती. ब्रिटीश राजवट त्यात बदल करु शकली नाही. हा अनुभवही आपल्यासारख्या नवप्रवासी भारतीयांसाठी नविनच.
खिडकीबाहेर पाहताना, नाविन्य अनुभवताना, आणि परवेज़कडून वेगवेगळ्या जागांची माहिती करुन घेताना, वाटत होतं, आपण ईथे दोन वर्षे टिकू शकू? पूर्णतः वेगळी संस्क्रुती, अशी संस्क्रुती जिच्याबद्दल सर्वाधिक गैरसमज पूर्ण जगात आहेत. तथाकथित लोकशाही राजवटीत इथे स्त्रियांवर असणारी बंधनं, इस्लामिक राष्ट्राच्या धार्मिक परंपरा, इस्लामिक शिष्टाचार, दाढी – अफगाण पगडी आणि पठाणी वेशात आजुबाजुला दिसणार्र्या या अडदांड लोकांबरोबर आपण जुळवून घेउ शकू? हळू हळू मला कळत होतं की मानवतावादी म्हणवणारे आपण, धर्म आणि धर्मांधतेवर तावातावाने चर्चा करणारे आपण, आपल्याच मनात ही शंकेची पाल चुकचुकावी? म्हणजे कुठेतरी आपल्या मनातही सूक्ष्म भेदभाव आहेच. कुठेतरी मनाच्या कोपय्रात आपणही हिंदू आणि मुस्लिम अशी दुफळी करतोच आहोत. माणसांच्या मनापेक्षा त्यांची राहणी आणि वेशभूषा आपल्याला आकर्षित किंवा अनाकर्षित करते…
स्वतःचं असं स्व-मुल्यांकन चालू असतानाच आम्ही Deadiction Centre च्या गेटपाशी पोहचलो. ओळखपत्र दाखवणे, सुरक्षा तपासणी आदि ऊपचार आटोपल्यानंतर आम्ही सेंटर व्यवस्थापक श्री. नादेरींच्या ओफिस केबिनमध्ये स्थानपन्न झालो. परवेज़नी ओळख करुन दिली. मी भेटीचा उद्देश सांगितला, मला इथे असणार्र्या मुलांशी बोलायचं होतं, कुठल्या परिस्थितीत ही मुलं या विनाशकारी व्यसनाच्या मागे लागली हे समजावून घ्यायचं होतं, किती आणि कुठल्या प्रकारे त्यांच शोषण झालं आहे हे अभ्यासायचं होतं…
नादेरी खुपच चांगल्या स्वभावाचे ग्रूहस्थ. युध्दकाळात लंडनला वस्तव्याला असल्याने शिक्षण आणि इंग्रजी भाषेनी सम्रुध्द. तशी छोटीच अंगकाठी, गोरापान चेहरा आणि घार्र्या डोळ्यांमधे ते अगदी युरोपिअनच वाटत होते.
“ मिस्टर दामले, इथे या मुलांबरोबर काम करताना जाणवतं की जे अत्त्याचार त्यांनी आत्तापर्यंत सोसले आहेत त्यापेक्षा जास्त शोषण इथून बाहेर पडल्यानंतर त्यांचं होतं.” नादेरींचं म्हणणं मला पटत होतं. मी स्वतः अशा मुलांना भारतामधे पाहिलं होतं. पुर्नवसनाची काहीही योजना नसलेल्या या संस्थांमधे वर्षानुवर्षं ही मुलं आपलं आयुष्य जेलमधे असल्यासारखं बंदिस्तं करतात आणि १८ वर्षांचे झाल्यानंतर, जेव्हा त्यांचा हाही निवारा जातो, तेव्हा पुन्हा व्यसन किंवा गुन्हेगारी जग त्यांची वाट पाह्त असतं. समाजाचा उपेक्षितपणा हा भारतमधे काय कींवा भारताबाहेर काय सारखाच आहे.
नादेरी तसे कायद्याचे अभ्यासक. आंतर-राष्ट्रीय कायद्यामध्ये त्यांचं पांडित्य, शिक्षण अणि पुर्वानुभव होता. त्यांनी आंतर-राष्ट्रीय कोर्टात सल्लागार म्हणून ८ वर्षं काम केलं होतं. एवढा अनुभवी माणूस पुन्हा आपल्या देशात परत येऊन एका सेंटरच्या व्यवस्थापनाची जबाबदारी स्वीकारतो, हे पाहून मला थोडं आश्चर्य वाटलं. मी जरा स्पष्टच विचारलं, “नादेरी साहेब, तुम्हाला नाही वाटत की जे काम तुम्ही करत आहात त्यापेक्षा तुमची योग्यता जास्तच आहे म्हणून?” …
“… हा…हा…हा!!” त्यांच्या छोट्या शरीरयष्टीमधे असा धिप्पाड आवाज असेल असं वाटत नव्हतं.
“प्रत्येक नविन माणूस, ओळख झाली की हेच विचारतो, म्हणून हसलो… राग मानून घेऊ नका…हंऽऽऽऽऽ! तुम्ही म्हणताय ते खरं आहे… हा प्रश्न मला बाहेरचेच नाही पण कधी कधी घरचेही करतात. पण खरं सांगू आमच्या सारख्या शिकलेल्या लोकांनिच जर आमच्या देशाला नकारलं तर सर्वस्व गमावलेले कसं स्वीकारतील? आणि प्रत्येक शिकलेला अफगाणी उच्चाधिकारीच होईल; असं कसं शक्य आहे? या देशात रस्त्याच्या सफाईपासून ते राष्ट्राध्यक्षापर्यंत सर्वच कामं महत्वाची आहेत. सर्वानाच एक उन्न्त, प्रगतीशील आणि मानवीय अफगाणिस्तान पहायचा आहे. आणि योग्यतेचं म्हणाल तर योग्यता तुम्ही केलेल्या सकरात्मक बदलानी मिळते. मग तो बदल या मुलांमधेच का नाही? या सेंटरमधेच का नाही? प्रत्येक क्षेत्रात आज सकारात्मक बदल जरुरी आहे, आणि ही बदलाची प्रक्रीया तितकिच आव्हानत्मक आहे. इस्लाम आम्हाला हेच सांगतो.”
मी अगदिच भारावून गेलो होतो. खरंच अशिही माणसं असतात…?
चला तुम्हाला सेंटर दाखवतो असं म्हणत नादेरी उठले. मी आणि परवेज़ त्यांच्या मागे होतोच. सेंटरची ईमारत तशी जुनीच होती, पण डागडुजी केलेली. आतमधे, तीन भाग होते. एका इमारतीत मुलांच्या राहण्याची सोय होती, एका भागात किचन आणि डायनिंग हॊल आणि एक भाग व्यवस्थापन आणि डॊक्टरांसाठी राखीव होता.
“सध्या १६ मुलं आहेत.” नादेरी माहिती देत होते. “तुम्हाला आश्चर्य वाटेल, यातील चारजणांचं वय दहापेक्षाही कमी आहे.” …एवढ्या लहान वयात ही मुलं व्यसनाधीन कशी झाली?....
“कुटुंबापासून दुरावलेली ही मुलं पाकिस्तानच्या सीमारेषेजवळ भटकत राहीली आणि ड्रग माफियांच्या जाळ्यात सापडली. सुरवातीला ड्रग स्मगलिंगसाठी त्यांचा वापर केला गेला आणि नकळतच ही मुलं कधी व्यसनी झाली हे त्यांनाही कळलं नाही… अफू ही जगातील आतंकवादाची आर्थिक ताकद आहे आणि दुर्दैवानी अफगाणिस्तानची भूमी ही अफूची मदिना आहे… आता सरकारने कायद्याने बंदी केली आहे पण अजुनही बराचसा भाग सरकारच्या नियंत्रणाखाली नाही…”
नादेरींकडून बर्र्याचशा गोष्टींचा उलगडा होत होता. अफगाणिस्तानची लढाई ही केवळ धार्मिकतेच्या आधारावर नव्हती, एक छुपं अर्थकारणही त्या मागे होतं. एक विनाशकारी अर्थकारण…
सेंटर पाहून झाल्यानंतर आम्ही मागच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत बसलो. तशी थंडी प्रचंड होती, पण बाहेर बसण्याची मजा जरा निराळीच. बर्फाच्छादित पर्वतराशी, निळेभोर आकाश, पर्वतांवर स्थिरावलेली छोटी छोटी घरं… सगळंच अनोखं होतं. या मोकळ्या जागेत कोपर्र्यात एक छोटीशी खोली होती. सुरक्षाकर्मींची खोली! आतमधे वायरलेस खणखणत होता. बाजुच्या कुंपण भिंतीही २० फुट उंच होत्या. ६-७ अत्त्याधुनिक बंदुकधारी गार्डस आजुबाजुला फिरत होते…हे सगळं पाहून आपण युद्धभूमीत असल्याची आठवण ताजी होत होती…
नादेरींनी सेंटर पर्यवेक्षकाला बोलावलं. “मि. दामले, हा अली. इथेच राहतो आणि मुलांची देखभाल करतो. खुप छान उर्दु बोलतो. मुलांशी बोलण्यात हा तुम्हाला मदत करेल. मला थोडं काम आहे, मी आपली रज़ा घेतो”, असं म्हणून नादेरी आपल्या ओफिसकडे रवाना झाले.
“अली कैसे हो आप? ऒर उर्दु कैसे बोल लेते हो?” … आमचा संवाद सुरु झाला.
“जनाब, ये जंग के दॊरान ह्म पाकिस्तान में थे! बस रहैते रहैते जबान सिख गये! आपभी पाकिस्तानसे हो?”
“नही में हिंदुस्थानी हूं!”
“बहुत खुब! हमें हिंदुस्थानी लोग बहुत पसंद है! ऒर मैं इसिलिए नही कहता कि आप हिंदुस्थानी है! यह तो हमारी बदनसिबी थी जो जंग के दोरान हिंदुस्थानी सफारात (राजदूतावास) यहा थी नही, जो हम पाकिस्तानके मुहाजिर (शरणार्थी) होनेमें मजबूर हो गये! ऎसी कयामत थी साहब जो यहा रहे तो मॊत ऒर वहा जाय तो ख्वॊफनाक दर्द! पाकियोंने ऎसे जुल्म ढायें है हमपर की आप सोच नही सकते!”
हा एक नविनच पैलु मी ऎकत होतो. शरणार्थींवर होणार्र्या अन्यायाच्या कथा मी ऎकुन होतो पण धार्मिक समानता असलेल्या दोन राष्ट्रांमधे अशी स्थिती असेल असं वाटलं नव्ह्तं. या विषयावर तसा मी खोलवर जाणारच होतो. पाकिस्तान आणि ईराणच्या शरणार्थी शिबिरांना माझी भेट भविष्यात होणारच होती…
एक मात्र नक्की, कि माझ्या ’भारतियत्वाच्या’ ओळखीमुळे इथली लोकं खुलत होती, माझ्याशी मनमोकळं बोलत होती.
“अली में कुछ बच्चोंको मिलना चाहता हू! जानना चाहता हू की ये बच्चे कॊनसी ऎसी मजबुरी में ये अफिम के आदि हो गये हॆ!”
“क्यो नही साहब, एक एक बच्चे कि अपनी दास्तान है! आपके फिल्मवाले आये तो हर बच्चे कि दास्तान पर एक फिल्म बनायेंगे! ये देखो साहब, ये सलिम है! वैसे, उम्रका कोई दस्तावेज़ तो नही है इसके पास, लेकिन, डोक्टर कि जांच के मुताबिक ९ साल का बताते है! अभी छे महिनेसे इसका इलाज चल रहा है! लेकिन अभी भी इसको टर्की आती है! पागल हो जाता है!
माझ्या समोर खरच एक ९ वर्षाचा, भुरे केस असणारा, नेपाळ्यांसारखे डोळे असणारा गोरापान मुलगा होता. तो व्यसनाधीन असेल यावर विश्वासच बसत नव्हता.
“सलामवालेकुम” सलीम खालच्या आवाजात मला उद्देशून म्हणाला
“वालेकुम-अस्सलाम बेटा! हमारा नाम आशिष है ऒर हम हिंदुस्थानसे आये है आपको मिलने…क्या आप हमसे दोस्ती करना पसंद करेंगे?”
सलीमला उर्दु समजत नव्हतं…आणि आता अली आमच्यातला दुभाषा होता.
माझ्या प्रश्नावर सलिमने होकारार्थी मान डोलावली…
पुढे काय विचारावं, काय बोलावं, मला काही सुचंत नव्हतं. ज्या वयात मुलं शाळेत दंगा-मस्ती करताना पाहिली होती, ज्या वयात मुलांना मनसोक्त हुंदडताना पाहिलं होतं, अशा वयातल्या मुलांना मी व्यसनाधीनतेबद्दल काय विचारावं?...
काहितरी विचारावं म्हणून मी अलीलाच विचारलं…
“ये बच्चोंका कोई केस फाईल, कुछ रेकार्ड रखते हो?”
“हां हां साब क्यू नही, लेकीन वे दस्तावेज़ ओफिस में है, ऒर नादेरी साब के हुक्म के बिना हम किसिको दे नही सकते.”
या गुप्ततेच्या धोरणाबद्दल ऐकुन मला थोडं बरं वाटलं…
“अली क्या तुम सलीम के बारे में जानते हो?”
हां साब, लेकीन ये भी बोलेगा, आपको पहिली बार देखकर शर्मासा गया है. “
“नही कोई बात नही, सलीम बेटे तुम जाओ…हम आपसे फिर मिलेंगे…अली आपही मुझे बताओ…”
एका नऊ वर्षाच्या मुलाला मला माझ्या कामाचं सब्जेक्ट बनवायचं नव्हतं.
“क्या कहे साब…” असं म्हणत अलीनं सलीमची कहाणी मला सांगितली…
सलीम उत्तर अफगणिस्तानातील फैज़ाबादचा. घरात नऊ भावंडामधे सगळ्यात छोटा. तालिबान काळात झालेल्या हिंसेमधे दोन भावांची हत्त्या झाल्यानंतर वडील सगळ्यांना घेऊन पाकिस्तानमधे शरणागत झाले. तेव्हा सलीमचं वय असेल एक-सव्वा वर्षांचं. घरात गरीबी..उद्योगधंदा नाही…अशात मोलमजुरीसाठी वडील आणि तीन भाऊ पेशावरला गेले. सलीमची अम्मी बाकी भावंडाना घेऊन शरणार्थी शिबिरात होती. एवढ्या छोट्या मुलाला घेऊन कुतुंबाची बाकी जबाबदारी कशी पार पाडावी तिने. तो सतत झोपेत रहवा म्हणून तिने अफूची गोळी द्यायला सुरुवात केली आणि कळत-नकळत हे मुल अफूच्या अधीन झालं. आता त्याचे आई-वडिल परत मायदेशी आले आहेत; पण इतकी वाताहात झाली आहे की, सलीमला परत आपल्यापाशी नेण्याची त्यांची कुवतच नाही. त्यात सलीमची अम्मी कसल्याशा रोगाने आजारी आहे आणि बाप दुसर्र्या लग्नाची तयारी करतो आहे…
हे सगळं ऐकुन माझं मन व्याकुळ झालं.
“ये तो कुछ भी नही साब! ये अजमल देखो…” एक सोळा-सतरा वर्षांचा मुलगा आपल्या जेवणाची थाळी घेऊन चालला होता…
“इसकी बहेन की तलाशमें ये पाकिस्तान की सरहद पहुंचा…”
“बहेन की तलाशमें? क्या हुआ इसकी बहेन को?”…या नंतर अजमलची कथा ऐकुन मी भांबवूनच गेलो.
अजमल मुळ्चा जलालाबाद्चा…जलालाबाद पाकिस्तानच्या सीमारेषे जवळचं शहर… वडिलांचा कपड्याचा व्यवसाय होता. धंद्यामधे कधी कधी कर्ज, उधार घ्यावं लागतच… प्रत्येकवेळी अडि-अडचणीला बैंकेमधे तर जाता येत नाही आणि त्यावेळी बैंका तरी कुठे होत्या फारशा…नव्हत्याच जवळ जवळ…
पाकिस्तानहून माल आणण्यासाठी काही कर्जं अजमलच्या वडिलांनी एका सावकाराकडून घेतलं… त्याचवेळी झालेल्या लढाईत दुकानं जळून राख झाली आणि ते कर्जाची परतफेड करण्याची क्षमता हरवून बसले. शेवटी कर्जाच्या बदल्यात अजमलच्या १० वर्षाच्या बहिणीचं लग्न त्या ५० वर्षाच्या सावकाराशी ठरलं… या प्रथेला इथे बाद म्हणतात. बहिणीचं लग्न झालं तेव्हा अजमल १२-१३ वर्षांचा होता. त्याला हे पटत नव्हतं पण विरोध करण्याचं त्याचं वय तरी कुठे होतं.
लग्नानंतर तो सावकार बहिणीला घेउन पाकिस्तानला गेला. बहिणीचा शोध घ्यावा म्हणून अजमलनी घर सोडलं ख्ररं; पण नकळतच तो या अफूच्या सोदागरांच्या जाळ्यात अडकला आणि व्यसनधीन झाला. आता त्याच्या कुटुंबातील कुणाचाही मागमूस लागत नाही.
मी आचंबित झालो. वडिलांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड एक १० वर्षाची मुलगी आयुष्यभर करणार होती. भारतामधे मुलांच्या बळी देणार्र्या कथा ऐकल्या होत्या. त्या बळी जाणार्र्या मुलांमधे आणि इथल्या ’बाद’ नावाच्या प्रथेला बळी पडणार्र्या मुलांमधे काय फरक होता?
“साब मुझे अगर मेरी बेटी को ’बाद’ देना हो तो मैं उसका गला घोटकर उसे मार डालना बेहतर समझूंगा. रोज रोज के मरनेसे अच्छा है एक दिनका मरना.”
मला कळत होतं अली काय म्हणत होता ते.
अजुन काही ऐकण्याची सहनशक्ती मझ्यात नव्हती… त्या दिवशी मी सेंटरमधेच मुलांबरोबर जेवलो. त्यांनाही खुप आवडलं. मला कशी त्यांची भाषा येत नाही यावर मजा होत होती. कुणी सुनिल दत्त, अमिताभ बच्चन विषयी काही विचारत होतं, तर कुणी हळूच सिगारेट आहे क याची चाचपणी करत होतं.
मी पुन्हा ओफीसकडे जाण्यासाठी निघालो. मला बाहेर निघताना बघताच निवांत झालेले माझे ड्रायव्हर आणि सुरक्षारक्षक आपापल्या बंदुका सरसावून उठले. ’ठक ठक’…त्यांच्या बुटांचे आवाज होत होते. मी गाडीच्या मागच्या सीटवर मधोमध बसलो. दोन्ही बाजूला सुरक्षारक्षक आणि पुढे परवेज़ होता. वायरलेस खणखणत आमची गाडी निघाली…
मला जाणवलं मीही माझं स्वातंत्र्य कुठे ना कुठे हरवून बसलो होतो. कुणितरी केलेल्या युध्दाचा मीही शिकार झालो होतो. मीही ’बाद’ झालो होतो.
काय वाटत असेल अशा मुलीला, जिला तिच्या भावंडानी किंवा वडिलांनी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा सारं जीवन भोगावी लागते… गेलो होतो काही प्रश्नांची उकल करण्यासाठी… पण परत येताना असंख्य प्रश्न मी बरोबर आणले होते…!
अफिम
Submitted by ashish.damle on 22 March, 2008 - 11:13
गुलमोहर:
शेअर करा
अजून लिहा..
खूप वेगळे अनुभव आहेत तुमचे, सुन्न व्हायला झालं हे सगळं वाचून.
अजून भरपूर काही असेल त्या जगातलं (हो वेगळ जगच म्हणाव लागेल) सांगण्यासारख. अजून नक्की लिहा.
लेख आवडला
खरच सुन्न व्हायला झाल वाचुन. तुमचि भाषा फार ओघवति आहे. पुढे वाचायला आवडेलच पण त्याच बरोबर तुमचि भारतातलि व्यावसायिक पार्श्वभुमि (professional background) आणि या कामासाठि तुमच्या बरोबर आलेल्या सहकार्यांविषयि पण जाणुन घ्यायला आवडेल.
अफगाण ची ओळख
बदलेल्या अफगाण ची माझी ओळख काईट रनर आणि थाउजंड स्प्लेंडीड सन्स मुळे झाली. ते वाचुनच कसलतरी अनामिक दडपण मनावर येत. तुम्ही तर तिथे काम केले. तुमच्या जिद्दीचे कोतुक. श्यामली व रश्मी ला अनुमोदन. तुमच्या कामाचे स्वरुप व अफगाण वर आणखी माहीती वाचायला मिळेल का? तुमचा तेथील परिस्तिथीशी लढा वाचुन आमच्या सारख्यांनाही स्फुर्ती मिळेल.
दाहक वास्तव!
ओघवती शैली आहे तुमची. वाचताना तिथलं वातावरण अनुभवायला मिळालं आणि अंगावर काटा आला. अजून लिहा..
विचार करायला लावणारा ले़ख...
अफगाणिस्थान मधले अनुभव खरच विचार करायला लावणारे आहेत.... गेली कित्येक दशके युद्धात होरपळलेल्या या देशाबद्दल कुठेही वाचले कि वाईट वाटतं.... तुमचे अनुभव वाचताना मला लहानपणी वाचलेल्या अफगाण डायरीची आठवण आली..... तुमच्या कामाबद्दल जाणुन घ्यायला व जमेल तशी थोडीफार तरी मदत करायला आवडेल....
अनुभव
खरंच खूप वेगळे अनुभव आहेत तुमचे. अजून लिहा...... तुमच्या कामाचं स्वरुपही जाणून घ्यायला आवडेल.
जुनं अफगाणिस्तान
आशिष,
अफगाणिस्तान मधे जाण्याचा धाडसी निर्णय घेतल्याबद्दल, अभिनंदन.
आता अफगाणिस्तान बद्दल काहिही वाचताना मनात काहुर उठते. खरेच काय जीवन जगताहेत ते ! पुर्वीची सुबत्ता, मोकळेपणा कुठे गेला ?
एक विनंति आहे, तिथल्या आनंदाच्या क्षणाबद्दल अवश्य लिहा.
अप्रतिम!!
अप्रतिम लेख आशिष!
निळू दामलेंचं अवघड अफगाणिस्तान वाचलय पण मला आठवतय त्याप्रमाणे हा विषय त्यात फारसा नाही. तुझ्या अनुभवाबद्दल वाचायला आवडेल. अरे तू आशिष दामले म्हणजे पुण्याचा का रे? आपटे प्रशालेत होतास? शिवथर घळीत गेलायस कधी?
धन्यवाद
सर्वांच्या मनापासून लिहिलेल्या प्रतिक्रिया / शुभेच्छा बघुन आनंद झाला. एक नवा हुरुप मिळाला. काही जणांना माझ्या कामाचे स्वरुप जाणुन घ्यायचे आहे, आणि काहीजणांना माझ्या बद्द्ल जाणून घ्यायचे आहे. थोडक्यात इथे सांगण्याचा प्रयत्न करतो.
मी मुळचा कोकणातला, राजापुर जवळ सागवे गावाचा. पण शिक्षण पुण्यात झालेले म्हणून खरंतर पुणेकर. सामाजिक कामात मला लहानपणापासून रस होता म्हणून करिअर करण्याचा निर्णय घेतला. शिक्षणामुळे द्रुष्टिकोन बदलला. कल्याणकारी, धर्मादायी कामापेक्षा व्यावसायिक शास्त्रीय पद्धतीचे सामाजिक काम मला जास्त वास्तविक आणि परिणामकारक वाटले. त्या द्रुष्टिने काहि कौशल्य आत्मसात केली. भारतामधे विविध क्षेत्रांमधे काम केले आणि त्या अनुभवाच्या जोरावर इथे संधी मिळाली. इथे खरंतर मी युनायटेड नेशन्स (संयुक्त राष्ट्र्मंडळ) बरोबर काम करतो. इथल्या मानवधिकार कमिशन मधे मि यु.एन. चे प्रतिनिधित्व करतो.
कमिशनचे कौशल्य वर्धन करण्याची माझी प्राथमिक जबाबदारी आहे. मानवाधिकारांचे हनन झालेल्या केसेस चे इन्व्हेस्टिगेशन (तपास) कसे करावे? मुल्य मापन कसे करावे? या संबधीचे प्रशिक्षण मी इथल्या अधिकारी वर्गाला देतो. त्याच बरोबर संयुक्त राष्ट्रांशी झालेल्या अनेक करारांमधे मुलांच्या अधिकारावरही करार झालेला आहे. अशा प्रत्येक करारानंतर त्या संबधी केलेल्या कामाचा व्रुत्तांत त्या त्या देशांच्या सरकारला यु.एन्.ला सुपूर्द करावा लागतो. सरकारी व्रुत्तांत आणि गैर-सरकारी संस्थांकडून आलेल्या व्रुत्तांतावर आधारित सुचना यु.एन. प्रत्येक देशाला करत असते. या सुचनांवर आधरित देशांची अन्तर्गत धोरणे, कायदे बदलत असतात किंवा नविन तयार होत असतात. त्यामुळे यु. एन. रिपोर्टिंग ही अत्यंत महत्वाची प्रक्रीया आहे. युध्दामुळे अफगाणिस्तानने गेल्या दहा वर्षात एकही रिपोर्ट सबमिट केलेला नाही. एक अभ्यासपूर्ण रिपोर्ट लिहिण्याची क्षमता इथे फार कमी आहे. मी मुलांच्या अधिकारावरील कामाचा रिपोर्ट आणि सरकारी कामाची समिक्षा इथे करत आहे. त्यासाठी मला अफगाणिस्तानमधे आणि बाहेर देशात खुप प्रवास करावा लागतो. त्यामुळे एक वेगळा अफगाणिस्तान पहायची संधी मिळते.
आता हे लिखाण कशासाठी?
हे लिखाण तसे म्हणाल तर एक स्वतःशी साधलेला संवाद. अनेक वर्षांपूर्वी बाबांची (अनिल अवचट) पुस्तकं वाचलेली, त्याचा प्रभाव म्हणा किंवा दुसर्यांना माहित नसलेले आपले अनुभव सांगण्याची उत्कटता म्हणा, हे लिखाण कुठल्यातरी आंतरिक ईच्छेचा परीणाम आहे. परन्तु बाबांचे प्रोत्साहन नसते तर हा परिणाम कागदावर उतरला नसता हेही नक्की.
काहितरी वेगळे करण्याची ऊर्मी, बालपणात सोसलेले गरीबीचे चटके, नेमाडे, चित्रे, दया पवार, लक्ष्मण माने आणी ईतर अनेक लेखकांचं समग्र वाचन, १९९२ चा पाहिलेला नर्मदेचा लढा, विस्थापितांशी झालेली चर्चा, अशा अनेक कारणांनी सामाजिक चळवळीत ऊतरलो…सामजिक कार्याचा अभ्यास केला, आणि संस्थात्मक कार्यात कार्यरत झालो… गेल्या १५ वर्षांत विविध स्तरांवर काम करताना खुप काही शिकत गेलो… भारतातील अनेक जागा पाहिल्या, अनेक संस्क्रुती पाहिल्या, अनुभवल्या, तळागाळातील शोषितांचे प्रश्न जाणण्याचा प्रयत्न केला, अनेक प्रतिष्ठित सामाजिक अभ्यासकर्मिंनी केलेल्या कामाचा अभ्यास केला, चळवळींचं संस्थाकरण आणि संस्थांचं राजकारणही पाहिलं…आणि काही नोंदी करत गेलो...
आज आंतर-राष्ट्रीय स्तरावर काम करताना या सगळ्या अनुभवाचे महत्व जाणवते. ईथे आंतर-राष्ट्रीय धोरणांवर होणार्र्या चर्चा, क्षमता वर्धन, आणि विकासाचे आलेख मांडताना कुठेतरी माणूसपण हरवल्यासारखे वाटते. मानवी अधिकारांची होणारी पायमल्ली आणि शोषितांची होणारी उपेक्षा आम्हा तथाकथित प्रोफेशनल म्हणवणार्र्यांसाठी एक केस किंवा सब्जेक्ट म्हणून राहिले आहेत… ज्या संवेदनशीलतेने या कामात ऊतरलो, ती संवेदना शोधण्याचे एक दुःख गेले अनेक दिवस अनुभवत होतो…
अचानक बाबांचं ’कोंडमारा’ हाती आलं, आणि जाणवलं कि मी अगदिच संवेदनशुन्य झालेलो नाही. अजुनहि काबुलच्या झोंबणार्र्य़ा थंडित व्याकुळणारं उघडं मुल पाहिलं कि माझं मन द्रवतं…अजुनही बाद नावच्या अत्याचारी प्रथेला बळी पडणार्र्या नफिसाचे विचार मनाची उलघाल करतात… अजुनही बोटातली अंगठी निघत नाही म्हणून बोटच कापलेल्या खलिफाचे न्यायासाठी झगडणारे शब्दं कानांवर आदळतात… अजुनही नजिब्दुल्लाचा डोळ्यांसमोर मारल्या गेलेल्या मुलांच्या आठवणींनी केलेला आक्रोश मला व्याकुळ करुन जातो.
आक्रंदलेल्या मनावर फुंकर घालणारी काही माणसंही आजुबाजुला दिसतात. ३० वर्षांच्या प्रदीर्घ युद्धानंतर एका देशाचं आशावादी पुनरुथ्थान होताना दिसतं. ईमारती उभ्या होताना दिसतात, बजारातील वर्दळ दिसते… पुन्हा शाळेत जाणार्र्या मुली दिसतात… आणि वाटतं कि आपण एका ईतिहासाचे साक्षिदार होत आहोत. या विचारानिच मी रोमांचित होतो…
कुठेतरी ही साक्ष नोंदवावी आणि स्वतःच्या संवेदनांशी एकरुप व्हावे, एव्ह्ढाच या लेखनाचा उद्देश. मी साहित्यकार नाही, ती माझी पात्रताही नाही. म्हणूनच या लिखाणाला ’रसीक’ मिळतील का, हा विचारच केलेला नाही. हे कुणाच्या आवडीसाठी केलेलं प्रवास-वर्णन नाही.
हे एका युध्दभुमीवर अनुभवलेल्या माणूसकिचं आत्मदर्शन आहे.
तुमच्या सर्वांच्या प्रोत्स्चाहनाबद्द्ल पुन्हा एकदा धन्यवाद!
आपला
आशिष दामले
वरीष्ठ सल्लागार, मानवाधिकार मंच, अफगाणिस्तान
प्रतिभा आणि फिरोझ रानडे
आशिष
प्रतिभा आणि फिरोझ रानडे, या दोघानीही लिहिलेय अफगाणिस्तानाबद्दल, पण ते संदर्भ आता खुपच बदललेत. काबुलीवाला तर इतिहासच म्हणायचा आणि महाभारतातील गांधारीचे माहेर, तर आता कविकल्पनाच वाटेल.
इराण आणि पाकिस्तानाबद्दल वाचायची खुप उत्सुकता आहे.
आशिष, मी देखील राजापूरचाच.
आभार
आशिष,
खूप बरं वाटलं हे वाचून. आधी लेख वाचून तुमचं लेखन भिडणारं आहे हे जाणवतच. पण आताच्या प्रतिक्रियेवरून आणखीही बर्याच गोष्टी स्पष्ट होतात. तुम्ही म्हणता तसं, हे लेखन भावण्याचं कारण त्याचं साहित्यमूल्य नाही तर ज्या प्रामाणिक अनुभवातून ते आलय त्यांची संपन्नता आहे.
भावनोत्कटतेने ह्या सामाजिक प्रश्नांकडे पाहणारे अनेक लोक आहेत. आपल्यापरीने मदत करण्याचा खूपजण प्रयत्नही करतात. पण एकंदरीत गरज पाहता हे सारे खारीचे प्रयत्न ठरतात. त्यांना कमी लेखण्याचा उद्देश नाही. परंतु ही तात्कालिक मदत होते. तुमच्यासारखे मुळावर घाव घालून, अभ्यासपूर्ण मार्गाने परिस्थितीला लढा देणारे द्रष्टे विरळाच. अशा लोकांची खूप खूप गरज आहे.
कृपया इथे सतत लिहीत राहून इतरांना काय करता येईल याबाबत मार्गदर्शन केलेत तर आपले आभार मानावेत तितके थोडे होतील.
काय लिहावं?
प्रतिक्रिया द्यायला शब्द सुचत नाहीत! मन सुन्न होतं. आपल्या नाकर्तेपणाची खंत वाटते.
-मृण्मयी
फारच छान
तुमचं लिखाण आवडलं .. लिहीत रहा....
'परदेसाई' विनय देसाई
मनापासून
मनापासून लिहिलेले मनात जाऊन पोहोचतेय. तुम्ही पुढे लिहित राहा. ....
"ब्र " च्या शेवटी आलेले काही विचार नि तुमच्या वरच्या reply मधील काहि मुद्दे समांतर नि अचूक आहेत.
अतिशय परिणामकारक
अतिशय परिणामकारक लिहिलेय तुम्ही. असलं काही वाचून प्रचंड अस्वस्थ व्हायला होतं !! ते प्रत्यक्ष बघताना अन आपण काहीच मदत करू शकत नाही या जाणीवेने तर काय होत असेल!! तुमचे work profile पहाता तुमचे इतर अनुभव ही असेच वाचनीय असणार यात शंका नाही! लिहीत रहा.
सुन्नं करणारं आहे हे...
वाचून नुस्तं बसून राहिले थोडा वेळ. बातम्यांतून, डॉक्यूमेंट्रीतून बघतो अशा गोष्टी... पण आशिष, तुमच्या लेखाने त्याचं "खरपण" खर्या अर्थाने परत एकदा जाणवून दिलं... तुमच्या शब्दांना केवळ वास्तवतेचा रंग आहे... त्याविना काही नाही... आणि हेच वाचणार्याच्या अगदी आतपर्यंत उतरतं.
वाचून, बघून सुन्नं होणारे आणि कधी जमेल तशी बाहेरून मदत करणारे आम्ही... आणि एक "व्यवसाय" म्हणून त्यात उडी घेतलेले तुम्ही...
तुमच्या कार्यात तुम्हाला पुढे जात रहाण्याचं बळ मिळत राहो... ह्यापरतं काय मागणार?
बापरे!!
वाचताना इतकं सुन्न व्हायला झालं!! असही जग असतं, नाही?? 'बाद' प्रथा तर भयानकच आहे.....
अजूनही लिहा तुमच्या अनुभवांबद्दल...
बाप रे! काय
बाप रे! काय भयानक परिस्थिती आहे. वाचून अंगावर काटा आला.
जबरदस्त!!!!
आशिषजी,
तुम्ही जे काही लिहिलय ते जबरदस्त आहे.
तुमचे अजून अनुभव वाचायला आवडेल.
अजुन वाचायला आवडेल
आशिष,
तुम्ही खुपच परिणामकारक लिहीलय, तुमचे अफगाणिस्तानातील सर्व प्रकारचे (कामातले आणि इतरही) अनुभव वाचायला आवडतील.
सुन्न करणारे
आशिष, तुमच्या लेखनाने ते अनुभव अधिकच सुन्न करणारे झाले आहेत. लिहीत रहावे.
तुमच्या
तुमच्या तिकडे असण्याचा अभिमानही वाटतो, काळजीही वाटते! साम्भाळून असा!
मी आधी एक प्रतिक्रिया लिहिली होती, खालच्या फॉरमॅटिन्गहेल्पवर चूकुन क्लिक झाल्यावर ती वाहून गेली! एनिवे!
सन्स्कारान्चे वेगळेपण मनात उमटणे स्वाभाविक आहे, ते माणसा माणसातल्या वेगळेपणाचे लक्षण आहे, माणुसपणाचे लक्षण आहे, आपले योग्य सन्स्कार जपणे महत्वाचे! हे मी सान्गणे अस्थानी पण कुठे तरी "माणुसकीच्या" भावनेच्या कल्लोळात आपण कोण हे जर स्पष्ट पणे जाणवलेच तर त्याबद्दल अपराधी वाटून घेण्याचे कारण नाही उलट अभिमानच वाटावा!
काही अन्शी तिकडील काही उदाहरणे इकडेही अस्तित्वात हेत असे आठवेल पण प्रमाणाच्या तुलनेत ते अजमावुन बघा अन निराशा टाळा!
तुम्हाला तिथे दोन वर्षे काढायची आहेत हे विसरू नका! तेथिल जे जे चान्गले ते ते हृदयाशी जपा!
इथे एखाददुसरा लेख लिहाल, पण एकुण वास्तव्याची डायरी म्हणा किन्वा अन्यप्रकारे म्हणा लेखन जरुर करा जेणेकरून पुढे मागे त्यावर पुस्तक लिहिले जाईल अर्थात अपेक्षा अशी की आधि मराठीत व नन्तर इतर जागतिक भाषात भाषान्तरीत.......!
अधिक काय लिहू? लहान तोन्डी मोठ्या घासाबद्दल क्षमस्व!
बाकी तुम्ही म्हणले की तुमचे लेखन हे तुमचा स्वतःशीच की कायसा सन्वाद हे.......... आपल्याला बोवा त्यात काय नविन नाय बॉ! तुम्हाला त्यात काय अडचण बिडचण आली तर बिनधास्त माझी "स्वगते" वाचायला यस्जीरोडबीबीवर येत जावा..... कस????
:DDD
भयानक
फारच भयानक स्थिती आहे अफगाणिस्तानची.
तुमच लेखन सुन्न करुन गेल
इथे एखाददुसरा लेख लिहाल, पण एकुण वास्तव्याची डायरी म्हणा किन्वा अन्यप्रकारे म्हणा लेखन जरुर करा जेणेकरून पुढे मागे त्यावर पुस्तक लिहिले जाईल अर्थात अपेक्षा अशी की आधि मराठीत व नन्तर इतर जागतिक भाषात भाषान्तरीत.......!>>> लिंबुला अनुमोदन!
तुमच लेखन सुन्न करुन गेल... इथे तुमचे अनुभव नक्कि लिहा.
मी नक्कीच लिहिन...
अफगाणिस्तानवर जितकं लेखन इंग्रजीमधे किंवा इतर भाषांमधे उपलब्ध आहे, तितके मराठीमधे दुर्दैवाने उपलब्ध नाही... अफगाणिस्तानला जाणून घेण्याची अनेक कारणं आहेत, ऐतिहासिक, राजकिय, सांस्क्रुतिक आणि मानविय... आपण गांधारीच्या माहेर बद्द्ल ऐकलं आहे, गझनीच्या सुलतानाच्या कथा ऐकल्या आहेत, रविन्द्रनाथांचे काबुलीवाला वाचले असेल, किंवा सुभाषचंद्र बोस यांच काबुल मार्गे झालेलं ऐतिहासिक पलायन ऐकलं असेल... अफगाणिस्तानचे असे अस्पष्ट संदर्भ प्रत्येक भरतीयाने कुठे ना कुठे नक्किच हाताळले आहेत.. याशिवाय वर्तमानातील बातम्या, अल्-कायदा, तालिबान यामुळे अफणिस्तानच्या बाबतित एक उत्सुकता साहाजिकच प्रत्येकाच्या मनात आहे. माझ्याही मनात अशिच उत्सुकता होती... म्हणुनच इथे आल्यानंतर रोजिनिशी लिहायला सुरुवत केली. आपण काय पाहिलं, काय अनुभवलं याची एक स्वत: पाशी नोंदणी असावी इतकाच उद्देश. परन्तु जसे जसे हे अनुभव, लोकांशी झालेल्या चर्चा, प्रवास सम्रुध्द होत गेला तसे हे लिखाण केवळ रोजिनिशी न राहता एक शब्दचित्रण होत गेले... आज जेव्हा माझे हस्तलिखित मी पाहतो, तेव्हा या लिखाणाला जडलेले अनेक पैलु दिसतात.. माणुसकीचे, राजकीय, ऐतिहसिक, सांस्क्रुतिक... हे कुणाला तरी सांगावे, असे वाटू लागले. सहज काही मराठी इंटरनेटवर वचायला मिळते का हे पहावे म्हणुन शोध घेत असतांना 'मायबोली'चा हा वैविध्यपूर्ण मंच मला मिळाला... सहज काही सांगावं म्हणून प्रकाशित केलेल्या पहिल्याच लेखाला मिळालेला उदंड प्रतिसाद पाहून खरंच हुरूप आला.
सध्या 'तालिबान काळातील लोकांनि अनुभवलेले अनुभव, त्यानंतर इराणला केलेले पलायन' याविषयीचा लेख टाईप करत आहे. मराठी टायपिंगची सवय नसल्यामुळे वेळ लागतो आहे, त्याशिवाय कामाचा व्याप आणि मर्यादित वेळ पाहता..जरा जास्तच वेळ घेत आहे... पण निश्चितपणे माझे हे अनुभव मायबोलीवर येत राहतील...
या मराठमोळ्या मंचाचे शतशः आभार!
वाचकांच्या प्रोत्साहनासाठी त्यानी व्यक्त केलेल्या काळजीसाठी आणि त्यांच्या सूचनांसाठी अनेक धन्यवाद!
आशिष दामले
वरीष्ठ सल्लागार, मानवाधिकार मंच, अफगाणिस्तान
स्पर्शुन गेला..
सुरेख लिहिण्याची शैली आणि अनुभवी नजरेने लिहिलेला लेख , अजुन लिहित रहा. तुमचे आजुन अनुभव वाचायलाआवडेल
दाहक वास्तव
आशिष , छान व्यक्त केलाय अनुभव तुम्ही !! आवडला !!
दाहक वास्तव
आशिष , छान व्यक्त केलाय अनुभव तुम्ही !! आवडला !!
दाहक
फारच दाहक अनुभव आहेत तिथल्या मुलांचे. मराठीत अस लिखाण फार नाही तरी तुम्ही english मधे ही आवर्जुन लिहाव. मराठी वाचणारा वर्ग हा खुप लहान आहे english वाचकांच्या तुलनेत. इथे US मधे तर परिस्थितीतली तफावत इतकी जाणवते कि कॅम्पस मधे भारतात इलेक्ट्रीसीटी प्रॉब्लेम एवढा आहे तुम्ही लोक कसे राहु शकता वैगरे चर्चा होतात. तेंव्हा म्हणाव वाटत कि खरे प्रॉब्लेम यांना माहीतही नाहीत. शिवाय तरुणवर्गाच पुस्तक घेउन वाचण्याकडे एवढा कल नाही, blog reading मात्र आवर्जुन करतात.
ओघवती शैली आहे, चित्र डोळ्यासमोर उभे रहाते.
बालपण हरवललेली मुलं!
बालपण हरवलेली ही मुलं, ज्यांच्यावर त्यांच्या देशाचं भविष्य अवलंबून आहे, त्यांचं बाल्य जर असं भरडलं जाणार असेल तर मग देशाच्या भविष्यात युद्ध आल्यास त्यात नवल ते काय! काय करता येईल अशा मुलांसाठी?
Pages