रोजच्या वापरासाठी हेअर ड्रायर चांगला की वाईट?

Submitted by ऋन्मेऽऽष on 7 August, 2021 - 19:15

थोडी माहिती हवी आहे.
त्याआधी थोडी माहिती देतो जी समदुखींना उपयोगी ठरू शकते.

मला लहानपणापासूनच केस वाढवायची फार आवड होती. पण तेव्हा शाळा कॉलेजचे नियम आणि घरची बंधने यामुळे फार वाढवता यायचे नाहीत. पुढे ऑफिसला निर्णयस्वातंत्र्य आले तरी कॉर्पोरेटच्या सोफेस्टीकेटेड वातावरणात एचआर लोकांचा फॅशनवर डोळा असायचा. त्यामुळे आवड मनातच राहिली. असेच एक दिवस आपले वय होत टक्कल पडणार आणि लांब केसांची ईच्छा अपुरीच राहणार असे वाटत होते. पण मग एक दिवस कोरोना आला आणि लॉकडाऊन लागला...

वर्क फ्रॉम होम आले. सलून बंद झाले. घरबसल्या केसांचे छप्पर रपारप वाढू लागले. आधी चापून चोपून तेल, मग हेअरबॅंड, मग वेणी, बघता बघता केसांची केस हाताबाहेर गेली.
मोठे केस आवडत तर होते पण सोबत काही प्रॉब्लेमही घेऊन आले. ईतर प्रॉब्लेम तर मी निपटले पण माझा सर्दीचा त्रास मात्र बळावला.

याआधीही जेव्हा मी आंघोळ करून बाहेर यायचो तेव्हा केस कितीही चांगले पुसले तरी जरा वारा लागताच सटासट शिंका यायच्या. कधी चार शिंकांवर निभावले जायचे तर कधी ती सर्दी दिवसभर साथ सोडायची नाही. माझ्याबरोबर कुठेही आंघोळ करून घराबाहेर पडायचे झाल्यास बायकोची पहिली अट हिच असायची की तुझी सर्दी सोबत राहिली तर जाणे कॅन्सल!

मग ती होऊ नये म्हणून आंघोळ केल्यावर केस खचाखचा पुसून मग आतून बाहेरून छान सुकेपर्यंत एका खोलीतला पंखा आणि खिडक्या बंद करून तिथेच बसून राहणे. कारण चुकून उठलो आणि दुसरया खोलीत गेलो तर वाऱ्याची एक झुळूकही सटासट शिंका यायला पुरेशी ठरायची Sad

आता यात केस जितके जास्त तितका हा प्रॉब्लेम मोठा. कारण केस खूप वेळ पुसावे लागतात आणि तरीही लवकर सुकत नाहीत. आतवर ओल राहतेच.
तसेच कधी साबण लाऊन तोंड धुतले तरी त्यात पुढचे निम्मे केस ओले होतात आणि ते ही शिंका येण्यास पुरेसे ठरतात.

पण गेल्या महिन्यात लोणावळ्याला गेलेलो तेव्हा यावर एक सोल्यूशन सापडले. तिथल्या हॉटेलच्या रूमवर बाथरूममध्ये हेअर ड्रायर होते. तोंड धुतल्यावर मी सहज ते वापरले आणि बघता बघता केस सुके सडसडीत! तीन दिवस तिथे होतो, त्यात पाच आंघोळी झाल्या, दहा वेळा तोंड धुणे झाले, दरवेळी न चुकता हेअर ड्रायर वापरला आणि ईतके पाण्यात पावसात भिजून डुंबूनही तीन दिवसात एक शिंक आली असेल तर शप्पथ!

नक्कीच हि कमाल लोणावळ्याच्या वातावरणाची नसून हेअर ड्रायरची होती.
त्यामुळे सध्या डोक्यात विचार घोळत आहे की का नाही एखादा हेअर ड्रायर घरातच बाळगावा.

पण चर्चा आणि चौकशी करता काही जणांनी असे सांगितले की हेअर ड्रायर कधीतरीच वापरावा. रोजच्या वापरासाठी तो नसतो. अन्यथा केस खराब होतात.
आता हे खराब होणे म्हणजे केस गळणे असेल तर बिलकुल नकोय तो हेअर ड्रायर.
रुक्ष होत असतील पण तेल शॅम्पू लाऊन हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असेल तर विचार करता येईल.

पण हि अफवा असेल तर ऊत्तमच.

मग त्या केसमध्ये केसांसाठी घरगुती वापरासाठी कुठला हेअर ड्रायर घ्यावा?
बजेट असे काही ठरवले नाही. जास्त वापर होणार असेल, शिंकांचा त्रास सुटणार असेल, तर चार पैसे जास्त मोजायलाही हरकत नाही.

कोणी या वा ईतर कारणासाठी रोज वा वरचेवर हेअर ड्रायर वापरत असाल तर प्लीज अनुभव शेअर करा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्वच हेर ड्रायरला हॉट/कोल्ड ब्लोअर बटण नसते.
दर आठवड्याला हॉट एर वापरून केसांची नारळाची शेंडी होते. तडतडीत होतात. अगदी कमी वेळात वाळवायची घाई नसेल तर कोल्ड एर ब्लोअर वापरणे योग्य.
किंवा टेबल fan समोर बसणे.

हा हेअर कट हल्ली फॅशनमध्ये आहे काय??????!!! ह्याला पूर्वी फिडो कट म्हणायचे. (म्हणजे इसवीसन पूर्वी नाही जस्ट जरा पूर्वी. जस हल्ली बँग्ज म्हणतात त्याला साधनाकट म्हणायचे.) फिडो कट मध्ये कान ठळक दिसतात. मेंदूला मोड आल्यासारखे मध्यभागी केस. पण आता केलाच आहे तर छान आहे, ठीक आहे.

हेयर ड्रायर वापरू नये कारण तो वापरताना मारेकरी घरात आले तरी कळत नाही.

सीमंतिनी Lol
मलाही सेम प्रॉब्लेम आहे गेली 15वर्षे . म्हणून कायम कमीत कमी केस डोक्यावर राहतील असाच कट करत होते. त्यात जाड केस त्यामुळं तरीही न्हायले की हमखास सर्दी , कधी लगेच जायची कधी 1, 2 दिवस मुक्काम करायची. मी तर 20-20 किंवा कसोटी सर्दी अशीच नावं ठेवलीत.
पण करोना आल्यापासून नो पार्लर व्हिजिट. म्हणून फिलिप्स चा हेअर ड्रायर घेतला. केस 5 मिनिटात छान कोरडे होतात. सर्दी ही होत नाही . पण पण ... दुभंगतात. रुक्ष होतात , जास्त गळतात . हा अनुभव.
अगदीच गरज असेल तर वापरावा. बाहेर पाऊस , लगेच बाहेर पडायचंय. नाहीतर टाळणे च उत्तम असं आता ठरवलंय.

तुमचं हे बरंय पोल घेऊन खरेदी करताय. रुमाल, फ्रीज, ड्रायर... मी फाटकन घेऊन मोकळी झाले. धागा काढून ,विचार विनिमय करायचं डोक्यात च आलं नाही.

शिंकांचा त्रास मला ही होतो व रोजच ओले केस घेउन हपीसल जावे लागते व मेन गेट पासून कडक उन्हे व रूम मध्ये कडक एसी ह्यामुळे रोजच सर्दी होते ओले केस वाळवायला वेळ नसतो. हे फक्त मुंबईकरच समजू शकतील. म्हणून मी पूर्वी ऑफिसात रुम मध्ये हेअर ड्रायर ठेवत असे.

ड्रायरचे लो हीट सेटिंग असते ते वापरायचे व जरा दुरून केस वाळवायचे. म्हणजे केस खराब होत नाहीत. मुंबईत पावसाळ्यात तर ऑफिसात एक स्पेअर कपडे जोड व हेअर् ड्रायर मस्ट आहे. म्हणजे आपला लुक मेंटेन करता येतो.

केसांचे एकूण केअर रेजिमेन बरोबर असेल म्हणजे दर आठव्ड्याला तेल. मसाज, उत्तम आहार असेल तर फार केस डॅमेज होणार नाही.

हाय हीट सेटिंग हे बायकांचे पार्लर मध्ये फॉर्मल हेअर स्टाइल्स केल्या जातात विशेष प्रसंगा साठी तेव्हा वापरले जाते. घरगुती युज ला त्याची
गरज पडत नाही.

दुसरे म्हणजे केसच बारीक कापायचे कृ कट. म्हणजे शावर मधून आल्यावर टावेल ने खसा खसा पुसले की वाळून जातात. पण हा फॅशनीचा प्रश्न आहे.

आमच्या घरी एक प्रोफेशन ल ड्रायर, कर्लर, स्ट्रेटनर हे आहे. ह्या ड्रायरला तीन चार सेटिन्ग व बरोबर काही अ‍ॅटेचमेंट असतात. कर्लर व स्ट्रे टनर अलग अलग चिमट्या सारखी मशिने आहेत.

व ऑफिसात ठेवायला एक बाल ड्रायर आहे. म्हणजे छोटुसा फिलिप्सचा दोनच सेटिन्ग वाला आहे.
मुळात ऑफिसात एक ग्रुमिन्ग किटच आहे. ब्रश पेस्ट मेकप सेट व ड्रायर. टिशूज सर्व महत्वाची मीटिन्ग असली तर व्यवस्थित तयार होउन जायचे.

तीक्षण नाकाचे लोक आजू बाजूला वावरत असतात त्याना अगदी आपण अर्ध्या तासा पूर्वी घेतलेल्या कॉफीचा पण वास सहन होत नाही.
केसांना फार वासाचे तेल लावता येत नाही वीकें ड शिवाय कारण ऑफिसात शांपू तेलाचे वास घेणारे पब्लिक फिरत असे( हाय गेले ते प्री लॉक डाउन दिवस. ) आता हे वर्क फ्रॉम होम करतात.

अमा Lol मस्त प्रतिसाद
केसांना फार वासाचे तेल लावता येत नाही वीकें ड शिवाय कारण ऑफिसात शांपू तेलाचे वास घेणारे पब्लिक फिरत असे( हाय गेले ते प्री लॉक डाउन दिवस. ) आता हे वर्क फ्रॉम होम करतात.>>>>>>>>> हे रिलेट करू शकले. अगदी अगदी झालं.

सी Lol 100Days अअ दृष्य मेंदूला मोड Lol फिडो किती दिवसांनी बघला.

तुमचं हे बरंय पोल घेऊन खरेदी करताय. रुमाल, फ्रीज, ड्रायर...>>>>> वर्णिता अगं ऋन्म्या आहे तो. नाही केलं तर आश्चर्य. :दिवे घे रे दिव्यांची आवस आहे: Proud

रोज डोक्यावरून अंघोळ नाही करायची.
फक्त रविवारी केस धुवायचे आणि हेअर ड्रायर वापरायचा.
हो, हे शक्य आहे.
२०१६ मध्ये मला सायनसायटीस झाला. काही केल्या कमी होत नव्हता. तीन महिने लागले. तर या दरम्यान डॉकने सांगितले रोज केस धुवू नका दोन आठवडे महिन्यातून एकदा धुवा. आणि ड्रायरने लगेच कोरडे करा.
आधी काही दिवस अंघोळ केलीच नाही वगैरे वाटायचे, पण आठ दहा दिवसांत सवय झाली. तेव्हा पासून मी केस आठवड्यातून एकदाच धुतो अजूनही.

'हेअर ड्रायर' असा शब्द इंग्रजीत रोमन लिहिला असता तर मायबोलीच्या बॉटने वाचला असता आणि त्या जाहिराती लेखात आल्या असत्या. बॉट मराठी वाचत नाही. थोड्या दिवसांनी जेवढ्या जाहिराती लेखाला जास्त तेवढे डिजिटल कॉईन्सही मिळतील. मोनेटाइझेशन. तसं तुमचं फालोइंग खूप आहेच.
शुभेच्छा देऊन ठेवतो.

आज मी खूप वर्षांनंतर मायबोलीवर आले. बघते तर इथले वातावरण काहीच बदललेलं नाही. रुन्मेषचे धागेही अजूनही येतच आहेत. सीमंतिनी, 100 डेज चा सीन बघून हहपुवा झाली. Rofl
रिफ्रेश झाले. माबोची जादू!

हेअर ड्रायर कोल्ड वर वापरा, काही परिणाम होत नाही. माझी आजी गेली 45 वर्षे वापरते आहे हेयर ड्रायर आणि केस अजूनही छान आहेत.

मायबोलीच्या बॉटने वाचला असता आणि त्या जाहिराती लेखात आल्या असत्या. बॉट मराठी वाचत नाही.
>>मराठी वेबसाईट वर करतोय काय मग हा bot?

छान प्रतिसाद आलेत. यावरून एक तर कळले की हेअर ड्रायरला हॉट आणि कोल्ड हेअर बटणे आहेत की नाही हे बघून घ्यावे.
कोल्ड एअर म्हणजे नॉर्मल एअर ना, त्याने सर्दी पकडणार नाही ना? जस्ट एक शंका.. कारण फॅनच्या वार्‍याने बँड वाजते

बाकी कोणाला चांगली कंपनी मॉडेल माहीत असेल तर प्लीज सुचवा _/\_

हा हेअर कट हल्ली फॅशनमध्ये आहे काय??????!!! ह्याला पूर्वी फिडो कट म्हणायचे.
>>>>
डिपीतला म्हणत आहात का? पहिल्या लॉकडाऊनंतर ऑफिस सुरू झाले तेव्हा कापलेले केस आहेत ते. त्यावर जाऊ नका. आता पुन्हा वाढत आहेत.

फिडो कट मध्ये कान ठळक दिसतात. मेंदूला मोड आल्यासारखे मध्यभागी केस.
>>>>>>>
कानावरचे केस वाढले की कानाला गुदगुल्या होत ईरीटेट होते. आणि मा पुन्हा लवकर कापावे लागतात. त्यामुळे मी कानावरचे केस कापून घेतो आणि वरचे मोठे राहू देतो. बरेचदा तिथे मशीन मारायला लावतो. त्यामुळे हे असे होते. फार काही कट वगैरे डोक्यात नसते सध्या.

तुमचं हे बरंय पोल घेऊन खरेदी करताय. रुमाल, फ्रीज, ड्रायर... मी फाटकन घेऊन मोकळी झाले. धागा काढून ,विचार विनिमय करायचं डोक्यात च आलं नाही.
>>>>>
वर्णिता, धन्यवाद. धाग्याचा फायदा सर्वांनाचा होतो. अन्यथा उगाच हेअर ड्रायरबद्दल मुद्दाम अशी चर्चा होत नाही. आणि आपण वेड्यासारखे आपल्या मनाने काहीही घेऊन फसतो.

अमा, मी सुद्धा हाफिसात शूज सॉक्सचा वेगळा जोड ठेवतो. आणि ओले कपडे असतील तर ते सुकवायला वॉशरूमधील स्टीमर वापरतो. तसा तो हात सुकवायलाच असतो पण तो डब्बा उचकटून काढायचा आणि अंगावर फिरवायचा. सध्या मात्र ऑफिसने नवा बसवलाय तो फिक्स आहे. आणि हात सुकवायला एका खाचेत घालावे लागतात. त्यामुळे उचकटून बाहेर काढला तरी कपडे सुकवायचे वांधे. असो, सध्या गाडी घर ते ऑफिस थेट असल्याने भिजायचा स्कोप शून्य आहे. फक्त आंघोळीचाच प्रश्न आहे.

रोज डोक्यावरून अंघोळ नाही करायची.
फक्त रविवारी केस धुवायचे आणि हेअर ड्रायर वापरायचा.
>>>>>
हो हे मी करतोच. म्हणजे मागे केस बरेच वाढलेले तेव्हा आठवड्यातून दोनदाच केस धुवायचो. व्हाई शूल्ड गर्ल्स हॅव ऑल द फन Happy
फक्त केसच नाही धुवायचेय तर आंघोळ तरी का करा म्हणून एक दिवसाआड आंघोळही स्किप व्हायला लागली Sad

शॉवर कॅप नावाचा एक प्रकार मिळतो. >>> हो बरेचदा पावसात भिजायला जातो तेव्हा वापरतो हे. बरी आठवण केलीत. हे वापरू शकतो. आंघोळीलाच नाही तर तोंड धुतानाही वापरू शकतो जेणेकरून पुढे कपाळावर रुळणारे केस भिजणार नाहीत. ते सुद्धा फार त्रास देतात.

सीमंतिनी, १०० डेज Proud कुठून आणता असली द्रुष्ये शोधून Proud

सीमंतिनी यांनी अक्खा पिच्चर दिलाय हे कळायला मला फार वेळ लागला, साधारण तीस चाळीस मिनिटे झाली तरी तो व्हिडीओ संपेना...
बरा वाटतोय हा चित्रपट, बघावा लागेल...

Try Dyson hair dryer >>>> बापरे हे गूगल केले तर ऊंचे लोग ऊंची पसंद दिसतेय. २८-३० हजारांचे मॉडेल दिसताहेत. मला वाटलेले ५-६ हजारांपर्यंत माझी गरज भागवणारा मिळेल आणि ईथे धागा काढल्यास कोणीतरी ४-५ हजारांचाही सुचवेल. तीसेक हजार केस सुकवायला जरा जास्तच होतील माझ्यासाठी Happy

पण थँक्स फॉर शेअरींग. याचे फीचर्स बघून बाकीच्यांशी तुलना करता येईल.

शोधाशोध करताना विजय सेल्समध्ये फिलिप्सचेही हेअर ड्रायर दिसले. डायसन २८ हजारांसोबत फिलिप्सचे थेट आणि फक्त २-३ हजारांचेच मॉडेल दिसले. केवढा हा फरक..

Ya it's slightly on higher side.But it's worth in investing into it.
& Plz apply live on cream & heat protection spray before you use hair dryer or any styling tool.

https://www.amazon.in/s?k=hair+dryer&ref=nb_sb_noss इथे बघा स्वस्तातले आहेत. २८-३० हजार खर्चायचे तर त्यात प्रोफेश नल स्टायलिस्ट आठ्वड्यातून एकदा घरी येइल अशी परिस्थिती आहे आता.

अमा, तुमच्या लिंकमध्ये खालील मशीन फक्त १५९ रुपयात आहे. कसे शक्य आहे? साबणाचे बुडबुडे काढायची मशीन यापेक्षा महाग असेल..

Arzet Professional Dryer NV-1290 Hair Dryer With 2 Speed Control For WOMEN and MEN, Electric Foldable Hair Dryer 1000 WATT (Pink and White)

@ मानव, आपला छान दिसत आहे. १० हजार म्हणजे बजेटच्या किंचित वर वाटला बघताक्षणी...
पण मग पुढच्याच क्षणी त्यापुढील डॉलरच्या चिन्हावर नजर पडली. आणि प्रश्न सुटला.
बाकी आहे छान. परीकथेतील वाटतो. सोनेरी केसांची राजकुमारी आणि हिरेजडित हेअर ड्रायर.
तो विकत घेण्यापेक्षा जी बाई तो वापरत असेल तिच्या घरी काम करून पगाराच्या बदल्यात तो वापरायची परवानगी मागता येईल.

अमा, तुमच्या लिंकमध्ये खालील मशीन फक्त १५९ रुपयात आहे. कसे शक्य आहे? साबणाचे बुडबुडे काढायची मशीन यापेक्षा महाग असेल..>> तां
माका काय म्हाइत? जेफ ला विचार.

Pages