इयत्ता पहिली

Submitted by deepak_pawar on 29 July, 2021 - 07:58

चर्चगेट स्टेशनवर आलो तेव्हा दुपारचे दोन वाजले होते. सकाळ-संध्याकाळ माणसांनी तुडुंबलेल्या फलाटावर आता फारशी गर्दी नव्हती. फलाट क्रमांक एक वर उभ्या असणाऱ्या बोरिवली ट्रेननं जावं का? पण नकोच, कारण एकतर ती  जुन्या डब्यांची गाडी, त्यात तिसऱ्या जागेवर बसावं लागलं असतं. गरमीने हैराण होण्यापेक्षा थोडावेळ थांबून खिडकीजवळ बसून मस्त हवा खात जावं. असा विचार करून  रिकाम्या असणाऱ्या बाकावर जाऊन बसलो. खिश्यातून रुमाल काढून चेहऱ्यावरचा घाम पुसला, बॅगेतून पाण्याची बॉटल काढून पाणी प्यालो आणि ट्रेनची वाट पाहत बसून राहिलो. कॉलेज सुटून बराच उशीर झालेला, पण पाठीमागे रेंगाळत राहिलेले विद्यार्थ्यांचे घोळके आता स्टेशनवर येत होते.  माझ्यासारखीच काही माणसं ट्रेनची वाट पाहत बसलेली. पाच-एक मिनिटांनी ट्रेन फलाटावर येत असल्याचं पाहून उभा राहिलो, ट्रेनचा वेग कमी होताच ट्रेन मध्ये चढून धावत जाऊन  खिडकीजवळच्या जागेवर बसलो. आता मस्त झोपून जाता येणार होतं. ट्रेनमध्ये चढल्यावर जरा जास्तच उकडायला लागलं. पंखे चालू होते पण, उन्हामुळे त्यातून गरम वाफा बाहेर पडत होत्या. ट्रेनमध्ये चढल्या चढल्या बरेच जण आपल्या मोबाईलमध्ये हरवून गेले. कुणी वृत्तपत्र वाचू लागले तर कुणी हातातल्या वृत्तपत्राने  हवा घालू  लागले. माझ्यासमोर बसलेला माणूस वृत्तपत्र उघडून वाचू लागला, त्याच्या बाजूला बसलेला दुसरा माणूस सारखा डोकावून डोकावून  बातम्या वाचत होता. पण त्याची पूर्ण बातमी वाचून होईपर्यंत पान उलटलं जात होतं. बातमी अर्धवट वाचायची राहिल्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर नाराजी दाटून येत होती. पलीकडच्या बाकावर एक विद्यार्थ्यांचा घोळका दंगा मस्ती करण्यात गुंतला होता. मनात विचार आला यांचं जग किती सुंदर असतं, स्वप्नानं भारलेलं. वेलीवर नुकत्याच उगवलेल्या कोवळ्या कळ्यांसारखं, ज्यांना अजून वादळ वाऱ्याचा सामना करावा लागलेला नसतो. अजून खऱ्या आयुष्याची ओळख झालेली नसते. कुणाचा चेहरा काळजीने व्यापलेला, कुणाच्या चेहऱ्यावर समाधान तर, कुणी नुसतंच डोळे बंद करून बसलेलं… कोऱ्या चेहऱ्याने. ह्या एका डब्यात अनेक भावभावनांचं मिश्रण भरून राहिलेलं.
            ट्रेन सुरु झाली अन् वाऱ्याची गार झुळूक चेहऱ्याला स्पर्श करून गेली. मी डोळे बंद करून घेतले. क्षणार्धात झोप लागली, जाग आली ती गाण्याच्या कर्कश आवाजाने. मळकी साडी नेसलेली, मळक्या कपड्यात आठ-नऊ महिन्याचं मूल पाठीवर बांधलेली एक बाई हातात असणाऱ्या दगडी चिपळ्यावर ताल धरून भसाड्या आवाजात गाणं गात होती. तिच्या आवाजानं सगळ्यांच्या चेहऱ्यावर वैताग दाटून आलेला. सोबत असणारा दुसरा पाच-सहा वर्षाचा मुलगा प्रत्येक माणसाच्या समोर जाऊन हात पसरत होता. तो समोर आल्यावर बसलेल्या माणसाच्या चेहऱ्यावर तिरस्काराचे भाव उमटत होते, तर कुणी एखादा रुपाया काढून देत होतं. मला तो मुलगा भिकाऱ्यांच्या टोळक्यात नवखा असल्या सारखा वाटला. मी नेहमी ट्रेननं प्रवास करत असल्यानं भीक मागणाऱ्या मुलांचं वागणं चांगलंच समजून आलेलं. एखाद्या माणसाच्या समोर जाऊन भूख लागल्याचा अभिनय करणं, त्याला हात लावून लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणं, असं काहीच तो  करत नव्हता. फक्त एखाद्या समोर जाऊन हात पसरायचा आणि पुढं सरकायचा, त्यामुळे त्याला फारसं कुणी काही देतं नव्हतं. त्याच्या अशा वागण्यावर ती बाई भलतीच चिडल्यासारखी वाटत होती. मुलगा जस जसा पुढं पुढं सरकत होता तस तसा बाईचा आवाज रागाने कापरा होत होता. संपूर्ण डबा फिरून झाला तरी, मुलाला फारशी भीक मिळाली नव्हती. संपूर्ण डबा फिरून झाल्यावर मुलगा बाईजवळ आला,
"साले, तेरे को भीक भी मागंने नहीं आती,"
असं म्हणत तिनं मुलाच्या पाठीत धपाटा मारला, त्या बरोबर  मुलगा रडू लागला, टिपांचे ओघळ त्याच्या गालावरून ओघळू लागले. या एवढ्याशा मुलाच्या डोक्यात केवढं मोठं वादळ घोंगावत असेल याचा पत्ता इथे बसलेल्या माणसांना लागणं शक्य नव्हतं. त्या मुलाला मारलेलं पाहून गर्दीतून कुणीतरी ओरडलं,
“ए बच्चे को क्यू मारती है!"
मुलाला मारलेलं पाहून कुणालातरी वाईट वाटलं होतं. म्हणजे अजून माणुसकी शिल्लक होती तर!  त्या आवाजासरशी  बाईच्या चेहऱ्यावर भीती दाटून आली. आता माटुंगा स्टेशनवर ट्रेन पोहचत होती. मुलगा ट्रेन मधून उतरण्यासाठी घाई करत पुढे जात असलेला पाहून बाईनं मुलाच्या शर्टची कॉलर घट्ट पकडून ठेवली.  चालत्या ट्रेन मधून उतरू पाहणारा मुलगा मला त्यावेळेस "गुन्हेगारीच्या पहिल्या इयत्तेमधून" पळून जाण्याचा प्रयत्न करत असल्यासारखा वाटला. 

Group content visibility: 
Public - accessible to all site users

देवकीजी, सामोजी, वावेजी, हीराजी प्रतिसादाबद्दल खूप खूप धनयवाद.
हीराजी प्र का टा म्हणजे काय?

कदाचित पळवून आणून जबरदस्तीने भीक मागायला लावलं असेल.
>>> मलाही असेच वाटले, कदाचीत कथानायक विचारेल तरी त्या मुलाला असं वाटलेलं

आसाजी अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद...
(कदाचीत कथानायक विचारेल तरी त्या मुलाला असं वाटलेलं)

जेव्हा एखादी गोष्ट लिहिली जाते तेव्हा सगळंच खरं असतं असं नाही, एखादा प्रसंग कुठेतरी पाहिलेला किंवा ऐकलेला असतो, तो डोक्यात घर करून राहतो, त्यात अनेक बदल करून कालांतराने कागदावर उतरवला जातो.

मी बघितलाय असा प्रसंग. खुपच वाईट वाटलेलं मला. दोन लहान मुलं आधी स्टेशनवर भांडत होती त्यातला एक रडत पण होता. पण ट्रेन आली तशी ती दोन्ही मुलं आणि एक मोठा दादा चढले. तो रडणारा मुलगा ही , आपलं रडं थांबवून निमूटपणे ह्यांच्या मागून वाजवत भिक मागू लागला. . इतकं वाईट वाटलं.